अध्याय १३ भाग ३

         आणि अर्जुना! स्वमताचा निश्चय करण्यासाठी जी दुसरी मते विचारात घेणे जरुरी असेल त्याचे ही विवेचन केले पाहीजे, याप्रमाणे ही निरुपण करण्याची पध्दती एक आहे हे लक्षात ठेव, आता यापुढे आमचे जे मुख्य मत आहे ते ऐक. ते स्वमत स्पष्टपणे सांगुन अहिंसेची लक्षणे सांगू ती लक्षणे कोणाच्याही अंगी स्पष्टपणे दिसु लागल्यावर त्याला खरे ज्ञान झाले आहे असे दिसेल, ज्याप्रमाणे कसोटी सोन्याचा कस ठरविते, त्याप्रमाणे अहिंसेने आश्रय केलेल्या शरीरावरुन आणि इंद्रियांच्या व्यवहारावरुन अहिंसेचे रुप जाणले जाते.  अर्जुना! ज्ञानाची आणि मनाची भेट झाली असता त्या मनामध्ये अहिंसेचे जे प्रतिबिंब उमटत असते ते ऐक. तरी लाटांचे उल्लंघन न करता लहान लहरींचा देखील भंग होवु न देता पाण्याचा खळखळ आवाज न मोडता वेगाने तो बगळा फार जपुन हळुवारपणे जसा अमिषावर दृष्टी ठेवुन जलामध्ये पाय ठेवतो. अथवा कमळामधील सुक्ष्म तंतु आपल्या ओझ्याने चुरगळुन जातील या शंकेने भुंगा कमळदलावर अत्यंत हळुवारपणे बसतो. त्याप्रमाणे परमाणुमध्ये देखील अत्यंत सुक्ष्म जीव भरलेले आहेत, हे जाणुन ते आपल्या पायाच्या ओझ्याने चिरडुन जातील या जाणिवेने तो आपले पाय कारुण्यामध्ये लपवुन चालतो, तो ज्या मार्गाने चालतो तो मार्ग कृपेने भरतो, तो ज्या दिशेकडे बघतो, ती दिशा प्रेमाने भरुन जाते, सर्व जीवांच्या खाली आपला जीव अंथरीत तो चालत असतो. (ओवी २४१ ते २५०)

         अर्जुना! असे ज्याचे जीवांच्या सरंक्षणासाठी चालणे असते, बोलणे असते, त्याचे वर्णन शब्दांनी करता येत नाही, कोणतीही उपमा त्याच्या वर्तनाला पुरेशी पडत नाही, मांजरी मायेने पिलाला तोंडात धरते तेव्हा तिच्या दृष्टीत जो अत्यंत कोमल भाव भरलेला असतो, अथवा कमळाच्या पाकळयांनी वारा घेवु लागला असता त्यातुन निघालेला वारा ज्याप्रमाणे डोळयांच्या बुबळांना अत्यंत सुखकर वाटतो, तशा प्रकारच्या मृदुपणाने जो आपले पाय जमिनीवर प्रेमाने आदराने ठेवत चालत असतो, त्यावेळी त्याच्या पायाच्या स्पर्शाने तेथील जीवजंतुना सुखच सुख लाभत असते, अर्जुना! अत्यंत  हळुवारपणे  चालत असताना कृमी-किटक पुढे दिसली तर आपल्या पायाने ती मरतील म्हणून तो  हळुवारपणे  माघारी फिरत असतो, तो मनात म्हणतो, चालताना आपले पाय धडपडले तर त्यातुन आवाज निघेल व सर्व भूतांत सम प्रमाणात व्यापुन असलेल्या परमात्म्याची झोप मोडेल व त्याच्या प्रकृतीच्या स्वस्थपणास धक्का बसेल. अशा करुणायुक्त अतंकरणाने तो मागे परततो, परंतु कोणत्याही छोटया कीटकांवर पाय ठेवुन पुढे जात नाही, गवताच्या काडीमध्ये देखील जीव आहे, असे समजुन ती काडीसुध्दा तो तुडवुन जात नाही अशा करुणा हदयामुळे तो प्राण्यास न जुमानता त्याला पायाखाली चिरडुन पुढे जाईल ही गोष्ट कशी बरे संभवेल? मुंगीला मेरु पर्वताचे उल्लंघन करता येत नाही. (ओवी २५१ ते २६०)

         असे त्याचे करुणामय चालणे कृपारुपी फळाने फळास आलेले असते आणि वाणीतही मुर्तिमंत दया दृष्टीस पडते. श्वास घेणे आणि सोडणे हे कर्म तो समोरच्या मनुष्यास त्रास होणार नाही अशा प्रकारे करतो, त्याचे मुखकमल पाहिले तर जणू प्रेमाचे माहेरघर दिसते, त्याचे दात माधुर्याला अंकुर फुटल्याप्रमाणे दिसतात, तो बोलताना मधुर स्नेह पाझरत असतो आणि मागुन अक्षरे चालत असतात आधी कृपा आणि नंतर शब्द प्रगट होत असतात, अगोदर तर तो कोणाशी विशेष बोलत नाही, कदाचित त्याने बोलण्याचे मनात आणले तर आपले बोलणे कोणाला खुपेल काय, अशी शंका त्याला येते, बोलताना अधिक शब्द बाहेर पडले तर ते कोणाच्या वर्मी लागतील काय आणि कोणाच्या मनात शत्रुत्वाची शंका निर्माण होईल काय त्या बोलण्याने कोणाच्या गोष्टीचा रसभंग होईल कोणास भिती वाटेल व कोणी दचकुन जागे होईल् काय ‍आणि  कोणी त्या बोलण्याची उपेक्षा करेल, म्हणुन न  बोलणे बरे असे त्याला वाटते, आपल्या बोलण्याने कोणाला त्रास होवु नये रागाने कोणाच्या भुवयां उंचावु नये, अशी त्याची मनोमन इच्छा असते, म्हणुन तो उगाच शांत असतो मग आपण बोलावे अशी कोणी कदाचित अंतकरणापासुन प्रार्थना केल्यावर तो त्यांच्याशी  बोलावयास प्रवृत्त होतो, तेव्हा त्याचे बोलणे सत्याशी एकरुप असते व अत्यंत प्रेमसंपन्न असते, जो त्याच्या बोलण्याच्या मुशीत आकाराला आला आहे जणु काही गंगेचे पवित्र जलच त्याच्या बोलण्याच्या रुपाने उसळत आहे वृध्द झालेली पतिव्रता स्त्रि जशी सात्विक गुणांची असुन पतीशी एकनिष्ठ असते, अमृताच्या लाटा ज्याप्रमाणे असाव्यात त्याप्रमाणे त्याच्या मुखातुन येणारे शब्द सत्य, मृदु, मर्यादीत आणि अत्यंत सरळ असतात. (ओवी २६१ ते २७०)

           जे बोलणे विरोध निर्माण करणारे, भांडण वाढविणारे, कोणालाही मानसिक दुख देणारे, जे निर्भत्सना किवां निंदा करणारे, दुसऱ्याला त्रास देणारे, एखाद्याच्या वर्मावर बोट ठेवणारे तसेच जे हट्ट, आवेश, कपटीपणा, आशा लावणारे, संशयात पाडणारे, फसविणारे असते. असे बोलणे त्याच्या वाणीतुन कधी प्रगट होत नाही, अर्जुना! त्याचप्रमाणे ज्याच्या दृष्टीने स्थिती आहे, ज्याने आपल्या भुवया रागाने चढविल्या नाहीत, ज्याच्या कपाळावर आठया पडत नाहीत, प्रत्येक भूतमात्रांमध्ये परमात्मा भरलेला आहे त्याला कदाचित त्रास होईल म्हणुन जो शक्यतो कुणाकडे एकटक पहात नाही,असे असुनही एखाद्या वेळेला अंतकरणातील कृपेच्या बळाने जर डोळे उघडुन तो कोणाकडे पाहिल तर चंद्रबिंबापासुन अमृताच्या धारा प्रगट होतात, त्या डोळयांना दिसत नाहीत  परंतु त्या अमृताच्या धारा प्राशान करुन चकोर पक्षी धष्ट पुष्ट होतात, त्याप्रमाणे ज्या प्राणीमात्रांकडे तो आपल्या कृपादृष्टीने पाहिल, त्याला समाधान लाभत असते, कासवीलादेखील या  कृपादृष्टीतुन प्रगटणारे प्रेम कळत नाही, अधिक काय सांगावे?  सर्व प्राणिमात्रांविषयी त्याची जशी कृपा-दृष्टी असते, तसेच त्याचे हातही कृपाळू असल्याचे दिसुन येईल, ज्याप्रमाणे  सिध्द पुरुषाचे मनोरथ  सिध्द  झालेले असतात, त्याप्रमाणे त्याचे हात व्यापाररहित असतात, भोग भोगण्यास असमर्थ आणि त्याने संन्यास घेतलेला असावा, अग्नी जसा काष्टात नसेल तर ते काष्ट अग्नीविरहीत होते, अ‍थवा जन्मापासुन मुका असणाऱ्या मनुष्याने जसे मौनव्रत धारण करावे. (ओवी २७१ ते २८०)

           त्याप्रमाणे ज्याच्या हाताला काही मिळविण्यासाठी कतर्व्य राहीलेले नसते, त्या अकर्त्या सिध्द पुरुषाचे हात काही कर्म न करता स्वस्थ असतात, वाऱ्याला धक्का लागेल आकाशाला नख  लागेल, अशा कोमल भावनेने तो आपला हात फार हलु देत नाही, अंगावर बसलेली माशी आदी उडवावी, डोळयांत जाणारी घुंगरटी दुर करावी अथवा पश् -पक्ष्यांना हाकलुन दुर करण्यासाठी डोळयांना भीती दायक अर्विभाव करावा, अर्जुना! ज्ञानसंपन्न सिध्द पुरुषाच्या अहिंसेसंबंधी अशा गोष्टी कितीतरी बोलण्यासारख्या आहेत त्याला हातात दंड अथवा काठी घेणे आवडत नाही तर मग हातात शस्त्र घेण्याची गोष्ट कशाला पाहिजे, सहज करमणुकीसाठी हाताने कमळ फिरवल्यास अथवा फुलांची माळ वर फेकून झेलल्यास ते गोफणीप्रमाणे एखाद्या सुक्ष्म जीवाला लागुन त्रास होईल अशा समजुतीने तो असले कर्म हाताने करत नाही. अंगावरील केस  हालविले तर तेथील सुक्ष्म जीव मरुन जातील म्हणुन जो अंग कुरवाळीत नाही, नखे काढली तर हिंसा होईल म्हणुन जो बोटावर नखांची गुंडाळी करुन ठेवतो,  आधी तर हातांना काही कर्तव्य राहिलेले नसते परंतु अशाही स्थितीत काही करण्याचा जर प्रसंग आला तर अत्यंत नम्रभावाने हात जोडणे ही त्याची सवय असते. अथवा भिऊ नकोस असे सांगण्यासाठी हात उचलावेत अथवा कोणी पडलेले असेल तर त्याला उठविण्यासाठी हाताचा आधार द्यावा अथवा पीडीत मनुष्याचे दुख कमी करण्या साठी त्याच्या अंगावरुन प्रेमाने हात फिरवावा. हे सुध्दा त्याच्या हातुन सहजपणे व्यवहाराने घडत असले तरीपण त्यामुळे दुखीताचे भय नाहीसे होते, त्याच्या अंतकरणातील प्रेमकृपेचा भाव चंद्रकिरणांना देखील समजत नाही, त्याच्या प्रेमळ हाताच्या स्पर्शाने मलय पर्वतावरुन येणारा वारादेखील उष्ण, कठिण वाटेल, अशा या कोमल भावमधुर  स्पर्शाने तो पशूंना कुरवाळीत असतो. (ओवी २८१ ते २९०)

          ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडाची मुळे, फांद्या, पाने ही सर्वच शीतल असतात, या चंदनाला फळ येत नाही ; परंतु सुगंध असल्यामुळे ते कधी निष्फळ होत नाही त्याप्रमाणे ते हात सदैव मोकळे असले तरी कृपेचा सुगंध त्यातून प्रगट होतो. आता हा अधिक केलेला विस्तार पुरे ! सज्जनांचे शील व स्वभाव ही ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणेच त्यांच्या हाताचे आचरणही असते. आता त्यांचे मन अहिंसेने कसे परिपूर्ण बनलेले असते हे जर सांगतो म्हणावे तर आतापर्यंत जे सांगितले तो लीलावास कोणाचा आहे ? झाडाच्या फांद्या म्हणजे झाड नव्हे काय ? जलावाचून सागर असतो काय? प्रकाश आणि सूर्य ही काय वेगळी आहेत काय ? शरीर आणि शरीराचे अवयव हे काय वेगळे आहेत काय? तसेच रस आणि पाणी यामध्ये काही भेद आहे काय? म्हणून जे सर्व इंद्रियांचे बाह्य भाव सांगितले ते सर्व मनाचेच आहेत असे समजावे.जमिनीमध्ये जे बी पेरलेले असते तेच बी जमिनीच्या वर वृक्ष झालेले असते. त्याप्रमाणे इंद्रियांच्या द्वारे आतले मनच विस्तार पावलेले असते. जर मनामध्ये अहिंसेचा विचार नसेल तर इंद्रियांच्या माध्यमातून ती बाहेर ओसंडून कशी बरे येऊ शकेल ? अर्जुना, कोणतीही वृत्ती प्रारंभी मनाच्या ठिकाणी निर्माण होते ; आणि नंतर ती वाचेने, दृष्टीने व हाताने घडते. जी गोष्ट मनातच येत नाही ती तोंडाने बोलली तरी जाईल काय ? बीजाशिवाय जमिनीमध्ये अंकुर उत्पन्न होईल काय?  (ओवी २९१ ते ३००)

          ज्याप्रमाणे सूत्रधाराशिवाय कळसूत्री बाहुली हालत नाही त्याप्रमाणे जेव्हा मनात संकल्प-विकल्प निर्माण होत नाहीत तेव्हा इंद्रिये आधीच निर्बल होतात. जे पाणी उगमाच्या ठिकाणीच वाळून गेले आहे ते नदीच्या पात्रातून कसे बरे वाहू शकेल ? प्राण जर निघून गेला तर देहाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हालचाल असते काय? त्याप्रमाणे हे अर्जुना! या इंद्रियांकडून होणाऱ्या कर्माला मन हेच मूळ कारण आहे. मन हेच सर्व इंद्रियांचे द्वारा कर्म करीत असते. परंतु ज्या वेळी जी वृत्ती ज्या प्रकारे मनाच्या आत साकार होऊन असते ती वृत्तीच त्या प्रकारे इंद्रियांच्या कर्माच्या रूपाने प्रगट होते. ज्याप्रमाणे पिकलेल्या फळाचा वास अतिउत्साहाने बोभाटा न करता बाहेर निघत असतो त्याप्रमाणे मनात अहिंसा मोठया प्रमाणात वाढली की ती इंद्रियांच्या कर्मांतून प्रगट होते. म्हणून इंद्रिये ही अहिंसेला पूर्णपणे आपली संपत्ती मानून अहिंसेचा व्यवहार करत असतात. ज्याप्रमाणे सागराला भरती आली म्हणजे समुद्राच्या पाण्याने खाडया भरतात त्याप्रमाणे मनात अहिंसेचे आलेले भरते इंद्रियांच्या कर्मांतही दृष्टीस पडते हे बोलणे आता पुरे झाले. पंतोजी ज्यप्रमाणे लहान मुलाचा हात धरून त्याच्याकडून सुंदर स्पष्ट अक्षर लिहवितो त्याप्रमाणे मनानेच आपला दयाळूपणा हाता-पायापर्यंत आणलेला असतो. त्या इंद्रियांच्याकडून ते अहिंसेचे प्रगटीकरण करते. याकरिता अर्जुना, इंद्रियांच्या अहिंसेच्या वर्णनानेच मनातील अहिंसेच्या वागणुकीचे स्पष्ट वर्णन केले असे जाण. (ओवी ३०१ ते ३१०)

         याप्रमाणे मनाने देहाने आणि वाणीने सर्व प्रकारच्या हिंसेचा त्याग झालेला ज्याच्या ठिकाणी तुला दिसेल  तो पुरूष ज्ञानाचे विलक्षण मंदिर आहे असे समज. फार काय तो मूर्तिमंत ज्ञानच आहे. तो ती अहिंसा कानाने श्रवण करतो जिचे निरूपण शास्त्रशुध्द ग्रंथाच्या आधारे केले जाते ती प्रत्यक्ष पाहावी अशी ज्या वेळेला मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हा त्या ज्ञानी पुरूषाला पहावे. देवाने सांगितलेल्या अहिंसेचे लक्षण मी एका वाक्यात सांगितले पाहिजे होते ; परंतु अहिंसेचे वर्णन फारच मोठे झाले याबद्दल तुम्ही श्रोत्यांनी मला क्षमा करावी. तुम्ही म्हणाल की हिरव्या चाऱ्याच्या लोभाने जनावर जसे पुढे-पुढे जाते आणि आपल्या घरी परत येण्याचे विसरते ; अथवा पक्षी जसा वाऱ्याच्या वेगाने आकाशात विहंगम करतो आणि दूर-दूर राहतो. त्याप्रमाणे अहिंसेवरील प्रेम ह्दयात स्फुरत गेले व काव्यातील रसाळपणाने माझी बुध्दी  दूर-दूर जाऊ लागली. ती आवरता आली नाही, परंतु खरा प्रकार तसा नाही हे समजुन घ्या, अहिंसेसंबंधी जो विस्तार केला त्याला काही कारण आहे, एरवी “अहिंसा” हा शब्द तीनच अक्षरांचा आहे, अहिंसा या शब्दाचा उच्चार करताना त्यात अक्षरे थोडीच वाटतात, परंतु प्राप्त कोटयावधी मतांचे ज्या वेळी खंडन करावे त्या वेळी त्या अहिंसेचे रुप प्रगट होते, येऱ्हवी प्राप्त झालेल्या विविध मतांचे खंडन न करता मी मनातील कल्पनेने बोललो असतो तर माझे बोलणे तुम्हाला पटले नसते, उत्तमोत्तम रत्नांची पारख करणाऱ्या गावात जर शाळीग्राम -शिळा विकल्या जातील तरच त्यांचे गाठोडे सोडावे नाहीतर त्या रत्नपारखी लोकांसमोर गारेचा दगड घेण्याविषयी त्यांची गोड वचनांनी स्तुती करु नये. (ओवी ३११ ते ३२०)

         ऐका, ज्या बाजारात कापराचा वास मंद आहे असे मानतात, त्या बाजारात कापुर म्हणुन पिठाची विक्री कशी बरी होवु शकेल?   म्हणुन श्रोतेहो, तुमच्या सभेमध्ये मी महान वक्ता आहे असा जर मी अभिमान धरला तर माझ्या बोलण्याला मान्यता प्राप्त होणार नाही, अहिंसेचे सामान्य स्वरुप आणि विशेष स्वरुप यांची फोड न करता त्यांचे मिश्रण जर केले असते तर तुम्ही ते कानांवर सुध्दा पडु दिले नसते. मुळामध्ये असणारा शुध्द सिध्दांत शंकेच्या घाणीने जेव्हा मलिन होतो, तेव्हा त्या सिध्दांताकडे असलेले तुमचे लक्ष मागच्या पावलांनीच पळून जाते, ज्या पाण्यावरती संपुर्ण शेवाळे पसरलेले असते, त्या पाण्याकडे हंस पक्षी कधी जातात काय? किवां अभ्राच्या पलीकडे जेव्हा चांदणे पडलेले असेल, तर ते चांदणे सेवन करण्याकरीता चकोर पक्षी चोच कधीही उघडत नाहीत, त्याप्रमाणे जर माझे निरुपण शंकारहित आणि  निर्दोष झाले नाही तर तुम्ही माझ्या ग्रंथाविषयी उत्सुक होणार नाही, माझा ग्रंथ स्वीकारणार नाही एवढेच नव्हे तर उलट तुम्ही माझ्यावर रागवाल. विविध मतांचे खंडन न करता जर मी व्याख्यान केले, तर आक्षेंपाचा संबंध दुर होणार नाही, असे  व्याख्यान मला तुमच्याशी प्रेमसंबंध जोडु देवु शकणार नाही. आणि माझी ग्रंथ रचना तर याच हेतुने आहे की, तुम्ही संतांनी सदैव प्रसन्न होवुन माझ्या समोर असावे. एऱ्हवी विचार करुन पाहिले तर तुम्ही या गीतार्थाचे सोयरे आहात, हे जाणुन मी गीता जीवासारखी धारण केली आहे. (ओवी ३२१ ते ३३०)

        तुम्ही आपले प्रेमधन आणि सर्वस्व मला द्याल, तर मग गीतेला माझ्याकडुन सोडवुन  घेवु शकाल, म्हणुन गीता हा खरोखर ग्रंथ नव्हे तर तुमचे हे माझ्याकडे ठेवलेले तारण आहे. तुम्ही जर आपल्या सर्वस्वाचा लोभ धरुन ठेवलेले तारणाची आशा सोडली मग  गीतेची आणि माझी उपेक्षित गती होईल, हे लक्षात ठेवा. अधिक काय सांगावे? मला तुमच्या कृपाप्रसादाशी कर्तव्य आहे ती कृपा प्राप्त होण्यासाठी मी या ग्रंथाचे निम्मीत केले आहे. तरी तुम्हा विचारवंत  रसिकांना श्रवणास योग्य असे व्याख्यान मला विचार करुन बोलावे लागते, म्हणुन  मी अहिंसेचे विविध प्रकार बोलण्यास प्रवृत्त झालो. त्यामुळे कथेचा विस्तार ती पसरट बनली आणि श्लोकांचा अर्थ दुर राहीला या बद्दल आपण मला लेकरांला क्षमा करावी. भोजन करताना घासामध्ये खडा आला  तर तो काढून टाकण्यास थोडा वेळ लागतो. परंतु हे दूषण नाही ; कारण घासातला खडा काढून टाकणे हेच योग्य आहे. आपला मुलगा चोरांना चुकवून येत असताना त्याला गावात परत येण्यास थोडा वेळ झाला तर आईने त्याच्यावर रागवावे की त्याच्यावरून निंबलोण उतरून टाकावे ? परंतु माझे हे बोलणे याहीपेक्षा चांगले आहे असे काही नाही ; म्हणून तर तुम्ही माझे लांबलेले व्याख्यान सहन केले हेच योग्य झाले. आता श्रीकृष्ण भगवान अर्जुनास काय बोलले  ते ऐका. देव म्हणाले , हे ज्ञानरूपी उत्तम डोळे असलेल्या अर्जुना , तू सावध हो. तुला श्रेष्ठ ज्ञानाचा परिचय करून देत आहे. जेथे कोणत्याही प्रकारच्या आक्रोशावाचून क्षमा असते  तेथे ज्ञान आहेच असे तू समज. (ओवी ३३१ ते ३४०)

          खोल तलावामध्ये ज्याप्रमाणे कमलिनी जशा वाढतात; अथवा भाग्यवान पुरूषाच्या घरी संपत्ती जशी आपोआप येत असते त्याप्रमाणे पार्था, ज्याच्या ठिकाणी  क्षमा वाढते व ती ज्या योगाने कळते ती लक्षणे सांगतो. ज्या भावनेने अंगावर आवडता अलंकार धारण करतात त्याच अनुकूल भावनेने ज्याला सर्व सहन करणे आवडत असते; आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक अशा तीन प्रकारच्या सर्व दुखां:चे समुदाय अंगावर कोसळले, तरी जो कधीही दु:ख मानत नाही ; अपेक्षित अनुकूल भोग ज्या संतोषाने अपेक्षित नसलेले प्रतिकूल भोग जरी प्राप्त झाले, तरी त्यांच्याही तो तसाच मान करतो. जो मान-अपमानांना समान चित्ताने सहन करतो, सुख-दुख:देखील ज्याच्या ठिकाणी सारखी मानली जातात निंदा-स्तुतीनेही जो मनाची भंग होऊ देत नाही, उन्हाच्या तापाने जो तप्त होत नाही व जो हिवाळयाने कापत नाही आणि कसलाही प्रसंग आला तरी जो भीत नाही  मेरू पर्वत जसा स्वत:च्या शिखराचे ओझे मानत नाही अथवा यज्ञवराहरूपाने अवतार धारण केल्यावर पृथ्वीला पाताळातून वर काढताना मला ओझे झाले असे म्हणाला नाही विविध प्रकारच्या जड चेतन भूतांमुळे पृथ्वी दबून जात नाही, त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या सुख-दु:ख द्वंद्वादीमुळे जो कष्टी होत नाही, पाण्याचे लोटच्या लोट घेऊन नदी व नद यांचे समुदाय आले असता समुद्र ज्याप्रमाणे त्या सर्वांचा आपल्यामध्ये समावेश करून घेतो. (ओवी ३४१ ते ३५०)

           ज्याप्रमाणे ज्याच्या ठायी सहन न करण्यासारखे जगात काहीही नाही आणि आपण सहन करतो याचेही ज्याला स्मरण नसते जे जे काही उत्तम-वाईट प्राप्त होईल, ते तो आपले स्वरूप मानतो हा त्याच सहज स्वभाव बनल्यामुळे ‌त्याचे त्याला काही आश्चर्य वाटत नाही, भक्तांमध्ये प्रियोत्तम असलेल्या अर्जुना ! असा कोणत्याही प्रकारचा त्रास न मानता क्षमा ज्याचे अंगी असते  त्याच्या योगाने ज्ञानाला महत्त्व प्राप्त होते असे जाण. अर्जुना ! असा जो पुरूष, तो खरोखर ज्ञानाचा जिव्हाळा ओलावा आहे. आता आर्जवाचे म्हणजे सरळपणाने  निरूपण सांगतो, ते ऐक. प्राणाचा चांगुलपणा वाटेल  त्या प्राणाच्या उद्देशाने जसा एकच असतो त्याप्रमाणे मनाचा सरळपणा हा  असा असतो. सूर्य जसा मनुष्याच्या तोंडाकडे पाहून प्रकाश देत नाही अथवा आकाश जसे सर्वत्र समान रूपाने पसरलेले असते, त्याप्रमाणे ज्याचे मन माणसा-माणसाबद्दल वेगवेगळे नसते आणि ज्याचे आचरणही वेगवेगळे नसते सारे जगच ज्याला ओळखीचे वाटते, त्याचे जगाशी जन्माजन्माचे नाते असते. हा आपला, हा परका, ही भाषाच त्याचे अंत:करण जाणत नाही. कोणाबरोबरही ज्याचा स्नेह जुळत असतो, पाणी जसे सर्वाशी एकरूप होत असते, त्याप्रमाणे ज्याचे चित्त कोणाविषयीही कसल्याही प्रकारची  हरकत घेत नाही. वाऱ्याची धाव जशी सरळ असते त्याप्रमाणे त्याच्या अंत:करणाचे भाव शुध्द सरळ असतात. कोणाविषयीही त्याला शंका नसते आणि कसलीही इच्छा नसते. (ओवी ३५१ ते ३६०)

पुढील भाग