अध्याय-१०-भाग-२

ज्याप्रमाणे नवीन मडक्यात प्रारंभी थोडे पाणी घालुन ते गळत नाही याची खात्री करुन मगच ते मडके पुर्ण भरतात, त्याप्रमाणे तूला जे तत्वज्ञान ऐकविले ते तुझ्या अंतकरणात बिबंले हे जाणून पुढे तुला आणखी ऐकवावे असे वाटत आहे, एखादा नवीन चाकर आला तर त्याची परीक्षा घ्यावी आणि तो प्रामाणिक आहे हे कळाले तर त्याला खजिनदार करावे त्याप्रमाणे तु लक्षपुर्वक ऐकतोस हे कळाल्यामुळे तु माझ्या ज्ञानाचे भांडार झाला आहेस.  याप्रमाणे सर्वेश्वर श्रीकृष्णाने अर्जुन मोठा अधिकारसंपन्न आहे असे पाहुन आदराने बोलण्यास प्रारंभ केला. ज्याप्रमाणे पर्वताला पाहुन मेघ जसे अधिकाअधिक भरुन येतो, त्याप्रमाणे कृपांळुचा राजा श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना ! आता ऐक, या पुर्वी सांगितलेलाच अभिप्राय यापुढे सांगत आहे. दर वर्षी शेतामध्ये पेरावे आणि ते शेत फुलुन आले तरी शेताची मशागत करण्यास कंटाळु नये, हे अर्जुना ! सोन्याला पुन्हा पुन्हा क्षाराची पुटे दिल्यामुळे सोन्याचा कस वाढत जातो, आणि ते सोने अधिक शुध्द करावेस वाटते. त्याप्रमाणे अर्जुना! हा अभिप्राय सांगण्यात आम्ही तुम्हावर काही उपकार करत नाही. आम्ही आमच्या स्वार्थासाठी बोलत आहोत. जसे बालकाला अलंकार घातले असता त्या शृंगाराला मूल जाणते काय? परंतु तो सुखाचा सोहळा आई आपल्या दृष्टीने पाहत असते. त्याप्रमाणे तुझे सर्व हित जसजसे तुला समजेल तसतसे आमचे सुख वाढत जाईल अशी वस्तुस्थिती आहे. आता हे अहंकारयुक्त बोलणे राहू दे माझे तुझ्यावरी खरोखर प्रेम आहे म्हणून तुझ्याबरोबर कितीही सुखसंवाद केला तरी माझी तृप्ती होत नाही. (ओवी ५१ ते ६०)

          म्हणून आम्हाला तेच तेच तत्त्वज्ञान सांगावे लागते ही पुनरूक्ती होते  तरीपण माझ्या बोलण्याकडे अंत:करणापासून लक्ष दे. हे वर्म जाणणाऱ्या अर्जुना ! माझे हे परमश्रेष्ठ वचन ऐक हे फक्त वचन नाही  तर वचनाच्या रूपाने अक्षरांचा पेहराव करून व अंगावर अलंकार घालून साक्षात परब्रम्ह तुला भेटावयास आले आहे. तरी हे अर्जुना ! तु मला यथार्थ रूपाने जाणत नाहीस ना ? तर मग मी तुला सांगतो  आता मी तुझ्यासमोर उभा आहे  तेवढाच मी मर्यादित नसून मी म्हणजे सारे विश्वच आहे. माझे स्वरूप सांगण्याविषयी वेददेखील मुके झाले मन व वायू यांची गती कुंठित झाली माझ्या प्रखर तेजाशिवाय रात्र झाल्यामुळे सूर्य-चंद्रही मावळून गेले. ज्याप्रमाणे  पोटामध्ये वाढणारा गर्भ आईचे वय जाणु शकत नाही त्याप्रमाणे माझ्यापासुन निर्माण झालेल्या देवदेवता मला जाणु शकत नाहीत सागरात संचार करणाऱ्या जलचरांना सागराचा अंत लागत नाही किवां चिलटाला आकाश ओलांडता येत नाही  त्याप्रमाणे मोठमोठया महर्षीचे ज्ञानही मला जाणु शकत नाही. मी कोण आहे ? केवढा  मोठा आहे? कोणापासुन उत्पन्न झालो? केव्हा निर्माण झालो? या सर्व गोष्टीचा निर्णय करण्यात कितीतरी  कल्पे निघुन गेली. याचे कारण हे अर्जुना! सर्व महर्षी, देव व इतर प्राणिमात्र या सर्वाचे मीच मुळ आहे त्यामुळे मला जाणणे त्यांना कठीण होते, पर्वतावरुन खली ओघळलेले पाणी जर परत पर्वतावरती चढेल अथवा प्रचंड विस्तारलेले झाड जर मुळाला स्पर्श करील तर माझ्यापासुन निर्माण झालेल्या जगाकडुन मी जाणला जाऊ शकेन. अथवा वडाच्या सुक्ष्म अंकुरामध्ये जर वडाचे विशाल झाड ग्रासुन जाईल अथवा लाटेमध्ये जर समुद्र साठवला जाईल पृथ्वी जर परमाणुमध्ये सापडली जाईल.(ओवी ६१ ते ७०)

           तर माझ्यापासुन निर्माण झालेल्या जीवानां, महर्षींना, अथवा देवदेवतांना मला जाणता येईल.असा मी जरी जाणण्यास कठीण आहे तरी कदाचित जो कोणी प्रवृत्तीची वाट सोडुन देऊन इंद्रियांना पाठमोरा होतो म्हणजे इंद्रियांना जिंकतो. एखाद्या वेळी माणुस विषंयाकडे दैववशात प्रवृत्त झाला तरी तो ताबडतोब विषय सोडुन देतो आणि विचाराने देहभाव टाकुन पंचमहाभुंताच्या ब्रम्हतत्वापर्यत पोचतो.अशी मनाची स्थिती स्थिर झाल्यानंतर परिशुध्द व स्वयंप्रकाशित , उत्पत्तिरहित असे जे स्वरुप, ते त्याला प्रत्यक्ष दिसते, मी कारणच्याही पलीकडे आहे आणि सर्व लोकांचा परम महान असा ईश्वर आहे, अशा या विराट स्वरुपाने मला जो कोणी जाणतो तो पाषाणांमध्ये जसा परीस, रसामध्ये जसे अमृत, तसा तो मनुष्यात माझाच अशं आहे. असे जाण. तो ज्ञानाचे जणु काही चालते सुर्यबिबं आहे. त्याचे अवयव जणु ब्रम्हसुखाचे अंकुर आहेत, एरवी लौकिक दृष्टीने पाहिले तर त्यांचे जे मनुष्यपण तो केवळ भ्रम होय. हिरा जर जळत्या कापुरात पडला तर तो कापराने दग्ध होत नाही नतंर तो पाण्यातही पडला तर तो पाण्याने विरघळत नाही, त्याप्रमाणे तो आत्मज्ञानी मनुष्यलोकातं जरी जन्माला  आला असला तरी आणि सामान्यांप्रमाणे प्राकृत दिसत असला तरीसुध्दा मायेला म्हणजे प्रकृतीच्या दोषाला तो जाणतदेखील नाही आपल्या स्वताच्या नाश होईल या भीतीने पाप त्याला सोडुन जाते सापाचे राहण्याचे स्थान चंदनाचे  झाड जरी असले तरी झाडाला  अग्नी लागताच साप तेथुन निघुन जातो त्याप्रमाणे  मला जो जाणतो त्याला सर्व संकल्प सोडुन टाकतात.(ओवी ७१ ते ८०)

          हेच मला कसे जाणावे असे जर तुझे चित्त कल्पना करत असेल तर मी कसा आहे आणि माझे विकार कोणते आहेत हे लक्षपुर्वक ऐक. ते माझे विकार भिन्न-भिन्न प्राणिमात्रांमध्ये त्यांच्या  त्यांच्या  प्रकृतीसारखे होऊन संपुर्ण त्रैलोक्यामध्ये विखुरलेले आहेत. त्यापैकी पहिली बुद्धी आहे असे जाणा नंतर अगाध असे  ज्ञान असंमोह म्हणजे उपस्तित ज्ञेय गोष्टीकडे विवेकपूर्वक प्रवृत्ती, सहनशीलता, सत्य, मनोनिग्रह, इंद्रियनिग्रह हे दोन्ही आणि अर्जुना मृत्युलोकात असलेले सुख-दुख तसेच जन्म-मरण हे ही विकार आहेत असे जाण. भय, निर्भयता, अहिंसा, समता, संतोष आणि तप हे देखील माझेच भाव आहेत हे  तु जाण. दान, यश, अपकिर्ती  हे  जे सर्व भाव प्राणीमात्रांच्या ठिकाणी दिसतात ते माझ्या पासुन उत्पन्न होतात.ज्या प्रमाणे भूते भिन्न आहेत त्याप्रमाणे विकार देखील भिन्न आहेत  असे जाण. त्यापैकी काही लोकांना माझे ज्ञान प्राप्त होते. तर काही लोकांना होत नाही. प्रकाश व अंधकार हे दोन्ही परस्परांविरुद्ध स्वभावाचे असले तरी ते एकाच सुर्यापासुन निर्माण होतात. सुर्याचा उदय झाला की प्रकाश पसरतो व सुर्याचा अस्त झाला की अंधकार दिसतो. त्याप्रमाणे माझे मन होणे अथवा न होणे हे प्राणिमात्राच्या कर्माचे फल आहे. म्हणुन त्या ठिकाणी विविध प्रकारचे विषम भाव निर्माण होतात. याचप्रमाणे अर्जुना ही संपुर्ण प्राणीमात्र-सृष्टी माझ्याच कोणत्या ना कोणत्या विकारांनी भरली आहे असे समज. (ओवी ८१ ते  ९०)

         आता जे या सृष्टीचे पालन करणारे आहेत आणि ज्यांच्या अधीन राहुन सर्व लोक व्यवहार करतात, ते आणखी अकरा भाव तुला सांगत आहे. सर्व गुणांनी संपन्न मोठमोठया ऋषीमध्ये प्रसिध्द असलेले सात ऋषी आहेत. आणखी चौदा मनू आहेत. त्यातील स्वयंभूवादी प्रमुख असे जे चार मनू  आहेत ते तुला सांगतो. हे धर्नुधरा ! सात ऋषी आणि  चार  मनू असे अकरा भाव सृष्टीच्या उत्पत्तीकरिता माझ्या संकल्पापासुन निर्माण झाले आहेत, ज्या वेळी स्वर्गादी लोकांची काहीही व्यवस्था नव्हती व त्रैलोक्याची रचना झाली नव्हती तेव्हा पंचमहादी भूतांचे समुदाय उपयोगात आलेले नव्हते. तेव्हा सात ऋषी आणि चार मनू  असे अकरा जण  निर्माण झाले आणि त्यांनी सात लोक निर्माण केले, मग अकराजणानी त्या त्या लोकामध्ये लोकांचे प्रमुख अध्यक्ष म्हणून इंद्रादी देवजन मांडुन ठेवले, म्हणून अकराजण राजाप्रमाणे असुन इतर सर्वजण यांची प्रजा आहे, असा हा माझा एकाचा विस्तार विश्वरुपाने प्रगटला आहे असे तु जाण. असे पाहा की आंरभी एकच बीज असते मग ते बीज अंकुररुपाने वाढले असता त्याचे खेाड बनते व त्या खोडातुन फांद्याचे कोंब निघतात. त्या  फांद्यापासुन विविध प्रकारच्या शाखा पसरतात, आणि त्यांतुन कोवळी पालवी आणि पाने फुटतात. त्या पल्लवांतून फुले आणि फळे येतात, अशा प्रकारे एका बीजाला संपुर्ण वृक्षपणा प्राप्त झालेला असतो, सुक्ष्म विचार केला, तर ते विशाल झाड म्हणजे केवळ एक बीजच असते असे सिध्द होते. (ओवी ९१ ते १००)

         याप्रमाणे सृष्टीच्या मुळारंभी मी एकटाच होतो मी अनेक रुपांनी प्रकट व्हावे, अशा त्या संकल्परुपी मनाला उत्पन्न केले. त्यानंतर त्या मनापासुन सप्तर्षी आणि चार मनु निर्माण झाले. त्यांनी इंद्र, अग्नी, यम, वरुण, नैऋती, वायू, कुबेर, ईशान असे आठ लोकपाळ निर्माण केले, त्या  लोकपाळांनी विविध प्रकारच्या स्वर्गादी लोकांची रचना केली, त्या लोकांपासुन सर्व प्रजासमुह निर्माण झाला. याप्रमाणे येथे जे प्रत्यक्ष स्वरुपात अफाट विश्व दिसते, ते मी अशा परंपरेने निर्माण केलेले आहे. परंतु शुध्द भावनेने ज्याला हे जाणता येईल त्यालाच हे समजु शकेल. यास्तव हे अर्जुना ! हे अकरा भाव म्हणजे माझ्या विभुती आहेत या विभुतीच्या व्यापकपणाने हे संपुर्ण विश्व व्यापलेले आहे. अशा रीतीने ब्रम्हदेवापासुन मुंगीपर्यत जेवढे प्राणी आहेत, या सर्वामध्ये माझ्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट नाही असे हे सत्य जो जाणतो त्याला ज्ञानाची जागृती होते. तो पुरुष हा उत्तम, तो अधम असे स्वप्नातदेखील पाहत नाही, मी आणि माझ्या विभूतीनी व्यापलेले सगळे प्राणिमात्र हे सर्वही ऐक्य-प्रतीतीने तो एकच समजतो. म्हणून सर्व प्रकारचा भ्रम-संशयरहित होऊन हया महायोगाने म्हणजे ऐक्यभावनेने तो मनाच्या सर्व वृत्तीसह माझ्याशी एकरुप झाला, असे समजावे, हे अलौकिक सत्य आहे यात शंका घेण्याचे काही कारण नाही. कारण अर्जुना ! अशा प्रकारच्या अभेद भावाने जो मला भजतो, त्याच्यां भजनाच्या छंदाने मी  त्याच्यां प्रेमपाशात अडकतो, म्हणून अभेद असा जो भक्तीयोग आहे, याबद्दल काही शंका नाही आणि यास खंडदेखील नाही या भक्तीयोगाचे आचरण करताना मध्येच काही व्यत्यय आला तरी असा भक्त पुढील जन्मी भक्तीयोगाच्या आचरणाने माझ्या ऐक्य पावतो, हे तुला सहाव्या अध्यायात उत्तम प्रकारे समजावुन सांगितले आहे. (ओवी १०१ ते ११०)

           ती अभेद भक्ती  कशा प्रकारची असते, हे जाणण्याची इच्छा मनात निर्माण होत असेल तर त्यांचे उत्तर मी जाणतो ते ऐक. तरी  अर्जुना ! मीच या जगाचा उत्पन्नकर्ता आहे, मीच सर्वाचे पालन करणारा आहे. अनेक लाटांचा जन्म पाण्याच्या ठिकाणी होत असतो, त्या तरंगांना आधार पाणीच असते तसेच तरंगांचे जीवनसुध्दा पाणीच असते, याप्रमाणे पाहा सर्व स्थितीमध्ये लाटांना ज्याप्रमाणे एक पाणीच असते, त्याप्रमाणे संपुर्ण विश्वास माझ्याशिवाय दुसरे काही नाही. अशा प्रकारे मी सर्वत्र सदैव सम प्रमाणात आहे हे जाणून भक्त कुठेही कोणत्याही  काळात मला भजतात. त्यांची ही भक्ती अंतकरणातुन प्रगटलेल्या प्रेमभावाची असते. वायू जसा आकाशरुप होऊन आकाशात मुक्त संचार करत असतो त्याप्रमाणे देश, काळ, वर्तमान हे सर्व माझ्या स्वरुपाशी एकरुप आहेत हे जाणून, सर्व भक्त त्याप्रमाणे आचरण करत असतात. याप्रमाणे ते आत्मज्ञानी पुरूष सर्वव्यापक असा जो मी त्याला मनामध्ये पुर्णपणे साठवुन त्रिभुवनात आपले कर्म करतात, जे जे प्राणिमात्र भेटतील, ते ते भगवंताचे स्वरुप आहे असे मानावे हाच भक्तियोग आहे, असे निश्चीतपूर्वक जाण, जे आपले चित्त माझ्याशी एकरुप करतात, ज्याचे प्राण माझ्या स्वरुप-अनुभवाने तृप्त झालेले असतात व अशा स्थितीमध्ये बोधाच्या भुलीमध्ये जे जन्म-मरणाला विसरतात. ज्ञानाच्या प्राप्तीमुळे ते आनंदाने नाचतात आणि सुख-संवादाच्या आवडीने एकमेकांना ज्ञान देतात व घेतात. (ओवी १११ ते १२०)

पुढील भाग