अध्याय-३-भाग-१

श्री ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी

सार्थ भगवद् गीता अध्याय3

कर्मयोग

श्री ज्ञानदेवांनी भगवदगीतेतील अध्याय – ३ मधील “कर्मयोग” या अध्यायातील  १ ते ४३ संस्कृत श्लोकाचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन २७६ ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये‍ फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही‍ अवघड वाटू लागली. श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहे. हा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य  कृपा-प्रसाद आहे, आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनाचे कोटकल्याण साधावे.

            मग अर्जुन म्हणला, हे देवा !  कृपानिधे ! तुम्ही जे वचन बोललात, ते मी एकाग्रतेने श्रवण केले आत्मज्ञानाचा विचार केला तर तेथे कर्म आणि कर्ता असे काही उरतच नाही.  हे अनंता ! असे तुझे निश्चित मत आहे तर मग हे श्रीहरी,  हे पार्था तू युध्द कर असे कसे बरे म्हणतोस ? या घनघोर युध्दामध्ये मला घालताना तुला काहीच वाटत नाही काय ? अरे, तूच कर्माचा पूर्णपणे निषेध करतोस तर मग माझ्याकडून हिसांत्मक कर्म का करवून घेतोस ? हे ऋषीकेशा ! याचा तू विचार कर की, आत्मज्ञानापुढे तु अल्पशा कर्माला देखील मान देतोस आणि माझ्या हातुन एवढी मोठी हिंसां का करवून घेत आहेस ?  हे देवा ! तुम्हीच जर असे बोलू लागलात तर आमच्या सारख्या अज्ञानी लोकांनी काय करावे ? तर मग आता विवेकाची गोष्टच संपली असे म्हटले पाहिजे. यालाच जर उपदेश म्हणावयाचा, तर मग याहुन भ्रम तो निराळा कोणता ? आता आमची आत्मबोधाची इच्छा उत्तम प्रकारे पूर्ण झाली म्हणावयाची. रोगी माणसाची प्रकृती पाहुन एकदा  का वैद्याने पथ्य काय ते सांगितले आणि त्याच वैद्याने जर रोग्याला विष खावयास दिले, तर रोगी कसा जगेल, हे मला सांग बरे ! जसे एखाद्या आंधळयाला आडमार्गाला लावावे किवां माकडाला मादक पदार्थ पिण्यास द्यावा, तसा हा उपदेश आम्हा अज्ञानी लोकांना चांगलाच लाभला आहे, मला आधीच काही कळेनासे झाले आहे. मी मोहाच्या चक्रात सापडलो आहे म्हणुन हे कृष्णा ! खरे काय आणि खोटे काय ही गोष्ट तुला विचारली आहे.(ओवी १ ते १०)

           पण तुझे एक-एक नवलच आहे तुझ्या उपदेशामुळे आमचा अधिकच गोधंळच होतो आहे. आम्ही तुला शरण आलो तुझे विचार ऐकतो, तर मग तु आमच्याबरोबर असे का बरे वागतोस ? आम्ही शरीराने, मनाने जीवे-भावे तुझ्यावर विश्वास ठेवावा आणि तू जर आम्हाला विचाराने भ्रमित केले तर सर्व काही संपलेचअसे म्हणावे लागेल. आता असाच जर तू बोध करणार असशील तर आकचे उत्तम कल्याण करतोस म्हणावयाचे ! आता असे झाले की माझे स्थिर असलेले मन संशयाले गोधंळून गेले. त्याचप्रमाणे हे श्रीकृष्णा ! तुझे अलौकिक चरित्र मला समजत नाही, या निमित्ताने तु माझ्या चित्ताची परीक्षा घेत आहेस काय ?  किवां तू मला भ्रमित करत आहेस का गूढ शब्दांनी तत्वज्ञान सांगत आहेस, यावा सूक्ष्म विचार केला तरी निश्चीत असे काही कळत नाही, म्हणून हे देवा ! आपण माझे ऐकावे आता गूढ भाषेत भावार्थ सांगू नकोस.खरे काय आणि खोटे काय हे मला समजेल अशा भाषेत सांगावे. हे श्रीकृष्णा ! माझी बुध्दी मंद आहे, तरी अशाही मला उत्तम प्रकारे समजू शकेल असे एक निश्चयात्मक सांग. रोग नाहीसा होण्यासाठी वैद्याने औषध तर अवश्य द्यावे ; पंरतु ते अति रुचकर आणि मधुर असावे त्याप्रमाणे सर्वार्थाने परिपुर्ण असे उचित तत्व सांगावे ; की जे माझ्या चित्ताला समजु शकेल. (ओवी ११ ते २०)

         हे देवा ! तुझ्या सारखा सदगुरू मला लाभला तर मी माझ्या इच्छेची तृप्ती का बरे करुन घेउ नये ? येथे मी भीड का बरे धरावी ? तु तर माझी प्रेमाची माउली आहेस. अहो, दैवयोगाने कामधेनूचे दुभते जर प्राप्त झाले तर त्या प्रसंगी हवे ते मागण्यास कमी का करावे किवां चिंतामणी जर हाती लागला तर आपणास इच्छित वस्तू मागण्याचे संकट का बरे निर्माण व्हावे? आपणास हवी तशी इच्छा का करु नये ? असे पाहा कि,अमृताच्या सागरा जवळ यावे आणि अमृताचे प्राशान न करता तहानेने व्याकुळ व्हावे तर मग अमृतसागरा जवळ येण्याचे श्रम तरी का बरे घ्यावेत? त्याप्रमाणे हे कमळापती ! जन्मोजन्मी मनोभावे आम्ही तुझी उपासना केली, त्यामुळे दैवयोगाने तुझी आम्हाला प्राप्ती झाली आहे. तर मग हे परमेश्वरा ! माझ्या इच्छेप्रमाणे तुझ्याजवळून मी का मागुन घेवू नये ? माझ्या मनातील इच्छेकरिता खरोख्रर आज सुकाळाचा दिवस प्रकाशित झाला आहे.आज माझ्या सर्व इच्छा परिपुर्ण झाल्या. माझे पूर्वपुण्य फळास आले . माझ्या सर्व मनोकामना सिध्दीस गेल्या. सर्वोकृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवांत उत्तम असलेल्या देवा, तु आज आमच्या स्वाधीन झाला आहेस. ज्याप्रमाणे बालकाला स्तनपान करण्यासाठी आईसाठी कोणतीच वेळ ही अवेळ नसते. त्याप्रमाणे हे कृपानिधी देवा, मी माझ्या इच्छेप्रमाणे वाटेल ते तुला विचारणार आहे. (ओवी २१ ते ३०)

         तरी परलोकात हितकारी आणि इहलोका मध्ये आचरण करण्यास उचित असे जे एक निश्चीत स्वरूपाचे आहे, ते मला सांगावे असे अर्जुन म्हणाला. हे बोलणे ऐकुन भगवान श्रीकृष्ण्‍ा आश्चर्याने म्हणाले  हे अर्जुना ! माझ्या बोलण्याचा अभिप्राय काही प्रमाणात गुढ आहे निष्काम कर्मयोगाचे वर्णन करत असताना प्रसंगाने सहजच आम्ही सांख्यांना मान्य अशा योगाची निष्ठा सांगितली. तो उद्देश तु जाणला नाहीस ; म्हणून तुला व्यर्थ राग आला आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग हे दोन्ही मार्ग मीच सांगितले आहेत. हे वीरश्रेष्ठ अर्जुना ! या दोन्ही निष्ठा अनादि काळापासुनच्या आहेत आणि माझ्यापासून या लोकी व्यक्त झाल्या आहेत. त्यापैकी एका निष्ठेला ज्ञानयोग म्हणतात, त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात.त्यामुळे आत्‍मतत्वाची जाणीव होउन तद्रुपता प्राप्त होते. दुसरी निष्ठा म्हणजे कर्मयोग होय. कर्ममार्गाचे लोक समत्वभाव ठेवण्याविषयी निष्णात असतात आणि काही काळाने त्यांना मोक्ष प्राप्त होतो. असे हे दोन मार्ग असले, तरी ते एकाच चैतन्याच्या ठिकाणी एकरुप होतात. ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावयाच्या अशा दोन्ही प्रकारच्या भोजनांत समान तृप्ती असते. पूर्वेकडून वाहणारी नदी आणि पश्चिमेकडुन वाहणारी नदी या वेगवेगळया दिसतात, परंतु सागरात मिळाल्यावर ऐक्य पावतात. त्याप्रमाणे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे जरी दोन मार्ग असले तरी ते एकच साध्य सुचवितात, परंतु त्यांची उपासना मात्र साधकाच्या क्षमतेवर अवलंबुन असते. (ओवी ३१ ते ४०)

            असे पाहा की, पक्षी उडाल्यानंतर ताबडतोब फळाला झोबंतो त्याप्रमाणे माणूस अतिजलद वेगाने फळापर्यत पोहोचू शकेल काय, हे तुच सांग. तो मनुष्य एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर हळूहळू जात असतो आणि काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या फळापर्यत निश्चीत पोहोचतो. त्याचप्रमाणे ज्ञानमार्गाने जे वाटचाल करतात. ते ज्ञानी विहंगम मार्गाने तत्काळ मोक्षाची प्राप्ती करून घेतात. दुसरे जे कर्मयोगी आहेत ते कर्मयोगाच्या आधारे शास्त्राप्रमाणे आपला आचार करुन काही काळाने मोक्षाला प्राप्त होतात. कर्माचा आरंभ केल्याशिवाय, योग्य असे कर्म न करता कर्महीन पुरुषाप्रमाणे निष्कर्म नक्कीच होता येणार नाही.अर्जुना ! विहित कर्म टाकुन द्यावे आणि एवढयाने निष्कर्म व्हावे हे बोलणे व्यर्थ आहे. अज्ञानपणाचे आहे, पुर्ण भरलेल्या नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर कसे जावे, असे संकट जेव्हा निर्माण होते, तेव्हा नावेचा त्याग करता येईल काय, तूच सांग . भोजनापासुन तृप्तीची इच्छा आहे तर मग स्वयंपाक का बरे करु नये? अथवा तयार असलेल्या अन्नाचे सेवन का बरे करु नये ? हे सांग  जोपर्यत निरिच्छ अवस्था प्राप्त होत नाही, तोपर्यत कर्म केले पाहीजे. एकदा का आत्मसंतुष्ट अवस्था प्राप्त झाली की, कर्म सहजच थांबले जाते म्हणुन  हे अर्जुना ! ऐक ज्याला नैष्कर्म्य स्थितीची तीव्र अशी इच्छा आहे, त्याने उचित विहीत कर्माचा त्याग करणे योग्य नाही.(ओवी ४१ ते ५० )

         आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्विकार  केला म्हणजे ते व्यवस्थित घडते किवां कर्माचा त्याग केला म्हणजे कर्मसंन्यास घडतो असे आहे काय ? हे उगीचच अयोग्य बोलणे आहे. साधकाने याचा नीट विचार करुन पाहिले  तर कर्म जरी टाकले असले तरी ते टाकले जात नाही, हे तू निश्चीतपणे समज. जोपर्यत जीवाला शरीराचा, प्रकृतीचा आश्रय आह्रे, तोपर्यत  मी कर्माचा त्याग करीन अथवा कर्म करीन असे म्हणणे अज्ञानपणाचे आहे. कारण जेवढे म्हणुन कर्म घडत असते तेवढे स्वभावत: सात्विक , राजस, तामस गुणांच्या अधीन असते. असे पाहा की, जेवढे म्हणुन विहीत कर्म आहे तेवढे जरी करावयाचे सोडुन दिले तरी इंद्रियाचे स्वभाव नष्ट झाले आहेत काय ? कर्माचा त्याग केला म्हणजेकानांचे ऐकणे बंद झाले का ? डोळयांची रुप पाहण्याची दृष्टी गेली का ? अथवा नाकपुडया बुझुन वास येईनासा झाला असे कधी होते का ? सांग. किवां प्राण,अपान या दोन्ही वायुंच्या क्रिया थांबल्या आहेत का ? किवां बुध्दीचा कल्पना-विलास थांबला आहे काय ? किवां भुक तहान लागणे इत्यादी पीडा थांबल्या आहेत का ? स्वप्न व जागृत या अवस्था बंद पडल्या आहेत काय ? अथवा पाय चालणे विसरले आहे का ? हे सर्व राहु दे  जन्म-मरण तरी संपले आहे काय ? हे जर काहीच बंद पडत नाही तर मग कर्म त्याग कसला ? म्हणून प्रकृतीच्या अधीन असलेल्या पुरूषाला कर्मत्याग करता येत नाही. मनुष्य प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे सत्व, रज, तम हे तीन प्रकारचे गुण‍ त्याच्याकडुन कर्म घडवीतच असतात, परंतु माणुस मी हे कर्म करतो अथवा या कर्माचा त्याग करतो, असा व्यर्थ अभिमान अंत:करणात बाळगत असतो. एकदा माणुस रथावर आरुढ झाला आणि काही न करता स्तब्ध झाला तरी देखील तो रथाच्या अधीन असल्यामुळे रथाचे फिरणे म्हणजे तोच फिरला असे होते. (ओवी ५१ ते ६०)

       एखादे वाळलेले झाडाचे पान काही न करता पडलेले असते परंतु जोरात वारा सुटला, की ते वाऱ्यामुळे आकाशात इकडे तिकडे फिरत राहतेच. त्याप्रमाणे प्रकृतीच्या आधाराने आणि कर्मेइंद्रियांच्या विकाराने निष्काम माणुसही नेहमी कर्म करीत असतो. जेा पर्यत प्रकृतीचा संबंध आहे तोपर्यत कर्माचा त्याग घडणे शक्य नाही. असे असुनही जे कर्माचा त्याग करु म्हणतात, त्यांचा तो केवळ बोलण्याचा आग्रह असतो. जे उचित कर्माचा त्याग करतात आणि केवळ कर्मेद्रिंय-प्रवृत्तीचा निरोध करूनच नैष्कर्म्य होउ पाहतात.त्यांना कर्माचा त्याग घडत नसतो, त्यांच्या मनामध्ये विषयप्राप्तीचे कर्तव्य  दडलेले असते. त्यामूळे कर्मत्यागाचे त्याचे सोगं वरवरचे असते. आणि ते कर्मत्यागाचे दारिद्रयच असते. असे जाण . हे अर्जुना ! असे ते लोक आतुन विषयासक्त असतात त्याच्यां विषयाच्या आसक्तीबद्दल संशय घेण्याचे काही कारण नाही,  हे अर्जुना ! प्रसंग आला आहे म्हणुन निष्काम पुरूषाचे लक्षण सांगतो, तरी तु ते एकाग्रतेने श्रवण कर. जो  अंत:करणात सात्विक निश्चयाने दृढ असतो तो इंद्रियानां आज्ञा करत नाही विषय आपणास बाधा करतील अशी त्यास भीती नसते आणि ज्या वेळेस जी  कर्मे करायची असतात, त्या वेळी त्या कर्माचा तो त्याग करत नाही कर्मेद्रिंय-कर्म करीत असताना तो पुरूष त्यानां आवरीत नाही. परंतु त्यामुळे होणाऱ्या विकाराच्या बंधनात तो सापडत नाही. (ओवी ६१ ते ७०)

        ज्याप्रमाणे जलातील कमळाचे पान जलाने भिज‍त नाही, त्याप्रमाणे तो कोणत्याही प्रकारच्या कामनेने लिप्त होत नाही आणि मोहरूपी मळाने मलिन होत नाही. त्याप्रमाणे तो प्रपंचामध्या राहुन इतर सर्व जनांसारखा दिसतो ; परंतु मनाने असंग असतो , जसे पाण्याच्या संगतीने सुर्यबिबं पाण्यामध्ये दिसते. त्या पुरूषाकडे सामान्य भुमिकेतून पाहिले, तर तो सामान्य माणसासारखा दिसतो. त्याच्या संबंधी निश्चीत विचार करू लागलो तर त्याचे वास्तव स्वरुप काही कळु शकत नाही. अशा लक्षणांनी युक्त तु जो पुरुष पाहशील तो आशा-पाश रहित त मुक्त आहे, असे तु जाण. हे अर्जुना ! तोच खरा कर्मयोगी होय. या जगात त्याचीच स्तुती होत असते म्हणुन तु असा कर्मयोगी हो असे मी तुला म्हणत आहे. तु आपल्या मनाचा निग्रह कर आणि  अंत:करणात स्थिर हो मग ही कर्मेद्रिंय खुशाल आपआपले व्यवहार सुखाने करु देत. कर्माचा त्याग करुन कर्मातीत व्हावे म्हणशील , तर ते देहधारी मानवास संभवत नाही. मग शास्त्राविरुध्द आचरण का करावे, याचा तुच विचार कर म्हणुन जे जे कर्म उचित असेल आणि प्रसंगाने प्राप्त झाले असेल, ते कर्म तु फळाची इच्छा न ठेवता आचरणात आण. हे अर्जुना ! आणखी एक म्हणजे निष्काम कर्माचे कौतुक तु जाणत नाहीस ते हे की निष्काम कर्म हे सहजपणे कर्मबंधनातून सोडविणारे असते जो स्वधर्माचे आचरण करतो त्याला मोक्षाची निश्चीत प्राप्ती होते. ही पुरातन कालापासुन चालत आलेली परंपरा आहे.  (ओवी ७१ ते ८० )

पुढील भाग