अध्याय-७-भाग-२

              स्वप्न हे खोटे आहे म्हटले तरी आपण झोपेच्या अधीन झाल्यामुळे तेव्हा ते आपल्या अनुभवास येते, त्यावेळी ते आपली आठवण करुन देते हे दृष्टांत असू दे, डोळयांतील पाणी डोळयांमध्ये गोठुन त्याचा पडदा ज्यावेळी डोळयावर येतो, त्यावेळी तो पडदा डोळयांची दृष्टी बंद करीत नाही का? त्याप्रमाणे त्रिगुणात्मक माया ही माझीच पडलेली छाया आहे पडदा जसा असावा त्याप्रमाणे ती माझ्याच आड आली आहे म्हणुन भूतमात्र मला जाणत नाहीत आणि माझ्यापासुन उत्पन्न झालेले असुनही ते मद्रुप होत नाहीत ज्याप्रमाणे पाण्यापासुन उत्पन्न झालेले मोती पाण्यात विरघळत नाहीत. मातीचा घट तयार करुन तो घट ताबडतोब मातीत मिसळला तर तो मातीत एकरुप होतो परंतु तोच घट आव्यात घालून अग्नीच्या आधाराने भाजला, तर मात्र तो माती पेक्षा वेगळा होतो, त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्र हे माझेच अवयव आहेत परंतु त्यांचा मायेशी संबंध आल्याने ते जीवदशेला प्राप्त झाले आहेत म्हणून माझ्यापासुन उत्पन्न झाले असुन देखील ते मद्रुप होणे कसे साध्य होईल, ते सांगतो, जी मायारुपी नदी ब्रम्हरूपी पर्वताच्या तुटलेल्या कडयात असतानाच प्रारंभी तिच्या ठिकाणी संकल्परुपी जलाचा उगम झाला आणि त्वरितच पंचमहाभुतांचा लहानसा बुडबुडाही आला, जी सृष्टीच्या विस्ताररूपी योगाने कालगतीच्या वेगाने वाढुन प्रवृत्ती व निवृत्ती हे दोन उंच काठ ओलांडुन पूढे चालली आहे. ( ओवी ६१ ते ७० )

           जी त्रिगुणरुपी मेघाच्या पावसाने तुडूंब भरलेली आहे, आणि भ्रमाच्या महापुराने योगांची यम-नियमरुपी नगरे वाहून घेवुन जाते,जी द्वेषरुपी भोवऱ्याने दाट भरुन गेली आहे आणि मत्सर रुपी वळणाने वाहत आहे जिच्यामध्ये उन्मत्तपणा इत्यादी दोषरुपी मोठमोठे मासे तळपत आहेत, जिच्यामध्ये प्रपंचरुपी भेदाची अनेक वळणे असुन कर्म-अकर्माच्या भेदामध्ये सुखदुखरुपी केरकचरा तरंगत येवुन जिच्या कडेला लागलेला आहे जिच्या प्रवाहामध्ये विषयसुखरुपी बेटावर कामविकाराच्या लाटा जोराने आदळुन त्या ठिकाणी जीवरुपी फेसाचा समुदाय दाटलेला दिसतो ज्या मायानदी मध्ये अहंकाराच्या मोठमोठया धारा आहेत त्यांवर संपत्ती, तारुण्य, कुळ या तीन मदाच्या उकळया येतात आणि ज्या नदीमध्ये विषयरुपी लाटांवर लाटा उसळी घेत असतात, ज्या नदीत उदय-अस्ताचे लोढेंच्या लोढें जन्ममृत्युरुप खळगे पाडतात आणि तेथे पंचमहाभुतां पासुन निर्माण झालेले शरीररुपी बुडबुडे  निर्माण होतात व नाहीसे होतात जिच्यामध्ये मोह, भ्रांती, हे मासे सात्विक धैर्यरुपी अमिषाला गिळुन टाकतात आणि ज्या नदीत अज्ञानाचे भोवरे वाकडे-तिकडे फिरतात, ज्या मायानदीमध्ये भ्रांतीचा गढुळपणा आहे आणि आशारुपी गाळामध्ये प्राणिमात्र फसले आहेत रजोगुंणाच्या खळखळाटात स्वर्गदेखील गर्जु लागला आहे ज्या मायानदीत तमोगुणाचा प्रंचड प्रवाह आहे सत्वगुणाचा गंभीर स्थिरपणा आहे अधिक काय बोलावे ?  ही मायानदी तरुन जाण्यास अतिशय अवघड आहे, या मायानदीतील जन्म-मृत्युच्या पुराच्या लोढयांत सत्यलोकाचे किल्ले वाहुन जातात आणि ब्रम्हांडगोलाचे धोंडे गडगडत खाली येतात. ( ओवी ७१ ते ८० )

              या मायानगरीच्या महापुरात कोणाला पाय रोवुन उभे राहता येत नाही, तर मग या मायानदीच्या महापुरातुन कोण बरे तरुन जावु शकेल ?  आणखी एक आश्चर्य असे की या मायानगरीतुन तरुन जाण्याचा जो जो उपाय करावा, तो तो अपाय होतो तो कसा ते ऐक,कोणी आपल्या स्वबुध्दीच्या बळावर मायानदीतुन तरुन जाण्यासाठी ती मध्ये उडी टाकली, परंतु ते पुढे कोठे गेले याचा काही पत्ता लागला नाही कित्येक जण पांडित्याच्या डोहामध्ये शिरले पण त्यांनादेखील गर्वाने गिळुन टाकले, मायानदीतुन तरुन जाण्यासाठी कित्येकांनी तीन वेदांच्या सांगडी घेतल्या परंतु विद्येच्या अभिमानाचे धोडें बरोबर घेतल्यामुळे ते मदरूपी माशांच्या तोंडात सगळेच नाहीसे झाले, कित्येकांनी तारूण्याची घटट अशी कंबर बांधली आणि ते मदनाच्या कासेला लागले परंतु त्यांना विषयरुपी मगरीने चघळुन टाकले, पुढे ते वार्धक्यरुपी हेलकावे खात-खात बुध्दीभ्रमरुपी जलाच्या जाळयात सापडतात आणि त्यायोगे चारी बाजुंनी गुरफटून जातात आणि पुढे ते शोकरुपी कडयावर आदळतात आणि क्रोधरुपी भोवऱ्यात सापडतात ते डोके वर काढु लागले की संकटरुपी गिधाडे त्यांस टोचून टोचून खाउ लागतात मग ते दुखाच्या चिखलाने बरबटले जातात, नंतर मृत्यूच्या गाळात फसतात याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय घेतला त्यांचे जीवन व्यर्थ गेले असे जाणावे, कित्येकांनी मायानदी तरुन जाण्यासाठी यज्ञक्रियारुपी पेटी आपल्या पोटाशी बांधली ते स्वर्गसुखाच्या कपारीत शिरुन तेथेच अडकुन राहीले कोणी मोक्षरुपी पलीकडच्या किनाऱ्याला लागावे या आशेने कर्मरुपी बाहुवर विश्वास ठेवला परंतु ते विधि निषेधांच्या वळणात सापडले गेले.         (ओवी ८१ ते ९० )

           या मायानगरीमध्ये वैराग्याची नाव चालत नाही आणि विवेकरुपी वेळु जमिनीला टेकत नाही तथापि अष्टांगयोगाच्या आधारे तरून जाण्याची शक्यता असते, परंतु तसा साधक एखादाच असतो, याप्रमाणे स्वताच्या अंग सामर्थ्याने ही मायानदी तरुन जाणे कशासारखे आहे म्हणावे बरे? जर पथ्य न पाळणाऱ्याला रोग घालवता येईल किवां साधुला दुर्जनांची बुध्दी कळु शकेल अथवा एखाद्या लोभी माणसास अनायसे संपत्ती प्राप्त झाली असता तो जर तिचा त्याग करेल, चोरानां जर न्यायदान करणारे सभासद भितील अथवा माशाला जर गळ गिळता येईल अथवा एखाद्या भित्रया माणसास पिशाच्चावर हल्ला करता येईल जर हरणाचे पाडस जाळे तोडुन टाकेल किवां मुंगी मेरूपर्वत ओलांडुन जाईल, तर मायानदी पलीकडील काठ जीव पाहु शकेल म्हणुन हे अर्जुना ! ज्याप्रमाणे विषयांने आसक्त असणाऱ्या मानवाला स्त्री जिकंता येत नाही, त्याप्रमाणे ही मायारुपी नदी जीवाला तरता येत नाही  येथे जे मला सर्वकाळ अनन्यभावाने शरण येतात ते या मायारुपी नदीतून सहजपणे तरुन जातात. एवढेच नव्हे, तर ते मायारुपी नदीच्या अलिकडील काठी उभे असतानाच तिथे संपुर्ण जल नाहीसे होवुन जाते ज्यांना सदगुरू हे नावाडी लाभले आहेत ज्यांची अनुभवांची कास अतिशय बळकट आहे आणि ज्यांना आत्मनिवेदन हेच तारू सापडले आहे. जे अहंभावाचे ओझे टाकुन विकल्परुपी वाऱ्याच्या झुळका चुकवुन प्रपंचावरील अनुरागरुपी पाण्याच्या प्रवाहाची दिशा टाळतात, ते जीव-परमात्मा ऐक्य हाच उतारा आहे हे जाणुन त्या उताराने ज्ञानरुपी सोबतीच्या आश्रयाने निवृत्तीच्या पलिकडील काठावर जावुन पोचतात.                                                       ( ओवी ९१ ते १०० )

          ते वैराग्यरुपी हाताने पाणी तोडीत- तोडीत “अहं ब्रम्हास्मि ” या अनुभवाच्या बळाने आपल्या स्वरुपस्थितीचा तोल सांभाळीत कोणत्याही संकटाची बाधा न होता निवृत्तीच्या तीरावर मायानदीतुन बाहेर येतात, या उपायाने जे मला अनन्यभावाने भजतात ते या मायानदीतुन तरुन जातात परंतु असे भक्त फारच थोडे असतात खुप नसतात, असे भक्त थोडे असण्याचे कारण म्हणजे बहुतेक करुन सामान्य लोकांत अहंकार रुपी भुताचा संचार झालेला असतो त्यामुळे त्यांना आत्मस्वरुपाचा विसर पडलेला असतो त्यावेळी त्यांना नियमरुपी  वस्त्राचे स्मरण राहत नाही, पुढे असलेल्या अधोगतीची त्यांना लाज वाटत नाही आणि वेद ज्या गोष्टी करु नयेत म्हणुन सांगतात तेच नेमके ते करतात. अर्जुना ! ज्या कार्यासाठी त्यांना मनुष्यशरीर प्राप्त झालेले असते तो सर्व कार्यभाग सोडुन, इंद्रियरुपी गावाच्या राजरस्त्यावर उभे राहुन ते ममत्वाच्या व अहंकाराच्या बडबडीने कामक्रोधादिक अनेक विकारांच्या समुदाय जमवतात, दुख आणि शोक यांचे अनेक घाव पडत असतानाही त्यांना त्याचे स्मरणसुध्दा नसते हे सांगावयाचे कारण एवढेच की ते मायेने ग्रासलेले असतात, म्हणुन मायेने ग्रासलेले लोक मला विसरले, ज्यांनी आत्महित साधले, असे चार प्रकारचे भक्त मला भजतात, तो प्रकार ऐक, या चौघापैकी पहिल्याला आर्त, दुसऱ्याला जिज्ञासु, तिसऱ्याला अर्थार्थी, आणि चौथ्याला ज्ञानी असे म्हणतात, आर्त हा द्रव्यादिकांच्या इच्छेने मला भजत असतो,जिज्ञासु हा ज्ञानप्राप्ती करुन घेण्यासाठी भजतो आणि तिसरा अर्थार्थी हा द्रव्यादिकांच्या इच्छेने मला भजत असतो.( ओवी १०१ ते ११० )

             पण चौथा ज्ञानी भक्ताचे ठायी कोणत्याही प्रकारचे स्वार्थ बुध्दीचे कर्तव्य नसते, म्हणुन तो ज्ञानी पुरूष माझा खरा भक्त होय असे जाण, कारण आत्मज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या भेदांचा अंधकार नाहीसा होतो, नंतर तो ब्रम्हऐक्यरुपी भावाने मद्रुप होतो आणि हे होवुन सुध्दा तो माझा भक्तच राहतो, ज्याप्रमाणे सर्व सामान्य लोकांच्या दृष्टीला स्फटिक क्षणभर पाण्यासारखाच भासतो, त्याप्रमाणे इतरांच्या दृष्टीला ज्ञानी हा माझ्याहुन वेगळा दिसतो परंतु तो माझ्याहुन वेगळा नसतो, त्याचे वर्णन करताना मोठे कौतुक वाटते ज्याप्रमाणे वारा हा आकाशात विरुन गेला म्हणजे तो वेगळा उरत नाही, त्याप्रमाणे आत्मज्ञानी माझ्याशी एकरुप झाला तरी भक्तीचा प्रेमभाव प्रतिज्ञापुर्वक तो सोडत नाही, वारा जर पंख्याने हलवुन पाहिला तर तो आकाशापेक्षा भिन्न भासतो एरवी तो वारा स्वभावत:च आकाशरुप असतो, त्याप्रमाणे ज्ञानी पुरूष भक्तीसाधनेच्या शारीरिक क्रियांमुळे बाहयता माझा भक्त आहे, असे भासते परंतु स्वानुभवाच्या आधारे तो मदरुपच असतो, तो ज्ञानी अतं:करणात दिव्य प्रकाश प्रगटल्यामुळे मला आपला आत्मा आहे असे जाणतो, म्हणुन माझ्या हदयातील प्रेम उचंबळुन येते आणि मी त्याला  “माझा आत्मा आहे ” असे म्हणतो, जो जीवाच्या पलीकडील परमतत्व अनुभवाने जाणतो, तो देहाच्या वेगळेपणाने खरोखर वेगळा होईल काय? म्हणुन आपल्या हिताच्या इच्छेने वाटेल तो मनुष्य माझी भक्ती करतो परंतु मी ज्याच्यावर आपणहुन प्रेम करावे असा एक भक्त म्हणजे ज्ञानीच होय असे पाहा की, दूध प्राप्त करण्याच्या इच्छेने सारे जगच गाईला दोराचा फासा घालीत असते परंतु तीच गाय आपल्या वासराकरिता दोराच्या फासाशिवाय आपणहुन पान्हा सोडीत असते. (ओवी १११ ते १२०)

                याचे कारण म्हणजे शरीराने, मनाने  आणि प्राणाने ते वासरु आपल्या आईशिवाय दुसरे काहीच जाणत नाही ज्या गाईला ते बघते तिला आपली आईच समजते, याप्रमाणे वासरु गायीशी अनन्यगती असते, म्हणुन त्याची जन्मदात्री गायदेखील त्याचप्रमाणे त्याच्यावर प्रेम करते, याकरिताच लक्ष्मीपती श्रीकृष्ण जे बोलले ते खरे आहे, हे असो मग भगवान पुन्हा म्हणाले,  अर्जुना ! तुला जे आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी हे तीन प्रकारचे भक्त सांगितले आहेत, ते सुध्दा उत्तम भक्त आहेत आणि आम्हाला ते आवडते आहेत, परंतु मला जाणुन जो संसाराकडे पुन्हा परतुन बघण्याचे विसरला जसे सागराशी एकरुप झाल्यावर नदीचे मागे फिरणे बंद पडते, त्याप्रमाणे अतं:करणरुपी गुहेमध्ये उगम पावलेली अनुभवरुप गंगा  निघुन मला मिळाली, तो माझ्याशी एकरुप झाला हे वर्णन मी किती करु?  एरवी ज्ञानी ज्याला म्हणतात, तो केवळ माझा आत्माच आहे ही गोष्ट शब्दाने वर्णन करण्या सारखी नाही, परंतु काय करावे ?   बोलण्यासारखे नसलेले देखील मी तुझ्याशी बोलत आहे कारण तो ज्ञानी भक्त विषयरुपी दाट झाडीतुन जात असताना मध्येच आलेली काम-क्रोध वगैरे संकटे टाळून सदवासनेच्या डोगंरावर आलेला असतो,मग अर्जुना, साधुंच्या संगतीने सत्कर्माच्या सरळ वाटेने, निषिध्द कर्माचा आडमार्ग डावलुन आणि शेकडो जन्म भक्तीच्या वाटेवरुन चालणारा तो ज्ञानी पुरुष फलाच्या आशेने वहाणा पायात घालीत नाही,अशा स्थितीत स्वर्गामधील फलांच्या हेतुचा हिशोब कोणी बरे करावा? याप्रकारे मनुष्य शरीरसंबंधरुपी  रात्रीच्या वेळी एकटा सर्वसंग परित्यागी दुरवर धावत असता सहजच कर्माचा क्षय होवुन ज्ञानोदयाची पहाट होते. (ओवी १२१ ते १३०)

पुढील भाग