अध्याय-१०-भाग-४

         तरी जनार्दना ! असा विचार तुझ्या मनात येवु देवू नकोस कारण जगातील सामान्य अमृत कोणीही घेतले तरी जे अमृत काळकुट विषाचे सख्खे भावंड आहे, मरणाच्या भितीने देवांनी ते घेतले असतानाही ब्रम्हदेवांच्या एका दिवसात चौदा इंद्राचा लय होतो मग त्या क्षीरसागराच्या अशा रसाचे अमृत हे नाव मिथ्या आहे का?  परंतु तरीही त्याला कोणी नको म्हणत नाही,  मग आपण तर परमामृत आहात, त्याची गोडी किती असेल बरे?  हे आत्मज्ञानरुपी परमामृत मंदार पर्वताची रवी करुन समुद्र न घुसळता अनादि तसेच स्वभावत:  स्वयंमसिध्द आहे. हे पाझरत नाही आणि  द्रवतही नाही, याचा गंधही नाही आणि हे सामान्य दृष्टीला दिसत नाही, असे हे परमामृत सदैव आहे आणि नाही याच्या पलिकडचे आहे रुपाने असल्यामुळे जो कोणी अंतकरणापासुन याचे स्मरण करेल, त्याला याचा अनुभव येतो. हे  परमामृत प्राशान करताच आत्मज्ञान प्राप्त होते, यामुळे स्वत्वाचा ऱ्हास होतो आणि जो मी आहे तो विश्व चैतन्यात विलीन होतो. जन्म-मृत्युचे भय संपते, आत्मा अंर्तबाहय महासुखाचा नित्य सुखद अनुभव घेवु लागतो. परमात्म्याची सेवा करताना दैवयोगाने याचे सेवन घडले तर सेवन करणारा स्वता परमामृत होवुन जातो. असे जे परमामृत तु स्वता मला देत असताना माझे चित्त पुरे असे म्हणू शकत नाही. आधी तर आम्हाला तुझे नाव आवडते त्यात तुमची भेट झाली आणि सहवास वाढला,त्याशिवाय आनंदाने आपण बोधाची वचने सांगत आहात. (ओवी १९१ ते २००)

           आता हे सुख कशा सारखे म्हणाल तर त्याचे वर्णन करता येत नाही. मला झालेल्या आनंदाने काही बोलता येत नाही, मला असे वाटते की, तुझ्या मुखातुन प्रगटलेली अमृतवाणी पुन्हा पुन्हा ऐकावी. अहो रोज उगवणाऱ्या सुर्यनारायणाला शिळा म्हणता येईल काय? अग्नीला ओवळा म्हणता  येईल काय? अथवा सदैव वाहत असणाऱ्या गंगेच्या जलास पारोसेपण येईल काय? तुम्ही मुखातुन जे आत्मज्ञान सांगितले, त्याचे श्रवण करुन असे वाटते की मूर्तिमंत नादब्रम्ह आमचे समोर उभे राहीले आहे, दुर्मिळ अशा चंदनाच्या फुलांचा सुगंध अनुभवित आहोत. असे अर्जुनाचे बोलणे ऐकुन श्रीकृष्ण सर्वागांने डोलु लागले आणि म्हणाले, हा  अर्जुन जणु काही भक्तीज्ञानाचा मळाच झालेला आहे. याप्रमाणे अर्जुनाचे बोलणे अंगीकार करण्याच्या संतोषामध्ये  प्रेमाचा जो आवेग वाढत होता, तो प्रयत्नाने सावरुन धरुन श्री अनंत बोलु लागले. स्वता ब्रम्हदेवाचे बाप असताना ही अत्यंत पुरातन गोष्ट लक्षात न राहिल्यामुळे भगवान म्हणाले, “बापा” अर्जुना हे चांगले केलेस, श्रीकृष्ण अर्जुनाला बापा म्हणाले, यात आश्चर्य करण्याचे काही कारण नाही, कारण तो स्वता नंदाचे लेकरु होवुन नंदाला बाबा म्हणतोच ना, परंतु आता हे राहु द्या प्रेमाचा अतिरेक झाला म्हणजे अशा गोष्टी घडतात, मग देव म्हणाले,  हे अर्जुना ! आता तुला प्रस्तुत विषय सांगतो तरी त्याचे श्रवण कर. हे सुभद्रापते, तु माझ्या विभुती विचारल्यास त्या अनंत आहेत, जरी त्या विभुती माझ्यात आहेत, तरी माझ्या बुध्दीने मला त्यांची गणना करता येत नाही, ज्याप्रमाणे आपल्या अंगावरचे केस मोजता येवु शकत नाही, त्याप्रमाणे माझ्याच विभुती आहेत पण मला न  मोजता येण्याएवढया असंख्य आहेत.  (ओवी २०१ ते २१०)

            एरवी देखील मी कसा आहे, केवढा आहे, हे खरे तर मलाच कळत नाही, याकरिता ज्या प्रमुख आणि प्रसिध्द  विभुती आहेत, त्या श्रवण कर.  अर्जुना ! या प्रमुख विभुती जाणल्या असता सर्व‍ विश्व जाणल्यासारख्याच आहेत, जसे बीज हातात आले असता वृक्षच हाती आल्यासारखा होतो. अथवा बाग हातात आल्यावर आपोआप फळे, फुले हाती लागतात, त्याप्रमाणे प्रमुख विभुती जाणल्या असता सर्व‍ विश्व जाणल्यासारखे होते. अर्जुना ! एरवी खरोखरच माझ्या विस्ताराचा अंतच नाही, अमर्याद असे आकाशदेखील माझ्यात लपुन बसू शकते एवढा मी व्यापक आहे. ज्यांच्या मस्तकावर कुरूळे केस आहेत आणि धर्नुविद्येत जो शंकराप्रमाणे तरबेज आहे, अशा अर्जुना, ऐक प्रत्येक प्राणिमात्रांच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मीच आहे. भूतांच्या अतंकरणात आतल्या बाजुने मी आत्मरुपाने आहे. बाहेरच्या बाजुनेही भूतमात्रांना ब्रम्हरुपाने गवसणी आहे तसेच भूतमात्रांच्या आरंभी, मध्ये व अंतीही मीच आहे.  जगताचे कल्याण करणारा जो शंकर तो मीच आहे. याविषयी मनात काही शंका धरू नकोस. ज्याप्रमाणे मेघांच्या खाली, वर, आत, बाहेर सर्वत्र आकाशच असते आणि मेघ हे आकाशात उत्पन्न होऊन आकाशातच असतात, ज्या वेळी मेघ लय पावतात  त्या वेळी आकाशरूप होऊन राहात, त्याप्रमाणे भूतांच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयकालामध्ये मीच एक त्यांचा आश्रय आहे. असे माझे सर्व ऐश्वर्यत्व आणि व्यापकपण माझ्या विभूतींच्या योगाने जाणून घे. तरी जीवाचे कान करून पूर्वी ऐकलेल्या ज्ञात गोष्टी पुन: एकाग्रतेने ऐक. हे सुभद्रापती, माझ्या व्यापक विभूती सांगितल्यावर आता पुढील विभूती सांगण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. तरी पण तुला सांगेन असे म्हटले होते याकरिता ज्या माझ्या प्रमुख विभूती आहेत  त्या ऐक.(ओवी २११ ते २२०)

           असे बोलून तो कृपाळू मी आहे. आदित्य नावाच्या बारा देवतांमध्ये विष्णू नावाची देवता ही माझी विभूती आहे. तेजस्वी वस्तूंमध्ये किरणयुक्त सूर्य माझी विभूती आहे. श्रीकृष्ण म्हणाले, एकोणपन्नास मरूत-गणांमध्ये मरीचि मी आहे. आकाशातील नक्षत्रांत चंद्रमा मी आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेद या चारी वेदांमध्ये प्रभूची सुस्वराने स्तुती केली आहे, असा सामवेद मी आहे. देवांमध्ये मरूदगणबंधू जो इंद्र  तो मी आहे. पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये या दहा इंद्रियांमध्ये अकरावे इंद्रिय जे मन ते मी आहे. सर्व प्राणिमात्रांमध्ये आंतरिक स्वाभाविक असणारी चेतना ही माझी विभूती आहे. हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, शंभू, कपदी, रैवत, मृगव्याध,  शर्व, कपाली, निशापती  या सर्व रूद्रांमध्ये मदनाचा म्हणजे कामाचा‍ शत्रू बनून जगताचे कल्याण करणारा जो देवाधिेदेव महादेव भगवान “शंकर” तो मी आहे. या विषयी मनात काही शंका धरु नकोस, यक्ष, राक्षस आणि प्रमथादिक गण यांच्यामध्ये शंकराचा जो मित्र धनवान कुबेर तो मी आहे, असे अनंताने सांगितले  जर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्यय आणि प्रभारु या आठ वसूंमध्ये भगवंताचे मुख असणारा अनल म्हणजे “अग्नी” मी आहे हे लक्षात  ठेव, ऊंच शिखराच्या पर्वतात सर्वात  ऊंच असा मेरु पर्वत मी आहे, स्वर्गाच्या राज्याला साहाय्य करणारा आणि जो सर्वज्ञतेमध्ये प्रमुख आहे असा जो पुरोहितांमध्ये श्रेष्ठ तो बृहस्पती मी आहे, हे बुध्दिमान अर्जुना! श्री शंकराच्या वीर्यापासुन अग्नीच्या संगतीने कृतिकाच्या ठिकाणी उत्पन्न झालेला तो त्रिभुवनातील सेनापतीत मुख्य असा कार्तिकस्वामी तो मी आहे, सर्व जलाशयामध्ये पाण्याचा मोठा साठा असणारा समुद्र तो मी आहे भृगु, पुलस्य, ऋतु, अंगिरा, मरिची, दक्ष, अग्नी आणि वसिष्ठ या दहा महर्षी मधील तपाच्या राशी असलेला जो भृगु तो मी आहे. (ओवी २२१ ते २३०)

         वैकुंठप्रिय श्रीकृष्ण म्हणाले, सर्व वाणी मध्ये ज्या अक्षरात सत्याचा उत्कर्ष असतो ते एक अक्षर ओमकार मी आहे. सर्व यज्ञांमध्ये कर्माचा त्याग करुन ओमकारादिकांनी उत्पन्न होणारा जो जपयज्ञ आहे. ती माझी विभुती आहे. तो नामजप यज्ञ श्रेष्ठ आहे,या जपयज्ञासाठी स्नानादी नित्य नैमित्तीक कर्मे केलीच पाहिजेत असा नियम नाही. नामाने धर्माचे संवर्धन होते आणि अधर्माची निवृत्ती होते, अशा प्रकारे धर्माधर्म पवित्र होतात, वेदांच्या अर्थाने नाम हे परब्रम्ह आहे. अचल अशा पर्वतांमध्ये ऋषि-मुनिच्या तपश्चर्येने पुण्यतम झालेला असा जो हिमालय तो मी आहे, असे लक्ष्मीपती म्हणाले, कल्पवृक्ष, पारिजातक, चंदन हे गुणांनी प्रसिध्द आहेत परंतु सर्व वृक्षात अनेक देवतांचा निवास असणारा अश्वत्थ वृक्ष (पिपंळ ) मी आहे, हे बुध्दिमान अर्जुना! सर्व सिध्दांमध्ये कपिलाचार्य मी आहे, सर्व घोडयामध्ये जो उच्चै:श्रवा नावाचा घोडा आहे ती माझी विभूती आहे जो देवांनी घुसळून काढलेल्या क्षीरसागरातुन अमृतबरोबर निघाला तो राजांचे भुषण असलेला ऐरावत नावाचा हत्ती ती माझी विभूती आहे, सर्व लोक प्रजा होऊन ज्याची विशेष सेवा करतात तो ” राजा” माझी  विशेष अशी विभूती आहे, अर्जुना! शंभर यज्ञ सुखरुपणे पुर्ण केलेल्या इंद्राच्या हातात असणारे आयुधामध्ये श्रेष्ठ असे वज्र मी आहे. (ओवी २३१ ते २४०)

          सर्व गायीमध्ये मनोकामना पुर्ण करणारी कामधेनु मी आहे. याप्रमाणे ज्यांच्या सेना विस्तार पावलेल्या आहेत ते श्रीकृष्ण  म्हणाले, प्रजा उत्पन्न करण्यामध्ये धर्माशी रत असलेला जो मदन तो मी आहे,  सर्प कुळामध्ये सर्पाचा मुख्य असलेला वासू  तो सर्प मी आहे, अर्जुना! सर्व नागांमध्ये हजार फणा असलेला अनंत नाग ती माझी विभूती आहे. अर्जुना! जलचरांमध्ये पश्चिम दिशारुप तरुण स्त्रिचा स्वामी जो वरुण  तो मी आहे, काव्यवाह, अनल, सोम, यम, अर्यमा, अग्निष्वात, बर्हिपद,सुकाल, अंगिरस, सुस्वधा, सोमप, वैराज या सर्व पितृगणांमध्ये अर्यमा नावाचा जो पितृदेव तो मी आहे, ही खरी वस्तु स्थिती सांगत आहे,जगाची शुभाशुभ कर्मे अचुकपणाने ज्याच्या त्याच्या मनाने लिहीणारे, प्राणिमात्रांच्या मानसिक पापांचा झाडा कसुन घेणारे मग ज्याचे जसे कर्म असेल त्याप्रमाणे भोगाची अवस्था करणारे जे आहेत, त्या नियमन करणाऱ्यांत जो सर्वाच्या कर्माचा साक्षी धर्म, दुर्जनांना कठोर व सज्जनांना दयाळु असलेला जो यम, तो मी आहे, असे आत्मानंदात रममाण होणारे लक्ष्मीपती म्हणाले, दैत्यांच्या कुळामध्ये प्रल्हाद त्याच्या भक्तीमुळे महान आहे  ती माझी विभूती आहे. म्हणुन भक्त प्रल्हाद हा  दैत्यांच्या असुरी स्वभावाच्या संर्पकाने लिप्त झाला नाही, निमेष‍, काष्टा, क्षण, दिन, पक्ष, मास, वर्ष, युग इत्यादी काळाची गणना करण्या मध्ये जो महाकाळ आहे तो मी आहे, असे गोपाळ कृष्ण म्हणाले, सर्व हिंस्त्र पशूंमध्ये क्रुर असलेला सिंह ही माझी विभूती आहे. पक्ष्यांमध्ये विनितेचा पुत्र सर्व पक्ष्यांचा राजा असा जो गरुड तो माझी विभूती आहे, हे जाणून घे, त्यामुळे तो मला पाठीवर वाहु शकतो. हे धर्नुधरा ! पृथ्वीच्या सभोवती एक क्षणदेखील न लावता एकाच उडडाणात सातही सागरांना जो प्रदक्षिणा घालतो. (ओवी २४१ ते २५०)

           अशा प्रकारे वेगवानांमध्ये जो श्रेष्ठ वायु तो मी आहे, आणि अर्जुना ! सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये दशरथी श्रीराम ही माझी विभूती आहे. ज्या रामचंद्राने संकटात पडलेल्या धर्माचा कैवार घेऊन आपल्या रुपानेच दुसरे धनुष्य बनवुन त्रैतायूगामध्ये विजयरुप लक्ष्मीस आपल्या एकाकडेच वळविले, नंतर सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे राहुन प्रतापशाली लंकेचा राजा जो रावण त्याच्या मस्तकाची ओळ आकाशामध्ये  “उदो उदो” म्हणणाऱ्या पिशाचांच्या हातावर बळी दिली. ज्या रामाने देवांचा गेलेला मान परत राखला, धर्माचे पुनरोत्थान केले जो सुर्यवंशात केवल प्रतिसुर्यच उदयाला आला, असा जो जानकीचा पती रामचंद्र तो सर्व शस्त्र धारण करणाऱ्यामध्ये माझी विभूती आहे, शेपटी असलेल्या जलचरामध्ये शक्तीवान असा जो मकर आहे तो मी आहे, सर्व जलप्रवाह (नद्यांमध्ये) पवित्र आणि पापमुक्त करणारी गंगा नदीस भगीरथ ऋषी विष्णुपदापासुन मृत्यूलोकात आणत असताना  जऱ्हू नावाच्या ऋषीनी गंगा नदीस प्राशान केले, त्यांची प्रार्थना केल्यानंतर त्यांनी गंगा नदीस मांडीतुन काढुन दिली, अशी जी त्रिभुवनाला पवित्र आणि पापमुक्त करणारी गंगा नदी माझी विभूती आहे असे समज , अशा प्रकाराने जगातील विविध विभूतीची एकेक नावे घेऊ लागलो तर पुर्ण आयुष्य असलेल्या हजारो जन्मांमध्ये त्या अर्ध्यादेखील  सांगुन होणार नाहीत हे निश्चीत समज. आकाशातील सर्व नक्षत्रे ज्याप्रमाणे एकदम वेचावीत, अशी मनात इच्छा निर्माण होईल  तेव्हा आकाशाची मोट बांधली ती सर्व नक्षत्रे हाती येतील. अथवा पृथ्वीच्या परमाणूंची मोजदाद करावी अशी इच्छा असेल तर सर्व पृथ्वीच काखेत घ्यावी लागेल. त्याप्रमाणे माझा विस्तार किती महान आहे असे पाहावयासे वाटत असेल तर मलाच जाणले पाहिजे.  (ओवी २५१ ते २६०)

पुढील भाग