अध्याय-९-भाग-१

ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी

सार्थ भगवद् गीता अध्याय – 

राजविद्याराजगुहय  योग

श्री ज्ञानदेवांनी भगवद् गीतेतील अध्याय  मधीलराजविद्याराजगुहय योगया अध्यायातील ते  ३४ संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन ५३५ ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे. परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहेहा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य  कृपाप्रसाद आहे, मनुष्य जीवन जगण्यासाठी अनमोल संजीवनी आहे, किंबहुना संसारसागर पार करण्यासाठी अध्यात्मातील नौका आहे, तिच्या मदतीने संसार करता सावरता आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनसागरातुन तरुन जावे आणि आपल्या जीवनाचे कोटकल्याण साधावे. ही ज्ञानदेवांची  “अक्षरब्रम्ह ज्ञानेश्वरीआत्मसाद करुन जीवनाचे  सार्थक करावे.

        तरी श्रोते हो ! माझ्या वचनाकडे तुम्ही लक्ष द्यावे, म्हणजे तुम्ही सर्व शाश्वत सुखाला प्राप्त व्हाल ही माझी अंत:करणापासुन केलेली प्रतिज्ञा ऐका. परंतु तुमच्यासारख्या सर्व जाणकारांच्या सभेमध्ये मी हे अहंकाराने बोलत नाही, तर तुम्ही तत्वविचारांच्याकडे लक्ष द्यावे, ही माझी लडिवाळपणाची प्रेमाची विनंती आहे.कारण तुमच्यासारखी श्रीमंत, प्रसन्न माहेरघरे असल्यावर मुलाचे हटट लाडाने पुरविले जातात आणि मनोरथांची इच्छादेखील पुर्ण होते, तुमच्या सदिच्छेच्या ओलाव्याने प्रसन्नतेचे मळे फुजले आहेत त्या थंडगार सावलीत श्रमलेला मी विश्रांती घेत आहे. महाराज तुम्ही सुखामृताचे डोह आहात, म्हणुन आम्ही स्वताच्या इच्छेने यातील ओलावा प्राप्त करुन घेत आहोत येथे जर सलगी करण्यास आम्ही भिवु लागलो तर आम्ही कोठे बरे शांत व्हावे? अथवा लेकरू जसे बोबडे बोल बोलत असते, अथवा वेडे-वाकडे पाय टाकत चालण्याचा प्रयत्न करत असते ते पाहुन आईच्या हदयात समाधानाच्या लहरी निर्माण होत असतात. त्याप्रमाणे, तुम्हा संत-सज्जनांच्या प्रेमाचा वर्षाव व्हावा, म्हणुन उत्कट भावनेने आम्ही सलगी करत आहोत वास्तविक  पाहता, माझ्या बोलण्याच्या योग्यते वाचुन आपणासारखे श्रोते सर्वज्ञ असु शकतात, सरस्वतीच्या पुत्राला एक-एक धडा पाठ करवुन त्याला शिकवावयाचे असते काय? असे पाहा वाटेल तेवढा मोठा काजवा असला तरी त्याचे सुर्यापुढे तेज पडेल काय? तसेच अमृताने भरलेल्या ताटामध्ये वाढण्यासारखी‍ योग्य पक्कवान्ने कोठुन आणणार? शीतल किरणाने परिपूर्ण असणाऱ्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किवां नादब्रम्हाला गाणे ऐकविणे अथवा स्वता अलंकाराला अलंकाराने सजविणे, असे कधी झाले आहे काय? (ओवी १ ते १० )

              सांगा बरे परिमलाने कशाचा वास घ्यावा? समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे? विशाल आकाश ज्याच्या आड होईल असा कोणता मोठा पदार्थ आहे? त्याप्रमाणेच, तुमची श्रवण करण्याची इच्छा पुर्ण तृप्त होईल असे  वक्तृत्व कोणात‍ आहे, की ज्यामुळे तुमचे मन रमुन जाईल? असे जर आहे तर जो संपुर्ण विश्वाला आपल्या प्रकाशाने प्रकाशित करतो त्या प्रखर तेजयुक्त सुर्याची हातात धरलेल्या वातीने आरती करु नये का? किवां विशाल सागराला चुळकाभर पाण्याने अर्घ्य देवु नये का? महाराज ! तुम्ही मुर्तिमंत भगवान शंकरच आहात,  मी दुर्बळ असुनही निर्मळ आणि शुध्द अंत:करणाने प्रेमपुर्वक तुमची पुजा करत आहे, म्हणुन बेलाऐवजी मी जरी निर्गुडी वाहत असला तरी आपण त्याचा स्वीकार करावा. लहान बालक वडिलांच्या ताटासमोर बसुन ते वडिलांना भरवु लागते तेव्हा ते संतोषाने तो घास खाण्यासाठी आपले तोंड पुढे करतात, त्याप्रमाणे मी तुमच्याशी बाललीला करीत आहे, तरी तुम्ही संतुष्ट व्हावे, कारण हा प्रेमाचा स्वभावच आहे. आणि त्या आपलेपणाच्या मोहाने तुम्ही संत-सज्जनांनी अनेक प्रकारांने मला आपले असे म्हटले आहे, म्हणुन या सलगीचा तुम्हाला भार वाटणार नाही. अहो, गायीला तान्हया वासराने ढुशी दिल्यावर ज्याप्रमाणे तिला अधिक पान्हा फुटतो त्याप्रमाणे अतिशय प्रिय जी व्यक्ती असते, तिच्यावर रागावण्याने प्रेम द्विगुणित होत असते. म्हणून तुमचे सुप्त कृपाळुपण माझ्या लेकराच्या बोलण्याने जागृत झाले, असे मला निश्चीत जाणवले, याकरिता अवधान द्या, असे मी बोललो एरव्ही चंद्राचे चांदणे कोणी अढीत घालुन पिकवले आहे काय? किेवां वाऱ्याला वाहण्यासाठी कोणी गती दिली आहे का? किवां विशाल आकाशाला गवसणी घातली आहे का? (ओवी ११ ते २० )

           ऐका, पाण्याला पातळ करावे लागत नाही, लोणी एकदा तयार झाले की त्याला रवीने कोणी घुसळीत नाही, त्याप्रमाणे या गीतेला बघुन लाजलेले व्याख्यान माघारी परतत आहे. हे असो शब्दरुपी सुर्य मावळल्यानंतर वेद ज्या बाजेवर निवांत झोपतो त्या गीतार्थाचे मी मराठी भाषेत वर्णन करावे, अशी माझी योग्यता आहे काय? परंतु जरी माझा अधिकार नसला तरी पुढील आशेवर इच्छा निर्माण झाली ती म्हणजे मनात आत्मिविश्वास निर्माण करुन आल्यासारख्याचे निस्वार्थी प्रेम संपादन करावे तर आता चंद्रापेक्षाही अधिक‍ शीतल करणारे अमृताहुनही जीवीत वाढवणारे असे जे आपले अवधान, त्याने माझे मनोरथ‍ उंच करावे. कारण जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल तेव्हा माझ्या बुध्दीरुप भूमीत सर्व अर्थरुप धान्य उत्तम प्रकारे फुलून येईल येऱ्हवी तुम्ही उदास असलात तर नुकतेच अंकुरदशेला आलेले ज्ञानरुपी पीक सुकुन जाईल,  तरी सहजपणे असे लक्षात घ्या की वक्तृत्वाला अवधानाचे खाद्य असेल तर अक्षरांना प्रमेयांची वाढलेली दोंदे सावरुन धरता येतात.आपल्या अवधानामुळे प्रारंभी वक्त्याच्या मनात अर्थ स्फुरण पावतो नंतर तो  अर्थ स्वताचा अविष्कार होण्याकरीता शब्दांची अत्यंत आतुरतेने वाट पहात असतो, त्यावेळी एक अभिप्राय दुसऱ्या अभिप्रायाला प्रगट करतो आणि बुध्दीवर भावभावंनाच्या फुलांचा बहर येतो,म्हणून सुखसंवादरुपी अनुकूल वारा सुटला, तर वक्त्याच्या हदयरुपी आकाशात ब्रम्हज्ञानाचा वर्षाव होतो श्रोता जर स्थिर चित्ताचा नसेल तर उत्तम प्रकारे निर्माण झालेला इंद्रधनुष्यरुपी रस वितळुन जाईल,अहो चंद्रकांत मणी पाझरणारा आहे हे खरे परंतु त्याला पाझरास लावण्याचे कौशल्य चंद्रातच आहे, त्याप्रमाणे श्रोत्यानी अवधान दिले तर हदयातुन शब्दसंपदा प्रगट होईल कारण अवधान देणाऱ्या श्रोत्याशिवाय वक्ता तो वक्ताच नाही, “परंतु आता आम्हाला गोड करावे”  अशी प्रकारची विनंती तांदुळानी जेवणांऱ्याना कशासाठी करावी? कळसुत्री बाहुल्यांनी “आम्हाला उत्तम प्रकारे नाचवा” अशी सुत्रधाराला प्रार्थना करावी काय? (ओवी २१ ते ३० )

                 तो सुत्रधार बाहुल्यांच्या करामती प्रेक्षकांना दाखविण्या करिता त्यांना नाचवीत नाही, तर आपली कला दाखविण्यासाठी त्यांना नाचवितो, म्हणुन आम्हाला अवधान द्या अशी उठाठेवी करण्याचे कारण काय? तेव्हा श्रीगुरू म्हणाले, “असे इतके बोलण्यासारखे झाले तरी काय? “अवधान द्या” या बोलण्यातील अर्थ समजला तरी आता श्रीकृष्णाने अर्जुनाला जे सांगितले, ते आम्हाला सांग” त्या वेळी श्रीगुरुंच्या बोलण्याने संतोष पावुन निवृत्तीनाथाचा दास ( ज्ञानेश्वर ) होय महाराज ठीक आहे असे उल्हासाने बोलते झाले. श्रोते हो ! ऐका, श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना !  हे ज्ञान सर्व ज्ञानाचे बीज आहे ही माझ्या अतं: करणातील जीवाची गोष्ट आहे की जी तुला मी पुढे सांगणार आहे, एवढी जीवाची  आतील गोष्ट बाहेर काढुन हे गुहय मला का बरे सांगावे, अशी जर तु स्वाभाविकपणे काही कल्पना करशील तर हे बुध्दीमान अर्जुना!  ऐक तुला ज्ञानप्राप्तीची तीव्र अशी इच्छा आहे आणि सांगितलेल्या गोष्टीची अवज्ञा करण्याचे तु जाणत नाहीस म्हणुन आमची गुहय गोष्ट बाहेर पडली, तर पडो शिवाय न बोलण्याची गोष्ट बोलावी लागली तर लागो, पण आमच्या हदयातील गुप्त ज्ञान तुझ्या हदयात अंकित होवो, अरे! स्तनांमध्ये दुध गुप्तपणे वास करीत असते, तरी त्याची गोडी स्तनांना नसते, पण तान्हया बाळाची दुध पिण्याची इच्छा पुर्ण होत असेल तर ती इच्छा पुर्ण होवो असे मातेला वाटत असते. कणगीमधुन बी बाहेर काढले आणि ते नांगरलेल्या जमिनीत पेरले तर ते व्यर्थ सांडले, विखुरले गेले असे म्हणता येईल काय? या करिता सात्विक मनाचा व शुध्द बुध्दीचा आणि निंदा न करणारा असा जर एकनिष्ठ भक्त असेल तर त्याला आपली गुहय गोष्ट सुखाने सांगावी.  (ओवी ३१ ते ४० )

         तरी आता प्रस्तुत गुणांनी युक्त तुझ्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही, म्हणुन जरी ही गुहय गोष्ट असली, तरी तुझ्यापासुन लपवु नये असे मला वाटते, आता वारंवार गुहय-गुहय असे म्हटले असता तुला ते कंटाळवाणे वाटेल तरी तुला विज्ञानासह ज्ञान सांगतो परंतु खरे आणि खोटे यांचे मिश्रण झाले असता ते परीक्षा करुन वेगळे काढावे, त्याप्रमाणे तुला ज्ञान-विज्ञान निवाडा करुन सांगेन, किवां चोचीच्या सांडशीने मिश्र झालेले दुध आणि पाणी राजहंसाने जसे वेगळे करावे त्याप्रमाणे  तुला ज्ञान-विज्ञान स्पष्टपणे वेगवेगळे सांगु. कोंडा व धान्य उफणण्यासाठी वाऱ्याच्या धारेवर धरले असता जसा कोंडा उडुन जातो आणि धान्याची रास आपोआप जोडली जाते, त्याप्रमाणे  जे ज्ञान जाणले असता देहादी प्रपंच हा प्रपंचाच्या पदरी बांधुन जीवाला मोक्ष ऐश्वर्याच्या पदावर बसविते, सर्व प्रकारच्या ज्ञानाच्या गावात ब्रम्हज्ञानाला थोरपणाची आचार्य अशी पदवी आहे, जे ज्ञान सर्व गुपित गोष्टीचा स्वामी आहे आणि पवित्रतेचा राजा आहे आणि जे धर्माचे स्वतांचे राहण्याचे घर आहे तसेच जे उत्तमातील उत्तम आहे त्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता पुन्हा जन्म-मरणाच्या चक्रात फिरण्याचे कारण राहत नाही, सदगुरुंच्या मुखकमलातुन जे ज्ञान प्रगटताना दिसते ते हदयामध्ये मुळचे सिध्दच असते तसेच ते सहजपणे प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते, त्याप्रमाणे ज्याच्या भेटीला सुखकारक पायरीने चढत यावयाचे असते आणि जे भेटले असता त्यांचे भोगलेपणही अवश्य संपुन जाते. परंतु भोगाच्या अलिकडच्या काठावर गुरुमुखाने झालेल्या ज्ञानाच्या तीरावर चित्त स्थिर झाले की ते सुखाने भरुन जाते, ते ज्ञान प्राप्त करुन घेणे शक्य आहे आणि सुलभ आहे, शिवाय ते ज्ञान स्वरुपता परब्रम्ह आहे. (ओवी ४१ ते ५० )

          आणखीही या ज्ञानाचे  वैशिष्ठय म्हणजे ते ज्ञान प्राप्त झाले असता नाहीसे होत नाही, अर्जुना ! तू तर तर्किक आहेस विचारी आहेस त्यामुळे तुझ्या मनात अशी शंका येईल की एवढी महत्वपुर्ण ज्ञानवस्तु असताना लोकांची या ज्ञानाकडे प्रवृत्ती का नाही? ज्याच्यां मनात धनाबद्दल अत्यंत लोभ आहे ते शंभर रुपयांवर एक रुपया व्याज अशा दराने पैसे देऊन जणु काही जळत्या अग्नीत उडी घेतात तर मग ते अनायसे मिळणारी ब्रम्हसुखाची गोडी कशी टाकतील? तरी पवित्र आणि रम्य तसेच सुखकारक साधनाने प्राप्त होणारे जाणावयास सुलभ, अतिसुखकारक, धर्माला अनुकूल असे व आपल्याच ठिकाणी आपणास मिळणारे याप्रमाणे हे सर्व प्रकारे सुखकारक आहे तर ते लोकाच्यां हाती लागल्याशिवाय कसे राहील? अशा प्रकारची शंका घेण्यास जागा आहे परंतु तू अशी शंका मनात आणू नकोस असे पाहा की दुध हे पवित्र आणि गोड आहे तसेच ते अगदी जवळ त्वचेच्या पडद्याच्या आतच आहे, परंतु त्याचा त्याग करुन गोचडी रक्ताचेच सेवन करीत नाही का? किवां कमळातील मकरंदाचे सेवन भ्रमर करतात आणि जवळ असणाऱ्या बेडकांना मात्र चिखलच शिल्लक रहातो, अथवा एखाद्या भाग्यहीन माणसांच्या घरात हजारो मोहोरा पुरून ठेवल्या आहेत परंतु त्याला त्याचे ज्ञान नसेल तर तो त्या घरात उपाशी बसुन दारिद्रयाने जीवन कंठीत असतो, त्याप्रमाणे मानवांच्या सर्व सुखाचे विश्रांतिस्थान असा आत्माराम मी हदयामध्ये असताना अज्ञानी माणसांची इच्छा विषयांकडे धाव घेत असते. (ओवी ५१ ते ६० )

            डोळयांनी मोठा मृगजळ पाहिला असता अमृताचा घोट गिळता- गिळता थुंकून टाकावा अथवा शिंप मिळाली असता गळयात बांधलेला परिस तोडुन टाकावा, त्याप्रमाणे मी आणि माझे या भ्रमात रमुन गेलेले लोक माझ्याशी एकरुप होत नाहीत आणि म्हणुन जन्म-मरणाच्या दुथडया भरुन वाहणांऱ्या संसारनदीत गटागंळया खात राहीले आहेत, येऱ्हवी मी कसा आहे तर तोंडासमोर जसा  सुर्य, तसा मी सर्वाना सदैव समोर आहे माझे अस्तित्व स्वयंप्रकाशरुप आहे मी स्वयंभू आहे, म्हणून मी कधी नाही आणि भासत नाही, हा बोलण्याचा विषय होत नाही, माझ्या विस्तारलेपणाच्या नावाने संपुर्ण जगत नाही काय? ते कसे? तर दुध विरजले असता स्वभावता तेच दही होते किवां एक बीजच वृक्षाच्या रुपाने जसे विस्तारलेले असते अथवा एकच सोने अलंकार जसे व्हावेत, त्याप्रमाणे माझ्या एकटयाचा हा विस्तार म्हणजे संपुर्ण जगतच होय,हे संपुर्ण विश्व पुर्वी अव्यक्तपणाने थिजलेले होते तेच नंतर विश्वाच्या आकाराने पातळ झाले म्हणजे सर्वत्र पसरले अशा प्रकारे अव्यक्त अशा माझ्याकडुन व्यक्त रुपाने जे विस्तारले तेच हे त्रैलोक्य जाण.जलावर ज्याप्रमाणे फेस भासतो, त्याप्रमाणे महत्त तत्वापासुन देहापर्यत ही सर्वही भुते माझ्या ठिकाणी भासत असतात.  परंतु अर्जुना ! त्या फेसामध्ये पाहिले तर पाणी दिसत नाही किवां स्वप्नातील विविध प्रकारची दृश्ये जागृत झाल्यावर राहत नाहीत, त्याप्रमाणे ही भुते माझ्या ठिकाणी भासमान होतात परंतु मी त्या भूतांमध्ये नसतो, माझ्या स्फुर्तीमुळे जगाला प्रतीती आहे परंतु जगाच्या आधीन माझी स्फुर्ती नाही हा सिध्दातं आम्ही तुला मागे सांगितला आहे तो लक्षात आण. (अध्याय – ७ श्लोक १२ ) म्हणुन मागे जे सांगितलेले आहे त्याचा पुन: अतिविस्तार करु नये असे वाटते म्हणुन हे बोलणे राहु दे आता तुझी दृष्टी माझ्या स्वरुपात विस्तार पावो. (ओवी ६१ ते ७० )

पुढील भाग