अध्याय १८ भाग ४

       हे वीरश्रेष्ठ अर्जुना!  ज्यांना हा ज्ञानप्रधान संन्यास म्हणजे कर्मत्याग घडतो, ते कर्मभोगापासुन होणाऱ्या दुखापासुन मुक्त होवुन जातात, आणि ज्यानां या ज्ञानप्रधान संन्यासाच्या आधारे सर्वत्र आत्मस्वरुप आहे असे जाणवते तेव्हा त्यांना कर्म हे निराळे आहे असे दिसते का?  भिंत पडल्यानंतर त्यावर काढलेली चित्रे मातीमध्ये मिसळुन जातात अथवा सुर्योदय झाल्यावर रात्र आणि अंधार उरत असतो काय? जर आकृतीच नसेल तर सावली कशाची पडणार? आरशाशिवाय आपला चेहरा कोठे प्रतिबिबिंत होईल काय? मुळ झोपच जर नाहीशी झाली तर स्वप्नाला आरंभ कसा होईल? त्यामुळे स्वप्न हे सत्य आहे का मिथ्या आहे असे कोण म्हणेल? त्याप्रमाणे या ज्ञानयुक्त संन्यासाने अज्ञानच शिल्लक राहत नही तर मग त्या अज्ञानाचे कार्य जे कर्म ते कोणी करावे अथवा त्यागावे? म्हणुन असे पहा की या ज्ञानयुक्त संन्यासात या कर्माच्या गोष्टी करता येतील काय? परंतु आपल्या देहात जर अज्ञान वास करीत असेल तेव्हा कर्तेपणाच्या अभिमानाच्या बळाने जीव शुभ-अशुभ कर्माकडे धाव घेतो आणि तेव्हा वृत्ती द्वैताच्या राज्यावर स्थिर झालेली असते, उत्तम प्रकारे वर्म जाणणाऱ्या हे  अर्जुना!  जसा पुर्व दिशा आणि पश्चीम दिशा यामध्ये खुपच वेगळेपणा असतो तसाच आत्मा आणि कर्म यामध्ये अतिशय वेगळेपणा असतो, आकाश आणि मेघ, सुर्य आणि मृगजळ तसेच पृथ्वी व वायू यांच्यात संबंध असला तरी ते एकमेकांपासुन फार दुर आहेत. (ओवी २६१ ते २७०)

नदीचे पाण्यामध्ये खडक असतो परंतु खडक आणि नदीचे पाणी यामध्ये खुपच फरक आहे. जरी पाण्यात आणि पाण्यावर शेवाळे पसरले असले तरी ते पाण्यापासुन वेगळे असते, काजळीचा दिव्याच्या ज्योतीशी संबंध येत असतो तरी त्या काजळीस दिव्याची ज्योत म्हणता येईल काय? चंद्राला जरी कंलक दिसत असला तरी तो चंद्राशी एकरुप नाही, तसेच दृष्टी आणि नेत्रगोलक यांच्यामध्ये जेवढा  विलक्षण भेद आहे अथवा वाट आणि त्यावरुन चालणारा वाटसरु, ओघाने वाहणारे पाणी तसेच आरसा आणि त्यामध्ये पाहणारा मनुष्य याच्यात जितका भेद आहे, किबंहुना तेवढेच आत्म्यापासुन कर्म भिन्न आहे, परंतु अर्जुना! अज्ञानामुळे ही दोन्ही एकच आहेत असे वाटते. जशी सरोवरातील कमळे त्याच्या उमलल्याने सुर्याचा उदय झाला आहे असे सांगतात, मग त्यातील मकंरदाचा भ्रमर उपभोग घेते. अर्जुना! पुन्हा-पुन्हा हे सांगणे आहे की, आत्म्याच्या  ठिकाणी भासणाऱ्या क्रिया आत्मभिन्न कारणाने घडत असतात. ती कारणे पाच आहेत त्या पाच कारणांचे स्वरुप मी तुला विशद करीत आहे. कदाचित कर्माची ही पाच कारणे तुलाही माहीती असतील, कारण शास्त्रे बाहु उभारुन अगदी उघडपणे ती सांगतम आहेत, वेदरुपी राजाच्या राजधानीत वेदांत सांख्यरुपी मंदिरात निरुपणरुपी नौबतीच्या ध्वनीने ती कारणे गर्जत आहेत, सर्व कर्माच्या उत्पत्तीकरता हीच पाच कारणे  कारण आहेत, या करीता आपल्या आत्म्यास कारणीभुत मानु नये.  (ओवी २७१ ते २८०)

अर्जुना, अशा वर्णनाच्या दंवडीने ती कारणे प्रसिध्दीस आली आहेत म्हणुन ती कारणे तुलाही माहीत असु देत त्याचा तुला उपयोगच होईल, आणि मी हा प्रत्यक्ष ज्ञानरत्न तुझ्या स्वाधीन असताना दुसऱ्याच्या मुखाने ऐकावे, असे दुसऱ्याचे उपकाराचे ओझे तरी तुझ्यावर कशाल पाहीजे ? आपल्या समोर आरसा असल्यावर आपले रुप पाहण्यासाठी लोकांना माझे रूप कसे दिसते ते सांग? अशी कशासाठी विनंती करायची? भक्त ज्या भावनेने मला जेथे पाहील त्या भावनेप्रमाणे ती तेथे तसा होत असतो असा तो मी परंतु तुझ्या हातातील मात्र खेळणे झालो आहे, म्हणजे तुझ्या स्वाधीन झालो आहे, असे बोलत असताना स्वता देव (श्रीकृष्ण) मात्र भानावर राहीले नाहीत आणि त्याच वेळी आंनदामुळे अर्जुनाचेही देहभान हरपले. चांदण्याचा भार अंगावर पडला असता सोमकांत मणी रुपी डोगंर सुध्दा विरघळुन सरोवर होतो त्याप्रमाणे सुख आणि अनुभव या द्वैताच्या भिंती पाडुन सुखच अर्जुनाच्या आकृतीचे दिसु लागले. तेव्हा (श्रीकृष्ण) देव समर्थ असल्यामुळे त्यांना आठवण होवुन त्यांनी सुखाच्या सागरात बुडणाऱ्या अर्जुनाला अलगद वर काढले. अर्जुन एवढा मोठा श्रेष्ठ पण बुध्दीच्या विस्तारासह त्यात बुडाला, एवढे त्याला सात्विक प्रेमाचे भरते आले होते. देवाने त्याला आंनदसागरातुन वर काढले, देव म्हणाले, हे अर्जुना, तु देहभानावर ये आणि आपण कोठे आहोत ते बघ. तेव्हा अर्जुनाने उसासा टाकुन आपण देहभानावर आहोत असे मान हलवुन सुचविले.                     (ओवी २८१ ते २९०)

अर्जुन म्हणाला, देवा तु जाणतोसच की, तुझ्याहुन वेगळा देह धारण करुन मी तुझी संगती करण्यास कंटाळलो आहे, मी मुळ ब्रम्हस्वरूपी पुर्ण ऐक्याला येवु पहात आहे, माझ्या इच्छेप्रमाणे आपण मला जे ब्रम्हज्ञान देत आहात तर मग लालसेने माझ्या जीवाच्या आड पुन्हा पुन्हा द्वैत का बरे घालत आहात?  तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तुझे बोलणे एका दृष्टीने खरे आहे तुझे आणि माझे ऐक्य आहे हे तुला समजलेच नाही, अरे अर्जुना! चंद्र आणि चांदणे  याचां कधी वियोग होतो का? आणि मनातील गुढ ऐक्य भाव तुला उघड बोलुन दाखविण्यास आम्ही भीत आहोत सदैव प्रेम करणारा मनुष्य एखाद्या वेळी रागावला असता जे प्रेम अधिक वाढलेले असते, तेच माझे प्रेम तुझ्यावर आहे. वास्तविक पहाता परमार्थता तुझ्या-माझ्यात पुर्ण ऐक्य असले तरी परस्परांच्या मनात द्वैताच्या खुणेने तुझ्या-माझ्यात भेद आहे, वेगवेगळे बोलणे आहे परंतु अद्वैत ब्रम्हभावामध्ये मीही नाही आणि तुही नाहीस, तेव्हा या ऐक्याविषयीचे बोलणे राहु दे. अर्जुना, सर्व कर्मे आत्म्यापासुन कशी भिन्न आहेत तो विषय आता मी बोलत होतो, तेव्हा अर्जुन म्हणाला, माझ्या मनात स्वभावता जो विषय होता तोच देवाने सांगण्यास आरंभ केला आहे, सर्व कर्माचे बीज असलेली पाच  कारणे  तुला सांगेन अशी जी तुम्ही प्रतिज्ञा केली. आत्म्याशी कर्माचा येथे कोणत्याही प्रकारे काहीही संबंध नाही हे जे तुम्ही बोलला आहात, तो माझ्या अत्यंत आवडीचा विषय आहे, कृपा करुन तो मला सांगा, अर्जुनाच्या या बोलण्याने विश्वेश्वर श्रीकृष्ण अतिशय संतुष्ट होवुन म्हणाले, या विषयाचे अंतकरणापासुन श्रवण करण्याविषयी धरणे देवुन बसेल, असा जिज्ञासु तरी कोठे मिळणार? (ओवी २९१ ते ३००)

अर्जुना! तुला ते खरोखर सोप्या भाषेत सांगणार आहे, कारण माझ्यावरील तुझ्या आत्यंतिक प्रेमामुळे मी तुझा ऋणी आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुम्ही मागील गोष्टीचा अभिप्राय विसरलात काय?  मी आणि तू अशाप्रकारचे  द्वैत आपण बोलण्यात का बरे आणता?  त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, बरे आता ते राहु दे, जी गोष्ट मी तुला सांगायला सुरूवात केली होती ती सांगतो तरी आता एकाग्र चित्ताने ऐक. हे धर्नुधरा, खरोखर सर्व कर्माची उभारणी आत्मतत्वाच्या बाहेर असलेल्या  पाच कारणांनी होते. आणि ज्या पाच कारणाच्या योगाने जो कर्माचा अफाट पसारा निर्माण होतो तीच पाच कारणे त्या कर्माचे हेतु असतात. या कारणावाचुन आत्मतत्व उदासीन आहे. ते निमित्तकारण देखील नाही व उपादानकारण देखील नाही, अथवा कर्माचे ओझे अंगावर घेवुन आलेले सहकारी कारणही नाही. शुभ अथवा अशुभ अशा प्रकारे होतात की रात्र व दिवस आकाशामध्ये उत्पन्न झाले तरी आकाश हे त्यापासुन वेगळे असते. सागराचे पाणी, सुर्याचे तेज, आणि अग्नीचा धुर या तिघांचा वायुशी संगम झाला म्हणजे आकाशामध्ये ढग निर्माण होतात, परंतु आकाशाला या गोष्टीची काही जाणीव नसते. अनेक लाकडे एकत्र जोडुन  नाव तयार केली जाते, नावाडयाकडुन ती नाव वल्हविली जाते आणि अनुकुल वाऱ्याने ती पाण्यावरुन चालविली जाते, परंतु नदीतील जल मात्र केवळ साक्षीभुत असते. मातीचा एखादा गोळा घेवुन तो चक्रावर ठेवुन दांडयाने चाक फिरवले म्हणजे त्यातील मातीपण जावुन भांडे तयार होते. (ओवी ३०१ ते ३१०)

त्या चिखलाच्या गोळयाचे भांडे बनविण्याचे काम कुंभार करत असतो, आता या चिखलाच्या गोळयाचे भांडे बनविण्यात एका आधाराशिवाय पृथ्वीचे काय बरे खर्च होते, याचा विचार कर?  पण हाही दृष्टांत राहु दया, असो जगातील सर्व लोकांचे कर्म सुर्याच्या प्रकाशात होत असतानाही सुर्य ज्याप्रमाणे त्या साऱ्यापासुन अलिप्त असतों, त्याप्रमाण ते पाच हेतु एकत्र आल्यावर त्या पाच कारणांकडुन कर्मवेलीची लावणी होते, आत्मा या कारणांहुन व क्रियेहुन वेगळा आहे. आता ती पाच कारणे उत्तम प्रकारे वेगवेगळी वर्णन करुन सांगतो, मोती ज्याप्रमाणे तंतोतंत वजन करुन घ्यावेत. त्याप्रमाणे कर्माच्या कारणांनी सर्व यथार्थ लक्षणे तूला सांगतो,ती श्रवण कर, त्या कर्माच्या उत्पत्तीविषयी “देह” हे “पहिले” कारण होय, असे मी म्हणतो. या देहाला अधिष्ठान असे म्हणतात, याचे कारण म्हणजे भोक्ता जो जीव तो आपल्या सुखदुखादी भोगांसह या देहात वास्तव्य करतो,म्हणुन देहास अधिष्ठान असे म्हणतात. दुसरा अर्थ असा की, ही प्रकृती पाच ज्ञानेद्रिंये आणि पाच कर्मेद्रियें यांच्या दहा हातांनी रात्रदिवस खुप कष्ट करुन जी सुखे-दुखे पुरुषाला मिळवुन देते. ती सुखे-दुखे भोगण्यासाठी जीवाला दुसरे ठिकाण नाही, म्हणुनही देहाला “अधिष्ठान” असे म्हणतात, हा देह प्रकृती, महत्व, अहंकार, पंचतत्व, पंचमहाभुते, पंचज्ञानेद्रियें, पंचकर्मेद्रिंये आणि मन या चोवीस तत्वांचे वस्तीस्थान असुन बंध व मोक्षाचा उलगडा या ठिकाणी होतो, अधिक काय सांगावे? अर्जुना, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना देह आधार आहे. म्हणुन या   देहाला “अधिष्ठान” हे नाव योग्य आहे. (ओवी ३११ ते ३२०)

कर्माच्या उत्पत्तीविषयी जसे देह हे पहिले कारण आहे त्याप्रमाणे “कर्ता” हे “दुसरे” कारण होय. आणि या कर्त्याला म्हणजेच पर्यायाने आपल्या जीवाला “चैतन्याचे प्रतिबिबं” असे म्हणतात.  मेघांने भरलेले आकाश जलाचा वर्षाव करते आणि ते जल  पृथ्वीवर डबक्याच्या आकाराचे होते,गाढ झोपेत असलेला राजा स्वताची आठवण विसरुन मी दारिद्री आहे असे त्याला स्वप्न पडते त्यावेळी स्वप्नातील दरिद्रीपणाशी तो एकरुप होतो. त्याप्रमाणे ब्रम्हच अंतकरणमध्ये मिथ्या जीवाच्या रुपाने  आभासित होते व अहंकाराने स्थुल अशा देहादिकांच्या रुपाने प्रगट होते. ज्या देहात आत्मस्वरुपाचा विसर पडतो तेथे चैतन्य जीव या नावाने प्रसिध्द आहे. या आभासरुपी जीवाने देहाबरोबर सर्व प्रकारे सर्व व्यवहाराविषयी जणु करार केला आहे.  वस्तुता देह-इंद्रियांची सर्व कर्मे प्रकृती करते, परंतु जो ती कर्मे मी केली आहेत असे भ्रमामुळे म्हणतो म्हणुन जीवाला तो कर्माचा कर्ता असे म्हणतात. ज्याप्रमाणे एकच दृष्टी पापण्यांच्या केसातुन बाहेर पडली असता ती दृष्टी जरी अखंड असते परंतु चवरीच्या केसाप्रमाणे चिरलेली वाटते. अथवा घरातील दिव्याचा प्रकाश एकच असतो परंतु तो घराच्या वेगवेंगळया खिडक्याच्या भेदाने अनेक आहे असे वाटते. अथवा एकच कलाकार पुरुष शृंगार, वीर, करुणा, आदी नवरसाचे अविर्भाव प्रगट करु लागला म्हणजे तो जसा नऊ प्रकाराचा वाटतो त्याप्रमाणे बुध्दीत असलेले ज्ञान एकच असुन पंच ज्ञानेद्रियांच्या रुपाने देहाच्या बाहेर जे काही प्रगट होत असते. (ओवी ३२१ ते ३३०)

हे राजपुत्र अर्जुना, ती मनुष्य देहातील “वेगवेगळी इंद्रियें” या कर्माचे “तिसरे” कारण आहे. असे जाण. ज्याप्रमाणे पुर्वे दिशेस वाहणारी नदी आणि पश्चिमेदिशेस वाहणारी नदी  वाहत-वाहत जावुन सागराच्या पाण्यात एकरुप होतात, त्याप्रमाणे प्राणवायुंच्या ठिकाणी नित्य अशी जी क्रियाशक्ती आहे ती अनेक इंद्रियांच्या स्थानी अनेक प्रकारची होते, जेव्हा ती  क्रियाशक्ती वाचाद्वारे बाहेर पडते, तेव्हा तीला आपण बोलणे असे म्हणतो, हाताकडुन देण्या-घेण्याचा व्यवहार होतो, अरे जी पायात आली असता तिला  गती असे म्हणतात आणि गुद व शिस्न या दोन अधोद्वाराचे ठिकाणी मल-मुत्र पुढे सरकते, ही प्राणवायुची शक्ती आहे. नाभीकमलापासुन हदयापर्यत ओमकारांची स्पष्टता तो प्राणवायु करत असतो. मग ती प्राणशक्ती कंठातुन श्वासोच्छवासाच्या रुपाने आत येते व बाहेर जाते, तेव्हा त्याच प्राणशक्तीला उदान असे नाव आले. ती शक्ती अधोद्वारातुन वाहते  तेव्हा  तिला अपान वायु म्हणजे उदस्थ वायु असे नाव प्राप्त होते आणि सर्व शरीरात व्यापकपणाने असते तेव्हा तिला व्यान म्हणजे शरीरस्थ वायु असे म्हणतात. ती वायुची क्रियाशक्ती खाल्लेल्या अन्नाची जीवनरसाने सर्व शरीर सारख्या प्रमाणात भरत असते. शरीरातील कोणताही सांधा न सोडता सर्व साध्यांत ती असते. अर्जुना!  याप्रमाणे सर्व क्रिया होत असुन या क्रियाशक्तीला “समान” असे म्हटले जाते. (ओवी ३३१ ते ३४०)

जांभई, शिंक, ढेकर अशा ज्या विविध क्रिया होतात, त्यामुळे ती क्रिया शक्ती नाग, कृकल,देवदत्त आणि धनंजय या नावाची होते हे उपप्राण होत, अर्जुना! याप्रमाणे प्राणवायुची ती क्रियाशक्ती मुळात एकच आहे परंतु शरीरातील विविध स्थानांमुळे व असाधरण व्यापारामुळे भिन्न भिन्न स्वरुपांना आणि  नावानां प्राप्त होते. “मनुष्य देहातील वेगवेगळया कार्यामुळे निरनिराळी झालेली वायुशक्ती” हेच येथे कर्माचे “चौथे कारण” आहे, असे जाण. शरद ऋतुसारखा सर्वेात्तम ऋतु असुन त्यात चंद्राचा उदय व्हावा, आणि तशात पौर्णिमेचा योग असावा. अथवा वंसत ऋतुत बाग जशी आल्हाददायक असते आणि बागेत प्रिय मनुष्याचा योग घडला तर  अधिकच उत्तम आणि त्या योगात जशी इतर उपहाराची प्राप्ती व्हावी, किवां अर्जुना!  कमल उमलावे आणि त्या उमललेल्या कमलात परागांचे येणे घडावे, वाणीने काव्य करणे तर उत्तमच त्या काव्यामध्ये रसात्मकता असणे अधिकच चांगले  आणि त्या  रसात्मकतेमध्ये परब्रम्हतत्वाचा स्पर्श म्हणजे ब्रम्ह्यासंबंधीचे निरुपण अधिकच चांगले, तसेच विविध प्रकारच्या ऐश्वर्याने युक्त जी बुध्दी उत्तम प्रकारची असुन सर्व इंद्रियांचे सामर्थ्य अनुकुल असावे. आणि सर्व इंद्रियांना भुषण देणारा असा जो अधिष्ठायी देवताचां समुदाय, तोही त्यात अनुकुल असावा, म्हणुन सुर्यादिक देवतांचा समुदाय  चक्षुरादिक दहा इंद्रियांच्या ठिकाणी स्वताच्या अनुग्रहाने उभा आहे. (ओवी ३४१ ते ३५०)

पुढील भाग