अध्याय १८ भाग ११

          शेतीच्या उद्योगावर जगणे, गाईचे रक्षण करणे आणि स्वस्त वस्तु आणुन ती जादा पैसे घेवुन विकणे, अर्जुना! वैश्यांनी या तीन प्रकारचे कर्म करुन निर्वाह करणे हा त्यांचा स्वाभाविक धर्म होय. आई-वडील आणि संस्कार या दोन कारणांपासुन दोन वेळा जन्माला आलेले वैश्य, क्षत्रिय  व ब्राम्हण या तीन वर्णाची सेवा ते शुद्राचे स्वाभाविक कर्म होय. द्विज-सेवेपलीकडे दुसऱ्या कर्तव्याकडे  धावणे नाही, याप्रमाणे चार वर्णानां योग्य अशी कर्मे तुला सांगितली. हे चतुर अर्जुना! ज्याप्रमाणे शब्दादी विषय श्रोतादी इंद्रियांना योग्य आहेत त्याप्रमाणे हीच कर्मे या निरनिराळया चार वर्णाना योग्य आहेत. जसे अर्जुना, मेघापासुन पडलेल्या जलाला मिळण्यासाठी नदी योग्य स्थान आहे आणि नदीला मिळण्यासाठी सागरच योग्य स्थान आहे, वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे आवश्यक असे कर्म आहे, ते केले असता गोऱ्या अंगास जसा गोरेपणा शोभा देतो, त्याप्रमाणे त्या वर्णास अत्यंत शोभा देतो. हे वीरोत्तम अर्जुना!  स्वभावजन्य कर्माचे, शास्त्रामध्ये वर्णन केल्याप्रमाणे आचरण करण्याविषयी आपली बुध्दी निश्चीत करावी, आपल्याजवळ असलेले रत्न जसे रत्न पारखी माणसाकडुन पारखुन घ्यावे लागते, त्याप्रमाणे स्वकर्म शास्त्राच्या आधाराने जाणुन घ्यावे लागते. आपल्याजवळ दृष्टी असुनदेखील दिव्यावाचुन ज्या दृष्टीचा उपयोग होत नाही, तसेच मार्ग सापडला नाही तर पाय असुन काय उपयोग आहे ? (ओवी ८८१ ते ८९०)

म्हणुन वर्णानुसार जो अधिकार सत्य आणि सहजपणे प्राप्त झाला आहे, तो आपण आपल्या शास्त्राकडुन समजुन घ्यावा. घरातील ठेवा जसा दिवा डोळयाला दाखवितो आणि तो ठेवा घेण्याविषयी मग कोणाचा प्रतिबंध नसतो, त्याप्रमाणे आपल्या वाटयाला आलेले आणि शास्त्राने निश्चीत केलेले विहित कर्म याचे जो आचरण करतो. पण आळस टाकुन आणि फळाची इच्छा त्यागुन शरीराने आणि मनाने कर्मे करुन जो आपला सर्व काळ घालवितो, प्रवाहामध्ये सापडेलेले पाणी ज्याप्रमाणे भलतीकडे जात नाही त्याप्रमाणे शास्त्राने सांगितेलल्या कर्माचे जो यथायोग्य आचरण करतो, अर्जुना!  याप्रमाणे जो विहित कर्माचे आचरण करतो तो पुरुष मोक्षसागराच्या अलिकडल्या वैराग्यरुपी तीरावरती स्थिर होत असतो. विहित कर्माचे आचरण न करणे आणि निषिध्द कर्मे करत रहाणे या दोघांशी संबंध करण्याविषयी जो कधी प्रवृत्त होत नाही तो सुखा-शांतीविरुध्द असलेल्या संसारातुन मुक्त होत असतो, तो काम्य कर्माकडे कौतुकाने ही वळत नाही त्यामुळे स्वर्गादी फलोपभोगरुपी चंदनाचे देखील खोडे घालीत नाही, आणि  दुसरे जे नित्यकर्म, त्याचां फलत्याग केल्यामुळे तेही संपवुन  टाकतो म्हणुन तो मोक्षाजवळ येतो, अशा पाप-पुण्याचे फळ असलेल्या स्वर्ग-नरकरुपी संसारानी सोडुन दिलेला  तो मुमूक्षू ( असा जिज्ञासु मनुष्य की जो ज्ञान प्राप्त करु इच्छीतो ) वैराग्यरुपाने मोक्षाच्या द्वारी उभा  राहीलेला असतो. (ओवी ८९१ ते ९००)

जे वैराग्य संपुर्ण भाग्याची सीमा होय आणि मोक्षलाभाचा निश्चय किवां कर्ममार्गाने झालेल्या श्रमाचा जेथे शेवट होतो, जे वैराग्य म्हणजे मोक्षफलाने दिलेले तारण होय,  जे पुण्यरुपी सत्कर्म वृक्षााचे फुल होय. त्या वैराग्यरुपी फुलावर जणु साधकरुपी भ्रमर हळुवारपणे पाऊल ठेवत असतो. अर्जुना! जे वैराग्य आत्मज्ञानरुपी आनंदाचा दिवस उजाडणार आहे अशी मंगलवार्ता सांगणाऱ्या अरुणाचा उदय आहे, ते वैराग्याचे स्थान वर्णविहीत निष्काम कर्म करणाऱ्या पुरुषाला प्राप्त होत असते, किबंहुना ज्या योगाने आत्मज्ञानाचा ठेवा हाताशी येतो ते वैराग्यरुपी दिव्यांजन तो जीवेभावे धारण करतो. अशा प्रकारे अर्जुना! त्या विहित कर्माला अनुसरुन त्याचा मोक्षाचा अधिकार सफल होतो. अर्जुना !  हे विहित कर्म आपल्या सर्व भावे कल्याणाचा जिव्हाळा होय. त्याचे आचरण करणे हीच मज सर्वात्मक ईश्वराची श्रेष्ठ सेवा आहे, पतिव्रता स्त्री आपल्या सर्व उपभोगासह प्राणप्रिय पतीशी रममाण होते आणि त्याच रतिक्रीडेच्या नावाने तिने तप केले असेही होते. अथवा बालकाला आईवाचुन जगण्याला दुसरे साधन नाही, म्हणुन पुत्राने आईची सेवा केली असता तोच पुत्राचा धर्म ही होतो. अथवा माया जल म्हणुन गंगेला न सोडणारा असला तरीदेखील तो ज्याप्रमाणे सर्व तिर्थस्वरुप असलेल्या गंगेच्या अखंड सहवासाला प्राप्त होतो. तसे आपल्या विहित कर्माचे आचरण केल्यावाचुन दुसरा कोणताही उपाय नाही अशा दृढ निश्चयाने आचरण केले असता जगन्नाथ ईश्वरावर आपल्या उद्वाराचे ओझे पडेल. (ओवी ९०१ ते ९१०)

अरे, ज्याचे जे विहित कर्म आहे, ते त्याने करावे हे ईश्वराचे मनोगत आहे. म्हणुन ते कर्म त्याने केले असता निश्चीतपुर्वक ईश्वराचा अनुभव प्राप्त होतो. एखादी दासी मालकाच्या मनाच्या  कसोटीला उतरली तर पुढे ती मालमत्तेची मालकीण होते अथवा आपल्या स्वामीसाठी जो मरण पत्करण्यास तयार होतो, त्याला स्वामी इनामपत्र देवुन आपले दप्तरी त्याचा दाखला ठेवतो, त्याप्रमाणे स्वमीच्या इच्छेप्रमाणे कर्म करण्यास न चुकणे ही त्याची श्रेष्ठ अशी  सेवा होय. अर्जुना! त्यावाचून दुसरे काही करणे म्हणजे तो केवळ व्यापार होय. म्हणुन विहित कर्म केले असता  ते कर्म केले होत नाही, तर ज्या अनंतस्वरुप ईश्वरापासुन हे सर्व प्राणीमात्र आकाराला आले  आहेत. त्या ईश्वराची आज्ञाच पाळली आहे असे होते. जो परमात्मा अविद्यारुपी म्हणजे अज्ञानरुपी चिध्यां गुंडाळुन जीवरुपी बाहुल्या यिार करतो आणि सात्विक, राजस व तामस अशा तीन पदरी अहंकार रुप सुत्राने त्यांना नाचवित असतो, दिवा ज्याप्रमाणे तेंजाने अंतबाहर्य पुर्ण भरलेला असतो, त्याप्रमाण ज्या परमेश्वराने हे संपुर्ण विश्व आत-बाहेर ओतप्रोत भरलेले आहे, हे वीर अर्जुना! त्या सर्वस्वरुप ईश्वराची स्वकर्मरुपी फुलांनी पुजा केली असता ती पुजा त्याला परम संतोषकारक होते. म्हणुन ज्या पुजेने संतुष्ट झालेल्या आत्मराजाकडुन विहीत कर्म करणाऱ्या त्या भक्ताला वैराग्यसिध्दीचा प्रसाद दिला जातो, त्या वैराग्य-अवस्थेमध्ये ईश्वरप्राप्तीचे वेध लागल्यामुळे त्याला प्रंपचाच्या गोष्टी आवडत नाहीत. तो प्रपंच ओकलेल्या पदार्थाप्रमाणे किळसवाणा  होतो. पतीचा वियोग झालेल्या स्त्रीला जगणेदेखील त्रासदायक  वाटत असते, त्याप्रमाणे  संसारातील जी सुखे आहेत ती दुखाप्रमाणे त्रासदायक वाटु लागतात. (ओवी ९११ ते ९२०)

ईश्वराच्या आत्मस्वरुपाचे यर्थाथ अपरोक्ष ज्ञान उदयाला येण्यापुर्वीच त्याचा वेध लागल्यामुळे मनामध्ये तन्मयाता निर्माण होते, अशी ज्ञानाची योग्यता प्राप्त होते, यास्तव मोक्ष मिळवण्यासाठी जो मनामध्ये निश्चयाची  व्रते बाळगतो त्याने परमआस्थेने स्वधर्मा चे  आचरण करावे. आपला धर्म जरी आचरण करण्यास कठीण असला तरी ज्याच्या परिणामाने चांगले फळ प्राप्त होईल त्यावर लक्ष ठेवावे आपले आरोग्य सुधारण्याकरीता कडुनिंब औषध म्हणुन घ्यायचे असेल तर त्याच्या कडुपणाला थोडे देखील कंटाळु नये. फळण्यापुर्वी फक्त केळीकडे बघितले तर नुसते सोपटे दिसते आणि फळाची आशा नाहीशी होते. त्या निराशेमुळे जर केळीची बाग कापुन काढली तर केळासारखे मधुर फळ कसे बरे मिळणार?  त्याप्रमाणे स्वधर्म आचरण्यास कठीण आहे, असे म्हणुन जर त्या स्वधर्माचा त्याग केला तर मोक्षसुखाचा लाभ होणार नाही. जरी आपली माता कुरूप असली तरी तिच्या प्रेमावर आपण जगत असतो, कारण तिचे प्रेम काही कुरूप नसते. मातेशिवाय इतर स्त्रीया रंभेपेक्षाही सुंदर  असल्या तरी बालकाला त्यांचा काय उपयोग? अरे, जलापेक्षा पुष्क्ळ अधिक गुण तुपामध्ये असतात पण त्या माशाला त्या तुपात ठेवले तर तो जगणे शक्य आहे काय ? साऱ्या जगाला जे पिष ते विष त्यातील किडयांना अमृतासमान असते आणि साऱ्या जगाला जो गुळ गोड असतो, तो त्या विषातील किडयांना मारक असतो.  (ओवी ९२१ ते ९३०)

म्हणुन जी विहित कर्मे सागितंलेली आहेत त्यांच्या आचरणाने  संसाराचे बंधन नाहीसे होते, ते विहित कर्म कितीही कष्टकारक असले तरी त्याचेच आचरण करावे. इतर दुसऱ्याचा आचार उत्त्तम आहे म्हणून त्याचा स्वीकार केला तर ते करणे म्हणजे पायाचे चालणे डोक्याने केल्याप्रमाणे होईल, याकरिता स्वभावानुसार आपल्या वाटयाला आलेले जे कर्म ते जो करतो तो कर्म बंधातुन मुक्त होवु शकतो. अर्जुना! स्वधर्माचे पालन करावे आणि परधर्माचा त्याग करावा हा नियमही मनुष्याने केलेला नाही. जोपयर्त आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यत कर्म करणे थांबते काय? आणि जेथे कर्म करणे आहे तेथे प्रारंभी कष्ट हे आहेतच. कोणत्याही सर्वसाधारण कर्मामध्ये प्रारंभी कष्ट आहेतच, तर मग स्वधर्माचे आचरण केले असता दोष का बरे लागेल हे सांग. अरे! सरळ वाटेवरुन चालले तरी श्रम हे होतातच आणि आडरानात फिरलो तरी श्रम हे आहेतच अर्जुना! वाटेने जाताना पदरामध्ये दगड अथवा शिदोरी ही दोन्ही जरी बांधली तरी त्याचे ओझे हे समानच असते, परतु मुक्कामाच्या ठिकाणी सोयीस्कर होईल तेच घ्यावे. धान्य आणि भुसा कांडतानश कष्ट हे सारखेच पडतात आणि श्वानाचे मांस शिजवताना जेवढे श्रम आहेत तेवढेच अग्नीला आहुती देण्यास लागणारे अन्न शिजवण्यालाही आहेत. हे विचाराी अर्जुना! दहयाला  व पाण्याला घुसळणाऱ्यास कष्ट सारखेच आहेत अथवा वाळु किवां तीळ घाण्यात गाळले तर त्याचे श्रमही समान आहेत. (ओवी ९३१ ते ९४०)

अर्जुना! नित्य होम करण्यासाठी अथवा अग्नी प्रज्वलित करण्यासाठी विस्तव फुकंण्याच्या कामी धुर सोसणे समानच असते, अथवा लग्नाची धर्मपत्नी किवां वारांगणा दोन्हीचे पोषण करण्यास जर सारखाच खर्च लागत असेल तर वारांगनेला पोसुन आपल्या अंगाला गैरवर्तनाचा दोष का बरं लावुन घ्यावा? युध्दाचे वुळी रणांगणातुन पळून जाताना पाठीमध्ये घाव लागला तर मरण हे चुकत नाही, तर मग पळुन न जाता त्या घावाला प्रतिबंध का बरे करु नये?  कुलवती स्त्री जर जाराच्या घरी शिरली तर तिला दांडक्याचा मार सहन करावा लागतो तर मग तिने स्वताच्या पतीचे घर सोडणे व्यर्थ नाही काय? त्याप्रमाणे पाहीजे ते कर्म केले असता जर दुख सोसावे लागते तर स्वधर्माचे आचरण हे कठीण कर्म आहे असे कोणत्या तोंडाने म्हणता येईल? अर्जुना ! अमृताने अमरत्व प्राप्त होते ते अमृत थोडे विकत घेताना त्याकरता सर्व धनदेखील का खर्च करु नये ? ज्या विषाचे सेवन केले असता सर्व सुख नाहीसे होवुन आत्महत्येचेही पातक लागते ते विष खुप धन खर्च करुन का बरे विकत घ्यावे ? त्याप्रमाणे इंद्रियांना कष्ट देवुन अनमोल आयुष्याचे दिवस खर्च करुन पाप वाढले असता दुखाशिवाय दुसरा कोणता परीनाम होणार?  म्हणुन स्वधर्माचे आचरण करावे. तो आपल्या सर्व श्रमाचा परिहार करुन उचित  अशा परमपुरुषार्थाची म्हणजेच सर्वश्रेष्ठ मोक्षाची प्राप्ती करुन देतो.  अर्जुना, म्हणुन जसे संकटकाळी सिध्दमंत्राला विसरु नये. त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण करण्यास विसरु नये. (ओवी ९४१ ते ९५०)

अथवा पाण्यातुन तरुन जाण्यासाठी जसा नावेचा त्याग करु नये किवां महारोग्याने जसे दिव्य औषधाला विसरु नये, त्याप्रमाणे स्वधर्माचे आचरण कधी विसरु नये. ध्वजावर हुनमान असलेल्या हे अर्जुना, स्वधर्माच्या आचरणरुपी महापुजेने संतुष्ट  झालेला ईश्वर तमोगुणाचा व रजोगुणाचा नाश करुन आपली स्वधर्म आचरण्याची उत्कंठा शुध्द सत्व-गुणाच्या मार्गाला आणतो आणि ऐहीक आणि पारलौकिक भोग हे कालकुट विषासमान आहे असे वाटावयास लावतो. अधिक काय सांगावे? मागे वैराग्य या शब्दाचे संसिध्दी या शब्दाने जे वर्णन केले आहे त्या आपल्या वैराग्यरुप स्थानास साधकाला ईश्वर आणुन सोडतो. मग ही वैराग्यलक्षण  संसिध्दिीची भुमिका जिंकल्यानंतर त्याला जी योग्यता प्राप्त होते, अथवा पुर्णत्वास पोहोचलेल्या पुरुषाला कशाचा लाभ होतो ते आता तुला मी सांगतो. वारा जसा इकडुन तिकडे वाहत असताना पारध्याच्या जाळयात अडकत नाही, त्याप्रमाणे संसाराच्यचा जाळयात तो पुरुष अडकत नाही, पिकलेले फळ जसे देठाला धरत नाही व देठही त्या फळाला धरत नाही, त्याप्रमाणे मी आणि माझा हा त्याचा संसाराचा भाव नाहीसा होतो. ज्याप्रमाणे ताटात वाढलेल्या अन्नाला कोणी आपले म्हणत नाही, त्याप्रमाणे त्याच्या मनाप्रमाणे वागणारी पत्नी, पुत्र आणि सर्व  धन आपल्या ताब्यात असताना देखील त्याबद्दल तो आसक्त नसतो, असो, विस्तवाने चटका दिला, की हात जसा मागे घेतला जातो, त्याप्रमाणे विषयाकडे आसक्तीने धावणारी बुध्दी हदयातील प्रभुचरणांकडे वळते, राजाने दासीला शपथ घातली तर ती जशी राजाच्या भितीने शपथ मोडत नाही, त्याप्रमाणे अंतकरणा तु देहाच्या बाहेर पडायचे नाही तुला माझी  शपथ आहे असे साधकाने सांगितले तर अंतकरण देहाच्या बाहेर जाताना भिते, आणि शपथ मोडत नाही. (ओवी ९५१ ते ९६०)

तसेच अर्जुना! ऐक्याच्या मुठीमध्ये चित्त धरुन ते आत्मप्राप्तीच्या वेधाकडे जलदगतीने प्रवृत्त करते, अग्नी ज्याप्रमाणे राखेत दडपुन टाकला असता धुर थांबला जातो, त्याप्रमाणे ऐहिक व पारलौकिक विषयभोगांच्या इच्छेचा पुर्णपणे नाश होतो, म्हणुन निग्रहाने जिंकलेल्या मनातुन इच्छा आपोआप नाहीशी होवुन जाते अधिक काय सांगावे?  तो पुरुष अशा भुमिेकेला प्राप्त होतो, हे अर्जुना! सर्व विपरीत बोध नाहीसा होवुन त्याला आत्मबोंध प्राप्त होतो, साचवलेले पाणी जसे खर्च करुन संपुन जाते त्याप्रमाणे त्याचे प्रारब्ध कर्म भोगुनच संपुन जाते आणि कर्तृत्व, अहंकार, आणि फलाशा नसल्यामुळे नवीन कर्म उत्पन्न होत नाही, हे वीरांच्या राजा अर्जुना, अशा प्रकारे तीन साम्यवस्था ज्या ज्ञानामध्ये जातात ते ज्ञान प्राप्त करुन देण्यासंबंधी मग सदगुरुंची आपोआप भेट होते, हे बघ, रात्रीचे चार प्रहर संपले म्हणजे अंधाराचा नाश करणारा सुर्य डोळयांना जसा दिसतो. किवां केळीतुन घड निर्माण झाला की केळीची वाढ तो जसा थांबवतो, त्याप्रमाणे सदगुरुंची भेट झाली असता आत्मज्ञान प्राप्त होवुन ते कर्माची वाढ थांबवितात. पौर्णिमा प्राप्त झाली म्हणजे ज्याप्रमाणे  चंद्राच्या ठिकाणी काहीच उणीवा रहात नाहीत, त्याप्रमाणे सदगुरुंची कृपा झाली म्हणजे साधकाच्या अंतकरणातील अज्ञान नाहीसे होवुन ते ज्ञानाने परिपुर्ण भरुन जाते. रात्र संपल्यावर जसा अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे सदगुरुंच्या कृपेने अज्ञानरुपी अंधार नाहीसा होवुन आत्मज्ञानाचा प्रकाश पसरतो. ( ओवी ९६१ ते ९७० )

पुढील भाग