अध्याय १८ भाग २०

त्याप्रमाणे शब्दब्रम्ह अनंत आहे त्या शब्दब्रम्हाचे सव्वालक्ष श्लोकांमध्ये महाभारत झाले या महाभारताचे सार म्हणजेच सातशे श्लोकांची गीता होय. त्या सातशे श्लोकांचे तात्पर्य म्हणजे हा शेवटचा श्लोक होय, हा श्लोक महर्षी व्यासांचा शिष्य संजयाचा पुर्ण उदगार आहे. जो या  श्लोकांचे जाणीवपुर्वक चितंन करील त्याने सर्व विद्यांचे शुध्द सार स्वाधीन केले असे होईल. असे हे सातशे श्लोक गीतेच्या पदांना स्वता धारण करतात, ही पदे आहेत का गीतारुपी आकाशातील परमअमृत आहे? माझ्या मनात अशी कल्पना स्फुरण पावते की हे सातशे श्लोक म्हणजे आत्मराजाच्या गीतारुपी सभागृहातील सातशे खांब उभारले आहेत. अथवा सातशे मंत्रांनी वर्णन करण्यास योग्य असलेली ही गीतारुपी भगवतीदेवी काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सररुपी महीषासुरांचा नाश करुन त्या विजयाने आनंद पावली आहे, म्हणुन जो काया, वाचा, मनाने या गीतादेवीचा सेवक होईल म्हणजे त्यातील आत्मज्ञान प्राप्त करुन  घेईल, तो आनंदरुपी साम्राज्याचा सार्वभौम राजाच होईल. अथवा अविद्यारुपी संसाररुपी मार्गावरुन चालताना जे श्रम होतात, त्यांचा परिहार होवुन विश्रांती घेण्यासाठी हे सातशे श्लोक जणु द्राक्षांचे वेलच असुन ते गीतारुपी मांडवावर पसरलेले आहेत, अथवा हे गीतेचे श्लोक जणु भाग्यवंत संतरुपी भ्रमरांनी सेवन केलेली आणि श्रीकृष्ण नावाच्या सरोवरात विकसित झालेली सुंदर आणि सुंगधी कमळे आहेत.  (ओवी १६६१ ते १६७०)

मला असे वाटते की, हे फक्त श्लोक नव्हेत तर गीतेचा महिमा वर्णन करणारे जणु अनेक भाटच जमले आहेत. अथवा सर्व शास्त्रे सातशे मंगलमय श्लोकांचे आवाज तयार करुन सुंदर अशा गीतापुरीमध्ये राहण्यासाठी आली आहेत, गीतारुपी लक्ष्मीने स्वताच्या आत्मरुपी आपल्या अत्यंत प्रिय पत्नीला आवडीने आलिंगन देण्याकरता जणु बाहु पसरले आहेत, तेच हे सातशे श्लोक आहेत, अथवा हे श्लोक म्हणजे गीतारुपी समुद्रावरील तरंग आहेत, किवां श्रीहरीच्या गीतारुपी रथाला जुंपलेले घोडे आहेत, अथवा गीता ही गंगा असुन सर्व श्लोकरुपी तीर्थे, अर्जुनरुपी सिहंस्थ पर्वणी आल्यामुळे मिळावयास आली आहेत, अथवा त्या श्लोकांच्या पंक्ती नसुन चित्ताला अचित्यं जे ब्रम्ह, त्याची प्राप्ती करुन देणारा चिंतामणीच आहे, किवां निर्विकल्प ब्रम्हाला प्राप्त करुन देणारी कल्पतरुची झाडे आहेत, असे हे सातशे श्लोक आहेत, ते एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत आता कोणत्या श्लोकाची‍निवड करुन त्याचे वेगळे वर्णन करावे? कामधेनुकडे पाहीले म्हणजे ती दुभती आहे का आटलेली आहे, हया गोष्टीच संभवत नाहीत, दिव्याकडे आधीचा व मागचा भेद कुठला? सुर्याकडे बघितले असता हा धाकटा किवां मोठा हे समजत नाही, अमृताचा समुद्र खोल आणि उथळ कसा बरे असु शकेल? त्याप्रमाणे गीतेचे जे सातशे श्लोक आहेत त्यामध्ये पहिला अथवा शेवटचा असे म्हणता येत नाही, स्वर्गामधील पारिजातकाची फुले नवी व जुनी असतात काय?    (ओवी १६७१ ते १६८०)

तसे पाहीले तर गीतेतील श्लोकंना कोणतीच उपमा  नाही त्यामुळे त्याचे समर्थन तरी काय करु? भाव असा की, प्रतिपादक शब्द आणि प्रतिपाद्य ब्रम्ह हे दोन्हीही या श्लोकांत एकरुप झाले आहेत, कारण या गीताशास्त्रात भगवान श्रीकृष्ण सांगणारे आणि हा श्रीकृष्णरुपच अर्जुन ऐकणारा हया गोष्टी सर्वाना माहीत आहेत, गीतेच्या अर्थापासुन जे फळ प्राप्त होते तेच गीतेच्या पाठानेही मिळते, गीतेचे अर्थज्ञान व पठण हे फलदृष्टीने सारखेच आहे, तसेच गीता हे वाच्य व वाचक यांचे ऐक्य साधणारे आहे म्हणुन मला आता समर्थन करण्यास काही विषय राहीला नाही. कारण गीता ही प्रभुची शब्दमय मुर्तीच आहे. इतर शास्त्राचे वाचन केले असता त्यांचा अर्थ समजतो आणि फलप्राप्ती झाली म्हणजे ते शास्त्र नाहीसे होते तसे हे गीताशास्त्र नाही. हे ओतप्रोत ब्रम्हस्वरुपच आहे, देवाने विश्वाचा उध्दार करण्यासाठी ब्रम्हानंद सुलभ करुन तो अर्जुनाच्या निमित्ताने गीतेच्या रुपाला आणला, ज्याप्रमाणे चकोराच्या निमित्ताने पुर्ण कलायुक्त चंद्राकडुन तृप्त झालेली तीन भुवने शांत केली जातात. किवां भगवान शंकरानी कळिकाळारुपी तापाने पीडित झालेल्या लोकांचा उध्दार करण्यासाठी गौतम ऋषींचे निमित्त गंगेचा खाली वाहणारा ओघ निर्माण केला. त्याप्रमाणे अर्जुनाला वासरु करुन श्रीकृष्णरुप गायीने हे गीतेचे दुभते संपुर्ण जगाला पुरेल एवढे दिले, या गीतारुपी अमृतगंगेमध्ये जर तुम्ही अंतकरण पुर्वक स्नान कराल तर तुम्ही गीतारुपी ब्रम्ह व्हाल अथवा जिभेने गीतेचे पठण केले तर गीतारुप व्हाल. (ओवी १६८१ ते १६९०)

परीसाने लोखंडाच्या एका भागाला जरी स्पर्श केला तरी ते लोखंड दुसऱ्या भागापर्यत आपोआप सुवर्णमय बनते, तशी  गीतापाठरुपी वाटीतील श्लोकांचे पद मुखाला लावता क्षणी अंगी ब्रम्हतेची  पुष्टी प्राप्त होते, अथवा गीतेकडे पाठ फिरवुन जरी  पडल्या-पडल्या  कानांनी फक्त श्रवण केले तरी तीच फलप्राप्ती होते,  गीता श्रवण, पठण करणाऱ्या आणि अर्थज्ञान जाणणाऱ्या कोणत्याही माणसास गीता मोक्ष प्राप्त करुन देते म्हणजे त्याचे आंतरबाहय जीवन आनंदरुप बनविते, ज्याप्रमाणे समर्थ व उदार दाता हा कोणालाही विन्मुख पाठवीत नाही,  म्हणुन संत-सज्जनांच्या संगतीत गीतेचे श्रवण करावे इतर अनेक शास्त्रे शिकुन काय परिनाम होणार? श्रीकृष्ण आणि अर्जुनाने जो मोकळे पणाने सुखसंवाद केला तो महर्षी व्यासांनी तळहातावर सहज घेता येईल आई जेव्हा बाळाला जेवु घालू लागते तेव्हा त्याला गिळता येतील असे लहान-लहान घासच करते अथवा अफाट वारा आपल्या हाती यावा म्हणुन शहाण्या माणसाने ज्याप्रमाणे पंख्याची योजना केली, त्याप्रमाणे शब्दांनी हे कळायचे नाही त्याचे अनुष्टुभ छंद करुन व्यासांनी स्त्री, शुद्र वगैरे सर्वाच्या बुध्दीला ते सुलभ करुन ठेवले. स्वाती नक्षत्राच्या पाण्याचे थेबं जर मोती बनले नसते, तर ते स्त्रिायांच्या अंगावर शोभुन दिसले असते का? (ओवी १६९१ ते १७००)

नादब्रम्ह जर वाद्यांमध्ये आले नसते तर मधुर नाद आपणास कसा कळला असता? फुले नसती तर सुवास कसा घेता आला असता? विविध पक्वान्नांत जर गोडी नसती तर ती जीभेला कशी कळली असती?  आरसा जर नसता तर डोळयांना आपले रुप कसे बरे पाहता आले असते ? निर्गुंण सदगुरुं जर आकारास आले नसते तर उपासकांना त्यांची कशी बरे सेवा करता आली असती? त्याप्रमाणे अनंतरुप ब्रम्ह गीतेच्या सातशे श्लोकांच्या रुपाने जर प्रगट झाले नसते तर ते कोणालाही जाणता आले असते काय? मेघ हा जरी समुद्राचे पाणी धारण करतो तरी देखील जग हे समुद्राकडे पाहत नाही तर मेघांकडे पाहते, कारण जे अमर्याद आहे ते कोणाला प्राप्त करुन घेता येत नाही. म्हणुन जे वाणीला देखील प्राप्त होत नाही त्याचे जर महर्षी व्यासांचे सर्वोत्तम श्लोक केले नसते तर श्रवण करण्यास अथवा मुखाने वर्णन  करावयास कसे आले असते? म्हणुन महर्षी व्यासांचे सर्व जगावर महान उपकार आहेत. त्यांनी श्रीकृष्णांच्या वचनांना ग्रंथाचा आकार दिला. आता तोच गीताग्रंथ मी महर्षी व्यासांच्या श्लोकांतील पदे विचाराने पाहत मराठी भाषेमध्ये सर्वाना श्रवण, पठण, करण्यास व त्यांचे अर्थज्ञान समजण्यास योग्य होतील असा प्रयत्न केला, महर्षी व्यासांदिक अधिकारी महान विद्वानांची बुध्दी ज्या गीतेतील सिध्दांतविषयी साशंकपणाने व्यवहार करते तेथे मी एक सर्वसामान्य असुनही मराठी भाषेत ते मांडत आहे परंतु गीतारुपी ईश्वर अत्यंत भावप्रधान आहे. तो महर्षी व्यासांच्या फुलांच्या माळा जशा धारण करतो तसा तो माझ्यासारख्याच्या दुर्वानांही “नाही” म्हणत नाही. (ओवी १७०१ ते १७१०)

क्षीरसागराच्या काठावर हत्तीचा कळप पाणी पिण्यासाठी येतो तेथे तो समुद्र चिलटांना नको म्हणतो काय? अगदी नवीनच पंख फुटलेले पाखरु फार उंच उडत नाही परंतु त्याच आकाशात तो गरुड देखील अतिशय वेगाने आकाशमध्ये विहार करीत असतो. राजहसांचे पृथ्वीवरील चालणे डोलाने म्हणुन प्रसिध्द आहे म्हणुन दुसऱ्याने कोणी पृथ्वीवर चालावेच नाही काय? कलशामध्ये तिच्या पोकळीप्रमाणे पुष्क्ळ पाणी घेता येते परंतु  चुळ जरी लहान असली तरी तिच्या मानाने ती पाणी देत नाही काय? मशाल मोठी असल्यामुळे तिचे तेज मोठे पडते, परंतु वात जरी लहान असली तरीही आपल्या परीने तिचे तेज पडतेच ना? समुद्राच्या विस्ताराप्रमाणे त्यामध्ये आकाशाचे प्रतिबिबं मोठे दिसत असते, परंतु डबक्यातही डबक्याच्या मानाने दिसतेच ना? त्याप्रमाणे व्यासांसारख्या महान बुध्दीचे लोक या ग्रंथाचे विवरण करतात, तर आम्ही अल्प बुध्दीचे असलो तरी आम्ही या ग्रंथाचे विवरण करु नये काय? ज्या महान सागरामध्ये मंदार पर्वताच्या आकाराएवढे मोठे जलचर संचार करत असतात, हे पाहुनदेखील तेथे छोटे-छोटे मासे पोहत नाहीत काय? अरुण हा सुर्याच्या अंगाजवळ राहत असतो म्हणुन तो सुर्याला पाहतो म्हणून पृथ्वीवर असणारी छोटी मुंगी देखील सुर्याला पाहु शकत नाही काय? म्हणुन आमच्या सारख्या सामान्य लोकांनी गीतेवर भाष्य केले ही गोष्ट अयोग्य आहे असे म्हणण्याचे कोणालाही कोणतेच कारण नाही. (ओवी १७११ ते १७२०)

आपले वडील पुढे चालले असता त्याच मार्गाने मुल जर येत असेल तर त्यालाही इष्ट स्थान प्राप्त होणार नाही काय? त्याप्रमाणे महर्षी व्यासांचा मागोवा घेत आणि भाष्यकारांना वाट पुसत मी सामान्य असलो तरी गीतार्थाच्या ठिकाणी न जाता दुसऱ्या विपरीत अर्थाच्या गावाला जाईन काय? ईश्वराच्या क्षमाभावाने स्थावर-जगंम विश्वाचा उपद्रव पृथ्वी सहन‍करते. ईश्वराच्या कृपेने चंद्रमा जगाला शांततेचे तेज प्रदान करत असतो. ईश्वराच्या  तेजाने सुर्य हा प्रकाशीत होत असतो त्यामुळे सुर्य हा अंधकाराला दुर करतो. ईश्वराच्या सत्तेने समुद्राला जल मिळाले त्या जलामध्ये माधुर्य व माधुर्यामुळे सौदंर्य प्राप्त झालेले असते. त्या ईश्वराच्या सत्तेने वाऱ्याला गतिरुप बळ, आकाशाला महान विस्तार व ज्ञानाला उज्जवल सार्वभौमत्व प्राप्त झाले. ज्याच्या सत्तेमुळे वेदाला बोलण्याची शक्ती प्राप्त झाली, ज्याच्या सत्तेने सुख समृध्द झाले, ज्याच्या सत्तेने विश्व हे रूपवान झाले, असो. आता हे वर्णन पुरे. ते सर्वांवर महान उपकार करणारे ईश्वराशी ऐक्य पावणारे समर्थ सदगुरू श्री नितृत्तिनाथ माझ्या अंत:करणात येऊन वास करीत आहेत. त्यांच्या प्रेरणेने, कृपेने आयतीच अर्थपूर्ण झालेली गीता मी जगाास मराठी भाषेमध्ये सांगितली, तर यामध्ये आश्चर्य करण्यासारखे काय आहे? एकलव्य कोळयाने, भिल्लाने श्री गुरूंच्या नावाने डोंगरावरती मातीची द्रोणाचार्यांची मूर्ती स्थापन केली आणि त्याची मनोभावे सेवा केली आणि आपल्या धनुर्विद्येची कीर्ती त्रैलोक्यामध्ये सर्वमान्य करून घेतली. ( ओवी १७२१ ते १७३० )

चंदनाने स्पर्श केलेली झाडे चंदनाप्रमाणे सुगंधी होतात. वसिष्ठ ऋषींनी सूर्याच्या ऐवजी त्याच्या जागी ठेवलेली छाटी सूर्याशी स्पर्धा करावयास लागली असता तिने सूर्यासारख प्रकाश पाडला. श्रेष्ठांच्या कृपेने जगामध्ये एवढे सामर्थ्य येते, तर मग मी तर सात्त्विक चित्ताने संपन्न असा चेतन मनुष्य आहे. श्री सदगुरूंसारखा परमेश्वराशी ऐक्य पावलेला असा माझा पाठीराखा आहे. तो केवळ आपल्या कृपेने शिष्याला आपल्या पदावर बसवितो. मूळची दृष्टी सूक्ष्म, स्वच्छ असून त्याला जर सूर्याच्या प्रकाशाची मदत मिळाली, तर दिसणार नाही, अशी कोणती गोष्ट आहे? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की, माझे नित्य नवे श्वासोच्छवास हे काव्यग्रंथ होतात. कारण सदगुरूंच्या कृपेने काय बरे होणार नाही? सदगुरूंची कृपा लाभल्यामुळे सामान्य लोकांच्या दृष्टीला विषय होईल, असा मराठी भाषेत गीतेचा अर्थ प्रगट केला आहे. तो अर्थ कोणी वक्ता असला, तर नुसती वाक्ये वाचली तरी स्पष्टपणे समजतो. म्हणून गीतेवर बोलणारा माझा अर्थ भूषणेच होतात आणि गाणारा नसला, तरीसुध्दा अक्षरे नुसती वाचली असता, वक्ता जरी नसला, तरी त्यात उणेपणा दिसत नाही. सुंदर शरीरावर दागिना जरी नाही घातला, तरी तो तसाच शोभून दिसतो; आणि तो सुंदर शरीरावर घातला तर त्याच्यापेक्षा अलंकाराचे दुसरे औचित्य कुठे असणार? मोत्याचा प्रकार असा आहे की, तो हाराच्या सोन्यालाही शोभा देतो. कदाचित सोने नसले, तरी नुसती मोत्यांची माळ अंगाला शोभा देते. वसंत ऋतूचे आगमन झाल्यानंतर मोगऱ्याची वाटोळी फुले हारामध्ये गुंफलेली असो किंवा नुसतीच फुले असो, त्यांच्या सुगंधामध्ये कमीपणा नसतो.  (ओवी १७३१ ते १७४०)

पुढील भाग