अध्याय ११ भाग ५

           एवढेच काय, तर स्वर्ग, पाताळ, पृथ्वी, दिशा, आकाश  हा सर्व प्रकारचा भेद नाहीसा होवुन सर्व काही विश्वमुर्तीमय दिसत आहे. तुझ्याशिवाय कोणत्याही दिशेला, अगदी दाही दिशांना पाहु म्हटले तर कणाएवढी ही मोकळी जागा,  मी कौतुकाने पाहत असता ती सापडत नाही अशा प्रकारे तूच सर्व काही व्यापलेले आहेस. विविध प्रकारच्या अमर्याद प्राण्यांसहित पंचमहाभूतांनी जे सर्व विश्व व्यापले होते ते सर्व आता तुम्ही व्यापले आहे असे दिसते. असे तुम्ही कोणत्या ठिकाणारुन आलात? तुम्ही येथे बसलेला आहात की उभे आहात ? तुम्ही इतके दिवस कोणत्या कोच्या पोटी होता आणि तुमचा आकार तरी केवढा आहे? तुझे रुप आहे कसे, तुझे वय किती आहे, तुझ्या पलीकडे काय आहे, असे जेव्हा मी विचारपुर्वक पाहु लागलो. तेव्हा महाराज , मला सर्व काही उमजले की, देवा ! तुझा आधार तुच आहेस. तूच सर्वत्र आहेस, तू अनादि आहेस, अनंत आहेस, अमर्याद आहेस, अगाध आहेस, तुझे कोणत्याही प्रकारे वर्णन करावे अशा कशाचाही तु नाहीस या साऱ्याच्या पलीकडे तु आहेस “तू तुच आहेस” शेषादि आणि वेद शास्त्रे,पुराणानांही तु अगम्य आणि अगोचर तू आहेस. तुझे वर्णन म्हणजे  “नेति नेतिच”  तुझे रुप तुझ्यासारखेच आहे, तुझे वयही तुमच्यासारखे आहे, हे परमेश्वरा ! तुझ्या पाठीशी आणि पोटाशी तुझा तुच आहेस, हे अंनता ! पुन्हा पुन्हा विचार करुन पाहीले असता मी जाणले, जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र फक्त तू आणि तुच आहेस. परंतु तुझ्या विश्वमुर्ती रुपाच एक खास वैशिष्ठे असे की, तुला आंरभ, मध्य, अंत हे तिन्हीही नाहीत. (ओवी २७१ ते २८०)

          एऱ्हवी तुझ्या विश्वरुपाच्या ठिकाणी उत्पत्ती, स्थिती, लय याचा शोध घेतला, पण कुठेही त्यांचा शोध लागला नाही, म्हणुन तुझ्या विराट स्वरुपात हे तिन्ही निश्चीतपणे आहेत का? हे आदि-मध्य-अंत रहिता विश्वेश्वरा, अनंतरुप अशा तुला मी आता तत्वता पाहिले आहे. हे विश्वस्वरुपा, तुझ्या शरीरावर विविध प्रकारच्या अनेक मुर्ती उमटल्या आहेत म्हणुन नाना प्रकारची वस्त्रे अंगावर तु धारण केली आहेस असे वाटते. तुझ्या विश्वरुप महापर्वतावर विविध प्रकारच्या मुर्ती याच जणू वृक्ष आणि लता असुन त्या मुर्तीरुपी वृक्ष-लता दिव्य अलंकाररुपी फळांनी आणि फुलांनी बहरलेल्या दिसतात. हे देवा! तुम्ही महासागर असुन मुर्तीरुपी लांटानी उसळलेले दिसता अथवा तुम्ही एक उत्तम महावृक्ष असुन मुर्तीरुपी फळांनी आणि फुलांनी बहरलेल्या दिसता, प्राण्यांनी जसा पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापलेला आहे अथवा आकाश जसे नक्षत्रांकडुन झाकले गेले आहे, त्याप्रमाणे मुर्तीनी भरलेले तुझे रुप मी पाहत आहे. ज्या एकेक मुर्तीच्या अंगावर त्रैलाक्य उत्पन्न आहेत आणि लय देखील पावते, या एवढया मोठया मुर्ती तुझ्या अंगावर एका-एका रोमाच्या ठिकाणी उत्पन्न झाल्या आहेत. असा अफाट विश्वाचा पसारा अंगावर मांडुन जो येथे प्रगटलेला आहे तो तू कोण आहेस?   कोणांचा आहेस?  हे पाहिले असता  जेा आमच्या रथाचा सारथी आहेस, तो तूच आहेस, हे समजले, तरी हे  मुकूंदा !  मी विचार करुन पाहीले असता असे वाटते की तु सर्वकाळ व्यापक आहेस, परंतु भक्तांवरती कृपा करण्यासाठी मात्र तु सर्वागंसुंदर रुप धारण करतोस. तुझे चार भुजांचे मनोहर रुप असे आहे की ज्याला परमश्रध्देने पाहीले असता मन द्रवते व डोळे आनंदाने पाझरतात, तसेच आलिगंन देवु लागलो तर दोन्ही बाहूंनी ते कवटाळता येते.(ओवी २८१ ते २९०)

            हे विश्वरुपा, तु अतिव्यापक असुनही आमच्यावर कृपा करुन हे साजिरे- गोजिरे रुप धारण केलेस परंतु आमची दृष्टी दुषित आहे त्यामुळे तुला सामान्य मनुष्यरुपाने पाहिले. परंतु हे दयाघना ! आपली कृपादृष्टी लाभली त्यामुळे आपण मला दिव्यदृष्टी दिली म्हणुन मला आपणास यर्थाथ रुपाने मला पाहता आले, आपला अगाध महिमा जाणता आला, परंतु रथाच्या समोरच्या भागाला असलेल्या मकरमुखाच्या मागील बाजुस जो तु सारथी बनुन बसला होतास तोच  तु एवढया अफाट विश्वरुपाने नटला आहेस, हे मी आता जाणले आहे. हे श्रीहरी ! पुर्वी सारथी असताना जो मुकूट तु मस्तकावर धारण केला होतास तोच मुकूट मस्तकावर धारण केला आहेस ना? परंतु त्या वेळच्यापेक्षा आता दिसणारे तेज आणि महानता अतिशय अदभुत आहे हे विश्वमुर्ती ! तु हे वरच्या हातामध्ये फिरवीत असलेले चक्र सावरुन धरतोस, त्यामुळे विश्वरुप धारण करुन देखील तूझी ती खुण मोडली नाही. आणि दुसऱ्या हातामध्ये असलेली तीच गदा नव्हे काय?  हे गोविदां ! खालच्या दोन्ही हातांत शस्त्र नसुन घोडयांचे लगाम हातांत धरले नव्हतेस काय?  आणि हे विश्वेश्वरा ! माझ्या मनात तु विश्वरुप धारण करावेस ही इच्छा निर्माण झाल्याबरोबर तेवढयाच लगबगीने तु एकदम विश्वरुप धारण केलेस म्हणुन तोच तु आहेस या बाबत माझ्या मनाची खात्री झाली. परंतु हे कसले बरे कौतुक? मला आश्चर्य व्यक्त करण्यास अवकाशदेखील नाही, खरोखर हया आश्चर्याने मी गोधंळुन गेलो आहे. हे विश्वरुप येथे आहे का नाही, अशा नुसत्या विचाराने श्वास घेणे देखील कठीण झाले आहे, तुझ्या अंगकांतीचा नवीनपणा आश्चर्यकारक आहे ती अंगकांती सर्वत्र कोंदटलेली आहे. हया  विश्वरुपाच्या प्रखर तेजाने अग्नीची दृष्टी देखील करपुन जात आहे, सुर्यदेखील काजव्यासमान हया तेजामध्ये हरपुन जात आहे, या तेजाचा प्रखरपणा अत्यंत अदभुत असा आहे. (ओवी २९१ ते ३००)

          जणु काही महातेजाच्या अथांग महासागरामध्ये अवघी सृष्टी बुडून गेली आहे, अथवा प्रलयकालीन विजांच्या पदराने अफाट आकाश झाकले गेले आहे, अथवा प्रलयकालच्या प्रखर तेजाच्या ज्वाला तोडून त्यांचा आकाशात मांडव बांधला आहे, असे अत्यंत तीव्र तेज आहे, ते माझ्या ज्ञानाच्या डोळयांनीही मला पाहवत नाही. ते तेज अत्यंत प्रखर होवुन माझ्या शरीराचा दाह होत आहे, त्या तेजाकडे पाहुन माझ्या दिव्य दृष्टीलाही त्रास होत आहे. भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळा उघडावा, त्याप्रमाणे ते प्रखर तेज सर्वत्र पसरले आहे. त्याचप्रमाणे पसरलेल्या या विराट विश्वरुपाच्या प्रखर तेजाने चारी बाजूला चार आणि वर एक अशा पाच अग्नीच्या ज्वालांचे दाट दाट वेढे पडत असताना ब्रम्हांडाचे कोळसे होत आहेत. अशा अदभुत तेजाच्या राशी याच जन्मात मी आश्चर्याने पाहत आहे देवा, तुझ्या व्यापक पणाला आणि महातेजाला कसल्याही मर्यादा नाहीत. देवा, आपण परब्रम्ह आहात श्रुती ज्याचे घर शोधीत असतात, ते आपण ओमकाराच्या साडेतीन मात्रांच्याही पलीकडे आहात. तु सर्व आकारांचे घर म्हणजे आधार आहेस व विश्वरुपी ठेवा ठेवण्याचे स्थान आहेस, तु गहन, अव्यय व अविनाशी आहेस, तु धर्माचा जिव्हाळा आहेस, तु अनादिसिध्द असून नित्य नुतन आहेस, तु छत्तीस तत्वांहुन वेगळा सदोतीसावा अलौकिक पुरुष आहेस, असे मी जाणतो. देवा ! आपण आदि, मध्य आणि अंत रहित आहात,  आपण स्वताच्या सामर्थ्याने अपार आहात, आपण अजानबाहू असुन विश्वाचे बाहु ते आपले बाहू आहेत, विश्वाचे चरण ते साक्षात आपले चरण आहेत, असे आपण विश्वबाहु आणि विश्वचरण आहात. (ओवी ३०१ ते ३१०)

         चंद्र व सुर्य या तुझ्या डोळयांनी तुझ्या क्रोधांच्या लिला आणि कृपेच्या लिला दाखवतात. आपण दुर्जनावर रागवता ‍आणि सज्जंनाचा साभांळ करता त्याच्यावर कृपा करता. देवा ! अनेक प्रकारांनी  तुम्ही माझ्या दृष्टीला दिसत आहात. प्रज्वलित अग्नीच्या प्रलयाचे तेज जसे असावे, तसे तुझे तेजोमय मुख आहे. चारी बाजुंनी पेटलेल्या पर्वतावर ज्वालांचे जसे लोटच्या लोट उठत असतात, त्याप्रमाणे तुमच्या दाढा आणि आत चाटत असलेली जीभ तोंडात लोळत आहे. त्या तोंडातील उष्णतेने आणि सर्वागांच्या तेजाने तापुन गेलेले विश्व अतिशय खवळलेले आहे. स्वर्ग, पाताळ, पृथ्वी आणि अंतरिक्ष अथवा दहा दिशा व सर्व क्षितीजे हे सर्व तु एकटयानेच भरलेले आहे, हे मी कौतुकाने पाहत आहे परंतु आकाशासह तुमच्या भयानक रुपात जणु काही हे सर्व विश्व बुड‍त आहे, असे मला दिसत आहे, अथवा ज्याप्रमाणे अदभुत रसाच्या लाटांनी चौदाही भुवनांना वेढा पडावा, त्याप्रमाणे ही अतिशय आश्चर्यकारक अशी गोष्ट आहे, ते मला कसे बरे पाहवेल? तुझे विश्वरुप अत्यंत व्यापक आणि विलक्षण असल्यामुळे त्याचे आकलन होत नाही, तुझ्या रुपाची प्रखरता कोणालाही सहन होत नाही त्यामुळे सुख तर दुरच राहिले, परंतु जग आपले प्राण‍ अतिशय कष्टाने धारण करीत आहे. देवा ! तुझे अदभुत विश्वरुप पाहुन भयाचे भरते कसे आले हे कळत नाही, दु:खाच्या  प्रचंड लाटांमध्ये तिन्ही लोक गटांगळया खात आहेत, एरवी तुझे हे विश्वरुपाचे दर्शन झाल्यावर भय व  दु:खाची का प्राप्ती व्हावी?  परंतु ज्या कारणामुळे हया विराट दर्शनापासुन त्रैलोक्य सुखी होत नाही ते कारण मला कळत नाही. (ओवी ३११ ते ३२०)

          जो पर्यत तुझे भव्य-दिव्य रुप दृष्टीस पडले नाही, तोपर्यत जगाला विषयसुखच उत्तम वाटते, आता ज्या अर्थी तुझ्या विराट स्वरुपांचे दर्शन झाले, त्या अर्थी विषयसुखाचा वीट आल्यामुळे जगाला त्रासही उत्पन्न झाला आहे, त्याचप्रमाणे तुला पाहील्याबरोबर एकदम आलिंगन देता येईल का? आंलिगन न द्यावे तर उग्ररुप दर्शनाच्या संकटात कसे बरे  रहावे ?  उग्ररुप पाहवत नाही म्हणुन मागे सरकावे तर अपरीहार्य असे जन्म-मरणाचे संसाराचे दुख आडवे येते, आणि तुला आलिंगन देण्यासाठी पुढे सरकावे तर तुझ्या उग्ररुपाचे आकलन होणे अवघड आहे.अशा मधल्यामध्ये सापडलेल्या बापडया त्रैलोक्यातील जीवांचा हुरडा होत आहे, हा अभिप्राय मला उत्तम रीतीने पटला आहे , ज्याप्रमाणे एखादा मनुष्य अग्नीने पोळल्यामुळे आपला दाह शांत करण्यासाठी समुद्राजवळ येतो, परंतु समुदातील  खवळलेल्या प्रचंड लाटांनी तो जसा अधिकच भितो. त्याप्रमाणे या जगाची स्थिती झाली आहे तुला पाहुन ते तळमळावयास लागले आहेत, तुझ्या अंगच्या दिव्य तेजाने हे सर्व देव कर्माची बीजे जाळुन सदभावनेच्या आधारे तुझ्या स्वरुपात एकरुप होत आहेत, आणखी कित्येक खरोखर भयभीत होवुन तुझ्यासमोर हात जोडुन तुझी मनोभावे प्रार्थना करत आहेत, देवा , आम्ही अज्ञानाच्या समुद्रात पडलो आहोत महाराज, आम्ही विषयरुपी जाळयात गुंतलो आहोत, स्वर्गसुख‍ व संसार या दोहोंच्या कचाटयात सापडलो आहोत. अशा प्रकारे बध्द झालेल्या आमची सोडवणुक तुझ्याशिवाय कोण बरे करु शकेल?  देवा ! पंचप्राणांनी आम्ही तुला शरण आलो आहोत, असे ते म्हणतात. (ओवी ३२१ ते ३३०)

          महर्षी अथवा सिध्द आणि नाना प्रकारच्या विद्याधरांचा समुदाय “आमचे कल्याण व्हावे” असे म्हणत आपली स्तुती गाण करत आहेत, हे अकरा रुद्र आणि बारा आदित्य आठ वसु, साध्य नावाचे सर्व देव, आश्विनकुमार, विश्वदेव, तसेच ऐश्वर्याच्या सहवायु देखील ऐका, अग्नी आणि गंर्धव, पलिकडे असलेला यक्ष -राक्षंसाचा समुदास, इंद्र ज्याच्यामध्ये श्रेष्ठ आहेत असे देव आणि सिध्द आदी करुन हे सर्व आपआपल्या लोकांत बसुन मोठया उत्कंठतेने आपली दिव्य मुर्ती पाहात आहेत. हे प्रभो ! तुला पाहताना प्रत्येक क्षणी मनात आश्चर्य मानुन तुझ्यासमोर ते नतमस्तक होत आहेत. ते सर्व देव मंजुळ नादाने तुझा जयजयकार करत आहेत. त्या घोषाने संपुर्ण स्वर्गात आवाज दुमदुमून गेला आहे, ते कपाळावर हात जोडून तुला नमस्कार करीत आहेत. त्या देंवाच्या विनयरुपी वृक्षांच्या वनात अष्टसात्विक भावांचा वसंत अनुकूल झाला म्हणुन त्यांच्या करसंपुटरुपी पालवीला लागलेले फळ तु झाला आहेस. जणु काही त्यांच्या नेत्रांचे भाग्य उदयाला आले आहे त्यांच्या मनाला सुखाचा सुकाळ झाला आहे, कारण त्यांनी तुझे अगाध विश्वरुप पाहिले आहे. हे त्रैलोक्यव्यापक रुप पाहुन देवांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे , कारण कोणत्याही बाजुने पाहिले तरी ते विराट विश्वरुप समोरच आहे असे वाटते, असे हे एकच विश्वरुप आहे परंतु त्याला चित्रविचित्र भयानक अशी अनेक मुखे, अनेक डोळे आणि शस्त्र धारण केलेले अनेक हात आहेत. (ओवी ३३१ ते ३४०)

पुढील भाग