अध्याय १८ भाग २१

  त्याप्रमाणे संस्कृत गीतेच्या गाण्याला जी शोभा वाढवितो किंवा गीतेच्या गाण्यावाचूनही जो आनंदकमळ विकसित करतो, असा तो दोन्ही प्रकारांनी लाभ देणारा ओवीछंदाचा ग्रंथ माझ्या हातून प्रगट झालेला आहे. बालकांपासून वृध्दांपर्यंत अथवा सर्वसामान्यांपासून ज्ञानींपर्यंत सर्वांना सहज समजतील, अशी ब्रह्मरसाची मधुर अक्षरे मी त्या ओवीछंदामध्ये गुंफली आहेत. चंदनाच्या वृक्षाजवळ गेल्यावर सुगंध घेण्यासाठी त्याला फुले नाहीत, म्हणून थांबण्याचे कारण नाही; कारण त्याचे सर्वांग सुगंधित आहे. तसा हा ओवीबध्द प्रबंध श्रवण करताच श्रोत्यांना भावसमाधी लागते. मग त्याचे व्याख्यान श्रवण केल्यावर तो पुन:पुन्हा श्रवण करण्याविषयी नाद लावणार नाही काय? ह्या ओवीप्रबंधाचा पाठ करीत असताना पांडित्याचा प्रकाश पडतो आणि व्याख्यानातील गोडीचा अनुभव आल्यावर अमृताची देखील आठवण राहत नाही. तसे हे अमृताहुन मधुर कवित्व सदगुरुंच्या कृपाप्रसादाने आयते उत्पन्न झाले आहे, त्यामुळे ओव्यांच्या श्रवणाने आत्मज्ञान प्राप्त होते त्यामुळे मनन, निदिध्यास याचे काही कारण‍च शिल्लक राहत नाही,  हदयातुन सहजपणे स्फुरलेले हे सहज काव्य कोणालाही स्वानंदभोगाचा शेलका वाटा देईल आणि श्रवणाच्या द्वारा सर्व इंद्रियें तुष्ट करील आपल्या स्वाभाविक सामर्थ्याने चंद्राच्या अमृताला भोगुन चकोर पक्षी हा चतुर ठरला आहे, परंतु वाटेल त्याला चंद्राचे चांदणे तरी सहज भोगावयास मिळते, त्याप्रमाणे हया अध्यात्मप्रधान शास्त्रामध्ये अंतरंग अत्यंत सात्विक असणारे‍अधिकारी पुरुष सुखी होतीलच परंतु सामान्य लोक देखील या ग्रंथातील शब्दचार्तुयाने सुखी होतील. अशा प्रकारे हे खरे तर सदगुरु श्री निवृत्तीनाथांचे खरे ऐश्वर्य आहे म्हणुन हा ग्रंथ माझा नसुन त्यांच्याच कृपेचेच खरे वैभव आहे. (ओवी १७४१ ते १७५०)

त्रिपुरासुराचा नाश करणाऱ्या भगवान श्री शंकरानी क्षीरसिधुंच्या  (समुद्राच्या किनारी ) परीसरात पार्वतीमातेच्या कानामध्ये जे गुह्य ज्ञान सांगितले ते कोणाला माहीत नव्हते, त्या क्षीरसागराच्या लाटेमध्ये एक मकर होता, त्या मकराच्या पोटामध्ये गुप्त रुपाने महाविष्णू होते त्यांना भगवान श्री शंकरापासुन ते गुह्य ज्ञान प्राप्त झाले. मच्छिंद्रनाथ संचार करीत असताना सप्तशृंगी गडावर आले तेथे त्यांनी अवयव भंग पावलेल्या चौरंगीनाथाला भेटले, मच्छिंद्रनाथाच्या कृपाप्रसादाने चौरंगीनाथ परिपुर्ण झाले,मग ती अखंड समाधी शिष्याला अनुभवता यावी या इच्छेने ही समाधिमुद्रा मच्छिंद्रनाथानी गोरक्षनाथाला दिली. त्या मच्छिंद्रनाथानी योगरुपी कमळाचे जणु सरोवर आणि विषयांचा नाश करण्यास प्रसिध्द अशा  गोरक्षनाथांचा समाधिपदावर सर्वाधिकारी राजा म्हणुन अभिषेक केला अष्टांग योगसंपन्न गोरक्षनाथांनी ते शंकरापासुन पंरपरेने प्राप्त झालेले अद्वैय आनंदाच्या ऐश्वर्ययोगसिध्दीच्या प्रभावासह श्री गहिनीनाथांना प्राप्त करुन दिले, कलीने सर्व भुतांचा ग्रास केलेला आहे हे पाहुन गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना आज्ञा केली की, आदिगुरु शंकराच्या पासुन शिष्यपरंपरेने ज्ञानाच्या उपदेशाचा संप्रदाय आमच्या पर्यत येवुन पोचला आहे, तो ज्ञानाचा उपदेश घेवुन तु कलीने ग्रासलेल्या जीवांना दुखापासुन सर्व प्रकारे मुक्त कर, वेगाने जा आणि त्यांच्या दुखाचा नाश कर, मेघांना वर्षाकाळाची जोड मिळाली म्हणजे ते जसे भरपुर वृष्टी करतात त्याप्रमाणे स्वभावता अत्यंत कृपाळु असलेल्या निवृत्तीनाथांना आज्ञा झाल्यावर परमानंद झाला. (ओवी १७५१ ते १७६०)

इहलोकात दुखाने पीडित झालेल्या लोकांच्या कळकळीने गीतेचा अर्थ जुळून सांगण्याच्या निमित्ताने निवृत्तीनाथांकडुन जी ही शांत रसाची अमृतमधुर वृष्टी झाली तोच हा माझा गीतेवर भाष्य केलेला ग्रंथ होय. सदगुरु माझ्यावर अध्यात्म शास्त्राचा वर्षाव करीत असताना तेथे चातक होवुन मी त्यांच्यासमोर उभा राहीलो यास्तव ग्रंथाचे यश प्राप्त करुन दिले, याप्रमाणे सदगुरु-परंपरेने प्राप्त झालेले आपले समाधीरुप अनमोल धन निवृत्तीनाथांनी माझ्या पदरात बांधुन दिले. यावाचुन माझ्या मध्ये अधिक योग्यता नाही मी शास्त्र शिकलो नाही, अथवा अधिक ग्रंथ वाचले नाहीत तसेच गुरुंची सेवा कशी करावी हेही मला समजत नाही, अशा मला ग्रंथ‍निर्माण करण्याची क्षमता कोठुन  असणार? पण सदगुरुनी मला निमित्त करुन या ग्रंथाच्या रुपाने सर्व जगाचे दुखापासुन रक्षण केले, याकरीता मी पुरोहीताप्रमाणे जे काही बोललो आहे त्यामध्ये काही उणेपणा असेल तर तुम्ही श्रोत्यांनी आईच्या प्रेमगुणांनी सहन करावा, शब्दांची रचना कशा प्रकारे करावी? शास्त्रीय सिध्दांत प्रक्रियेच्या आधारे कसे सांगावेत? सिध्दांत समजण्यासाठी शब्दालंकार, अर्थालंकार असे मांडावते हे मी ( ज्ञानदेव महाराज ) काही जाणत नाही, कळसुत्री बाहुली ज्याप्रमाणे सुत्रधार हलवीत असतो त्याप्रमाणे हलते तसे मला श्रोत्यापुढे निमित्त करुन माझे स्वामी श्रीनिवृत्तीनाथच बोलत आहेत. यामुळे गुण-दोषांविषयी मी ( ज्ञानदेव महाराज ) विशेष क्षमा मागत नाही, कारण श्री गुरुंनी पुर्वी तयार केलेला उपदेशच मी ( ज्ञानदेव महाराजांनी ) या ग्रंथामध्ये ग्रंथित केला आहे. आणि तुम्ही संत-सज्जन आहात या सभेमध्ये एखाद्या गोष्टीचा उणेपणा झाला नाही, तर‍लडिवाळपणाचा तुमच्यावर दोष येईल. (ओवी १७६१ ते १७७०)

लोखंडाचा कमीपणा परीसाच्या स्पर्शाने जर सहज नाहीसा होणार नसेल, तर त्याचा दोष कोणाकडे बरे येईल? ओहोळाने एवढेच करावे की, गंगेस जावुन मिळावे. मग जर त्या पाण्यामध्ये स्वीकार करुन घेतला आणि तो ओहोळ साक्षात गंगा बनला तर त्याच्याकडे काय बरे दोष आहे?  म्हणुन महान भाग्याच्या योगाने मी ( ज्ञानदेव महाराज )  तुम्हा  संतचरणांच्या कमलाजवळ आलो आहे तर आता मला या जगात काय उणे आहे? अहो स्वामी महाराज, माझ्या सदगुरुंनी तुम्हा संतजनाची भेट करुन दिली त्यामुळे माझ्या ( ज्ञानदेव महाराजाच्या ) सर्व इच्छा परिपुर्ण झाल्या आहेत, असे पाहा की, तुमच्या सारखे थोर, प्रेमळ माहेर मला लाभले, त्या अनुकूलते मुळे माझे ग्रंथनिर्माण करण्याचे कार्य सिध्दीस गेले. मोठया मुशीमध्ये शुध्द सुवर्णाचा रस ओतुन  पृथ्वी सुवर्णाची करता येईल, अथवा महेद्रादी कुल पर्वताप्रमाणे चितांमणी रत्नांचा एखादा कुल पर्वत निर्माण करता येईल, सात समुद्रानां अमृताने भरुन टाकणे सोपे होईल, तारकांना सुध्दा चंद्र करणे अवघड होणार नाही, कल्पतरुंची बाग करणेही कठिण होणार नाही, परंतु गीतेतील अर्थाचे वर्म सदगुरुंच्या कृपेशिवाय समजू शकणार नाही. तो मी ( ज्ञानदेव महाराज ) सर्व  प्रकारे मुका असुनही सदगुरुंच्या कृपाप्रसादाने गीतेचा भावार्थ मराठीत अशा रीतीने केला की सर्व लोकांना प्रत्यक्ष डोळयांनी दिसावा, त्याच्यांच कृपेने एवढा ग्रंथरुपी महासागर तरुन पलीकडे किर्तीरुपी विजयाचा झेंडा नाचविला.  (ओवी १७७१ ते १७८०)

गीतार्थाच्या आवारामध्ये अठराव्या कलश-अध्यायासह सर्व अध्यायांचे महामेरुसमान उंच, भव्य-दिव्य मंदिर तयार करुन त्यामध्ये सदगुरुंरुपी शिवलिगांची स्थापना केली, आता या शिवलिगांची पुजा या मी ज्ञानदेव महाराज ग्रंथाद्वारे करीत आहे, गीता ही  निष्कपट प्रेम करणारी माझी आणि आपणा सर्वाची आई आहे, पण त्या आईची आणि माझी चुकामुक होवुन मी ( ज्ञानदेव महाराज )   तान्हे बाळ इकडे-तिकडे व्यर्थ हिडंत होतो. त्या मायलेकरांची आज भेट झाली ती पुण्याई माझी नसुन तुमची आहे, तुम्ही संत-सज्जनांनी जी कृपा केली त्यामुळे मी ( ज्ञानदेव महाराज )  बोलत आहे, श्री ज्ञानदेव स्वत: म्हणतात की मी जे वर्णन केले ते लहान आहे पण तुमची कृपा मात्र महान आहे, अधिक काय सांगावे? तुम्ही हा जो ग्रंथसमाप्तीचा सोहळा दाखविला, त्यायोगे माझ्या ( ज्ञानदेव महाराजांच्या )  जन्माचे फळ मला प्राप्त करु‍न दिले, मी ( ज्ञानदेव महाराज ) ज्या ज्या सुखाची आशा केली होती तुमच्यावर विश्वास ठेवला होता. त्या त्या सर्व आशा तुम्ही पुर्ण करुन मला अंर्तबाहय आनंदी केले, हे स्वामी, माझ्या                   ( ज्ञानदेव महाराजांच्या ) माध्यमातुन तुम्ही ही जी ग्रंथाची दुसरी सृष्टी निर्माण केली ती पाहुन आम्ही प्रतिसृष्टी करणाऱ्या विश्वामित्रालाही हसतो, कारण ती नाशवंत सृष्टी त्रिशंकु राजाच्या निमित्ताने ब्रम्हदेवांस कमीपणा आणण्याच्या उद्देशाने विश्वामित्रांने उत्पन्न केली होती. हा ग्रंथ माझ्या   (ज्ञानदेव महाराजांच्या) साठी नसून सर्वासाठी आणि ब्रम्हदेवालाही आनंद देण्यासाठी आहे. भगवान शंकरांनी उपमन्युच्या प्रेमासाठी क्षीरसागर निर्माण केला परंतु या ग्रंथासाठी ती ही उपमा योग्य नाही कारण त्या क्षीरसागरातुंन समुद्रमंथनाच्या  वेळी काळकुट नावाचे अत्यंत विषारी विष बाहेर आले, परंतु या ग्रंथात संपुर्ण ज्ञानाचे अमृत भरलेले आहे, अंधकाररुपी राक्षसाने संपुर्ण चराचराला गिळुन टाकले परंतु सुर्याने आपल्या तेजाने चराचराला उजळुन टाकले, हा सुर्य चराचराला ताप देवुनच हे कार्य करतो, तुमचे विचार अज्ञानरुपी अंधकाराचा नाश करणारे आहेत, म्हणुन या ग्रंथाला सुर्याची उपमादेखील देता येत नाही, तप्त झालेल्या जगावर चंद्राने चांदण्याची बरसात केली पण तो चंद्र कलंकयुक्त आहे, म्हणुन या ग्रंथाला चंद्राची उपमा देता येत नाही. (ओवी १७८१ ते १७९०)

याकरीता तुम्ही कृपाळु संतजणानी माझ्याकडुन त्रैलोक्याला उपयोगी व्हावा असा जो ग्रंथ निर्माण करुन  घेतला तो खरोखर अनुपम आहे, महाराज, आता फार काय सांगावे? मला निमित्त करुन तुम्ही हे ग्रंथाचे किर्तन, निरुपन केले , तुम्हीच हा ग्रंथ सिध्दीस नेला, त्यामुळे या ग्रंथाच्या कर्तृत्‍वाविषयी माझा केवळ निमित्तमात्रपणा उरला आहे, आता विश्वरुपी देवाने या वागयज्ञाने संतुष्ट व्हावे, आणि संतुष्ट होवुन मला हे प्रसादाचे दान द्यावे. दुष्टांचा दुष्टपणा जावुन त्यांच्या मनात सतकर्माची प्रीती वाढत राहो, जीवमात्रांची एकमेकांवर खरी मैत्री वाढो, पापाचा अंधकार नाहीसा व्हावा आणि विश्वामध्ये स्वधर्मरुपी सुर्याचा उदय होवो आणि प्राणीमात्र ज्या ज्या सात्विक इच्छा करतील त्या त्या त्यांच्या इच्छा पुर्ण होवोत. सर्व प्रकारच्या मंगलाचा सदैव वर्षाव करणा-या ईश्वरनिष्ठ संतांचा समुदाय या भुमंडळावर सर्व प्राणीमात्रांस अखंड भेटत राहो. जे संत कल्पतरुचे चालते-बोलते उद्यान आहेत, सजीव चितांमणीचे गाव आहेत, जे अमृताचे बोलते सागर आहेत, ते कलकंरहीत चंद्रमा आहेत, जे उष्णतारहीत सुर्य आहेत ते संत-सज्जन सर्वाना सर्व काळ प्रिय होवोत फार काय मागावे? सर्व त्रैलोक्य आनंदाने परिपुर्ण होवुन प्राणीमात्रांनी आदिपुरुष परमात्म्याची अखंड भक्ती करावी. आणि या ग्रंथावर ज्याचे उपजीवन आहे, त्यांना इहलोकाचा व परलोकाचा आनंद प्राप्त होवो. (ओवी १७९१ ते १८००)

अशी प्रार्थना केल्यावर विश्वात्मक परमेश्वराशी ऐक्य पावलेले सदगुरु श्रीनिवृत्तीनाथ संतुष्ट होवुन म्हणाले, हा दानप्रसाद अवश्य होईल, या कृपाप्रसादरुपी मिळालेल्या वराने ज्ञानदेव अंर्तबाहय आनंदी झाले. याप्रमाणे कलियुगामध्ये महाराष्ट्राच्या भुप्रदेशावर श्री गोदावरीच्या दक्षिण तीरावर त्रैलौक्यात पवित्र असलेले अनादि पाच कोस विस्ताराचे जे क्षेत्र आहे त्या नेवाश्यामध्ये सर्व जीवांचे चालक श्रीमहालया म्हणजे मोहनीराज आहेत. ज्या क्षेत्रामध्ये विविध कलांनी परिपुर्ण व पृथ्वीचा धनी व न्यायाने प्रजेचे पालन करणारा यदुकुलभुषण रामराजा राज्य करीत होता. तेथे आदिशंकर यांच्य परंपरेने उत्पन्न झालेल्या श्रीनिवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव यांनी श्रीमदभगवत गीतेस मराठी भाषेचे लेणे केले. याप्रमाणे महाभारतातील  प्रसिध्द भीष्मपर्वात श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा जो सर्व श्रेष्ठ सुखसंवाद झाला ती गीता होय. जी गीता उपनिषंदाचे सार आहे सर्वच शास्त्राचे माहेर आहे परमहंस परिव्राजकाचार्यानी जिचे प्रेमभावाने सेवन केले आहे, अशी ही गीता परमहंसांचे मानसरोवर आहे. त्या गीतेचा हा अठरावा अध्याय महालय क्षेत्रांतील श्री करवीरेश्वराच्या (नावाच्या) भगवान श्री शंकरांच्या मंदिरात संपन्न झाला. असे सदगुरु श्रीनिवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव म्हणतात. उत्तरोत्तर या सर्व श्रेष्ठ ग्रंथराजाच्या पुण्यरुप संपत्तीने सर्व जीवमात्रांना परिपुर्ण आंनदाचा लाभ होवो. शालिवाहन शकातील बाराशे बारावे वर्ष जेव्हा होते. तेव्हा श्री ज्ञानेश्वरांनी गीतेवर अलैाकिक भाष्य सांगितले. श्री सच्चिदानंदबाबानी परमश्रध्देने आणि अत्यंत आदराने या ज्ञानदेवांच्या भाष्याचे लेखन केले.

        सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरीचा अठरावा अध्याय श्री भगंवताच्या कृपेने संपन्न झाला.

  (भगवदगीता श्लोक १ ते ७८ आणि ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी मराठीत भाषांतरीत ओव्या १ ते १८१०)