पाठीराखा-साई- २३

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… !  साई माऊली.. कृपेची सावली.. आज देव दिवाळी. बघता बघता तीन वर्षे होवून गेली. परंतु बाबाच्या आज्ञेशिवाय तीन अक्षरेही लिहू शकलो नाही.  ही सारी बाबांचीच किमया दुसरे काय? बाबांच्या भक्तीचे अनुभव येत राहिले. मी त्या सर्व अनुभवांना शब्दबध्द करायचे आश्वासन स्वत:स देत राहिलो. मात्र, ती वेळ आलीच नाही. आज देवदिवाळीच्या दिवशी तीन वर्षानंतर बाबांची आज्ञा मिळाली आणि लिहिण्यास घेतले. नाशिकचे ट्रेनिंग संपवून नवी मुंबई या ठिकाणी पोस्टिंग झाले. नोकरी करण्यात सर्व वर्ष गेले तरी शिर्डी जाणे झालेच नाही. डिसेंबर २०१० च्या महिन्यात एसआरपीएफच्या ट्रेनिंगमध्ये असताना शिर्डीस जाण्याचा योग आला. गोरेगाववरुन बोरिवली बसस्थानकात आलो. तेथून शिर्डीला जाणाऱ्या गाडया सुटतात. त्यानुसार बाबांनी तो योग आणला आणि एका शनिवारी रात्री शिर्डीस जाण्यासाठी निघालो. पहाटे चार वाजता शिर्डीस पोहोचलो. भक्तनिवासात अंघोळपाणी उरकून दर्शनास जाण्याअगोदर चहा घ्यावा म्हणून कूपनसाठी नंबर लावला. थंडीचे दिवस असल्याने एकदम दोन चहा घ्यावे म्हणून दोन कूपन घेवून बाहेर पडलो. तो लगेचच पुढयात एक वृध्द व्यक्ती हजर होती. त्यांनी चहाबाबत विचारले मी लागलीच माझ्याकडील एक कूपन देवून त्यांना चहा घेण्यास सांगितले. काही वेळात ती वृध्द व्यक्ती गायब झाली. मनात वाटले बाबांनीच परीक्षा घेतली. पूजेचे साहित्य घेवून पहाटे साडेपाच पर्यंत बाबांचे दर्शन घेवून मंदिराच्या बाहेर आलो. त्यानंतर द्वारकामाई, चावडी, हाजी अब्दूलबाबांची झोपडी आदीचे दर्शन घेतले. तब्बल २४ वर्षानंतर शिर्डीवारीत द्वारकामाईचे दर्शन मिळाले. यावेळी बाबांची छानशी सफेद रंगाची एक फूट उंचीची मूर्ती खरेदी केली. बाबांच्या या मूर्तीला पश्चिम बंगाल येथे जात असताना बाबांच्या रुपात रेल्वेप्रवासात येवून मला कलकत्यात उतरताना दिलेली २८ मण्यांची लहान रुद्राक्षांची माळ घालत असे. आजही या मूर्तीची घरी विधीवत पूजा सुरु आहे. मात्र त्याच मूर्तीप्रमाणे मुंबई येथून संगमरवरी दगडातील तसलीच मूर्ती घ्यायचा विचार करत होतो. ज्यावेळी हे पक्के ठरत आले त्यावेळी एका रात्री साधारण सप्टेबर ११ च्या शेवटी ते ऑक्टोबर ११ च्या सुरुवातीस बाबा स्वप्नात आले. त्यांचा आवाज आम्ही तीन चार मित्र  स्वप्नात ऐकत होतो. तू ज्या ठिकाणी माझा फोटो ठेवला आहेस त्याच्या खाली मी आहे. ती मूर्तीं तू बदलू नकोस हे स्पष्ट बोलणे ऐकून माझे मित्र आश्चर्यचकीत झाले. ते फटाफट त्यांची जागा सोडून  उठले आणि मी पूजा करत असलेले बाबांची मूर्ती पाहू लागले. सर्वजण उत्साहाने बाबांचे दर्शन घेत होते. मी ही घेतले. बाबांचा एक छोटा फोटो फ्रेम करुन मुंबईतील खोलीवर ठेवून पूजा करायचो तो पावसाने खराब झाला होता. खराब फोटो इतरत्र न टाकता पाण्यात सोडावा. तर मुंबईच्या खाडीतील पाणी घाण व खारे असते त्यामुळे तो फोटो विर्सजन करण्यासाठी घरी आणून देव्हाऱ्यावर ठेवला होता. त्याच फोटोच्या खाली शिर्डीतून आणलेल्या बाबांच्या मूर्तीची पूजा सुरु असते. तीच मूर्ती न बदलण्याबाबत बाबांनी स्वप्नात सांगितले आणि जेथे जातो तेथे मी तुझा सांगाती या उक्तीचा प्रत्यय दिला. स्वप्नातील बाबांच्या या दृष्टांताने मला कितीतरी आनंद झाला. आपण देवपूजा करत असलेल्या देव्हाऱ्यातील मूर्तीमध्ये बाबांचा साक्षात वास होतो यापेक्षा आणखी काय पाहिजे? शिर्डीतून मूर्ती आणताना ती देवळात घेवून जावून पूजा करुन आणली नाही ही खंत मनात होती. बाबांनी सारेच समाधान केले. बाबांच्या भक्तवत्सलतेबद्दल काय लिहावे? मन मे बाबा.. तन मे बाबा.. नजर मे बाबा… सोते है तो सपने बाबा.. जागते रहो तो सामने बाबा… बाबांच्या निस्सिम भक्तीने साईमय झालेल्या माझ्यावर बाबांनी त्यांच्या दृष्टांतांची मोहर उठवली.

 

।। हरि ॐ बाबा ।।