अध्याय १५ भाग २

      अर्जुनाच्या ठिकाणी अशी श्रवण करण्याची अमर्याद इच्छा पाहुन श्रीकृष्णानी त्यानां झालेले समाधान त्याच्यावरुन ओवाळुन टाकले.भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले ते ब्रम्ह या संसारवृक्षाच्या वर आहे त्यास या झाडामुळे ऊर्ध्वपणा प्राप्त झाला आहे, एऱ्हवी ज्याच्या स्वरुपाच्या ठिकाणी ऊर्ध्व, मध्य‍ किवां अधो असा भेद नाही,ज्याचे ठिकाणी दुसरे काही नाही, अशी धर्मशास्त्राची एकवाक्यता आहे, जो कानाला विषय न होणारा नाद, नाकाने सुवास न घेता येण्यासारखी मकरंद आणि जो विषयसेवनाशिवाय स्वरुपता सत्तारुप आहे, मुर्तिमंत आनंदरुप आहे. ब्रम्हयाचे ज्ञान ज्यानां आहे त्यानां ते अलीकडे आहे ज्यानां ब्रम्हयाचे ज्ञान नाही त्यानां ते पलीकडे आहे, तसेच ज्यांना ब्रम्हयाचे ज्ञान आहे त्यानां ते पुढे आहे आणि ज्यानां ब्रम्हयाचे ज्ञान नाही, त्यानां ते मागे आहे,जे ब्रम्ह पाहणाऱ्यावाचुन प्रत्यक्ष स्वरुप आहे जे इंद्रियांना विषय होत नसल्यामुळे अदृश्य आहे. त्या ब्रम्हयाच्या ठिकाणी मायेच्या उपाधीचा संबंध कल्पिला, म्हणजे नामरुपाचा व्यवहार प्राप्त होतो, ज्ञाता म्हणजे ज्ञानाचा आश्रय होय ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय होय यावाचुन जे केवळ ज्ञाप्तिमात्र असते ते ब्रम्ह होय. ते ब्रम्ह आनंदाने परिपुर्ण आहे, ते आकाशरुपी वस्त्रातुन जणु काही गाळुन घेतलेले आहें इतके ते सुक्ष्म आहे, जे नित्य असल्यामुळे कोणाचे कार्य नाही आणि असंग असल्यामुळे कोणाचे कारणही नाही ज्याचे ठिकाणी कोणत्याच प्रकारचा भेद नाही त्यामुळे ज्याला कोणी दुसरे सजातीय किवां विजातीय नाही, त्या ब्रम्हयाच्या ठिकाणी दुसरेपणाचा सापेक्ष असलेला एकपणाही लनाही जे आपणच आपल्याला जाणणारे आहे, अशी जी सत्य ब्रम्हवस्तु आहे ती या संसारवृक्षाचे ऊर्ध्व म्हणजे अधिष्ठान आहे तिच्या ठिकाणी संसारवृक्षाच्या मुळाचे जे अंकुर निघाले ते असे आहेत. परमार्थ सत्तेने जी नसतानाही जिला व्यावहारिक सत्तेचे अस्तित्व आहे ती माया या नावाने प्रसिध्द झाली आहे, वांझ स्त्रीच्या मुलांचे वर्णन जसे करावे तसे तिचे वर्णन आहे. (ओवी ७१ ते ८०)

     जी माया ब्रम्हज्ञानाने बाधित होत असल्यामुळे ‘सत’ नाही आणि जी जगातातील अनेक कार्याच्या रुपाने अनुभवास येत असल्यामुळे जी ‘असत’ नाही. जी ब्रम्हविचाराचे नावही सहन करत नाही, जी विचारापुढे टिकत नही अशा प्रकाराची जी आहे तिला अनादि म्हणतात, जी अनेक तत्वांची शक्तीची पेटी आहे ती जगतरुप अभ्राला आधार होय‍ आणि विश्वाकाररुपी वस्त्राची घडी आहे जी माया संसारवृक्षाचे बीज आहे तसेच जी संसारविस्ताराची आधारभुमी आहे, तसेच जी विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित अशी मशाल आहे. ती माया ब्रम्हवस्तुच्या ठिकाणी जशी नाहीव अशा स्वरुपाने आहे, त्या योगाने ब्रम्हयाच्या तेजाने ती विश्वाच्या रुपाने प्रगट होते असे जाण. जागे असलेल्या मनुष्यास झोप आली असता ती झोप त्याला जशी मुढ करते अथवा काजळी जशी दिव्याच्या प्रकाशाला मंदपणा आणते, अथवा स्वप्नामध्ये एखाद्या मनुष्याजवळ तरुण स्त्री येवुन त्यास जागे करुन तिने आलिंगन दिल्याशिवायच तो ज्याप्रमाणे तिला आलिंगन देवुन सकाम बनतो, त्याप्रमाणे धनंजया, ब्रम्हस्वरुपाच्या ठिकाणी आश्रित असलेली माया आपल्याच आश्रयाच्या ठिकाणी नेणतेपणा आणते आणि ब्रम्हयालाच विषय करते  अशा प्रकार माया विश्वरुप वृक्षाचे पहिले मुळ होय. प्रत्येक जीवाला आपले वास्तव स्वरुप ब्रम्ह आहे हे कळत नाही. तेच शुध्द ब्रम्हाच्या ठिकाणी जगतकारणात्वाचा कंद पुष्ट होण्यास कारण आहे, हे जीवात्म्याला असलेले अज्ञान शुध्द ब्रम्हाला जगतकारणत्व येण्यास कारण आहे, यालाच उानिषदामध्ये बीजभाव असे म्हटले आहे, जेव्हा अज्ञानाने गाढ झोप लागते तेव्हा त्याला मायेचा मोड येतो, असे म्हटले जाते व त्याच मोडापासुन स्वप्न व जागृती ही फले उत्पन्न होतात. अशा प्रकारे वेदान्तामध्ये सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती यांचे निरुपण करण्याची जी परिभाषा आहे त्यावरुन बीज,अंकुर व फळ हा बोध प्राप्त होतो पण ते तुर्तास राहु दे संसारवृक्षाचे मुळ अज्ञान हे आहे असे तु जाण. (ओवी ८१ ते ९०)

     निर्मळ आत्म्याशी मायेचा म्हणजे अज्ञानाचा जो कल्पित संबंध आहे ते संसारवृक्षाचे बळकट असे जाळे आहे, या मायेमुळेच प्रारंभी देह निर्माण होवुन त्याला खालच्या बाजुला अंकुर फुटतात, याप्रमाणे हा संसाररुपी वृक्ष बळकट झाल्यावर त्या अंकुरास झुपके निघतात,त्यात मायेपासुन प्रारंभी महदतत्व हेच एक उमललेले कोवळे लुसलुशीत पान निघते, त्यातुन अहंकार निर्माण होतो, जो अहंकार मुळात एक असुन सात्विक, राजस, तामस असा तीन प्रकारचा होतो, याप्रमाणे महदतत्वापासुन सत्व,रज, तम अशी तीन पाने असलेला खाली विस्तारलेला अहंकाररुपी अंकुर फुटतो. मग तो सात्विक अहंकार बुध्दिरुपी शेडां निर्माण करुन सर्व प्रकारच्या भेदभावांची बुध्दी करतो, त्याच वेळी तो अहंकार मनाची डहाळी विकसितपणाने धारण करतो, या प्रमाणे मुळ बळकट झाल्यावर विकल्परुपी रसाच्या योगाने मन,बुध्दी , चित्त, अहंकार या चार कोवळया डहाळयांच्या रुपाने तो कोंभाला प्राप्त होतो, मग तामस अहंकारापासुन आकाश, वायु, अग्नी, पाणी, पृथ्वी असे पंचमहाभुतांचे पाच सरळ फांदया वेगाने निघतात, त्याप्रमाणे राजस अहंकारापासुंन महाभुत स्वरुप अशी श्रोत्रादी दहा इंद्रिये निर्माण होतात, ती इंद्रिये शरीराच्या आश्रयाने राहणारी इकडे-तिकडे डोलणारी चित्र-विचित्र अशी लुसलुशीत पाने आहेत.त्या पंचमहाभुतांमध्ये परस्पर पंचीकरण झाल्यानंतर आकाशापासुन शब्दाचा अंकुर निर्माण होतो, त्या अंकुराला भेटण्याकरता श्रोत्रेद्रियांची दिडपट वाढ होत असता ती वाढ इच्छेने पेरे करीत असते. (ओवी ९१ ते १००)

     मग अंग व त्वचा ही वेल आणि पाने फुटुन त्याला स्पर्शरुपी अंकुर येतो, त्या वेळी नवनवीन विकारांची खुपच वाढ होते पुढे रुप हे पान फुटते आणि डोळा हा भ्रमाने त्याची गोडी घेण्यासाठी धावतो, तसेच जीभ ही पाण्यापासुन उत्पन्न झालेल्या रसाचा आस्वाद घेण्यास आतुर होत असते व पृथ्वीपासुन गंधाचा अंकुर निघाल्यामुळे नाकाचा शेंडा तिकडे गंधाकडे धावुन हव्यासाचा तळ गाठतो, याप्रमाणे मन, बुध्दी, अहंकार आणि पंचमहाभुते अशी अष्टदाप्रकृती या मायेपासुन निर्माण होते फार काय सांगावे? या आठ अंगांनी हा संसारवृक्ष अधिक प्रमाणात वाढतो, परंतु जसे शिपीवर भासणारे रुप ते आपले अधिष्ठान जी  शिंप तेवढेच भासते, किवां समुद्रावर निर्माण होणाऱ्या लाटा ज्याप्रमाणे समुद्रा यवढयाच असतात त्याप्रमाणे ब्रम्ह हे अज्ञानमुल असलेल्या संसारवृक्षाच्या आकाराचे होते, म्हणुन संपुर्ण जगत हा अज्ञानाचा विस्तार असुन त्यावर त्याचा पसारा भासत असतो, ज्याप्रमाणे स्वप्नात मनुष्य एकटा असुन जे जे काही स्वप्न तो पाहतो ते सर्व आपणच होतो, परंतु हे असो असा हा भ्रममुलक संसारवृक्ष आश्चर्यकारक रीतीने वाढतो, त्या वेळी हया वृक्षाला महदतत्वादी अंकुरापासुन खाली शाखा फुटतात आणि जाणते लोक याला जे अश्वत्थ असे म्हणतात, त्याचेही कारण आता सांगतो, तरी त्याचे श्रवण कर.       (ओवी १०१ ते ११०)

      तरी “श्व” म्हणजे उद्या. उद्यापर्यत देखील या प्रपंचरुपी वृक्षाची एकसारखी स्थिती नाही म्हणुन याला अश्वत्थ असे म्हणतात. ज्याप्रमाणे एक क्षण गेला नाही तोच मेघ विविध रंगांचा होतो किवां वीज देखील काही क्षणच टिकते. कमळाच्या हलणाऱ्या पानावर जसे पाणी थांबत नाही, अथवा व्याकुळ झालेल्या माणसाचे चित्त जसे स्थिर नसते तशीच या संसारवृक्षाची स्थिती आहे, हा क्षणाक्षणाला नष्ट होत असतो, म्हणुन याला अश्वत्थ असे म्हणतात. व्यवहारात अश्वत्थ म्हणजे पिपंळ वृक्ष होय. परंतु या ठिकाणी  श्रीहरीचां तसा अभिप्राय नाही. एरवी व्यवहारात अश्वत्थ म्हणजे पिपंळ असा अर्थ संभवतो परंतु मी या विषयी सुक्ष्म विचार केला आहे ते असो, येथे समाजामध्ये रुढ असलेल्या अर्थाचे काय कर्तव्य आहे? भगवंताला अभिप्रेत असणारा अर्थ समजुन घेतला पाहीजे. म्हणुन आता या संसारवृक्षासंबंधी अलौकिक विचार ऐका, तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्या दृष्टीने शास्त्रामध्ये अश्वत्थ असे म्हटले आहे, आणखी हा वृक्ष अव्यय म्हणजे नित्य या नावाने प्रसिध्द आहे. परंतु त्याचा अविनाशीपणा आतुन असा आहे. ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी मेघ किवां ढग हे वाफेच्या रुपाने शोषण करीत असतात, त्यानंतर पावसाच्या रुपाने ते जमीनीवर पडते त्यानंतर ते नदीपात्रात एकत्र होवुन पुन्हा समुद्रास मिळते त्याप्रमाणे तो समुद्र कधी कमी होत नाही आणि वाढतही नाही. सर्व काळ सर्व बाजुंनी तो भरलेला आहे असे वाटते.      (ओवी १११ ते १२०)

      तसेच या संसाररुपी वृक्षाची उत्पत्ती आणि लय अतिजलद होत असते परंतु त्याचा तर्क करता येत नाही, त्यासाठी सामान्य लोक याला हा अव्यय आहे असे म्हणतात. एरवी दान करणारा मनुष्य एकीकडे दान करुन पैसे खर्च करताना दिसला तरी दुसरीकडे तो दानाने पुण्याचा संचय करीत असतो.त्याप्रमाणे हा वृक्ष जरी नाश होत असला तरी अविनाशी आहे, रथाचे चाक जसे फिरत असताना जसे जमिनीत रुतले की फिरत नाही, परंतु या वृक्षाचे तसे नाही याची एक प्राणीरुपी शाखा वाळली तरी याच ठिकाणी त्याला दुसऱ्या कोटयावधी शाखा फुटत असतात‍ आणि कालांतराने गळत असतात. आषाढ महिन्यात जसे ढग येतात आणि केव्हा जातात हे कळत नाही त्याप्रमाणे या वृक्षाच्या फांदया कधी गळल्या आणि नवीन कधी फुटल्या हे कळत नाही. महाकल्पाच्या शेवटी निर्माण झालेले जगत उन्मळुन पडते आणि कल्पाच्या सुरुवातीला जसे होते, तसेच दुसऱ्या कल्पाच्या सुरुवातीला पुन्हा विस्तार पावते. संहारकारक अशा प्रचंड मोठया वाऱ्याने प्रलयकालाच्या अखेरीस संसारवृक्षाच्या जीर्ण साली गळुन पडतात, तोच कल्पाच सुरुवातीला सृष्टीचे समुदाय उत्पन्न होवु लागतात, ज्याप्रमाणे ऊसाच्या कांडयापासुन कांडे निर्माण होत-होत वाढीची मर्यादा गाठते, त्याच प्रमाणे एका मन्वंतरापुढे दुसरे मन्वंतर येते आणि एका वंशानंतर दुसरा वंश वाढत जातो कलियुगाच्या शेवटी चार युगांची वठलेली सालपटे गळुन पडतात, तोच कृतयुगाची नवीन अतिशय रसरशीत सालपटे जोमाने वाढत जातात, चालु असलेले वर्ष संपुन ते जसे पुढील वर्षास आमंत्रण देते, तसे दिवस जातात कधी आणि येतात कधी हे कळत नाही. (ओवी १२१ ते १३०)

     ज्याप्रमाणे वाऱ्याच्या लहरी एकामागुन एक येत असतात त्यामुळे दोन लहरीमधील सांधा कळत नाही, त्याप्रमाणे शरीररुपी किती डहाळया पडल्या व किती उत्पन्न झाल्या ते कळत नाही, एका देहाचा शेंडा तुटुन पडतो तोच दुसऱ्या देहाचा अंकुर फुटत असतो, त्यामुळे हा संसारवृक्ष अविनाशी आहे असे वाटते. ज्याप्रमाणे वेगाने वाहणारे पाणी पुढे-पुढे जात असते त्यासारखेच दुसरे पाणी त्या प्रवाहाला येवुन मिळत असते त्याप्रमाणेजे असत आहे ते जगाकडून सत मानले जाते किवां डोळयाचे पाते लवते न लवते तोच आकाशात कोटयावधी घडामोडी होत असतात तसेच समुद्रावर लाटावर लाटा येतात त्या नित्य भासतात, त्याप्रमाणे अज्ञानी लोकांना हा संसार नित्य भासत असतो, त्यामुळे त्याला दोन डोळे आहेत, ‍असे लोकांना भासते त्याप्रमाणेच संपुर्ण जगत हे अनित्य असुनही ते नित्य आहे असा भ्रम होतो. जसे  भोवरा अतिवेगाने फिरु लागला म्हणजे तो फिरत असुनही स्थिर आहे असा भास होतो, त्याप्रमाणेच या जगाचा प्रकार आहे, हे अनेक दृष्टात राहु दे एकादा मनुष्य अंधारामध्ये हातात कोलती घेवुन खुप वेगाने फिरवु लागला म्हणजे ती जशी अखंड चक्राकार दिसते, त्याप्रमाणेच हा संसारवृक्ष कधी नाश पावतो आणि कधी उत्पन्न होतो , कधी विस्तार पावतो तेच न कळाल्यामुळे अज्ञानी लोक यास नित्य मानतात, परंतु जो पुरुष या संसारवृक्षाच्या उत्पत्ती व नाशाचा वेग पहातो आणि हा क्षणभंगुर आहे हे जाणतो, त्यास एका क्षणात कोटयावधी घडामोडी होतात याचे ज्ञान असते. या वृक्षाचे मुळ अज्ञान आहे आणि याचे अस्तित्व खरे नाही असा हा संसार वृक्ष जीर्ण सालीचा भासमान आहे, असे ज्यांनी जाणले. (ओवी १३१ ते १४०)

पुढील भाग