अध्याय १ भाग ४

     बघ, माझा देह कापत आहे, तोंडाला कोरड पडली आहे आणि सर्व गात्रांना शिथिलता आलेली आहे.माझ्या सर्वागावर रोमांच उभे राहिले आहेत. मनामध्ये अतिशय संताप निर्माण झाल्यावर हातामध्ये गांडीव धरण्याचे सार्मथ्यही राहिले नाही. हे धनुष्य हाती न धरल्याने गळून पडले; परंतु ते केव्हा गळुन पडले, हे देखील मला कळाले नाही. याप्रमाणे सर्व आप्तेष्टांना पाहुन माझे हदय मोहाने व्यापून गेले आहे. खरोखर माझे अंत:करण‍ वज्रापेक्षा कठीण आहे, कोणाला दाद न देणारे अतिखंबीर असे आहे, परंतु काय आश्चर्य, त्यापेक्षाही या आप्तेष्टाचां मोह आश्चर्यकारक आहे. ज्याने युध्दामध्ये शंकरांनाही जिंकले आणि निवातकवच नावाच्या राक्षसांचा ठावठिकाणाही नाहीसा केला, तो अर्जुन आप्तेष्टांना पाहुन एका क्षणामध्ये मोहाने ग्रासला गेला.

        भ्रमर हा वाळलेले कठीण लाकूड सहज कोरतो, परंतु कोवळया कमळ कळीमध्ये रात्रभर अडकून पडतो .तो त्या ठिकाणी प्राणास मुकेल परंतु कमळा विषयीच्या स्नेहामुळे तो कमळ-कळी कोरून बाहेर पडत नाही. त्याप्रमाणे आपल्या आप्त लोकांची मोह-ममता कोवळी असली, तरी त्यातुन बाहेर पडणे महाकठीण आहे. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्र राजा ! हा मोह म्हणजे ईश्वराची माया आहे. ही ब्रम्हदेवाला ही आकळली जात नाही.म्हणूनच या मायेने अर्जुनालाही मोहित केले आहे .हे राजा! अर्जुनाने आपले सर्व स्वजन पाहिले आणि युध्दातील सर्व अभिमान तो विसरून गेला. रणांगणावर अर्जुनाच्या मनात दयाभाव कसा निर्माण झाला, हे कळत नाही.तो म्हणाला, हे कृष्णा ! आपण आता येथे राहु नये. ( ओवी १९६ ते २०५ )

          या स्वजनांचा वध करावयाचा आहे. या विचाराने माझे मन अतिव्याकुळ झाले आहे आणि माझी बोबडी वळली आहे.या कौरवांना मारणे जर योग्य असेल, तर धर्मराजादिकांना का बरे मारु नये ? कारण, हे सर्व आणि आम्ही एकमेकांचे म्हणुन असले हे युध्दच नको .मला हे युध्द योग्य वाटत नाही. एवढे महापाप करण्याची काय जरुरी आहे ? हे देवा ! अनेक दृष्टीनी विचार केला, तर या युध्दाने हानी होणार आहे आणि जर का हे युध्द टाळले, तर मात्र काही लाभ होईल.अशा प्रकारे विजय प्राप्त करण्याची मला मुळीच गरज नाही. गोत्रजानां ठार मारुन मिळविलेले राज्य तरी काय करायचे ? सर्वाचा वध करुन जे भोग भोगावयाचे, ते माझ्या दृष्टीसमोरुनही दूर होवोत, असे अर्जुन म्हणाला.

        या सुखांवाचुन जी काही आमची स्थिती होईल, ती आम्ही सहन करु.याकरिता आमचे प्राण गेले तरी चालतील. पंरतु यांचा घात करावा आणि आपण राज्यसुख भोगावे, ही गोष्ट स्वप्नात देखील माझ्या मनात येणार नाही. जर या वडील मंडळीचे अिीहत आम्ही मनात चिंतले , तर आमचा जन्माला येउन तरी काय उपयो‍ग आणि आम्ही कोणासाठी जगावे ? कुळातील लोक पुत्राची इच्छा करतात. त्याचे हेच का फळ ही, त्या पुत्राने आपल्याच कुळाचा संहार करावा ? (ओवी २०६ ते २१५ )

           याच्यां वधाचा विचार आपण मनात तरी कसा आणावा ? यांच्यासाठी वज्रासारखे कठोर तरी कसे व्हावे .आपल्या हातुन घडेल, तेवढे कल्याणच करावे .आम्ही जे जे काही मिळवावे. त्याचा उपभोग सर्वानी घ्यावा.एवढेच काय, त्यांच्या कामाकरता आम्ही आपले प्राणही खर्च करावेत. आम्ही देशोदेशीच्या राजांना जिंकावे आणि आपल्या कुळास संतुष्ट करावे .परंतु कर्माची गती किती विपरीत आहे, ते पहा.

          तेच आमचे सर्व गोत्रज युध्द करण्यासाठी प्रवृत्त झाले आहेत. बायका,मुले ,सर्व संपत्ती या सर्वाना सोडून तलवारीच्या धारेवर प्राण ठेवून हे युध्दासाठी तयार झाले आहेत.अशांना मी कसे मारु ? कोणावर शस्त्राचा प्रहार करु ? आम्ही सारे एकाच कुळातले आहोत. त्यामुळे माझ्याच हदयाचा घात मी कसा बरे करु? हे श्रीकृष्णा! युध्दासाठी आमच्यासमोर कोण उभे आहे , हे तुला माहीत आहे .पलीकडे भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य उभे आहेत.

             त्यांचे आमच्यावर अनन्य साधारण उपकार आहेत. या ठिकाणी माझे मेव्हणे, सासरे ,मामा, दुर्योधन इत्यादी सर्व बंधू आहेत, तसेच पुत्र, नातू आणि आप्तही आहेत.म्हणुन यांचा वध करावा, असे आम्ही नुसते बोललो तरी तेही पाप होईल. उलट पक्षी हे वाटेल ते करोत अथवा आम्हास मारोत ; परंतु यांचा घात करण्याचा विचार देखील मनात आणू नये .(ओवी २१६ ते २२५ )

          त्रिभुवनाचे राज्य जरी मला मिळणार असेल, तरी हे अनुचित कृत्य मी करणार नाही. जर असे अनुचित कृत्य आम्ही केले, तर आमच्याबददल कोणाच्या मनात आदरभाव राहील ? अशा पापकर्मामुळे तुझे मुख तरी कसे पहाणार ? जर मी गोत्रजानां ठार केले, तर मी सर्व दोषांचा आश्रयस्थान बनेन. असे झाल्यामुळे तुझ्याशी जोडलेला संबंध मी माझ्या हातानेच दुर केल्यासारखे होईल. कुळाचा नाश केल्यामुळे सर्व पातके लागतात.अशा प्रसंगी तुला कोणी आणि कोठे शोधावे ? जर उद्यानामध्ये सर्वत्र आग पसरली, तर कोकिळ तेथे क्षणभर देखील थांबत नाही. किंवा सरोवरात चिखल झाला, तर ते पाहुन चकोर पक्षी तेथील पाण्याचे सेवन न करता सरोवराचा त्याग करुन निघून जातो.            

            त्याप्रमाणे माझ्या हदयातील प्रेमाचा ओलावा नाहीसा झाला, तर तु मला आपल्या मायेने फसवशील आणि तू माझ्याकडे येणार नाहीस. म्हणून मी हे कृत्य करणार नाही. या समरांगणमध्ये हातात शस्त्र धरणार नाही. कारण हे युध्द अनेक प्रकारांनी निंद्य आहे, असे मला दिसत आहे. हे श्रीकृष्णा ! युध्दाच्या पापामुळे तुझा वियोग होईल, तर मग तुझ्यावाचुन आमचे या जगात काय राहणार आहे ? त्या  वियोग -दुखानेच आमचे हदय विदीर्ण होईल. म्हणून या कौरवांचा वध करून राज्याचे भोग भोगावेत, ही गोष्ट घडणे अशक्य आहे, असे अर्जुन म्हणाला.(ओवी २२६ ते २३५)

              कौरव हे अभिमानाच्या मदाने भुलून गेले आहेत, त्यामुळे ते संग्राम करण्यासाठी आले आहेत ,तरी आमचे हित कशात आहे, हे आम्हाला पाहिले पाहिजे.आपलेच स्वबांधव आपण कसे मारावे ? हे असे भलतेच कसे करावे ? काळकूट विष आहे, हे कळाले, तर ते कसे घ्यावे, अहो ! वाटेने चालत असताना पुढे सिंह एकदम आडवा आला, तर त्याला चुकवून जाण्यातच हित आहे. प्रकाशाचा मार्ग सोडून अंधारमय विहिरीत जाउन बसणे, यामध्ये कोणता लाभ आहे ?

         हे देवा ! तूच सांग बरे. किंवा अग्निज्वाला प्रज्वलित आहेत, हे पाहून आपण बाजूने गेलो नाही, तर त्या अग्निज्वाला एका क्षणात आपणास वेष्टून जाळून टाकतील. तसेच कुलक्षयामुळे होणारे मूर्तिमंत दोष आम्हाला लागतील, हे कळल्यावरही, आम्ही हे संहाराचे काम कसे बरे करावे ? एवढे बोलून अर्जुन देवास म्हणाला, इकडे लक्ष द्यावे , ही विनंती. या पापाचे भंयकर परिणाम सांगतो. ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असता तेथे अग्नी निर्माण होतो.

          तो अग्नी भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो. त्याप्रमाणे एका कूळातील लोकांनी मत्सराने परस्परांचा नाश केला, तर त्या मोठया दोषाने कुळाचाच नाश होतो. म्हणून या कुलक्षयाच्या पापापासून वंश परंपरागत कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुळामध्ये अधर्मच वाढत जातो.(ओवी २३६ ते २४५ )

तेथे सारासार विचार नाहीसा होते. कोणी कोणते आचरण करावे आणि कर्तव्य व अकर्तव्य काय, या सर्व गोष्टी लोप पावतात. आपल्या जवळ असलेला दिवा विझवून अंधारात चालु लागलो, तर चांगल्या जागीही माणूस अडखळतो.

           कुलक्षय झाला, की कुळातील परंपरागत चालत आलेला धर्म नष्ट होतो.मग त्या ठिकाणी पापाशिवाय दुसरे काय असणार? ज्या वेळी यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तय, ब्रम्हचर्य अपरिग्रह आणि नियम म्हणजे शौच , संतोष , तप, स्वाध्याय ईश्वर, प्रणिधान या  क्रिया बंद पडतात, त्या वेळी इंद्रिये स्वैर व्यवहार करतात, म्हणून कुळस्त्रियां कडुन व्याभिचार घडतो. उत्तम आणि अधम यांचा समागम होतो, त्या वेळी वर्णसंकर निर्माण होतो. तसेच जातिधर्म मुळातून उखडले जातात. ज्याप्रमाणे चव्हाटयावर ठेवलेल्या बळीवर कावळे हे चोहोकडून झडप घालतात,त्याप्रमाणे अशा कुळात  सर्व बाजंनी महापातके प्रवेश करतात. मग त्या वर्णसंकर झालेल्या कुळाला आणि कुळाचा घात करणाऱ्या अशा दोघांना नरकात जावे लागते.

             याप्रमाणे वंशत वाढलाली सर्व प्रजा अधोगतीला जाते आणि स्वर्गात असलेले पूर्वज सहजच पतन पावतात. त्या भ्रष्ट कुळामध्ये रोज करावयाची धर्मिक कर्म बंद पडतात. तसेच,विशेष प्रकारची करावयाची कर्मे ही बंद पडतात.अशा परिस्थितीत पितरांना कोण बरं तिलोदक देणार ? अशी स्थिती प्राप्त झाल्याम्रळे पितर तरी काय करणार ? ते स्वर्गात कसे राहू शकतील ? म्हणून ते ही नरकात पडलेल्या आपल्या कुळाजवळ येतात. (ओवी २४६ ते २५५ )

            ज्या प्रमाणे नखाच्या टोकाला सापाने दंश केला असता त्याचे विष ताबडतोब शेंडीपर्यत सर्वत्र पोहोचते, त्याप्रमाणे एका कूळात पाप घडले तर ते मूळ पुरूषापर्यत सर्वास पापात बुडविते. हे श्रीकृष्णा ! आणखीन एक गोष्ट ऐक.या वर्णसंकरामळे दुसरे देखील मोठे पाप घडेल. ते असे की, त्या पतिताच्या संसर्गदोषाने इतर लोकांचे आचार-विचार देखील भ्रष्ट होतील.

         ज्याप्रमाणे आपल्या घरात जर अकस्मात आग लागली,  तर ती सर्वत्र भडकते व दुसऱ्या घरासही जाळुन भस्म करते, त्याप्रमाणे दुष्ट कुळाच्या संगतीमध्या राहून जेजे लोक आपली कर्मे करतात, ते देखील त्या संसर्गदोषाने दूषित होउन जातात. त्याप्रमाणे त्या कुळामध्ये नाना प्रकारचे दोष निर्माण होतात आणि ते सर्व कुळ भयंकर अशा  नरक यातना भोगीत असते. असे अर्जुन म्हणला. एकदा त्या नरकयातना भोगाव्या लागल्यानंतर त्यातुन कल्पांतीही सुटका होत नाही, इतके या कुलक्षया पासून पतन होते.

             हे देवा ! विविध प्रकारचे बोलणे कानांनी ऐकतोस, परंतु अजून तुला काही त्रास होत नाही. तू आपले हदय वज्रासमान कठोर का केले आहेस ? कुलक्षय करून ज्याच्यासाठी राज्यसुखाची इच्छा करायची, ते शरीर तरी क्षणभंगुर आहे इतके कळून देखील अशा या घडणाऱ्या महापातकाचा त्याग करू नये काय ? हे जे समोर सर्व वाड-वडील जमले आहेत, त्यांचा वध करावा, या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले, तरीसुध्दा थोडे पाप घडेल काय ? हे तूच सांगावे.असे करून जगावे, त्यापेक्षा शस्त्रे टाकून कौरवांचे वार सहन करावेत, हे उत्तम ! (ओवी २५६ ते २६५ )

           असे केल्याने दु:ख भोगावे लागले तरी चालेल, तसेच शेवटी मृत्यू आला तरी ते चांगले आहे ,परंतू यांचा वध करून पातक करण्याची माझी इच्छा नाही. याप्रमाणे अर्जुनाने रणांगणावर आपले सर्व कुळ पाहिले आणि तो म्हणाला,  याचां वध करून कमळविलेले राज्य म्हणजे केवळ नरकभोग होय. संजय म्हणाला, हे धृतराष्टा ! इकडे लक्ष दे. याप्रमाणे रणांगणावर उभा असलेला अर्जुन असे बोलला. अत्यंत उदवेगलेल्या अर्जुनाला गहिवर आवरता आला नाही. मग त्याने रथावरून खाली उडी घातली.

        ज्याप्रमाणे एखादा राजकुमार पदभ्रष्ट झाला असता सर्व दृष्टीने निस्तेज होतो किंवा सूर्य राहूने ग्रासला गंला, तर त्याचे तेज लोप पावते, किवां महासिध्दीच्या मोहाने पछाडलेला तपस्वी भुलून जातो आणि तप सोडून कामनेच्या चक्रात सापडून दीन होतो. त्याप्रमाणे अर्जुनाने ज्या वेळी रथाचा त्याग केला, तेव्हा तो धर्पुधारी योध्दा अतिशय दु:खाने व्याप्त झालेला दिसला. संजय म्हणला, हे राजा ! ऐक तेथे असा प्रकार घडला की , अर्जुनाने धनुष्य-बाण टाकून दिले आणि त्याच्या डोळयांतून सारख्या अश्रुधारा वाहू लागल्या.

        आता या नंतर अर्जुनास दु:ख झालेले पाहून वैकुंठनायक श्रीकष्ण हे त्यास कोण्त्या प्रकाराने अध्यात्माचा उपदेश करतील, ती आता पुढे येणारी विस्तार पूर्वक सांगितलेली कथा श्रवण करण्यास अतिकौतुकमय आहे , असे श्री निवृत्तिनाथांचे शिष्य श्री ज्ञानदेव म्हणतात.

सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय भगवंताच्या कृपेने संपन्न !  

(भगवदगीता श्लोक १ ते ४७ आणि श्री ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी मधील मराठीत भाषांतरीत ओव्या ०१ ते २७५  )

 पुढील  अध्याय