अध्याय-९-भाग-६

           एरवी अर्जुना ! या यज्ञातील हविद्रव्याचा भोक्ता माझ्यावाचून दुसरा कोण बरे आहे? परंतु दुर्बुध्दी असलेले जे लोक असतात, ते मला सोडुन अन्य देवतांना भजतात.ज्याप्रमाणे गंगेचे जल देव व पितर यांच्या नावाने गंगेतच अर्पण करतात, त्याप्रमाणे मीच निर्माणा केलेले हविद्रव्ये भिन्न-भिन्न देवतांच्या उद्देशाने मलाच अर्पण करतात. म्हणुन हे अर्जुना ! ते कोणत्याही प्रकारे मला प्राप्त होत नाहीत, त्यांच्या मनात जी इच्छा असते त्या लोकांत ते जातात. मनाने, वाणीने आणि इंद्रियाने जे इंद्रादि देवतांची उपासना करतात ते शरीर पडताक्षणी स्वर्गात देवशरीर प्राप्त करतात, अथवा श्राध्द, पक्षांदी जी पितरांची व्रते आहेत ती व्रते जे अतंकरणपुर्वक पाळतात, ते मृत्यूनंतर पितृलोकांला जातात. अथवा राक्षस, प्रेत, वेताळ, पिशाच्च, ब्रम्हराक्षस ही ज्यांची परमदैवते आहेत आणि ज्यांनी जारण, मारण, उच्चाटन इत्यादी तामस प्रकारांनी उपासना केली आहे, त्यांच्या देहाचा पडदा दुर होतो,आणि त्यांना भुत-खेतादीकांची गती प्राप्त होते, याप्रमाणे संकल्पनांनुसार त्यांची कर्मे फळाला येतात.ज्यांनी डोळयांमध्ये माझे स्वरुप साठविले , कानांनी माझ्या लीलाकथा ऐकल्या, मनाने माझे चितंन केले वाणीने माझे गुणगान केले, विश्वामध्ये सर्वरुपाने सम प्रमाणात सर्व भुतांच्या ठिकाणी मीच आहे, अशा परिशुध्द भावनेने ज्यांनी मला सर्वागांने नमस्कार केला आणि माझ्याच उद्देशाने दान, पुण्य, तप, जप केले. (ओवी ३५१ ते ३६०)

माझे वर्णन केलेल्या ग्रंथाचे ज्यांनी अध्ययन केले, जे अंर्तबाहय माझ्या योगाने तृप्त झाले, ज्यांनी  आयुष्यभर माझी भक्ती करुन आपले जीवन सार्थकी लावले, “आम्ही हरीचे दास आहोत” असे भुषण मिरवण्याकरीता जे आपला अहंकार जाळुन टाकतात, तसेच ते माझ्या एका लोभाने जगात लोभी आहेत, माझी इच्छा करुन ज्यांची इच्छा पुर्ण होते जे माझ्यावर प्रेम करुन इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. मला जाणुन घेणे हे ज्यांचे शास्त्रे  ( चार वेद, उपनिषद्,  सहा शास्त्रे, अठरा पुराणे, महापुराणे  ) आहेत, जे माझी प्राप्ती होणाऱ्या मंत्रदिचाही जप करतात, याप्रमाणे जे सर्व प्रकारच्या क्रियांनी माझी उपासना करतात, ते मृत्यूच्या पुर्वीच माझ्याशी एकरुप झालेले असतात, तर मग त्यांना मृत्यूनंतर दुसरीकडे कसे बरे जावे लागेल? याप्रमाणे ज्यांनी सर्व जीवन मला अर्पण केले, असे जे लोक माझे भजन करणारे आहेत ते माझ्या सायुज्य गतीस प्राप्त होतात. हे अर्जुना ! भक्ताने आपला जीव अर्पण केल्याशिवाय माझ्यावर त्यांचे खरे प्रेम निर्माण होत नाही, म्हणुन मी इतर कोणत्याही उपायाने प्राप्त होत नाही.मला परमेश्वराचे ज्ञान प्राप्त झाले असे जो म्हणतो त्याला खरोखर ज्ञान प्राप्त होत नाही  मी कृतार्थ झालो असे जो म्हणतो तो कृतार्थ होत नाही, मी मुक्त झालो असे जो म्हणतो तो देखील  खरोखर मुक्त  नाही, अथवा अर्जुना ! जे साधक यज्ञ, दान, इत्यादी साधंनानी किवां तपाने माझी प्राप्ती करुन घेण्यास अहंकार बाळगतात, त्यांची ती साधने गवताच्या एका सामान्य काडी इतकी देखील मला मान्य नाहीत. अर्जुना ! ज्ञानसंपदेपेक्षा श्रेष्ठ असा वेदांवाचुन दुसरा कोणी आहे काय? अथवा शेषा शिवाय हजार तोंडाने  अधिक बोलणारा  कोणी तरी आहे काय? ( ओवी ३६१ ते ३७० )

               तो शेष देखील माझ्या अंथरूणाखाली लपुन बसतो, वेदही “नेति नेति” म्हणून मागे परततात, या विषयी सनकादिक देखील वेडेपिसे झाले  आहेत. सर्व तपस्वी लोकांचा विचांर केला, तर शूळपाणी जगत् गुरु महादेवाजवळ बरोब‍र बसवता येईल असा कोण बरे आहे? परंतु त्या देवाधिदेव महादेवांनी देखील‍ आपल्या तपस्येचा अभिमान त्यागुन माझ्या चरणांपासुन निघणाऱ्या गंगा नदीला आपल्या जटेत धारण केली आहे. अथवा ऐश्वर्याच्य‍ा बाबतीत देवी श्रीलक्ष्मीदेवी यांच्यापेक्षा दुसरे कोणी अधिक आहे बरे?  देवी श्रीलक्ष्मीदेवीच्यां घरी ऋध्दिी -सिध्दी दासी राबत असतात. त्या दासी सहज खेळताना घरकुल करतात, त्याचें नाव जर अमरपुरी असे ठेवले, तर इंद्रादिक देव हे त्यांच्या घरकुलामधील बाहुल्या होत नाहीत काय? खेळणे न आवडल्यामुळे  ऋध्दिी -सिध्दी खेळणे मोडुन टाकतात, त्या वेळी मोठे मोठे इंद्रादिक देव गरीब होतात, त्या देवता मृत्यूलोकात येऊन दुख भोगतात, ऋध्दिी -सिध्दी ज्या झाडाकडे पाहतात, ती झाडे कल्पवृक्ष होतात. अशा प्रकारे जिच्या जवळ राहणाऱ्या, घरातील कामे करणाऱ्या ऋध्दिी -सिध्दी यांचे सामर्थ्य आहे,‍ त्यांची जी मुख्य देवी श्रीलक्ष्मीदेवी आहे ती देखील मला मान्य नाही. हे अर्जुना ! आपणाजवळ असणाऱ्या ऐश्वर्याचा जेव्हा तिने त्याग केला आणि ज्यावेळी ती माझी सेवा करू लागली, तेव्हाच देवी श्रीलक्ष्मीदेवी माझे चरणकमळ प्राप्त झाले, म्हणून जेव्हा श्रीमंतीचा सर्व प्रकारचा थोरपणा त्यागावा, विद्वता जणू विसरुन जावी, जगातील सर्वाबरोबर नम्रपणाने वागावे, त्यावेळी माझे सानिध्य प्राप्त होते. सहस्त्र किरणांनी युक्त सुर्याच्या दृष्टीपुढे चंद्रदेखील लोपुन जातो,तेथे काजव्याने आपल्या तेजाबद्दल का बरे गर्व करावा?  त्याप्रमाणे जेथे श्रीलक्ष्मीदेवीचा मोठेपणा चालत नाही, शूळपाणी जगत् गुरु महादेवाचे तप पुरे पडत नाही, तेथे सामान्य अजागळ माणसे मला कसे बरे जाणु शकतील?                         (ओवी ३७१ ते ३८०)

         याकरीता ईश्वरावरुन आपले शरीर ओवाळुन टाकावे, आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे लिबं लोण करावे आणि संपत्तीच्या अभिमानाची ओवाळणी करुन टाकावी. मग अमर्याद भक्तीप्रेमाच्या उल्हासाने मला अर्पण करण्याच्या निम्मीत्ताने एखादे फळ मग ते कोणत्याही झाडाचे असेना, भक्त माझ्यापुढे जेव्हा ते दाखवतो, तेव्हा ते घेण्याकरीता मी दोन्ही हात पुढे करतो, आणि त्या फळाचा देठही न काढता मी ते आदराने खातो, भक्ताने निस्सीम भक्तीने एखादे फुल मला दिले, तर त्याचा सुंगध घ्यावा परंतु भक्तीप्रेमाने रमुन गेल्यामुळे मी ते तोंडातच घालतो, फार काय सांगावे? फुलच काय कोणत्याही झाडाचे पान देखील मला प्रिय आहे, मग ते टवटवीत असो वा सुकलेले असो, त्या पानामध्ये भक्ताच्या हदयातील सर्व प्रेमभाव भरलेला असतो, हे मी जाणतो, एखादा भुकेलेला माणुस अमृताच्या भोजनाने जसा संतुष्ट होतो त्या प्रमाणे मी  तेवढयाच संतोषाने सुकलेल्या झाडाचे पान खाऊन देखील तृप्त होतो, अथवा एखाद्या वेळेला असे घडते की, झाडाचे एक पान देखील मिळत नाही, अशावेळी पाणी मिळण्याची अडचण तर येणार नाही ना? हे पाणी वाटेल त्या ठिकाणी प्रयत्नाशिवाय सहजपणे उपलब्ध होऊ शकते,  ज्या भक्ताने  भक्तीभावाने  ते       पवित्र-जल सर्वोपचार मानुन मला प्रेमाने अर्पण केले, तर त्या भक्ताने  माझ्याकरीता वैकुंठासम महान मंदिर बांधल्याप्रमाणे आहे आणि कौस्तुभ-मण्यासम तेजस्वी रत्नालंकार अर्पण केल्यासारखे आहे असे मी समजतो. त्या भक्ताने क्षीरसागरासारखी मनोहर दुधाची अनेक शय्यागृहे माझ्यासाठी उभारली आहेत असे मी समजतो. त्या भक्ताने कापुर, चंदन, अगरबत्ती, अशा सुगंधमय उपचाराचा मेरु पर्वतच मला अर्पण‍ केला असे मी समजतो. (ओवी ३८१ ते ३९०)

          अशा भक्ताने माझ्यासाठी साक्षात सुर्यदेवाला दिपमालेवर लावले तसेच माझ्या अतिप्रिय गरुडासारखे वाहन, कल्पवृक्षाचे बगीचे, कामधेनुची खिल्लारे मला अर्पण केली आहेत असे मी समजतो, तसेच त्या भक्ताने माझ्यासाठी नैवद्यास अमृतासम मधुर, विविध पक्कवान्ने वाढली आहेत असे मी समजतो. याप्रमाणे प्रेममय भक्ताच्या जलाच्या थेबांनेही मी संतुष्ट होतो.  हे अर्जुना ! हे अधिक सांगावयास कशाला पाहीजे? तु आपल्या डोळयांनी पाहिले आहेत की मी मुठभर पोहयासाठी सुदाम्याच्या पुरचंडीच्या गाठी सोडल्या आहेत. मी फक्त  भक्ताच्या अतंरगांतील प्रेममय भाव जाणतो, त्या वेळी हा लहान, हा मोठा, असा भेदभाव नसतो. कोणच्याही निस्वार्थ प्रेमाचा स्वीकार करणारे आम्ही अतिथी आहोत. बाकी पान, फुल, फळ याचे अर्पण करणे हे केवळ भजावयाचे निम्मीत्त आहे.या उपचारापेक्षा आमचा संबंध शुध्द भक्तीतत्वाशीच आहे. म्हणुन  अर्जुना ! तू लक्षात ठेव आपली बुध्दी माझ्या स्वाधीन कर आणि आपल्या मनोरुपी मंदिरात माझा विसर पडु देवु नकोस. तु जे जे काही व्यवहार करशील ज्या वस्तूचा उपभोग घेशील किवां विविध प्रकारच्या यज्ञाने यजन करशील किवां सत्पात्रे जी जी दाने देशील अथवा आपल्या सेवकांना उपजिवेकेसाठी वेतने देशील,तसेच तपादी साधने आणि व्रते करशील, या ज्या ज्या क्रिया तुझ्याकडुन स्वभावत: घड‍तील, त्या सर्व क्रिया माझ्या प्राप्तीच्या उद्देशाने मला अर्पण कराव्यात.  (ओवी ३९१ ते ४००)

          मी अमुक एक कर्म केले अशी कर्तृत्वाची जाणीव तु आपल्या मनामध्ये थोडी देखील ठेवू नकोस.सकामतेचा मळ धुऊन परिशुध्द झालेली सर्व कर्मे माझ्या हाती द्यावीत. मग अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेल्या बीजाला अंकुर जसा येत नाही, त्याप्रमाणे मला अर्पण  केलेली कर्मे चांगले अथवा वाईट या रूपाने फळच देत नाहीत. अरे, कर्म शिल्लक राहिले  तर त्यापासून सुखदु:ख भोगावे लागते आणि ते भोगण्याकरिता एखादा जन्म घ्यावा लागतो. कर्तृत्व, अभिमान आणि फलाशा यांचा त्याग करून कर्म जेव्हा मला अर्पण केले जाते , त्या क्षणी जन्म-मरणाचे चक्र थांबते आणि त्याबरोबर जन्मानंतर येणारे सर्व प्रकारचे कष्टही नाहीसे होतात. हे अर्जुना! याप्रमाणे कर्मफलाचा त्याग केल्यास तुला पुढील काळ कठीण जाणार नाही. म्हणून सोपी अशी ही कर्मफलत्याग करण्याची युक्ती तुला दिली आहे. या कर्मफल-त्यागामुळे भविष्यकाळा मध्ये देहाच्या बंधनात गुंतावे लागत नाही. तसेच सुख-दु:खरूपी भवसागरातही बुडावे लागत नाही. माझे जे अक्षय आनंद स्वरूप आहे  त्याच्याशी सहजपणे ऐक्य पावता येते. तो मी कसा आहे म्हणून विचारशील  तर सर्वकाळ मी सर्व भूतमात्रांमध्ये समान रूपाने आहे, जेथे आपला व परका असा कोणताही भेद नाही. जे अशा माझ्या विशाल समरूप स्वरूपाला जाणतात आणि अहंकाराला नाहीसे करून काया, वाचा आणि मनाच्या कर्माद्वारे मला भजतात, ते भक्त देहाने व्यवहार करीत असलेले दिसतात; परंतु त्यांच्या ठिकाणी देहातादात्म्य नसते. ते माझ्याशी एकरूप झालेले असतात आणि मी त्यांच्या ह्रदयात समग्र रूपाने प्रगट झालेला असतो. ज्याप्रमाणे विस्तार पावलेले वडाचे मोठे झाड वडाच्या बीजामध्ये असते आणि ते बीजकण त्या झाडामध्ये असते. (ओवी ४०१ ते ४१०)

          त्याप्रमाणे माझ्यामध्‍ये आणि भक्तामध्ये  बाहेरचा परस्पर नामभेद असतो. आतल्या सच्चिदानंदरूपाचा विचार केला , तर तो भक्त आणि मी एकच आहे. लोकांचे उसने मागून आणलेले दागिने घातले, तर त्या दागिन्यां विषयी घालणारा हा उदासीन असतो, त्याप्रमाणे  भक्तही आपल्या देहाविषयी उदसीन असतात. वाऱ्याच्या झोताबरोबर सुगंध निघून गेल्यावर जसे सुगंधरहित फूल देठावर राहते, त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावल्यावर देहाचे कर्तव्य संपलेले असते; फक्त‍ प्रारब्ध कर्माने देह जिवंत असतो. हे पांडवा! एरवी त्याचा सर्व देह-अहंकार ब्रम्हस्वरूपा मध्ये विलीन होउन जातो आणि देह प्रयोजनशुन्य होतो. याप्रमाणे नि:स्वार्थ प्रेमाने  जे मला भजतात  त्यांना पुन: शरीर प्राप्त होत नाही.  मग ते भलेही कोणत्याही जातीचे असोत. आणि अर्जुना! त्याचे आचरण पाहिले  तर तो वाईट वागणुकीचा शेलका भाग आहे. परंतु त्याने आपले उरलेले आयुष्य नि:स्वार्थ भक्तीच्या चव्हाटयावर खर्ची घातले आहे. अरे! अंत:काळी ज्याची जशी वासना असते, तशी त्याला पुढची गती प्राप्त होत असते. यासाठी ज्याने आपले संपूर्ण आयुष्य शेवटी भक्ती करण्यातच उपयोगी आणलेले असते, तो पूर्वी जरी दुराचारी असला तरी नि:स्वार्थ भक्तीने सर्वोत्तम होता असे जाणावे. जसे महीपुरातच बुडालेला मनुष्य मृत्यू न पावता बाहेर निघाला तो अलिकडच्या किनाऱ्यावर सुखरूप परत आला; म्हणून त्याचे बुडालेपण वाया गेले. त्याप्रमाणे आयुष्याच्या शेवटच्या अवस्थेत जो नि:स्वार्थ भक्ती करतो  त्याचे पाप मुळीच शिल्लक राहत नाही. याकरिता तो पूर्वीचा वाईट कृत्य करणारा असला  तरीपण नंतर जर त्याने पश्चात्तापरूपी तीर्थामध्ये  स्नान केले असेल आणि असे स्नान करून सर्वभावे तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला असेल.(ओवी ४११ ते ४२०)

पुढील भाग