अध्याय १८ भाग १७

          तसे स्वर्ग किवां नरक प्राप्त होण्यास साधनभुत जे धर्म व अधर्म ज्या अज्ञानापासुन उत्पन्न होतात, त्या अज्ञानाचा आत्मज्ञानाने संपुर्ण नाश करुन टाक, जो दोरावर सर्पाचा भास झालेला असतो तो दोर हातात  घेतल्यावर जसा सर्पाचा भास नाहीसा होतो अथवा झोप संपली म्हणजे स्वप्नातील घर  व त्यातील प्रपंच नाहीसा  होतो, किवां कावीळ  नाहीशी झाल्यावर चंद्रात भासणारा पिवळा प्रकाश जसा नाहीसा होतो, तसेच व्याधी बरी झाल्यावर तोंडाचा कडुपणा जसा नाहीसा होतो, हे अर्जुना! दिवस मावळल्यावर मृगजळ जसे नाहीसे होते अथवा लाकडाचा त्याग केला म्हणजे अग्नीचा जसा त्याग होतो, त्याप्रमाणे मिथ्या धर्म-अधर्माला  दाखविणारे जे मूळ अज्ञान, त्या अज्ञानाचा त्याग करावा, म्हणजे सर्व धर्म आपोआप लयाला जातील, ज्याप्रमाणे निद्रेसह स्वप्न गेले असता आपण एकटे उरतो, त्याप्रमाणे अज्ञान नष्ट झाल्यावर मीच एक आपोआप असतो. त्याप्रमाणे माझ्या एकटयावाचुन स्वरुपता भिन्न-अभिन्न असे दुसरे काहीच नाही, त्या माझ्या अखंड स्वरुपाच्या ठिकाणी तो मीच आहे, अशा ज्ञानाने तु माझ्याशी एकरुप हो. अर्जुना!  आपल्याला माझ्यावाचुन भिन्न न मानता जे माझे एकपण आत्मत्वाने जाणायचे, त्याचेच नाव “मला शरण येणे” होय. घटाचा नाश झाला म्हणजे घटाकाश महाकाशामध्ये प्रवेश करतो, तसे मला शरण आलास म्हणजे माझ्या स्वरुपी ऐक्‍य पावशील, सुवर्णाचा मणी सुवर्णाशी जसा ऐक्यरुप असतो अथवा पाण्याची लाट जशी पाण्याशी ऐक्यरुपाने असते  अशा प्रकारे हे धनंजया , तु मला अभेदाने शरण ये.   (ओवी १३९१ ते १४००)

अर्जुना, शरणागती शिवाय वडवानळ हा आश्रयसाठी सागराच्या पोटी वास्तव्यास येतो, परंतु तो सागररूप तर होत नाहीच; उलट सागराचे पाणी जाळून तेथेच राहतो. तसे माझ्यापासून भिन्न राहून शरण येण्याच्या गोष्टी त्यागून दे. मला शरण येउुनही जीवाभावाने वेगळा राहतो, असे बोलण्याला त्याची बुध्दी का बरे साथ देते? अशा बोलण्याचा धिक्कार असो. अर्जुना, राजाने जिचा अंगीकार केला, अशी ती सामान्य दासी जरी असली, तरी ती राजाच्या बरोबरीला येते. मी विश्वेश्वर एखाद्या भक्तास भेटलो, तरी त्याच्या जीवदशेचे बंधन तुटत नाही, हे अमंगल बोलणेदेखील कानांवर पडू देऊ नकोस. म्हणून मद्रूप होऊन माझी भक्ती करणे, ही सहजभक्ती आहे. अशी भक्ती या ज्ञानाने प्राप्त करून घे. ताकातून काढलेले लोणी ताकामध्ये पुन्हा घातले, तरी ते लोणी ताकामध्ये काहीही केले, तरी मिसळत नाही, त्याप्रमाणे मला अभेदाने शरण आल्यावर धर्म-अधर्म हे तुला स्पर्श करू शकणार नाहीत. लोखंड जरी उभे टांगून ठेवले, तरी त्याला गंज चढत असतो; परंतु तेच लोखंड परिसाच्या संगतीने सोने झाल्यावर त्याला गंज चढत नाही. फार काय सांगावे? काष्ठ मंथून काढलेला अग्नी हा जसा काष्ठात कोंडून ठेवता येत नाही. अर्जुना, सूर्याला जसा अंधकार भेटत नाही; अथवा जागे झालेल्याला स्वप्न जसे दृष्टीस पडत नाही. (ओवी संख्या १४०१ ते १४१०)

त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावल्यावर मी जो सर्वस्वरूप आहे, त्या माझ्याशिवाय वेगळेपणा न उरकण्याकरता काही कारण आहे काय? म्हणून तो आपल्या ठिकाणी तुझ्या धर्म-अधर्माविषयी काहीही चिंता करू नकोस. तुझे सर्व पाप-पुण्य मीच होईन. सर्व बंध देणारे असे जे पाप, त्याचे लक्षण हे होय की, आपण कोणीतरी आहोत, असे वाटणे आणि माझ्याहून भिन्नत्वाने उरणे. ते पाप माझ्या सतस्वरूप ज्ञानाने नाहीसे होईल. हे अर्जुना! जलात मीठ पडल्यानंतर ते आपण नाहीसे होऊन सर्व जलरूप होते, त्याप्रमाणे तू अनन्यभावाने मला शरण आलास, म्हणजे मद्रुपच होशील. हे धनंजया, एवढे जाणले, की तू मुक्त झालास, हे समज. या करता ‘मी ब्रह्म आहे’, असे परोक्ष ज्ञान प्राप्त करून घे, म्हणजे मी तुला सर्व प्रकारच्या बंधनापासून मुक्त करीन. म्हणून या कारणाने शुध्द बुध्दी असलेल्या अर्जुना, धर्म-अधर्माची चिंता चित्तामध्ये ठेवू नकोस. तू मलाच एकाला अभेदाने जाणून शरण ये. सर्व रूपांच्या योगाने जो रूपवान आहे, सर्व दृष्टींची दृष्टी व जो सर्व देशांत राहणारा आहे, त्या श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाला सांगितले. मग त्या सावळया श्रीकृष्णाने आपले आभूषणयुक्त बाहू पसरून स्वत:ला शरण आलेल्या भक्तराज अर्जुनाला प्रेमाने आलिंगन दिले. ज्याला प्राप्त न होता वाचाही बुध्दीला काखेत घालून माघारी परतली, असे जे बुध्दीला व वाचेला आकलन न होणारे स्वरूप, ते अर्जुनाला देण्यासाठी श्रीकृष्णाने आलिंगनाचे निमित्त केले. (ओवी संख्या १४११ ते १४२०)

आलिंगनाच्या निमित्ताने ह्रदयाचे ह्रदयाशी ऐक्य झाले. या ह्रदयातील ज्ञान त्या ह्रदयात घातले गेले. श्रीकृष्णाने दोघांतील त्या व्यावहारिक सत्तेचे द्वैत न मोडता अर्जुनाला पारमार्थिक सत्तेच्या आधारे आपणासारखे केले. एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता, दिसावयास जरी ते दोन दिसतात, तरी प्रकाशाच्या दृष्टीने त्यांचे ऐक्य मोडत नाही, त्याप्रमाणे तो आलिंगनाचा प्रकार झाला म्हणजे देव आणि भक्त हा द्वैतभाव न मोडता श्रीकृष्णाने अर्जुनाला आपल्या स्वरूपी मिळवून घेतले. तेव्हा मग त्या अर्जुनाला आनंदाचा एवढा मोठा पूर आला की, देव विराट या पुरात बुडून गेले. एखाद्या समुद्रात दुसरा समुद्र भेटावयास गेला, तर त्यांचे मिळणे एकीकडे राहते व पाणी दुप्पट होते. शिवाय, भरती आकाशात प्रवेश करते. तसे श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या आलिंगनाचे प्रेम दोघांनाही आवरेना, ते कोणी जाणावे? अधिक काय सांगावे? सर्व विश्व नारायणाने कोंदटून गेले. याप्रमाणे वेदांचे सूत्ररूपाने असलेले मूळ आणि ज्याच्या श्रवण-पठणाचा सर्वांना अधिकार आहे, असे पवित्र गीताशास्त्र भगवान श्रीकृष्णाने प्रकट केले. ”इथे गीता ही नित्य नूतन वेदांचे मूळ सूत्र आहे, असे कसे तुमच्या बोधास आले?” असे श्रोत्यांनी विचारले; तर ज्ञानेश्वरमाउली म्हणाले, ”याविषयी तुम्हाला ती प्रसिध्द कारणे सांगतो.” ज्याच्या नि:श्वासापासून वेदराशीचा जन्म झाला, तो सत्यप्रतिज्ञ भगवान श्रीकृष्ण प्रतिज्ञापूर्वक स्वमुखाने गीताशास्त्र बोलला. म्हणून गीताशास्त्र हे वेदांचे मूळ आहे, हे म्हणणे योग्य आहे. यासंबंधी आणखीही एक कारण आहे. जे स्वरूपाने विस्तार न पावता, ज्याचा विस्तार जेथे लीन होऊन राहतो, ते त्याचे बीज असते, असे जगात बीजाचे लक्षण बोलेले जाते.(ओवी १४२१ ते १४३०)

ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये गुप्तरूपाने असतो, त्याप्रमाणे कर्म, ज्ञान व उपासना व ज्ञान हे त्रिकांडवेद गीतेमध्ये सूक्ष्मरूपाने आहेत; म्हणून वेदांचे मूळ गीता आहे, असे मला वाटते आणि ते सहजदेखील दिसत आहे. रत्न-अलंकारानी सर्व अंग जसे शोभते, त्याप्रमाणे वेदांचे कर्म, उपासना व ज्ञान हे तीन भाग गीतेमध्ये सुशोभितपणाने प्रगट झाले आहेत. ती कर्म, ज्ञान, उपासना ही तीन कांडे कोणत्या कोणत्या  ठिकाणी गीतेमध्ये आहेत, ते तुमच्या डोळयांना स्पष्ट दाखवितो, तरी एकाग्रतेने श्रवण कर. पहिल्या अध्यायात गीताशास्त्राच्या प्रवृत्तीची प्रस्तावना आहे आणि दुसऱ्या अध्यायात सांख्याशास्त्राचा अभिप्राय थोडक्यात स्पष्टपणे सांगितला आहे. हे गीताशास्त्र ज्ञानप्रधान असून मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे, हा अर्थ सूत्ररूपाने दुसऱ्या अध्यायात सांगितला आहे. मग अज्ञानाने बांधलेल्या जीवास मोक्षपदाची प्राप्ती होण्याकरिता साधनांचा जो आरंभ निष्काम कर्मयोग, तो तिसऱ्या अध्यायात सांगितला आहे. जे देह-अभिमानाने बध्द आहेत, त्यांनी काम्य व निषिध्द कर्मांचा त्याग करावा, केवळ विहित कर्मे कर्तृत्‍व अहंकार व फळाशा त्यागून करवीत, अशा रीतीने सदभावनेने कर्माचे आचरण करावे, असे देवांनी तिसऱ्या अध्यायात सांगितले आहे. ते वेदप्रतिपादित कर्मकांड जाणावे. आणि तेच नित्य-नैमित्यिक कर्म आचरिले असता अज्ञानापासून सोडविणारे कसे होईल? (ओवी १४३१ ते १४४०)

अशी इच्छा झाली असता म्हणजे बध्द पुरुषाला मोक्षाची इच्छा झाली असता त्याच्या करीता देवाने ब्रम्हापर्ण बुध्दीने कर्म करणे  सांगितले. काया, वाचा, मनाने जे विहित कर्म उत्पन्न होते ते ईश्वरार्पण बुध्दीने करावे असे सांगितलेले आहे. कर्मयोग्याने ईश्वराची उपासना कशा प्रकारे करावी ळया सांगण्याच्या विषयासं चौथ्या अध्यायाच्या शेवटी प्रारंभ केला आहे, तो प्रकार विश्वरुपदर्शन ही अकरावा  अध्याय संपेपर्यत सर्व कर्मे ईश्वराला अर्पण करुन त्याचे भजन कसे करावे हे सांगितलेले आहे, चौथा अध्यायाच्या शेवटच्या भागापासुन अकराव्या अध्यायापर्यत म्हणजे या आठ अध्यायांत देवताकांड म्हणजे उपासनाकांड यांचे वर्णन केले आहे, अये गीताशास्त्र आडपडदयातुन सांगते आणि मी तो आड-पडदा दुर करुन उघडपणे बोलत आहे, आणि त्याच ईश्वरप्रसादाने सदगुरु-परंपरेने प्राप्त झालेले प्रेमरुप आणि खरे जे ज्ञान प्रगट होते ते ज्ञान बाराव्या अध्यायामधील अद्वेष्टा सर्वभुतानां या श्लोकापासुन अथवा तेराव्या अययायातील अमानित्वम् आदी श्लोकांमधुंन विस्तारपुर्वक‍कथन केले आहे, म्हणुन बाराव्या अध्यायाची गणना ज्ञानकांडात करु, त्या बाराव्या अध्यायाच्या प्रारंभापासुन पंधराव्या अध्यायाच्या शेवटपर्यत या चार अध्यायांत ज्ञानफल आणि त्याच्या सिध्दी यांचे वर्णन केले आहे.‍ म्हणुन संसारवृक्षाचे ऊर्ध्वमुळ म्हणुन ज्याच्या मध्ये वर्णन  केले आहे, त्या पंधराव्या अध्यायापर्यत म्हणजेच बारा ते पंधरा या चार अध्यायांमध्ये ज्ञानकांडाचे निरुपण सांगितले आहे, अशा प्रकारे कर्म, ज्ञान व उपासना या कांडत्रयाचे निरुपण करणारी गीता ही लहानशी गोजीरवाणी श्रुतीच आहे, या श्रुतीने गीताश्लोकरुपी रत्नांचे अलंकार घातले आहेत. (ओवी १४४१ ते १४५०)

हे वर्णन असुन, अशी ही तीन कांडत्रयात्मक श्रुती जे एक मोक्षरुपी फळ प्राप्त करुन घ्यावे म्हणुन सर्वाना गर्जना करुन सांगते. त्या मोक्षाचे साधन असलेल्या त्या ज्ञानाशी सदैव वैर करणारा जो दंभादी सहा अज्ञानांच्या  दोषांचा समुदाय सोळाव्या अध्यायात सांगितलेला आहे, त्या शत्रुला वेदांसारखा मार्गदशक बरोबर घेवुन जिंकावे, हा निरोप देवांनी सतराव्या अध्यायात सांगितलेला आहे . याप्रमाणे पंधराव्या अध्यायापासुन तो  शेवट सतराव्या अध्यायापर्यत देवांना आपला निश्वास जो वेद तो स्वमुखाने गीतेत स्पष्ट करुन सांगितला आहे, त्या सर्व अध्यायांचे तात्पर्य ज्या अठराव्या अध्यायात आहे तो हा अठरावा अध्याय कळसाध्याय आहे. याप्रमाणे भगवदगीतारुप काव्यग्रथं सर्व प्रकारे आत्मज्ञानाचा महासागर असुन औदार्याने विशेष असा मुर्तीमुतं वेद आहे असे जाण. वेद हा मूळामध्ये आत्मज्ञानाने संपन्न आहे परंतु त्याच्यासारखा कृपण कोणीही नाही कारण तो ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य या तीन वर्णाच्याच कानी लागला या तीन वर्णानांच उपनयनपुर्वक वेदांच्या अध्ययनाचा आणि वेदश्रवणांचा अधिकार आहे. अशी आज्ञा आहे, इतर स्त्री-शुद्रादिक प्राण्यांना तीन वर्णाप्रमाणेच भवदुख असुनही वेदांच्या  अध्ययनाचा आणि वेदश्रवणांचा अधिकार नाही, असे ठरवुन वेद स्वस्थ बसला आहे. म्हणुन विचार केला असता मला असे दिसते की तो आपला मागील कमीपणा नाहीसा करण्यासाठी येथे आपल्याला सत्कीर्ती मिळावी या हेतुने सर्वानी आपले सेवन करावे म्हणुन हा वेदच गीतारुपाने पुन्हा प्रगट झाला आहे, अशा प्रकारे वेद सुलभ झाला नाही काय? कारण तो अर्थाने मनात प्रवेश करतो, श्रवणाने कानांमध्ये शिरतो, आणि जपाच्या निमित्ताने तोंडात बसुन तो वेद गीतेच्या रुपाने सर्व इंद्रियांना सेवन करण्यास योग्य झाला आहे. (ओवी १४५१ ते १४६०)

हया गीतेचा जो नित्य पाठ करतो अथवा त्याच्या संगतीत राहुन गीता लिहुन जो लोकांस देतो, अशा प्रकारे तो प्राणीमात्रांस सर्वाना संसारामध्ये शुध्द मोक्षसुखाचे अन्नछत्र घालतो. ताऱ्यांना आकाशामध्ये राहण्यासाठी मनुष्य वृक्ष, पर्वतादीना पृथ्वीवर वसविण्यासाठी, सुर्यप्रकाशाला संचार करण्यासाठी आधार जसे आकाश आहे. त्याप्रमाणे गीता-अध्ययन करणारा उत्तम अथवा अधम असे कोणास विचारत नाही तर सर्वानां मोक्ष देवुन जगाला आनंद प्रदान करतो. याकरता वेद हा आपल्या कृपनपणाच्या अपकिर्तीला घाबरला आणि गीतेच्या पोटात शिरला त्यामूळे लोक वेदांला चांगले म्हणू लागले व त्याचीं किर्ती वाढली. म्हणुन वेदांचे उत्तम सेवन करण्यासारखे जे मुर्तिमंत ती ही गीता होय. ही गीता श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेशिली आहे गायीने वासरासाठी सोडलेल्या पान्हयामुळे घरातील सर्वाना दुध -दुभते मिळत असते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने सांगितलेली गीता जगाच्या उध्दारास कारण झाली चातकाच्या दयेने मेघ जसा पाणी घेवुन धावत येत असतो तेव्हा संपुर्ण चराचरास जलाच्या वर्षावाने शांतता लाभत ‍असते, सुर्याशिवाय ज्याला दुसरी गती नाही अशा कमळाकरीता सुर्य प्रत्येक दिवशी उदय पावत असतो परंतु सुर्याच्या उदयाने त्रिभुवनाच्या डोळयांना सुख लाभत असते. त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने लक्ष्मीपती भगवंताने गीतेतील आत्मज्ञान प्रकट करुन जगाच्या डोक्यावर असलेले जन्ममरणाच्या दुखाचे ओझे नाहीसे केले.  ( ओवी १४६१ ते १४७० )

पुढील भाग