अध्याय १८ भाग ८

        परंतु असे कर्म करण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे किवां नाही याचा साधा विचारही न करता तो कर्म करु लागतो, माझे सामर्थ्य किती आहे? कर्म करीत असताना अचानकच कोणता  दुर्धर प्रसंग निर्माण होईल का? आणि कर्म संपल्यावर कोणते फल प्राप्त होईल? या विचाराला अविवेकाच्या पायाखाली तुडवुन टाकतो आणि मी हे कर्म करणारच असा अभिमान बाळगतो. लाकडात असलेला अग्नी जर चेतवला गेला असता भडकल्या नंतर लहान-मोठे, ओले-सुके लाकडे किवां जळणाऱ्या कोणत्याही वस्तु जाणत नाही तो स्वयंभू होतो, तसेच उफाणलेला समुद्र जेव्हा उग्र रुप धारण करतो तेव्हा आपल्या मर्यादा विसरुन जातो आणि नद्या, नाले, ओढे असे सारे जलमय झाल्यामुळे एकच दिसते, त्याप्रमाणे योग्य-अयोग्य असा कोणताही विचार न करता जे आपले ते आपले आणि दुसऱ्याचे तेही आपले असे समजुन जो कर्म करतो ते तामस कर्म आहे असे जाण. याप्रमाणे अर्जुना! गुणांच्या भिन्नपणाने कर्म तीन प्रकारचे कसे बनते याचे दृष्टासहित विवेचन केले आहे, या सात्विक, राजस आणि तामस कर्माचे आचरण करीत असता त्या त्या कर्माविषयी अभिमान ठेवणारा जो कर्ता जीव आहे तोसुध्दा तीन गुणांच्यामुळे तीन प्रकारांना प्राप्त झाला आहे. एकाच पुरुषावर ब्रम्हचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, व संन्यास या चार आश्रमांच्या योगे चार अवस्था दिसत असतात, त्याप्रमाणे कर्माच्या तीन प्रकारांमुळे कर्ता तीन प्रकारचा झाला आहे तर त्या तिहीपैकी जो सात्विक कर्ता आहे त्याचे प्रारंभी वर्णन करतो तरी एकाग्रतेने श्रवण कर. (ओवी ६२१ ते ६३०)

ज्याप्रमाणे मलय पर्वतावरील वंदनाच्या झाडास सुगंध असतो, त्याच्या फांद्या फळाची इच्छा न धरता सरळ वाढतात, नागवेलीला जरी फळ येत नाही तरीपण तिची पाने उपयोगी पडतात, त्याप्रमाणे सर्वोत्तम नित्य-नैमित्तीक कर्माच्या फळाची इच्छा न धरता त्या कर्माचे जो आचरण करतो, त्याच्या कर्माचे फळ व्यर्थ जाते असेही नाही, अर्जुना! नित्य नैमित्तीक कर्मे स्वताच्या फलरुप असल्यामुळे फळालाच फळे कशी बरी येतील? ज्याप्रमाणे वर्षा ऋतुमध्ये मेघ खुप पाऊस पाडतात, पण गर्जना करत नाहीत, त्याप्रमाणे सात्विक कर्ता हा परमश्रध्दने खुप कर्म करतो, परंतु कर्तृत्वाचा अभिमान बाळगत नाही. याप्रमाणे परमात्म्याच्या प्रतिमेला अर्पण करण्यास योग्य अशा कर्माचा समुदाय उत्पन्न होण्याकरीता शास्त्रविधीची आवश्यकता आहे. पुजेकरता शास्त्राने वर्णन केलेल्या कालाचे उल्लंघन न करणे, कर्माना जे  शुध्द स्थळ पाहिजे, तसे साधणे आणि कर्माचा निर्णय शास्त्राच्या दृष्टीने पाहणे, कर्मावाचुन दुसरीकडे वृत्ती जावु न देणे, कर्माच्या फळाकडे मनाला जावु न देणे आणि कर्माच्या आचरणासंबंधीने शास्त्रांनी घालुन दिलेल्या नियमांचे बंधन पाळणे हे सर्व निर्बधं पाळण्याकरीता दृढ धैर्य आपल्या अंगी असावे, यासाठी जो रात्रंदिवस त्याचा विचार करत असतो, आत्मज्ञानाच्या आवडीपुढे त्याला शारीरिक भोगसुखाचे महत्व वाटत नाही, नित्य-नैमित्तीक कर्मे करताना त्याची झोप दुर जाते, भुक त्याला पीडा करु शकत नाही, विषयांचे भोगसुख त्याच्या शरीराच्या स्थानास प्राप्त होत नाहीत. (ओवी ६३१ ते ६४०)

हिणकस सोने अग्नीमध्ये तापविले असता वजनात कमी भरते, तरी त्याचा कस वाढत असतो त्याप्रमाणे सात्विक कर्म करणाऱ्याचा उत्साह अधिकच वाढत असतो, एखाद्या स्त्रीच्या मनात पतीविषयी अंतकरणापासुन प्रेम असेल तर, पतीच्या मृत्यूनंतर तिला जगणे असह्य होते आणि मग ती पतीव्रता, पतीच्या देहाबरोबर अग्नीत उडी घेवुन सती जाताना तिच्या अंगावर भितीचे रोमांच दिसतील काय? त्याप्रमाणे अर्जुना! आत्मतत्वावर शुध्द प्रेम जडलेला साधक त्याचे शरीरास कष्ट झाले तरी तो खेद मानेल काय? जसजशी विषयभोगाची इच्छा कमी होते आणि मी म्हणजे देह ही धारणा नाहीशी होते तसतसा कर्मे करत असतानाचा आनंद व उत्साह दुप्पट वाढत असतो, याप्रमाणे कर्म करीत असताना काही कारणामुळे एकादे वेळी कर्म करण्याचे बंद पडले तरी पर्वताच्या कडयावरुन घसरलेला एकादा गाडा खाली पडुन  मोडतो त्यावेळी तो स्वतावर संकट आले असे मानत नाही, त्याप्रमाणेच जो कर्म बंद पडल्यामुळे जो मनात उद्विग्नही होत नाही, अथवा आरंभिलेले कर्म  निर्दोष होवुन सिध्दीस गेले तर आपण अंतकरणात आढळतील त्याला निश्चयाने सात्विक कर्ता म्हणावे. धनंजया! आता राजस कर्त्याची चिन्हे तुला सांगतो, तो राजस कर्ता जगातील सर्व अभिलाषांचे आश्रयस्थान झालेला असतो. ज्याप्रमाणे गावातील सर्व घाण उकिरडयात टाकतात, अथवा जसे सर्व अमंगल स्मशानात एकत्र आलेले असतात. (ओवी ६४१ ते ६५०)

त्याप्रमाणे असे पहा की, विश्वातील सर्व इच्छांचे पाय धुण्याचे तो घर झाला आहे, म्हणुन ज्या कर्मामध्ये सहजपणे फळ मिळण्याची शक्यता दिसते त्या कर्माच्या ठिकाणी तो  आदराने आरंभ करतो आणि आपणास प्राप्त झालेल्या संपत्तीपैकी जो एक कवडी देखील खर्च होवु देत नाही त्या द्रव्यावरुन तो जीव ओवाळून टाकतो, कृपण मनुष्य आपण मिळविलेल्या पैशावर जसे नेहमी लक्ष ठेवतो अथवा बगळा पाण्यात जसे माशाकरीता ध्यान धरुन एक पायावर तटस्थ उभा असतो, त्याप्रमाणे राजस कर्ता दुसऱ्याच्या मौल्यवान वस्तुवर नजर ठेवुन असतो.बोरीच्या झाडाजवळ गेले असता जसे आपले वस्त्र त्याच्या काटयात अडकते, ते सोडवु लागलो तर जसे अंगास काटे ओरखडतात,व त्याची फळे खाल्ली असता घशास पोळून निघते, त्याप्रमाणे मनाने, वाणीने आणि शरीराने जो कोणालाही दुख देत रहातो आणि स्वताचा स्वार्थ साधताना दुसऱ्याचे हित बघत नाही, मसेच स्वताचे जे कर्म आरंभिलेले असते ते निरंतर चालवण्याचा ज्याचा नेम नसतो व त्या कर्माविषयी ज्याचे मनाला कधीही कंटाळा येत नाही, धोतऱ्याच्या फळाच्या आत गुंगी आणणारा मादक पदार्थ असतो, आणि बाहेर काटे असतात त्याप्रमाणे आत-बाहेर जो पावित्र्याविषयी दरिद्री  असतो. हे धनंजया!  अनेक कर्म केल्यानंतर जर फळ प्राप्त झाले तर जो हर्षाने जगास वेडावुन दाखवितो, अथवा आरंभ केलेले कार्य फलद्रुप झाले नाही तर शोकाने त्या कर्माचा धिक्कार करतो. (ओवी ६५१ ते ६६०)

अशा प्रकारे कर्माविषयी ज्याची वागणुक असेल तो राजस कर्ता आहे असे निश्चीत जाणावे. आता यानंतर वाईट कर्माचे आगर आहे असा तामस कर्ता त्याच्या विषयी स्पष्ट पणे सांगत आहे. आपल्या स्पर्शामुळे समोर येणारे पदार्थ कसे जळतात हे अग्नीला समजत नाही, आपल्या तीक्ष्ण धारेने दुसऱ्याचा जीव कसा जातो हे शस्त्राला जसे समजत नाही, अथवा आपल्या योगे दुसऱ्याचा नाश होईल अशा वाईट क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो,  क्रिया करताना त्या कशा होत आहेत शिवाय त्यापुढे त्यांचे काय झाले याची सावधगिरी जो ठेवीत नाही, वावटळीत सुटलेला वारा जसा हवा तिकडे भटकतो त्याप्रमाणे जो वाट्टेल ती क्रिया करतो, हे धनंजया!  ज्याच्या कृतीत व इच्छेत काही मेळ नसतो विचार आणि पुर्वनियोजन काही नसते तो तामस कर्ता पाहिला असता त्याच्या पुढे वेडयाची किंमत ती काय?  बैलाच्या पोटाला लागलेले गोचीड रक्त पिवुन स्वताच्या जीवाचे रक्षण करते तसे इंद्रियाने दिलेले भोग भोगुन जो आपल्या जीवीताचे रक्षण करतो,  लहान मुल जसे योग्य-अयोग्य वेळ न जाणता निष्कारण  रडण्यास व हसण्यास आरंभ करते त्याप्रमाणे जो स्वैर वागतो, प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे काय करावे आणि काय न करावे याविषयी ज्याला ज्ञान नसते, उकिरडा जसा केर-कचऱ्याने भरुन जातो, त्याप्रमाणे स्वैर आचरणाने तो गर्वाने फुगत असतो. (ओवी ६६१ ते ६७०)

गर्वाच्या भरात तो ईश्वरापुढेही नम्र होत नाही आणि ताठरपणाच्या बाबतीत तो डोगरांलाही मान देत नाही, गर्वामुळे तो अतिशय ताठ असतो, ज्याच्या मनात दुष्ट विचार सुरु असतात ज्याचा सर्व व्यवहार चोरटा असतो, ज्याच्या दृष्टीमध्ये वारांगणेचा कृत्रिम जिव्हाळा असतो, फार काय वर्णन करावे? त्याचा देहच कपटाने बनलेला असतो, ज्याचे आयुष्य म्हणजे जुगाराचे वाईट कृत्याचे स्थान असते. त्याचा जन्म म्हणजे अनेक इच्छज्ञंनी भरलेल्या लुटारु लोकांचे प्रत्यक्ष वसतिस्थान असते, त्याच्या वाटेने कोणी येवु जावु नये, त्या तामस कर्त्याची कधी संगती करु नये, दुसऱ्याची प्रगती झालेली पाहुन आपल्या मनाविरुध्द घटना झाली असे त्याला वाटते त्याच्या मनात सदैव मत्सर असतो, मीठ दुधामध्ये मिसळले असता ते दुधास पिण्याला अयोग्य करुन टाकते, अथवा कितीही थंड पदार्थ अग्नीमध्ये घातला तरी त्या क्षणी धडधडीत तो अग्नीरुप होतो, अथवा अर्जुना! ज्याप्रमाणे कितीही उत्तम प्रकाराची पक्वान्ने खाल्ली तरी पोटात गेल्यावर त्याचा मलच होतो, त्याप्रमाणे दुसऱ्याचा उत्कर्ष झालेला ऐकला किवां पाहीला तर तो त्याला सहन होत नाही आणि द्वेष-निंदा यांच्यात रुपांतर होवुन तो त्याच्या मुखावाटे बाहेर पडतो, सापाला दुध पाजल्यानंतर त्याचे विषच होते, त्याप्रमाणे जो दुसऱ्याचे गुण पाहुनदेखील दुसऱ्याला नावेच ठेवतो, जे कर्म केले असता इहलोकांमध्ये सुखाने जगणे होईल आणि परलोकांमध्ये निश्चीत जाता येईल त्याला असे उत्तम कर्तव्य कर्म करणे ज्या प्रसंगी प्राप्त होते. (ओवी ६७१ ते ६८०)

त्या वेळी त्याला आपोआप हटकुन झोप येते, आणि वाईट कर्म करणे ज्या प्रसंगी प्राप्त होते त्या वेळी तीच झोप विटाळशी सारखी दुर रहाते, द्राक्षांचा रस आणि आंब्याचा रस ज्या वेळी फळामध्ये परिपक्व होत असतो त्याच वेळी कावळयास मुख रोग होतो अथवा घुबडाचे डोळे फुटतात, ज्या वेळेस पवित्रकाळ किवां कल्याणकाळाची वेळ येते त्यास आळस ग्रासुन टाकतो आणि वाईट कर्म करण्याच्या वेळी तोच आळस त्याच्या हुकूमाप्रमाणे वागतो. ज्याप्रमाणे सागराच्या पोटामध्ये वडवाग्नी अखंडपणे जळत असतो, त्याप्रमाणे याच्या अंतकरणात दुसऱ्याच्या उत्कर्ष सहन होत नाही, असा विषाद निर्माण होतो ज्याप्रमाणे लेंडयाच्या विस्तवामध्ये शेवटपर्यत धुरच भरलेला असतो, गुदद्वारातुन निघणाऱ्या अपान वायुत शेवटपर्यत दुर्गंधीच असते, त्याप्रमाणे तो मृत्यूपर्यत मनामध्ये विषादच बाळगत असतो, हे अर्जुना! जो कल्पाच्या अतांनंतरही फळाची प्राप्ती व्हावी अशा तीव्र इच्छेने व्यापाराचे धोरण आखत असतो, जगातील लोक जे व्यापार करीत नाहीत, ते करण्याविषयी मनामध्ये तीव्र इच्छा धरुन तो कर्म करीत असतो. परंतु त्यात त्याला काडीचाही त्रास होत नाही, असा जो लोकांमध्ये पापांची मुर्तीमंत रासच आहे, तो निश्चीतपणे तामस कर्ता आहे असे जाणावे. हे सृजनांच्या राजा अर्जुना! याप्रमाणे तुला कर्म, कर्ता व ज्ञान या तिन्हीचे तीन प्रकारचे लक्षण स्पष्ट पणे सांगितले आहे.  आता अविद्येच्या गावात मोहाचे नवे कोरे वस्त्र नेसुन आणि सर्व संशयरुपी अलंकार घालुन जी बुध्दी म्हणजे जीवाच्या स्वरुपाच्या निश्चयाची शोभा पाहण्याचा जणू मुर्तीमंत आरसा आहे.(ओवी ६८१ ते ६९०)

त्या बुध्दीची प्रवृत्ती तीन प्रकारची आहे. अरे, असे पाहा की, या सात्विक, राजस आणि तामस या तिन्ही गुणांनी जगातील कोणत्या वस्तुचे तीन प्रकार केले नाहीत, ज्याच्या पोटात अग्नी नाही, असे कोणते लाकुड आहे? त्याप्रमाणे दृश्य वर्गात जे सर्व पदार्थ येतात, त्यापैकी असा कोणता पदार्थ आहे की जो गुणांच्या भेदामुळे तीन प्रकारचा होत नाही, म्हणुन तीन गुणांनी बुध्दी तीन प्रकारची केलेली आहे, धैर्याचे देखील तीन भाग केले आहेत तीच एक बुध्दी व धैर्य निरनिराळी यथायोग्य लक्षणांनी अलंकृत झालेली आणि गुंणभेदाने विस्तारलेली आहे, ते तुला भिन्नत्वाने सांगणार आहे. परंतु अर्जुना! बुध्दी व धैर्य या दोन्हीपैकी प्रारंभी बुध्दीच्या भेदांची लक्षणे सांगतो, हे उत्तम योद्वा अर्जुना!  जन्माला येणाऱ्या प्रत्येक प्राण्याकरता उत्तम, मध्यम आणि अधम असे तीन प्रकारचे  मार्ग आहेत. कारण की,  विहीत कर्म न करणे काम्य कर्म करणे व निषिध्द कर्म करत रहाणे, असे तीन मार्ग आहेत. यापासुन प्राणीमात्राला संसारभेद प्राप्त होत असतो. म्हणुन अधिकारानुरुप व विधीच्या मार्गाने वाटयाला आलेले जे नित्यकर्म तेच काय एक या जगात आचरण करण्यास चांगले आहे. ज्याप्रमाणे तहान लागली तर ती तहान भागविण्या करता केवळ पाणी प्यावे त्याप्रमाणे आत्मपाप्ती व आत्मदृष्टी ठेवुन शास्त्रविहीत नित्यकर्म करावे. (ओवी ६९१ ते ७००)

पुढील भाग