अध्याय १७ भाग ४

आपल्या शरीरास दु:ख देऊन जे सुखी प्राणी असतील, त्यांना जिंकण्याकरता तपाचे आचरण करतात. अर्जुना! अधिक काय सांगावे? दुसऱ्याला व स्वत:ला दु:ख देण्याची ही अघोरी पध्दत स्वीकारून जे तप केले जाते, ते ‘तामस तप’ होय. याप्रमाणे सात्त्विक, राजस, तामस या तीन गुणांच्या स्वरूपात पडलेले तप तीन भागांत विभक्त झालेले आहेत. ही तिन्ही प्रकारची तपे तुला उत्तम प्रकारे स्पष्ट करून दाखवलेली आहेत. आता बोलताना ओघाने प्रसंगात आले म्हणून सात्त्विक, राजस आणि तामस या तीन प्रकारच्या दानांची लक्षणे मी तुला सांगतो. आता गुण म्हटले, की त्याने दानही तीन प्रकारचे झाले आहे. त्या तीन दान-प्रकारांपैकी पहिले जे सात्त्विक दान आहे, त्याचे श्रवण कर. तरी आपण स्वकष्टाने, सन्मार्गाने मिळवलेले धन ते आदरभावनेने सन्मानपूर्वक दुसऱ्यास द्यावे.‍ उत्तम प्रकारचे बीज मिळाले, तरी सुपीक जमीन व वाफसा यांची उणीव पडते, त्याप्रमाणे दान देण्याची मनापासून इच्छा असली, तरी दान देण्यास पात्र मनुष्य आणि देश व काळ यांची उणीव पडते. अनमोल असे रत्न जरी हाती सापडले, तरी त्याला कोंदण करण्यास सोन्याची उणीव पडते. कदाचित सोने मिळून अलंकार झाला तरी अलंकार घालणाऱ्या इंद्रियाची उणीव पडते. दिवाळीसारखा सण, आपल्या इष्ट मित्रांचे आगमन आणि आपल्याकडे विपुल संपत्ती असणे, या तीनही गोष्टी एकत्र येऊ शकतात; पण केव्हा? तर भाग्यच आपल्याकरता उत्कर्ष धारण करतो तेव्हा आपल्या हातून दान घडवायचे असेल, तर सत्त्वगुणांचा उत्कर्ष होतो; आणि तेव्हा देश, काल, पात्र व द्रव्य अशा चार सुयोग्य गोष्टींचा संगम होतो.(ओवी२६१ ते २७०)

सात्त्विक दान घडवून आणण्याकरिता प्रयत्नाने कुरूक्षेत्र अथवा काशी ही क्षेत्रे निवडावीत; अथवा ही क्षेत्रे न मिळाल्यास, इतर पवित्र क्षेत्रे निवडावीत. त्या पवित्र क्षेत्रात सूर्यग्रहण अथवा चंद्रग्रहण यांसारखा पुण्यकाल असावा अथवा त्यासमान अन्य पवित्र पर्वकाळ असावा. त्या पवित्र काळात त्या देशात ज्याला दान द्यावयचे, त्या पात्राची योग्यता अशी असावी की, शुध्दतेनेच जणू आकार धारण करावा. सदाचाराचे मूळ स्थान, वेदांचे वसतिस्थान‍ म्हणजेच सदाचारसंपन्न व वेदशास्त्रसंपन्न असे ब्रह्म जाणणारे शुध्द रत्न प्रयत्नाने प्राप्त करून घ्यावे. त्यांच्या चरणकमलावर द्रव्य अर्पण करून आपल्या द्रव्यावरून आपली सत्ता काढून घ्यावी. ज्याप्रमाणे स्त्री आपल्या देहावरील स्वामित्व नष्ट करून पतीजवळ स्वसंतोषाने येते; अथवा एखाद्याने आपल्याजवळ ठेवलेली ठेव स्वसंतोषाने त्याला परत देऊन माणूस जसा उतराई होतो अथवा हुजुराने राजास विडा दिल्यानंतर तो जसा बाजूला होतो, तशा निष्काम अंत:करणाने भूमी, वस्त्र, धन अर्पण करावे. परंतु अंतकरणात फळाची कोणतीही अपेक्षा धरू नये. आणि ज्याला दान द्यावयाचे, तो असा निवडावा की, त्याला आपण केलेल्या दानाची कोणत्याही प्रकारे परतफेड करता येणार नाही, असा असावा. आकाशाला कितीही जोरात हाक मारली, तरी तो प्रतिशब्द देत नाही; आरसा उलट बाजूने, म्हणजे काच नसलेल्या बाजूने पाहिले असता प्रतिबिंब दाखवत नाही; पाण्याच्या पृष्ठभागावर चेंडू जोराने आपटला, तर तो जसा सहजपणे उसळून हाताशी येत नाही;(ओवी २७१ते२८०)

अथवा वळूला चारा घातला तर तो जसा उपकार मानत नाही, अथवा ज्याप्रमाणे कृतघ्न मनुष्यावर केलेले उपकार तो फेडीत नाही, त्याप्रमाणे दान करणाऱ्याकडून कोणत्याही प्रकाराने उलट उपकार होणार नाहीत, अशा माणसास दान द्यावे आणि दान दिलेल्याने त्याची आठवण मनातसुध्दा येऊ देऊ नये. हे वीरराज अर्जुना! धर्माने मिळवलेले द्रव्य योग्य काल, देश व पात्र पाहून दिले जाते, ते सर्व दानांत श्रेष्ठ असे ‘सात्त्विक दान’ होय. आणि याप्रमाणे देश, काल व सत्पात्र वगैरे योग जुळून येतो. निर्मळ व न्यायाने मिळवलेले असे दानभाग यांचा एक योग जुळून आलेला असतो. मनात दुधाची इच्छा धरून गायीस उत्तम प्रकारे चारावे; अथवा धान्य साठवण्यासाठी प्रारंभी पेव तयार करून शेतात पेरणी करण्यासाठी जावे; अथवा लग्नादी मंगलकार्यामध्ये आहेरावर दृष्टी ठेवून नातेवाईक, स्नेहीमंडळी यांना बोलवावे; किंवा ओवसा परत येईल, अशा ठिकाणीच दान द्यावे, अशा प्रकारे ज्याला जे दान द्यावयाचे, तो मनुष्य आपण दिलेल्या दानाने जीवन जगला पाहिजे आणि पुढील आयुष्यात तो सर्वकाळ आपणास उपयोग पडला पाहिजे, अशी इच्छा मनात ठेवून जे दान दिले जाते; अथवा घेतलेले दान परत फेडू न शकणारा कोणी एखादा गरीब परंतु ज्ञानसंपन्न, आचारसंपन्न ब्राह्मणोत्तम वाटेने जाताना सहज भेटला, तर त्या आचारसंपन्न माणसाच्या हातात एक कवडी देतो  आणि त्या एका कवडीच्या मोबदल्यात आपण केलेल्या दानाच्या भरघोस परतफेडीची अपेक्षा करतो, आपल्या गोत्रातील सर्व लोक पातकातून मुक्त व्हावेत, अशी अपेक्षा करतो,(ओवी २८१ते२९०)

अत्यंत कमी दिलेल्या दानापासून हा अनेक पारलौकिक फळांची अपेक्षा करतो, त्या कवडीदानाने गरीबाची एक वेळेची भूकही भागत नाही, हे दिलेले कवडीदान गरीब घेऊन चालला असता आपली मोठी हानी झाली, असे म्हणून तो मनात झुरत असतो, जणू काही चोरांनी सर्वस्व लुटून नेले, असे त्याला वाटत असते, हे सदबुध्दी अर्जुना! अधिक काय सांगावे? अशा प्रकारच्या वृत्तीने दिलेले दान त्रैलोक्यात ‘राजस दान’ नावाने प्रसिध्द आहे. मग म्लेंच्छांच्या  राहण्याच्या ठिकाणी, अरण्यात धर्मकृत्यास अयोग्य असलेल्या असलेल्या देशात अथवा छावणीत अथवा शहराच्या चव्हाटयावर, अशा ठिकाणी एकत्र येऊन संध्याकाळी अथवा रात्री चोरी करून आणलेल्या धनाचे उदाहरण ते दान करतात. ज्यांना दान द्यावयाचे, ती पात्रे तरी कोण? तर स्तुती करणारे भाट, कोल्हाटी, गारूडी, वारांगना, जुगार खेळणारे लोक आणि मूर्तिमंत भ्रम करणारे लोक यांच्यावर खूष होतात. अशा लोकांनी त्यांच्यापुढे नृत्य-गायन केल्यावर अथवा भाट लोकांनी स्तुती केलेली ऐकल्यावर ते शब्द त्यांच्या कानांत नेहमी गुणगुणत असतात. त्या नृत्य-गायनाच्या बैठकीत जेव्हा फुलांचा किंचित सुगंध सर्वत्र पसरतो, तेव्हा उन्मादक वातावरण निर्माण होते आणि भ्रमाचा वेताळ अवतरतो, तेव्हा दुसऱ्याकडून लुटून आणलेले धन, पदार्थ अपवित्र लोकांस दान देतात; तसेच अन्नछत्र घालतात. अशा पध्दतीने जे दान देणे, ते ‘तामस दान’ आहे, असे मी म्हणतो. आणि दैववशात आणखी एक प्रकार घडून येतो, त्याचेही श्रवण कर. (ओवी २९१ते३००)

लाकुड कोरणारा  घुणा नावाचा किडा सहजपणे लाकुड कोरत असता त्याला जर अक्षरा आकार प्राप्त झाला अथवा टाळी वाजवीत असता देान्ही हातात कावळा सापडावा, त्याप्रमाणे तामस माणसास पुण्यक्षेत्राचा लाभ होतो. तर त्या ठिकाणी या तामस माणसाचे ऐश्वर्य पाहुन योग्य अतिथी त्या ठिकाणी आजा तर त्यास पाहुन हा क्रोधाने भांबावला जातो, आणि त्याला जर काही द्यावेसे वाटले तरी त्या अतिथीविषयी मनात तो श्रध्दादेखील ठेवत नाही. त्याचे पुढे नतमस्तक होत नाही तसेच त्याची अर्ध्यपाद्यादिक पुजा करत नाही आणि दुसऱ्याकडुनही करवत नाही, त्या अतिथीला आपल्या जवळ बसण्यास आसनही देत नाही. तर मग त्याच्या गंधाक्षता-समर्पण विघी तरी कसा करणार?  याप्रमाणे तामस मनुष्य योग्य अतिथीचा आदर सत्कार करत नाही सत्कार करणे त्याला वाईट प्रसंग वाटत असतो, व्याजासह मुद्दल मागावयास आलेल्या सावकारास थोडे पैसे देवुन जसे परत पाठवावे त्याप्रमाणे तामसी मनुष्य अतिथीला अल्प दान देवुन फसवीत असतो, आणि सामान्य भाषा वापरुन त्याचा अपमान करीत असतो.त्या योग्य अतिथीस तामसी थोडेसे दान देतो आणि त्या दानाच्या बरोबरीने त्याची योग्यता मोजत असतो. याचक आणखी काही मागु लागला तर धक्के मारुन त्याला बाहेर काढतो, हे अधिक वर्णन राहु दे,  याप्रमाणे जे द्रव्य दान करणे त्याला या जगात तामस दान म्हणतात, याप्रमाणे आपआपल्या लक्षणांनी सुशोभित अशी तीन प्रकारची सात्विक, राजस, तामस दाने तुला स्पष्ट पणे कथन केली हे बुध्दीमान अर्जुना, मी असे जाणतो की तु कदाचित राजस आणि तामस दानाविषयी मनामध्ये अशी कल्पना करत असशील की, सात्विक कर्मानेच  जर भवबंधनातुन मुक्ती मिळते  तर मग विरुध्द दोषांनी भरलेली राजस व तामस कर्मे मी का बरे बोलावी? ( ओवी ३०१ ते ३१० )

परंतु ज्याप्रमाणे पिशाच्चाला दूर केल्याशिवाय पुरलेले धन हाती लागत नाही; अथवा धूर सहन केल्याशिवाय दिवा जसा लागत नाही, त्याप्रमाणे शुध्द सत्त्वगुणाच्या आड रजोगुण व तमोगुणचे जे दार आहे, ते फोडणाऱ्याला वाईट म्हणावे काय? म्हणून आम्ही श्रध्देपासून दानापर्यंत सर्वच साधने तीन गुणधर्मांनी कशी व्याप्त आहेत, ते सांगितले आहे. तेथे तीनही प्रकारचे गुण मी खरोखर सांगणार नव्हतो; परंतु सात्त्विक गुण कोणते, हे दाखविण्याकरिता इतर‍ राजस व तामस गुणासंबंधी बोलावे लागले, असे तू जाण. ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांचा त्याग केला असता सात्त्विक दोघांच्या संधिकालात असलेले संध्येचे रूप स्पष्ट दिसते, त्याप्रमाणे राजस त तामस गुणांचा त्याग केला असता सात्त्विक गुण स्पष्टपणे दिसतात. त्याप्रमाणे दोषयुक्त राजस व तामस गुणांचा नाश झाल्यावर तिसरा जो सात्त्विक गुण, तो आपोआप अनुभवयास येतो. याप्रमाणे सात्त्विक गुण दाखविण्यासाठी तुला राजस व तामस हे गुण विस्ताराने सांगितले. या राजस व तामस गुणांचा त्याग करून केवळ सत्त्वगुणाने तू आपली कार्यसिध्दी सफल करून घे. त्या शुध्द सत्त्वगुणाने यज्ञादी सर्व क्रिया कर, त्या योगाने तुला आपले शुध्दस्वरूप तळहातावर घेतलेल्या पदार्थाप्रमणे प्राप्त होईल. स्वत: सूर्यच जर कोणती वस्तू दाखवायला लागल्यावर ती दिसणार नाही काय? त्याप्रमाणे सत्त्वगुणाने केलेले कर्म कोणते फल देणारे नाही? अशी सर्वतोपरी सत्त्वगुणांच्या अंगी महान शक्ती आहे खरी; परंतु मोक्षाची प्राप्ती जेणेकरून होते. ( ओवी ३११ ते ३२० )

ते एक वेगळेच आहे. ज्या वेळी सत्त्वगुणाचे साहाय्य प्राप्त होते, त्या वेळी मोक्षप्राप्तीची योग्यता येते. हे पहा की, सोने पंधराच्या दराने असले म्हणजे शंभर नंबरी असले, तरी त्यास जेव्हा राजमुद्रेची अक्षरे प्राप्त होतात, तेव्हाच ते सर्वत्र चालते. स्वच्छ, थंड, सुगंधी असे जलाचे प्रकार सुखकारक असतात; परंतु त्या पाण्यात पवित्रपणा तीर्थाच्या संबंधाने येतो. येऱ्हवी नदी पाहिजे तेवढी मोठी असेना का, परंतु गंगा ज्या वेळी तिचा स्वीकार करते, तेव्हाच तिला सागरात प्रवेश मिळतो. अर्जुना, त्याप्रमाणे सात्त्विक कर्मांना मोक्षाच्या भेटीला येताना ज्या योगाने संकटे आणि आडकाठी येणार नाहीत, तेदेखील एक कारण वेगळेच आहे. हे बोलणे ऐकताक्षणी अर्जुनाच्या अंत:करणात उत्कंठा मावेना. तो म्हणाला, ”देवांनी कृपा करावी आणि मला ते कारण सांगावे.” तेव्हा कृपाळूंचे सार्वभौम राजे भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ते स्पष्ट करून सांगतो, तरी ऐक की ज्याच्या साहाय्याने ते सात्त्विक कर्म मुक्तिरूपी रत्न पाहू शकते. जे स्वरूपत: उत्पत्तिरहित; परंतु जगाच्या उत्पत्तीचे व विश्रांतीचे म्हणजे लयाचे स्थान जे परब्रह्म ते आहे. त्याचे नात तर एकच आहे; पण ते तीन प्रकारचे आहे. ते परब्रह्म खरोखर नामरहित आहे. ते ब्रह्म एक अद्वितीय असल्यामुळे आणि त्याच्यावाचून सर्व अनित्य असल्यामुळे नित्य या लक्षणाची जाती त्या ठिकाणी संभवत नाही; परंतु अज्ञानी अविद्यासमूहाच्या रात्रीमध्ये त्याला नेमके ओळखण्यासाठी वेदांनी त्याला ‘ तत्‍ सत्’ असे नाम दिले आहे. नवीन जन्माला आलेल्या बालकाला नाव नसते; परंतु बारशाच्या दिवशी ठेवलेल्या नावाने त्याला हाक मारली, की ते ‘ओ’ देत उठते. (ओवी ३२१ ते ३३०)

संसारदुखाने त्रासलेले जीव आपल्या दुखाचे गाऱ्हाणे सांगण्यास आले असता त्यांनी हाक मारल्यावर वेद त्यास ‘ओ’ देतात. तो संकेत म्हणजे ‘तत्सत्’ हे नाम होय. जीवाचा परमात्म्याशी अनादी काळापासुन असलेला अबोला संपावा आणि तो आत्मरुपाने भेटावा, या उद्देशाने जगतपिता वेदाने एक मंत्र स्वता पाहिला आणि दुसऱ्यास त्याचा उपदेश केला मग त्या एका उपदेशिलेल्या मंत्राने तो परमात्मा सहज आळविला असता तो  वृत्तीच्या  मागे अज्ञान असलेला परमेश्वर एकदम पुढे उभा राहतो परंतु जे पुरुष वेदरुपी पर्वताच्या शिखरावर बसले आहेत व या उपनिषंदाच्या अर्थाच्या नगरात बसले आहेत म्हणजे ब्रम्हरुप झाले आहेत अशा पुरुषांना ‘ओम तत् सत्’ या नामाचा अर्थ आणि त्याचे अलौकिक महत्व कळते असो हे वर्णन पुरे पुढे ‘ओम तत् सत्’ हे त्रिविध नाम होय. हे वीरोत्तम अर्जुना! सृष्टीच्या पुर्वी माझ्या नाभीकमलातुन ब्रम्हदेवाची उत्पत्ती झाली त्या वेळी तो आपल्याला कोणीव कशासाठी निर्माण केले त्याचे काही ज्ञान नसल्यामुळे मुढ असा ते एकटाच होता. तो मला ईश्वराला ओळखत नव्हता, अथवा सृष्टीचीरचनाही करु शकत नव्हता.  परंतु तो ज्या एकानामाने सज्ञान व थोर झाला तेच हे ‘ओम तत् सत्’ नाम होय.  ‘ओम तत् सत्’ नावाचा अर्थ जाणला असता आणि  त्याचा जप केला असता त्या प्रजापती ब्रम्हदेवाला  माझा साक्षात्कार झाला, त्याच्यावर मी  कृपेचा वर्षाव आणि त्यामुळे त्याचे  ठिकाणी विश्व निर्माण करण्याची योग्यता निर्माण झाली  तेव्हा त्यांनी ब्राम्हण निर्माण केले त्यांना वेदांची आज्ञा मान्य करण्यास सांगुन त्यांच्या उदरनिर्वाहाकरीता त्यांना यज्ञाचे आचरण करण्यास सांगितले, नंतर विविध प्रकारचे असंख्य लोक निर्माण केले म्हणुन ते त्रैलोक्य लोकांच्या भोगांकरीता मोक्षाकरिता ब्रम्हदेंवाने दिेलेले  जणु इनामी गावच झाले. ( ओवी ३३१ ते ३४० )

पुढील भाग