अध्याय-६-भाग-७

         म्हणुन गोविदां, मला सांग की कोणी एक साधक यथा योग्य परिश्रम केल्यावाचुन केवळ श्रध्देच्या आधारे मोक्षपद प्राप्त करु पाहत होता, जो साधक पुढील आत्मसाक्षात्कार रुपी गावाला येण्याकरिता इंद्रियरुपी गावाहुन निघाला आणि मोक्षाच्या इच्छेच्या वाटेला लागला, परंतु तो साधक आत्मसिध्दीच्या गावाला पोहोचला नाही आणि त्याला प्रपंचात परत येण्याची इच्छाही नाही, अशा स्थितीत ज्याचा आयुष्यरुपी सुर्य मावळला. जसे अवेळी आलेले विरळ असे चुकून आलेले ढग आले तर ते टिकत नाहीत व वर्षावही करत नाहीत, त्याप्रमाणे त्या साधकाला वैराग्यामुळे संसारसुख आणि आयुष्य संपल्यामुळे मोक्ष ही दोन्हीही दूरावलेली असतात, कारण त्याला आत्मप्राप्ती तर दुरच राहिली आणि श्रध्देमुळे त्याला आत्मप्राप्तीची आशा असते, असा दोन्ही गोष्टीना जो मुकला आणि तो आत्मप्राप्ती विषयी पुर्ण श्रध्दा असताना मृत्यु पावला, तर त्याला कोणती गती प्राप्त होते? तेव्हा  श्रीकृष्ण म्हणाले,

        हे अर्जुना ! ज्या मोक्षसुखाची आंतरिक इच्छा आहे, त्याला मोक्षा वाचुन दुसरी गती आहे काय? परंतु एवढेच एक घडते कि, मध्यंतरी काही काळ त्याला विश्रांती घ्यावी लागते, ती विश्रांती देखील श्रेष्ठ प्रकारची असते, की जी देवांनाही प्राप्त होत नाही, वास्तविक अभ्यासाच्या मार्गाने तो भराभर चालला असता, तर देह ठेवण्यापुर्वीच “मी ब्रम्ह आहे ” या जाणिवेवर येवुन पोहोचला असता, परंतु तेवढया वेगाने अभ्यास न झाल्यामुळे त्याला विसावा घेणे भाग पडले, परंतु त्यानंतर मोक्ष‍ त्यांच्यासाठी ठेवलेलाच आहे. (ओवी ४३१ ते ४४०)  अर्जुना ! ऐक, आश्चर्य कसे आहे बघ, जे लोक अतिशय कष्टाने शंभर यज्ञ करुन ज्या गतीला प्राप्त होतात, त्या मोक्षाची इच्छा करणारा हा योगभ्रष्ट पुरूष कष्ट न करता प्राप्त होतो, मग त्याठिकाणचे दिव्य अलौकिक‍ भोग भोगीत असता त्याचे मन कंटाळुन जाते, हे भगंवता ! तुझ्या प्राप्तीच्या मार्गामध्ये हे अकस्मात संकट का निर्माण झाले? असा पश्चाताप तो स्वर्गातील भोग भोगीत असताही सदैव करत असतो,

         नंतर तो मनुष्यलोकात जन्म घेतो,सर्व धर्माचे माहेरघर असणाऱ्या कुळात जन्म पावतो आणि शेत कापल्यानंतर पडलेल्या भातगोटयांचे जसे जोरात फोफावते, त्याप्रमाणे त्याच्या ऐश्वर्याची वाढ होते, जे कुळ नितीच्या मार्गाने वाटचाल करीत असते, सत्य आणि पवित्र भाषण करणारे आणि जे पाहावयाचे ते शास्त्रशुध्द दृष्टीने पाहते, ज्या कुळाला वेद जागृत ठेवतो, स्वधर्माचे आचरण हा ज्याचा व्यवसाय आणि सारासार विचार हाच ज्याचा मंत्री होय, प्रत्यक्ष ईश्वरच ज्याच्या कुळाची योगक्षेमा संबंधी काळजी वाहतो, म्हणजे योगक्षेमाची चितां ही  ईश्वराची पतिव्रता पत्नी झाली आहे, ऋध्दी आणि सिध्दी ज्याच्या गृहदेवता झाल्या आहेत, असे ज्या कुळाने स्वता पुण्य जोडले आहे व जेथे सर्व सुखांची समृध्दी आहे, अशा कुळात तो योगभ्रष्ट पुरुष सुखाने जन्म घेतो,अथवा ज्ञानरुप अग्नीमध्ये हवन करणारे, जे परब्रम्हाच्या सिध्दांतात निष्णात आहेत व जे ब्रम्हसुखरुप शेतीचे वतनदार आहेत,

         जे परब्रम्हाच्या सिध्दांताच्या सिहांसनावर बसुन त्रैलोक्यात धर्म-आचरणाचे राज्य करतात, जे संतोषाच्या वनामध्ये अध्यात्म ज्ञानाचे मधुर कूजन करणारे कोकीळ आहेत. (ओवी ४४१ ते ४५०)   जे विवेकरुपी वृक्षाच्या मुळाशी बसुन ब्रम्हरुप फळांचे सदैव सेवन करतात, अशा योग्याच्या कुळात तो योगभ्रष्ट पुरूष जन्म घेतो, जन्म घेतल्यावर बालपणीच त्याच्या हदयात आत्मज्ञानाचा प्रकाश पसरतो, ज्याप्रमाणे सुर्य उगवण्याच्या पुर्वी अरूणोदयाचा प्रकाश पसरत असतो, त्याप्रमाणे प्रौढ वयाची वाट न पाहता बालपणीच त्याला सर्वज्ञतेने वरलेले असते.मागील जन्मसिध्द प्रज्ञेच्या लाभाने त्याचे मन सर्व विद्यांना प्रसवते, त्यामुळे सकळ शास्त्रे त्याच्या मुखातुन आपोआप प्रगट होतात, अशा प्रकारचे जे जन्म असतात, पार्था ! देवांनी भाट होवुन मृत्यूलोकाचे वर्णन करावे, असा जो श्रेष्ठ जन्म , तो योगभ्रष्ट पुरुषाला सहजच प्राप्त होतो, आणि मागील जन्मात आयुष्याचा शेवट झाला होता, त्या वेळेच्या सदबुध्दीचा संस्कार पुन्हा त्याला प्राप्त होतो, एखादा माणुस भाग्यवान आणि पायाळु असेल आणि त्याच्या नयनकमलांत जर दिव्याजंन असेल तर मग तो ज्या पाताळातील गुप्त धन सहज पाहु शकतो, त्या प्रमाणे गुरूंनी सांगितल्या शिवाय न कळणाऱ्या कठीण अभिप्रायाच्या ठिकाणी त्याची बुध्दी प्रयत्नावाचुन सहजपणे प्रवेश करते, बलशाली इंद्रिये मनाच्या आधीन होतात, मन प्राणाशी एकरुप होते आणि प्राण हा मूर्धन्याकाशात समरस होवु लागतो. (ओवी ४५१ ते ४६०)

        असे आपोआप कसे घडते, हे काही कळत नाही , त्या योगभ्रष्टाला अभ्यास आपोआप येतो आणि समाधी त्याच्या मनाचे घर विचारीत येते, असे वाटते की, तो योगभ्रष्ट पुरुष जणु योगरुपी पीठावर उभा असलेला भैरव देवच आहे, अथवा योगारंभरुपी गजाननाचा मोठेपणा आहे, किवां वैराग्य सिध्दीचा अनुभवच आकाराला आला आहे. हा पुरूष संसाराची मर्यादा मोडण्याचे जणू काही मापच आहे अथवा अष्टांगयोग सामग्रीचे बेटच होय, जणू काही सुगंधाने रुप धारण करावे, याप्रमाणे साधक अवस्थेत हा एवढा धैर्यवान झालेला असतो की, जणू काही तो संतोषाचा पुतळा अथवा सिध्दीच्या भांडारातुन काढल्यासारखा दिसत असतो, कारण की कोटयावधी वर्षानी हजारो जन्मांचा प्रतिबंध दुर करीततो आत्मसिध्दीच्या किनाऱ्याला येवुन पोचतो, म्हणुन सर्व प्रकारची साधने स्वभावताच त्याला आपोआप प्राप्त होतात आणि मग तो सहजपणे  विवेकाच्या गादीवर बसतो, नंतर वेगाने आत्मतत्वांचा विचार करीत असता साधक पुढे जाता असतो त्यामुळे विवेकही मागे रहातो. आणि मग सर्व विचाराच्या पलीकडे असलेले ब्रम्ह ते तो स्वताच होतो, अशा समाधीच्या अवस्थेत मनरुपी ढग विरुन जातात, प्राणवायुचे हसणे बंद होते आणि तो आपल्या ठिकाणच्या चिदाकाशात लीन होवुन जातो, तो ओमकाराच्या बिदुंरुप अर्धमात्रेमध्ये निमग्न होतो,अशा प्रकारे त्याला शब्दाने वर्णन करता येत नसलेले सुख प्राप्त होते, म्हणून अशा सुखाचा अनुभव येण्याकरता शब्द आधीच मागे फिरतो, अशी जी परब्रम्हाशी एकरूप होण्याची अवस्था आहे की जी सर्व सदगतीसाठी ही सदगती आहे, त्या निराकार ब्रम्हस्थितीची हा मुर्ती होवुन राहतो. (ओवी ४६१ ते ४७०)

      त्याने मागील अनेक जन्मात विक्षेपरुपी केरकचरा काढुन टाकला म्हणुन त्याची लग्न घटिका त्याचा जन्म होताच बुडते, ज्याप्रमाणे ढग नाहीसा झाला म्हणजे तो आकाशाशी एकरूप होतो, त्याप्रमाणे ब्रम्हस्वरुपाशी त्याचे अभिन्नतेने लग्न लागते, ज्याच्या पासुन संपुर्ण विश्वाची उत्पत्ती होते,ज्याच्यामुळे विश्व चालते व ज्या ठिकाणी विश्व पुन्हा लय पावते, असे जे ब्रम्ह ते तो योगी याच देहाने होतो. ज्या वस्तुच्या प्राप्तीच्या आशेने कर्मनिष्ठ लोक धैर्यरुपी बाहुंवर विश्वास ठेवुन अध्ययन, अध्यापन, यजन, दान, प्रतिग्रह या षटकर्माच्या प्रवाहात उडी घालतात, ज्या एका वस्तुकरिता ज्ञानी लोक ज्ञानाचे चिलखत अंगावर चढवुन विचाररुपी समरागणावर प्रपंचाशी झुंज देतात. अथवा तपस्वी ब्रम्हपआप्तीच्या इच्छेने तपरुपी तुटलेल्या निराधार व निसरडया किल्यावर चढण्याचा प्रयत्न करतात, या प्रकारे जे भक्तांच्या भक्तीचा विषय आहे जे यज्ञ करणाऱ्यांच्या यजनाचा विषय आहे, जे सर्व पुजकांच्या सदैव पूजनाचा विषय आहे, जे साधकांचे साध्य आहे, जे सिध्दांचे स्वयंभू असे तत्व आहे, ते निर्वाण ब्रम्ह तो योगी स्वता शेवटच्या जन्मात बनलेला असतो, म्हणून तो कर्मनिष्ठांना वंद्य आहे, ज्ञानवंतांनाही तो जाणुन घेण्यास योग्य आहे,तसेच तपस्वी लोकामध्येही तो प्रमुख तपोनाथ आहे, जीव व परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्याच्या मनाचे ऐक्य झालेले असते, त्यामुळे तो देहधारी असला तरी त्याला महान योग्यता प्राप्त झालेली असते. (ओवी ४७१ ते ४८०)

           हे अर्जुना ! याकरता मी तूला सदैव म्हणत आहे की, तु अतंकरणाने खराखुरा योगी हो, अरे योगी ज्याला म्हणतात, तो देवांचाही देव आहे, असे जाणावे तो माझे सुखसर्वस्व आहे, तो चैतन्यरुप आहे, ज्या योग्याला भक्ती करणारा , भक्तीचा विषय आणि भक्तीची साधने हे सर्व अभेद अनुभवाने अखंडितपणे तीच झाला आहे  हे सुभद्रापते ! त्याच्या आणि माझ्या प्रेमाचे स्वरुप वर्णन करता येत नाही, तर असे जाण की तो म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे, त्या ऐक्यभावाच्या प्रेमाला जर योग्य उपमा पाहिजे असेल तर मी देह आणि तो आत्मा ही होय, संजय धृतराष्ट्रास म्हणाला, भक्तरुपी चकोरास चंद्राप्रमाणे असलेला, सदगुणांचा सागर, सर्व त्रिभुवनाचा राजा अशा त्या श्रीकृष्णाने सांगितले. तेथे अर्जुनाला पुर्वीपासुन यागाचे वर्णन श्रवण करण्याची आस्था होती, ती पुन: दुप्पट  वृध्दीगत झाली, असे भगवंतांनी मनात जाणले, आणि ते पाहुन श्रीकृष्णाच्या मनात सहजच आनंद प्रगटला, कारण आपल्या बोलण्याचे यथार्थ असे प्रतिबिबं ग्रहण करणारा जणु हा अर्जुन आरसा लाभलेला आहे.

          तेव्हा आता या आनंदाच्या भरात ते पुढील कथा सांगतील, तो निरुपणाचा प्रंसग पुढील अध्यायात आहे,  त्यामध्ये शांतरस स्पष्टपणे दिसून येईल, प्रतिपाद्य विषयाची साठवण मोळी करुन विस्तृत प्रकारे श्रोत्यांच्या अतंकरणात पेरणी करून त्यांना अंकुरित करण्यात येईल, कारण्‍ आता सत्वगुणांच्या वर्षावाने बुध्दिरुपी शेतातील पापविचारांचा रुक्षपणा गेला आहे, आणि चतुर चित्ताचे वाफे सहजपणे तयार झाले आहेत, त्यावर पुन: श्रोत्यांच्या अवधानाचा सोन्यासारखा वाफसा लाभला, म्हणुन सदगुरु निवृत्तीनाथांना सिध्दांतरुपी बीज पेरण्याची सदिच्छा निर्माण झाली, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते बीज पेरण्यासाठी कौतुकाने सदगुरूंनी माझी या ठिकाणी योजना केली आणि माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि ते बीज उघडपणे सोडले , म्हणुन माझ्या मुखातुन जे जे काही प्रगटेल, ते सत्य आहे, हे संतांना जाणवेल, असो , आता श्रीरंग काय बोलले, ते पुढील अध्यायात सांगेन, ते अमृतमधुर शब्द मनाच्या कानांनी ऐकावेत, बुध्दीच्या डोळयांनी  पाहावेत, तसेच वक्याला चित्त द्यावे आणि त्याच्या बदली शब्द घ्यावेत, ते शब्द अवधानाच्या हाताने हदयात आत न्यावेत, ते शब्द सज्जनांच्या मनाला निश्चीतच समाधान प्राप्त करुन देतील, हे शब्द आत्महित प्राप्त करुन देवुन शांत करतील, आनंददायी मोक्ष प्राप्त करुन देतील आणि लक्ष लक्ष सुखाचे उन्मेष जीवनात निर्माण करतील आता श्रीकृष्णाने अर्जुनास सहजपणे जे सर्वोत्कृष्ट ज्ञान सांगितले , ते मी ओवी छंदाने सांगेन.

सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरी सहावा अध्याय भगवंताच्या कृपेने संपन्न !

 (  भगवदगीता श्लोक १ ते ४७ आणि ज्ञानेश्वरी ओव्या ४९७  )

पुढील अध्याय