अध्याय-२-भाग-४

             हे अर्जुना ! निष्काम कर्मयोगातील बुध्दी ज्याने आचरली  त्याला कर्मबंध मुळीच बाधा  करू शकत नाहीत. ज्याप्रमाणे अंगात वज्रकवच घातले म्हणजे शस्त्रांचा वर्षाव सहन करता येतो शस्त्राचा स्पर्शही न हाहेता विजय प्राप्त करुन सुरक्षित राहता येते त्या प्रमाणे ऐहिक सुख नाहीसे न होता मोक्ष‍ दूर राहत नाही कर्मयोगात पूर्वीपासूनचे कर्म शध्द रूपात सुरू असलेले दिसुन येते शास्त्रशुध्द कर्माच्या आधाराने वागावे ; परंतु कर्मापासून होणाऱ्या फळाची इच्छा करू नये. ज्याप्रमाणे मंत्र जाणणाऱ्यास भुताची बाधा होत नाही त्याप्रमाणे अंत:करणात अनासक्त भावाने कर्म करण्याची सदबुध्दी निर्माण झाली म्हणजे देह धारण करून देखील उपाधी निर्माण होत नाही ज्या बुध्दीला पाप-पुण्याची बाधा होत नाही, जी खूप सूक्ष्म असून निश्चळ आहे आणि जिला सात्विक, राजस, तामस या गुणांचा लेप लागत नाही.

          अर्जुना, पूर्वपुण्याईने हदयात थोडी देखील सदबुध्दी लहान आहे असे मानू नये. हे अर्जुना ! विचारी लोक विविध प्रकारच्या प्रयत्नांनी ही सदबुध्दी प्राप्त होण्याची इच्छा करतात कारण  या चराचरात ही सदबुध्दी प्राप्त होणे दुर्लभ आहे. ज्या प्रमाणे अनेक वस्तु मिळतात परंतु परीस मात्र मिळत नाही तसेच भाग्याने अमृताचा एक  बिदूं जसा मिळतो. (ओवी २३१ ते २४० ) त्याप्रमाणे परमेश्वराशी एकरूपता प्राप्त करुन देणारी सदबुध्दी अतिशय दुर्लभ आहे. ज्याप्रमाणे गंगा जशी शेवटी सागरालाच मिळते त्याप्रमाणे जिला ईश्वरावाचून दुसरे आश्रय स्थान नाही अर्जुना ! अशी या जगामध्ये ती एकच सदबुध्दी आहे हे जाण. इतर त्या दुर्बुध्दी आहेत त्या ठिकाणी अनेक विकार निर्माण होतात अविचारी लोक या दुर्बुध्दीमध्ये निरंतर रमून गेलेले असतात.

          म्हणून हे पार्था ! त्यांना स्वर्ग, संसार व नरक प्राप्त होतात पण‍ आत्मानंदाचा अनुभव काही प्राप्त होत नाही ते वेदांतील वचनांचा आधार घेउन बोलतात केवळ कर्मभागाचे श्रेष्ठत्व सिध्द करतात परंतू कर्मफळाची आसक्ती त्यांच्या हदयात असते ते म्हणतात, इहलोकात वारंवार जन्माला यावे यज्ञादी कर्माचे आचरण करावे आणि मनोहर स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा इहलोकी उपभोगाच्या सुखासारखे दूसरे सुख नाही. असे दुर्बुध्दी असलेले हे लोक बोलतात  अर्जुना ! हे तू जाण असे पाहा की  केवळ सुखाच्या उपभोगाकडे लक्ष ठेवुन आणि फळाची इच्छा मनात धरून ते कर्मे करतात शास्त्रशुध्द विधीप्रमाणे ते अनेक प्रकारची कर्मे करतात आणि त्यात निपुण होउन धर्माचे अनुष्ठान करता परंतु ते एकच वाईट गोष्ट करतात. ती म्हणजे मनामध्ये ते स्वर्गाची इच्छा करतात आणि यज्ञाचा भोक्ता जो परमात्मा , त्यालाच नेमके विसरतात. (ओवी २४१ ते २५०)

            ज्या प्रमाणे कापराची रास करावी आणि तिला अग्नी लावून द्यावा किवां मिष्टान्ना मध्ये काळकूट नावाचा विष मिसळावे. किवां भाग्याने मिळालेला अमृताचा कुंभ पायाने पालथा करून टाकावा त्याप्रमाणे फलाच्या आशेने आचरलेला धर्म विनाकारण व्यर्थ घालविता अपार कष्टाने पुण्य  प्राप्त करावे आणि मग संसारातील फळाची अपेक्षा का करावी? पण सदबुध्दीचा महिमा त्यांना माहीत नसतो. अशा अज्ञानी लोकांना समजत नाही तर काय करावे.

           ज्याप्रमाणे एखाद्या सुगरण अशा स्त्रीने रूचकर स्वयंपाक बनवावा आणि तो द्रव्याच्या आशेने विकून टाकावा त्याप्रमाणे अविचारी लोक सुखाच्या उपभोगासाठी धर्म व्यर्थ घालवितात. म्हणून हे अर्जुना ! वेदांतील अर्थवादात रमुन गेलेल्या लोकांच्या मनात सदैव वसत असते हे लक्षात ठेव. वेद सात्विक, राजस, तामस या तिन्ही गुणांनी गुंफलेले आहेत. त्यापैकी उपनिषदे जेवढी आहेत ती सात्विक आहेत. हे धर्नुधरा, वेदांतील इतर भाग रजोगुण व तमोगुणाचे मिश्रण आहे त्यामध्ये ऐहिक फलाची प्राप्ती करुन देणारे स्वर्गसूचक सकाम  कर्म सुख – दुख निर्माण करणारे आहे तरी तू आपले मन तेथे एकाग्र करू नकोस मी आणि माझे हा विचार त्यागून तू तिन्ही गुणांच्या पलिकडे जा. अंत:करणामध्ये आत्मसुखाचा विसर कधीही पडू देउ नकोस. जरी वेदांमध्ये अनेक प्रकारचे विचार सांगितले असले विविध प्रकारचे भेद सांगितले असले, तरी ज्यांच्यामध्ये आपले हित आहे, तेच विचार आपण ग्रहण करावेत.           (ओवी २५१ ते २६० )

            ज्याप्रमाणे सुर्याचा उदय झाला असता सर्वच मार्ग दिसु लागतात परंतु त्या सर्वच मार्गानी माणूस जाउ शकतो काय हे सांग बरे. किवां पृथ्वीवर उदंड पाणी असले  तरी आपण आपणास लागणार तेवढेच पाणी घेतले पाहिजे त्याप्रमाणे खरे ज्ञानी असतात ते संपूर्ण वेदांचा विचार करतात आणि त्यातील अपेक्षित अशा शाश्वत परब्रम्हाचाच फक्त स्वीकार करतात. म्हणून अर्जुना, ऐक. या सर्व गोष्टीचा विचार केला तर तुला आता स्वकर्म करणेच उचित आहे  आम्ही सर्व गोष्टीचा विचार केला त्यावेळी आमच्या मनात असे आले की तु आपले विहित कर्म सोडू नये  तू कर्मफळाची इच्छा मनात धरू नये वाईट कर्माची संगती करू नये फळाची इच्छा न ठेवता सत्कर्म करत राहावे.

            अर्जुना ! तू समता रुपी योगाने युक्त हो फळाच्या आसक्तीचा त्याग कर आणि चित्त एकाग्र करून कर्मे कर परंतु दैवयागाने तू आरंभलेले कर्म पूर्ण झाले तरी त्याचा तू विशेष संतोष मानू नकोस किवां कोणत्याही कारणाने तू आरंभिलेले कर्मे सिध्दीस गेले नाही अर्धवट राहिले तरी देखील तू असंतोष मानू नकोस व मनाला त्रास करून घेउ नकोस कर्म सिध्दीस गेले तर खरोखर आपले काम झाले आणि जरी ते अपूर्ण राहिले तरी ते सफल झाले असे समजावे. (ओवी २६१ ते २७० )

             असे पाहा की, जेवढे कर्म केले जाते तेवढे आदिपुरूष जो ईश्वर, त्याला जर अर्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले असे समज.हे पाहा, पूर्ण झालेल्या कर्मा विषयी आणि अपुर्ण राहिलेल्या कर्मा विषयी मनाचा समतोलपणा राखणे हीच खरी योगस्थिती होय या योगस्थितीची प्रशंसा ज्ञानी पुरूष करतात. अर्जुना ! जय अथवा पराजय याविषयी चित्ताची समता हे योगाचे सार आहे या योगामध्ये मन आणि बुध्दी यांचे ऐक्य झालेले असते.

           पार्था ! बुध्दीयोगाची आणि कर्मयोगाची तुलना केली तर अनेक प्रमाणानी सकाम कर्मयोग हा कमी प्रतीचा दिसतो. वेदांत सांगितलेली काम्य कर्मे शास्त्रविधी प्रमाणे करावीत म्हणजे हा कर्मयोग प्राप्त होतो कारण‍ सकाम कर्मा मधील फळाची अपेक्षा आणि कर्तृत्वाचा अभिमान हे दोन्ही नाहीसे होउन जे कर्म शिल्लक राहते ती सहजच योगसिध्दी होय. म्हणून  हे अर्जुना ! बुध्दीयोग हाच आनंदाचा आधार आहे त्या ठिकाणी तु आपले मन स्थिर कर मनामध्ये फळाच्या प्राप्तीची आशा करु नकोस. जे बुध्दियोगाचा आश्रय करतात ते संसार सागराच्या पलीकडे जातात आणि त्यांची पाप-पुण्याच्या चक्रातुन सुटका होते.

                हे अर्जुना ! त्यांनी कर्मे जरी केली तरी त्यांच्या हदात कर्मफळाची लालसा नसते; म्हणून त्यांचे जन्म-मरणाचे चक्र थांबले जाते. हे धर्नुधरा ! मग ते बुध्दियोगी सर्व प्रकारचे उपद्रव रहित आणि आनंदाने परिपुर्ण भरलेल्या अशा कधीही न ढळणाऱ्या परमात्म-स्वरूपाला प्राप्त होतात. तु ज्या वेळी मोहाचा त्याग करशील त्या वेळी तू मुक्त होशील आणि तुझ्या मनात वैराग्याचा चंद्रमा उदय पावेल.(ओवी २७१ ते २८०)

             त्यामुळे तुला निर्दोष आणि गहन आत्मज्ञान प्रगट होईल आत्मज्ञानामुळे तुझे मन सहजपणे निरिच्छ बनेल. हे अर्जुना ! तुझ्या मनाची अशी स्थिती झाल्यावर याच्यापुढे काही जाणावे किवां मागे जाणलेल्या गोष्टीचे स्मरण करावे या क्रिया बंद पावतील इंद्रियांच्या संगतीने जी बुध्दी विषयांकडे पसरलेली असते  ती बुध्दी आत्मस्वरुपाला प्राप्त झाली की सहजपणे स्थिर होते समाधिसुखात ज्या वेळी बुध्दी स्थित होते त्या वेळी निष्काम कर्मयोग प्राप्त होतो त्यावेळी अर्जुन म्हणाला,  हे देवा !  हा तूमचा सर्व अभिप्राय समजुन घेण्यासाठी मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तरी हे कृपानिधी, आपण तो स्पष्टपणे सांगावा त्या वेळी अच्यूत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना ! तुला योग्य वाटेल ते समाधानी मनाने विचारावे हे ऐकून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, “स्थिप्रज्ञ कोणाला म्हणावे व तो कसा ओळखावा? हे आपण सांगावे ज्याची बुध्दी परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झालेली आहे. आणि जो सदैव समाधिसुखात रममाण‍ झालेला असतो त्याला कोणत्या लक्षणांनी जाणावे? हे लक्ष्मीपती देवा ! तो कोणत्या स्थितीत असतो? कोणत्या प्रकारे आचरण करत असतो? सर्व आपण मला सांगावे.” तेव्हा यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य या सहा गुणांचा आश्रयस्थान असलेला श्रीकृष्ण बोलू  लागले. (ओवी २८१ ते २९०)

             श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना !  ऐक. मनामध्ये जी अतिशय वाढलेली आसक्ती असते ती आत्मसुखात विघ्न निर्माण करीत असते. जो सदैव तृप्त असतो ज्याचे अंत:करण नित्य आनंदाने परिपूर्ण भरलेले असते परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या संगतीने विषयात पतन होते. तो काम ज्याच्या मनातुन पूर्णपणे नाहीसा झालेला असतो आणि ज्याचे मन सदैव आत्मसुखात रममाण असते तोच पुरुष स्थितप्रज्ञ असतो असे जाण. नाना प्रकारची दु:खे प्राप्त झाली तरी ज्याच्या चित्तात उदवेग निर्माण होत नाही. आणि सुखाच्या इच्छेत जो अडकला जात नाही, अर्जुना ! त्याच्या अंत:करणातील काम, क्रोध, सहजच नाहीसे झालेले असतात. तो सर्वकाळी भयमुक्त असतो विश्वचैतन्याशी एकरुप झाल्यामुळे तो परिपूर्ण असतो असा जो अमर्याद आणि सर्व प्रकारच्या उपाधीचा त्याग करून भेदरहित झालेला असतो तो स्थितप्रज्ञ होय हे जाणावे. पोर्णिमेचा चंद्र ज्याप्रमाणे उत्तम अथवा वाईट लोकांना सारखाच प्रकाश देत असतो त्याप्रमाणे जो सर्वावर समबुध्दीने प्रेमाचा वर्षाव करीत असतो अशी ज्याची सर्व भुतमात्रां विषयी अखंड समता आणि दयाळू भाव असतो आणि कोणत्याही वेळी त्याच्या शूध्द चित्तात बदल होत नाही उत्तम गोष्टी प्राप्त झाल्या तरी संतोषाने त्याला अहंकार होत नाही आणि वाईट गोष्ट झाली तरी जो दु:खी-कष्टी होत नाही. तसेच जो हर्ष-शोक रहित असुन ज्याच्या हदयात आत्मबोध परिपुर्ण भरलेला असतो  तोच स्थिप्रज्ञ असतो असे  तू जाण. (ओवी २९१ ते ३००)

              ज्याप्रमाणे कासव सुखामध्ये असताना आपले अवयव पसरते किवां आपल्या इच्छेप्रमाणे आपले अवयव आपणच आवरून घेते, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वत:च्या ताब्यात असतात‍ आणि तो जे म्हणेल, त्याप्रमाणेच वागतात, त्याची बुध्दी स्थिर झाली असे समजावे. अर्जुना , आणखी एक कौतुकाची गोष्ट तुला सांगतो जे साधक नित्य नियमाने, निग्रहाने विषयांचा त्याग करुन श्रोत्रादी इंद्रियांना विषयभ्यांपासून आवरतात, परंतु जिभेला मात्र आवरु शकत नाहीत, त्यांना हे विषय हजारो प्रकारानी गुंतवून टाकतात. जर एखाद्या झाडावरची वरवरची पालवी खुडून टाकली आणि त्या झाडाच्या मुळाला पाणी घातले ,तर त्या झाडाचा नाश  कसा बरे होईल.ते झाड मुळामध्ये घातलेल्या पाण्यामुळे आडव्या अंगाने अधिकच विस्तार पावु लागते , त्याप्रमाणे जिभेच्या व्दारा अंत:करणातील विषय अधिकच वाढत राहतात.

         ज्याप्रमाणे इतर इंद्रियांचे विषय प्रयत्नाने कमी करता येतात ; परंतू त्याप्रमाणे जिभेचा विषय प्रयत्नाने कमी करता येत नाही. कारण ते जीवन आहे. त्याशिवाय शरीराच्या क्रिया चालत नाहीत. हे अर्जुना ! जो साधक परब्रम्हाशी एकरुपतेचा अनुभव घेतो , त्या वेळी तो अतिशय अवघड अशा रसाच्या निग्रहाला स्वभावत: प्राप्त होतो. ज्यावेळी आपण ब्रम्हरुप आहोत , असा अनुभव त्याला प्राप्त होतो, त्या वेळी देहाला विदेही अवस्था प्राप्त होते आणि इंद्रिये विषयांना विसरतात.एरव्ही हे अर्जुना ! यांना जिंकण्यासाठी जे सदैव प्रयत्न करतात, त्यांना देखील ही इंद्रिये स्वाधीन करता येत नाहीत . ( ओवी ३०० ते ३१०)

पुढील भाग