अध्याय १ भाग १

||श्री ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी ||

सार्थ भगवद् गीता अध्याय – १

अर्जुनविषाद योग

          श्री ज्ञानदेवांनी भगवद् गीतेतील अध्याय – १ मधील “अर्जुनविषाद योग” या अध्यायातील   १ ते ४७ संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन २७५ ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे. खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे, परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री निवृत्तीनाथांचे परमशिष्य श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहे. हा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य  कृपा-प्रसाद आहे, मनुष्य जीवन जगण्यासाठी अनमोल संजीवनी आहे, किंबहुना संसारसागर पार करण्यासाठी अध्यात्मातील नौका आहे, तिच्या मदतीने संसार करता सावरता आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनसागरातुन तरुन जावे आणि आपल्या जीवनाचे कोटकल्याण साधावे. ही ज्ञानदेवांची “अक्षरब्रम्ह ज्ञानेश्वरी” आत्मसाद करुन जीवनाचे सार्थक करावे.

     (आत्मरूप-वंदन) अनादिसिध्द वेदांनी वर्णन केलेल्या,ज्याच्या-त्याच्या स्वत: प्रत्ययास येणाऱ्या , विश्वस्वरूप निर्गुण आत्मरुपा ,तुझा जयजयकार करून तुला नमस्कार करत आहे. ॥१॥  

        (ॐ कार रुप गणेश- वंदन) हे देवा सर्व विश्वाच्या बुध्दीला प्रकाश देणारा जो गणेश ,तो तुच आहेस. निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात,तो गणेश कसा आहे,ते अवधानपूर्वक ऐक.॥२॥ संपुर्ण वेद हिच जणू काही उत्तम पोषाख केलेली गणेशाची मूर्ती होय आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून दिसते आहे.॥३॥ मन्वादिकांच्या स्मृती हे त्याचे अवयव आहेत.ते अवयव या स्मृतीतील अर्थसौंदर्याने जणू लावण्यांची केवळ खाणच बनले आहेत.॥४॥ अठरा पुराणे हे गणपतीच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत. त्यामध्ये सांगितलेली तत्वे ही रत्ने ,आणि शब्दांची छंदयुक्त रचना ही त्यांची कोंदणे आहेत.॥५॥

       लालित्यपूर्ण पदरचना हेच उत्कृष्ट रंगाने रंगविलेले वस्त्र आहे. शब्द-अंलकार आणि अर्थ-अंलकार हे त्या वस्त्रातील तेज:पुंज दिसणारे जरीचे तलम तंतू आहेत. काव्य आणि नाटक यांचा कौतुकाने विचार केला असता, घागऱ्यानां बसविलेल्या घुंगरांचा मंजूळ असा ध्वनी आहे. व्यास, वाल्मीकी, भरतमुनी यांच्या काव्य – नाटकातील विविध सिध्दांताच्या शब्दांच्या एकाग्रतेने अभ्यास केला तर त्यात कवीचे अलौकिक कौशल्य दिसुन येते.

        अशी ही अनमोल शब्द -घाग-यातील उत्तमोत्तम रत्ने आहेत. महर्षी व्यासादिकांची बुध्दीही गणपतीची मेखला म्हणजे कटिभुषण होय. त्याला लोंबत असलेल्या मोत्यांच्या पदरातील घोष हे त्या बुध्दीतील शुध्दत्व सात्विकपणे झळकत आहे. गणपतीचे सहा हात ही सहा शास्त्रे होत ,म्हणून त्यातील विविध प्रकारचा अभिप्राय ही त्या त्या हातातील वेगवेगळी शस्त्रे होत. न्याय दर्शनातील सोळा पदार्थाचे विश्लेषण करणारा तर्क म्हणजे गणपतीच्या हातातील परशू होय.वैशेषिक दर्शनातील सात पदार्थाचा सिध्दान्तभेद हा दुसऱ्या हातातील अंकुश आहे आणि उत्तरमीमांसा दर्शनातील ब्रम्हस्वरुप सिध्दांत हा गणपतीच्या हातातील अमृतमधुर मोदक होय. वार्तिककारांनी सांगितलेले आणि स्वभावत:च खंडीत झालेले जे बौध्द मत आहे, ते एका हातात असणाऱ्या खंडित दाताच्या ठिकाणी शोभते. सत्कारवाद हा गणपतीचा वर देणारा कमलासन हात होय.

        हा धर्माची  सिध्दी करतो आणि हा अभय देणारा हात आहे. गणपतीच्या ठिकाणी ब्रम्हांनद ही सरळ, निर्मळ आणि चांगले व वाईट याची निवड करण्यास समर्थ अशी सोंड आहे.  गुरू-शिष्याचा हा सुखसंवाद म्हणजे गणपतीच्या मुखातील दात असुन ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व भूतमात्राच्यां ठिकाणी निर्माण होणारी समता हा त्या दाताचा पांढरा रंग होय. ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचें सुक्ष्म असे नेत्र होत.  ( ओवी ६ ते १५ )

         पुर्वमिमांसा आणि उत्तरमिमांसा हिच त्या गणपतीच्या कानाच्या ठिकाणी असुन बोध हे त्याचे मदरुपी अमृत मुनिरुपी भ्रमर सेवन करतात ,असे मला वाटते. वेदशास्त्रपुराणात सिध्दांतरुपाने सांगितलेली तत्वे ही गणपतीच्या अंगावरील तेजयुक्त पोवळी होत. द्धैत आणि अद्धैत मते ही मस्तकावरील गंडस्थळे असुन सारखेपणाने ती तेथे एकत्र झाली आहेत. ज्ञानरूपी मकंरद ज्यामध्ये परिपूर्ण भरलेला आहे, अशी ईशावास्य इत्यादी दहा उपनिषदे ही जणू सुगंधी फुले असून मी गणपमीच्या मुकुटावर उत्तम तऱ्हेने शोभून दिसत आहेत. ओमकाराची पहिली मात्रा हे गणपतीचे दोन्ही पाय आहेत. दुसरी उकारमात्रा हे त्यांचे मोठे पोट आहे. तिसरी मकारमात्रा हा त्याच्या मोठया वाटोळया मस्तकाचा आकार आहे. अकार, उकार, मकार या तिन्ही मात्रा एकत्रित झाल्या म्हणजे त्या ओमकारात संपूर्ण वेद संक्षेपाने समाविष्ठ होत असतो.त्या बीजरूप ओमकाररदेवरायास मी सदगुरू श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेने  नमस्कार करतो.

(सरस्वती – वंदन ) या नंतर नित्य नुतन प्रतिभा आणि वाणीच्या रुपाने क्रीडा करणारी चातुर्य,अर्थ व कला यांची कामिनी, विविध रस आणि अलंकार युक्त मधुर भाषेद्धारे संपुर्ण विश्वाला मोहित करणारी अशी जी शारदा ,तिला मी विनम्र भावाने नमस्कार करतो.                        

 ( सदगुरू- वंदन ) श्री सदगुरुनी सांगितलेले ज्ञान मी माझ्या हदयामध्ये साठविले ,त्यामुळे मला भवसागर तरुन जाता आला. म्हणून अंत:करणातील विवेकावर माझे आत्यांतिक प्रेम आहे. ज्याप्रमाणे पायाळू माणसाच्या डोळयात अंजन घातले असता त्याची दृष्टी सर्वत्र पसरते आणि त्याला भूमीमध्ये असणाऱ्या संपत्तीचा ठेवा दिसू लागतो. मनोकामना पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला असता सर्व हेतू पूर्ण होतात , त्याप्रमाणे सदगुरू निवृत्तीनाथां मुळे मी पूर्णकाम झालो आहे .माझ्‍या सर्व इच्छा पुर्ण झाल्या आहेत असे ज्ञानदेव म्हणतात . यासाठी जाणकारांनी सदगुरूवर परम श्रद्धा ठेवून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे , म्हणले जीवन कृतकृत्य होईल. जसे झाडाच्या मुळाला पाणी घातले असता फांद्या व पाने सहजच विकसित होतात .(ओवी १६ ते २५ )

       एका समुद्र स्नानामुळे त्रैलोक्यात जेवढी तीर्थे आहेत, त्या सर्वाचे स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते किवां एका अमृतरसाच्या सेवनाने जगातील सर्व रस सेवन केल्याप्रमाणे होते. एका सदगुरूनां वंदन केले की, सर्वाना वंदन केल्याचे पुण्य प्राप्त होते, म्हणून मी वारंवार सदगुरूंना वंदन करतो, जे सदगुरू मनातील सर्व सदिच्छा पूर्ण करतात .                 

(महाभारत -महिमा) आता सखोल विचारांची कथा श्रवण करा. हि कथा सर्वाच्या मनात कौतुक उत्पन्न करणारी आहे अथवा विवेकरूपी वृक्षाचे नाविन्यपूर्ण उद्यान आहे. ही महाभारतातील गीतारूपी कथा सर्व सुखांचे मूळ कारण आहे. हे सर्व प्रमुख सिद्धांतांचे भांडार आहे किवां नवरसांनी परिपूर्ण भरलेला अमृताचा सागर आहे.  किवां महाभारताच्या रूपाने मोक्षच प्रगटलेला आहे. ते सर्व विद्याचे मूळपीठ आहे .जगातील सर्व ज्ञानाचे आश्रयस्थान आहे. महाभारत हे सर्व धर्माचे माहेर आहे , सज्जनांच्या जिव्हाळयाचा, आनंदाचा विषय आहे, आणि सरस्वतीच्या सौदर्यरूपी रत्नांचे भांडार आहे.

         सरस्वती ही महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीत प्रगट होउन विविध कथेच्या रुपाने त्रैलोक्यात प्रसारित झाली.  हा महाभारत ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी महानतेची परिसीमा झाली आहे. या ग्रंथापासून काव्यातील रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. तसेच या ग्रंथाचे आणखी महत्व श्रवण करा .महाभारतापासून शब्दरूप संपत्तीला शारत्रीयता प्राप्त झाली आणि ब्रम्हज्ञानाच्या ठिकाणी कोवळिकता अधिकच वाढली. या महाभारतात चातुर्य शहाणे झाले .सिद्धांतांना अमृतमय  गोडी प्राप्त झाली आणि सुखाचे ऐश्वर्य अधिकच पुष्ट झाले. (ओवी २६ ते ३५ )

         माधुर्याला मधुरता, शृंगाराला सुरेखपणा आणि योग्य वस्तूंना श्रेष्ठपणा येवुन त्या सर्व उत्तम रीतीने शोभून दिसू लागल्या. यातील कथे पासून कलांना विशेष कौशल्य प्राप्त झाले. पुण्याचा प्रताप वाढू लागला. महाभारताच्या श्रवणाने जनमेजयाचे ब्रम्ह हत्येचे दोष नाहीसे झाले. सुक्ष्म बुद्धीने महाभारताचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की. विविध कलांतील गुढ त्याने वाढले. या कथेमुळे सदगुणांचे सामर्थ्य प्रगट झाले. सुर्याच्या तेजाने त्रैलोक्य जसे उजळून निघते, त्याप्रमाणे महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीतून निर्माण झालेल्या या कथेमुळे सर्व जगावर ज्ञानाचा प्रकाश पसरला आधि ते शोभून दिसू लागले.                    

         उत्तम जमिनीत बी पेरले असता जसा त्याचा सहजच विस्तार होत जातो, त्याप्रमाणे महाभारतात सर्व विषय शोभायमान झाले आहेत. ज्याप्रमाणे नगरात राहिल्यावर मानवास शहाणपण प्राप्त होते, त्याप्रमाणे व्यासांच्या सात्विक वाणीच्या तेजामुळे सर्व जग ज्ञानसंपन्न झाले. तारूण्यात पदार्पण केल्यानंतर मुलीच्या अंगी सौदर्याचा नवा बहर आलेला असतो आणि तो स्पष्टपणे दिसू लागतो. वंसत ऋतूचे आगमन झाले ,की बागेतील वनशाभा पूर्वी पेक्षा अधिकच बहरुन येते ,जणू काही सौदर्याची खाणच उघडते. लगडीच्या रूपात सोने पाहिले, तर त्याचे सौदर्य विशेष रूपाने खुलून दिसते. महर्षी व्यासांच्या तेजस्वी बुद्धीतून प्रगटलेल्या विषांमध्ये सत्य,शिव आणि सुंदरतेचे दर्शन होते,  हे पाहून जगातील अनेक इतिहासकारांनी महाभारताचा आश्रय केला आहे. ( ओवी ३६ ते ४५ )

          आपणास मोठी प्रतिष्ठा लाभावी म्हणून स्वत:च्या अंगी नम्रता धरून सर्व पुराणे आख्यानरूपाने महाभारतात येउन जगामध्ये प्रसिद्ध पावली. म्हणूनच महाभारतामध्ये जे नाही, ते तिन्ही लोकांमध्ये नाही .महर्षी व्यासांच्या नंतर त्रैलोक्यात जे भाष्यकार झाले,त्यांनी महाभारतातील सिद्धांतांचा अभ्यास केला.’ व्यासोच्छिष्टं जगत्‍त्रय ‘असे म्हणतात. अशी ही जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली आणि परमार्थाची जन्मभूमी असलेली महाभारताची कथा आहे. ही कथा जनमेजय राजाला वशेपायन ऋषींनी सांगितली. श्रोते हो ! ही कथा एकाग्रतेने श्रवण करा. हे महाभारत अद्धितीय,उत्तम,अतिपवित्र निरुपम आणि सर्व मांगल्याचे परम स्थान आहे.

       (गीता महात्म) महाभारत हे जणू काही कमळ असून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास सुखसंवादाच्या रुपाने सांगितलेली गीता हा जणू काही त्यातील सुगंधी पराग आहे. महर्षी व्यासांनी आपल्या प्रखर बुद्धीने वेदरुपी समुद्राचे मंथन करुन महाभारतरुपी अनुपमेय नवनीत काढले , मग ते नवनीत ज्ञानरुप अग्नीच्या सबंधाने विवेकपूर्वक कढविले ,आणि त्याचा उत्तम परिपाक होउन त्या लोण्याचे सुगंधी साजूक तूप झाले, ते म्हणजे ‘गीता’होय. वैराग्यवान देखील या गीतेची इच्छा करतात. संत देखील या गीतेचा अनुभव घेतात. ‘तो परमात्मा मी आहे (अहं ब्रम्हास्मि) अशा अभेद भावात असणारे ब्रम्हनिष्ठ देखील या गीतेत रममाण होतात.भक्त जिचे परम श्रद्धेने श्रवण करतात. जी त्रैलोक्यात प्रथम वंदनीय आहे, जी भीष्मपर्वात प्रसंगाच्या अनुरोधाने सांगितली आहे. ती भगवदगीता होय. ब्रम्हदेव आणि महादेव तिची स्तुती करतात,सनकादिक परम श्रद्धेने तिचे श्रवण, पठण,मनन करतात.(ओवी ४६ ते ५५ )

 पुढील भाग