अध्याय १६ भाग ७

       अरेरे, अशी त्या आसुरी लोकांची भयानक अवस्था वर्णन करताना वाणी देखील रडते, त्यांचे ते दु:ख आठवले असता मन सुन्न होते. अशा पाखंडी लोकांनी किती महाभयंकर नरकदु:ख प्राप्त करुन घेतले? ज्या आसुरी संपत्तीमुळे असे घोर पतन होते, तर मग ते अशी संपत्ती का बरे वाढवितात?  म्हणनु धनंजया, ज्या असुरी लोकांना आसुरी संपत्ती वाढवल्याने आणि त्याज्य वर्तन केल्यामुळे कर्माचे फळ म्हणुन भविष्यामध्ये भयंकर नरकवास आणि नरकयातना भोगाव्या लागतात त्या मार्गाकडे तु कधी जाऊ नकोस. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे आसुरी लोकांच्या अंतकरणात भरलेले असतात,त्यांचा त्याग करावा हे खरोखर सांगायला पाहिजे काय? काम, क्रोध, लोभ, या तिघांचा अंकुर हा अतिशय वाढतो, तेव्हा तेथे पाप पिकले आहे असे जाणावे. हे धनंजया, वाटेल त्यास आपली भेट होण्यास सोपे जावे म्हणु सर्व दुखानी आपला मार्ग अचुक दाखवण्या करीता तर त्या काम, क्रोध, लोभास वाटाडे म्हणुन नेमुन दिले आहे, अथवा पापी लोकांना नरकाच्या दुखामध्ये घालवण्यासाठी त्यांना नरकभोगाचा दंड देण्यासाठी ही पातकांची सामर्थ्यशाली अशी सभाच आहे, रौरव नावाचा एक महाभयानक नरक आहे, असे पुराणांतुन तोपर्यत ऐकण्यात येते जोपर्यत काम, क्रोध, लोभ हे तिघे उदभवले नाहीत. याच्यामुळे अपाय फार लवकर प्राप्त होतो, यातना यांच्यामुळे सुलभ आहते, हानी ही हानी नाही, तर काम, क्रोध, लोभ हे तिघे मुर्तिमंत हानी आहेत, अर्जुना, यांची अतिनिकृष्ट अवस्था सांगितली तिच्या पेक्षा अधिक काय वर्णन करु? काम, क्रोध, लोभ हा नरकाच्या त्रिशंकु दाराचा उंबरा आहे.                      (ओवी ४२१ ते ४३०)

         या काम, क्रोध, लोभरुपी त्रिशंकु दारापैकी कोणत्याही एका दारामध्ये जो अंतकरणापासुन उभा असतो त्याच नरकपुरीत सन्मान होतो. म्हणुन अर्जुन! तुला पुन्हा-पुन्हा हेच सांगतो की काम, क्रोध, लोभ ही त्रिपुटी सर्व विषयातं अतिवाईट आहे, तरी तिचा त्याग करावा. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारापैकी कोणताही एक पुरुषार्थ प्राप्त करण्याची गोष्ट मानवाने त्या वेळी करावी कि जेव्हा तो काम, क्रोध, लोभ यांचा समुदाय त्यागेल, काम, क्रोध, लोभ हे तीन दोष अंतकरणात जागृत असता मानव कल्याणाची प्राप्ती करु शकतो, असा सिध्दांत कानांनी कधी ऐकला नाही असे देव म्हणाले, ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे आणि जो आमचा नाश होईल म्हणून भितो, त्याने काम, क्रोध, लोभ हा दोषांचा मार्ग धरु नये या धोक्याच्या मार्गापासुंन सावध रहावे. पोटाशी दगड बांधुन बाहुच्या जोरावर जसे सागरात पोहणे जगण्याकरिता जसे काळकुट विषाचे सेवन करणे चुक आहे. त्याप्रमाणे या काम, क्रोध, लोभ याच्या संगतीने विपरीत कार्यसिध्दी होते असे जाण. म्हणुन अंतकरणातील त्यांची राहण्याची जागा पुर्णपणे पुसुन टाक. जेव्हा‍ अकस्मात काम, क्रोध, लोभ या तीन कडयाची साखळी तुटेल तेव्हाच आत्मकल्याणाच्या मुक्तमार्गाने चालावयास मिळेल, कफ, वात आणि पित्त हे तीन दोष जोपर्यत शरीरात उत्पन्न झाले नाहीत अथवा चहाडी, चोरी व शिदंळकी यापासुन एकादे नगर अलिप्त आहे. जोपर्यत आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक या त्रिविध तापांपासुन अंतकरण मुक्त आहे तोपर्यत ज्याप्रमाणे आनंद प्राप्त होतो त्याप्रमाणे काम, क्रोध, लोभ अंतकरणातुन काढुन टाकलेला मनुष्य जगात‍ ऐहिक व पारलौकीक सुख प्राप्त करतो त्याशिवाय मोक्षमार्गावरुन वाटचाल करताना त्याला मार्गात संतांची संगती देखील लाभते. (ओवी ४३१ ते ४४०)

       मग त्या सदाचारसंपन्न संतसंगतीने आणि सत् शास्त्रांच्या अध्ययनाने जन्म-मृत्यूची माळराने तो उल्लघंन करतो, त्या वेळेस ज्या ठिकाणी आत्मानंदाचे तेज सर्वत्र पसरले आहे असे हे सदगुरू-कृपेचे स्थान ते त्याला प्राप्त होते. त्या महानगरात परमप्राप्तीची परमसीमा असलेला माऊलीचा आत्मा त्याला भेटतो. हा आत्मा प्रेमानंदाची शेवटची मर्यादा आहे. त्यांच्या भेटीने प्रपंचातील सर्व प्रकारचे दुख‍ नाहीसे होते. याप्रमाणे काम, क्रोध, लोभ यांचा संपुर्ण नाश करुन जो मोक्ष‍ आनंदात स्थिर राहतो तो आत्मतत्वाचा स्वामी होतो.तसेच आत्मप्राप्तीचा लाभ न आवडुन जो कामादिकांचे विचार डोक्यामध्ये भरुन टाकतो तो आत्मघात करणारा होय. जो जगात सर्व भुतमात्रांविषयी समान कृपाळु व आपले हीत किवां अनाहीत दाखवणारे तेजस्वी दिपच असे जे सर्वाचे परम गुरू वेद, त्यांची आज्ञा जो पाळत नाही, जो वेदशास्त्रांत  सांगितलेल्या विधींची मर्यादा पाळत नाही, आत्मज्ञानाची इच्छा करत नाही, तसेच इंद्रियांचे लाड जो वाढवित गेला आहे, काम, क्रोध, लोभाची कास सोडणार नाही, म्हणुन त्यांना दिलेले वचन जो पाळतो आणि स्वैराचाराच्या अफाट अशा रानात ज्याने आश्रय केला आहे. जसे मोक्षाच्या नदीमधील फुकट वाहणारे पाणी थोडेसुध्दा पीत नाही त्याला स्वप्नातसुध्दा मोक्ष‍ मिळणार नाही. त्याला पारलौकिक सुख प्राप्त होत नाही व ऐहिक भोग देखील भोगण्यास मिळत नाहीत. (ओवी ४४१ ते ४५०)

        एखादा ब्राम्हण गृहस्थ नदीच्या काठी बसला असता नदीतील माशांवर मन जावुन त्याला पकडण्यास गेला असता ते त्याचे वागणे पाहुन लोक त्याला नास्तिक म्हणतात त्याची माशांविषयीची इच्छा देखील पुर्ण होत नाही व आपल्या ब्राम्हणत्वासही तो मुकतो. त्याप्रमाणे विषयांच्या नादाला लागुन ज्याने परलोक पालथा घातला व इहलोकीदेखील तो मृत्यूच्या चक्रात फिरु लागला, याप्रमाणे त्या आसुरी लोकांना पारलौकिक स्वर्गातील सुख प्राप्त होत नाही आणि ऐहिक भोगाचीही प्राप्तीही होत नाही तर मग त्यांच्या आयुष्यात मोक्षांचा प्रसंग तरी कसा येणार? म्हणुन कामविकांराच्या सहाय्याने जो विषय सेवन करु पाहतो त्याला ऐहिक सुख प्राप्त होत नाही स्वर्गसुखसुध्दा प्राप्त होणार नाही. याकरीता बाबा अर्जुना! ज्यांना आपले कल्याण व्हावे अशी इच्छा आहे त्यांनी वेंदातील उपदेशाची अवज्ञा कधीही करु नये. पतीव्रता स्त्री जसे पतीचे आंतरिक मनोदय जाणुन वागते त्यामुळे अनायसे तिला स्वहीत प्राप्त करुन घेता येते, अथवा सदगुरुंच्या आज्ञेकडे लक्ष देवुन त्याप्रमाणे जो आचरण करतो तो शिष्य आत्मप्राप्ती करुन घेतो, अंधारात असलेला धनाचा ठेवा आपल्या हाती यावा असे जर वाटत असेल तर अतिशय आदराने दिवा जसा पुढे करावा लागतो, त्याप्रमाणे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारी पुरुषार्थाचा स्वामी होण्याची  ज्याची इच्छा असेल, त्याने श्रुती व स्मृती यांना शिरसावंद्य मानले पाहीजे, शास्त्र ज्याचा त्याग करावा म्हणेल ते राज्य जरी असले तरी गवतासमान तुच्छ मानावे आणि शास्त्र ज्याचा स्वीकार करावा म्हणेल ते विषसमान असले तरी आपल्या जीवीताच्या विरुध्द म्हणु नये. (ओवी ४५१ ते ४६०)

      अर्जुना! अशी वेदांविषयी अढळ श्रध्दा निमार्ण झाली तर अकल्याणाची भेट होणे कसे शक्य आहे? अहितापासुन वाचविणारी आणि सुख देवुन वाढविणारी जगात श्रुतीवाचुन अन्य माऊली नाही, श्रुती ही जीवाचे ब्रम्हयाशी ऐक्य करुन देते हिच्या विचारांचा कोणी त्याग करु नये आणि तुही एकनिष्ठपणाने श्रुतीच्या आज्ञेचे पालन करावेस. कारण अर्जुना! धर्माचे आचरण करुन त्याच्या आधारे शास्त्रे प्रमाण भुत व सफल आहेत हे सिध्द करण्याकरता तुझा जन्म झाला आहे “धर्मानुज” म्हणजे धर्मराजाचा धाकटा भाऊ हे नाव तुला सहजच प्राप्त झाले आहे, म्हणुन तु धर्माच्या विरुध्द वर्तन करु नकोस. योग्य काय आणि अयोग्य काय याविषयी शास्त्रांनांच परीक्षक करावे आणि शास्त्रांत निषिध्द कृत्य म्हणुन जे सांगितले आहे. त्याचा त्याग करावा. आणि मग उत्तम कृत्य म्हणुन जे शास्त्रांतुन बाहेर निघेल ते तु आपल्या काया, वाचा, मनाने आणि परम श्रध्देने आचरण करुन पार पाडावेस. हे सदबुध्दी असणाऱ्या अर्जुना, आज तुझ्या हातात जगाने प्रमाण मानण्यासारखा शिक्का असल्यामुळे तु जे आचरण करशील ते कृत्य आज सारे जग प्रमाण मानणार आहे. याप्रमाणे आसुरी संपत्तीची कारणे, लक्षणे व कार्य हे पुर्णपणे सांगुन त्या दोषापासुन बाहेर कसे निघावे तोही प्रकार देवाने अर्जुनाला सांगितला. यानंतर पांडुराजाचा पुत्र अर्जुन अंतकरणातील एक सात्विक प्रश्न भगवंताला विचारणार आहे, तरी तुम्ही अत्यंत एकाग्रतेने जीवा-भावाने त्याचे श्रवण करा. महर्षी व्यासांच्या आज्ञेप्रमाणे संजयने कुरुंक्षेत्रीचा वृत्तांत सांगुन त्या राजा धृतराष्ट्राचा तो काळ जसा घालविला त्याप्रमाणे मी ही निवृत्तीनाथांच्या कृपार्शिवादाने आपणासं सांगेन. तुम्ही संत श्रोते माझ्यावर कृपेचा वर्षाव कराल तर तुम्हाला मान्य होतील असे विचार मी बोलीन. म्हणुन तुम्ही माझी ही सेवा पाहुन आपल्या अवधानरुपी कृपाप्रसादाचे दान मला द्यावे.त्या आधारे मी गीतेचा अर्थ सांगण्याविषयी समर्थ होईन. असे श्री निवृत्तीनाथांचे परमप्रिय शिष्य श्री ज्ञानदेव महाराज म्हणाले.

       सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरीचा सोळावा अध्याय श्री भगवंताच्या कृपेने संपन्न

       ( भगवद गीता श्लोक ते २४ आणि मराठीत भाषातंरीत ज्ञानेश्वरी ओव्या ते ४७३)   

पुढील अध्याय