अध्याय १४ भाग २

 तेव्हा अर्जुनाची अशी स्थिती झाली की, त्याच्या सर्व अवयवांच्या ठिकाणी श्रवण करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि तो केवळ अवधानाची मुर्ती बनला, आपण सांगत असलेले ज्ञान आकाशासही आवरले जाणार नाही, ते अर्जुन धारण करत आहे, हे पाहुन देवालीही प्रेमाचे भरते आले, देव म्हणाले, अर्जुना !  माझ्या वक्तर्त्वरुपी कन्येला तु बुध्दीरुपी वर लाभलास त्यामुळे ती आज उजवली, मी सांगितलेल्या आत्मज्ञानास तु उत्तम श्रोता लाभला आहेस.तरी मी एक असुनही त्रिगुणरुपी पारध्याकडुन अनेक देहाच्या पाशांत कोणत्या प्रकाराने बांधला जातो, व मायेच्या उपाधीने हे जग कसे उत्पन्न होते ते सांगतो, त्याचे श्रवण कर. माझ्या संगरुप बीजापासुन प्राणीमात्र निर्माण होतात या कारणामुळे प्रकृतीला क्षेत्र असे म्हटले जाते. ही माया महद् तत्व, अहंकार, पचंतन्मात्रा, पंचभुते या सर्वाची विश्रांती घेण्याची अर्थात प्रलयकालामध्ये लीन होण्याची विशाल धर्म शाळा आहे, अर्जुना !  हिच्या योगाने विकार व गुण हे वाढत जातात म्हणुन हिला महद् ब्रम्ह म्हटले आहे.अव्यक्त मतवाद्यांच्या मते हिला अव्यक्त असे म्हणतात आणि सांख्यमतवादी हिला प्रकृती असे म्हणतात. हे बुध्दीवंताच्या राजा अर्जुना ! वेदान्ती हिला माया असे म्हणतात असो हे किती वर्णन करावे ?  अज्ञान जे ते हेच होय. (ओवी ६१ ते ७० )

             हे धंनजया !  आपल्या आत्मस्वरुपाचा आपणास जो विसर पडतो तेच हया अज्ञानाचे रुप होय. या अज्ञानाचे आणखी एक लक्षण असे आहे की, आत्मस्वरुपाचा विचार केला तर ते दिसत नाही, ज्याप्रमाणे हातात दिवा घेवुन अंधकार शोधु लागलो तर तो दिसत नाही. ज्याप्रमाणे दुध निश्चळ असताना दुधाची साय दिसते व दुध ढवळले असता ती दिसत नाही. जिच्यामध्ये जागेपणा नाही व स्वप्न नाही अथवा स्वरुपस्थितीही नाही. अशी गाढ सुषुप्ती जशी असते. अथवा वायुला उत्पन्न न करता आकाश जसे निष्फळ व रिकामे असते, ‍त्याप्रमाणे हे खरोखर अज्ञान होय. पलीकडे दिसतो तो वेडावाकडा खांब आहे की पुरूष आहे असा एक निश्चय होत नाही, काय भास आहे, हे कळत नाही, परंतु दिसते मात्र खरे.‍त्याप्रमाणे आत्मस्वरुप खरोखर दिसत नाही आणि दुसरी वस्तु आहे,असाही निश्चय होत नाही. ज्या वेळी रात्र नाही आणि दिवसही नाही, दोघाच्यां संधिकालात सांजवेळ जशी असते, त्याप्रमाणे ज्या अवस्थेत विपरीत ज्ञान नसते अथवा आत्मस्वरुपाचे ज्ञान नसते, अशी जी कोणती एक अवस्था तिला अज्ञान म्हणतात, ज्या अज्ञानाने ज्ञानप्रकाश  आवृत्त केलेला आहे त्याला क्षेत्रज्ञ हे नाव आहे. आपले आत्मस्वरुप न जाणता जे अज्ञान वाढते, ते जीवात्म्याचे रुप आहे.     (ओवी ७१ ते ८० )

          हाच तो क्षेत्र-अज्ञात आणि क्षेत्रज्ञ जीव या दोघांचा संबंध आहे. हे अर्जुना, हे उत्तम प्रकारे समजुन घे. ती ब्रम्हचैतन्याची सामान्य सत्ता जीवस्वरुपान असल्यामुळे अज्ञानाचा व जीवाचा संबंध असतो. याप्रमाणे मायेच्या अनुरोधाने जीव हा आत्मस्वरुपाला विसरून अनेक देह धारण करतो, स्वताला तो किती स्वरुपानी पाहतो हे कळत नाही ज्याप्रमाणे एखाद्या दरिद्री मनुष्यास भ्रम झाला असता, तो रस्त्याने चालताना म्हणतो ” बाजुला व्हा आमची राजाची स्वारी आली आहे.”  अथवा मूर्च्छित झालेला मनुष्य स्वर्ग पाहुन आलो आहे असे म्हणतो, त्याप्रमाणे ब्रम्हस्वरुप पासुन दृष्टीचलित झाली असता जी जी कल्पना उत्पन्न होते तिला सृष्टी असे म्हणतात. ती माझ्यापासुनच उत्पन्न होते. ज्याप्रमाणे एकटा मनुष्य झोपला असता स्वप्नाच्या भ्रमाने स्वताला अनेक रुपांनी पाहतो, तीच स्थिती जीवात्म्याला आत्मस्वरुपाचे ज्ञान नसल्याने प्राप्त होते. तीच गोष्ट तुला दुसऱ्या प्रकाराने उघड करुन सांगतो, मी सृष्टीला प्रसवतो, वगैरे हे सर्व स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे हे तु विसरू नकोस माझी ही प्रकृतीरुपी पत्नी अनादि आहे तरुण आहे आणि तिच्यातील गुणसांगता येत नाहीत सात्विक, राजस व तामस गुणांनी ती संपन्न आहे तिचे नाव अविद्या आहे ही वस्तुता नाही हेच तिचे रुप आहे, तिच्या राहण्याचे स्थान अतिविशाल आहे ती अज्ञानाच्या जवळ असते आणि आत्मज्ञानी माणसापासुन दुर पळते, मी झोपलो असता ती जागृत असते स्वरुपज्ञानाच्या गैरहजेरीत अविद्येचे सर्व व्यवहार सुरू असतात माझ्या सत्तेचा आश्रय घेवुन ती आपल्या पोटामध्ये ब्रम्हांड साठवुन ठेवते, ही माझी प्रकृतीरुपी पत्नी महद ब्रम्ह नावाच्या पोटामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, मन, बुध्दी व अहंकार या आठ विकार-स्वरुप गर्भाची वाढ करते. (ओवी ८१ ते ९०)

         माझ्या व मायेच्या संगतीत प्रथम बुध्दीतत्व जन्माला येते ते बुध्दीतत्व सुक्ष्म रजोगुणाने भारले गेले म्हणजे सृष्टीसंकल्पात्मक मन तयार होते मनाची तरुण स्त्री ममता हिच्यापासुन अहंकार उत्पन्न होतो पुढे त्या अहंकारापासुन पंचमहाभूतांची उत्पत्ती होते, विषय व इंद्रिये यांचा स्वभावताच पंचमहाभुताशी संबंध असल्यामुळे विषय व इंद्रिये ही देखील त्या भूतांबरोबर आकारास येतात, विकारात पंचीकरणाचा क्षोभ झाल्यानंतर अव्यक्त त्रिगुणांचे स्वरुप व्यक्त होवुन उभे राहते, त्यायोगे जशी वासना होते, त्याप्रमाणे जीव हा जागोजागी जन्म घेतो, ज्याप्रमाणे जमिनीत असलेले बीज व पाण्याचा संयोग होताक्षणीच भावी काळात होणाऱ्या वृक्षाचा सुक्ष्म आकार अगोदरच धारणकरुन ठेवलेला असतो.त्याप्रमाणे माझ्या संगतीने अविद्या नामक प्रकृती विविध प्रकारच्या जगाच्या रुपाने अणकुचीदार अंकुर घेवु लागते, हे सज्जनांच्या राजा अर्जुना,   मग त्या गर्भगोलाला जुने रुप येते, ज्याचा विस्तार कसा होतो हे सांगतो, त्याचे श्रवण कर, त्या गर्भाला अंडज, स्वेदज, उद्भिज्ज आणि जरायुज असे चार प्रकारचे अवयव स्वभावताच उमटतात, आकाश आणि वायु यांच्या संबंधाने गर्भाला पोषक असा रस वाढु लागला की तो अंडज नावाचा अवयव श्वासोच्छवास करु लागतो त्यात जिवंतपणा येवुन त्याचे स्पंदन सुरू रहाते, तमोगुण व रजोगुण यांना पोटात घालुन पाणी आणि तेज यांचे अधिक्य झाले असता स्वेदज हा अवयव उत्पन्न होतो. (ओवी ९१ ते १००)

           पंचमहाभुते ही सर्वही आपसांत सहाय्य करतात आणि मन,बुध्दी, अहंकार, आदि ज्ञानसाधने ही सर्व जरायुजाच्या उत्पत्तीला कारण आहेत असे जाण. याप्रमाणे हे चार अवयव जगद् रुपी गर्भाचे दोन हात आणि दोन पाय आहेत आणि अष्टधा प्रकृती हे ज्याचे शीर आहे सकाम कर्माकडे प्रवृत्ती हे त्या गर्भाचे वाढलेले पोट आहे आणि सकाम कर्मापासुन निवृत्ती ही त्याची पाठ आहे आणि इंद्रादी देवयोनी कंबर, छाती, मान, कपाळ, दोन डोळे, दोन कान, ही आठ अंगे आहेत. उल्हासित स्वर्गलोक हा कंठ, मृत्यूलोक हा मध्यभाग व पाताळलोक हा कमरेखालचा मांसल भाग होय.असे हे जगदरुपी लेकरु या मायेस झाले तिन्ही लोकांचा विस्तार हे या लेकरांचे बाळसे होय. चौऱ्यांशी लक्ष योनी ही त्या लेकरांच्या शरीराची हाडे, बोटाची पेरे आणि सांधे आहेत. हे लेकरु प्रत्येक दिवशी वाढत चालले आहे माझी माया ही गृहिणी त्या लेकराच्या देहाच्या अवयवांवर विविध प्रकारचे नामरुपांचे अलंकार घालते आणि त्याला मोहरुपी स्तनांतील नित्यनवीन दुध पाजते, वेगवेगळया प्रकारची सृष्टी ही त्या बाळाच्या हाता-पायांची बोटे आहेत, प्रत्येक योनील असणारे विविध अभिमान हया त्या बोटात घातलेल्या आंगठया आहेत, असे हे विश्वरुपी लेकरु अज्ञानरुपी प्रकृतीस झाल्यावर आपण अतिभाग्यवान आहोत असे तिला वाटु लागते. (ओवी १०१ ते ११०)

         ब्रम्हदेव हा त्या बाळाचा प्रातकाळ आहे विष्णू त्याचा माध्यान-काळ आहे आणि सदाशिव हा स्थितीकाळातील त्या बाळाचा सांयकाळ आहे. हे बाळ स्थितीकाळामध्ये अनंत घडामोडीचा खेळ खेळुन-खेळून दमले म्हणजे महाप्रलयाच्या अंथरुणावर शांत झोपी जाते, आणि कल्पाचा उदय झाला असता भेदज्ञानाने जागे होते, अर्जुना ! याप्रमाणे हे बालक मिथ्या दृष्टीच्या घरात कृत,त्रेता,द्वापार आणि कली या चार युगांच्या अनुक्रमांची पावले कौतुकाने पुढे-पुढे टाकत जाते.विविध प्रकारचे संकल्प करणे हा या बालकाचा  आवडता खेळ आहे, अहंकार याचा खेळगडी आहे, एवढया गुणांच्या बाळाचा नाश हा आत्मज्ञानाने होतो, आता हे पुष्कळ बोलणे पुरे झाले याप्रमाणे माझी माया विश्वाला प्रसवली आहे आणि माझ्या सत्तेच्या आधारेच मायेपासुन हे विश्व निर्माण झाले. या कारणाने अर्जुना, मी संपुर्ण विश्वाचा पिता आहे आणि महदब्रम्ह माया माता आहे. हा एवढा विशाल जगताचा आकार हे आम्हा दोघांपासुन झालेल मुल आहे. आता विविध प्रकारची शरीरे पाहुन चित्तात भेद येवु देवु नकोस कारण या सर्व निरनिराळया शरीरात मन,बुध्दी,अहंकार व पंचमहाभुते ही जी विश्वातील आठ तत्वे आहेत ती  एकत्र आहेत. अरे ! एकाच देहाच्या ठिकाणी निरनिराळे अवयव नसतात काय?  त्याप्रमाणे हे विश्व विविध स्वरुपाचे दिसले तरी ते तत्वता एकच आहे, वृक्षाच्या शाखा उंच व खाली, वाकडया आणि परस्परांच्या भिन्न स्वरुपाच्या असतात परंतु त्या सर्व एकाच बीजापासुन उत्पन्न झालेल्या असतात, म्हणुन विशाल जगत् व मी याचां संबंध असा आहे, ज्याप्रमाणे  मातीपासुन उत्पन्न झालेला घट हा मातीचा मुलगा होय किवां वस्त्र हे कापसाचे नातवंड आहे. (ओवी १११ ते १२०)

         अथवा ज्याप्रमाणे सागरावर उत्पन्न होणाऱ्या असंख्य लाटा ही सागराची संपत्ती आहे. त्याप्रमाणे आमचा आणि चराचरांचा संबंध कल्पित आहे, ज्याप्रमाणे अग्नी आणि ज्वाला हे दोन्ही मिळुन केवळ एकच अग्नी असतो, त्याप्रमाणे मी आणि हे सर्व जगत् हे दोन्ही मिळुन मीच आहे. आमच्या दोघांचा एकरुप संबंध कल्पित असल्यामुळे तो मिथ्या आहे. निर्माण झालेल्या विश्वाने खरोखर मी झाकला गेलो तर विश्वाच्या रुपाने कोण प्रकाशित होतो?  माणकांच्या तेजाने माणिक कधी लोप पावते काय?  सोन्याचे विविध अलंकार केल्याने त्यातील सोनपणा नाहीसा होतो काय?  अथवा कमळ उमलले असता ते कमळपणाला मुकते काय? अर्जुना !  असे सांग कि अवयव धारण करणारा अवयवाने झाकला जातो काय? कारण अवयव हेच अवयवीचे स्वरुप आहे. जोधंळयाचे बी पेरल्यानंतर त्याला कणीस आले म्हणजे ते पेरलेले बी नाहीसे झाले काय?  की अनेक पटीने वाढले?  म्हणुन जग बाजुला सारुन मला पहावे असे नाही तर एकंदर सर्व काही मीच आहे, असे पहावे. हे वीरा अर्जुना! तु आपल्या अंतकरणामध्ये या सिध्दातांचा दृढ निश्चय करुन ठेव. आता निरनिराळया शरीरातं माझे प्रकाशन माझ्याकडुनच होते आणि त्या शरीरामध्ये तीन गुणांनी मीच बांधला गेल्यासारखे दिसतो. हे अर्जुना,ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपले मरण आपण कल्पनेने तयार करुन त्या स्वता कल्पना केलेल्या मरणांचे दुख आपणच स्वता भोगतो. (ओवी १२१ ते १३०)

पुढील भाग