अध्याय-६-भाग-१

ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी

सार्थ भगवदगीता अध्याय – 

आत्मसंयमन योग

 श्री ज्ञानदेवांनी भगवदगीतेतील अध्याय मधीलआत्मसंयमन योगया अध्यायातील  ते ४७ संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन ४९७ ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे. परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहेहा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य  कृपाप्रसाद आहे, आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनाचे कोटकल्याण साधावे.  

मग संजय राजा धृतराष्ट्राला म्हणाला, जो अष्टांगयोगासंबंधी अभिप्राय श्रीकृष्ण अर्जुनाला सांगणार आहेत तो आता एकाग्रतेने श्रवण करा. श्री नारायणाने अर्जुनाकरता भोजनाचा उत्तम प्रसंग सहज केलेला होता. त्याच वेळी आम्ही तेथे पाहुणे म्हणुन गेलो होतो खरोखर दैव किती थोर आहे हे कळत नाही  तहान लागलेल्या माणसाने पाणी पिण्यास घ्यावे व त्याची चव घेताच ते पाणी नसुन अमृत आहे हे कळावे तसे आम्हाला आणि तुम्हाला झाले आहे. मिळण्याचा काही संबंध नसताना ब्रम्हज्ञान आपणास प्राप्त झाले.

       त्यावेळी धृतराष्ट्र म्हणाला, या ब्रम्हज्ञानासंबंधी मी काही विचारले नाही, तर मग तु का बरे सांगतोस? या बोलण्यामुळे धृतराष्ट्राचे अंत:करण कसे आहे ते संजयाला कळुन आले.  धृतराष्ट्र आपल्या पुत्रांची हकीकत ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक झालेला दिसला. ते ऐकुन संजय मनातल्या मनात हसला आणि म्हणाला, हे वयोवृध्द    धृतराष्ट्र मोहामुळे वाया गेले आहेत एरवी विचार करुन पाहिले तर श्रीकृष्ण अर्जुनाला  सांगितलेले विचार अतिशय चांगले आहेत परंतु या सुखसंवादाची गोडी याला कशी लागणार ? कारण तो जन्मापासुनच आंधळा आहे. त्यांना कसे दिसणार? हे जर उघड बोलावे तर हा धृतराष्ट्र ताबडतोब माझ्याविषयी मनामध्ये द्वेष धरील.

        म्हणुन तो भीतीने उघड बोलला नाही. परंतु तो संजय मनामध्ये अतिशय संतुष्ट झाला. कारण श्रीकृष्ण-अर्जुनाचा सुखसंवाद त्याला अनायसे प्राप्त झाला. त्या अलौकिक आनंदाच्या तृप्तीने आणि श्रीकृष्णाचा अभिप्राय अंत:करणात दृढ झाल्यामुळे संजयकडुन आता श्रध्दापुर्वक पुढील बोलणे घडेल. हा गीतेतील सहाव्या अध्यायातील प्रसंग अत्यंत चातुर्याचा आहे. ज्याप्रमाणे क्षीरसागरातुन अमृताची निवड झाली.        ( ओवी १ ते १० )

        त्याप्रमाणे हा सहावा अध्याय म्हणजे भगवदगीतेच्या अर्थाचे सार आहे. हा अध्याय विवेकरुपी सागराच्या पलिकडचा किनारा आहे अथवा हा अध्याय म्हणजे अष्टांगयोगाच्या ऐश्वर्याचे उघडलेले ज्ञानानंद भांडारच होय. जो मुळ मायेचे विश्रांतिस्थान आहे, ज्याचे शब्दांनी वर्णन वेदालाही करता आले नाही, जेथुन गीतारुपी वेलीचा अंकुर वाढीस लागला. असा हा सहावा अध्याय सर्व रस-अलंकारांनी युक्त अशा भाषेत सांगितला जाईल. म्हणुन श्रोत्यांनी एकाग्र चित्ताने तो श्रवण करावा.असे माझे प्रतिपादन मराठी भाषेत आहे.

       परंतु गोडीच्या बाबतीत ते  अमृताला देखील प्रतिज्ञेने जिंकु शकेल. अशा तऱ्हेची रस-अलंकार युक्त अमृतमधुर शब्दांची रचना करेन. ज्या भावमधुर कोमल शब्दांच्या मानाने सप्तस्वरातुन निर्माण होणारे स्वर देखील कमी योग्यतेचे दिसतील आणि ज्या शब्दांच्या आकर्षणाने सुगंधाचे सामर्थ्य देखील कमी भासेल. अशा रसमाधुर्ययुक्त शब्दांच्या लोभाने कानांना देखील जिभा निर्माण होतील. या अर्थपुर्ण शब्दांमुळे इंद्रियांमध्ये परस्परांत भांडण लागेल वास्तविक पाहता शब्द हा कानाचा विषय आहे परंतु जिव्हा म्हणेल हा रस माधुर्ययुक्त विषय आमचा आहे तसेच नाकाला असे वाटेल कि हया  शब्दांच्या माध्यमातुन मला विविध प्रकारचे सुवास प्राप्त होतील.

          तर हा शब्द रस आणि डोळे म्हणतील, ही तर रुपाची खाणच उघडली आहे.ज्यावेळी मधुर शब्द जुळून अमृतमय वाक्य मुखातुन प्रगटेल त्यावेळी त्याला जाणण्यासाठी मन बाहेर धावेल आणि बाहू देखील त्या चैतन्यमय शब्दांना आलिंगन देण्याकरता सरसावतील. याप्रमाणे सर्व इंद्रिये आपल्या विषयांच्या भावनेने या  शब्दांना झोबंतील, परंतु ते शब्द सर्वाचे सारखे समाधान करतील. ज्याप्रमाणे एकटाच सुर्य आपल्या हजारो किरणांनी जगत व्यापाराला चालना देतो. ( ओवी ११ ते २० )

         त्याप्रमाणे या भावमधुर शब्दांचे व्यापकपण असामान्य आहे असे जाणावे. या शब्दांचे चितंन करुन त्यातील अभिप्राय जाणणाऱ्यास यामध्ये चितांमणी सारखे अलौकिक गुण दिसुन येतील. हे असो, सारांश ही शब्दरुपी उत्तम ताटे आहेत आणि  त्यामध्ये मोक्षरुपी मिष्टान्ने वाढलेली आहेत निष्कामी लोकांना या ग्रंथरुपी मेजवानीची पर्वणी आहे. या मेजवानीच्या उजेडासाठी नित्य नुतन अशी आत्मज्योतीची चिमणीसारखी दिवटी करुन त्या प्रकाशात जो इंद्रियांना न कळत मेजवानीचे सेवन करतो त्यालाच मोक्षरुप आनंदाचा लाभ होतो.

        शब्दांचे प्रत्यक्ष ज्ञान होण्यासाठी श्रोत्रेइंद्रियाची आवश्कता असते परंतु शब्दांचा जो अर्थ ब्रम्हरुप मोक्ष त्याचा अनुभव होण्यासाठी मन अंतर्मुख करावे लागते वरवर असलेले शब्दांचे कवच फोडले पाहिजे आणि आत असलेल्या ब्रम्हस्वरुपाशी एकरुप  झाले पाहिजे म्हणजे, तरच शब्दश्रवणजन्य सुखासह ब्रम्हसुखात रंगुन जाता येते. असे जर ब्रम्हस्वरुपाशी  एकरुप  होता येईल तरच मी सांगितलेल्या निरुपणाचा उपयोग होईल. नाहीतर मुक्याने सांगावे आणि बहिऱ्याने ऐकावे अशी अवस्था होईल. पंरतु आता हे सर्व असु दे.

          श्रोत्यांना सावध करण्याची आवश्यकता नाही. कारण या ठिकाणी निष्काम भावनेने परब्रम्हाची इच्छा करणारे अधिकार संपन्न श्रोते आहेत. ज्यांना ब्रम्हज्ञानाच्या अनुभवासाठी स्वर्ग व संसार यांच्या प्राप्तीची ओवाळणी केली आहे. अशा विरक्त मानवाशिवाय इतर लोक या अध्यात्मामधील अमृतमधुर गोडी समजु शकणार नाहीत. ज्याप्रमाणे कावळयांना चंद्रातुन प्रगटणाऱ्या आनंददायी किरणांची ओळख नसते त्याप्रमाणे विषयांमध्ये आसक्त असलेल्या लोकांना या प्राकृत ग्रथांतील आशयसंपन्न शब्द कळणार नाहीत आणि शीतल किरणांचा चंद्र हाच ज्याप्रमाणे चकोरांचे आवडते खाद्य आहे त्याप्रमाणे जे अध्यात्मज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ म्हणजे विश्रांतीचे स्थान आहे आणि जे बाहय विषयांतच रमणारे अज्ञानी आहेत त्यांना हा ग्रंथ परक्या गावाप्रमाणे आहे म्हणुन याविषयी विशेष बोलण्याचे कारण नाही.  (ओवी २१ ते ३०)

          प्रसंगाप्रमाणे मी जे बोललो, त्याबद्दल सज्जनांनी मला क्षमा करावी आता श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे सांगितले ते मी सांगेन.ते परब्रम्ह बुध्दीला आकलन करण्यास कठीण आहे परंतु शब्दांत अधिकार संपन्न पुरूषास सापडेल परंतु की सदगुरू श्रीनिवृत्तिनाथांच्या कृपाप्रकाशात परब्रम्ह प्रत्यक्ष पाहीन आणि सर्वाना सांगेन जर अतीद्रिंय ज्ञानाने बळ प्राप्त झाले तर जे दृष्टीला दिसत नाही ते दृष्टीशिवाय स्पष्टपणे पाहता येते जा दैवयोगाने हातात परीस आला तर किमयागारास जे न मिळणारे ते सोने लाखंडात सापडते त्याप्रमाणे जर सदगुरूची मृपा होईल तर प्रयत्नाने काय प्राप्त होणार नाही ? म्हणुन ज्ञानदेव म्हणतात ती कृपा मजवरती अपार आहे.

         त्या सदगुरूंच्या कृपाप्रसादाने मी बोलु शकेन ब्रम्ह हे अरुप असले तरी मी त्याचे स्वरुप दाखवीन. ते अतीद्रिंय खरे परंतु ते इंद्रियांकडुन भोगवीन.हे पहा यश, लक्ष्मी, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सहा गुण ज्याच्या ठिकाणी वास करतात म्हणुन त्या श्रीकृष्णांला भगवान असे म्हणतात जो सर्वसंग परित्याग करणाऱ्यांचा सोबती आहे तो अर्जुनाला म्हणाला आता माझ्या बोलण्याकडे पुर्ण लक्ष दे. हे अर्जुना ! ऐक. या जगात निष्काम कर्मयोगी आणि संन्याशी हे दोन्ही एकच आहेत. ते वेगळे आहेत असे तु मानु नकोस. सुक्ष्म विचार करून पाहीले तर दोन्ही एकच आहेत. संन्यास आणि योग या दोन नावांचा भ्रम टाकुन दिला तर योग तोच संन्यास व संन्यास तोच योग होय. तत्वत: जाणले तर ब्रम्हस्वरुपाच्या ठिकाणी या दोघांत भेदाला अवकाश नाही.(ओवी ३१ ते ४०)

          ज्याप्रमाणे अण्णा, काका अशा वेगवेगळया नावांनी एकाच पुरूषास हाक मारली जाते किवां काही ठिकाणी दोन मार्ग असतात पण दोन्ही एकाच स्थानास आपण पोहोचतो.स्वभावता सर्व पाणी एकच असते परंतु निरनिराळया घागरीत भरले की ते वेगवेगळे दिसते त्याप्रमाणे साधनमार्गाच्या भेदामुळे योग व संन्यास यांचा वेगळेपणा दिसण्यापुरता आहे. हे अर्जुना! ऐक. जो सतकर्माचे आचरण करुन त्याच्या फलाविषयी आसक्त होत नाही तोच या जगी योगी होय. हे सर्व संत-महंताना मान्य आहे ज्याप्रमाणे पृथ्वी सहजपणे अनेक वृक्ष-वेलींना जन्म देते पण तिला कोणत्याही प्रकारचा अभिमान नसतो तसेच वृक्षाला लगडलेल्या फळांची ती अपेक्षा करत नाही.

          त्याप्रमाणे आत्मबोधाच्या आधाराने आणि पूर्वजन्मातील कर्माप्रमाणे ज्या काळी जे विहित कर्म म्हणुन प्राप्त झाले आहे ते सर्व कर्म यथाविधि करुन आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अहंकार निर्माण होउ देत नाही, बुध्दीला फळाच्या अपेक्षेकडे जाउ देत नाही.  हे अर्जुना! ऐक. असा जो पुरूष तोच संन्याशी आणि निसंशय योगीश्वर होय.याशिवाय जो कोणी प्रसंगाने प्राप्त जे विहित कर्म त्याला बंधनकारक म्हणतो आणि त्याग करीन असे म्हणतो, तो पहिले कर्म त्यागता दुसऱ्या कोणत्या तरी कर्माचा आरंभ असतो.जसे अंगाला लावलेला एक लेप धुवून ताबडतोब दुसरा लेप लावावा.त्याप्रमाणे जो आग्रही असतो तो व्यर्थच विवंचना करत बसतो आधीच डोक्यावर ग्रहस्थाश्रमाचे ओझे असते ते ओझे टाकण्यासाठी संन्यास घेतला तर त्याचबरोबर पुन‍: संन्यास आश्रमातील कर्माचे ओझे तो डोक्यावर घेतो.     (ओवी ४१ ते ५०)

       म्हणुन गृहस्थाश्रमात अग्निहोत्र न त्यागता, कर्माचरणाची मर्यादा उल्ल्रघंन न करता योगमुख स्वभावताच आपल्या ठिकाणी मिळणारे आहे  हे अर्जुना! ऐक. जो संन्याशी तोच योगी होय. अशी अनेक शास्त्रांनी एकवाक्यतेची गुढी उभारली आहे. ज्यावेळी कर्म करीत असतानाही फळांचा त्याग करणारी  संकल्प नाहीसा होतो त्या वेळी कर्मसंन्यास योगाचे तत्व अनुभवाच्या तराजुने तंतोतंत प्राप्त होते.

           अर्जुना! योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्याला पोहोचावयाचे असेल त्याने कर्ममार्गाच्या पायऱ्यांनी चढुन जाण्यास चुकू नये तो यम-नियमाच्या पायथ्यापासुन निघुन आसनांच्या पायवाटेने प्राणायामाच्या कडयाने चढुन वर जातो नंतर प्रत्याहार हा तुटलेला कडा लागतो त्यावरुन बुध्दीचेही पाय निसटतात त्या ठिकाणी कडा चढुन जाणारे हठयोगदेखील योगपर्वताच्या माथ्यावर चढुन जाण्याची प्रतिज्ञा मागे घेतात. तरी आत्मस्वरुपाच्या अभ्यासाच्या बळाने चढण्यास आधार नसलेल्या प्रत्याहार रुपी कडयावर वैराग्यरुपी नखी ही घोरपडीसारखी हळुहळ‍ चिकटेल त्यामुळे वर चढण्यास आश्रय लाभेल अशा प्रकारे प्राण व अपान या वायुंच्या वाहनावरुन येउन धारणेच्या विशाल मार्गाने वाटचाल करुन तो ध्यानाचे शिखर गाठतो मग त्या योगमार्गाची धाव पुर्ण होते. मनाची हाव संपुन जाते या अवस्थेत पुढील भविष्यकाळाचा विस्तार बंद पडतो आणि भुतकाळात घडलेल्या गोष्टीचे स्मरण बंद होते अशा ऐक्याच्या भुमिेकेवर समाधी लागते. (ओवी ५१ ते ६०)

पुढील भाग