अध्याय १५ भाग ४

       कारण या संसारवृक्षाच्या ठिकाणी सत्यत्व मुळीच नाही मग जो मुळात नाही, त्याचा आरंभ कसला? आणि आरंभ तरी कोण करणार? ज्याच्या पासुन सत्य पदार्थ निर्माण होतो त्याला आदि म्हणणे शोभते आता जो स्वरुपेकरुन नाहीच त्याला तो कोठुन झाला म्हणावे? म्हणुन ज्याला जन्म नाही त्याची आई कोणाला म्हणावे? असा हा वृक्ष‍ अस्तित्वाशिवाय आहे म्हणुन याला अनादि म्हटले एवढेच. वांझेच्या मुलाची जन्मपत्रिका कशी असु शकेल? त्याप्रमाणे आकाशाचा खरा रंग निळा आहे अशी कल्पना कशी करता येईल? आकाशाच्या फुलाचा देठ कोणाला तोडता येईल काय? म्हणुन ज्या संसाररुपी वृक्षास अस्तित्व नाही त्याचा मुळारंभ कोठुन असणार?  ज्याप्रमाणे मातीचा घट तयार केल्याशिवाय त्याला अस्तित्व येत नाही, त्याप्रमाणे हा संसाररुपी वृक्ष समुळ अनादि आहे असे जाणावे. अर्जुना! या संसारवृक्षाला उत्पत्ती व नाश नाहीच परंतु वर्तमान त्याचे जे अस्तित्व भासते ते देखील मिथ्याच आहे. जसे मृगजळ हे ब्रम्हगिरी पर्वतातुन निघत नाही आणि समुद्राला खरोखर जावुन मिळत नाही, तथापि ते मृगजळ जसे मध्यंतरी व्यर्थ भासते, त्याप्रमाणे हा संसारवृक्ष आरंभी आणि अंती खरोखर नाही, कोणत्याही काळात तो सत्य नाही तो परमार्थता नसुनही भासतो हे त्याच्या खोटेपणाचे आश्चर्य आहे ज्याप्रमाणे आकाशात विविधरंगांची अर्धवर्तुळाकार कमान दिसते तिला आपण इंद्रधनुष्य या रुपाने पहातो, त्याप्रमाणे अज्ञानाला हा संसारवृक्ष खरा आहे असे वाटते.(ओवी २३१ ते २४०)

       याप्रमाणे हा संसार, स्थितीच्या काळात अज्ञानी डोळयानां फसवितो, ज्याप्रमाणे बहुरुपी विविध प्रकारची सोंगें आणुन लोकांना फसवितो. आकाशाला कसलाही रंग नसुन ज्याप्रमाणे त्याचा निळा रंग भासतो, तथापि तो रंग एका क्षणात दिसतो व नाहीसा होतो त्याप्रमाणे संसार केवळ मिथ्या आहेच असे नाही तर तो क्षणिकही आहे. स्वप्नातील खोटे पदार्थ वस्तुता नाहीत तरी पण ते खरे आहेत असे जरी मानले तरी ते एकसारखे टिकतात काय? त्याप्रमाणे संसार हा मिथ्या आणि क्षणिक आहे, आपले प्रतिबिबं पाण्यात पडलेले पाहुन माकडास ते दुसरे माकड आहे असे वाटते परंतु हाताने त्याला धरता येत नाही, त्याप्रमाणे डोळयांनी हा संसार आहे असे वाटते परंतु विचाराने पाहु लागलो तर सापडत नाही, लाटांचे एकामागुंन एक निर्माण होणे व विजाचे चमकणे यापेक्षा या विश्वरुपी वृक्षाचे येणे-जाणे अतिशय जलद असते. ज्याप्रमाणे ग्रीष्म ऋतुतील शेवटच्या काळातील वारा समोरुन वाहतो की पाठीमागुन वाहतो हे जसे निश्चीतपणे कळत नाही, त्याप्रमाणे या संसारवृक्षाची स्थिती आहे. याप्रमाणे या वृक्षाला आदि, मध्य, स्थिती व अंत नाही. म्हणुन हा संसारवृक्ष उपटुन टाकण्याचा खटाटोप तरी कशाला पाहीजे? अर्जुना! हा नसलेला संसारवृक्ष आपल्या अज्ञानामुळे बळावलेला आहे, तर आता आत्मज्ञानरुपी दुधारी शस्त्राने याला तोडुन टाक. परंतु एका आत्मज्ञानाशिवाय याला छेदण्याचे जेवढे उपाय करशील तितका तु या वृक्षात अधिकच गुंतून राहशील, मग त्या संसारवृक्षाच्या फांदया-फांदयानी खाली-वर किती फिरावे? म्हणुन या संसारवृक्षाचे अज्ञानरुपी मुळच आत्मज्ञानाने तोडुन टाकू. (ओवी २४१ ते २५०)

       एरवी दोरीला साप समजल्यानंतर त्याला मारण्यासाठी मोठमोठया काठया जरी जमवल्या तरी त्यांनी साप नाहीसा होत नाही, उलट काठया जमवण्याचे श्रम वाया जातात. मृगजळाच्या मोठया नदीतुन पलिकडे जाता यावे म्हणून काहीजण धावाधाव करुन नाव शोधीत असतात परंतु त्याच प्रदेशातील खऱ्या ओहोळामध्ये कोणीतरी खरोखरीच बुडून जात असतो. अर्जुना! या खोटया संसाराचा नाश करण्यासाठी योग-यागादी साधकांनी अधिक कष्ट केले, तर त्याच्या प्राणवायुमध्ये विकृती निर्माण होवुन त्याचे आरोग्य बिघडेल. अर्जुना! स्वप्नात एखादी जखम झाली तर जाग येणे हेच जसे औष‍ध आहे त्याप्रमाणे मुळ अज्ञानाचा नाश करण्यासाठी हत्याराची आवश्यकता आहे, परंतु ज्ञानरुपी हत्यार लीलेने सहज धारण करता येईल असे बुध्दीला वैराग्याचे बळकट सहाय्य लागते. हे वैराग्य एवढे दृढ झाले पाहीजे की, त्याच्या आधारे स्वर्ग,पृथ्वी, पाताळ या भोगांचा एवढा वीट आला पाहिजे की तो भोग म्हणजे नुकतेच कुत्रे ओकुन गेले आहे. अर्जुना! जगातील सर्व विषयभोगांसंबंधी जेव्हा एवढा वीट येतो, तेव्हाच वैराग्य प्राप्त झाले असे म्हणावे. मग ज्ञानरुपी हत्यारावरील देहाभिमानरुपी म्यान एकदम काढुन अंतर्मुख झालेल्या बुध्दीरुपी मुठीने ते धारण करावे. हे ज्ञानरुपी हत्यार, विवेकरुपी सहाणेवर घासुन पाजळावे, मी ब्रम्ह आहे या बोधाने ते धारदार झालेले असावे, आणि हे संपुर्ण विश्व ब्रम्ह आहे अशा परिपुर्ण बोधाने चकचकीत केलेले असावे अशा निश्चयरुपी मुठीचे बळ एक-दोन वेळेला पाहुन मग ते अतिशुध्द मननापर्यत तोलुन धरावे. (ओवी २५१ ते २६०)

      नंतर ज्ञानरुपी हत्याराचे व आपले निदिध्यासाने ऐक्य झाल्यानंतर आपल्यापुढे घाव मारण्याने ते झाड टिकणार नाही. ते आत्मज्ञानरुपी अद्वैत दुधारी शस्त्र आपल्या अद्वैतप्रकाशाच्या अधिक्याने भवरुपी वृक्षास कोठे ठरु देत नाही, शरद ऋतुतील आरंभीचा वारा जसा आकाशातील ढगरुपी केर नाहीसा करतो अथवा उगवलेला सुर्य जसा सर्व अंधकार नाहीसा करतो जागे होताक्षणी स्वप्नातील सर्व संभ्रम जसे नाहीसे होतात, त्याप्रमाणे आत्मज्ञानरुपी शस्त्राच्या धारेमुळे संसाररुपी वृक्षाचा नाश होतो, ज्याप्रमाणे आकाशात चांदणे पसरल्यावर मृगजळ दिसत नाही, त्याप्रमाणे संसारवृक्षाचे वरचे मुळ माया, खालच्या व वरच्या शाखांचा समुदाय हे काहीच दिसणार नाही. याप्रमाणे हे वीरश्रेष्ठ  अर्जुना, आत्मज्ञानरुपी शस्त्राने हा संसाररुपी वृक्ष खालच्या -वरच्या मुळासंह छेदुन टाक. मग ही अमुक वस्तू अशा प्रकारचा भास जेथे शिल्लक रहात नाही आणि अहंकाराचा लोप होतो असे जे आत्मस्वरुप ते पहावे, परंतु मुर्ख लोक आरशाला समोर धरुन त्याच्या आधारे आपले एकच रुप प्रतिबिबंरुपाने दुसरे करुन पाहतात, तसे तु एकाच ब्रम्हचैतन्याला जीवरुपाने ज्ञाता व ब्रम्हरुपाने ज्ञेय करुन पाहु नकोस, अर्जुना , ते पाहणे असे आहे की विहीर न खोदता ती जशी आपल्या उगमाच्या ठिकाणी पाण्याच्या झऱ्याने भरुन असते, त्याप्रमाणे ज्ञात्याने ब्रम्हाला विषय न करता “मी ब्रम्हरुपच आहे”, अशा दृष्टीने त्याला पहावे. अथवा पाणी आटल्यावर जसे त्यामधील प्रतिबिबं मुख्य बिबांशी ऐक्य पावते, अथवा घट फुटल्यावर घटातील आकाश महाकाशामध्ये एकरुप होते. (ओवी २६१ ते २७०)

      अथवा अग्नीतील जळणारी लाकडे नाहीशी झाल्यावर त्यातील अग्नी जसा स्व-स्वरुपी लय पावतो, त्याप्रमाणे अर्जुना, आपले स्वरुप हे आपल्याच स्वरुपात पाहावे लागते. जिभेने आपलीच चव जशी चाखावी, डोळयांनी आपली बुबळे जशी पाहावीत, त्याप्रमाणे आपणच आपल्याला पहाणे आहे. किवां प्रकाश जसा प्रकाशात मिळावा, आकाशाने आकाशावर जसे लोळावे किवां पाण्याने खोलीत पाणी भरावे त्याप्रमाणे अद्वैत दृष्टीने आपले स्वरुप आपण पाहण्याची रीत आहे, हे मी तुला खरे सांगत आहे जीव आणि ब्रम्ह यातं शब्दांचा भेद आहें. परंतु दोघे एकरुपच आहेत जे द्रष्टयावाचुन पहाणे, जे कोणत्याही प्रकाराने वृत्तिज्ञानाला केव्हाही विषय न करता जाणणे हे विश्वाच्या आरंभी आहे-नाही याच्या पलिकडे सदरुपाने पाहणे आहे आणि ते शरीरामध्ये राहणारे आहे म्हणुन ज्या स्वरुपाला आद्यपुरुष असे म्हणतात. त्या आद्यपुरुषाचे वर्णन करण्यासाठी मायेच्या उपाधीचा आश्रय घेण्यासाठी श्रुती त्याचे वर्णन करतात, आणि मग त्या ठिकाणी नामरुपाचा व्यर्थ आरोप केला जातो, संसार आणि स्वर्ग या भोगास कंटाळलेले ध्यान आणि ज्ञान या साधनाकडे प्रवृत्त झालेले मुमुक्षू पुन्हा जन्मच नको अशा दृढ प्रतिज्ञेने ज्या  आद्यपुरुषाकडे जाण्यास निघालेले आहेत, संसाराच्या पावलांच्या पुढे पावले टाकीत वैराग्याची पैज मारुन ते धावतात आणि कर्ममार्गाच्या आचरणाने प्राप्त होणारा ब्रम्हलोक ओलांडुन पुढे जातात. नंतर ते साधक संसाराविषयी मुळीच आसक्ती राहीली नाही असा सदगुरुंजवळ धडा देवुन ज्ञानी होतात आणि आद्यपुरुषाकडे जाण्यास सदगुरुंचा दाखला घेतात. निजपदापासुन ही विश्वाची एवढी परंपरा वाढली आहे ती केवळ दैवहीनाच्या आशेप्रमाणे मिथ्या आहे. (ओवी २७१ ते २८०)

      ज्या आद्यपुरुषाच्या अज्ञानाने, नसलेल्या जगाला आणि जगाच्या ज्ञानाला महत्व प्राप्त करुन दिले आणि ज्या अज्ञानाने जगात नसलेले “मीपण”आणि “तुपण” जगात प्रचारामध्ये आणले, अर्जुना! ती मुळ वस्तु थंडीने थंडीला जसे थंड करावे, त्याप्रमाणे आपली आपणच पाहावी. हे अर्जुना! आत्मस्वरुप ओळखण्याची आणखी एक खुण आहे ज्या स्वरुपाची भेट झाली असता त्या ठिकाणाहुन पुन्हा जन्माला येणे घडत नाही. महाप्रलयकाली जसे सर्वत्र जलमय होते तसे ते ज्ञानाने परीपुर्ण होवुन त्या स्वरुपास भेटतात, ते स्व-स्वरुपात एकरुप झालेले असतात. वर्षा ऋतुच्या शेवटी पावसाळा संपल्यावर मेघ‍ जसे आकाशाला सोडुन जातात, त्याप्रमाणे ज्या पुरुषाच्या मनाला मोह व अभिमान सोडुन जातात. निर्धन आणि निष्ठुर अशा मानवाला ज्याप्रमाणे त्याचे आप्त आणि सगे सोयरे सोडुन देतात, त्याप्रमाणे जे विकारांच्या चक्रामध्ये सापडत नाहीत. केळाचे घड येवुन गेल्यावर केळी जशी आपोआप उन्मळुन पडते, तशा आत्मस्वरुपाच्या लोभाच्या प्रबलतेने ज्याच्या क्रिया क्रमाक्रमाने गळून पडतात. वृक्षावर बसलेले पक्षी त्या वृक्षाला आग लागल्यावर जसे सैरावैरा उडुन जातात त्याप्रमाणे सर्व विकल्पांनी ज्याचा त्याग केला आहे. अर्जुना! ऐक सर्व प्रकारचे मान-मोह आदी दोष रुपी गवत ज्या भेदबुध्दीरुपी जमिनीत उगवते, त्या भेदबुध्दीची गोष्‍टच त्यांना नाहीशी झाली आहे. (ओवी २८१ ते २९०)

      आयुष्य संपले की जीवाला शरीर जसे अचानक टाकुन देते, याप्रमाणे अज्ञानजन्य द्वैताने ज्यांना टाकुन दिले आहे, परिसाला जसे लोखंड मिळणे दुर्मिळ आहे अथवा सुर्याला जसा अंधकार कधी सापडत नाही, त्याप्रमाणे त्यांनाही द्वैत-बुध्दीचा दुष्काळ असतो. अरे, सुखदुखरुपी द्वंद्वे जी या देहाच्या ठिकाणी सदैव अनुभवास येत असतात, ती या पुरुषाच्या समोर कधी येतच नाहीत, ज्याप्रमाणे जागे झाल्यानंतर स्वप्नामध्ये मिळालेले राज्य किवां प्राप्त झालेले मरण यापासुन हर्ष होत नाही आणि शोकही होत नाही. सर्पाकडुन कधी गरुड जसा धरला जात नाही, त्याप्रमाणे सुख-दुखरुपी व पाप-पुण्यरुपी द्वंद्वाच्या चक्रात ते सापडत नाहीत. आणि जे ज्ञानरुपी राजहंस देहादी अनात्म समुहरुपी पाणी टाकुन आत्मानंदरुपी दुधाचे सेवन करतात, ज्याप्रमाणे सुर्य आपल्या प्रकाशरुपी रसाचा पृथ्वीवर वर्षाव करुन पुन्हा तो रस आपल्या किरणसमुहाच्या द्वारे बिबांच्या ठिकाणी परत घेत असतो. तसेच आत्म्याने खरे स्वरुप न कळाल्यामुळे एक आत्मवस्तु अनेक वाटांना विखुरल्यासारखी वाटते, परंतु जे ज्ञानीपुरुष आहेत, ते आपल्या ज्ञानदृष्टीने नेहमी आपल्याच ठिकाणी एकत्वाने पाहतात. फार काय सांगावे?  गंगेचा ओघ जसा समुद्रामध्ये एकरुप होवुन जातो, त्याप्रमाणे त्या आत्मज्ञानी पुरुषांचा विवेक आत्म्याच्या निश्चयामध्ये एकरुप होवुन जातो. आकाश सर्वत्र असल्यामुळे त्याला इकडुन तिकडे जाण्याचे काही कारण राहत नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुषाला सर्व विश्व सच्चिदानंदस्वरुप आहे याची जाणीव झाल्यामुळे कोणजही विषयाची इच्छा करण्याचे कारण राहत नाही. (ओवी २९१ ते ३००)

     ज्याप्रमाणे अग्नीच्या डोंगरावर कसलेही बीज पेरले तरी उगवत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या मनात आत्मज्ञान प्रगट झाले आहे तेथे कोणताही विकार निर्माण होत नाही. समुद्रमंथनाच्या वेळी मंदार पर्वताची   रवी केली होती, ती रवी क्षीरसागरातुन बाहेर काढल्यावर तो सागर शांत झाला, त्याप्रमाणे ज्याचे मनात आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यामुळे कामवासनेच्या लहरी निर्माण होत नाहीत. जसे चंद्र षोडशकलांनी युक्त झाल्यावर कोणत्याही बाजुंनी कमी दिसत नाही, तसे आत्मप्राप्ती झाल्यामुळे त्याच्या मनात कोणतीही इच्छा निर्माण होत नाहीत. असे किती प्रकारे निरुपण करू? जसे वाऱ्यापुढे परमाणु टिकत नाहीत त्याप्रमाणे ज्याला विषयांचे नावदेखील आवडत नाही अशा प्रकारे हूत भक्षण करणारा जो ज्ञानाग्नी, त्यात ज्या पुरुषांनी सर्व विषय भस्म करुन टाकले आहेत, ते पुरुष सोन्यामध्ये सोने मिळल्याप्रमाणे स्वरुपाशी ऐक्य पावतात. ते ठिकाण कोणते आहे असे जर तु विचारशील तर जे कधीही नाश पावत नाही ते ठिकाण. ते पाहु गेले असता दिसावे जाणुन घेतले असता समजावे किवां अमुक वस्तुप्रमाणे आहे असे म्हणता यावे असे जे नाही. परंतु दिव्याच्या मोठया प्रकाशाने जे प्रकाशित होते किवां चंद्र ज्याला उजळीत असतो, फार काय सांगावे, ज्या सुर्यापासुन सर्व जग प्रकाशित होते त्याच्या प्रकाशाने जे संपुर्ण दिसणे आहे, ते त्या परमात्मा वस्तुला न पाहणेच होय. कारण जो परमात्मा अज्ञानाने आवृत्त असताच जे बाहय विश्व दिसत असते, भासत असते, त्याप्रमाणे शिंपीचे शिपं म्हणुन यथार्थ ज्ञान जसजसे नाहीसे होते तसतसे त्या शिंपीवर मिथ्या भासणारे रुप खरे आहे असे वाटु लागते किवां दोरीच्या यथार्थ स्वरुपाच्या अज्ञानात सापाचा भास अधिक दृढ होत जातो. (ओवी ३०१ ते ३१०)

पुढील भाग