पाठीराखा-साई- ६

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… !  जळीस्थळी, काष्टी, पाषाणी ज्या बाबांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. त्या बाबांच्या शिर्डीमध्ये एक प्रार्थना, एक नवस बोलून आलो होतो. पुन्हा शिर्डीत येईन ते पीएसआय होवूनच. हा अवघड नवस बोलून मी बाबांना जणू कोडयातच टाकले होते. ज्या पीएसआय पदासाठी मी आतूर होतो. त्यासाठी सिव्हिल दुनियेत फार मोठी मारामार सुरु होती. सर्वसामान्याचे तर काम नव्हतेच मुळी. त्यात मी भारतीय सैन्यात. परंतु बाबांनी सांगितले आहे. माझे शब्द प्रमाण माना. त्यानुसार स्वप्नवत मी कारगील येथे गेलो. तेथून ऐच्छिक बदली मिळवून पुणे कॅम्प येथे आलो. नंतर सर्वच अडचणी दूर होत गेल्या आणि क्रमाक्रमाने पीएसआयच्या दिशेने पडू लागली. या काळात जे जे अशक्य ते बाबांच्यामुळे शक्य होत गेले  मी मात्र माझी जिद्द सोडली नव्हती. सातारा येथील गोडोलीच्या बाबांच्या मंदिरातून मराठीतून भाषांतर केलेला साईरंग महाराज यांचा मराठी साई सचरित्र हा ग्रंथ मी घेतला होता. त्यामुळे माझ्या साईभक्तीस आणखीन कलाटणी मिळाली. बाबांच्याबद्दल परिपूर्ण माहिती मिळाली आणि बाबांची भक्ती आणखी दृढ झाली. तर बाबांची ११ वचने वाचताना नवस बोलताना तो कसा बोलावा याबद्दलही वाचनात आले. त्यानुसार मी नवस पूर्ण होईपर्यंत रोजच्या जेवणातील भाकरी न खाण्याचा संकल्प केला होता. आज तीन चार वर्षे होत आली. मी जेवणात भाकरी खात नाही. अगदी स्वप्नात सुध्दा बाबा ती खाऊ देत नाहीत. तसा दृष्टांत मला मिळाला. एकेदिवशी माझी आई स्वप्नात आली. तिने मला स्वैपाकघरात आमच्या गावच्या घरी जेवणास वाढले होते. मी आणि आई दोघेजण जेवण करत होतो. दुपारची वेळ होती. त्यावेळी आमच्या गावचे जगुआण्णा पुढारी अचानक दारावर आले. त्यांना पाहून आईने त्यांना जेवणासाठी हाक मारली. ते लगेचच दारातून आत आले आणि बघतात तो काय माझ्या ताटात भाकरी वाढलेली होती. त्यामुळे त्यांनी ते ताट लगेचच बाजुला घेतले. माझ्या मनात नवसाबद्दल द्विधा अवस्था असे. पीएसआयची परीक्षा लांबणीवर पडणारी प्रक्रिया पाहून मनात कधी कधी वाटायचे बाबांना उगीच कोडयात टाकले आहे. असा नवस बोलायला नको होता. याबद्दल एकदा सातारच्या गोडोली मंदिरात बाबांची माफीही मागितली. भाकरी आणि डाळीच्या भिजवलेल्या सुक्या पिठल्याचा नैवेद्य दाखवून वाटली. त्यानंतर भाकरी खाणे सुरु केले  नसले तरी बाबांना तशी अडचण नको म्हणून नवस फेडला. श्रध्दा असावी अंधश्रध्दा नको. परंतु बाबांनी मात्र स्वप्नात येवून माझे भाकरीचे ताट बाजूस केले. ते फक्त आमच्या गावच्या जगुआण्णा पुढाऱ्याच्या रुपाने आले होते. ते स्वप्न आठवून मी डोळयापुढे आणले की माझा नवस मोडू न देणाऱ्या बाबांची तेवढयाच तत्परतेने आठवण येते. मी आजही पीएसआयसाठी होणाऱ्या २००५ च्या बॅचच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहे. अजून मुलाखतीसाठी पत्र आलेले नाही. त्यामुळे मी आजही जेवणात भाकरी खात नाही. अगदी पोलीस डयुटी करताना महिना दीड महिन्यासाठी कोयना डॅम येथे धरण सुरक्षा डयुटी असताना स्वत: जेवण करुन खायची वेळ आली आणि इतर सहकारी भाकरी करुन खात असले तरी मी माझ्यासाठी चार चपात्या करायचो परंतु परीक्षेचा फायनल रिझर्ल्ट लागेपर्यंत भाकरी खाणार नाही. बाबांच्या कृपेन माझे मनोरथ पुर्ण होतीलच ही सदिच्छा मनी बाळगत लेखणी ठेवतो.

 

।। हरि ॐ बाबा ।।