अध्याय-१०-भाग-१

ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी

सार्थ भगवद् गीता अध्याय –  १०

विभूती  योग

श्री ज्ञानदेवांनी भगवद् गीतेतील अध्याय१०  मधीलविभूती योगया अध्यायातील ते  ४२ संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन ३३५ ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे. परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहे. येथुन पुढे गीतेचा उत्तर खंड सुरू होतो. हा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य  कृपाप्रसाद आहे, मनुष्य जीवन जगण्यासाठी अनमोल संजीवनी आहे, किंबहुना संसारसागर पार करण्यासाठी अध्यात्मातील नौका आहे, तिच्या मदतीने संसार करता सावरता आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनसागरातुन तरुन जावे आणि आपल्या जीवनाचे कोटकल्याण साधावे. ही ज्ञानदेवांची  “अक्षरब्रम्ह ज्ञानेश्वरीआत्मसाद करुन जीवनाचे  सार्थक करावे. 

परिशुध्द अशा ब्रम्हज्ञानाचा बोध करण्यास चतुर असलेल्या विद्यारुपी कमलाचा विकास करणाऱ्या परा वाणीला विषय न होणाऱ्या स्वरुपस्थितीरुपी स्त्रीशी विलास करणाऱ्या श्री गुरूराया तुम्हाला श्री ज्ञानमाऊलीचा नमस्कार असो. जो संसाररुपी अंधकाराचा म्हणजे अज्ञानाचा नाश करणारा जणू सुर्यनारायण आहे, ज्याचे सामर्थ्य श्रेष्ठ आणि अमर्याद आहे त्रिपुटीरहित ज्ञानरुप जी चौथी अवस्था, त्या तारुण्यात असलेल्या तूर्यास्वथेशी लीलाविलास करणाऱ्या अशा श्रीगुरूराया, तुला नमस्कार असो. सर्व जगाचे पालन करणारा जो कल्याणरुप मंगलकारक रत्नांचा ठेवा आहे, ज्याचे स्वरुप आराधना करण्यास योग्य आहे, जो भक्तरुपी वनातील चंदन आहे आणि पुज्य शिवलिंग आहे अशा तुला माझा नमस्कार असो. ज्ञानरुपी चित्ताच्या चकोराला आल्हाद देणाऱ्या चंद्रा, आत्मानुभवाचा राजा असलेल्या श्रुतीमध्ये वर्णन केलेल्या सिध्दातांच्या सागरा, मदनाचा नाश करणाऱ्या अशा तुला माझा नमस्कार असो. शुध्द भावाने प्रेममय भजन करण्यास योग्य असणारे संसाररुपी हत्तीच्या गंडस्थळाचा भेद करणारे सिहं, विश्वाच्या उत्पत्तीचे स्थान असणाऱ्या गुरूराया,तुला माझा नमस्कार असो.

         तुमचा अनुग्रहरुपी गणेश जेव्हा आपला कृपाप्रसाद देतो, तेव्हा लहान मुलांना देखील अध्यात्मातील सूक्ष्म सिध्दातांचे ज्ञान प्राप्त होण्यास सुरूवात होते. गुरूरायांच्या उदार अशा वाणीने जेव्हा अभयवचन प्राप्त होते. तेव्हा नवरसरुपी अमृतमधुर सागराची खोली मोजता येते. जेव्हा आपली प्रेमस्वरुप सरस्वती मुक्याचाही स्विकार करते, तेव्हा मस्तकावर आपण वरदहस्त ठेवता, तो जीवरुप असूनही सत्-चित्-आनंदरुप शिवाशी  ऐक्य पावतो.एवढी श्रेष्ठ अवस्था ज्यांच्या सामर्थ्याने प्राप्त होते त्यांचे ते अलौकिक सामर्थ्य मी कोणाच्या शब्दांनी वर्णन करु?  सूर्याचे अंग चकचकीत करण्यासाठी  त्याला उटणे  लावता  येईल का?  (ओवी १ ते १० )

          कल्पवृक्षाला फलद्रुप होण्यासाठी त्याला मोहर फुटावयास पाहिजे का? क्षीरसागराचा पाहुणचार कशाने बरे करावा?  कापुराला कोणाच्या वासाने  सुंगध द्यावा? चंदनाला कोणत्या सुगंधी द्रव्याची ऊटी लावावी? अमृताला कसे बरे शिजवावे? आकाशावरती कसा बरे मंडप उभा करावा?  त्याप्रमाणे श्री गुरूंचे महिमान जाणता येईल, असे कोणते बरे साधन आहे? अर्थात असे साधनच नाही, हे जाणून मी काही न बोलता शांतपणे त्यांना नमन केले बुध्दीच्या आधारे श्री गुरुंच्या सामर्थ्याचे वर्णन करु म्हटले तर ते माझे करणे मोत्यांना चकाकी येण्यासाठी अभ्रकाचे पुट दिल्याप्रमाणे  होईल. अथवा साडेपंधरा दराच्या शुध्द सोन्याला जसा चांदीचा मुलामा  द्यावा त्याप्रमाणे हे स्तुतीचे बोलणे होणार आहे. यासाठी काहीही न बोलता श्री गुरुंच्या चरणकमळावर मस्तक ठेवणे हेच बरे.असा विचार करुन ज्ञानेश्वर महाराज श्री गुरुंस म्हणाले, “अहो महाराज ! तुम्ही माझ्याकडे प्रेमाने, आत्मीयतेने पाहिले, म्हणुन मी श्रीकृष्ण-अर्जुन संवादरुपी त्रिवेणी संगमातील प्रयागक्षेत्रातील वड झालो आहे.” पुर्वी मला दुध पाहिजे असे उपमन्युने म्हटल्यावर शिवशंकरानी ज्याप्रमाणे सर्व क्षीरसमुद्राची वाटी करुन त्या उपमन्युसमोर जशी ठेवुन दिली, वडिलांनी मांडीवरुन ढकलुन दिल्यामुळे रुसुन बसलेल्या ध्रुवबाळास वैकुंठनायक महाविष्णुने अढळपद देऊन जसे समजावले.त्याप्रमाणे गीता, जी ब्रम्हविद्येचा राजा आहे आणि सर्व शास्त्रांचे विश्रांती स्थान आहे ती भगवद् गीता मी प्राकृत ओवीछंदामध्ये गावी अशी प्रेरणा श्री गुरूंनी दिली. शब्दरुपी अरण्यामध्ये कितीही भटकलो असता त्या वाचारूप वृक्षाला विचाररुप फळे आली अशी गोष्ट कधी कानांवर येत नाही, परंतु अशा माझ्या वाणीलाच श्रीगुरूंनी विवेकाची कल्पकता केली. (ओवी ११ ते २० )

         माझ्या बुध्दीने देहाशी तादात्म्य साधले होते, त्या माझ्या बुध्दीला ज्ञानानंद भांडाराची खोली केली सातत्याने विषंयाच्या मागे धावणारे माझे मन गीतार्थ रुपी सागरावर शयन करणाऱ्या महाविष्णुप्रमाणे झाले आहे. याप्रमाणे गुरुंदेवाच्या लीला आहेत या बहुविध लीला असल्यामुळे त्यांचे संपुर्ण ज्ञान मी कसे बरे जाणु शकेन? तरीपण महाराज ! धीरपणाने मी जे काही बोललो, ते आपणा सहन करावे.एवढा वेळ आपल्या कृपाप्रसादाने मी भगवद् गीतेच्या पुर्वखंडाचे  ओवीबध्द वर्णन काव्यशास्त्र विनोदाने केले आहे. ( येथे त्याचे वर्णन सध्याच्या प्रचलित मराठी भाषेत केले आहे )  पहिल्या अध्यायात अर्जुनाला झालेल्या विषादाचे वर्णन केले आहे दुसऱ्या  अध्यायात स्पष्टपणे सांख्ययोग सांगितला आहे. तसेच ज्ञानयोग आणि बुध्दीयोग यातील फरक दाखवुन दिला आहे. तिसऱ्या अध्यायात केवळ निष्काम कर्मच कसे योग्य आहे हे सिध्द केले आहे. चवथ्या अध्यायामध्ये तेच निष्काम कर्म ज्ञानासह सांगितले आहे. पाचव्या अध्यायात गुढ पदध्तीने अष्टांगयोगाचे सिध्दांत सांगितले आहेत. तोच योग सहाव्या अध्यायात आसनापासुन  समाधीपर्यत  वर्णन केला आहे जिवा-शिवाचे ऐक्य कसे होईल याचे स्पष्टपणे वर्णन केले आहे. त्याप्रमाणे योगाने सिध्द झालेल्या पुरुषाची स्थिती आणि योगमार्गाने वाटचाल करताना मध्येच मृत्यू आलेल्यास जी गती प्राप्त होते त्याचे वर्णन केले आहे. त्यानंतर सातव्या अध्यायाच्या प्रारंभी परा व पश्यंती असे प्रकृतीचे भेद दाखविले आहेत नंतर भगवंताला भजणाऱ्या चार प्रकारच्या भक्तांचे म्हणजे आर्त, जिज्ञासु, अर्थार्थी व ज्ञानी  पुरूषांचे वर्णन केले आहे. तसेच सात प्रश्न उपस्थित केले आहेत. आठव्या अध्यायात त्या प्रश्नांची उत्तरे सांगितली आहेत, तसेच भक्त आणि सर्वसामान्य माणसे यांचे प्रयाण कसे होते व प्रयाणासाठी शुध्दकाळ कोणता हा विषय अध्याय संपेपर्यत कथन केला आहे. मग वेदांमध्ये कर्म, ज्ञान, आसन या संबंधीचे जे परिपक्व विचार आहेत तेवढे एक लक्ष श्लोक असलेल्या महाभारतात सापडतात. (ओवी २१ ते ३०)

           महाभारतात सांगितलेल्या अठरा पर्वातील अभिप्राय श्रीकृष्ण-अर्जुनाच्या संवादरुपी गीतेच्या सातशे श्लोकांत आहे आणि तोच एकटया नवव्या अध्यायात आहे. म्हणुन नवव्या अध्यायातील अभिप्रायावर उत्तम प्रकारे शिक्कामोर्तब करण्यासाठी भव पावलेला मी गीतेचा अर्थ मराठी भाषेत उत्कृष्ठ पध्दतीने सांगितला असा व्यर्थ अहंकार मी काय म्हणुन धरु?  अहो गुळ आणि साखर यांच्या ढेपा जरी एकाच रसाच्या तयार केलेल्या असतात, तरी पण त्यांची गोडी ही निरनिराळी असते. त्याप्रमाणे गीतेच्या सर्व अध्यायात जरी ब्रम्हस्वरुपाचे वर्णन केले आहे तरी काही अध्यायात अधिष्ठानस्वरुप ब्रम्हस्वरुपाला जाणुन घेण्याचे वर्म सांगितले आहे. काही अध्याय जाणुन घेण्याचा प्रयत्न केला, तर जाणणारा ब्रम्हस्वरुप होतो,असे हे गीतेचे सर्व  अध्याय श्रेष्ठ आहेत परंतु नवव्या अध्यायाचे  वर्णन शब्दांनी करता येत नाही, परंतु महाराज, आपण मला प्रतिभेचे सामर्थ्य प्राप्त करुन दिले म्हणुन मी त्यातील आशय प्रगट करु शकलो. अहो, वशिष्ठऋषीच्या छाटीने सुर्यासारखा प्रकाश पाडला. विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी निर्माण केली, नल वानराने मोठे मोठे दगड पाण्यावर टाकल्याने समुद्रावरुन वानरसेनेने समुद्र पार केला. मारुतीने जन्मताच आकाशात उडडान करुन सुर्याला धरले होते, अगस्ती ऋषीनी एका घोटात समुद्र पिवुन टाकला. त्याप्रमाणे हे गुरूराया, मी मुखाने बोलु शकणार नाही अशा नवव्या अध्यायातील अभिप्राय तुमच्या सामर्थ्याने बोलु शकलो. परंतु हे वर्णन असो, राम व रावण युध्दासाठी  समोरासमोर आले असता त्यांनी युध्द कशाप्रकारे केले , तर ते राम -रावणासारखे केले असेच म्हणता येईल, त्याप्रमाणे नवव्या अध्यायातील श्रीकृष्णाचे बोलणे हे नवव्या अध्यायासारखे आहे. असे मी म्हणतो, ज्याला  गीतेच्या अर्थाचे आकलन झाले आहे, त्या तत्वज्ञानी पुरूषास ही मी केलेला निर्णय पटेल, याप्रमाणे गीतेच्या पहिल्या नऊ अध्यायातील सारभुत तत्व मी माझ्या प्रमाणे प्रगट केले, आता गीता ग्रंथाचा उत्तरखंड श्रवण करा. (ओवी ३१ ते ४०)

            या अध्यायात आता प्रमुख विभुती व गौण विभुती अर्जुनाला सांगितल्या जातील आणि ती विभुतीची कथा वाक् चार्तुययुक्त व रसयुक्त भाषेत वर्णन केली जाईल, मराठी भाषेतील विषय सौदंर्याने शांत रस हा शृंगार रसाला ही जिकूं शकेल, या मराठी ओव्या साहित्य शास्त्राला अलंकार होतील. मुळ गीता ग्रंथ संस्कृत असुन त्यावर माझी (श्री ज्ञानदेवांची) मराठी टिका (भाषांतर) जर एकाग्रतेने वाचली आणि त्यातील सुक्ष्म अभिप्राय मनाला पटला, तर गीतेला ओवीचा आधार आहे का ओवीनां गीतेचा आधार आहे. असा संभ्रम वाचकांच्या मनात निर्माण होईल. ज्याप्रमाणे मुळचे शरीराचे सौदर्य दागिन्यांनी शोभा वाढविते, त्या वेळी कोणी कोणाला शोभा आणली याचा निवाडा करता येत नाही.  त्याप्रमाणे मराठी भाषा व संस्कृत भाषा या दोन्ही ही एकाच अभिप्रेत अर्थाच्या पालखीत शुध्द स्वरुपाने शोभत आहेत, तरी तुम्ही संस्कृत भाषेबरोबर अमृतमधुर मराठी भाषा ही श्रवण करा. गीतेचे पुढील अभिप्राय सांगत असताना शृंगारादी नवरसांचा वर्षाव होऊ लागतो, तेव्हा वाक् चार्तुय म्हणु लागते की आम्हाला या रसाळपणामुळे श्रेष्ठ अशी प्रतिष्ठा प्राप्त झाली मराठी भाषेचे सौदर्य घेवुन मी नवरसांना टवटवीत केले आणि मग गीतेत सांगितलेले सिध्दांत मी  मराठी भाषेत रचले. याप्रमाणे जगाचे महान गुरू असलेले आणि चतुरांच्या चित्ताला आश्चर्यभूत यादवांचे राजे श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाले ते आता एकाग्रतने श्रवण करा. निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीकृष्णाने कोणते वचन बोलले ते ऐका, श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! तुझ्या मनात वैराग्य निर्माण झाल्यामुळे आता तुझ्या अंतकरणात हे आत्मज्ञान स्थिर होईल, आम्ही मागील अध्यायात जे काही सांगितले आहे, त्या वेळी तुझे लक्ष किती आहे हे आजमावुन पाहिले, तुझे लक्ष अपुर्ण नसून पुर्ण आहे असे कळुन आले. (ओवी ४१ ते ५०)

पुढील भाग