अध्याय १६ भाग ४

         त्याप्रमाणे अविद्येने बांधल्या गेलेल्या जीवानां मुक्त करीत संसारसागरामध्ये बुडत असलेल्या जीवांना वर काढीत पीडीतांची दुखे नाहीशी करीत, किबंहुना रात्रदिवस दुसऱ्याचे सुख वाढवित आत्महितमध्ये प्रवेश करतो. आणि स्वताचा स्वार्थ साधण्याकरीता किवां दुसऱ्याचा नाश करण्याकरता ज्याच्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प निर्माण होत नाही. अर्जुना, त्यालाच अद्रोहत्व असे म्हणतात. ते तुला प्रत्यक्ष दृष्टीने पाहता येईल, अशा पध्दतीने सांगितले आहे. आणि अर्जुना, शंकरांच्या मस्तकावर येवुन गंगा जशी संकुचित झाली त्याप्रमाणे स्वता मानाला योग्य असुनही लोकांनी मानले असता जे लज्जित होणे आहे. हे उत्तम बुध्दी असणाऱ्या अर्जुना! ते हे अमानित्व आहे असे जाण, मागील तेराव्या अध्यायात अमानित्वाचे लक्षण सांगितलेले आहे तेच ते पुन्हा किती सांगू? या सव्वीस दैवी गूणांच्या रुपाने ब्रम्हयाची संपत्ती या जगात रहात आहे. मोक्षरुपी सार्वभैाम राजाचे हे सव्वीस गुण म्हणजे इनामी गावे आहेत. भगीरथाने तप केल्यानंतर सगरपुंत्राच्या उध्दारासाठी गंगा पृथ्वीवर जशी अवर्तीण झाली आहे अथवा मुक्तीरुपी कन्या सव्वीस गुणरुपी फुलांची माळा हातात घेवुन स्वंयवरासाठी वैराग्य भावामुळे निरपेक्ष कर्म करणाऱ्या पुरुषाचा शोध घेत आहे. अथवा गीतारुपी स्त्री सव्वीस गुणरुपी वाती प्रज्वलित करुन आपल्या परमात्मारुपी निजपतीला आरती ओवाळण्याकरता आली आहे.        (ओवी २०१ ते २१०)

        अथवा गीतारुप समुद्रातील एक गुणरुपी मोती दैवी संपत्तीरुप शिंपल्यात निर्माण झाली आहे. आता या अलौकिक दैवी संपत्तीचे किती बरे वर्णन करावे? अशी सव्वीस गुणांची राशी असलेली दैवी संपत्ती विनासायास सर्वाना सहज कळेल, असे मी तिचे वर्णन केले आहे, आता आसुरी संपत्ती ही जशी दुखीरुपी वेल असुन दोषरुपी काटयांनी परिपुर्ण भरलेली आहे, तिचे वर्णन मी करतो तरी तु ते समजुन घे. कारण आसुरी संपत्ती ही त्याज्य आहे. ती आपल्या उपयोगाची नाही, परंतु तिचा त्याग करण्याकरता काय करावे याचे तु अत्यंत एकाग्रतेने श्रवण करुन घे, नरकातील दुखाला महत्व प्राप्त करुन देण्यासाठी महाभयंकर पाप एकत्र आले तीच आसुरी संपत्ती होय. सर्व विषे एकत्र झाली म्हणजे त्याला काळकुट विष हे नाव प्राप्त होते.त्याप्रमाणे सर्व दोष एकत्र झाले म्हणजे त्याला आसुरी संपत्ती असे म्हणतात. अर्जुना!  त्या आसुरीं दोषामध्ये त्याच्या नावाने मोठेपणाचा डांगोरा पिटलेला आहे असा तो दंभ जाणावा. ज्याप्रमाणे आपली माता ही तीर्थाप्रमाणे पावन करणारी आहे. परंतु समाजात तिचे दोष दाखवुन निदां केली असता ती पुत्राला शाप देवुन अधोगतीला नेण्यास कारण होते. अथवा गुरुंनी उपदेशीलेली ब्रम्हविद्या ही इष्ट फल देणारी आहे परंतु ती चव्हाटयावर अनाधिकाऱ्यापुढे ओरडुन सांगितली तर ती हित करणारी असुनसुध्दा आपले अहितच करते, आपण महापुरात बुडत असताना नाव आपल्याला ताबडतोब पलिकडच्या काठावर पोचविते, परंतु तीच नाव आपण डोक्यावर बांधली असता निश्चीतपणे आपणास बुडविते.                (ओवी २११ ते २२०)

       अर्जुना! जे अन्न जगण्यासाठी कारण आहे त्या अन्नाची स्तुती करत प्रमाणापेक्षा जादा खाल्ले तर तेच अन्न विषाप्रमाणे बाधक होते. त्याप्रमाणे धर्म हा इह-परलोकांत दृष्टादृष्ट फल देणारा जिवलग मित्र आहे तो जर चव्हाटयावर उघडा केला तर आपणास तारणारा असुनही त्यापासुन दोष घडतात. अर्जुना! आपल्या मुखाने मी धर्म केला धर्माने वागलो अशी जर प्रसिध्दी करु लागलो तर तो अधर्म होय. अधर्म करणारा जो दोष तोच दंभ जाणावा. अज्ञानी माणसास किंचींत जरी विद्या प्राप्त झाली तरी तो प्रत्यक्ष ब्रम्हदेवाच्या सभेला तुच्छ मानतो, ओझे वाहून नेणारा घोडा थोडा जलद चालु लागला तर तो ऐरावतालाही कमी समजतो. गवताच्या जळण्यामुळे अग्नी जसा आकाशाकडे धाव घेत असतो. अथवा लहान मासा डबक्यातील जलाच्या बळाने जसा समुद्राला मोजत नाही, केवळ एकच दिवस दुसऱ्याच्या घरी भोजन केल्यामुळे शुद्र स्वभावाचा गरीब मनुष्य जसा मोजतो त्याप्रमाणे स्त्री, धन, स्तुती आणि अतिमान-सन्मान याच्या योगाने जो माजतो, दैवहिन मनुष्य ढगाची छाया पडली असता घराची आवश्यकता नाही असे समजुन घर मोडुन टाकतो किवां एकादा अज्ञानी मनुष्य मृगजळ पाहुन तळे जसे फोडुन टाकतो किबंहुना संपत्तीच्या मुळे जे उन्मत्त होणे त्याला दर्प असे म्हणतात. असे मी तुला निश्चीतपणे सांगतो, आता अभिमानाचे स्वरुप सांगतो ते ऐक, सर्व जगाचा वेदावर विश्वास आहे, ईश्वर सर्व जगाला पुज्य आहे आणि सर्व जगात सुर्याप्रमाणे तेजस्वी दुसरा कोणी नाही. (ओवी २२१ ते २३०)

       जगातील प्रत्येक माणसाला आपल्याला सार्वभैाम राज्य भोगावयास मिळावे असे वाटत असते आपणास मृत्यू येवु नये असे साऱ्या जगाला वाटते म्हणुन लोक अतिउत्साहाने वेदांचे व ईश्वराचे भजन, पुजन करतात पण त्यांचे श्रवण केले असता त्याचे मनात मत्सर निर्माण होवुन जो क्रोधायमान होतो तो म्हणतो,त्या ईश्वराचे अस्तित्वाचे विचार नाहीसे करीन वेदातील विचारांचे खंडन करीन आपला मोठेपणा मिरवण्यात आपली शक्ती खर्च करीत असतो पतंगाला दिव्याची ज्योत आवडत नाही. काजव्याला सुर्याचा प्रकाश आवडत नाही त्या प्रकाशाचा तिरस्कार वाटतो अथवा टिटवीने जसे समुद्राशी वैर करावे त्याप्रमाणे तो ‘आसुरी संपत्ती’ असलेली मनुष्य ‘मी’ या नावाच्या भुलीने ईश्वराचे नाव देखील सहन करत नाही तो वेदांना म्हणतो, मला वेद  ही एक सवतच आहे. याप्रमाणे तो मानमान्यतेचा अतिशय अभिमानी आणि उन्मत्त खोटेपणाने भरलेला असतो रौरव नरकाचा प्रसिध्‍द मार्ग म्हणजे हाच होय, दुसऱ्याचे सुख पाहण्याचे निमित्त होताच त्याच्या मनोवृत्तीत क्रोधाचे विष चढते, ज्याप्रमाणे अतिशय तापलेल्या तेलात थंड पाणी  टाकले असता ते जास्त भडकते, चांदण्याची आवड नसल्यामुळे चंद्राला पाहुन कोल्हा जसा मनात जळत असतो, संपुर्ण जगत ज्याच्यामुळे उजळुन निघते त्या सुर्याचा उदय होताच घुबडाचे डोळे जसे आधंळे होतात, जगाला जी भावकोमल पहाट सुखकारक वाटते ती चोराला मरणापेक्षाही दुखकारक वाटते अथवा सर्वाना जे दूध अमृतासमान वाटते तेच सापाच्या पोटात गेले कि त्याचे काळकुट विष तयार होते. (ओवी २३१ ते २४०)

        अथांग पसरलेल्या सागराचे जल पिवुनही त्या अपरिमित जलाने वडवाग्नी कधी शांत होत नाही तर उलट अधिकच भडकतो, त्याप्रमाणे दुसऱ्याचे विद्यावैभव, विनोदबुध्दी, ऐश्वर्य असे भाग्य पाहुन जो मनात चरफडतो तो क्रोध होय. आता पारुष्याचे स्वरुप ऐक ज्याचे मन जणू सापाचे वारुळ असते म्हणजे मनात घातक विचार सदैव सुरू असतात, ज्याचे डोळे म्हणजे धनुष्यापासुन वेगाने झालेली बाणांची सुटका होय. ज्याचे बोलणे म्हणजे जणु निखाऱ्यांचा वर्षावच होय, आसुरी लोकांच्या सर्व क्रिया जणु तीक्ष्ण धार असलेली करवतच होय असा दुसऱ्यास त्रासं देण्याच्या क्रियांनी ज्याचे अंतकरण अंर्तबाहय भरुन गेले असते, तो मनुष्यामध्ये ‘अधम’ होय. तो दुखकारक कठोरपणाचा अवतार आहे आता अज्ञानाचे लक्षण सांगतो, त्यांचे श्रवण कर, ज्याप्रमाणे दगडास थंडी व उष्ण यांच्या स्पर्शाची समज नसते किवां जन्मापासुन आंधळा असलेल्या माणसाला रात्र व दिवस समजत नाही, अग्नी एकदा प्रज्वलित झाला कि कोणत्या वस्तुचा नाश करावा व कोणत्या वस्तुचा करु नये हे जाणत नाही अथवा परीस हा सोने व लोखंडातील भेद  जाणत नाही अथवा  स्वयंपाकातील पळी अनेक पदार्थात बुडविली तरी त्या पदार्थची रुची जशी जाणत नाही. अथवा वारा वाहु लागला म्हणजे हा छोटा रस्ता आहे हा मोठा रस्ता आहे ने न समजता सर्वत्र वाहत राहतो त्याप्रमाणे चांगल्या किवां वाईट कृत्यांच्या विचाराविषयी जो आंधळा असतो त्याला अज्ञानी म्हणतात. जरी वस्तु चांगली आहे किवां वाईट आहे ने न जाणता लहान मुल ज्याप्रमाणे पाहील ती वस्तु तोंडात घालतो. (ओवी २४१ ते २५०)

       त्याप्रमाणे पाप-पुण्य यांची खिचडी करुन खात असता बुध्दीच्या विचारस्वरुप कर्माला चांगले-वाईट न कळणे अशी ही अविचारी अवस्था, तिला अज्ञान हे नाव आहे. या माझ्या बोलण्यामध्ये खोटे असे काही नाही याप्रमाणे सहा प्रकारच्या दोषांची लक्षणे तुला सांगितली. या सहा दोषांच्या अंगांनी ती आसुरी संपत्ती बलवान झाली आहे ज्याप्रमाणे सुंदर स्त्रीचा बांधा लहान असला तरी तिच्यात कामविषयक तीव्र इच्छा असते. तसेच (भुजंग) साप जरी लहान दिसत असला तरी त्याचे विष भंयकर असते. अथवा प्रलयाग्नी, विद्युदग्नी व वडवाग्नी हया तीन अग्नीची संख्या जरी थोडी आहे पण ते भडकल्यावर त्यानां प्राणाहुती करण्यास हे विश्वही पुरत नाही, कफ, वात, पित्त यांचा क्षोम हा त्रिदोष आहे असा त्रिदोष झाला असता ब्रम्हदेवाला जरी शरण गेले तरी मरण चुकत नाही या तीन दोषांच्या दुप्पट सहा दोष आहेत असे समज. या संपुर्ण सहा दोषांनी आसुरी संपत्तीची उभारणी झाली आहे म्हणुन आसुरी संपत्ती कमी आहे असे नाही, क्रुर ग्रहांचा समुदाय जसा एकाच राशीला यावा अथवा निंदकाजवळ जशी सर्व पातके येतात. सर्व प्रकारचे रोग जसे मरणाऱ्याच्या शरीराला पीडीत करतात किवां वाईट मुहूर्ताच्या ठिकाणी वाईट योग एकत्र होतात, दुसऱ्यावर विश्वास ठेवणारा मनुष्य चोंराच्या तावडीत सापडावा अथवा थकलेला-दमलेला मनुष्य महापुरात पडावा, त्याप्रमाणे या सहाही दोषांनी मनुष्याचे अकल्याण केले जाते. किवां शेळी मरतेवेळी तिला सात नांग्यांची इंगळी चावते, त्याप्रमाणे हे सहाही दोष त्या मनुष्यास प्राप्त होतात.   (ओवी २५१ ते २६०)

       ज्याचे मोक्षमार्गास जाण्याचे सर्व उपाय बंद असल्यामुळे जो संसारात बुडतो. आणि अर्जुना!  जो आसुरी मनुष्य संपत्तीमुळे निर्माण होणाऱ्या पापाच्या योगाने पशु-पक्ष्यादी अधम योनीच्या पायऱ्यांनी खाली उतरत-उतरत शेवटी तळापर्यत येवुन पोचतो, हे असो साराशं, त्या आसुरी मनुष्याच्या ठिकाणी या सहा दोषांनी एकत्रित होवुन ही आसुरी संपत्ती वाढविली आहे असे जाण याप्रमाणे जगात ही दैवी आणि आसुरी संपत्ती प्रसिध्द आहे आणि या दोन संपत्ती तुला वेगवेगळया लक्षणांनी सांगितल्या आहेत. हया दोन्ही संपत्तीमध्ये पहिली जी दैवी संपत्ती म्हटली जाते ती मोक्षरुपी सुर्याने झालेली पहाटच आहे. असे जाण. दुसरी जी आसुरी संपत्ती आहे ती जीवाकरता साखळी म्हणजे बेडीच आहे, परंतु हया आसुरी संपत्तीचे वर्णन ऐकुन कदाचित तुझ्या मनामध्ये भय निर्माण होईल पण हे बघ सुर्याने रात्रीचा धाक का बरे बाळगावा? हे अर्जुना! ही आसुरी संपत्ती त्यालाच बंधनकारक होते कि, जो या सहाही दोषांना आश्रय देतो, अर्जुना! तु तर वर्णन केलेल्या दैवी गुणांचा उत्तम असा ठेवाच घेवुन जन्माला आला आहेस. म्हणुन अर्जुना! तु दैवी संपत्तीचा स्वामी होवुन मोक्षरुपी आनंदाकडे प्रसन्न मनाने यावे. (ओवी २६१ ते २७०)

        दैवी व आसुरी संपत्तीने युक्त अशा लोकांच्या व्यवहार करण्याच्या पध्दती अनादिसिध्द आणि प्रसिध्द आहेत, ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी निशाचर राक्षसांनी वाईट व्यवहार करण्याकरता सर्वत्र संचार करावा आणि दिवसा मनुष्यांनी उत्तम व्यवहारात प्रवृत्त व्हावे ही रीतच आहे, अर्जुना! त्याप्रमाणे या लोकांमध्ये दैवी व आसुरी अशा दोन प्रकारच्या सृष्‍टी आपआपल्या व्यवहारामध्ये वागणुक करत असतात, तसेच मागील अध्यायात भक्ती ज्ञान सांगण्याच्या प्रकरणात दैवी संपत्ती विस्ताराने सांगितली आहे, आता आसुरी संपत्तीमध्ये वागणारे जे लोक आहेत त्यांविषयी तुला विस्ताराने सांगतो, तरी तु ते एकाग्रतेने श्रवण कर. वाद्याशिवाय नाद जसा कोणाला ऐकु येत नाही, अथवा फुलाशिवाय सुगंध जसा मिळत नाही, त्याप्रमाणे ही आसुरी संपत्तीने एकाद्या शरीराचा स्वीकार केल्याशिवाय ती दिसत नाही, लाकडावर लाकुड घासल्याने अग्नी प्रगट झालेला दिसतो, त्याप्रमाणे ही आसुरी प्रकृती प्राण्यांच्या देहात प्रविष्ठ झाली तरच ती अनुभवास येत असते जसा ऊस  वाढत जातो, तसा आतला रसही वाढत जातो त्याप्रमाणे जसजसा प्राण्यांचा देह वाढेल तसतसा आसुरी संपत्तीचा आकार वाढत जातो, अर्जुना, आता आसुरी संपत्तीच्या दोषांनी युक्त असे जे प्राणी‍ जन्मलेले आहेत त्यांची लक्षणे तुला प्रतिपादन करतो. (ओवी २७१ ते २८०)

पुढील भाग