अध्याय १७ भाग ५

 

याप्रमाणे या नाममंत्राने ब्रम्हदेवाला महान ज्ञानी बनविले आणि समर्थ

त्या ओम ‘तत्’ ‘सत्’ या नामाचे स्वरुप श्रवण कर. असे लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण म्हणाले. तरी सर्व मंत्रांचा राजा तो ओमकार या नामातील पहिला वर्ण आहे दुसरा ‘तत्’ व तिसरा ‘सत्’ हे वर्ण आहेत याप्रमाणे ओम ‘तत्’ ‘सत्’ या रुपाने ब्रम्हाचे नाव तीन प्रकारचे आहे, असे हे नाम उपनिषंदाचे सुरेख फुल असुन त्याचा तु योग्य प्रकारे आस्वाद घे. या नामाशी एकरुप होवुन‍ सात्विक कर्माचे आचरण केले तर मोक्ष आपल्या घरचा चाकर होवुन राहतो. दैवयोगाने कापुराचे दागिने जर अचानक कोणी आणुन दिले तर ते कसे वापरावेत, हे कळण्याची अडचण असते. त्याप्रमाणे सात्विक कर्म करण्यास प्रारंभ करता येईल ब्रम्हनामाचा उच्चारही करता येईल परंतु कोणत्या नामाचा कुठे विनियोग करावा हे वर्म जर समजलेनाही. तरी साधुसंत महात्मे मोठया प्रयासाने जर घरी आले तर त्यांचा मानसन्मान करावा. हे जर कळाले नाही तर आणि त्यांच्याशी योग्य वर्तन केले नाही तर पुण्य प्राप्त न होता पुण्याचे भांडवलच कमी होते. उत्तम प्रकारचा शृंगार करण्यासाठी सोने आणि वस्त्र एका वस्त्रामध्ये बांधुन ते गाठोडे गळयात बांधणे जसे व्यर्थ आहे,त्याप्रमाणे मुखाने ब्रम्हनाम घेतले आणि हाताने सात्विक कर्म केले  तरीपण त्याचा विनियोग कळल्यावाचुन ते कर्म निष्फळ होय. असे पाहा की, अन्न जवळ आहे व भुकही लागलेली आहे तरीपण लहान बालकास कसे जेवावे हे माहीत नसल्यामुळे त्याला उपवास घडतो. (ओवी ३४१ ते ३५० )

अथवा अर्जुना!  तेल, वात व अग्नी हे एके ठिकाणी असले तरी दिवा कशा प्रकारे लावावा हे माहीत नसल्यामुळे प्रकाश निर्माण होत नाही, त्याप्रमाणे योग्य देश व काल प्राप्त होवुन कर्म करण्याचा प्रसंग आला त्या कर्माशी संबंधित मंत्रही आठवला तरीदेखील त्या मंत्राचा विनियोग कसा करावा हे कळाले नाही तर सर्व व्यर्थ होते, म्हणुन  ज्यात तीन वर्ण आहेत परंतु जे वस्तुता एकच आहे असे हे जे ब्रम्हज्ञान आहे, त्याचा विनियोग कसा करावा याचे तु श्रवण कर. नामातील ओम तत आणि सत ही तीन अक्षरे अनुक्रमे कर्माच्या आरंभी मध्ये व शेवटी या तीन  ठिकाणी योजावीत हे अर्जुना, याच पध्दतीचा स्वीकार करुन वेदवेत्ते पुरुष हे ब्रम्हाच्या अपरोक्ष ज्ञानाने ऐक्यभावाला प्राप्त झाले, जे ज्ञानी लोक शास्त्राचे तात्पर्य जाणुन बोलतात, ते ब्रम्हास ऐक्य होण्याकरीता यज्ञादी क्रियांचा त्याग करत नाहीत, वेदांचे प्रमुख तात्पर्य जाणणारे लोक कर्माच्या प्रारंभी ओमकाराला ध्यानाचा विषय करतात, म्हणजे प्रथम त्याचे ध्यान करतात, व नंतर वाणीने त्याचा उच्चार करतात, त्या ध्यानाने ओमकारा सिध्द झाल्यावर व नंतर ओमकाराचा उच्चार स्पष्ट केल्यावर मग ते क्रिया करण्यास आरंभ‍ करतात, अंधारामध्ये जसा न विझणारा दिवा अ‍थवा अरण्यामध्ये जसा सामर्थ्यवान सोबती त्याप्रमाणे कर्माच्या आरंभी प्रणव समजावा. धर्माने मिळवलेले पुष्कळ धन वेदांत वर्णन केलेल्यायोग्य देवतेला अर्पण करण्याच्या हेतुने ब्राम्हणाद्वारा अथवा अग्नीद्वारा यज्ञ करतात. ( ओवी ३५१ ते ३६०)

तो वेद जाणारे वेदोक्त विधानांत निष्णात होवुन अश्वानीय, गार्ह्यपत्यव दक्षिण या तीन अग्नीत ते यथाविधी हवन करतात, फार काय वर्णन करावे? विविध प्रकारच्या उत्पत्तीचे जणु क्रियात्मक शरीर स्वीकारुन न आावडणाऱ्या देह-इंद्रिये आणि ऐहीक  भोगाच्या उपाधीचा त्याग करतात. अथवा धर्म, न्याय आणि नीतीने मिळवलेली पवित्र व स्वताचा हक्क असलेली भुमी, वस्त्र व धनांची दाने योग्य देश-काळाचे ठिकाणी योग्य पात्राचे ठिकाणी दान करतात. अथवा एक दिवस आड किवां एक महीना आड चांद्रायण व्रताचे आचरण करुन आपले शरीर शुध्द करुन त्या वेदवेत्यांना प्रणवाचा  उच्चार प्रारंभी केल्यामुळे मोक्षाचे फळ मिळणे सोपे होते, नदीच्या कडेला असलेली नाव पाण्यात लोटतेवेळी आपणास जड लागत असते, परंतु ती पाण्यात आणली  की, तिच्या आधारे पाण्यावरुन तरुन जाता येते, त्याप्रमाणे बंध निर्माण करणाऱ्या या कर्मापासुन या नामाच्या योगाने मनुष्य मुक्त होतो. परंतु आता हे राहु दे, या यज्ञ, दान वगैरे ज्या क्रिया आहेत त्या ओमकाराच्या सहाय्याने मुक्तीच्या योग्यतेस प्राप्त होतात, त्या क्रिया जेव्हा लौकिक फळे देवु पाहतात, तेव्हा त्या लौकिक फळांचा भोग प्राप्त होवुन बंध निर्माण होवु नये म्हणुन त्या वेळी वेदवेत्ते तत् शब्दाचां उपयोग करतात. जी वस्तु सर्व विश्वाच्या पलीकडे आहे जी आपत्ती व विनाशरहीत आहे जी अत्यंत व्यापक आहे जी एक सजातीय-विजातीय भेदरहीत आहे, जी सर्वाना सहजपणे पाहणारी साक्षीरुप आहे जी कार्यकारण भावाच्या पलीकडे आहे. जी अविनाशी, अविकारी आहेती वस्तु तत् शब्दाने सांगितली जाते. हे बुध्दीमान अर्जुना!  ती ब्रम्हवस्तुला व्यक्त अवस्थेत आणतात आणि या विचाराने तिचे चित्तामध्येध्यान करुन नंतर तत् नामाच्या उच्चाराने त्या ब्रम्हवस्तुला व्यक्त अवस्थेत आणतात आणि त्याचे परोक्ष ज्ञान प्राप्त करुन ‍ घेतात. ( ओवी ३६१ ते ३७०)

आणि असे म्हणतात की, तद्रुपी जे ब्रम्ह, त्याला फळासह सर्व क्रिया अर्पण असो आम्हाला भोगण्याकरीता काहीही न राहो. याप्रमाणे ‘तत्’ स्वरुपी ब्रम्हाकडे सर्व कर्माचा व फलाचा हिशोब देवुन न मम म्हणजे ही कर्मे व फळे  माझी नाहीत असे म्हणून आपला व कर्माचा संबंध त्यागतात, आता ओमकाराचा उच्चार करुन ज्या कर्माचा आरंभ झाला ‘तत्’ या नावाच्या उच्चाराने जे कर्म ब्रम्हाला समर्पण केले अशा प्रकारे ज्या कर्माला ब्रम्हरुपता आली आहे ते कर्म खरोखर जरी ब्रम्हरुप झाले तरी देखील तेवढयाने कार्य भार सिध्द होत नाही, कारण कर्ता हा आपल्याला ब्रम्हाहुन वेगळा समजतो, मीठ पाण्यात टाकले असता विरुन जाते पण त्याचा खारटपणा पाण्यापेक्षा वेगळा असतो, त्याप्रमाणे कर्म जरी ‍ब्रम्हाकार झाले तरी कर्ता वेगळा उरतो ते द्वैत भासते, जोपर्यत द्वैतभाव आहे तोपर्यत संसारभय जात नाही, हे देव आपल्या मुखाने सांगतात आणि वेदांच्या द्वारेही सांगतात. म्हणुन ब्रम्हयाच्या ठिकाणी असलेले द्वैत हे ‘तत्’ या शब्दांच्या ज्ञानाने नाहीसे होण्याकरीता देवाने सत् हा शब्द शिल्लक ठेवला आहे, तरी जे कर्म ओमकाराच्या विनियोगाने आरंभिले तत शब्दांच्या विनियोगाने ब्रम्हस्वरुप केले आणि जे कर्म प्रशस्त अशा ‘सत्’ या शब्दाने  वर्णिले आहे त्‍या प्रशस्त कर्माचे ठिकाणीच ‘सत्’ शब्दांचा विनियोग आहे तो विनियोग जसा आहे तसाच तुला सांगतो तरी त्याचे श्रवण कर. ‘सत्’ शब्दाने असत पदार्थमात्राचा निरास करुन व्यापक सत्तेचे म्हणजे ब्रम्हयाचे स्वरुप दाखविले जाते. ( ओवी ३७१ ते ३८०)

ज्या सत्तेचे स्वरुप देशकालाने बदलणे जाणत नाही व जी सत्ता आपण आपल्या ठिकाणी अखंडीत ‘सत्’ आहे, हे जेवढे साकार विश्व दिसत आहे तेवढे ‘असत्’ असल्यामुळे जी ब्रम्हवस्तु ते विश्व नाही असे अनुभवल्यानंतर ज्या ब्रम्हवस्तुच्या स्वरुपात आश्रय मिळतो जे कर्मापुर्वी ‘तत्’ या नावाने सर्वात्मक ब्रम्ह बनलेले होते तेच कर्म‍ नंतर ‘सत्’ या नावाने प्रशस्त होते कर्म करणाऱ्या पुरुषाने ‘सत्’ शी आपण एकरुप आहोत अशा  ज्ञानाने ब्रम्हस्वरुप झालेल्या कर्माप्रमाणे आपल्यालाही ब्रम्हरुप  करुन पाहावे ओमकार आणि ‘तत्’ कार यांनी जे ब्रम्हरुप झाल्याचे दाखवले ते गिळुन कर्म ब्रम्हस्वरुप झाले हे खरे आहे परंतु हे‍ कृत्य करणारा मी वेगळा आहे ही भावना न धरता एकदम सन्मात्र ब्रम्हस्वरुप व्हावे असा हा ‘सत्’ शब्दांचा विनियोग कर्म करणाऱ्याला ब्रम्हस्वरुप करीत असल्यामुळे ओम ‘तत्’ या शब्दापेक्षा अंतरंग आहे, असे श्री लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणतात, मी श्री ज्ञानदेव असे म्हणत नाही हे श्रोत्यांनी जाणुन घ्यावे. अथवा असे माझे बोलणे आहे असे जर मी म्हटले असते तर मी भगवंताहुन वेगळा आहे असे झाले असते म्हणुन हे बोलणे देवाचेच आहे असे जाणावे. आता ‘सत’ हा शब्द आणखीही एका प्रकाराने जो सात्विक कर्मावर जे उपकार करतो त्याचे लक्षपुर्वक श्रवण कर. ‘सत’ कर्मे यथाविधी उत्तम प्रकाराने सुरु असता त्यात एखाद्या अंगाने जेव्हा उणेपणा येतो तेव्हा शरीराचा एखादा अवयव कमी असला म्हणजे शरीराचे कर्म थांबते, किवां रथाचा एखादा भाग कमी झाल्यावर रथांची गती जशी कमी होते तसे ‘सत्’ कर्म हे उत्तम आहे हे खरे तरी पण ज्या वेळी एखाद्याच गुणाच्या अभावी ते ‘असत्’ होते. (ओवी ३८१ ते ३९०)

तेव्हा ॐकार आणि तत्कार यांनी उत्तम प्रकारे साहाय्य कलेला हा ‘सत्’ शब्द कर्माचा जीर्णोध्दार करतो. हा ‘सत्’ शब्द आपल्या सत्पणाच्या सामर्थ्याने ते कर्माचे असतपण नाहीसे करतो आणि त्या कर्माला सत्पणाच्या महत्त्वास प्राप्त करून देतो. रोगी माणसास अमृतासारखे दिव्य औषध जसे प्राप्त व्हावे अथवा धैर्य खचलेल्या मनुष्यास कोठूनतरी साहाय्य मिळावे, त्याप्रमाणे ‘सत्’ हा शब्द व्यंग झालेल्या कर्माचा न्यूनपणा नाहीसा करतो, असे जाण. अथवा काही प्रमादाने कर्म जर आपली मर्यादा सोडून जर निषिध्द मार्गाने गेले- नेहमी वाटचाल करणारा एखादा मनुष्य वाट चुकतो आणि परीक्षकालाही भ्रम होतो; कारण व्यवहारामध्ये चुकीने काय काय घडत नाही? म्हणून तशी कर्माची अविचाराने मर्यादा सुटली, तर त्याला निषिध्द कर्माचे वाईट नाव प्राप्त होते. ॐकार व तत्कार या दोहोंपेक्षा ज्ञाता असा जो हा ‘सत्’ शब्‍द, त्याची योजना केली असता हा वाईट कर्माचे चांगले कर्म निर्माण करतो. परिसाचे घर्षण जसे लोखंडाला सुवर्ण बनविते, गंगेचे मीलन जसे ओहोळाला पवित्र करते अथवा अमृताचा वर्षाव ज्याप्रमाणे मृताला अमृत करतो, हे वीरेशा अर्जुना, तसा असत्‍ कर्माला ‘सत्’ या शब्दाचा प्रयोग होय. असो हे वर्णन असो. या ‘सत्’ नामाचे असे महत्त्व आहे. अशा प्रकारे ‘सत्’ शब्दाचे वर्म जाणून घेऊन जेव्हा तू त्या नामाचा विचार करशील, तेव्हा हे नामच केवळ ब्रह्म आहे, असे तू जाणशील. ( ओवी ३९१ ते ४०० )

असे पहा की, ‘ॐतत् सत्’ ही अक्षरे साधकास त्या अर्थाचा बोध करून देतात की, ज्या ठिकाणाहून या अखिल दृश्य विश्वाचे प्रकाशन होते. ते परब्रह्म तर सर्व प्रकारच्या विशेषांनी रहित आहे, परिशुध्द आहे व त्याच परब्रह्माचे ‘ॐ तत् सत्’ हे अंतरंगदर्शक नाम आहे. परंतु ज्याप्रमाणे आकाशाला आकाशच आश्रय आहे, त्याप्रमाणे ॐ तत्‍ सत् या अक्षरांना ब्रह्माचाच आश्रय आहे. आकाशामध्ये उदय पावल्यानंतर सूर्यच सूर्याला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे ‘ॐ तत् सत्’ या नावाचा उच्चार परब्रह्मालाच प्रकाशित करतो. म्हणून हे केवळ तीन अक्षरांचे नाम नसून केवळ परब्रह्माचे आहे. म्हणून ब्रह्मप्राप्तीसाठी सर्व कर्मे करावीत. यज्ञयाग, दान अथवा गहन तप यापैकी कोणतेही कर्म पूर्णपणाने सिध्दीस जावो अथवा काही अंगाने न्यून होऊन मध्येच बंद पडो, परिसाच्या कसोटीवर शुध्द सोने व मिश्रीत सोने ही भाषा संभवत नाही, त्याप्रमाणे कर्म जर ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केले, तर ते ब्रह्मरूप होते. ज्याप्रमाणे सागरात वेगवेगळया नद्यांचा भेद निवडता येत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपात न्यून कर्माचे आणि पूर्ण कर्माचे भेद उरत नाहीत, हे लक्षात ठेव. याप्रमाणे परमार्थाविषयी डोळस असलेल्या अर्जुना, ब्रह्मनाची शक्ती तुला अनेक दृष्टांतांनी उघड करून सांगितली; आणि एक-एक अक्षराच्या कर्माच्या आदि, मध्ये आणि अंती वेगवेगळा विनियोग कशा प्रकारे करावा, हे उत्तम रीतीने सांगितले. (ओवी  ४०१ ते ४१०)

हे मर्मज्ञानी अर्जुना, याप्रमाणे असे हे ब्रम्हनाम उत्कृष्ट प्रकारचे व महत्वाचे असल्याशिवाय तु जाणलेस ना? आता यापुढे सदैव याच नामावर परमश्रध्दा ठेलीस तर तु जन्म-मरणरुपी चक्रातुन मुक्त होशील. ज्या कर्मामध्ये ब्रम्हनामाचा आश्रय त्यागुन सात्विक आधार नाहीवा करुन व केवळ  दुराग्रहाचे बल वाढवुन मग  कोटयावधी अश्वमेध यज्ञ केले सर्व पृथ्वी रत्नांनी भरुन दान दिली अथवा एका अंगुष्ठावर उभे राहुन हजारो वर्ष तपश्चर्या केली लोकांना पाणी पिण्यासाठी अथवा शेतीला देण्यासाठी समुद्राप्रमाणे तळे निर्माण केले तरीपण ती सर्व कर्मे नामाशिवाय आणि सात्विक श्रध्देशिवाय व्यर्थ होतात.खडकावर पाऊस पडला किवां भस्मामध्ये आहुती दिली अथवा सावलीला आलिंगन दिले किवां आकाशाला चापटया मारल्या तर ती जशी व्यर्थ जाते त्याप्रमाणे हे सर्व समारंभ फळाच्या दृष्टीने शुन्य होतात. घाण्यामध्ये गोटे घालुन गाळले तर त्यापासुन तेल अथवा पेंड प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे अशा गोष्टीपासुन स्वताय दारिद्रय तेवढे प्राप्त होते. पदरामध्ये खापरकुंडी बांधुन आपल्या गावात अथवा परगावात गेलो तरी ती जवळची नाहीशी न होता उपाशी मारुन टाकते. (ओवी  ४११ ते ४२०)

त्याप्रमाणे अशा प्रकारच्या कर्माने इहलोकातील सुख जेथे भोगायला मिळत नाही तेथे परलोकातील सुखाची कशी अपेक्षा करावी?  म्हणुन ब्रम्हज्ञान व सात्विक श्रध्देला त्यागुन कर्माचा जो लौकीक व्यवहार केला जातो तो दृष्‍ट-अदृष्ट फलाविषयी एक प्रकारचा शीणच असतो असो हे विवेचन पुरे. पापरुपी हत्तीचे  नाश करणारे सिहं , आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक या त्रिविध तापरुपी अंधाराचा नाश करणारा सुर्य,लक्ष्मीपती हे सर्व वीरांमध्ये श्रेष्ठ श्रीकृष्ण, त्यांनी हे कर्माचे रहस्य प्रगट केले, चंद्र जसा चांदण्याच्या प्रकाशात हरपला जातो त्याप्रमाणे भगवंताच्या या अमृतमय बोलण्याने अर्जुन आत्मानंदामध्ये तल्लीन होवुन गेला. अहो संग्राम हा केवळ वाणी आहे, आणि बाणांची टोके हीच त्याची मापे आहेत त्यांनी जीविताचे जणु  काही माप घेतले आहे, अशा रणभूमीवर कर्कश आवाजात अर्जुन कसे स्वराज्य भोगत आहे हे काही कळत नाही, आजच्या प्रसंगी हा भाग्याचा उत्कर्ष अर्जुंनाशिवाय दुसऱ्या कोणाच्याही दैवात नाही . संजय म्हणाला, हे कौरव राजा!  धृतराष्ट्रा, आपल्या शत्रुच्या गुणांबद्दल आनंद मानुया आणि हे दोन्ही झाले नसते तर आम्हाला परमार्थाचे विचार कसे ऐकण्यास मिळाले असते? आपण अज्ञानरुपी अंधारात जन्म-मरणाच्या चक्रात सापडलो होतो तोच अर्जुनाने आत्मज्ञान प्रकाशरपी मंदिरात आम्हाला आणुन सोडले. एवढा महान उपकार अर्जुनाने आमच्यावर व तुमच्यावर केला आहे, म्हणुन हा महर्षी व्यासाप्रमाणे आपला गुरू झाला आहे. संजय आपल्या मनातल्या मनात म्हणाला मी जी अर्जुनाची अतिशय स्तुती केली ती खरोखर धृतराष्ट्रास सहन होणार नाही, तरी आता जास्त बोलण्यात अर्थ नाही.याप्रमाणे संजयाने हे बोलणे सोडून अर्जुनाने श्रीकृष्णालाजी दुसरी गोष्ट विचारली ती सांगण्यास प्रारंभ केला. श्री निवृत्तीनाथांचे परमशिष्य  श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, अर्जुनाने आणखी प्रश्न विचारले ते मी सांगतो, तरी श्रोत्यांनी मन एकाग्र करुन  ऐकावे.

सर्व श्रेष्ठ ग्रंथराज सार्थज्ञानेश्वरीचा सतरावा अध्याय श्री भगवंताच्या कृपेने संपन्न !

(श्री भगवदगीता श्लोक ते२८ आणि मराठीत भाषांतरीत ज्ञानेश्वरी ओव्या ते ४३३)

पुढील अध्याय