अध्याय १३ भाग १०

          हे सुभद्रापती , या आलेल्या अनुभवावरून तू आपल्या चित्तात जो एक विचार कायम करणार असशील, तो एवढयात करू नकोस कारण यानंतर तुला आणखीन एक-दोन गहन विचार  सांगणार आहे, तु मनाला सुक्ष्म अवधानाने तारण दे आणि मग ते विचार ऐक, असे भगवंत म्हणाले आणि त्यांनी बोलावयास प्रारंभ केला तेव्हा तेथे अर्जुनाने आपले सर्वागं अवधान करुन ठेवले. ज्याप्रमाणे सूर्य पाण्यामध्ये प्रतिबिंबित झालेला दिसला तरी तो पाण्याने ओला होत नाही त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्यास म्हणतात, तो प्रकृतीच्या गुणाने लिप्त होत नाही. हे त्याचे स्वरूप समज असे श्रीकृष्ण म्हणाले.  अर्जुना ! जलामध्ये प्रतिबिंबित होण्यापूर्वी आणि नंतर सूर्य जसाचा तसाच असतो; परंतु अज्ञानी लोकांच्या दृष्टीने त्यांना पाण्यातील प्रतिबिंब सूर्यच भासते. त्याप्रमाणे देहात आत्मा आहे, असे जे काही म्हटले जाते ते खरे नाही. देह निर्माण होण्याच्या पुर्वीपासून तो जेथे होता, तेथेच आहे आणि नंतरही तेथेच असतो. आरशात मुख प्रतिबिंबित झाले असता त्याला आपण प्रतिबिंब असे म्हणतो, त्याप्रमाणे देहात प्रतिबिंब-रूपाने आत्मा असतो. ह्या देहाचा व आत्म्याचा संबंध आहे , असे म्हणणे सर्वथैव व्यर्थ होय. वारा व वाळु याची कधी गाठ मारता येईल काय? अग्नी आणि कापूस ही दोन्ही दोऱ्यात कशी ओवता येतील? आकाशाचा दगडाशी सांधा कसा जोडता येईल? एक मनुष्य पूर्वेकडे निघाला आणि दुसरा पश्चिमेकडे चालला. त्यांच्या भेटीप्रमाणे देहाचा आणि आत्म्याचा संबंध आहे. (ओवी १०९१ ते ११००)

          उजेड आणि अंधकार मृत्यू पावलेला मनुष्य आणि जिवंत मनुष्य यांचा एकमेकांशी जसा काही संबंध नाही, त्याप्रमाणे आत्मा व शरीर यांचाही संबंध नाही असे जाण. रात्र आणि दिवस, सोने आणि कापूस यांचा ज्याप्रमाणे काही संबंध नाही. त्‍याप्रमाणे आत्मा आणि देह यांचा संबंध नाही. कारण हा देह तर पंचमहाभूतांचा बनला आहे, कर्माच्या दोऱ्यात गोवलेला आहे आणि जन्म-मृत्यूच्या चाकावर घातलेला आहे. त्यामुळे तो विविध प्रकारच्या योनींमध्ये फिरत असतो. हा देहरूपी लोण्याचा छोटसा गोळा काळरूपी अग्नीच्या कुंडामध्ये घातला आहे. लहानशा माशीचे पंख हलण्यास जितका वेळ लागतो, तितक्याच क्षणीक वेळात हे शरीर नाहीसे होते. हा देह कदाचित अग्नीमध्ये सापडला, तर त्याची राख होऊन वाऱ्याने ती इकडे-तिकडे उडून जाते. कदाचित हा देह जंगली जनावरांनी खाल्ला तर त्याची विष्ठा होऊन जाते. ह्या दोन प्रकारांतून देह सुटला तर त्या देहाचा अळ्या-किडयांचा तयार होतो. हे अर्जुना ! ह्या देहाचा शेवटी होणारा परिणाम अतिशय वाईट आहे. ह्या देहाची अशी दशा आहे आणि आत्मा तर अनादि असल्यामुळे सहज नित्य व शुध्द आहे. तो आत्मा निर्गुण असल्यामुळे अवयवसहीत किंवा अवयवरहीतही नाही. तो निष्क्रिय नाही अथवा क्रिया करणाराही नाही. तसा तो कृश नाही व स्थूलही नाही. तो निराकार असल्यामुळे दृश्य नाही व अदृश्यही नाही. तो प्रकाशरूप नाही व अंधकाररूपही नाही. तसेच तो थोडाही नाही अथवा अधिकही नाही. तो निर्विशेष असल्यामुळे रिकामा नाही व भरलेलाही नाही. तो कोणत्या गुणविशेषणाने रहित नाही अथवा सहितदेखील नाही. तो साकारही नाही किंवां निराकारही नाही. (ओवी ११०१ ते १११०)

          तो आत्मस्वरुपी असल्यामूळे त्याला सुखही नाही आणि दुखही नाही तो विविध प्रकारचा नाही, तो मुक्तही नाही अथवा बध्दही नाही,  आत्मा हा कोणाचा विषय नाही अथवा तो एवढाही नाही व तेवढाही नाही, कोणीही त्याला सिध्द अथवा निर्माण केला नाही, तो बोलणारा नाही अथवा मुकाही नाही, सृष्टीच्या उत्पत्तीबरोबर तो उत्पन्न होत नाही अथवा सृष्टीच्या विनाशाबरोबर त्याचा नाशही होत नाही, तो “आहे” व “नाही” या दोन्ही स्थितीचे  “लयस्थान” आहे. तो अव्यय असल्यामुळे कशानेही मोजता येत नाही व त्याचे वर्णनही करता येत नाही हा वाढतही नाही किवां कमीही होत नाही, तो विकार पावत नाही आणि घटत नाही. हे प्रियोत्तम अर्जुना ! असे ज्या आत्म्याचे स्वरुप आहे तो देहात आहे असे जे म्हणतात त्यांचे ते बोलणे मठात असलेल्या आकाशाला आकार आहे असे म्हटल्याप्रमाणे व्यर्थ आहे. तसेच त्या आत्म्याच्या अधिष्ठानावर देहाचे आकार उत्पन्न होतात आणि नष्ट होतात, हे उत्तम बुध्दीच्या अर्जुना !  वस्तुस्थीतीने तो आत्मा देहाला घेत नाही अथवा टाकतही नाही, तो जसाच्या तसा असतो. विशाल आकाशाच्या अधिष्ठानावर दिवस आणि रात्र येतात व जातात त्याप्रमाणे अनंत आत्मसत्तेवर अनेक देह येतात व जातात, याची जाणीव ठेव. म्हणुन या शरीरात आत्मा काही करीत नाही आणि काही करवित नाही  तो या देहात स्वयंसिध्द असला तरी शरीराच्या कोणत्याही व्यवहाराने तो आसक्त होत नाही, यास्तव त्याचे स्वरुपात कमी अथवा जास्त काही होत नाही, येवढेच नव्हे तर तो आत्मा देहात राहूनही देहधर्माने लिप्त होत नाही. अर्जुना!  आकाश कोठे नाही ? आणि ते कोणत्याही ठिकाणी प्रवेश करत नाही. परंतु ते आकाश  कशानेही कधीही लिप्त होत नाही. (ओवी ११११ ते ११२०)

          त्याप्रमाणे सर्व देहात आत्मा जरी आहे , तरी देहाच्या संसर्ग-दोषाने तो लिप्त होत नाही. आत्म्याचे हेच खरे लक्षण आहे असे वारंवार जाणावे, क्षेत्रज्ञ आत्मा या देहात राहुनही क्षेत्र हे धर्मरहित आहे.  लोहचुबंकाच्या संसर्गाने लोखंड हालते परंतु लोहचुंबक कधी लोखंड होत नाही. त्याप्रमाणे क्षेत्रज्ञाच्या सत्तेवर क्षेत्राचे व्यवहार होतात परंतु क्षेत्रज्ञ कधी क्षेत्र होत नाही, दिव्यांची प्रज्वलित ज्योत घरातील सर्व व्यवहार चालविते परंतु दिव्याची ज्योत आणि घर यांच्यात गुणसाधर्मता ही कितीतरी वेगळी आहे. अर्जुना!  लाकडात अग्नी असतो परंतु अग्नी लाकुड होत नाही, त्याप्रमाणे क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ आहे परंतु क्षेत्रज्ञ कधी क्षेत्र होत नाही, अशा दृष्टीने आत्मतत्व जाणावे.आकाश व ढग अथवा सुर्य आणि मृगजळ यांत जो भेद आहे तसा देह व आत्मा यातील भेद तु विवेकाच्या डोळयांने पाहशील, या सर्व उपमा राहु दे आता एक उपमा सांगतो ती अशी की जसा एक सुर्य आकाशातुन तिन्ही लोकांना पुन्हा-पुन्हा प्रकाशित करतो, त्याप्रमाणे येथे तो क्षेत्रज्ञ आत्मा , या भासमय क्षेत्राचा प्रकाशक आहे यानंतर आत्मा व देह यासंबंधी शंका घेवु नकोस व काही विचारु नकोस. हे शब्दांच्या खऱ्या स्वरुपाचे मर्म जाणुन घेणाऱ्या अर्जुना ! तीच बुध्दी डोळस, की जी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील भेद जाणते, क्षेत्र व क्षेत्रज्ञ या दोहोंतील अंतर समजण्या करता चतुर मुमूक्षू पुरूष ज्ञानी पुरुषांच्या द्वारी जावुन त्यांची सेवा करतात. (ओवी ११२१ ते ११३०)

         हे सुबुध्दी अर्जुना ! हे समजण्याकरता ते शांतीरुप संपत्ती स्वाधीन करुन घेवुन शास्त्रांच्या दुभत्या गाई घरी पोसतात, म्हणजे शास्त्राचे अध्ययन, मनन, चिंतन करतात. हे समजण्याकरता साधक अष्टांगयोगरुप आकाश चढुन जाण्याची इच्छा मनात धरतात.शरीरादी सर्व गोष्टी गवताप्रमाणे तुच्छ मानतात आणि संताच्या पादुका आपल्या मस्तकावर धारण करतात, अशा प्रकाराच्या ज्ञानप्राप्तीकरता विविध प्रयत्न करुन ते ज्ञान मिळवतात आणि त्यायोगे अंतकरणात निश्चीत होतात, देह व आत्मा यातील अंतर जे खरोखर पाहतात, त्यांच्या ज्ञानावरुन आम्ही आमचे ज्ञान ओवाळुन टाकू. पंचमहाभुतादी अनेक पदार्थाच्या विविध रुपांनी ही मिथ्था प्रकृती पसरली आहे, पोपट ज्याप्रमाणे नळीवर येवुन बसतो आणि नळीच्या संयोगाने वास्तविक पाहता बध्द न होता तो आपल्या कल्पनेनेच बध्द होतोख्‍ त्याप्रमाणे ही प्रकृती क्षेत्रज्ञ पुरूषाला न‍ चिकटताच चिकटलेली आहे असे वाटते, ज्याप्रमाणे माळेवरील मिथ्या सर्पबुध्दी नष्ट झाली म्हणजे माळ  ही ती माळच असे डोळयानी पाहतो, प्रखर प्रकाशात दुरवर पडलेली शिंप पाहुन त्यावर मिथ्या रुप्याचे ज्ञान होते, पण सुक्ष्म विचाराने पाहता रुप्याची भ्रांती जावुन ते शिंपच आहे असे खरे ज्ञान प्राप्त होते. त्याप्रमाणे आत्म्याहुन प्रकृती वेगळी आहे असे जे आपल्या अंतकरणात पाहतात, ते पुरूष ब्रम्हरुप होतात. असे श्रीकृष्ण म्हणतात. (ओवी ११३१ ते ११४०)

          जे ब्रम्ह आकाशाहुन अतिविशाल आहे जे ब्रम्ह प्रकृतीरुप नदीच्या पलिकडचा काठ आहे, जे ब्रम्ह प्राप्त झाले असता भुतमात्रांमध्ये साम्य-वैषम्य उरु देत नाही. ज्या ब्रम्ह्याच्या ठिकाणी प्रकृतीमुळे आलेला आकार नाहीसा होतो जीवपणा जेथे विरुन जातो द्वैत जेथे उरत नाही असे जे अद्वय आहे, अर्जुना !  तेच पुरूष परब्रम्ह होतात की जे आत्मरुपी दुध आणि प्रकृतीरुपी पाणी यांचा निवडा करण्याविषयी राजहंस आहेत.संजय म्हणाला, महाराज असा हा श्रीकृष्णाने जीवांचाही जीव असलेल्या त्या अर्जुनास क्षेत्र-क्षेत्रज्ञ याचा पुर्ण हिशोब दिला, ज्याप्रमाणे एका घागरीतील सर्व पाणी दुसऱ्या घागरीत ओतावे त्याप्रमाणे श्रीकृष्णाने आपल्या ह्दयातील हे ज्ञान अर्जुनाच्या हदयात घातले, वस्तूस्थितीने पाहता येथे कोण कोणास देणारा आहे? कारण अर्जुन हा नराचा अवतार आहे व श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार असल्यामुळे ते दोघेही साक्षात भगवान विष्णुचे  अवतार अंश आहेत, याशिवाय अर्जुनाला “हा अर्जुन आणि मी श्रीकृष्ण आहे”  असे मागे श्रीकृष्णाने सांगितले आहे. संजय मनात म्हणाला, परंतु हे संबंध नसलेले बोलणे राहु द्या. या धृतराष्ट्राने न विचारता मी तरी का बरे बोलत आहे? फार काय सांगावे? श्रीकृष्णाने आपले सर्वस्व आत्मज्ञान अर्जुनाला दिले. तरी सुध्दा महाराज, अर्जुनाने आपल्या मनात तृप्ती मानली नाही, ज्ञानाचे श्रवण करण्याची इच्छा तो अधिकाअधिक वाढवीतच आहे, प्रज्वलित दिव्यामध्ये जो जो तेल घालावे तो तो अधिक प्रकाश पडतो त्याप्रमाणे श्रीकृष्ण जे आत्मज्ञान सांगू लागले ते ऐकण्याची इच्‍छा अर्जुनाच्या मनात वाढतच चालली. जेथे रसयुक्त स्वयंपाक करणारी असुन जेवणारे भोक्तेही आहेत, तेथे मग वाढण्यास व जेवण्यास हात जसा पुढे सरसावतो.   (ओवी ११४१ ते ११५०)

        महाराज, श्रीकृष्णास तसे झाले, अर्जुनाची ऐकण्याची उत्सुकता पाहुन व्याख्यानाला चौपटीपेक्षा जास्त जोर चढला, पावसाला अनुकूल असलेल्या वाऱ्याने मेघ जसे भरुन येतात, अथवा पोर्णिमेच्या चंद्राने समुद्राला जशी भरती येते, त्याप्रमाणे श्रोत्यांच्या श्रवण करण्याच्या उत्सुकतेने वक्त्याचे स्फुरण वाढत जाते. आता यानंतर देव गुणांतीतांची लक्षणे सांगून अर्जुनाच्या निमीत्ताने संपुर्ण विश्व आनंदमय करणार आहेत, तरी लक्षणांचे एकाग्रतेंने श्रवण करावे, असे संजय धृतराष्ट्रास म्हणाला. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अमर्याद आणि विशाल बुध्दीच्या महर्षी व्यासांनी भीष्मपर्वातील शांतिरसाने भरलेली जी कथा सांगितली, तो श्रीकृष्ण-अर्जुन संवाद ओवीबध्द काव्यात, सुंदर भावपुर्ण शब्दांनी स्पष्टपणे सांगून दाखवितो. मी आता शांतिरसाची कथा सांगेन, ती कथा शृंगाररसाच्याही डोक्यावर पाय ठेवु शकेल. ज्या रितीने देशी भाषा विविध अलंकाराना सजविते व अमृताला देखील आपल्या मधुरपणाने मागे टाकील, अशा रितीने अपुर्व उत्कृष्ट मराठी भाषा उपयोगात आणू. ज्या चंद्राच्या उदयापासुन चंद्रकात मण्यास पाझर फुटतो, त्या चंद्रालाही माझ्या भावमधुर बोलांपासुन पाझर फुटेल, तसेच माझे शब्द आपल्या रसातील रंगांच्या मार्धुय शक्तीने नादब्रम्हास झाकुन टाकतील. अज्ञानी माणसाच्या मनात देखील अष्ट सात्विक भावाचा पान्हा फुटेल, आणि ज्ञानी जिज्ञासुला श्रवण केल्याबरोबर समाधीसुखाचा लाभ होईल. असा गीतेचा अर्थ सांगेन की, तो सर्व जगभर पसरुन सर्वाना आनंदकारक होईल. त्यामुळे विचारांचे दैन्य फिटून जाईल, श्रवणाने कानांचे आणि आत्म-साक्षात्काराने मनाचे जगणे सफल होईल आणि जिकडे-तिकडे ब्रम्हविद्येची खाण दृष्टीस पडेल, सर्वाच्या दिव्यचक्षूंस परब्रम्ह तत्व दिसावे, सर्वत्र आनंदाचा सोहळा संपन्न व्हावा, आणि सर्व विश्वात ब्रम्हबोधाचा सुकाळ व्हावा. हे सर्व आता घडावे, असे मी भावमधुर शब्द बोलेन, कारण निवृत्तीनाथांनी माझा स्वीकार केला आहे, एवढयासाठी भावार्थ प्रगट करुन सांगेन.येथ पर्यत मला आमच्या श्रीमंत सदगुरूंनी मस्तकी हात ठेवून सर्व शास्त्रांमध्ये निपुण केले आहे. महाराज, त्या सदगुरुंच्या कृपाप्रसादाच्या सहाय्याने मी जितके बोलेन, तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संतमंडळीमध्ये गीतेचा भावार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे. शिवाय, मी आज तुम्हा संतांच चरणकमलांजवळ बसलो आहे, म्हणुन मला आता काही प्रतिबंध होणार नाही. हे प्रभो, सरस्वतीच्या पोटी मुके बालक कौतुकानेदेखील जन्माला येत नाही, लक्ष्मीच्या हातावर सामुद्रीक चिन्हे कधीच कमी नसतात, त्याप्रमाणे तुम्हा संताच्या जवळ  आल्यावर माझ्या जवळ अज्ञान कसे राहील? मी आता गीतार्थाच्या द्वारा भावपुर्ण नवरसांचा वर्षाव करीन. फार काय सांगावे?  मला गीतेचा भावार्थ सांगण्यास संधी द्यावी म्हणजे देवा !  सदगुरुंराया! ग्रंथ उत्तम रितीने सांगेन,असे श्री निवृत्तीनाथांचे परमशिष्य शिरोमणी परमपुज्य श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात.

सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ श्री ज्ञानेश्वरीचा १३ वा अध्याय श्री भगवंताच्या कृपेने संपन्न !

(श्रीमद भगवद गीता श्लोक १ ते ३४ आणि मराठीत भाषांतरीत ज्ञानेश्वरी ओव्या १ ते ११७०)

पुढील अध्याय