अध्याय १८ भाग १४

             ज्याप्रमाणे जागे झाल्यानंतर स्वप्न नाहीसे होते, त्या वेळी आपले आपल्याशी जसे ऐक्य दिसते, त्याप्रमाणे द्वैतावाचून तो भक्त माझा आनंद अनुभवत असतो. यावर द्वैतवाद्यांचा असा आक्षेप आहे की, भक्त आणि भगवंत ऐक्य पावल्यावर त्या भक्ताला ब्रह्माचा आनंद कसा अनुभवास येतो? तर असे पाहा की, शब्दाने शब्दाचा उच्चार केला जातो, त्या वेळी उच्चार करण्याचे साधन श्ब्दच असते. ऐक्यामध्ये आनंद संभवत नाही, असे म्हणणाऱ्यांच्या गावात सूर्याला दिव्याने प्रकाशित केले की काय? त्यांनी आकाशासाठी लहान मांडव उभा केला आहे काय? ज्या माणसांच्या अंगी राजेपण नाही, त्याला राजा राजेपणाचे काय सुख भोगतो, ते कसे कळणार? किंवा प्रकाशमान सूर्याला अंधार आलिंगन देईल काय? आणि जो स्वत: आकाश झाला नाही, त्याला आकाशाच्या पोकळीची व्याप्ती समजेल काय? रत्नाच्या सुंदर रूपावर गुंजाचे सुंदर अलंकार शोभतील काय? त्याप्रमाणे जो पुरूष मी झाला नाही, त्याला मी कसा आहे, किती विशाल आहे, हे कसे बरे कळेल? आणि जे मीच झाला आहे, तो खरी भक्ती करतो, हे मी कसे बरे बोलू? याकरिता तो एकेक पायरी क्रमाने वर चढत मीच झालेला असतो; म्हणून तो अंतर्बाह्य आनंदस्वरूप असतो. जशी तरूण स्त्री आपल्या तारूण्याचा उपभोग घेत असते, पाण्याच्या लाटा जशा सर्वागांनी पाण्यावर खेळत असतात, प्रकाश जसा सूर्यबिंबाच्या ठिकाणी सर्वत्र विलास करत असतो अथवा पोकळी जशी आकाशाच्या सर्व भागांवर लोळत राहात असते, त्या प्रकारे  तो क्रमयोगी माझ्याशी ऐक्य पावून क्रियेवाचून माझी भक्ती करत असतो. अंलकार ज्याप्रमाणे सोन्याशी अभिन्न असतात, चंदनाचा सुगंध जसा स्वभावत: चंदनाला भजतो अथवा चंद्राची प्रभा जशी चंद्राजवळ सहजच असते. ( ओवी ११४१ ते ११५०)

तशी त्या भक्तीमध्ये क्रिया सहज होते तरीदेखील अद्वैत स्वरुपाच्या ठिकाणीच भक्ती असते याचा दिव्य अनुभव घेतला तर ते समजु शकेल, एरवी केवळ बोलून सांगण्यासारखी ही अवस्था नाही. पुर्ण संस्कारामुळे तो माझ्याशी जे जे काही बोलेल त्या त्याच्या अंतकरणापासुन होणााऱ्या विनंतीस मी ओ देवुन त्याच्याशी बोलणारा होतो, बोलणाऱ्यास जेव्हा बोलणाराच  स्वता भेटतो, तेव्हा तो बोलतो असे कसे म्हणता येईल? अशा तऱ्हेने जे प्रेमळ बोलणे ते न बोलण्यासारखे असुन त्या बोलणाऱ्या क्रमयोग्याला मी अभयत्वाने भेटत असता जे मौन निर्माण होते त्या मौनाने तो माझी खरी स्तुती करत असतो. तसेच हे अर्जुना, बुध्दीने अथवा दृष्टीने तो जे जे जाणील अथवा पाहील तेव्हा त्याचे ते पाहणे दृश्याला दुर सारुन पाहणाऱ्याचे स्वरुप दाखविते, त्याला दृश्य न दिसता सर्वत्र आत्मचैतन्यरूप द्रष्टा दिसतो, आरसा हा मुखापुढे येण्यापुर्वी पाहणारे केवळ एक मुख अनुभवास येत असते आणि आरसा पुढे घेतल्यानंतर त्या प्रतिबिंबाला जे पाहणारे आहंत ते पाहणाऱ्या मुखाशी एकरुप करते. तेव्हा दृश्य जावुन म्हणजे दृश्य कल्पनेचा निरास होवुन द्रष्टा आपल्या मुळ सत्तारुप ब्रम्हस्वरुप द्रष्टयालाच जेव्हा भेटतो तेव्हा तेथे एकटेपणाने दृश्याच्या सापेक्ष असलेला द्रष्टेपणाही संभवत नाही, एखादा कामुक माणुस स्वप्नातील सौदर्यवान स्त्रीला जागृत होवुन आलिंगन देवु लागला तर ती स्त्री आणि ते स्वप्न दोन्हीही न राहता तो जसा आपणच एकटा रहातो.दोन लाकडांच्या घर्षणाने अग्नी उत्पन्न होतो तेव्हा तो अग्नी दोन लाकडे ही भाषा नाहीशी होवुन अग्नी जसा आपण एकटाच राहतो. सुर्य आपले पाण्यात पडलेले प्रतिबिंब हातात घेवु लागला तर त्याचे प्रतिबिंब नाहीसे होवुन सुर्याच्या ठिकाणी असलेला त्याचा प्रतिबिंबपणाही नाहीसा होतो. ( ओवी ११५१ ते ११६० )

त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावुन जो दृश्य वस्तु पाहण्यास जातो त्याला ती सर्वत्र पसरलेली वस्तु वेगळी तर दिसत नाहीच परंतु त्याचे असलेले द्रष्टत्वही नाहीसे होते. सुर्य अंधाराला पाहु लागला, तर त्याप्रमाणे प्रकाश्य अंधार तर शिल्लक रहात नाही आणि सुर्याचा प्रकाशपणाही उरत नाही त्याप्रमाणे दृश्याच्या ठिकाणी मी झालो असता, म्हणजे दृश्य माझ्याशी एकरुप झाले असता दृश्य सापेक्ष दृष्टेपणाही दिसत नाही, मग पाहणेही नाही व न पाहणेही नाही. अशी जी अवस्था निर्माण होते ते माझे खरे दर्शन होय. हे अर्जुना, वाटेल त्या पदार्थाच्या भेटीत ते दर्शन त्याला होत असते, तो क्रमयोगी पुरुष द्रष्टा व दृश्य या सापेक्ष भाव रहीत असलेल्या स्वरुपाला आपल्या दृष्टीने सदैव अनुभवत असतो आणि आकाश अगदी दाट भरुन गेले असल्यामुळे जसे ते इकडे-तिकडे मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे माझ्या अनंतस्वरुपाने तो क्रमयोगी पुरुष स्वता दाट भरलेला असतो म्हणुन त्याचे ठिकाणी कोणतीही क्रिया संभवत नाही, ज्यावेळी कल्पाचा शेवट होतो त्या वेळी पाण्यानेच पाण्याला अडविले असता जसे त्याचे वाहणे बंद पडलेले असते तसा माझ्या एका आत्मस्वरुपाने तो क्रमयोगी कोंदाटुन परिपुर्ण भरलेला असतो, त्यामुळे त्याचा जन्म-मरणाचा गतिमान प्रवाह पुर्ण बंद पडलेला असतो. पाय कधी पायावर चढेल काय? अग्नी कधी अग्नीलाच जाळेल काय? अथवा पाणी कधी पाण्यातच स्नान करेल काय? म्हणुन तो क्रमयोगी सर्वत्र मी म्हणजे ब्रम्ह झाल्यामुळे त्याचे कोठेही यात्रेला जाणे-येणे नसते जीवन हीच त्याची अद्वैतस्वरुप यात्रा करणे असते. जलावरचा तरंग जरी पुढे धावला तरी तो  सागराला सोडुन फक्त जमिनीच्या भागावर धावत गेला असे कधी होत नाही, त्या तरंगाने जे ठिकाण त्यागावे अथवा ज्या ठिकाणी जावे म्हणजे जे चालणे व ज्याच्या योगाने चालावयाचे ते सर्व एकच जल आहे म्हणुन… ( ओवी ११६१ ते ११७०)

अर्जुना! तो तरंग कोठेही धावत गेला तरी तो मुळात जलस्वरुप असल्यामुळे त्याची एकात्मता जशी कधीही बिघडत नाही, त्याप्रमाणे ऐक्य साधुन देहाने जरी तो दुर देशाला गेला तरीपण तो सर्व व्यापक स्वरुपाने माझ्या जवळच आला आहे. त्या यात्रेने तो माझा यात्रेकरुच होतो, आणि शरीरधर्माने  तो जर काही करु लागला तर त्याचा त्या क्रियेचा विषय या रुपाने मीच त्याला भेटत असतो. अर्जुना! अशा स्थितीमध्ये हे कर्म , हा कर्ता हा भेद जावुन आत्मरुपाने मीच मला पाहत असतो , पाहण्याचा विषय आणि आशय मीच होतो, आरशाने आरशाला पाहीले असता ते तत्वता न पाहणेच होय, सोन्याने सोने झाकले असता ते न झाकणेच होय, दिव्याने दिव्याला प्रकाशित केले असता ते जसे न प्रकाशणेच सिध्द होत असते, त्याप्रमाणे मीच कर्ता आणि मीच कर्म होवुन  गेल्यावर माझ्याकडुन जे कर्म केले जाते, ते करणे कसले होय, तो क्रमयोगी कर्म करीत असतो, परंतु हे कर्म करावे आणि मी हया कर्माचा कर्ता आहे अशी भाषा ज्या वेळेला नाहीशी होते तेव्हा त्याचे कर्म करणे, न करणेच होत असते, त्या क्रमयोग्याची सर्व कर्मे ब्रम्हरुप झाल्यामुळे परमार्थता त्याच्या कडुन  कोणतेच कर्म घडत नसते त्याचेच नाव माझी पुजा होय, हे अर्जुना! व्यावहारीक दृष्टीने तो कर्म करीत असता आत्म दृष्टीने काहीच न करणे या त्याच्या अकर्तेपणातुन महापुजा निर्माण होत असते आणि अशा प्रकारे ब्रम्हतत्वाशी ऐक्य पावुन केलेल्या महापुजेने तो मला पुजीत असतो, याप्रमाणे  तो जे जे बोलेल, ती माझी स्तुती आहे. तो जे जे बघेल ते माझे दर्शन आहे आणि तो चालेल ते माझे चालणे माझी यात्रा करणे होय. (ओवी ११७१ ते ११८०)

तो जे जे कर्म करेल ती माझी समाधी होय. सोन्याची कंकणे जशी सोन्याशी अभिन्न असतात, त्याप्रमाणे तो क्रमयोगी ज्ञानोत्तर भक्तीयोगाने माझ्याशी अनन्य असतो. जशा पाण्यात लाटा, कापुरात जसा वास, रत्नात तेज ज्याप्रमाणे अनन्यसाधारण असते, किबंहुना, तंतूशी अथवा मातीशी ज्याप्रमाणे घट अभिन्न असतो, त्याप्रमाणे माझा भक्त माझ्याशी  अभिन्न असतो, ह‍े सुमती अर्जुना, ही जी  अनन्यसिध्द भक्ती आहे त्या भक्तीच्या योगाने दृश्यमात्राच्या ठिकाणी मी आत्मा जो द्रष्टा आहे , त्या मला तो जाणतो जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्हीही अवस्थांच्या द्वाराने व स्थुल, सुक्ष्म व कारण या तीन प्रकारच्या उपाधीने व विश्व, तेजस आणि प्राज्ञ या तीन अभिमानी जीवांच्या आकाराने व  भावरुपाने आणि जागृती व स्वप्न या दोन अवस्थांमध्ये असल्या प्रमाणे व अभावरुपाने सुषुप्ती अवस्थामध्ये नसणे पणाने जे हे संपुर्ण विश्व अनुभवास येते म्हणजे ज्ञानाला विषय होते. हे अर्जुना, हे संपुर्ण दृश्य मीव आहे अशा बोधाच्या भरात तो झेडां घेवुन नाचतो. दोरीचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्यावर त्यावर झालेला सर्पाचा भास नाहीसा होवुन तो दोरच आहे असा जेव्हा निश्चय होतो, सुवर्णपेक्षा कोणताही अलंकार एक गुंजभरदेखील वजनामध्ये कमी नसतो  याची तो अलंकार आटवुन जशी खात्री करुन घेता येत असते जलापेक्षा तरंग हा वेगळा नाही पाण्याशिवाय तरंगामध्ये दुसरे काहीही नाही हे निश्चीतपणे समजल्यानंतर त्या तरंगाला स्वतंत्र अस्तित्व आहे असे कोणीही मानत नाही. ( ओवी ११८१ ते ११९०)

अथवा स्वप्नातील सर्व पदार्थाचे जागृत होवुन माप घेतले असता हे सर्व पदार्थ आपणाहुन वेगळे आहेत असे ज्याप्रमाणे अनुभ‍वास येत नाही त्याप्रमाणे जे काही आहे व नाही त्याच्या योगे हे जाणण्याची स्फुर्ती होते व मी नाशरहित आहे ज्याच्या पुर्वी कोणी कारण नाही ज्याच्या स्वरुपाला अंत नाही ज्याच्या पलीकडे दुसरे काही नाही असा मी सत्-चित्-आनंदरुप आहे. मीचलन न पावणारा, स्वरुपा पासुन भ्रष्‍ट न होणारा, अमर्यादित, भेदरहीत, अद्वैत जगताच्या उत्पत्तीच्याही पुर्वी असलेला निराकार आहे तसेच संपुर्ण विश्वाच्या आकाराने मीच आहे. सर्वाचा ईश, अनादी व अमर, अभय, आधार आणि आश्रयदाता मीच आहे. मी सदैव उत्कर्षाला पावलेल्या विश्वाचा स्वामी आहे, मी स्वाभाविक सत्तारुप आहे मी सर्व आणि सर्वामध्ये  चेतनारुपाने असणारा आणि सर्वाच्या पलीकडेही असणारा आहे, मी नित्य नुतन आहे मी सर्वात आदी आहे, मी सर्व विशेषशुन्य आहे मी सर्वत्र, सदोदीत आणि सम प्रमाणात भरलेला आहे. मी स्थुलरुपाने सर्वाहुन मोठा आहे व अणु-रेणू पेक्षाही सुक्ष्म आहे, जगात जे जे काही आहे ते ते सर्व मीच आहे. मी क्रियारहित आहे मी एक‍अद्वितीय आहे मी संगरहीत व शोकरहित आहे व्याप्त आणि व्यापक मीच आहे सर्वात उत्तम पुरुष मीच आहे मी सर्व गुणरहीत आहे मी सर्व इंद्रियरहित आहे, मला कुळ-गोत्र काही नाही मी सर्वत्र सम प्रमाणात भरुन राहीलो आहे. मी स्वतंत्र आहे मी साक्षात परब्रम्ह आहे अशा अद्वैत भक्तीने फक्त मला जो जाणतो आणि याही बोधाला जाणणारा मी परमात्मा तोही आपणच आहेत असे समजतो. ( ओवी ११९१ ते १२०० )

जागृत झाल्यानंतर स्वप्नातील अनेकत्व जावुन जे एकपण उरते त्या एकपणाचेही स्फुरण जागृत झालेल्या पुरुषाला थोडा वेळ राहत असते पुढे कालांतराने जागृत अवस्थेचेही स्फुरण जाते आणि केवळ जागृत अवस्था शिल्लक रहाते. सुर्य ज्या वेळेला आपले प्रकाशन करतो, तेव्हा प्रकाश्य व प्रकाशक तोच होतो आणि  त्या प्रकाश्य आणि प्रकाशातील अभेदाचा प्रकाशदेखील तोच जसा असतो, तसाच जाणण्यास योग्य अशा पदार्थच्या नाशानंतर केवळ जाणणारा उरतो, हे देखील ज्याला समजते असा जो तेही मीच आहे असे समजतो, हे अर्जुना! आपल्या पुर्ण स्वरुपाला प्रकाशित करणारे जे ज्ञान ते ईश्वरच म्हणजे ब्रम्ह आहे आणि ते ब्रम्ह मी आहे, असे त्या क्रमयोग्याला अनुभवास येते, मग द्वैताहुन आणि द्वैतसापेक्ष अद्वैताहुन मीच एक वेगळा आत्मा आहे हे वृत्तीच्या द्वारे जाणणे आहे हे वृत्तिज्ञानदेखील ज्या अवस्थेमध्ये अनुभवामध्ये प्रवेश करते तेव्हा जागृत झाल्यानंतर जे आपल्याला आपले स्वरुप दिसते तेही नाहीसे झाल्यानंतर आपणास कोणती स्थिती येते ते काही सांगता येत नाही, अथवा सोन्याचे सोनेपण डोळयाने पाहताक्षणी अलंकाराची आटणी न करता आटणी केल्याप्रमाणे होते, अथवा गोड पाण्यात मीठ घातले असता त्या पाण्यातला खारटपणा जिरुन गेल्यावर पाणी खारे झाले आहे, असा व्यवहारही जसा संपुन जातो, त्याप्रमाणे मी देव आणि भक्त हे जे द्वैत आहे तेही पुर्ण आनंदाच्या भरात एकत्र येवुन माझ्याशी लय पावते. आणि तो ही भाषा अनुभवामध्ये संपुन जाते, तेथे मी हा शब्द तरी कोठे उरतो? असा मी नाही आणि तोही नाही ते जे अनंत रुप त्या ठिकाणाशी तो ऐक्य पावतो. ( ओवी १२०१ ते १२१० )

कापुर जळाताक्षणी जसे अग्नीचेही नाव नाहीसे होते मग दाहय कापुर आणि दाहक अग्नी यांच्याहु‍न वेगळे असलेले एक आकाश मात्र वेगळे उरते.अथवा एकातुन एक वजा केले असता जसे केवळ शुन्य शिल्लक राहते. त्याप्रमाणे ‘आहे’ व ‘नाही’ हा सापेक्षभाव मिटुन गेल्यावर जे उरते ते मीच एक आहे. त्या अनंत ठिकाणी ब्रम्ह, आत्मा, ईश, अशा बोलण्यालाही अर्थ राहत नाही ते अशुध्द सत्-चित्-आनंदरुप अनंत स्थितीमध्ये बोलणे आणि न बोलणे हे दोन्ही प्रकार आहेत परमार्थता नष्ट होतात न बोलुनही ते ब्रम्ह आपणच आपल्याशी तोंड भरुन बोलते आणि ज्ञान व अज्ञान टाकुन जे जाणले जाते, तेथे बोधानेच बोध जाणुन आनंदाचे आनंद भोगुन सुखानेच सुखाचा अनुभव येतो, त्या ब्रम्हस्वरुपात लाभालाच लाभ होतो, प्रकाशानेच प्रकाशास आलिंगन दिले जाते, अशा वेळी आश्चर्य आश्चर्यामध्ये उभेच्या उभे बुडून जाते, तेथे समता, साम्याला प्राप्त होते. विश्राम, विश्रांती घेण्यासाठी येतो, आणि अनुभवाला काही विषय मिळत नसल्यामुळे तो वेडावला जातो, हे अर्जुना! फार काय सांगावे? त्या क्रमयोग्याला असा शुध्द भाव प्राप्त होतो की, ते फळ धारण करुन क्रमयोगाची वेल‍अधिकच विस्तारली जाते, अर्जुना! क्रमयोगरुपी सार्वभौम राजाच्या मुकूटावरील मी ज्ञानरुप रत्न होतो आणि तो माझा भक्त होतो, अथवा क्रमयोगरुपी देवमंदिरावर जो मोक्षाचा उंच कळस आहे त्याच्याही वर त्या क्रमयोगी पोकळीचा विस्तार झालेला असतो. अथवा संसाररुपी अरण्यात जी क्रमयोगीरुपी चांगली वाट मिळाली आहे ती माझ्या गावात प्रगट झाली आहे.  ( ओवी १२११ ते १२२० )

पुढील भाग