लेखनकाराचे दोन शब्द

 

विघ्न हर्ता श्री गणेश देवांना त्रिवार वंदन !जे गणांचे अधिपती आहेत, भगवान श्री महादेव आणि माता पार्वती यांचे पुत्र, कि ज्यांचे प्रथम स्मरण प्रत्येक शुभ कार्याच्या सुरुवातीस करुन इच्छित कार्य उत्तम प्रकारे पार पडण्यासाठी त्यांचे स्मरण, पुजा, प्रार्थना, वंदन करुन आाम्हास विद्येचे, बुध्दीचे बळ मिळावे म्हणुन स्तवन करुया… तसेच श्री सरस्वती मातेस नमन करुन आपण आपल्या पुर्ण कलांनी प्रकाशीत होवुन या लिखानाची शोभा वाढवावी यासाठी दोन्ही कर जोडुन नतमस्तक होवु या… भगवान भोलेनाथासह पार्वती मातेसही त्रिवार वंदन करु या, हा ज्ञानसागर पार करत असताना आपले अमोघ कृपाछत्र माझ्यावर असावेच… म्हणजे आमची जीवननौका या अथांग ब्रम्हांडात कुठेही भरकटणार नाही. श्री महविष्णू आणि श्री महालक्ष्मी मातेसही दोन्ही कर जोडुन मनोभावे प्रार्थना करुया आपण या सृष्टीचे पालनकर्ते आहात आपल्या छत्रछायेत आणि आपल्या कृपेने आमचा हा पवित्र  वाग्ययज्ञ आणि लेखनयज्ञ र्निविघ्न पार पडुदे. तद्ववतच माझी गुरु माऊली कृपेची सावली साईनां त्रिवार वंदन… देवा ! मुंगीने मेरुपर्वत चढावा का ? मुक्याने अस्सखलित बोलावे का ? आधंळयाने हत्तीचे वर्णन करावे का ? आणि रेडयाने वेद म्हणावे का ? परंतु आपली कृपा होते तेव्हा काहीच अशक्य रहात नाही.

या सदरामध्ये एवढच सांगावयाचे आहे, की मला ही प्रेरणा कशी झाली, गुरुबंधुनो आणि भगिनीनो… प्रंपचातुन परमार्थ करावा हीच सर्व घर गृहस्थीची कल्पना असते, परंतु तो कसा ? हा पुढचा प्रश्न आहे. ही सर्व माझ्या गुरुनाथांची कृपा की असा प्रश्न मला पडला नाही, साईकृपेने समयोपरान्तं माझी अध्यात्मात प्रगती होत राहीली. आणि त्याचाच परीपाक म्हणजे भगवदगीतेचे ज्ञानेश्वरीच्या रुपात वाचन आणि त्यानंतर  उस्फुर्त अंत:प्रेरणा अशी की, ज्यांना मराठी वाचता येते परंतु संस्कृत आणि तत्कालीन थोडेसे अवघड वाटणा-या भाषेमुळे अध्यात्मा पासुन चार हात दुर आहेत… त्या माझ्या सारख्या अज्ञानी, मुमूक्षूं जनासाठी परमार्थाचा सोपा रस्ता दाखवावा… आणि तो चोखाळण्यास (अशी सेवा करण्यास) मला माझ्या गुरुंनी दिलेली अपुर्व संधी…

परंतु जो पर्यत मनुष्याचा भाग्योदय होत नाही, तोपर्यत कितीही प्रयत्न केले तरी भगवद् गीता किवां अन्य धार्मिक ग्रंथाचे वाचन, पारायण होवु शकत नाही, अर्थबोधही होत नाही, मी २००७ साली आळंदी येथे आषाढी वारी बंदोबस्तासाठी सातारा पोलीसमध्ये असताना  गेलो होतो. या कालावधीमध्ये देवळातच बंदोबस्तास होतो आणि माऊलीची सेवा आळंदीच्या श्री ज्ञानेश्वरांच्या मंदिरात केली. परत येताना भगवद् गीता आणि ज्ञानेश्वरी हे दोन्ही ग्रंथ  विकत घेतले, श्री विठ्ठल-रुक्मीणी देवीचा एकत्र फोटो आणि ज्ञानदेवांचा व तुकारामांचा फोटो,  भगवान महादेव आणि पार्वतीमातेचा फोटो तसेच शिवराज्यभिषेक आदी सह घरी आलो, परंतु या ग्रंथाचे वाचन करण्यास पहीली अडचण म्हणजे भगवद् गीता ग्रंथाची आली. कुणी एकाने सांगितले की, युध्दक्षेत्रातील रथाचे चित्र असलेले पुस्तक घरात ठेवु नका. मग काय आम्ही ते पुस्तक एका साई ध्यान मंदिरात दिले की, यदाकदाचित तेथे जावुन हे पुस्तक आम्ही वाचु शकू? परंतु असे झाले नाही. या अगोदर लोकमान्य टिळकांचे गीता रहस्य वाचुन गीता समजुन घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होताच असो…

अशा प्रकारे भगवद् गीता आमच्यापासुन दुर झाली, पुढे ज्ञानेश्वरीचे वाचन करता करता २०१७ हे साल आले, म्हणजे ११ वर्ष गेली… योग नाही तर मग आपण काय करणार ? असो, परंतु  ज्ञानेश्वरी वाचन करीत असताना मला स्वताला यातील तत्कालीन मराठी भाषेचा अर्थबोध झाला नाही, त्यामुळे मी पुणे  (अप्पा बळंवत चौक ) येथुन मराठीत सर्वसामान्यांना समजणारी ज्ञानेश्वरी शोधुन विकत घेतली ती भाषातंरा सहीत आणखी चार भाषेतील मिळाली असो… यातील मराठी वाचन करत असताना प्रर्कषाने जाणवले की फक्त २१व्या शतकातील आत्ताच्या बोली आणि लिखीत  मराठी भाषेतच एकसुत्री असणारी ज्ञानेश्वरीचे संपादन आपण का करु नये ? सर्वसामान्य मराठी वाचकांसाठी आपण असे काही करु शकतो का ? विचाराला चालना मिळण्यासाठी अर्थातच हे विचार माझ्या मनात आणणारे माझे प्रेरणास्त्रोत देवाधिदेव भगवान महादेव आणि श्रीसाईबाबा.त्यामुळे जे मनात होते ते स्मृतीपटलावरील विचारमाला वास्तवात प्रगट होऊ लागली. (खरेतर  भगवतगीता वाचनाची प्रेरणा  बाबांच्या मुळेच होत होती.)

या प्रेरणा स्तोत्रामधील सुरुवात श्रीसाईचरित्रांतील ३९ वा  अध्याय, बाबांचा आणि त्यांचे भक्त नानासाहेब चांदोरकर (तत्कालीन प्रांताधिकारी,अहमदनगर) यांच्या मधील गीतेच्या चौथ्या अध्यायातील ३४ वा  श्लोक संवादही आहे आणि श्रीसाईकृपेने तीअमोघ साईसिध्दी आपणा सर्वमराठी वाचकासाठी माझ्याकडून श्रीसाईनी शब्दबध्द करुन घेतलीयाची सुरुवात भगवतगीतेचापुढील श्लोक – तद्विद्वि प्रणिपातेन, परिप्रश्नेन सेवया… उपदेक्ष्यंति ते ज्ञानं, ज्ञानिनस्तत्वदर्शिन: स्वता साईनी या श्लोकावर मग यवढे विवेचन केले आहे की, आजही तो अध्याय मी मनपुर्वक वाचतो परंतु मला पुर्ण कळला नाही. मी आजही तो अध्याय वाचताना पुर्णपणे  एकरुप होत नाहीआणि त्या अध्यायाबाबत विचार केलेले सारे पुढील वाचनासाठी तसेच राहून जाते. ही जिज्ञासा होतीच. वरील गीतेमधील श्लोकाचा अर्थ – ( गुरुला साष्टांग नमस्कार करुन प्रश्न विचारुन, त्यांची सेवा करुन ते ज्ञान जाणुन घे म्हणजे ब्रम्हवेत्त्ते ज्ञानीजन तुला ज्ञानाचा उपदेश करतील ) हा माहीती असलेला अर्थ नानांनी सांगितला, परंतु बाबांनी त्यावर जे भाष्य केले ते ऐकुन त्यावेळेचे हजर असणारे सर्वजन मंत्रमुग्ध झाले कि बाबांना तर आम्ही कधीच काही वाचन करताना पाहीले नाही तर मग त्यांच्या तोंडी हे संस्कृतचे भाष्य अस्सखलित मराठीत अर्थासहीत बाबाकडुन निरुपण कसे ?असो.

 

 (श्री साई तर चालते बोलते ब्रम्हच होते. )आजही तो अध्यायातील प्रसंग मला कायमच आठवतो. आणि त्यामुळेच साईनां प्रार्थना केली आणि हे अवघड शिवधनुष्य उचलण्यासाठी विचाराचे, बुध्दीचे सामर्थ्य मागीतले. उन्हाळयाच्या सुट्टीत सहकुटूंब कोल्हापुरच्या अंबाबाईच्या दर्शनाला गेलो असताना मातेस  आणि, माता सरस्वती देवीनां मनापासुन प्रार्थना केली. पुढे स्वताच घरी फक्त मराठीत ज्ञानेश्वरीचे मराठी टायपिंग सुरु केले. त्यासाठी सातारा राजवाडा येथील नगर वाचनालयाजवळील युवर ओन टायपिंग क्लासमध्ये दोन महीने टायपिंग क्लास केला. आणि माझ्या दोन्ही मुलांना प्रसाद आणि प्रियांका यांना टायपींग आणि इतर पुस्तकास पुर्ण करण्याच्या मदतीस घेवुन हा सारा शब्द प्रंपच उभा करु शकलो. यासाठी पत्नीचीही मदत झाली, माझे वडील (वय ८२ वर्षे, रिटायर्ड शिक्षक) यांना मी एक-एक अध्याय टायपिंग करुन झाला की वाचनासाठी आणि दुरुस्ती साठी देत असत पंरतु त्यांनी मौनम् सर्वार्थ साधनम् !  यातच गोडी मानुन एकही करेक्शन सांगितले नाही, उलट अध्याय देण्यास उशीर झाला तर माझ्याकडे येवुन पुढील अध्यायाबाबत विचारणा करीत आणि त्यांनी आपले मराठी ज्ञानेश्वरीचे वाचन या निम्मीताने पुर्ण केले ते बोलता-बोलता म्हणाले, याच ज्ञानेश्वरीचे मी १९६५ मध्ये पारायण केले होते. म्हणजे आता तब्बल ५४ वर्षानंतर त्यांनाही हा अकल्पनीय योग आला.

या ज्ञानेश्वरीच्या १८ व्या अध्याया नंतरचे गीता माहात्म्य आणि अनुसंधान हे त्याच्यांच मुळे देवु शकलो. सहजचएकदा वडीलांना भेटण्यास गेलो असता त्यांनी आर्वजुन एक लहानसे गीतेचे जुनेपुराणे पुस्तक देवुन वाचण्यास सांगितले, सध्या वेळ कमी असल्याने ते पुस्तक निवांत वाचीन म्हणून घेतले.तरीही टायपिगं करताना पुरक शब्दांसाठी ते पुस्तकही चाळले आणि त्यामुळेच त्यातील माहात्म्य आणि अनुसंधानाचे महत्व कळाले आणि या पुस्तकात ते देता आले, तेही मराठीतच दिले आहे, ही माझ्या साईचीच कृपा किवां आदेश मानुन मी आठवणीने तेही टायपिंग केले आहे, एकप्रकारे साईनी हे काम मला देवुन माझ्या कडुन वाचकांना या ज्ञानेश्वरी वाचनाचे पुर्ण फळ कसे मिळेल याचा विचार करुन माझ्याकडुन ते काळजीपुर्वक चोखपणे करुन घेतले, तो हा सर्व अध्यात्मातील शब्द प्रपंच.

ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी संपुर्ण मराठी मध्ये नऊ महीन्यात एका वेगळया स्वरुपात तयार झाली. ही सर्व त्या साईची कृपा मी पोलीस नोकरीतुन स्वेच्छा निवृत्ती  घेताना  सदगुरु साईना प्रार्थना केली होती, हे देवा! माझी अध्यात्मात प्रगती होवु दे, प्रपंचातुन परमार्थ करता करता मला मिळालेले ज्ञान मी सर्वाना देवु शकू अशी मला बुध्दी दे. आज जे काही आहे ते सर्व आपणा सर्वापुढे आहे. माझी मिलीटरी खात्यातली आणि पोलीस खात्यातली निस्वार्थी सेवा म्हणा किवां माझे कर्म-धर्म म्हणा, परंतु अध्यात्मा संबधी आपणास जे काही ज्ञान देवु शकलो ती सर्व साईची महान कृपा, नाहीतर माझ्यासारख्या अज्ञानीस हे केवळ अशक्य आहे. आपण सुज्ञ, जानकार आहात, आजच्या माहीती व संगणकाच्या युगात आपणास सर्व काही एका क्लिक द्वारे मिळु शकते, साईनाथांना प्रार्थना की, ज्ञानमाऊलीच्या जिज्ञासु भक्तांना व भगवद् गीता वाचण्याची परम इच्छा असणाऱ्यांना ही संपुर्ण मराठी ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी वाचण्याची प्रेरणा मिळुन सर्वाची अध्यात्मात प्रगती होवु दे. शेवटी “करता करविता तो आहे” आपण त्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे आजच्या यंत्रयुगाच्या भाषेतील रोबोट आहोत. मात्र कुणाकडुन काय करुन घ्यायचे हे तो स्वताच ठरवित असतो, साऱ्या जगावर आपले अधिराज्य चालवणाऱ्या त्या ब्रम्हांड नायकाच्या विचार वेगाला आणि कर्तृत्वाला कोणत्याही सीमाच नाहीत. आज त्यांच्या पुढे नतमस्तक होवुन त्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका दासस्य..दासस्य…दासाची ही गुरुदक्षिणा म्हणजे आमचे पसायदानच समजुन आता मौन्ं सर्वार्थ साधनम्! ओम साईराम.

 

वर्षपुर्तीच्या   निम्मीताने

सर्वच वाचक  आणि माऊलींच्या भक्तांना एक लेखक याना त्याने माझा त्रिवार नमस्कार. खर तर कोणत्याही उद्दीष्टाचा विचार करुन  हे लेखन मी केलेच  नव्हते.उद्दीष्ट होते ते फक्त सर्वसामान्य कष्टकरी आणि भक्तीमार्गाकडे वळलेल्या मुमूक्षूंना अध्यात्माचे योग्य ज्ञान मिळावे. संत तुकोबारायांच्याअभंगानुसार जो कारंजला गांजला, त्यासी जो म्हणे आपुला, तोचि साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा. माऊलीचे हे महान धर्मकार्य जेआपणापुढे सादर करताना त्या महान साधूला ओळखण्याची कुवत आपणामध्ये यावी ही भगवंताकडे प्रार्थना…

वाचक हो बघता-बघता एक वर्ष कसे गेले हे कळालेच नाही. श्रीसाईकृपेने या महान ज्ञानयज्ञाचे कामदाही दिशाना व्यापून टाकण्याचे आहे. सध्याच्या सोप्या बोली मराठी भाषेमध्ये आपल्या सेवेसाठी मागील गुरुपोर्णिमेचे दिवशी सुरु झालेली ज्ञानयज्ञाची गंगा आता ६०००  (सहा हजार मराठी वाचकापर्यत पोहोचली आहे.) माऊलीच्या एवढया भक्तगणानी या सेवेचा लाभ घेतला आहे.साईकृपेने हीच माझ्या अध्यात्मसेवेची पावतीआहे. मागील वर्षामध्ये यात आणखी सुधारणा काय करता येतील का याचा विचार केला आणि त्यानुसार या  गुरुपोर्णिमेचे औचित्य साधत आता माऊलींचा हरीपाठ संपुर्ण मराठीमध्ये ( सर्व २८ अभंग ) निरुपण करुन दिेले आहेत. खरे तर चार-चार ओळींच्या या प्रत्येक अभंगामध्ये चारीमुक्तीचे, चारीधामाचे रहस्य लपलेआहे.तो ज्ञानाचा अगाध सागर आहे यावर आणखी विचार मंथन सुरु आहे. कदाचित माऊलीची कृपा झालीच तर आणखी निरुपण लिहुन पुढील आवृत्तीच्यावेळी यात देवुया. हा अध्यात्माचा प्रचंड महासागरआहे. यामध्ये श्रीसाईच्याकृपेने पार करत करत ज्ञानकण शोधत आहोत. श्रीसाईना एकच मागणे या ज्ञानयज्ञासाठी आपण आपल्याकृपेचे भांडारातुन नखभर या पामराला दयावे. ही या दासस्यदासस्यदासस्यदासाची मनापासुन प्रार्थना….

-:श्रीसाईकृपेने लेखकांची प्रकाशीत पुस्तकमाला:-

श्रीसाई अध्यात्म प्रसार मंडळ शाहूपुरी सातारा यांची पुस्तके:-

१)  श्रीसाई भक्तीचे अनुभव-  पाठीराखा साई

२)  श्रीसाईचे नऊ गुरुवारचे व्रत

३)  श्रीसाईचरीता मधील अध्याय ११ वा पुर्ण सोप्या मराठीमध्ये

४)  श्रीसाईचरीता मधील अध्याय १५ वा पुर्ण सोप्या मराठीमध्ये

प्रकाशीत होणारी इतर पुस्तके-

  • श्रीकाल भैरव स्तोत्र आणि महात्य संपुर्ण मराठीत ( शिव महापुराणातील)
  • श्री जोतीबा देवांचे स्तोत्र मराठीमध्ये ( श्री केदार विजय ग्रंथानुसार )  

श्री साईच्या चरणी या दासाचे हेच सदैव मागणे आहे हे साई देवा प्रंपचातुन परमार्थ करता करता आपण माझी अध्यात्मात प्रगती करावी.आणि मला प्राप्त होणारी ही ज्ञानगंगा मी सर्व मुमूक्षूपर्यत पोहच करावी….

ही लेखनसेवा श्री साईचरणी अर्पण… 

दासस्यदासस्यदासस्यदास साईभक्त नारायण विठ्ठल देवरुखकर, शाहूपुरी सातारा.