अध्याय १८ भाग १५

          अधिक काय सांगावे? क्रमयोगाच्या ओघाने भक्ती-ज्ञानरुप ही गंगाही आनंदरुपी सागर जो मी त्याला येवुन मिळत असते, हे मर्मज्ञ अर्जुना! असा हा क्रमयोगाचा महान महिमा आहे,म्हणुन मी तुझ्याजवळ त्याचे वर्णन करतो देश, काल, व पदार्थ यांच्या अनुकूलतेने मला साध्य करुन घेण्याचा हा मार्ग नसुन मी स्वतासिध्द आहे सर्वाचा आत्मा आहे. सर्व स्वरुप आहे आणि सर्वाचे सर्व ही आहे पण माझ्या प्राप्तीसाठी अवघड साधना करुन काही कष्ट करावे लागत नाहीत. मी या सहजसुलभ कम्रयोगाच्या उपायाने निश्चीतपणे प्राप्त होत असतो, एक शिष्य व एक गुरु असावा हा जो संप्रदाय प्रसिध्द पावला आहे, तो माझ्या प्राप्तीचा उपाय जाणण्यासाठी आहे. अर्जुना! पृथ्वीच्या पोटामध्ये रत्न, सोने, आदी जशा खाणी स्वतासिध्द असतात लाकडामध्ये जसा अग्नी हा स्वतासिध्द असतो धेनुच्या कासेमध्ये दुधही स्वतासिध्द असते, परंतु हे सर्व सिध्द असले तरी ज्या योगाने ते प्राप्त होईल ते उपाय करावे लागतात. मी देहामध्ये आहे तरीपण क्रमयोगाच्या उपायाने प्राप्त होत असतो,  एकदा फलप्राप्ती सांगितल्यावर देखील हा साधनाप्रकार सांगण्याचा देव पुन्हा का प्रयत्न करीत आहेत असे काणी विचारतील तर हा साधर-प्रकार सांगण्याचा हा अभिप्राय असा आहे की, गीतेले सामर्थ्य एवढे महान आहे की यामध्ये सांगितलेल्या सर्व उपायांनी मोक्ष प्राप्ती होते, आणि दुसऱ्या शास्त्रानी सांगितेले मोक्षप्राप्तीचे उपाय प्रमाण सिध्द नाहीत. ( ओवी १२२१ ते १२३० )

वाऱ्याने सुर्याच्या आड आलेले ढग दुर होतात परंतु वारा सुर्याला निर्माण करु शकत नाही स्वताच्या हातांनी पाण्यावरील शेवाळ दुर करता येईल परंतु पाणी निर्माण करता येत नाही. अविद्येचा जो मळ आहे, तो इतर शास्त्रे नाहीशी करतात परंतु माझे प्रकाशन शास्त्र करु शकत नाही, कारण मी स्वयं-प्रकाशमान आहे, म्हणुन सर्व अध्यात्मविषयक शास्त्रे अविद्येचा नाश करण्यास समर्थ आहेत तरी त्यांच्याने स्वतासिध्द आत्म्याचा बोध करवत नाही, त्या अध्यात्मशास्त्रात आत्मस्वरुपाचा निर्णय करण्याचा प्रसंग आला म्हणजे त्या विविध शास्त्रांना ज्या ठिकाणी विचारावयास जावे लागते ते हे गीताशास्त्र होय. सुर्यनारायणाने पुर्व दिशा उजळली म्हणजे सर्व दिशा प्रकाशित होतात त्याप्रमाणे सर्व प्रकाश देणाऱ्या शास्त्रांना गीता हे श्रेष्ठ शास्त्र होय. गीताशास्त्रामुळे इतर शास्त्र सनाथ झाली फार काय सांगावे? ज्या गीताशास्त्राने मागील अध्यायांमध्ये अनेक उपाय  विस्तारपुर्वक सांगितले आहेत, की जे उपाय केल्याने आत्मतत्‍वाशी सहज एकरुपता साध्य होईल. परंतु प्रारंभी एकदा श्रवण केल्याने अर्जुनाला हे कळले किवां नाही, हा भाव श्रीहरीने मनात धारण करुन हे सांगितलेले प्रमेय अर्जुनाच्या अंतकरणामध्ये अंकित होण्यासाठी पुन्हा एकदा उजव्या हाताची पाच बोटे एकत्र करण्याच्या मुद्रेने म्हणजे संक्षेपाने श्रीकृष्ण सांगत आहेत. आणि हा अठरावा अध्याय म्हणजे गीतेचा प्रवास संपवणारा शेवटचा मुक्काम आहे म्हणुन आरंभापासुन शेवटपर्यत एकच अर्थ प्रतिपादन केला आहे असे दाखवितात, ग्रंथाच्या मध्यभागी विविध अधिकार-प्रसंगानी अनेक सिध्दांत सांगितलेले आहेत. (ओवी १२३१ ते १२४०)

तरी पुर्वापार संबंधाचा विचार मनात न आणता गीताग्रंथात अनेक सिध्दांत आहेत असे फार कोणी मानेल तर, महासिध्दांताच्या एकत्वामध्ये अनेक उपसिध्दांताना संबध्द करुन या गीताग्रंथाने जो उपक्रम केला तोच उपसंहारात सांगुन हा ग्रंथ आपले सांगणे संपवीत आहे गीताशास्त्रात अविद्येचा नाश हा मुख्य विषय आहे आणि त्याद्वारे  मोक्षाची प्राप्ती हे फळ आहे या दोघाचे साधन केवळ ज्ञान होय. तेच ज्ञान नाना प्रकारे ग्रंथात सांगुन ग्रंथाचा विस्तार झाला आहे. त्याच ज्ञानाचा आता संक्षेपाने अनुवाद करावा म्हणुन साध्य प्राप्त झाल्यावर  साधनांचे स्वरुप पुन्हा सांगण्यास याच‍अभिप्रायाने देव प्रवृत्त झाले. मग देव म्हणाले हे अर्जुना! अशा उत्कट निष्ठेने तो क्रमयोगी मद्रुप होवुन माझ्या शुध्द स्वरुपाच्या ठिकाणी स्थिर होतो, आणि स्वधर्मरुप पवित्र, सदाचारी, कोमल भावफुलानी उत्तम प्रकारे पुजा करुन माझ्या कृपाप्रसादाने ज्ञानमार्गाला प्राप्त करुन घेतो. हा ज्ञानमार्ग जेव्हा हस्तगत होतो त्या वेळी माझी भम्ती प्रकट होते व तया भक्तीच्या आधारे तो माझ्याशी ऐक्य पावुन आनंदी होतो, विश्वाला प्राकशित करणारा मी जो आत्मा त्याला सर्व व्यापक मानुन जो पुरुष जाणतो, अनुसरतो, आपला कठीणपणा टाकुन मीठ हे पाण्याशी मिळुन जाते किवां वारा सर्वत्र हिंडुन शेवटी आकाशाच्या ठिकाणी स्थिर राहतो. (ओवी १२४१ ते १२५०)

त्याप्रमाणे काया-वाचा-मनाने जो माझा आश्रय करुन राहतो त्याच हातुन एखाद्या वेळी कदाचित निषिध्द कर्मही घडेल महानदी अथवा रस्यावरील अशुध्द पाणी हे गंगानदीला मिळाले की ते जसे गंगारुप होतात तसा माझा आश्र‍य करणाऱ्या भक्ताला अनुभव ज्ञानाने पाप-पुण्याची एकरुपता प्राप्त होत असते, फुले, चदंन आणि एरंडासारखी पोकळ लाकडे हा भेद तोपर्यत मान्य असतो की जोपर्यत त्यांचा अग्नीशी संबंध आला नाही, किवां हिणकस सोने अथवा सोळा दराने सोने हा भेद सोन्यामध्ये तोपर्यतच असतो की जोपर्यत परीस आपल्या स्पर्शाने लोखंडाला एकरुप करणार नाही. त्याप्रमाणे शुभ अथवा अशुभ भेद तोपर्यत असतो जोपर्यत सर्वत्र प्रकाश झाला नाही. जोपर्यत सुर्याचा गावामध्ये प्रवेश झाला नाही तोपर्यत रात्र आणि दिवस हा भेद दिसत असतो. म्हणुन अर्जुना, माझी भेट झाली म्हणजे त्या क्रमयोग्याची सर्व कर्मे नाहीशी होवुन तो मोक्षाच्या सिंहासनावर विराजमान होतो, ज्या मोक्षपदाचा देशाने, कालाने व स्वाभावाने कधीही नाश होत नाही असे अविनाशी मोक्षपद तो क्रमयोगी मिळवतो. हे अर्जुना, फार काय वर्णन करावे?  सत्-चित्-आनंदरुप आत्मतत्वाला जो प्राप्त करुन घेतो. आत्मतत्व प्राप्त झाल्यावर न मिळणारा  असा जगात कोणता लाभ आहे? अर्जुना, कारणासाठी तु आपली सर्व कर्मे माया ठिकाणी समर्पण कर. (ओवी १२५१ ते १२६०)

हे वीरा अर्जुना ! तो त्याग कदाचित तु वरवरचा करशील, पण तसे करु नकोस सर्व कर्म करीत असताना आपली चित्तवृत्ती आत्मविचाराकडे लाव, मग त्या विचाराच्या सामर्थ्याने तु आपल्या आत्मतत्वाला कर्मावेगळा आणि माझ्या शुध्द व्यापक स्वरुपाशी अभिन्न असलेला पाहशील. आणि कर्माची जन्मभुमी जी प्रकृती ती आपल्या स्वरुपाहुन फार दुर म्हणजे अगदी भिन्न अशी तु पाहशील. अर्जुना! जशी रुपावाचुन छाया दृष्टीस पडत नाही तशी ती प्रकृती कल्पित असल्यामुळे मुलभुत आत्मस्वरुपापेक्षा वेगळी उरत नाही, अशा ज्ञानाने अज्ञानाचा नाश झाला म्हणजे संपुर्ण कर्माचा संन्यास अनायसे प्राप्त झाला असे होईल. मग कर्ममात्र नाहीसे झाल्यावर केवळ मी  सच्चिदानंदस्वरुप आत्मा आपल्या ठिकाणी उरतो त्या केवळ आत्म्याच्या ठिकाणी तु आपली बुध्दी पतीव्रते प्रमाणे म्हणजे एकनिष्ठ करुन ठेव,जेव्हा अनन्य योगाने बुध्दी माझ्यामध्ये प्रवेश करते तेव्हा चिंतन करण्याचे अन्य विषय टाकून ती माझ्या एकटयाचेच चित्त भजते. याप्रमाणे चिंतन करयाचे सर्व विषय त्यागुन सदैव चित्त माझे ठिकाणी अखंड जडुन राहील असे त्वरीत कर. मग जेव्हा अनन्य भक्तीने चित्तात मी भरुन जाईन तेव्हा माझा प्रसाद प्राप्त झाला असे तु ओळख. मग सर्व दुखाची वसतिस्थाने जी जन्म-मरणे भोगली जातात, ती कठिण असली तरी तुला सोपी होतील. (ओवी १२६१ ते १२७०)

सुर्याच्या सहाय्याने डोळयाला जेव्हा आश्रय मिळतो तेव्हा त्या डोळयांना अंधकाराची पर्वा राहते काय? त्याप्रमाणे माझ्या कृपाप्रसादाने ज्याचा जीवपणा नाहीसा झाला आहे, त्याला संसाररुपी बागुलबुवाची भिती वाटेल काय? म्हणुन अर्जुना, माझ्या कृपाप्रसादशने संसार-दुर्गतीपासुन तु तरुन जाशील. कानाने श्रवण केले नाहीस अथवा मनाने पटवुन घेतले नाहीस तर तु नित्य मुक्त अविनाशी असे ब्रम्हस्वरुप आहेस, ही तुझी पारमार्थिक स्थिती तुला न कळाल्यामुळे व्यर्थ  होईल देह-संबंधामुळे दुखाचे घाव तुला सोसावे लागतील. ज्या देह-संबंधामुळे पावलो पावली आपला घात होत आहे तो भोगत असताना कधीही विश्रांती मिळत नाही, जर तु हे माझे बोलणे नीटपणे जाणुन घेतले नाहीस तर एवढा भयानक मृत्यू हा तुला न मागताही भोगावा लागेल.  जर पथ्याचा द्वेष केला  तर ताप वाढतो अथवा दिव्याचा द्वेष केला तर अंधकार वाढतो, तसा विवेकाचा द्वेष केला तर अहंकार वाढेल, आपल्या देहाला अर्जुन हे नाव देवुन भीष्मादिकांना देहाला आत्मसंबंध  असे नाव देवुन आणि युध्दाला वाईट कर्म असे नाव देवुन  अर्जुना! अशा या आपल्या बुध्दीने या तिघांना तीन नावे ठेवुन मी युध्द करणार नाही असा, अंतकरणामध्ये तु पुर्णपणे निश्चय केलास तरी तुझा जन्मजात क्षात्रस्वभाव तुझा तो निश्चय टिकु देणार नाही. (ओवी १२७१ ते १२८०)

अंत:करणामध्ये तू पूर्णपणे निश्चय केलास, तरी तुझा जन्मजात क्षात्रस्वभाव तुझा तो निश्चय टिकू देणार नाही. वास्त्विक विचार करून पाहिले असता, मी अर्जुन आहे, भीष्मादिक माझे नातलग आहेत, त्यांचा वध करणे हे पापच आहे, या सर्व कल्पनांमध्ये भ्रमाशिवाय दुसरे काही आहे काय? प्रारंभी तू युध्दास तयार झालास आणि युध्दाकरता शस्त्रही हाती घेतलेस; आणि आता युध्द न करण्याची शपथ घेतोस, हे योग्य आहे काय? याकरिता ‘मी युध्द करणार नाही’ हे तुझे बोलणे व्यर्थ आहे. तसेच, व्यवहार म्हणून लोकदृष्टीनेदेखील तुझे म्हणणे कोणी मान्य करणार नाही. ‘मी युध्द करणार नाही’, असा आपल्याच मनाने तू जो निश्चय केला आहेस, तो व्यर्थ होऊन जाईल आणि तुझी जी क्षात्र प्रकृती आहे, ती तुझ्या निश्चयाचे उलट तुझ्याकडून युध्द करवीलच. हे बघ. पूर्वेकडे पाण्याचा ओघ जोरात चाललेला असेल आणि पोहणारा जर म्हणेल, ”मी पश्चिमेकडे जाईन”, तर त्याचे म्हणणे व्यर्थ ठरेल व तो पाण्याचा ओघ त्याला पूर्वेकडे ओढून नेईल; अथवा साळीचा दाणा जर म्हणेल की, ”मी साळीपणाने उगवणार नाही.” तर त्याचे म्हणणे व्यर्थच जाईल; कारण त्याला त्याच्या स्वभावाच्या विरूध्द जाता येणे शक्य नाही. त्याप्रमाणे हे बुध्दिमान अर्जुना, तुझी प्रकृती क्षात्रगुणांनी घडलेली आहे. ‘मी युध्द करण्यास उठणार नाही’, असे म्हणशील, तर ते व्यर्थ होईल. तुझा क्षात्रधर्मच तुला युध्‍द करावयास उठवील. हे अर्जुना, प्रकृतीने तुला जन्मत:च शौर्य, तेज, धृती, दक्षता इत्यादी गुण दिले आहेत. हे अर्जुना, त्या प्रकृतीच्या गुणानुरोधाने युध्द न करता स्वस्थ बसणे तुला शक्य होणार नाही. (ओवी १२८१ ते १२९०)

कोंदड नावाचे धनुष्य हाती असलेल्या अर्जुना, त्या क्षात्रगुणांनी तू बांधला गेला असल्यामुळे तुला तुझ्या स्वभावाच्या विरूध्द जाता येणार नाही. अथवा आपल्या जन्माच्या मूळाचा विचार न करता , ‘मी लढणार नाही’, असे केवळ अढळ व्रत जर घेशील, तर ज्याप्रमाणे हात-पाय बांधून ज्याला रथामध्ये घातले आहे, तो स्वत: जरी चालला तरी रथाबरोबर दूर दिशेच्या शेवटपर्यंत जातो. त्याप्रमाणे तू ‘मी काहीही करणार नाही’, असे म्हणून जरी स्वस्थ बसशील तरी खात्रीने युध्द करशील, यामध्ये शंका नाही. विराट देशाचा राजा उत्तर तो युध्दाच्या वेळी पळत असताना तू बृहन्नडेचे सोंग घेऊन त्याचा सारथी होऊन युध्द का बरे केलेस? तोच तुझा क्षत्रिय स्वभाव तुला युध्द करावयास लावील. महायोध्दे जिच्यामध्ये आहेत, अशा अकरा अक्षोहिणी सैन्य तू एकटयाने रणांगणावर पराजित केलेस. हे कोंदडपाणी अर्जुना! तो तुझा क्षात्रस्वभाव तुझ्याकडून युध्द करवीलच. असे पहा, रोग्याला कधी रोग आवडतो का? दरिद्री माणसास दारिद्रय आवडते काय? पण ज्या बलवान अशा प्रारब्धाने त्याला ते भोगविले जाते, ते अदृष्ट प्रारब्ध, ईश्वराच्या अधीन असल्यामुळे ह्याहून वेगळे दुसरे काही तू करणार नाहीस, हे लक्षात ठेव. कारण, हे घडविणारा जो ईश्वर, तो तुझ्या ह्रदयामध्ये विराजमान आहे. सर्व भूतांच्या ह्दयरूपी महा-आकाशात ज्ञानरूपी वृत्ती हीच ज्याची सहस्त्र किरणे आहेत, असा जो ईश्वर त्या किरणांनी उदयाला आलेला आहे, त्या ईश्वररूप दिव्य सूर्याने जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांना व स्वर्ग, मृत्यू व पाताळ या तीन लोकांना प्रकाशित करून ‘देह म्हणजे मी’, अशा विपरीत ज्ञानाने भुललेले वाटसरू जागृत केले.  (ओवी १२९१ ते १३००)

दृश्य जगदरूपी पाण्याच्या सरोवरात विषयरूपी कमले प्रफुल्लित झाली असता, पाच ज्ञानेंद्रिये व सहावे मन या सहा पाय असलेल्या जीवरूपी भ्रमराला जो त्या कमळातून सुगंध चारतो, असो. हे सूर्याचे रूपक राहू दे. तो ईश्वर सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी ‘मी अमुक आहे’ अशा रीतीने स्फुरण पावणारा आहे व समष्टी आणि अहंकार पांधरून अखंड प्रकट आहे. तो ईश्वर आपला मायेचा पडदा पुढे लावून आतून एकटाच दोरी हालवितो व बाहेर चौऱ्याऐंशी लक्ष छायारूपी चित्रे नाचवितो. ब्रह्मदेवापासून छोटया कीटकांपर्यंत सर्व भूतमात्रांना त्यांच्या कर्मानुसार योग्यतेप्रमाणे विविध प्रकारच्या देहांच्या आकारास आणतो. तेव्हा जो देहकार ज्या प्राण्यांच्या कर्माप्रमाणे त्याच्यापुढे मांडला जातो, तो प्राणी ‘हा देह मीच आहे’, असे म्हणून त्या देहावर स्वार होतो. सुताची गुंडी ज्याप्रमाणे सुताने गुंडाळलेली असते; अथवा गवताची पेंढी जशी गवताच्याच दोरीने बांधली जाते; अथवा पाण्यातील प्रतिबिंबाला बाळ ते आपणच आहोत, असे मानते, त्याप्रमाणे देहाच्या आकाराने आपल्याला दुसरे वेगळे कल्पून जीव हा देहाच्या ठिकाणी आत्मबुध्दी ठेवून प्रगट होतो. अशा प्रकारे शरीर-आकाररूपी यंत्रावर, सर्व भूतमात्रांना चढवितो आणि त्यांच्या-त्यांच्या संचित कर्माची दोरी हालवीत असतो. ज्याच्यासाठी जे कर्मरूपी सूत्र स्वतंत्र तयार करून ठेवलेले असते, ते हालविताच तो तो प्राणी त्या त्या गतीच्या योनीला प्राप्त होतो. फार काय सांगावे? चक्री वारा गवताला जसे आकाशात फिरवितो. अर्जुना, त्याप्रमाणे सर्व भूतमात्रांना स्वर्ग आणि संसार यांमध्ये प्रारब्ध फिरविते.   (ओवी १३०१ ते १३१०)

पुढील भाग