हरीपाठ-भाग-६

अभंग – २६

अरे मना, जे अंतिम सत्य असे मुख्य नामच आहे ते नामच तू दृढ धरुन ठेव. जर तु हरीच्या नामाचा अखंड जप करत राहीलास तर हरीला तुझी दया येईल. ते नाम कोणते? राम, कृष्ण, गोविंद अशी ती नामे तू सतत घेत रहा. काया, वाचा, मनाने पुर्णपणे हरीच्या अधीन होवुन तु या नामाचे नामस्मरण कर म्हणजे तुला हरीची प्राप्ती होईल, नामापेक्षा अन्य कोणतेही तत्व श्रेष्ठ नाही, इतर अन्य उपायाच्या नादाला लागुन तु नामाचा सोपा मार्ग गमावुन बसू नकोस.ज्ञानदेव माऊली म्हणतात – मी बाहय वाचेने मौन आहे परंतु माझे मन कायमच हरीनामाची जपमाळ घेवुन हरीनाम जपत असते परीनामी मी कायमच हरीचा होवुन रहातो. माझ्या काया, वाचा, मनात एक हरीच घर करुन असतो, किंबहुना कणाकणात सामावलेला हरीत मीही सामावुन गेल्याचा भास मला कायम होत असतो.

अभंग – २७

सर्वच शास्त्रे, वेद, पुराणे आदी असा निर्णय देतात, सांगतात की, ईश्वराचे, भगवंताचे नामस्मरणातच सर्व सुख आहे. तेव्हा हे मना, तु सुख म्हणजे काय? हे विचारण्यापेक्षाअशा सर्वच चराचराचे सुखाची खाणच असणाऱ्या नामाचा महीमा अनुभवून या पृथ्वीतलावर स्वर्गसुखाच्या गोडीचा अनुभव घे, एका हरीविना हा दिसणारा आणि ज्याचा आपण प्रत्यक्ष उपभोग घेत आहोत तो लटकाच संसार दिसण्यास गोड आणि लालच दाखवणारा असला तरी त्याच्या आहारी जावू नकोस. लोभ, प्रलोभने दाखवणारा आणि शरीरसुखाची चट लावणारा, जीभेला अनेक स्वाद चाखवयास लावणारा आणि माया,काया, जाया यामध्ये तुला गुरफटून टाकणारा हा संसार क्षण भंगुरच आहे. हे विसरु नकोस. कारण हा संसार तुला कायमच त्याच्या मायाजालामध्ये गुंतवत ठेवतो. आणि शाश्वत सुखापासुन दुर ठेवतो, आणि कायमच जन्म-मरणाचे फेरे मागे लावुन देतो. तरी धर्म,अर्थ,काम यामध्ये ज्याप्रमाणे गोडी दाखवलीस तशी गोडी तु आता मोक्ष मिळवण्यामध्ये दाखव. आणि या जन्म-मरणाच्या चक्रातुन कायमचा मुक्त हो. आणि स्वताच्या अत्स्तित्वाचा शोध घे, या पृथ्वीवर तु का आलास तु कोण आहेस आणि तुझी अतिंम यात्रा काय आहे कोठून आला आहेस आणि कोठे जाणार आहेस, हे सारे तुला कोठेतरी थांबवायचे आहे, कधी असे प्रश्न स्वताला तु विचारलेस का? नाही विचारलेस तर मग विचारुन घे, त्याचे उत्त्र ही तुलाच दयायचे आहे.वेळ आणि काळ कोणसाठी कधीच थांबले नाहीत, ते त्यांचे काम करणार कारण ते कर्माला अधिक महत्व देतात. परंतु त्यांचे कर्म निष्काम असते. काहीतरी कारणमात्र होते आणि होत्याचे नव्हते होते. होणारे होवुन जाते. चालता-बोलता जीव क्षणार्धात निपचीत पडतो ती वेळ काळ कोणालाही सांगत नाही. आणि त्यांना थांबवण्याचे सामर्थ्य आजमितीला कोणाकडेही नाही, कारण आजकालच्या भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या मनुष्याने त्याच्याकडील अध्यात्मिक शक्ती घालवुन टाकल्या आहेत, त्या लयास गेल्या आहेत, तरी आता तु पुर्णपणे सावध होवुन मिळालेल्या वेळेचा लाभ घेवुन, तुला कळाल्यावर तरी हरी-कृष्णनाम घे. कारण ईश्वराचे नामस्मरण करण्याने तुझी तुला नकळत घडलेली असंख्य पापे नष्ट होतात. शरीर थकले हे मान्य कर, अरे एखादया झाडाकडे बघ मग तुला कळेल त्या झाडाची पिकलेली पाने काही कळायच्या आत जमिनीवर पडतात, त्यामुळे वेळ-काळाचा कोणताही भरवसा न ठेवता आणि इंद्रियाच्या मागे आता न लागता आपली वृत्ती नामाच्या मागे लाव आणि मायेच सर्व पाश तोडून टाक. तीर्थयात्रा आणि व्रत नित्यनेम याचा आदर कर तुझे मन शांत ठेव. परोपकारी वृत्तीचा अंगीकार कर, इतर प्राणिमात्रावर दया कर आणि ईश्वराला आपल्या हदयात स्थान दे. ईश्वराचे नाम स्मरण केल्यास तुला मोक्षाचे द्वार प्राप्त होईल. श्रीज्ञानमाऊली म्हणतात – हे ज्ञान माझे थोरले बंधु आणि माझे गुरुवर्य श्रीनिवृत्तीनाथांनी मला अत्यंत उदारमनाने मनात कोणताही भेदभाव न ठेवता विश्वकल्याणासाठीच दिले आहे. मी याचा अंगिकार केला आणि माझा उध्दार करण्यास समर्थ झालो ही माझ्या गुरुचींच महान कृपा. हे कृपासिंधु गुरवर्या श्रीनिवृत्तीनाथा आपण दिलेले हेच ज्ञान मला प्रमाण वाटते.या ज्ञानासाठी आपण मला पात्र समजलात याबद्दल मी आपली कृतज्ञता कशी व्यक्त करणार कारण त्यासाठीचे शब्दाचे भांडार या ज्ञानदेवापाशी कोठून येणार? हे गुरुदेवा या ज्ञानाला आपल्यापासुन कधी दुर करु नकोस. तुझ्यातच माझी समाधी लावुन घे. मला सामावुन घे. जेथे द्वैत असणार नाही असा अद्वैत करुन घेवुन माझी संजीवन समाधी तुझ्यात लय करुन घे.

अभंग -२८

गुरुवर्य श्रीनिवृत्तीनाथांच्या महान कृपेने श्रीज्ञानमाऊलींनी हरीपाठाचे हे अठ्ठावीस अभंग अत्यंत श्रध्देने आणि तन्मयतेने जनकल्याणासाठी रचले आहेत. या अभंगाचे जो भक्त, श्रध्दाळू इंद्रायणी तीरी नित्यपाठ करतो. त्याला अध्यात्मातील ज्ञान प्रापत होते. तो ज्ञानाचा अधिकारी होतो. एकांतात स्वथ-चित्त होवुन आणि तन-मन अर्पुन हरीचे स्मरण करावे. मनुष्याने अशा रीतीने हरीचे नामस्मरण केल्यास त्याच्या संकटकाळामध्ये आणि मनुष्याच्या अंतिमकाळात हरीच त्याचे अंर्तबाहय सदैव रक्षण करतो. हे त्रिवार सत्य आहे. संतजनानी याची प्रचिती घेतली आहे. परंतु जो ही गोष्ट जाणत नाही जो अत्यंत आळशी आहे. जो हरीचे नामच घेत नाही. किवां अशा नामाचा तिरस्कारच करतो. त्याचे प्रारब्धात असे योगच नाहीत.असे म्हणूया आणि कोणत्याही श्रमाशिवायचे कोणत्याही मोलाशिवायचे तसेच घेण्यास अत्यंत सोपे नाम जर कोणी घेणार नसेल तर त्या मनुष्याचा उध्दार श्रीहरी तरी कसा बरे करणार त्याचे कर्म त्याच्याबरोबर असणार आहे, कारण्‍ त्याचा हरीपेक्षा स्वतावर विश्वास आहे. ज्या हरीला पाहीले नाही त्याचे नाम उच्चारण स्मरण करुन कोणाचा उध्दार होईल का? असे ज्याला वाटते, तोच त्याच्या कर्मफलाचा भोग तसेच घेईल. त्याचा उध्दार कसा बरे होणार? श्रीगुरवर्य निवृत्तीनाथांच्या अशा प्रकारच्या बोधवचनांनी श्रीज्ञानमाऊलीना अतिशय संतोष झाला, त्यांचे मन अतिप्रसन्न झाले.

अभंग -२९

प्रत्येक मनुष्याने असा विचार करावा की, हे घरदार कोणाचे आहे? ही स्थावर, जंगम मालमत्ता कोणाची आहे? मी कोण आहे आणि हे नश्वर असणारे शरीर कोणाचे आहे.हा देह म्हणजे आत्मारामाचे घर आहे. मी आणि तु हा विचार विवेकाने शोधावा आणि याच देहात रामकृष्णहरी गोविंद, माधव यांचे स्मरण करावे. ध्यान करावे. ते ध्यान करता-करता ध्याता-ध्यान-ध्येय ही देहाची त्रिपुटी ज्यावेळी एकत्र होईल त्यावेळी या घटाकावेगळा परंतु या देहातच असणारा आत्मा या नामस्मणाने जागृत होवुन सुर्यासारखा सहस्त्र दलचक्रात प्रकाशमान होईल. ज्ञानमाऊली म्हणतात- नेत्रामध्ये ज्याप्रमाणे तेज असते. त्याप्रमाणे देवांच्या, ईश्वराच्या नामामध्ये अत्यंत तेजस्वी, प्रखर तेज असते आणि हे तेज मनुष्यमात्राच्या असंख्य पापाचा नाश करते त्यामुळे तो मनुष्यमात्र या संसारसागरातुन तरुन जातो. असा हा ईश्वरनाम स्मरणाचा अगाध अपंरपार महीमा आहे. म्हणून ज्याला या जन्ममरणाच्या चक्रातुन सुटका करुन घेवुन मोक्ष प्राप्त करावयाचा आहे. त्याच्या साठी ईश्वराचे हे नाम म्हणजे अमृतच आहे. या अमृताची गोडी चाखावी ही ज्ञानमाऊलीची अत्यंत तळमळीची इच्छा असुन त्यांनी ती हरीपाठातुन व्यक्त केली आहे. जो मनुष्य या हरीपाठाचे मनापासुन वाचन, मनन, चितंन करेल तो नक्कीच या संसारसागरातुन तरेल.

रामकृष्ण हरी नारायण हरी, वासुदेव हरी, पांडुरंग हरी, श्रीज्ञानदेवगुरुवर्य श्रीनिवृत्तीनाथ महाराज की जय, श्रीज्ञानदेवमहाराज की जय…

येथे श्री ज्ञानेश्वरमहाराज कृत हरीपाठ संपुर्ण झाला.

माऊलीच्या कृपेने साईभक्त-नारायण विठ्ठल देवरुखकर यांच्याकडुन भक्तासाठी अर्पण.

 

हेची दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा ||

गुण गाईन आवडी | हेचि माझे सर्व जोडी ||

न लगे मुक्ती धन संपदा | संतसंग देई सदा ||

तुका म्हणे गर्भवासी | सुखे घालावे आम्हाशी ||

पुनश्च रामकृष्ण हरी…भक्त पुडंलिकवरदा श्रीहरीविठ्ठल श्रीनिवृत्तीनाथ, ज्ञानदेव, तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय…