अध्याय-१०-भाग-३

         ज्याप्रमाणे जवळ-जवळ असलेले तलाव पाण्याने भरुन वाहु लागल्यावर त्यांचे पाणी एकमेकांत मिसळते अशा स्थितीमध्ये लाटाच लाटांना आश्रयभूत होतात, त्याप्रमाणे  भक्त एके ठिकाणी आल्यावर त्यांच्या आनंदरुपी लाटा एकमेकांत मिसळतात, त्या वेळी ज्ञानच ज्ञानाच्या द्वारा ज्ञानाचे अलंकार मिरवीत असतात, ज्याप्रमाणे सुर्याला सुर्यानेच ओवाळावे, चंद्राला चंद्रानेच आलिंगण द्यावे अथवा समान योग्यतेचे दोन प्रवाह एकमेकांत येऊन मिळावेत, त्याप्रमाणे भक्तांच्या  एकमेकांच्या भेटीमध्ये ब्रम्हैक्यरसाचे प्रयाग झालेले असते, ऐक्यरसाच्या महापुरावर अष्टसात्विक भावाची पुराड  तरंगत असते आणि ते भक्त सुख-संवादरुपी गणेश झालेले असतात. तेव्हा त्या महासुखाच्या आवेशाने जे देहरुपी गावाबाहेर धावत येऊन म्हणजे देहाचे तादात्म टाकून देऊन माझ्या योगाने तृप्त झालेले असतात. त्यामुळे “मी धन्य-धन्य झालो” अशी गर्जना ते करू लागतात. गुरू व शिष्य उपदेश करण्याकरता एकांत स्थळी जावुन एकाक्षराचा “ओम” ब्रम्हतत्वाचा उपदेश करतात, ती अक्षरे भक्तजन त्रैलोक्यामध्ये मेघाप्रमाणे उघ‍डपणाने गर्जना करुन सांगत असतात, ज्याप्रमाणे कमळाची कळी पुर्णपणाने उघडल्यानंतर आपल्यातील सुगंधाची  राजाला आणि गरीबाला आनंदाची मेजवानी देत असते, त्याप्रमाणे  भक्त विश्वामध्ये संचार करुन माझ्या गुणांचे वर्णन करतात, असे करताना त्या भक्तानां परमआनंद प्राप्त होतो, त्यामुळे ते मला विसरुन जातात, परीनामी ते स्वतालाही विसरुन जातात, या अलौकिक प्रेमामुळे सुख प्राप्त झालेल्या भक्तानां दिवस आणि रात्र याचेही भान राहात नाही, अर्जुना ! त्या भक्तानां आम्ही काही द्यावयाचे नसते तर त्यातील उत्तम भाग आम्ही द्यावयाच्या अगोदर त्यांनीच प्राप्त करुन  घेतलेले असतात.                  (ओवी १२१ ते १३०)

             कारण अर्जुना ! ते ज्या मार्गाने माझ्याकडे येण्यासाठी वाटचाल करत असतात त्या मार्गा समोर स्वर्ग व मोक्ष या देखील त्यांना आडवाटा असतात, त्यांनी अंतकरणातुन जे प्रेम धारण केलेले असते ते स्वताच्या प्रयत्नांमुळेच आतचे काम त्यांनीच केलेले असते वरंतु आम्हीच ते त्यानां दिले असे ते जगात प्रसिध्द करत असतात आता यानंतर इतके घडेल की भक्तीच्या आधारे त्यांनी प्राप्त केलेले ते सुख आहे ते जास्तीत जास्त कसे वाढेल आणि काळाची दृष्टी त्यावर पडणार नाही हे आम्हाला पाहावे लागते, अर्जुना ! ज्याप्रमाणे माता आपल्या दृष्टीचे पांघरुन करुन बालक खेळता- खेळता कुठे पडू नये म्हणुन त्याच्या मागे- मागे धावत असते, ते बाळ जो जो खेळ दाखविते तो  खेळ  आई त्याच्यापुढे ठेवते, आईला त्याच्या  खेळाचे सोन्याइतके महत्व वाटत असते, त्याप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार मी वाढवित असतो. उपासनेची स्थिती वाढविल्याने माझे भक्त मला सहजपणे येऊन मिळतात,अशा तऱ्हेने पालन करणे मला विशेष आवडते, अरे भक्ताला माझी अंतकरणापासुन आवड असते आणि त्यांच्या या एकनिष्ठ भावाची मला इच्छा असते, कारण की प्रेमळ भक्ताची आमच्या घरी उणीव असते, सकाम भक्ती करणारांना स्वर्ग व मोक्ष असे दोन मार्ग खुले केले आणि लक्ष्मीसह मी आपले शरीर शेषाच्या स्वाधीन केले परंतु याशिवाय जे परिशुध्द भक्तिप्रेमसुख आहे  ते मात्र केवळ प्रेमळ भक्तांकरिताच मी जतन करुन ठेवले आहे, अर्जुना ! इतके आम्ही प्रेमळ भक्तांना आपल्या जवळ घेत असतो, या गोष्टी शब्दांनी बोलुन दाखवता येत नाहीत भक्त बनुनच त्या तुम्हास अनुभवता येतात. (ओवी १३१ ते १४०)

           म्हणुन मी जो आत्मा, त्याविषयी असलेली ज्ञानभक्तीच ज्यांनी जगण्यासाठी आधार केली आहे आणि ज्यांनी माझ्याशिवाय इतर सर्वही मिथ्या मानले आहे. अर्जुना ! त्या शुध्द अंतकरणाच्या भक्तांसाठी मी तत्वज्ञानरुपी कापराची मशाल तयार करतो आणि मीच मशालजी होऊन त्याच्या पुढे-पुढे चालतो. अज्ञानरुपी रात्रीमध्ये दाट असा काळोख जमलेला असतो त्या रात्रीचा नाश करुन तिला पलीकडे सारतो आणि ज्ञानरुपी सुर्याचा नित्य उदय करतो, असे प्रेमळ भक्तांना अत्यंत प्रिय असणारा, सर्व पुरुषात उत्तम असणारा श्रीकृष्ण जेव्हा बोलला, त्यावेळी “माझ्या मनाच्या सर्व वृत्ती शांत झाल्या” असे अर्जुन म्हणाला. अहो महाराज, ऐका माझ्या मनात निर्माण झालेला संसाररुपी अज्ञानाचा केर तुम्ही उत्तम प्रकारे दुर केला आणि हे प्रभू त्यामुळे आईच्या पोटातलन अग्निकुंडापासुन, म्हणजे जन्म-मरणाच्या चक्रातुन मी मुक्त झालो. अहो आत्मज्ञानामुळे मी आज नवा जन्म डोळयाने प्रत्यक्ष पाहिला आणि माझे जीवित आज माझ्या हाती आले असे मला वाटु लागले, हे प्रभो, आपल्या मुखातुन प्रगटलेली ही ज्ञानभक्ती ऐकुन माझे आयुष्याचे सार्थक झाले, आपली कृपा प्राप्त झाली आणि माझ्या दैवाचे भाग्य उजळले आता या तुझ्या तेजोमय वचनाने माझा अंर्तबाहय अज्ञानरुपी अंधकार नाहीसा झाला म्हणुन तुझे यथार्थ रुप मी पाहु शकलो. तु ब्रम्हा, विष्णु, महेश या तिन्हीं देवांचे अधिदैवत आहेस तुच प्रकृती, महतत्व, अहंकार, पाच सन्मात्रा, पाच महाभुते, दहा इंद्रीये, आणि मन या चोवीस तत्वांहुन वेगळे असे पंचविसावे तत्व आहेस. प्रकृती तिचे कार्य या पलिकडे अलौकिक तेजस्वी प्रकृतीभाव आहेस.  (ओवी १४१ ते  १५० )

           तु अनादिसिध्द असा संपुर्ण विश्वाचा स्वामी आहेस, तुला जन्मादि धर्म नाहीत. तोच तु आहेस हे आता आम्ही जाणले आहे. तुम्ही तीनही काळरुपी यंत्राचे सुत्रधार आहात, आणि संपुर्ण ब्रम्हाडंरुपी कढईचे आधार आहात,  हे मला आता निश्चितपणे समजले आहे. आणखी एका प्रकाराने याच अनुभवाचा थोरपणा कळुन येतो, कारण यापुर्वी महान ऋषींनी याप्रमाणे तुझे वर्णन केलेले आहे. परंतु त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आज माझ्या अंतकरणाला पटत आहेत, परंतु ते सुध्दा आपण कृपा केली म्हणून, एरवी देवर्षी नारद नेहमी आमच्याकडे येत असत आणि ते सुध्दा अशाच आशयाची गाणी गात असत परंतु त्याचा अर्थ आम्हाला कधीच कळाला नाही, तरीही त्यामध्ये अवीट गोडवा असे, आंधळयाच्या गावात सुर्य जरी प्रगटला तरी त्यांना त्याच्या उन्हाचाच अनुभव घेता येईल परंतु सुर्याचा अनुभव कसा बरे घेता येईल? त्याप्रमाणे देवर्षी नारद अध्यात्माच्या गीताचे गायन करीत असले तरी आमचे चित्त त्यातील  मुळत्वास स्पर्श करीत नसे, नारदाप्रमाणे असित व देवल या ऋषीच्या मुखातुन आपल्या स्वरुपाचे वर्णन ऐकले असले तरी आमची बुध्दी विषयविकारांनी व्यापली होती. त्यामुळे परमार्थ हा अमृतासमान असुनही कडू भासत असे आणि विषंय कडू असुनही गोड लागतात, आणखी ऋषींचे काय सांगावे? श्रेष्ठ महर्षी व्यास सुध्दा आपणहुन राजप्रासादी येत असत, आणि तुझ्या विश्वस्वरुपाची थोरवी सांगत असत. (ओवी १५१ ते १६०)

        परंतु अंधारात चितांमणी सापडावा आणि तो हातात घेवुन दगड म्हणुन टाकुन द्यावा, त्याप्रमाणे देवा ! महर्षी व्यासाची वचने म्हणजे चैतन्याच्या खाणी असत परंतु त्यावेळी आपल्या सारख्या सुर्याचा उदय झाला नव्हता, म्हणुन त्याचा अनादर केला. आता तुझ्या वचनरुपी ज्ञानाची सुर्यकिरणे माझ्या हदयात सर्वत्र पसरली आणि ऋषी-मुनीनी जे मार्ग सांगितले होते त्यांची अज्ञानता संपली. मुळातच त्या ऋषीची वचने म्हणजे प्रत्यक्ष ब्रम्हज्ञानाचे बीजच आता ते माझ्या हदयरुपी भुमीवर खोलवर रुजले. आता तर तुझ्या कृपेचा ओलावा आणि तुझ्या ममत्वाची सावली त्या बीजाला मिळाली म्हणुन आज त्या बीजाचा मोठा वृक्ष होऊन त्याला संवादरुपी फळे आली. अहो अनंता !  नारदादिक जे महर्षी आहेत, त्यांच्या उक्तिरुपी नद्यांना मिळण्यासाठी मी संवाद-सुखाचा मोठा सागर झालो आहे, हे प्रभो ! या जन्मामध्ये आणि मागील जन्मामध्ये मी काही उत्तम पुण्य केली, म्हणुन आपणासारखा विश्वरुपी सदगुरु लाभला अन् माझे जीवन कृतार्थ झाले. एरवी थोरा-जाणत्या कडुन तुझे गुणगान एैकत आलो परंतु आपली कृपा नसल्यामुळे ते सारे व्यर्थच होते, आपली गुरूकृपा झाली आणि नारदादिक ऋषी मुनी, महर्षीची श्रवण केलेली वचने त्यांचे अध्ययन याचा ज्ञाता झालो आणि हे सारे खरे आहे याचा अनुभव घेतला. माळी हा अपार कष्ट करुन झाडाला पाणी घालतो, आणि फळाची वाट पहात असतो, परंतु ज्यावेळी वसंत ऋुतूचे आगमन होते त्यावेळी फळाची प्राप्ती होते, अहो ज्यावेळी विषमज्वराला उतार पडतो त्यावेळी गोड पदार्थ गोड लागतात. त्यावेळी शक्ती वाढवण्यासाठी घेतलेली औष‍धे परीनामकारक होतात. (ओवी १६१ ते १७०)

         अथवा इंद्रिये, वाचा आणि प्राण यामध्ये जेव्हा चैतन्याचा संचार होतो तेव्हा त्यांचे सार्थक होते. त्याप्रमाणे वेद, शास्त्र, पुरांणाचा अभ्यास अथवा योगाची साधना करुनही ती उपयोगी पडत नाहीत पण जेव्हा सदगुरुंची कृपा प्राप्त होते, तेव्हाच ती साधने उपयोगी पडतात. याप्रमाणे अर्जुन हा प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आत्मविश्वासाने व दृढनिश्चयाच्या संतोषाने नाचू लागला, तसेच तो देवाला म्हणाला, तुझी वचने मला प्रत्ययास येवु लागली. तरी हे कैवल्यदाता श्रीकृष्णा, मला खरोखर असे समजुन आले आहे की तू देव-दानवांच्या बुध्दीच्या पलीकडचा आहेस, हे देवा ! तुला शरण आल्याशिवाय खरे ज्ञान प्राप्त होत नाही हे मला खात्री पुर्वक पटले आहे. ज्याप्रमाणे आकाशाची विशालता आकाशालाच समजते, पृथ्वीचे घनस्वरुप पृथ्वीच जाणते, त्याप्रमाणे हे लक्ष्मीपते! तूच आपल्या सर्व शक्तीमय प्रभावाला जाणू शकतोस, इतर वेद, शास्त्र, पुराणे अथवा विद्वान आपल्या बुध्दीचे महत्व उगीचच मिरवीत असतात, पळण्याच्या शर्यतीत मनाला कसे बरे मागे  टाकावे?  वाऱ्याला हाताने कसे बरे मोजावे? आपल्या बाहुंच्या बळावर मायानदीतुन कसे बरे पार जावे?  त्याप्रमाणे तुझे ज्ञान प्राप्त करुन घेणे, अशक्य आहे, ते कोणालाही प्राप्त होत नाही, तुझे ज्ञान तुच जाणु शकतोस, हे देवा ! तुच आपल्या स्वरुपाला जाणतोस आणि इतरानां ते सांगण्यास तुच समर्थ आहेस. ‍तरी आता माझ्या आर्त इच्छेच्या कपाळावरचा घाम पुस. (ओवी १७१ ते १८०)

          हे सर्व प्राणिमात्रांची उत्पत्ती करणाऱ्या परमेश्वरा, त्रिभुवनरुपी हत्तीचे विदारण करणाऱ्या सिंहा, सर्व देवतांना अर्चन करण्यास योग्य असणाऱ्या देवा !  जगाच्या स्वामी हे ऐकले का?  आम्ही तुझ्या स्वरुपाचे श्रेष्ठत्व पाहत आहोत, ते पाहुन असे वाटते की तुझ्याजवळ उभे राहण्याचीही आमची योग्यता नाही. अशा दीन अवस्थेमध्ये आम्ही तुला विनंती करण्यास भ्यालो तर तुझे रुप जाणण्यास दुसरा कोणताही उपाय नाही.सर्वत्र नद्या व समुद्र तुडूबं भरलेले असले तरी चातकाला ते कोरडे ठणठणीत वाटतात, कारण ज्या वेळी मेघातुन एक लहानसा थेबं पडतो, त्यावेळीच त्याला तहान भागवणाऱ्या पाण्याची प्राप्ती होते. त्याप्रमाणे  हे श्रीकृष्णा, जगात जरी सर्वत्र गुरूं असले तरी आम्हाला तुझ्याशिवाय दुसरा गुरु नाही हे असो, आता मला आपण आपल्या “विभुती”चे वर्णन करावे. सर्व विश्व आपल्या विभुती आहेत हे खरे आहे परंतु आपल्या दिव्य शक्तीने व्यापलेल्या विशेष प्रकारच्या विभुती आहेत, त्याचे मला दर्शन द्यावे, हे अनंता !  तू त्रैलोक्याला व्यापुन त्याच्यही पलीकडे अतिविशाल आहेस तरीही त्यातील प्रमुख नामंकीत विभूती सांगा.मी तुला कसे बरे जाणावे? तुला जाणून घेण्यासाठी कशाचे सदैव चितंन करावे? विश्वाच्या लिला तुच आहेस म्हणावे तर तुझे चितंन होणार नाही, हे देवा यापुर्वी आपण आपले विभुती स्वरुप थोडक्यात सांगितले आहे एक वेळ तेच पुन्हा विस्तारपुर्वक सांगावे. ज्या ज्या  विभुतीच्या ठिकाणी आपण आहात असे समजुन चितंन केले असता श्रम पडणार नाहीत तो आपला ऐश्वर्ययोग स्पष्ट सांगावा.हे सर्व भुतांच्या ईश्वरा ! ज्या विभूती मी विचारल्या आहेत त्याही मला सांगाव्यात,त्याच विभूती पुन: पुन: काय सांगाव्या असे आपण म्हणाल. (ओवी १८१ ते १९०)

पुढील भाग