पाठीराखा-साई- २१

भक्तवत्सल बाबा

 

हरी ॐ बाबा… ! कलियुगात नामस्मरणाची मोठी महती सांगितली आहे. हरि मुखे म्हणा । हरि मुखे म्हणा ।  पुण्याची गणना कोण करी।। तेणे मुक्ती चारी साधियली संसारात ।। या नरदेहास सार्थकी लावायचे, मोक्ष मिळवून देण्याचे काम हा नामाचा महिमा करु शकतो. कोणतेही धन खर्च न करता कितीतरी मोठा  मार्ग आपणासाठी भगवंताने सांगितला आहे. तूज आहे तूजपाशी, परी जागा चुकलाशी,. जर तुझ्या मुखाने काही न करता एक हरिचे नामस्मरण केले तर चारी मुक्ती साधतील. ते हरिचे नामही सोपे आहे. परंतु, त्यासाठी फक्त तुझ्या मनाची तयारी कर. प्रपंचातून परमार्थ साधता यावा यासाठी बाबांनी भक्तांकडून वेगवेगळया रुपात  भक्ती करुन घेतली. काही भक्तांकडून रामायण वाचून घेतले. काही भक्तांकडून हरिपाठ करुन घेतला. काही भक्तांना विष्णूसहस्त्रनाम वाचण्यास सांगितले.  तर काही भक्तांना डोंगरदऱ्यात वाचनासाठी पाठवले. भक्तांच्या एवढयाजवळ बाबा असत की तुमच्या अंतरात्म्याची हाक जाईपर्यंत अवकाश बाबा स्वत: कोणत्या ना कोणत्या रुपात. आपणाजवळ हजर मिळतील. फक्त तुम्ही त्यांना त्या रुपात ओळखले पाहिजे. मलाही बाबांनी तसा अनुभव दिला. साई सचरित्रात एका भक्तास बाबांनी सांगितले होते. मी तुझ्या घरी जेवायला येईन. त्याचे जेवणाचे निमंत्रण स्वीकारुन त्यास पत्रही पाठवले होते आणि त्यांच्याबरोबर दोनजण असतील हे ही सांगितले होते. त्याप्रमाणे त्या भक्ताच्या कार्यक्रमादिवशी बाबा साधूंच्या वेशात दोघांसह जेवायला गेले. जेवण जेवले व परत सुध्दा गेेले. बिचारा भक्त बाबांची वाट पाहून नाराज झाला. बाबा आले नाहीत याची खंत त्यास लागून राहिली. पुढे शिर्डीस गेल्यानंतर जोगांच्याजवळ त्यांनीही गोष्ट बोलून दाखवली असता बाबांनी त्यास साधूंच्या वेशात जेवून गेेलेल्या तिघांबद्दल सांगितले असता त्या भक्तास गहिवरुन येताना राहिले नाही. मलाही बाबांनी असाच अनुभव दिला. बाबांच्याच आज्ञेने माझ्या घराचा वरचा मजला विनाविघ्न उभा राहिला. त्यामुळे मी त्यास बाबांची द्वारकामाई हे नाव दिले. देवघरातील देव्हाऱ्याची जागा बदलून चौथरा पूर्वाभिमुख केला. बहुतेक महत्वाची काम  कामगुरुवार आणि सोमवारच्या दिवशीच होत गेली. चौथरा पूजनासाठी व मूर्ती ठेवण्यासाठी वेळ नसल्याने गुरुवारी रात्री सहजासहजी एका साईभक्ताची गाठ पडून त्याने शिर्डीतील मूळ फोटो असलेल्या बाबांच्या फोटोची  कॉपी दिली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास या चौथऱ्यावर प्रथम बाबांचा फोटो ठेवून पूजा केली. पुढे देव्हारा चढवून चांदीची बाबांची मूर्ती सोमवारी ठेवली. हळू हळू घराचे काम पूर्ण झाले. माझी सुट्टी ॲडजस्ट करत वास्तू प्रवेशाच्या पत्रिका एक दिवस अगोदर छापल्या. योगायोगे पहिली पत्रिका गोडोली येथील साईबाबांच्या मंदिरात ठेवली गेली. त्यावेळी मी बाबांना नमस्कार करुन दर्शन घेवून वास्तूप्रवेशास येण्याचे निमंत्रण दिले आणि निमंत्रण बाबांना स्वीकारले असल्यास बाबा आल्याचे आपण ओळखायचे हे मनोमन ठरवले. पुढे ती रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजेला वेळ गेला. भटजी उशिरा आले. त्यातच माझी मोटारसायकल ट्राफिक पोलीस उचलून घेवून गेले. कसे तरी बाजार करत रिक्षाने घरी आलो. सोबत भावजी होते. पूजेसाठी मलाच बसायचे असल्याने पूजेचे साहित्य देत देतच तयार झालो. सपत्नीक पूजेस बसलो. भटजी आल्यामुळे पूजा सुरु झाली. ग्रहांची पूजा अगोदर सुरु केली होती. ही पूजा सुरु असताना १५ ते २० मिनिटांनंतर आश्चर्याचा धक्का बसला होता तो सुखद होता. साताऱ्यापासून ८० कि. मी. लांब असलेल्या पाटण येथून माझे मेव्हणे सपत्नीक पूजेस हजर राहिले. अर्थात दोन दिवस अगोदर घाईघाईत त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते तेव्हा त्यांना फक्त माहितीसाठी सांगत असल्याचे बोललो होतो. तसेच घाईगडबडीत येवू नका असे मीच सांगितले होते. काही दिवस अगोदर त्यांच्याकडे साईबाबांचे कॅनव्हॉस पेंटीग करण्यासाठी मी त्यांना बाबांचा एक फोटो दिला होता. तसेच ते पेंटीग सावकाश आणि सुंदर करण्याविषयी सांगितले होते. शिक्षकी पेशा सांभाळत ते पेटींग्ज करतात. गडबडीत बाबांचे पेटींग चांगले येणार नाही याबाबत सांगितले असताना तसेच कार्यक्रमासाठी येण्याचा आग्रह धरलेला नसताना पाटणवरुन ते सपत्नीक एक दिवसाची सुट्टी घेवून सगळयात महत्वाचे म्हणजे साईबाबांच्या पेटींगसह हजर होते. घरात येताच त्यांनी स्वत:च पेटींगवरील कागद बाजुला काढत सार्इंचे दर्शन दिले आणि मी अवाक झालो. एवढया गडबडीच्या माणसाला बाबांनी कसे हातोहात काम पूर्ण करण्यास लावले. दिलेल्या वचनाप्रमाणे वास्तूशांतीसाठी सर्वात अगोदर सत्यनारायणाची पूजा ऐकण्यास पेंटींग रुपात बाबा हजर झाले आणि माझ्या मनातील शंकेचे निरसन केले. कोणत्या रुपात बाबा येणार हे ओळखण्याचा त्रास अजिबात न देता बाबा म्हणाले, तू अंर्तमनाने मला बोलव, साद घाल, तुझ्या प्रत्येक कामात मी येणारच. याचा प्रत्यय दिला. बाबांचे ते पेंटीग आमच्या बाजूस ठेवून सत्यनारायण पूजेचे फोटो काढले. मात्र कॅमेऱ्याच्या फोटो बाबांचे फोटो आले नाहीत. दुसरे काढलेले फोटो रीळ साफ केली नाही. परंतु भक्ताच्या हाकेस बाबा कसे धावतात. दिलेले वचन कसे पूर्ण करतात याचा प्रत्यय मलाही दिला.

 

।। हरि ॐ बाबा ।।