अध्याय १४ भाग ५

        लाकडाच्या आकाराने अग्नी जसा आकाराला येतो, किवां भुमीतील रसच भुमीवरील वृक्षाच्या फळा, फुलांच्या रुपाने प्रगट होतो, अथवा दुध विरजले असता जसे दह्याच्या रुपाने परिणामाला प्राप्त होते किवां गोडी जशी ऊसाच्या रुपाने आकाराने साकार होते, त्याप्रमाणे अंतकरणासह तीनही गुण देहाच्या रुपाने परिणामांना प्राप्त होतात, म्हणुन जीवाच्या मुक्त स्थितीला कमीपणा येत नाही. तीनही गुण आपआपल्या देहाच्या धर्माने प्रत्यक्ष किवां अप्रत्यक्ष क्रिया करीत असतानाही आत्म्याची गुणातीतता बाधित होत नाही,  अशी ही आत्म्याची स्वभावत:  मुक्त स्थिती आहे, त्या मुक्तीचे स्वरुप आता तुला ऐकवतो, कारण तु ज्ञानरुपी कमळाचा मकरंद सेवन करणारा भ्रमर आहेस. आत्मचैतन्य हे शरीरादी गुणांत राहुनही त्या गुणासारखे होत नाही, त्यापासुन ते अलिप्त असते असे जे तत्व तुला मागे तेराव्या अध्यायात सांगितले आहे तशीच ही गोष्ट आहे. तरी अर्जुना! तीन गुणांचे मिथ्यत्व सदगुरुंनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे वाटचाल केल्याने अनुभवास येते, जसे जागृत झालेल्या मनुष्याला स्वप्न मिथ्या वाटते, जेव्हा तीरावरुन आपण पाण्यामध्ये पाहतो तेव्हा पाण्यात आपले प्रतिबिबं दिसते जशा लाटा हालतात तसे प्रतिबिबं हालताना दिसतात, किवां नटाने अनेक वेष परिधान केले, तरी आपण मुळ  कोण आहोत हे तो विसरत नाही, त्याप्रमाणे स्वस्वरुपी स्थिरबुध्दी कायम ठेवुन गुण भिन्न आहेत  फक्त एवढेच पहावे.       (ओवी २८१ ते २९०)

      ज्याप्रमाणे आकाशावर तिन्ही ऋतु निर्माण होतात आणि नाहीसे होतात, परंतु त्या पासुन आकाश ह अलिप्त असते, त्याप्रमाणे गुण-व्यवहार सुरू असताना त्याहुन पलीकडे असे जे आपले सहज स्वरुप आणि जो अहं या प्रथम स्फुरणाचे मुळस्थान त्या आत्मस्वरुपाशी त्याची बुध्दी स्थिर होते. मग त्या मुळस्वरुपी पाहु लागलो असता तो म्हणतो की, मी कर्माचा कर्ता नसुन केवळ साक्षीभुत आहे आणि सर्व कर्म त्रिगुणांपासुन होतात, प्रकृतीस्वरुप असलेल्या सात्विक,राजस, तामस या विशेष अवस्थांमध्ये अनेक प्रकारच्या कर्माचा विस्तार होत असतो, म्हणुन हा जो कर्माचा विस्तार आहे तो त्रिगुणांचा परिणाम आहे, वनांची शोभा वाढविण्यास जसा वसंत ऋतु कारण असतो,तसा मी सर्व क्रिया करुनही अलिप्त आहे, अथवा तारांगणाने लोपुन जावे, सुर्यकांत मण्याने अग्नी उत्पन्न करावा, सुर्यविकासी कमळाने विकासावे आणि अंधाराने नाहीसे व्हावे यापैकी कोणत्याही कार्यामध्ये सुर्य जसा केव्हाही कोणालाही कारण होत नाही, त्याप्रमाणे मी देहात सत्तारुप असतानाही अकर्ता आहे, मी स्वरुपता प्रकाशित होवुन तीन गुणांचे प्रकाशन करत असतो तीन गुणांचे गुणत्व माझ्या सत्तेने वाढत असते या तीन गुणांचा अभाव‍झाला असता जे उरते ते मीच आहे. हे धनंजया ! अशा विवेकाचा ज्याच्या हदयात उदय झाला आहे तो गुणातीत आहे. आता निर्गुण ब्रम्ह म्हणुन जे तीनही गुणांपेक्षा वेगळे आहे त्याला तो द्रष्टा पुरूष संशयरहित आणि भ्रमरहित होवुन जाणतो, कारण ज्ञानाने आपले रहाण्याचे ठिकाण त्याच्या ठिकाणी केलेले असते. (ओवी २९१ ते ३००)

         अर्जुना! फार काय सांगावे? ज्याप्रमाणे नदी सागराला प्राप्त होते त्याप्रमाणे तो द्रष्टा पुरूष माझ्या सत्तेला म्हणजे स्वरुपाला प्राप्त होतो. ज्याप्रमाणे नलिकेवरून उठून झाडाच्या दुसऱ्या फांदीवर बसल्यानंतर पोपट जसा भ्रांतिरहित होतो, त्याप्रमाणे जो गुणातीत झाला, तो गुणाच्या चक्रात न सापडता ‘अहं ब्रम्हं’ असे जाणतो. हे ज्ञानवंत अर्जुना ! जो अज्ञानाच्या झोपेमध्ये ‘मी देह आहे आणि स्त्री, पुत्र, संपत्ती माझी आहे’, असे म्हणत घोरत पडला होता तो ब्रम्हस्वरूपाच्या अवस्थेत ‘मी ब्रह्म आहे’ याच ज्ञानाने जागृत झाला. धैर्यवान अर्जुना ! अनेक भेद निर्माण करणार बुध्दिरूपी आरसा त्याच्या हातून खाली पडला. ज्ञानाने बाधित झाला, म्हणून तो जीवरूपी प्रतिबिंबाला मुकला. हे वीरा अर्जुना ! देह तादात्म्याचा वारा वाहणे ज्या वेळी बंद होते, तेव्हा लाटांचे सागराशी जसे ऐक्य असते, त्याप्रमाणे जीवाचे ब्रह्माशी ऐक्य होते. त्या आत्मज्ञानी पुरूषाला माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते, जसे मेघ हे वर्षाकाळच्या शेवटी आकाशात त्याच्यासारखे होऊन राहतात. असा ज्ञानी‍भक्त मद्रूप झाल्यावर जरी देहात असला, तरी त्रिगुणांनी लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे दिवा भिंगाच्या घरात ठेवला म्हणजे त्या दिव्याचा प्रकाश त्या घराकडून जसा कोंडून ठेवला जात नाही, अथवा जसा सागराकडून विझला जात नाही, त्याप्रमाणे गुणांच्या येण्या-जाण्याने त्या ज्ञानी भक्ताचा आत्मबोध मलिन होत नाही. आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पडले, तरी जसा तो ओला होत नाही, त्याप्रमाणे तो देहात असूनही गुणांनी बध्द होत नाही. तीनही गुण आपल्या सामर्थ्याने विविध प्रकारचे प्रयत्न करतात; परंतु तो आपल्या अहंतेला ते प्रयत्न पाहण्यास पाठवीत नाही. (ओवी ३०१ ते ३१०)

        अशा स्थितीत तो ज्ञानी अंत:करणामध्ये अत्यंत बळकट असा निश्चय करून स्थिर झालेला असतो. वर्तमानकाळात शरीराच्या ठिकाणी काय काय घडते, हे तो काहीच जाणत नाही. साप आपली कात टाकून ज्या वेळी बिळात शिरल्यावर आपल्या कातीचे काय होईल, इकडे लक्ष देत नाही त्याप्रमाणे तो ज्ञानी आपल्या देहाविषयी काळजी करत नाही. अथवा कमळ पूर्णपणे विकसित झाल्यावर त्याचा सुवास आकाशात विरून जातो; पण तो पुन: कमलकोशात येत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मतत्त्वाशी ऐक्य पावल्यामुळे त्या ज्ञानी पुरूषांची स्थिती तशीच झालेली असते. अशा अवस्थेत देह कसा आहे? देहाचे धर्म कोणते? हे तो कधीच जाणत नाही. म्हणून जन्म, अस्तित्व, वर्धन, विपरिणाम, वृध्दत्व व विनाश हे जे सहा विकार आहेत, ते देहाच्या ठिकाणीच राहलेले असतात. त्या ज्ञानी पुरूषाचा या सहा विकारांशी कोणताच संबंध नसतो. घट फुटल्यानंतर घटाच्या खापऱ्या लांब फेकून दिल्या असता घटातील आकाश जसे आपोआपच महाकाश झालेले असते, तशी देहबुध्दी नाहीशी झाल्यावर आत्मस्वरूपाचे जेव्हा अखंड अनुसंधान घडते, तेव्हा आत्मस्वरूपावाचून दुसऱ्या कशाची आठवण राहते काय? असा महान बोध ज्याच्या अंत:करणात झालेला आहे, तो देहधारी असला तरी ‘तो गुणातीत झाला आहे’, असे मी म्हणतो. मेघाच्या गर्जनेने जणू हाक मारलेला मोर जसा सुखावतो, त्याप्रमाणे या देवाच्या बोलण्याने अर्जुन अतिशय संतुष्ट झाला. त्या संतोषाने वीर अर्जुन विचारू लागला, ” महाराज ! ज्याच्या अंत:करणास असो बोध झाला आहे, त्याची लक्षणे काय असतात? (ओवी ३११ ते ३२०)

       तो गुणातीत पुरुष कसे आचरण करतो? गुणांचे उल्लंघन कसे करतो? देवा !  आपण तर कृपेचे माहेरघर आहात, तरी आपण हे मला सांगावे. या अर्जुनाच्या प्रश्नास षटगुण ऐश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण परमात्मा काय उत्तर देतात त्याचे श्रवण करा, परमात्मा म्हणाले, हे पार्था ! हा काय तुझा प्रश्न आहे?  कारण गुणातीत हे नाव उच्चारल्यानंतर त्याचे आचरण काय हा प्रश्नच संभवत नाही.ज्याला गुणातीत म्हणतात तो खरोखर गुणाधीन नसतो अथवा गुणात सापडला असला तरी गुणांच्या अधीन नसतो, परंतु त्याचा गुणांशी संबंध असुन तो गुणांच्या अधीन आहे किवां नाही हे कसे ओळखावे?  अशा संशयाची चक्रे तुझ्या मनात फिरत असतील तर तो प्रश्न तु सुखाने विचार आता आम्ही त्याचे स्पष्ट उत्तर देतो तरी तु ऐक, गुणातीत पुरूष रजोगुणाच्या उत्कर्षाने ज्यावेळी वेढला जातो, त्या वेळी त्याच्या देहात कर्माचे अंकुर फुटतात, तेव्हा त्याला मी एक कर्मठ आहे असा अभिमान होत नाही अथवा कर्मे करण्याची राहीली आहेत असा त्याच्या बुध्दीला खेद होत नाही, अथवा सत्वगुणाच्या उत्कर्षाने ज्यावेळी त्याच्या सर्व इंद्रियांत ज्ञान प्रकाशित होते तेव्हा त्या विद्वत्तेने तो संतुष्ट होत नाही व विद्वत्ता नसेल तर दुखही मानत नाही, तमोगुण वाढला असता तो गुणातीत पुरूष मोह व भ्रम यांकडुन ग्रासला जात नाही किवां अज्ञानामुळे कष्टी होत नाही अज्ञानाचा स्वीकारदेखील तो करत नाही.  (ओवी ३२१ ते ३३०)

        मोहाच्या वेळी तो ज्ञानाची इच्छा करत नाही, तसेच बुध्दीपुर्वक कोणत्याही कर्माचा आरंभ करत नाही,कर्म घडले तरी तो दुखी होत नाही. सुर्याला जशी सकाळ, दुपार व सांयकाळ याची गणना नसते तसा तो देहावर उत्पन्न होणाऱ्या गुणांकडे लक्ष देत नाही, अशा गुणातीत ज्ञानी पुरुषाला दुसऱ्या ज्ञानाची अपेक्षा असते काय? पाऊस पडला तरच समुद्र जलाने भरुन शोभत असतो काय?  त्या गुणातीत पुरुषाची कर्माकडे प्रवृत्ती झाली तर मी यथायोग्य कर्म करणारा आहे  असा अभिमान त्याला वाटेल काय?  सांग बरे हिमालय पर्वत कधी थंडीने थरथर कापेल काय?  अथवा मोह उत्पन्न झाला असता त्याचे ब्रम्हज्ञान नष्ट होईल काय? उन्हाळयाकडुन मोठा अग्नी कधी जाळला जाईल काय? त्याप्रमाणे गुण व गुणांचे जे कार्य आहे ते सर्व आपण नाही म्हणुन एक-एक गुण वाढला तरी त्याचे त्याला सुखदुख नसते. एखादा वाटसरु प्रवासात अडचण आली तर जसा एखाद्या गावात, धर्मशाळेत वगैरे ठिकाणी वस्तीस राहतो, तसा तो गुणातीत पुरूष प्रारब्धभोगाच्या अडचणीत सापडल्यावर देहात उदासीन वृत्तीने राहत असतो, ज्या प्रमाणे युध्दभुमी कोणालाही जिकंणारी अथवा पराजीत करणारी नसते, ती दोन्ही पक्षाविषयी उदासीन असते, त्याप्रमाणे हा गुणांच्या स्वाधीन होवुन काही कर्मे करीत नाही अथवा शरीरातील प्राण, अतिथी म्हणुन घरी आलेला ब्राम्हण, चव्हाटयावर रोवलेला खांब हे अनुक्रमे शरीरात, घरात, आणि चव्हाटयावर होणाऱ्या सर्व कर्माविषयी जसे उदासीन असतात. हे अर्जुना, मृगजळाच्या लाटांनी मेरु पर्वत ढळत नाही, तसा तो गुणांच्या येण्या-जाण्याने अंतर्यामी ढळत नाही. (ओवी ३३१ ते ३४०)

           फार काय वर्णन करावे?  आकाश वाऱ्याकडुन कुठे घालविले जाते काय?  अथवा  सुर्य कधी अंधाराकडुन गिळला जातो काय?  जागृत पुरूष तीन गुणांनी बांधला जात नाही, हे लक्षात ठेव. गुणानी तो निश्चय करुन आवळला जात नाही, परंतु दुरूनच सभेत बसलेला पुरुष लाकडाच्या बाहुलीचा खेळ जसा पाहतो त्याप्रमाणे त्रिगुण जेव्हा व्यवहार करतात त्या वेळी त्याकडे तो तटस्थ वृत्तीने व कौतुकाने पहातो.सत्वगुण हा सात्विक कर्माकडे, रजोगुण हा राजस भोगाकडे  आणि तमोगुण हा मोह,प्रमाद, आळस, निद्रा याकडे कशा प्रकारे प्रवृत्त होत असतो हे सर्वकाही तो साक्षीरुपाने पहात असतो,सुर्य जसा उदासीन राहून लौकिक व्यवहाराला कारणीभुत आहे तसेच या सर्व गुणांच्या क्रिया त्या गुणातीताच्या आत्मसत्तेने होतात, हे जाणुन घे. समुद्राला भरती येते, सोमकांत मण्याला पाझर फुटतो आणि चंद्रविकासी कमळे उमलतात, हे सर्व चंद्रामुळे घडते तरी पण तो या सर्वापासुन अलिप्त असतो, वारा वाहतो अथवा वाहण्याचा बंद होतो परंतु आकाश मात्र स्थिर असते, त्याप्रमाणे गुणांच्या हालचालीने जो गोधंळुन जात नाही, अर्जुना! या लक्षणांनी युक्त तो गुणातीत पुरुष जाणावा, आता त्याचे आचरण कसे असते ते सांगतो तरी श्रवण कर. अर्जुना! वस्त्रांच्या आत-बाहेर सुतावाचुन दुसरे काही नाही, त्याप्रमाणे चराचरात माझ्यावाचुन दुसरा पदार्थ नाही, हे जाणुन जो मद्रुप झाला, ज्याप्रमाणे देवांचे देणे भक्तांना व शत्रुंना समान असते, त्याप्रमाणे सुख व दुख प्राप्त झाले असता ज्याचे मन ताजव्याप्रमाणे समतोल रहाते.  (ओवी ३४१ ते ३५०)

पुढील भाग