अध्याय-१०-भाग-५

         ज्याप्रमाणे फांदया सह फळे, फुले एकदम हातात घेवु म्हटले तर त्या झाडाचे मूळच उपटून हातात घ्यावे लागेल. त्याप्रमाणे माझ्या प्रमुख विभूती जाणुन पहावयाच्या असतील तर माझे निर्दोष उपाधिरहित स्वरुप जाणावे लागेल. येऱ्हवी वेगवेगळया विभूती किती ऐकत राणार आहेस? म्हणून महाबुध्दीमान अर्जुना ! एकदाच मीच सर्व आहे जे जाण. ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये उभे-आडवे सुतच भरलेले असते, त्याप्रमाणे  अर्जुना !  सर्व जगाच्या आंरभी, मध्ये आणि शेवटी मीच आहे. अशा विश्वव्यापक मला जाणले जाते, तेव्हा विभुतीचे वेगवेगळे प्रकार जाणून काय करावे?  परंतु तु माझ्या निरुपाधिक विशाल स्वरुपाला एकदम जाणू शकत नाहीस म्हणून प्रमुख विभूती सांगत आहे, अर्जुना ! तु मला विभूती विचारल्यास म्हणून सांगत आहे तरी आता ऐक, सर्व विद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आनंदरुप अध्यात्मविद्या मी आहे. विविध शास्त्रांची एकवाक्यता होऊन वाद हा कधी संपत नसतो, तत्वसार जाणण्याकरता परस्परांमध्ये जो वाद होत असतो तो मी आहे असे जाण. जो वाद तत्वाचा निर्णय करु लागलो की अधिक वाढतो आणि ऐकणाऱ्याच्या तर्कास बळ प्राप्त होते, हा वादविवाद बोलणाऱ्यांची वचने गोड होतात. याप्रमाणे प्रतिपादनामध्ये जो वाद सुरू असतो, ती  माझी विभूती आहे, सर्व समास-समुहामध्ये “द्वंद्वं”  नावाचा समास मी आहे हे समजुन घे, चिलटापासुन ब्रम्हदेवांपर्यत सर्वाचा ग्रास करणारा काळ तो मी आहे.        (ओवी २६१ ते २७०)

         मेरु, मंदार  आदी पर्वतासहित पृथ्वीलाही जो गिळंकृत करतो जो प्रलयकाळी संपुर्ण जलमय झालेल्या जगास जागच्या जागी जिरवतो. हे अर्जुना !  जो प्रलयकालीन तेजाला आंलिगन देत सर्व वायुनां गिळुन टाकतो आणि आकाशदेखील ज्याच्या पोटात सामावले जाते. असा अमर्याद महाभंयकररुप काळ तो मी आहे. नंतर सृष्टीवी निर्मीती करणारा जो ब्रम्हदेव तो माझीच विभुती आहे असे लक्ष्मीशी लिला करणारे वैकुंठनाथ म्हणाले. उत्पन्न झालेल्या प्राणिमात्रांना धारण करणारा मीच आहे. सर्वाना धारण करणारा मीच आहे आणि सर्वाचा नाश करतो त्या वेळी मृत्यूदेखील मीच असतो. आता स्त्री समुहापैकी माझ्या आणखी सात विभुती आहेत, त्यांचे मी कौतुकाने वर्णन करतो तरी तु श्रवण कर. हे अर्जुना !  धर्माच्या आचरणाने नित्य नुतन “किर्ती” येते ती माझीच मुर्ती म्हणजे विभुती आहे, औदार्ययुक्त जी “संपत्ती” तीही मीच आहे, असे जाण आणि न्यायाच्या सुखसिहांसनावर बसुन विवेकाच्या मार्गाने चालणारी जी वाणी आहे तीही मीच आहे. जगातील कोणताही पदार्थ डोळयांनी पाहीला असता माझे स्मरण करुन देणारी अशी जी स्मृती आहे ती मी आहे हे त्रिकालसत्य आहे स्वहिताविषयी सदैव जागरुक असते अशी बुध्दी ती मी आहे, याप्रमाणे स्त्रियांमध्ये या सातही शक्ती मीच आहे. हे लक्षात ठेव.असे संसाररुपी हत्तीचे विदारण करणारा श्रीकृष्णरुपी सिंह म्हणाला. (ओवी २७१ ते २८०)

         माझ्या प्राणप्रिय अर्जुना ! वेदांच्या राशीमध्ये रर्थरादि सामवेदा मध्ये ज्या ऋचेमध्ये संगीताच्या आधारे भगवंताची स्तुति केली आहे तो बृहसाम मी आहे, असे शारगंधर श्रीकृष्ण म्हणाले, सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना तो मी आहे, सहा ऋतुमध्ये फुलांना फुलविणारा जो वसंत ऋतु आहे तो मी आहे, हे विलक्षण बुध्दीमान अर्जुना !  कपटकारक कारस्थाना मध्ये द्युत ही माझी विभुती आहे. म्हणुन चव्हाटयावर उघडयावर चोरी झाली तर त्याचे निवारण कोणालाही करता येत नाही. अरे , सर्व प्रकारच्या तेजस्वी पदार्थामध्ये जे तेज आहे ते मी आहे, यावर भरवसा ठेव. सात्विक कार्याच्या उद्देशाने केलेल्या प्रयत्नामध्ये मिळालेला विजय अथवा यश मी आहे. ज्या उद्योगामध्ये धर्मनिती शुध्द स्वरुपात दिसतात तो उद्योग सर्व उद्योगामध्ये श्रेष्ठ असल्यामुळे माझे स्वरुप आहे. असे देवाचे राजे  श्रीकृष्ण म्हणाले, सत्वगुणसंपन्न असलेल्या पुरुषांमध्ये जे सत्व आहे ते मी आहे, असे अनंत म्हणाले आणि यादव कुळातील पुरुषांमध्ये ऐश्वर्यवान जो कृष्ण तो मी आहे, जो वसुदेव-देवकीपासुन जन्मला आणि यशोदेपासून झालेल्या मायारुपी कुमारी साठी गोकुळात गेला. ज्याने मथुरेचा राजा कंसाने पूतना राक्षसीला स्तनपान करण्यास पाठवले असले तरी (श्रीकृष्णानां ) मारण्याचा हेतु होता, परंतु स्तनपान करताना तिचे प्राण हरण केले तो  कृष्ण  मी आहे. बाळदशेतच अनेक दैत्यांचा नाश करुन सृष्टी दैत्यरहित केली देवराज इंद्राचे गर्वहरण करण्यासाठी आणि गोकुळवासियांचे जलप्रलया पासुन रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलुन आपल्या हातावर घेतला, यमुना नदीच्या कालिंदीच्या डोहातील कालिया नागाचे हरण करुन त्याला पाताळात पाठवले, दावाग्नीपासुन जळत असलेल्या गोकुळाचे संरक्षण केले, ब्रम्हदेवाने गोपाल आणि वासरांना  पळवुन घेवुन गेल्यावर दुसरे पशुधन निर्माण करुन त्यास वेड लावले. (ओवी २८१ ते २९०)

       बालपणीच कंसासारखी राक्षसी प्रवृत्तीची संकटे नाहीशी केली, हे काय आणि किती म्हणुन सांगावे? हे सर्व तु पाहीले आहेस आणि ऐकले आहेस यादवांमध्ये कृष्ण ही माझी स्वरुपी विभुती आहे हे जाण, सोमवंशामधील तुमच्या पांडवांमध्ये जो अर्जुन तो मी आहे असे जाण, म्हणून तुझ्या-माझ्या परस्परांच्या प्रेमभावामध्ये बिघाड येत नाही, तु या लोकांमध्ये संन्यासी बनुन माझी बहीण सुभद्रा चोरुन नेलीस, तरीपण माझ्या मनात  विकल्प निर्माण झाला नाही, याचे कारण मी आणि तु दोघे ही एकरुपच आहोत, सर्व मुनीमध्ये श्रेष्ठ असे जे व्यासदेव ती माझी विभुती आहे असे यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले, सर्व कवीमध्ये श्रेष्ठ जे शुक्राचार्य ही माझी विभुती आहे. जो मुंगीपासुन ब्रम्हदेवापर्यत सर्वास सारखे शासन करतो, जो दमन करण्यामध्ये दंड तो मी आहे असे जाण, सारासार विचार करुन ज्या शास्त्रांमध्ये जे धर्माचे अनुकरण केलेले असते ते धर्मज्ञानाला आधारभुत असे निती शास्त्र ती सारी माझी विभुती आहे, हे शक्तीशाली अर्जुना ! सर्व गुहयांमध्ये जे मौन ते मी आहे म्हणून न बोलणाऱ्यांच्या मध्ये ब्रम्हदेवसुध्दा अज्ञानी होतो, ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी असणारे जे ज्ञान, ती माझी विभुती आहे, आता हा विभूती विस्तार राहु दे, कारण या विभूतीनां मला कुठेही मर्यादा दिसत नाही. हे अर्जुना ! पावसाच्या धाराची गणना करता येईल काय? अथवा पृथ्वीवर गवताचे अंकुर किती उगवले आहेत याचा निश्चय करता येईल काय?        (ओवी २९१ ते ३००)

         ज्याप्रमाणे  महासागरांच्या  लाटांची गणती करता येत नाही त्याप्रमाणे माझ्या विशेष विभुती मोजता येत नाहीत. अर्जुना ! असे असले तरी तुला माझ्या प्रमुख पंचाहत्तर विभुती मी सांगितल्या परंतु आमचे हे थोडक्यात सांगणे आमच्या मनाला वरवरचे वाटते, बाकीच्या आमच्या विभुती विस्ताराला काही मर्यादा नाही म्हणुन आम्ही सांगणार तरी किती आणि तु श्रवण  तरी करणार किती? याकरीता आमचे वर्म तुला एकदम सांगतो ज्या एका बीजापासुन सर्व अंकुर निर्माण होतात ते बीज मी आहे,  म्हणुन कोणत्याही प्राणिमात्रांला लहान अथवा मोठे म्हणु नये तसेच त्यांच्या विषयी उच्च-निच भाव सोडुन द्यावा आणि विश्वातील सर्व वस्तुमध्ये मीच एक आहे असे समजावे.  अर्जुना ! यापेक्षा सर्वसामान्य आणखीन एक खुण आहे, ती मी तुला सांगतो त्या लक्षणावरुन तु ती विभुती माझी आहे असे जाण.  हे धनंजया !  ज्या ज्या ठिकाणी संपत्ती आणि दयाभाव हयाचे वास्तव्य आहे तो तो पुरुष‍  माझी विभुती आहे असे जाण. अथवा आकाशामध्ये सुर्यबिबं हे एकटेच असते परंतु त्याचा प्रकाश त्रैलोक्यात सर्वत्र पसरलेला असतो त्याप्रमाणे ज्या एकटयाची आज्ञा सर्वजण पाळतात. त्याला तु कदाचित एकटा आहे असे म्हणशील परंतु तसे म्हणु नकोस तो निर्धन आहे अशी भाषाही बोलु नकोस कारण दुसऱ्यांची मनोकामना पुर्ण करण्याकरता कामधेनुला आपल्या बरोबर काही सामुग्री घ्यावी लागते काय?  त्या कामधेनुला ज्या वेळी जो जे मागेल त्या वेळी ती त्याच्यासाठी तेव्हाच एकदम प्रसवु लागते त्याप्रमाणे माझ्या विभूतीच्या अंगी सर्व ऐश्वर्य भरलेले असते.  (ओवी ३०१ ते ३१०)

         त्याला ओळखण्याची हीच खूण आहे की , जगाने त्याची आज्ञा अत्यंत नम्र भावाने मानलेली असते. हे बुध्दिमान अर्जुना, असे जे कोणी आहेत ते माझेच अवतार आहेत असे जाण. ही सामान्य विभूती आहे ही विशेष विभूती आहे असे जाणणे हा महादोष आहे. कारण मीच एक संपूर्ण विश्वाच्या रूपाने पसरलेलो आहे. तरी ही विभूती साधारण आहे आणि ही विभूती चांगली आहे अशी कल्पना  करून निष्कारण आपल्या बुध्दिला कलंक का बरे लावून घ्यावा? एरवी तूप कशासाठी घुसळावे? अमृताला शिजवून का बरे अर्धे करावे ? अरे! वाऱ्याला डावे-उजवे असे अंग असते काय? सूर्यबिंबाची पाठ कुठे आहे; आणि त्याचे पोट कुठे आहे , याचा शोध घेऊ लागलो, तर दृष्टीच आंधळी होऊन जाईल. त्याप्रमाणे माझ्या विशाल स्वरूपाच्या ठिकाणी हा सामान्य, हा विशेष, असा भेद पाहणारा अज्ञानी ठरेल. माझ्या परिशुध्द स्वरूपाचे ठिकाणी सामान्य आणि विशेष, असा भेदच नाही. हे सुभद्रापते, माझ्या ज्या अगणित विविध प्रकारच्या विभूती आहेत, त्या तू किती बरे मोजू शकशील ? म्हणून माझ्या विभूती जाणण्याची तुझी इच्छा पुरे कर. माझ्या एका अंशाने हे सर्व विश्व व्यापलेले आहे, याकरिता सर्व भेदभावांचा त्याग करून सर्व भूतांना भगवद् भावनेने समान मानून साम्याभावाने माझी भक्ती करावी. ज्ञानरूप वनास वसंत ऋतुप्रमाणे आनंद देणारे आणि विरक्तांना एकांतात सोबत देणारे, असे सर्वगुण ऐश्वर्यसंपन्न श्रीकृष्ण परमात्मा बोलले. तेव्हा अर्जुन‍ म्हणाला, हे स्वामी !  माझ्या विभूतीच्या ठिकाणी कोणताही भेद मानू नको, असे जे तुम्ही सांगितले, ते आपल्या मोठेपणाला शोभून दिसते. कारण भेद वेगळा आणि त्याचा त्याग करणारे आम्ही निराळे असे झाले, सूर्यनारायण उगवण्यापूर्वी जगाला असे म्हणतो काय, की आपण अंधकाराला दूर घालवून द्या. त्याप्रमाणे तुमच्या स्वरूपापुढे भेद नाही. या बाबतीत तुम्हाला काही बोलावे तर अधिक प्रसंग होईल.  (ओवी ३११ ते ३२०)

         हे प्रभो! फक्त तुझे नाम कोणी नि:स्वार्थ भावाने तोंडाने उच्चारले किंवा अत्यंत प्रेमाने कानांनी श्रवण केले तरी त्याच्या ह्रदयातील भेदभाव निघून जातो. असा जो तू परिपुर्ण परब्रम्ह तो माझ्या परम दैवाने हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे प्राप्त झाला आहेत तर आता भेद कसा, कुठे आणि कोणी पहावयाचा आहे? चंद्रबिबांच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर उकडते असे जर कोणी म्हणेल तर ते योग्य आहे काय? पण श्रीकृष्णा आपण मोठे आहात आपले बोलणे औपचारीकपणाचे आहे,असे अर्जुनाचे बोलणे ऐकताच सहजच संतुष्ट झालेल्या श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवेभावे आलिंगन दिले आणि म्हणाले तू आमच्या बोलण्याने रागावु नको हो. आम्ही तुला भेदाच्या मार्गाने ज्या परंपरागत विभूती सांगितल्या, त्या तुझ्या अंतकरणात अभेदाने पटल्या अथवा पटल्या नाहीत?  भेदांचे रुपांतर अभेदात झाले किवां नाही?  हे पाहण्यासाठी थोडा वेळ बाहयदृष्टीच्या रीतीने बोललो हे खरे परंतु आता भेदाच्या आधारे सांगितलेल्या विभूती तुला अभेद भावाने तुला उत्तम प्रकारे समजल्या याचा मला आला आहे  त्या वेळी अर्जुन म्हणाला, मला अभेदज्ञान झाले की नाही हे आपले आपणच पहावे परंतु असा अनुभव येत आहे की, संपुर्ण विश्व तुझ्या स्वरुपाने भरुन राहिलेले आहे. अशा प्रकारे अर्जुन प्रतीतीला स्वसंतोषाने वरलेला पती झाला. संजयच्या बोलण्याने धृतराष्ट्र स्तब्धच होवुन राहिला. तेव्हा दुखी झालेल्या अंत:करणाने संजय म्हणाला, सहज प्राप्त झालेल्या भाग्याला दवडणे, हे नवल नाही का? धृतराष्ट्र चर्मचक्षुने जरी आंधळा असला तरी ज्ञान-चक्षुने डोळस असेल, असे मी समजत होतो. परंतु आतील ज्ञान-चक्षुने ही  तो आंधळा आहे.  संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे संजयचे बोलणे राहु दे  तो अर्जुन स्व:ताचे ‍हित वाढवीत आहे. कारण त्याने  विभूती ऐकल्या तरी त्याला तृप्ती न होता एका अलौकिक गोष्टीची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. तो म्हणाला, सर्व जगत् भगवंताच्या लीलाविलासच आहे, असा माझ्या अंत:करणात अनुभव प्रगट झाला. आता प्रत्यक्षात तो माझा डोळयांसमोर प्रगट व्हावा, अशी  इच्छा माझ्या बुध्दीत वाढु लागली हया दोन्ही डोळयांनी विश्वरुपाचे दर्शन व्हावे,अशी  इच्छा दैववान अर्जुन करु लागला. आज तो अर्जुन म्हणजे जणू काही कल्पवृक्षाची शाखाच झाला आहे, म्हणुन त्या शाखेवर वांझ फुले उमलणार नाहीत कारण, अर्जुनाच्या मुखातुन जे जे प्रगट होईल, ते ते श्रीकृष्ण खरे करुन दाखवतील. तो श्रीकृष्ण परमात्मा प्रल्हादाच्या बोलल्याप्रमाणे विष‍सुध्दा स्वत: आपणच झाला होता. असा तो  श्रीकृष्ण अर्जुनाला सदगुरुंच्या रुपाने लाभलेला आहे.म्हणून परमगुरु श्री निवृत्तीनाथांचे परमशिष्य ज्ञानदेव माऊली म्हणतात, विश्वरुंप विचारण्याकरता अर्जुन कशा प्रकारे प्रारंभ करेल, ही सुरस कथा आता पुढील प्रसंगी सांगेन.

सर्वश्रेष्ठ ग्रथंराज सार्थ ज्ञानेश्वरीचा दहावा अध्याय भगवंताच्या कृपेने संपन्न!        (भगवदगीता श्लोक १ ते ४२ व  मराठीत भाषातंरीत ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी ओव्या १ ते ३३५)

पुढील अध्याय