अध्याय १३ भाग ४

       आईसमोर येताना बाळाला जसा काही विचार करावा लागत नाही, त्याप्रमाणे तो लोकांना आपल्या मनातील गुपित सरळपणांने  सागंतो अर्जुना , पुर्ण विकसित झालेल्या कमळाचा सुगंध जसा सर्वत्र दरवळतो, त्याप्रमाणे आत एक व बाहेर एक असे विचार ज्याच्या मनात नसतात, ज्याप्रमाणे रत्नांचा सुंदरपणा दिसण्या अगोदर त्याचे तेज फाकते, त्याप्रमाणे कर्म करण्याअगोदर ज्याच्या मनाची धाव पुढे असते जो संकल्प करण्याचे जाणत नाही आणि आत्मानंदात तृप्त असतो तो मनाने कशातही लिप्त होत नाही आणि मुद्दाम कशाचा त्याग करत नाही, ज्याची दृष्टी कपटी नसते ज्याचे बोलणे कधी संशयास्पद नसते आणि जो कोणाशीही क्षुद्र बुध्दीने वागत नाही, ज्याची दहाही इंद्रिये शुध्द, सात्विक, निष्काम आतात आणि पंचप्राण सदैव मोकळे असतात, अमृताच्या धारेप्रमाणे ज्याचे अंतकरण सरळ असते, किबंहुना जो या सर्व गोष्टीचे माहेरघर असतो. हे वीर पुरूषा, तो मुर्तिमंत आर्जवच आहे ज्ञानानेदेखील त्या पुरुषाचे ठिकाणीच आपले राहण्याचे घर केलेले असते, हे चतुरांच्या राजा, आता यानंतर तुला गुरूभक्तीचा विचार सांगतो तरी इकडे लक्ष दे. ही गुरूसेवा म्हणजे सर्व भाग्यांची जन्मभुमी होय, जी शोकाने ग्रस्त झालेल्या जीवाला ब्रम्हस्वरुप करते. (ओवी ३६१ ते ३७०)

       ती आचार्य उपासना, सदगुरूसेवा तुला सांगतो तरी अत्यंत एकाग्र चित्ताने श्रवण कर, गंगा नदी जशी सर्व जलाचा साठा घेऊन सागरामध्ये प्रवेश करत असते अथवा श्रुती जशी ब्रम्हस्वरुपात स्थिरावते आणि ब्रम्हाचे सुक्ष्म ज्ञान सांगत-सांगत तेथेच विलीन पावते,  अथवा पतिव्रता स्त्री आपले जीवनव गुणावगुण हे सर्व आपल्या प्रिय पतीस उत्तम प्रकारे अर्पण करते, त्याप्रमाणे ज्याने आपले अंतकरण अंर्तबाहय गंरुकुलाच्या ठिकाणी अर्पित केले आहे आणि स्वताला गुरूभक्तीचे घर केले आहे, गुरुचे घर ज्या देशामध्ये असते त्या देशाच्या स्मृती ज्याच्या मनात तरंगत असतात, विरहीणी ज्याप्रमाणे आपल्या प्रिय पतीला जशी क्षणमात्र विसरत नाही त्याप्रमाणे  जो गुरूच्या देशाला क्षणभर देखील विसरत नाही, गुरुच्या देशाकडुन जो वारा वाहत येतो त्यास समोरा जावुन जो मनोभावे नमस्कार करुन माझ्या घरी राहावयास या, अशी नम्र विनंती करतो सदगुरुच्या शुध्द प्रेमाने वेडा झाल्यामुळे ज्याला त्या दिशेचे बोलणे देखील आवडते आणि जो आपल्या जीवाला गुंरुच्या घरात मिरासदार करुंन ठेवतो, ज्याप्रमाणे वासराला दावे लावलेले असते त्यामुळे त्याचे चिृतत गाईकडे ओढ घेत असले तरी त्याचे शरीर हे गोठयातच असते त्याप्रमाणे केवळ गुरूंनी आज्ञा केल्यामुळे त्याचा देह केवळ त्याच्या गावी असतो, तेव्हा तो मनात विचार कतर असतो की हे गावी राहण्याचे दावे केव्हा सुटू शकेल? गुरूंच्या वियोगामुळे  त्याला प्रत्येक क्षण हा युगापेक्षा मोठा भासत असतो,  अशा विरहाच्या अवस्थेत जर कोणी गुरुंच्या गावाहुन आले अथवा स्वता गुरूंनीच त्याला पाठविलेले असते तर आयुष्य संपत आलेल्यास परत आयुष्य लाभावे. (ओवी ३७१ ते ३८०)

        किवां सुकलेल्या अंकुरावर जसा अमृताचा वर्षाव व्हावा, अथवा छोटया जलाशयातील मासा जसा अफाट सागरात यावा,किवां दरिद्री माणसास जसा अचानक द्रव्याचा ठेवा प्राप्त व्हावा, किवां जन्मापासुन अंध असलेल्या माणसास जशी अचानक दृष्टी यावी आणि त्याने अचानक डोळे उघडावेत, किवां अत्यंत गरीब माणसास जसे इंद्रपद प्राप्त व्हावे, त्याप्रमाणे गुरुंच्या देशाहुन, गावाहुन कोणीही त्याच्याकडे आले तरी आपण इतके वाढलो आहोत असे वाटते की, आकाशाला आपण सहजच कवटाळु शकु, अशी गुरुकुलाविषयी ज्याच्या ठिकाणी आवड पाहशील त्याच्या जवळ ज्ञान सेवा करत असते असे जाणावे, आणि अंतकरण-शुध्दीरुपी आवारामध्ये आराधना करण्यास योग्य अशा आराध्यदैवत श्रीगुरुंची स्थापना करतो आणि  मग काया, वाचा, मन या सर्व भावांसह आपणच होतो, अथवा ज्ञानाच्या आवारात असणाऱ्या आनंदाच्या देवळामध्ये श्रीगुरूरुप शिवलिंगाची स्थापना करुन त्यावर ध्यानरुपी अमृताचा जो अभिषेक करतो, ज्ञानबोधरुपी सुर्याचा उदय होताच बुध्दीची ढाल करुन अष्टसत्विकरुपी लक्ष बिल्वपत्रे श्रीगुरूरुपी त्र्यंबकेश्वराला अर्पण करतो, पवित्र वेळ हेच शिवाच्या पुजनाचे तीनही काळ असे मानुन त्यात देहाभिमानरुपी धुप जाळतो व ज्ञानरुपी दिव्याने ओवाळतो, गुरूशी ऐक्य हाच गुरूला नैवेद्य अर्पण करुन आपण पुजारी बनुन गुरुस श्री शंकरांच्या ठिकाणी मानुन त्यांचे स्तवन करतो. (ओवी ३८१ ते ३९०)

        अथवा आपल्या जीवाच्या शय्येवर आपण पत्नी होवुन गुरू हाच आपला प्रिय पती आहे असे समजुन जो त्यांचा उपभोग घेतो, तो अशी बुध्दी गुरूप्रेमाच्या आवडीने कधी-कधी धारण करतो, कोण्या एका वेळी अंतकरणात प्रेम भरले की त्या प्रेमाच्या भरतीला तो क्षीरसागर असे नाव देतो, त्या ठिकाणी क्षीरसागरावर देहाच्या ध्यानाने जे अमर्याद असे सुख आहे, त्या शेषशय्येवर गुरू हेच भगवान श्रीविष्णु निजलेले आहेत असे मानतो, मग चरणकमलाची सेवा करणारी लक्ष्मी आपणच होतो आणि आपणच गरुड होवुन पुढे उभा राहतो, नाभीकमलातुन आपणच ब्रम्हदेवांच्या रुपाने जन्माला येत असतो आणि श्रीगुरुच्या प्रेमाने व श्रीगुरु हेच विष्णू  आहेत अशा आंतरीक भावनेने त्यांच्या ध्यानाचे सुख अनुभवत असतो, एखाद्या वेळी भावकोमल भक्तीने प्रेमाने गुरुला माता असे कल्पुन आपण लेकरु बनतो, मग मातेच्या स्तनांतुन दुध पिण्याच्या सुखाने मांडीवर लोळतो, अथवा अर्जुना !  चैतन्यरुपी कल्पवृक्षाच्या खाली श्रीगुरू धेनु आहेत अशी भावना करतो आणि आपण तिच्या पाठीस लागलेले वासरु बनतो, कोण्या एकादे वेळी आपण गुरूकृपास्नेहरुपी जलातील मासोळी आहोत अशी कल्पना करतो, श्रीगुरूच्या कृपारूपी अमृताचा वर्षाव होत आहे आणि आपण गुरूसेवावृत्तीरुप रोपटे आहोत असे विविध प्रकारचे संकल्प त्यांच्या मनात  निर्माण होतात, तो श्रीगुरूला पक्षिणी करतो आणि आपण ज्याचे डोळे अजुन पुर्ण उघडलेले नाहीत व पंख फुटलेले नाहीत असे छोटे पिल्लू होतो, त्यांच्या आवडीने अमर्यादपणे कसे आहे हे बघा. (ओवी ३९१ ते ४००)

          तो गुरूला पक्षिणी करतो  आणि आपण छोटे पिल्लू होवुन तिच्या मुखातुन चारा चोचीने घेत असतो, श्रीगुरू हे तारक आहेत आणि आपण ‍त्याची कास धरली आहे असे मानतो, ज्याप्रमाणे सागराला भरती आल्यावर लाटांपासुन लाटा उत्पन्न होतात त्याप्रमाणे हळुवार प्रेमाच्या बळाने गुरू-ध्यानांपासून त्याच्या मनात अनेक भावकोमल तरंग निर्माण होतात, अधिक काय सांगावे?  याप्रमाने तो आपल्या अंतकरणात श्रीगुरूमुर्तीचा भोग घेतो अशी त्याची मानसिक सेवा असते. आता त्याची बाहय सेवा कशी असते ते श्रवण कर तो मनात विचार करतो की मी श्रीगुरूचे उत्तम प्रकारे दास्य करेन त्यामुळे श्रीगुरू कौतुकाने मला काही माग असे म्हणतील अशा उत्तम सेवेने स्वामी श्रीगुरू प्रसन्न होतील तेव्हा मी त्यांना विनंती करेन त्यांना मी म्हणेन, हे गुरूदेवा ! तुमचा जो सर्व सेवक परिवार आहे तितक्या रुपानी मीच एक व्हावे आपल्या उपयोगी पडणारी जेवढी उपकरणे आहेत स्वामी तेवढी माझी रुपे असावीत, त्या उपकरणांच्या रुपाने मीच असावे, अशा प्रकारचा त्यांना मी वर मागीन तेव्हा गुरू हो म्हणतील मग मी त्यांचा सर्व परिवार होईन. गुरूंना जीवनउपयोगी पडणाऱ्या जेवढया वस्तु आहेत त्यापैकी प्रत्येक वस्तू मी जेव्हा होईन त्यावेळी उपासनेचे खरे कौतुक दृष्टीस पडेल, गुरू हे अनेकाचे माऊली आहेत, तरीही गुरूंच्या कृपेने मी आपली शपथ घालून त्यांना फक्त माझी माऊली करुन घेईन.(ओवी ४०१ ते ४१०)

           गुरुंच्या प्रेमाला माझा छंद लावीन, त्यांच्याकडुन एकपत्नीव्रत आचरवीन आणि त्यांचा लोक मला सोडुन जाणार नाही असा क्षेत्रसंन्यास करवीन, वारा कितीही वाहु लागला, तरी चार दिशांच्या आतच वाहतो त्याप्रमाणे गुरूच्या कृपेस सर्व बाजुंनी मीच पिजंरा होईन त्यामुळे गुरुकृपा माझ्याबरोबर जाणार नाही, गुंरुसेवा जी माझी स्वामिनी तिला मी आपल्या गुणांचे अलंकार करीन, त्यांच्या भक्तीला मीच गवसणी होईन आणि त्यांच्या सर्व सेवेला व्यापुन टाकीन, गुरुच्या प्रेमाच्या वर्षाव झेलण्यासाठी मी खाली पृथ्वी होईन, याप्रमाणे तो मनोरथांच्या अनंत सृष्टी निर्माण करत असतो. तो म्हणतो गुरूच्या राहण्याचे घर मी स्वता होवुन त्या घरातील सर्व कामे करीन. गुरु जाण्या-येण्यासाठी जे उंबरे ओलांडतात ते उंबरे मी होईन आणि मी दास होवुन त्या घरातील सर्व कामे करीन, श्री गुरुंच्या पादुका मीच करीन मी त्या पादुका त्यांच्या चरणमकमलांत घालीन, छत्र देखील मी होईन आणि छत्र धरण्याचे कामही मीच करीन, श्रीगुरू चालताना खोलगट जागा, उंच जागा याची जाणीव करुन देणारा श्रीगुरु पुढे चालणारा हुजऱ्या मीच होईन, श्रीगुरूंची झारी धरणारा शार्गिद मी होईन, त्यांना चुळ भरण्यासाठी मी झारी होईन, त्यांच्या हातावर पाणी मी घालीन आणि चूळ टाकण्याचे निर्मळ तस्तही मीच होईन, श्रीगुरूंचे तांबुलपात्र धारण करणारा मी होईन त्यांना विडा मी देईन, त्यांनी चघळलेला विडा मी हातात घेईन, त्यांच्या स्नांनाची देखील सोय मी करीन. (ओवी ४११ ते ४२०)

           श्रीगुरूंचे आसन मी होईन त्यांच्या अंगावर घालायचे अंलकार व नेसायचे वस्त्र मी होईन,आणि चंदनादी उपचार मीच होईन मी आचारी होऊन त्यांना अनेक प्रकारचे उपाहार वाढीन, मी आपलेपणाने श्रीगुरूना ओवाळीन, श्रीगुरू ज्यावेळी भोजनास बसतील त्यावेळी त्यांच्या पंक्तीचा लाभ मी घेईन व भोजनानतंर त्यांना  मी विडा देईन. त्यांनी भोजन केलेले ताट की काढीन त्यांचे अंथरुन मी स्वच्छ करुन ठेवीन, त्यांच्या चरण्कमलांची मी सेवा करीन श्रीगुरु ज्यावर आरोहण करतात ते सिंहासन मीच होईन मीच त्यांची संपुर्ण सेवा करीन, श्रीगुंरूचे मन जिकडे लक्ष देईल ते मी होईन मी असा चमत्कार करेन श्रीगुरुच्या श्रवणरुप अंगणामध्ये शब्दांचे असंख्य समुदाय मीच होईन श्रीगुरूचे अंग ज्या ठिकाणी लागेल ते अंगण मीच होईन, श्रीगुरूची दृष्टी प्रेमकृपेने ज्या ज्या गोष्टी पाहतील त्या त्या सर्व मीच होईन,त्यांच्या जीभेला जो जो रस आवडेल तो तो मीच होवुन विविध प्रकारच्या सुगंधांनी मी त्यांची सेवा करीन,  त्याप्रमाणे बाहय आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या पुर्ण गुरुसेवेला मीच सर्व वस्तुसमुह होवुन व्यापुन राहीन. (ओवी ४२१ ते ४३०)

         जो पर्यत शरीर आहे तो पर्यत मी अशा प्रकारे सेवा करीन आणि शरीराचा नाश झाल्यानंतर माझी सेवा करण्याची बुध्दी आश्चर्यकारक राहील. शरीर पडल्यानंतर शरीराची माती होवुन जाईल, ती माती पृथ्वीमध्ये मिळवीन ज्या ठिकाणी सदगुरूंचे चरणकमल उभे राहतील, माझे स्वामी कौतुकाने ज्या जलाला स्पर्श करतील, त्या जलात माझ्या शरीरातील जल लय करीन, आणि वाऱ्याच्या रुपानेही सेवा करीन, जे दिवे गुरुंच्या मंदिरात जळतात त्या दिव्यात माझे तेज मिळवीन, ज्या आकाशात गुरुंचा परिवार आहे त्या आकाशात माझे शरीर लयास नेईन, मी जिवंत अथवा मृत्यू झालो तरी गुरूंची सेवा सोडणार नाही, अशा प्रकारे माझी गुरूची सेवा सुरूच राहील. अशा प्रकारे जरी गुरूंची सेवा केली तरी माझे मन या सेवेचा कंटाळा करणार नाही. गुरुंची सेवा करताना मन  रात्रंदिवस मोजत नाही, गुरूसेवा थोडी फार म्हणत नाही, तसेच सेवा कितीही झाली  तरी मन सदैव प्रसन्न असते, आपल्या हातुन गुरुसेवेचा व्यापार घडतों या एका पदवीने तो गगनापेक्षा मोठा होतो आणि सर्व प्रकारची सेवा तो एकाच वेळी एकटाच करतो. (ओवी ४३१ ते ४४०)

          असा त्याचा चपळपणा असतो, श्री गुरुंच्या छोटयाशा लीलेवरुन तो आपल्या सर्व जीवीतांचे लिंबलोण उतरुन टाकत असतो, श्रीगुरूंच्या दास्याने कृश झालेला असतो. आणि गुरुसेवेने जो पुष्ठ  होतो, जो आपण स्वता गुरूंच्या आज्ञेने स्वताच रहाण्याचे घर होतो, जो गुरूकुलाच्या योगाने आपणास श्रेष्ठ मानतो, जो गुरूबंधुच्या सौजन्याने अत्यंत सज्जन असतो आणि जो अखंड गुरूसेवेच्या छंदात रंगुन जातो, गुरूपरंपरेने प्राप्त झालेले आचार तेच वर्णाश्रम धर्म आणि गुरूची सेवा हेच हे त्याचे नैमित्तीक कार्य असते. गुरू हेच पवित्र क्षेत्र, गुरू हीच देवता, गुरुच आता माता, गुरूच पिता आणि जो गुरूसेवेवाचुन दुसरा मार्ग जाणत नाही, श्री गुरूचे दार हेच सदैव उच्चार प्रगट होत असतो जो गुरूवाक्याहुन इतर कोणत्याही शास्त्राला हाताने शिवत नाही, ज्या पाण्यास गुरूचरणाचा स्पर्श झाला आहे ते पाणी कसलेही असले तरी त्यात त्रैलेाक्यातील सर्व तीर्थे सामावली आहेत, असे जो मानतो, अकस्मात श्रीगुरूंच्या उच्छिष्ट प्रसादाचक भक्षण करावयास लागले तर त्यासमोर तो समाधिसुख देखील तुच्छ मानतो. (ओवी ४४१ ते ४५०)

           अर्जुना, श्रीगुरू चालत असताना त्यांच्या चरणकमलांच्या मागे जे रजकण उडतात, त्यांस मोक्षसुखाच्या योग्यतेचे समजतो असो, गुरूभक्तीचा महिमा किती बरे वर्णन करावा? गुरूंच्या प्रेमाला अंतच नाही परंतु आतुन प्रगट होणारी माझी बुध्दी हेच या विस्ताराचे कारण आहे, ज्याला या गुरूभक्तीची आंतरिक इच्छा आहे, ज्याला याविषयी कौतुक वाटते, जो या गुरूसेवेवाचुन इतर काही गोड मानत नाही, तो पुरूक्ष तत्वज्ञानाचे स्थान आहे, त्याच्या योगाने ज्ञानाला शोभा येते, फार काय सांगावे?  तो पुरूष देव होतो आणि ज्ञान हे त्याचे भक्त होते, ज्याला अंतकरणापासुन गुरूभक्तीची आवड असते त्याचे घरी जगाला पुरेल इतके ज्ञान उघडया दाराने नांदते. या गुरूसेवेविषयी माझ्या इंतकरणात अतिशय उत्कट अशी इच्छा आहे म्हणुन मी अधिक विस्ताराने वर्णने केले,‍ एऱ्हवी मी गुरूसेवा मरण्याकरिता हात असुनही थोटा आहे डोळे असुनही गुरूसेवेविषयी आंधळा आहे आणि गुरूसेवेविषयी धावाधाव कदण्याविषयी पांगळयापेक्षाही पांगळा आहे, वाचा असुनही गुरूवर्णनाविषयी मुका व ज्यास फुकट पोसावे लागते असा मी खरोखर आळशी आहे, पंरतु माझ्या मनात गुरूसेवेविषयी आत्यंतिक प्रेम आहे, त्याच कारणामुळे मला आचार्य-उपासनेचे व्याख्यान इतके विस्तृत प्रमाणात करणे भाग पडले, असे संत श्री ज्ञानदेव महाराज सांगतात, परंतु ते विस्तृत व्याख्यान आपण श्रोत्यांनी सहन करुन आपली सेवा करण्याची संधी दयावी, आता पुढे गीताग्रंथाचा अर्थ उत्तम रीतीने सांगेन.   (ओवी ४५१ ते ४६०)

          श्रोतेहो, ऐका! भुताचां भार सहन करणारा विष्णुचा अवतार जो श्रीकृष्ण, तो बोलत आहे आणि अर्जुन ऐकत आहे, कापुर ज्या प्रमाणे अंर्तबाहय शुध्द असते अथवा सुर्य जसा आतबाहेर एकसारखा प्रकाशमान असतो, कर्माच्या योगाने ज्याची बाहय शुध्दी झालेली असते, ज्ञानाच्या योगाने ज्याची अंतकरण-शुध्दी झालेली असते. असा जो दोन्ही प्रकारांनी शुध्दत्वाला प्राप्त झालेला असतो, वेदांतील मंत्राचा उच्चार करुन मृत्तिका व पाणी बाहेरुन लावली असता जशी त्याची बाहयशुध्दी होते. मनुष्य बुध्दीने बलवान असेल तर मलिन झालेला आरसा मातीच्या रजकणाने उजळतो आणि धोब्याच्या भट्टीपात्रातील पाणी वस्त्रांचे डाग नाहीसे करते, फार काय सांगावे?  ऐक याप्रमाणे ज्याचे शरीर शुध्द असते आणि मनात ज्ञानदीप प्रज्वलित झालेला असतो म्हणुन आंतरशुध्द असते असे समज. अर्जुना! अंतकरण विवेक, दिपाने शुध्द न होता जो अविवेकाने बाहेरील कर्मे करतो, त्याची सर्वत्र विटबंनाच होते ज्याप्रमाणे मृत मनुष्यास शृंगार करावा, गाढवाला गंगा स्नान घालावे, कडु दुधी भोपळा जसा गुळाने माखावा,ओसाड घराला जसे तोरण बांधावे, उपाशी मनुष्याला जसे अन्नाने लिंपावे अथवा विधवेने कपाळाला कुंकू लावावे आणि भांगात शेंदुर भरावा. (ओवी ४६१ ते ४७०)

            तसेच सोन्याचा मुलामा दिलेले व आतून पोकळ असलेले कळस होत. त्यांच्या वरच्या चकाकीचा काय उपयोग ? रंग देऊन फळ जरी सुंदर दिसत असले , तरी त्या खोटया फळात आत शेण भरलेले असते , त्याप्रमाणे विवेकदीपाने अंत:करण शुध्द नसताना नुसते शारीरिक कर्मे केली तरी ती व्यर्थ होत. वाईट पदार्थाला फार मोठी किंमत लावली तर ती खपत नाहीत. अंमली पदार्थाने भरलेली घागर पवित्र गंगेमध्ये ठेवली असता वरून वाहणारी गंगा पवित्र असते ; परंतु आतील अंमली पदार्थाची घागर अपवित्रच असते. म्हणून अंत:करणामध्ये विवेकदीप सतत प्रज्वलित असावा म्हणजे बाहेरची शुध्दी आपोआपच होईल. पण ज्ञान व कर्मे या दोन्हींनी उत्पन्न होणारी पवित्रता कोठे बरे मिळू शकेल? यासाठी बाह्य शरीर इंद्रियांनी कर्माचे आचरण करून तो शुध्द झाला आहे आणि विवेकज्ञानाने अंत:करणातील अविचाररूपी मळ संपून गेला आहे त्या स्थितीत आतील आणि बाहेरील शुचित्व हा भेद गेलेला असतो. दोन्ही शुचित्वे एकच झालेली असतात अधिक काय सांगावे? त्या अवस्थेमध्ये केवळ शुचित्वच उरलेले असते. ज्याप्रमाणे स्फटिकाच्या घरात प्रज्वलित दिव्याचा प्रकाश आतल्याप्रमाणे बाहेरही चमकत असतो त्याप्रमाणे अंत:करणातील सदभाव देह-इंद्रियांच्या आचरणातून बाहेर प्रगटलेले स्पष्टपणे दिसतात. ज्या कारणाने मनात विकल्प निर्माण होतो ; आणि काम, क्रोध आदी विकार निर्माण होतात आणि पापांची बीजे असणारे राग द्वेष असतात ते निषिध्द कर्मरूपी अंकुराला प्राप्त होतात. असे विषय व अशा गोष्टी जरी प्रत्यक्ष भेटले अथवा कानाने श्रवण केले तरी ज्याच्या मनावर काही परिणाम होत नाही त्याप्रमाणे विशाल आकाशाला मेघांच्या विविध रंगांमुळे कोणत्याही प्रकारची बाधा होऊ शकत नाही. येऱ्हवी इंद्रियांच्या संगतीने जीव विषयांवरती खुशाल लोळत असतो म्हणजे विषयांचा उपभोग घेत असतो ; परंतु कोणत्याही प्रकारच्या विकारांच्या विटाळण्याने तो लिप्त होत नाही. एकादी पवित्र किंवा अपवित्र वाट माणसाने जरी पार केली तरी त्या वाटेवर काही परिणाम होत नाही त्याप्रमाणे विषयांच्या संगतीचा त्याच्यावर काही परिणाम न होता तो जगत असतो. (ओवी ४७१ ते ४८०)

          एखादी तरूण स्त्री आपल्या पतिराजाला व पुत्रालाही आलिंगन देत असते ; परंतु पुत्राला आलिंगन देत असताना तिच्या मनामध्ये कामवासना उत्पन्न होत नाही. त्याप्रमाणे ज्याचे ह्रदय परमपवित्र असते संकल्प-विकल्पाची ज्याला उत्तम प्रकारे ओळख असते, कर्तव्य आणि अकर्तव्य यातील भेद तो स्पष्टपणे जाणतो. पाण्याने हिरा कधी भिजत नाही, आंधणात वाळू कधी भिजत नाही, त्याप्रमाणे कोणत्याही संकल्प-विकल्पाने ज्याचे मन लिप्त होत नाही अर्जुना!  त्याला शुचित्व असे नाव आहे हे शुचित्व ज्याचे ठिकाणी असते तेथे ज्ञान आहे असे जाण. ज्या पुरूषाच्या घरात स्थिरतेने प्रवेश केला आहे तो पुरूष ज्ञानमय आयुष्य जगत असतो. तो देहाने आपल्या स्वभावाप्रमाणे सर्वत्र फिरत असतो ; परंतु त्याच्या मनाची स्थिरता कधी मोडत नाही ज्याप्रमाणे गाय रानावनात चरावयास गेली तरी तिचे चित्त नसून जसे वासराजवळ असते. मृत पतीबरोबर सती जाणाऱ्या स्त्रीचे मन विलासाकडे नसून ते पतीबरोबरच स्थिर असते. अत्यंत धनलोभी मनुष्य दूर प्रवासाला जातो ; परंतु त्याचे मन घरात लपवुन ठेवलेल्या द्रव्याकडे असते त्याप्रमाणे देह सर्वत्र फिरत असला तरी त्याचे मन शांत‍ स्थिर असते. इकडे-तिकडे जात असलेल्या ढगांबरोबर आकाश जसे धावत नाही अथवा गतिमान असणाऱ्या ग्रहांच्या बरोबर जसा ध्रुवतारा फिरत नाही, प्रवास करणाऱ्या माणसाबरोबर वाट जशी चालत नाही तसेच वृक्ष फिरताना दिसले तरी ते कुठे जात नाहीत व येत नाहीत. (ओवी ४८१ ते ४९०)

पुढील भाग