अध्याय १८ भाग ९

        अशा युक्तीने नित्य कर्म केले असता ते अवघड अशा जन्मभयाच्या संकटातुन सोडविते, आणि मोक्षाची प्राप्ती सुगम रीतीने करुन देते, अशा प्रकारे जो सुज्ञ मनुष्य कर्म करतो, तो संसारभयापासून मुक्त होतो व या आचरणाने मोक्षाच्या मार्गास लागतो, या नित्यकर्मावर विश्वास ठेवुन जी बुध्दी त्याच्या आचरणाविषयी दृढ निश्चय करते तेथे मोक्षप्राप्ती ठेवलेलीच असते. म्हणुन निष्काम कर्माच्या प्रवृत्तीला खाली ठेवुन त्यावर निवृत्ती म्हणजे मोक्ष मानलेला आहे, अशा कर्मामध्ये साधकाने बुडी देवु नये काय?  तहानेने व्याकुळ झालेल्या प्राण्याला पाणी, महापुरात सापडलेल्या मानवाला नाव  हे जीवन आहे. तसेच अंधाऱ्या विहीरीत पडलेला मनुष्य सुर्यकिरणांचे सहाय्य झाल्यावर जसा जगतो. अथवा पथ्य पाळून औषध घेतले असता रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य जसा वाचतो. किवां छोटया माशांना पाण्याचा ओलावा जरी प्राप्त झाला तर तो जसा निश्चीत जगला जातो, त्याप्रमाणे निष्काम बुध्दीने नित्यादी कर्मामध्ये प्रवृत्त झाला असता मोक्ष  प्राप्त होतो. हे नित्य कर्म करण्याकडे ज्या ज्ञानाची प्रवृत्ती असते आणि हे बघ खरोखर आचरण करण्यास योग्य नव्हती अशी जी काम्य आणि निषीध्द कर्मे संसार भय उत्पन्न करतात आणि ज्यांच्यावर  निषीध्दपणाचा शिंतोडा आहे, जन्ममरणचक्राचा व नरकाचा प्रसंग ज्यामध्ये आहे, अशी ती अकर्तव्य कर्मे न करण्याविषयी जी बुध्दी प्रवृत्तीला मागच्या पायानेच पळविते. (ओवी ७०१ ते ७१०)

धगधगत्या अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, अथवा अशा पाण्यात जशी उडी घालवत नाही व तापुन लालभडक झालेला शुळ जसा हातात धरवत नाही, अथवा फुत्कार टाकीत असलेला काळसर्प पाहुन बिळात हात घालवत नाही व वाघाच्या गुहेत जाणे होत नाही,  त्याप्रमाणे निषिध्द कर्म केले असता मोठे भय उत्पन्न होईल असा ज्या बुध्दीमध्ये निश्चय होतो, विष घालून तयार केलेले अन्न जर खाल्ले तर मृत्यू चुकत नाही, त्याप्रमाणे निषिध्द कर्माचे आचरण केले असता जन्म-मृत्यूचे चक्र थांबत नाही, हे बंधभयाने निषिध्द कर्म प्राप्त झ्राले असता त्या कर्माच्या त्यागाचा विनियोग जी बुध्दी जाणते, ज्याप्रमाणे रत्नपारखी खऱ्या व खोटया रत्नांची परीक्षा करतो, अशा प्रकारे जी बुध्दी कर्तव्य -अकर्तव्याचा विचार करणारी आहे, प्रवृत्ती-निवृत्तीचे यथार्थ माप घेणारी आहे. तसेच ज्या बुध्दीला चांगले काय व  वाईट काच हे स्पष्टपणे समजते, ती बुध्दी सात्विक होय. हंसाच्या गावात दुध आणि पाणी एकत्र केले जाते, अथवा आंधळा मनुष्य जसा दिवस व रात्र यातील गुंता जाणत नाही, भ्रमर हा फुलांच्या मकरंदाचे सेवन करतो, तसेच लाकुडही कोरण्यास प्रवृत्त होतो, परंतु हे कृत्य जसे भ्रमराच्या स्वभावाशी विसंगत नाही, त्याप्रमाणे धर्म किवां अधर्मरुपी असणारीजी कार्याकार्ये त्यांची योग्य निवड न करता जी बुध्दी त्याचे आचरण करते. (ओवी ७११ ते ७२०)

मोत्याची परीक्षा करण्याची दृष्टी असल्याशिवाय जर मोती विकत घेतला तर खरा मोती मिळेल अथवा मिळणार नाही, हे अगदी ठरलेले आहे. त्याप्रमाणे अकर्तव्य कर्म कदाचित पुढे आले नाही  तर ते लांबच रहाते, एरवी कर्तव्य-अकर्तव्य दोन्हीही एकसारखी जाणली जातात. जसे योग्य अयोग्य न पाहता सर्वाना आमंत्रण द्यावे, तसे चांगल्या व वाईट कर्माविषयी जी आंधळी वुध्दी निर्णय करते ती राजस बुध्दी होय. राजा ज्या वाटेने जातो ती वाट चोराला अडचणीची वाटते अथवा राक्षसांना  दिवस उजाडला असता ती रात्र आहे असे वाटते. किवां भाग्यहीन माणसाला पुरलेले धन कोळशाचा ढिग वाटतो, म्हणुन ते धन त्याच्याजवळ असुनसुध्दा त्याला ते नसल्यासारखे असते, त्याप्रमाणे जेवढे धर्म आहेत तेवढे त्या बुध्दीला पापे वाटतात, आणि खऱ्या गोष्टी खोटया भासतात. ही बुध्दी सर्व अर्थाचा अनर्थ करुन टाकते. आणि जे नितीशास्त्राने गुण म्हणुन सांगितले आहेत ते सर्व तिला दोष वाटतात. अधिेक काय वर्णन करावे? वेदांनी ज्यांचा स्वीकार करुन जे मान्य केले आहेत ते  तितके सर्व गुण जी बुध्दी विपरीतपणाने जाणत असते, ती कोणालाही न विचारता तामसी बुध्दी आहे असे जाणावे. अर्जुना! जी बुध्दी धर्म आणि व्यावहारीक अर्थाविषयी अज्ञानरुप आहे हे आत्मबोधरुपी कमलाच्या विकास करणाऱ्या चंद्रा, अर्जुना, याप्रमाणे तुला बुध्दीचे तीन भेद स्पष्ट सांगितले आहेत. (ओवी ७२१ ते ७३०)

या बुध्दीचा कर्म करण्याविषयी ज्यावेळी निश्चय होतो त्यावेळी तिला धैर्य अशी संज्ञा प्राप्त होते, आणि तिचेही तीन प्रकार आहेत त्या धैर्याचे तीन प्रकार  व त्याची लक्षणे सांगतो, तरी तु एकाग्रतेने श्रवण कर. सुर्य उगवल्यानंतर चोरांचा चोहीसाठी उपकारक अंधार एकदम थांबतो किवां राजाची आज्ञा नीतिबाहय वाईट व्यवहार थांबविते, वायुचा  साठा एकसारखा एकदम वेगाने वाहु लागला असता मेघ हे आपल्या गर्जनेसह नाहीसे होतात. अथवा अगस्त्य ऋषींना पाहील्याबरोबर सागर जसा मौन धारण करुन बसतो. अथवा चंद्रोदय झाल्याबरोबर सुर्यविकासी कमळे जशी मिटुन जातात. मदोन्मत्त हत्ती चालत असताना मोठी गर्जना करुन सिहं पुढे आला, तर हत्तीला पुढे टाकण्यासाठी उचललेले पाऊल खाली ठेवण्याचे सुचत नाही, त्याप्रमाणे सात्विक धैर्य निर्माण झाले असता मन, प्राण व इंद्रिये यांचे व्यापार जागच्या जागी बंद पडतात, अर्जुना!  इंद्रियांच्या विषयांशी पडलेल्या गाठी आपोआप सुटतात आणि दहाही  इंद्रिये अंतर्मुख होवुन मनरुप मायेच्या कुशीत प्रवेश करतात. जे धैर्य खाली असलेला अपान वायु व वर वाहणारा प्राणवायु यांची मर्यादा काढुन प्राण व अपान, व्यान, उदान,समान, नाग, कृकल, देवदत्त व धनंजय या नऊ वायुची पेंढी बांधुन सुषम्नेमध्ये प्रवेश करतो. ज्या धैर्याच्या योगाने धैर्य  हे  संकल्प-विकल्पाचे वस्त्र टाकुन देते व उघडे होते आणि बुध्दी देखील मनाच्या मागे स्वस्थ बसते. (ओवी ७३१ ते ७४०)

जो धैर्यरुपी राजा याप्रमाणे मनाला, प्राणांना व इंद्रियांना परस्परांतील क्रियारुपी बोलणे बंद करावयास लावतो, मग अष्टांग योगाच्या आधारे त्या एकटया सर्व इंद्रियांना ध्यानाच्या आतल्या समाधीरुपी घरात कोंडुन ठेवले जाते. परंतु सार्वभौम राजा जो परमात्मा त्याच्या स्वाधीन होईपर्यत ज्या धैर्याकडुन काही न घेता याचा निग्रह केला जातो,लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, असे जे धैर्य ते केवळ सात्विक धैर्य होय हे जाण. शरीर हेच माझे खरे स्वरुप मानुन जो धर्म, अर्थ व काम या तीन उपायांनी स्वर्ग व संसार या दोन्ही घरात आनंदाने वास्तव्य करतो जो जीवात्मा विविध प्रकारच्या सागरांच्या धर्म, अर्थ व काम या जहाजांवर बसुन ज्या धैर्याने क्रियारुप व्यापार करतो त्या व्यापारात पाप व पुण्यरुपी कर्माचे भांडवल घालतो त्या भांडवलावर चौपट माल घरी येईल  असे जो पहातो एवढे कष्ट ज्या धैर्याच्या योगाने सहन करतो, अर्जुना! त्या धैर्यास राजस धैर्य असे म्हणतात. आता तिसऱ्या तामस धैर्याची लक्षणे सांगतो तरी एकाग्रतेने श्रवण कर. कोळसा जसा काळेपणानेच निर्माण झालेला असतो त्याप्रमाणे ज्या तामस धैर्याचे सर्वात नीच जो तमोगुण त्या गुणाने नामरुपाला येणे घडलेले असते. तमोगूण हा जड प्रकृतीशी संबंधित अज्ञानरुप आणि सर्वामध्ये हीन आहे परंतु त्यालाही गुणपणाचा मान मिळाला आहे. जसे राक्षस सर्वात दृष्ट, पापी असुनही संस्कृत भाषेत त्याला पुण्यजन म्हणतात. (ओवी ७४१ ते ७५०)

सर्व ग्रहामध्ये मंगळ हा निखाऱ्यासमान ताप देणारा आहे. त्यालाही मंगल म्हणजे शुभ असे म्हणत नाही काय? त्याप्रमाणे तमाच्या  ठिकाणी गुण शब्दाचे प्रवृत्तिनिमित्त नसतानाही केवळ गूण हा शब्द प्रवृत्त झाला आहे. अर्जुना! सर्व दोषांचे वसतिस्थान असलेले जे तमोगुण ते कमवुन तमोगुण ज्या नराची मुर्ती बनला आहे, ज्याप्रमाणे पापांचे पोषण केले असता दुख सोडत नाही त्याप्रमाणे जो आळस बाळगुन असतो त्याला निद्रा कधीही सोडत नाही.ज्याप्रमाणे दगडापासुन कठिणपणा कधीही दुर जात नाही त्याप्रमाणे देहरुपी धनावर त्याचे सदैव प्रेम असल्यामुळे त्याला भय कधीही सोडत नाही. कृतघ्नापासुन पाप जसे जाऊ शकत नाही तसे पदार्थाच्या ठिकाणी प्रेम ठेवल्यामुळे ते शोकाचे रहाण्याचे ठिकाण होतो. तो तमोगुणी माणुस रात्रंदिवस मनामध्ये असंतोष धरुन ठेवत असतो. म्हणुन त्याच्याशी स्नेह केलेला असतो. लसणाचा दुर्गंध जसा त्यापासुन दुर जात नाही. अथवा कुपथ्य करणाऱ्याला व्याधी जशी सोडत नाही. त्याप्रमाणे त्या तामसी मनुष्याला मरणाच्या वेळेपर्यत खेद सोडत नाही. तारुण्य,द्रव्य आणि विषयांची इच्छा यांचा तो गर्व वाहतो, म्हणुन त्याचे ठिकाणी मद (उन्मत्तपणा,अहंकार ) ही वास करत असतो. ज्याप्रमाणे अग्नीला उष्णता सोडीत नाही अथवा जातीवंत साप कधी वैर सोडत नाही. त्याप्रमाणे तामस माणसाच्या ठिकाणी गर्व हा अढळ असतो. काळ जसा कोणत्याही वेळी शरीराला विसरत नाही, त्याप्रमाणे तमोगुणी माणुस कधी गर्व सोडत नाही. त्याचेजवळ गर्व अढळ असतो. (ओवी ७५१ ते ७६०)

याप्रमाणे निद्रा, भय, शोक, विषाद व मद हे पाच ही दोष तामसाच्या ठिकाणी धैर्याने धरुन ठेवलेले आहेत, त्या धैर्याला तामस धैर्य असे म्हणतात असे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. याप्रकारे तीन प्रकारच्या बुध्दीनी जो कर्माचा निश्चय केला आहे. तो तीन प्रकारच्या धृतीनी सिध्दीस नेलेला असतो सुर्य उदयाला आल्यानंतर मार्ग दिसु लागतो यावरुन मनुष्यानी चालतो. परंतु ते चालणे धैर्यामुळे जसे घडत असते त्याप्रमाणे बुध्दीही कर्माचे प्रकाशन करीत असते. ते कर्म शरीर, कर्ता, इंदिये आदी पाच गोष्टीमुळे निर्माण होत असत परंतु कर्म घडवुन आणण्याला जे धैर्य लागते ते धैर्य तुला तीन प्रकारानी सांगितले आहे त्या धैर्यामुळे सात्विक, राजस व तामस अशा तीन कर्माची उत्पत्ती झाली, या तीन प्रकारच्या कर्मापासुन जे एक फळ निर्माण होते,त्याला सुख असे म्हणतात. ते देखील कर्माप्रमाणे तीन प्रकारानी जाणावे.तरी फलस्वरुप जे सुख आहे,ते तीन गुणांनी भिन्न झालेले आहे तरी आता उत्तम शब्दांनी सुखाचे वर्णन करतो. परंतु शब्दांची आणि सुखाची शुध्दता कशी आहे ते सांगतो शब्दाच्या मार्गाने सांगु लागलो, तर शब्दाचा मळ लागतो कानाने श्रवण केल्यास कर्णरुप हाताचा मळ लागतो. म्हणुन शब्दाचा व अवधानाचा त्याग करुन अंर्तमुख वृत्तीच्या अंतकरणाने ऐक. (ओवी ७६१ ते ७७०)

असे बोलुन देवांनी तीन प्रकारचे सुख सांगण्यास प्रारंभ केला, आता त्याचे निरुपण करत आहे. देव म्हणाले, हे बुध्दीमान अर्जुना! तीन प्रकारच्या सुखाची लक्षणे सांगतो, असे मी जे प्रतिज्ञेने सांगितले, ते आता श्रवण कर. तरी अर्जुना! ते सुख तुला अनुभवास आणुन देईन, की जे परमात्म्याशी ऐक्य झाले असत जीवाला प्राप्त होते. परंतु योग्य प्रमाणात जसे दिव्य औषध सेवन करावे अथवा रसाची पुटे देवुन जसे कथिलांचे रुपे करावे, अथवा मिठाचे पाणी होण्याकरता दोन-चार वेळेला पाण्याचे हबके द्यावे लागतात. म्हणजे ज्याप्रमाणे त्याचे चितंन सुरु होते जीव या सुखात रमुन जातो, त्या वेळी जीवदशेचे दुख नाहीसे होते, तेच आत्मसुख त्रिगुणात्मक झाले आहे. त्या प्रत्येकाचे आता तुला लक्षण सांगतो.चंदनवृक्षाच्या बुडाजवळ सुगंधामुळे वेटोळे देवुन बसलेल्या सर्पामुळे तेथे जाण्यास कठिण  होते. अथवा पिशाच्चामुळे धनाच्या ठेव्याचे तोंड उघडणे जसे अवघड होते. स्वर्गाचे उत्तम प्रकारचे भोग मिळवण्यासाठी प्रारंभी जसे यज्ञाचे संकट आहे अथवा बालपण जसे विविध प्रकारच्या त्रासामुळे तापदायक होते. हे असो दिवा लावणे झाल्यास प्रारंभी विस्तव पेटविण्यास जसा धुराचा त्रास सहन करावा लागतो,अथवा आरोग्य उत्तम राखण्यासाठी प्रारंभी जिभेला औषधांचा कडवटपणा सोसावा लागतो. (ओवी ७७१ ते ७८०)

अर्जुना, त्याप्रमाणे आत्मसुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी यम-दमादी अवघड साधनाचे दु:ख सोसावे सर्व प्रकारच्या विषयभोगांच्या आसक्तीला दूर करत स्वर्ग व एंहिक संसाराचे मर्यादित कुंपण दूर करत अंत:करणात अशा स्वरूपाचे वैराग्य जेव्हा उत्पन्न होते, तेव्हा आत्मसुखाची प्राप्ती होते. सूक्ष्म अशा ज्ञानाचे कथन व कठोर व्रताचे आचरण करताना जेथे बुध्दी वगैरेचे वाभाडे निघतात, समाधिसुख प्राप्त करून घेण्यासाठी सुषुम्नेच्या तोंडाने प्राण अपानाचे घोट गिळावे लागतात, याप्रमाणे प्रारंभी जेथे अतिशय कष्ट आहेत, शिवाय योगाकरिता सर्वसंगपरित्याग हा अतिशय कठिण आहे. जसे चक्रवाक पक्ष्याच्या जोडप्याचा वियोग घडवून आणला असता; किंवा गायीच्या कासेपासून वासरांस माघारी ओढले असता; किंवा वाढलेल्या ताटावरून भुकेलेल्यास हाकलून दिले असता; अथवा आईपुढून एकुलते एक बाळ काळाने ओढून नेले असता; किंवा माशास पाण्यातून बाहेर काढले असता जे दु:ख होते, त्याप्रमाणेच इंद्रियांकडून विषय सोडवीत असता जणू युगाचा शेवट होणारा प्रलयकाळ आला आहे की काय, एवढे कठिण वाटते, ते वैराग्यसंपन्न दु:ख शूर साधक सहन करतात. ज्या सुखाचा प्रारंभ जसा कठिणपणाच्या त्रासाचा अनुभव देत असतो; परंतु ज्याप्रमाणे क्षीरसमुद्र मंथन करण्याचा त्रास सोसल्यानंतर अमृताचा लाभ देवांना झाला, त्याप्रमाणे प्रारंभी वैराग्यरूपी विष प्राशन करण्यासाठी धैर्यरूपी भगवान शंकर आपला गळा पुढे करतील, तरच ज्ञानरूपी अमृत पिण्याचा सुख-सोहळा दिसेल. कच्ची द्राक्षे इतकी आंबट असतात की, तोंडात टाकल्याबरोबर जिभेला कोलितापेक्षा जास्त चटका बसतो; परंतु तीच द्राक्षे पिकल्यानंतर त्यांना अतिशय मधुर गोडी प्राप्त होते. (ओवी ७८१ ते ७९०)

पुढील भाग