अध्याय १६ भाग ६

याप्रमाणे विश्वातील सर्व संपत्तीचा मीच मालक होईन मग माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याला मी शिल्लक ठेवणार नाही, आज पर्यत अनेक शत्रु मारले परंतू ते थोडेच असुन आणखीन जे बलाढय शत्रु आहेत त्यांनीही मी संपवणार आहे मग मी एकटाच या जगामध्ये मोठया लौकिकाने नांदेन, जे कोणी माझे दास होतील त्यानां मी जीवंत ठेवीन, त्याशिवाय इतरानां मारुन टाकीन, फार काय सांगावे?  चराचरात ईश्वर जो आहे तो मीच आहे मी सर्व भोगांचा व पृथ्वीचा राजा आहे जगातील सर्व सुखांना प्राप्त होणारा मीच आहे, मला पाहील्यावर इंद्र सुध्दा तुच्छ वाटतो, मी काया, वाचा, मनाने जे जे करीन ते ते सर्व सिध्दीस जाईल, माझ्यावाचुन अधिकारवाणीने आज्ञा करणारा सिध्द पुरुष दुसरा कोण आहे? माझ्या बलाची  दुसऱ्या कोणत्याही बलाशी तुलना करता येत  नाही, जोपर्यत  माझे  बल  दिसत आहे तोपर्यतच मुत्यू रुपी काल माझ्यापेक्षा बलवान मानला जातो आणि मी  तर  केवळ  सुखाची राशीच आहे, कुबेर तर संपन्न आहे हे खरे आहे, परंतु तो माझ्या अमर्याद संपत्तीला जाणत नाही, माझ्या संपत्तीची बरोबरी लक्ष्मीपती भगवंतही करु शकत नाही, माझ्या कुळाची शुध्दता अथवा जातीचा आणि गोत्राचा समुदाय पाहता ब्रम्हदेव सुध्दा हलका व कमी दिसेल. म्हणुन लोक ईश्वरांदिकाचा लौकिक  गातात, तो व्यर्थ असुन माझ्याशी  तुलनेला पावेल, असा त्रैलौक्यात कोणी नाही, सांप्रत काळामध्ये अभिचार-कर्म लोपले आहे त्याचा मी जिर्णेाध्दार करीन, लोकाना पीडा करणारे यज्ञ-याग करीन.    (ओवी ३५१ ते ३६०)

माझ्या स्तुतीची गीते जे गातील, नृत्याद्वारे माझे जे रंजन करतील त्यांना मी ते मागतील ती वस्तु दान देईन, मादक पदार्थाच्या खाण्या-पिण्याने आणि तरुण स्त्रियांच्या आलिंगनानी मी सुख-समाधानाचे रुप होईन, अधिक काय सांगु? ज्यांना आसुरी पणाचे वेड लागलेले आहे, ते अशा प्रकारे काल्पनिक आकाशपुष्पांच्या अमर्याद वास घेतात. शरीर तापाने व्यापल्यामुळे रोगी जसा वाट्टेल ते बडबडतो त्याप्रमाणे ते आसुरी लोक मनातील नाना विषयांच्या संकल्पाने वाटेल तशी बडबड करतात. अज्ञानरुपी धुळ आशारुपी वावटळीच्या सपाटयात सापडल्यानंतर मनोरथरुपी आकाशात फिरत असतात. आषाढ महिन्यात मेघ जसे अमर्याद प्रमाणात येतात, अथवा समुद्रावर लाटा जशा अखंडपणे येतात. त्याप्रमाणे त्याच्या मनात विषयांच्या लाटा अव्याहतपणे निर्माण होतात, मग त्यांच्या अंतकरणात विषयवासनांच्या वेलींच्या जाळया पसरतात, सुकोमल कमले जशी काटयांवरुन ओढावीत अथवा अर्जुना!  दगडावर मातीची घागर जशी फोडावी त्याप्रमाणे त्यांच्या अंतकरणात विविध विषय वासनांमुळे सर्व बाजुंनी तुकडे तुकडे झालेले असतात, रात्र जशी वाढत जाते तसतसा अंधारही वाढत जातो त्याप्रमाणे विषयवासना वाढत असता त्यांचा मोह देखील वाढु लागतो, ज्याप्रमाणात मोह वाढतो त्या प्रमाणात विषयवासना वाढत चाललेली असते आणि विषय हे तर पातकांना कारणीभुत आहेत. (ओवी ३६१ ते ३७०)

पापे आपल्या बळाने जेव्हा समुह करतात तेव्हा जीवंतपणी आसुरी लोकाना नरकयातना भोगाव्या लागतात, हे शुध्द बुध्दीच्या अर्जुना! अशा प्रकारच्या वाईट वासना बाळगणारे हे असुर ते अशा नरकात रहावयास येतात, ज्या ठिकाणी तलवारीच्या तीक्ष्ण धारे प्रमाणे पाने असलेली मोठमोठी झाडे आहेत जेथे खैराच्या निखाऱ्यांचे डोगंर आहेत व तापलेल्या तेलाचे समुद्र उसळत्‍ आहेत, जेथे यातनांची रांगच लागलेली असते यमाची रोजच जाचणी असते, अशा महाभयंकर नरकलोकामध्ये ते पडतात, असे जे नरकाचे निवडक भागीदार जन्माला आले आहेत ते खरे तर धार्मिक नाहीत परंतु भ्रमिष्ट होवुन ते यज्ञ करताना दिसतात. अर्जुना! यज्ञादी कर्माचे फळ जे आहे, तेच वास्तविक त्याच्यां आचरणाने प्राप्त व्हावयाचे परंतु नाटकी लोकांप्रमाणे मोठा देखावा करुन ते असुर त्या कर्माचरणास निष्फळ करुन टाकतात. स्वैरपणे वागणाऱ्या स्त्रिया आपल्या प्रियकराचा आश्रय करुन आपणास सौभाग्यवती मानुन  जशा मनामध्ये संतोष  मानतात, आसुरी लोक आपले आपणास मंहत मानतात, त्यांच्या अंगात गर्वाचा ताठा असतो, लोखंडाचे ओतीव खांब जसे लवत नाहीत आकाशात उंच गेलेली पर्वताची शिखरे जशी नम्र होत नाहीत, त्याप्रमाणे आसुरी लोकही नम्र होत नाहीत, ते आपल्या वागण्याने मनात संतोष‍ मानत असतात, आणि इतरांना  गवतापेक्षाही शुद्र समजतात. (ओवी ३७१ ते ३८०)

अर्जुना! धनरुपी अहंकाराचे मद्य प्याल्यामुळे योग्य काय आणि अयोग्य काय याचा ते विचार करत नाहीत, ज्याच्या अंगी विवेक नाही त्याच्या अंगी यज्ञाची किंमंत ती काय आहे? तथापि मुर्ख लोक काय करीत नाहीत?  म्हणून एखाद्या वेळेस अज्ञानपणाने मद्य पिवुन त्या बळाने ते यज्ञाचा आ‍भास निर्माण करतात, त्या यज्ञामध्ये कुंड, मंडप, वेदी नसते आणि उचित अशी यज्ञ सामुग्रीही नसते आसुरी लोकांना सदैव शास्त्रविधिचे वैर असते, देवा-ब्राम्हणांच्या नावाने पुढे आलेला वारा सुध्दा त्यांना चुकुन देखील खपत नाही, असे जेथे वैर आहे, तेथे कोणास यावे, असे वाटेल? ज्याप्रमाणे हुशार माणसे मृत्यू पावलेल्या वासराच्या पोटा‍त कोढां भरुन ते गायीच्या पुढे उभे करुन तिचे सर्व दुध काढुन घेतात, त्याप्रमाणे यज्ञाच्या आमिषाने सर्व लोकांना निमंत्रण देवुन उलट त्यांच्या कडुन आहेर घेवुन त्यांना लुबाडतात, याप्रमाणे आपला मोठेपणा सिध्द करण्यासाठी यज्ञ करतात आणि प्राण्याचा सर्वेातोपरी नाश व्हावा अशी त्यांची इच्छा असते. ते आसुरी लोक आपणच आपल्यापुढे नगारे, डंके वाजवुन यज्ञकेल्याचा दिक्षितपणा प्रसिध्द करतात परंतु त्यांचा तो यज्ञ आभासमात्र असतो तेव्हा लोकांनी दिक्षीत म्हणून त्याच्या केलेल्या गौरवाने त्या अधम आसुरी लोकांच्या अंगावर गर्वाचा मोठेपणा  एवढया मोठया प्रमाणात चढतो की जसे काही अंधाराला काजळाचे लेप द्यावेत. (ओवी ३८१ ते ३९०)

त्याप्रमाणे त्यांचा  मुर्खपणा अधिकच वाढतो उध्दटपणाचीही  वाढ होते अहंकार आणि अविचार हे दुप्पट होतात, आणि मग आपल्याशिवाय या जगामध्ये दुसऱ्याचे नाव सुध्दा घेवु नये म्हणून ते आपल्या मोठेपणाचे बळ वाढवत असतात, याप्रमाणे अहंकार एकदा प्रबळ झाला की दर्परुपी सागर आपली मर्यादा सोडुन प्रक्षुब्ध होतो, याप्रमाणे दर्प वाढला म्हणजे कामाचेही पित्त खवळले मग त्या उष्णतेने क्रोधरुपी अग्नी अतिशय भडकतो, कडक उन्हाळा असावा, त्यात पुन्हा तेला-तुपाच्या कोठाराला आग लागावी आणि त्यात अनुकूल असा जोराचा वारा सुटावा म्हणजे जी अतिशय भंयकर परिस्थिती निर्माण होते तसा अहंकार प्रबल झाल्यावर आणि काम-क्रोधांनी व्यापलेल्या दर्प या दोघांचे ज्याचे ऐक्य झाले आहे, हे वीर अर्जुना! ते आसुरी लोक आपल्या इच्छेप्रमाणे या प्राण्यांना कोणत्या-कोणत्या प्रकारच्या हिसेंने मारत नाहीत? अर्जुना! प्रथम तर ते आपले मांस व रक्त जारण-मारणासाठी खर्च करीत असतात ते ज्या देहाला जाळत असतात, त्यामध्ये मी आत्मरुपाने आहे त्या माझ्या आत्मस्वरुपावर दुखाच्या घावाने मोठे आघात होतात, त्या अविचारी कर्माने ज्या ज्या प्राण्यांना पीडा दिली जाते त्या सर्वामध्ये चैतन्यरुपाने असणाऱ्या मला ती प्राप्त होतच असे जाण. (ओवी ३९१ ते ४००)

जारण-मारणाच्या तडाख्यातुन जे सुटले त्यांच्यावर द्वेष‍ रुपी दगड फेकतात, पतीव्रता, सत्पुरुष, दानशील पुरुष, याज्ञिक, तप करणारे तपस्वी, सर्व संगपरित्याग करणारे संन्याशी असे जे लोकोत्तर पुरुष आहेत अथवा भगवद भक्त व ज्याचे अंतकरण शुध्द आहे असे महात्मे आणि श्रैात, अग्नीहोत्रादी होमक्रियांनी शुध्द झालेले कर्मनिष्ठ पुरुष ही माझी स्वताची राहण्याची घरे आहेत. त्यांना द्वेषरुपी काळकुट पिषाने तीक्ष्ण केलेले दुखरुपी बलशाली बाण मारतात, याप्रमाणे सर्व प्रकारांनी जे माझ्याशी वैर करण्याविषयी प्रवृत्त झाले आहेत त्या पाप्यांना मी कोणती शिक्षा करतो हे तु श्रवण कर हे आसुरी लोक ज्या मनुष्यदेहाचा आधार घेऊन जगाला पीडा देतात ती त्यांची मनुष्यपदाची श्रेष्ठ पदवी हिसकावुन घेऊन मी त्यानां अशा स्थितीत ठेवतो की जी क्लेशरुपी गावाचा उकिरडा आहे जन्म-मरण रुपी नगराचा पाणवठा आहे अशी ती तामस योनी त्या मुर्ख आसुरी लोकांना वतनदारी म्हणुन देतो, मग खाण्याकरता जेथे  गवतही उगवत नाही अशा प्रकारच्या अरण्यात मी त्यांना वाघ, विंचु वगैरे करतो, त्या अशा अरण्यात अतिशय भुक लागली कि दुखाने ते आपल्याच शरीराचे लचके तोडून खातात मग पुन्हा मरुन त्याच तामस योनीत जन्म घेत असतात, अथवा आपल्याच विषाच्या ज्वालेने अंगावरची  मांसल त्वचा जळत असताना देखील त्याला बाहेरची शीतल हवा लागु न देता बिळामध्येच अडकवुन टाकलेला सर्प करीत असतो. (ओवी ४०१ ते ४१०)

       आत घेतलेला श्वास बाहेर सोडण्यास जितका वेळ लागतो तितका वेळही मी त्या तामसी माणसास विश्रांती मिळु देत नाही. याप्रमाणे कल्पांच्या कोटी संख्या कितीही वेळा मोजल्या तरी त्या थोडयाच होतील त्यावेळेपर्यत मी त्यांना दुखातुन बाहेर काढत नाही. त्या असुरांना जेथे जायचे आहे तेथील हा पहिला मुक्काम आहे आणि मुख्य ठिकाण प्राप्त झाल्यावर त्यांना याहीपेक्षा अतिशय अशी दुखे भोगावी लागतात. त्या मुर्ख लोकांनी आसुरी संपत्तीच्या योगाने या मर्यादेपर्यत अधेागती मिळवलेली असते हे तु लक्षात ठेव. तरीही या आसुरी लोकांना मनुष्यदेहानंतर व्याघ्रादी तामस प्रकारच्या योनीमध्ये जो देहाच्या आधाराचा थोडा विसावा प्राप्त होत असतो. परंतु तो आधार, ओलावा सुध्दा नंतर मी हिरावुन घेतो मग ते आसुरी लोक जड अज्ञानरुप होतात, ज्या ठिकाणी अंधार गेला असता तो देखील काळवंडुन जाईल. ज्या तमाची पापालाही किळस उत्पन्न होते नरक ज्याचे भय बाळगतो ज्या ठिकाणच्या श्रमाने श्रमदेखील मुर्च्छावस्थेत जातात. ज्याच्या संयोगाने मळ देखील मलिन होतो. ज्याच्या तपाचा स्पर्शाने विविध तापदेखील पोळुन निघतो ज्याचे नाव काढले असता महाभय सुध्दा भीती पावते. ज्या तपाचा पापालादेखील कंटाळा येतो. अमंगळालादेखील जे अमंगळ वाटते, विटाळालादेखील ज्याच्या विटाळाची भिती वाटते. धनंजया, अशी जी विश्वातील वाईट अवस्था, ती भोगुन ते अधम तामस योनीत पुन्हा पुन्हा जन्म घेतात. (ओवी ४११ ते ४२०)

पुढील भाग