अध्याय ११ भाग ३

         याप्रमाणे नाना प्रकारची पण विपुल आणि दिव्य तेजाने तळपणारी, एकसारखी दुसऱ्याला वर्ण, रंग नसलेली अशी रुपे होती काही तावुन काढलेल्या शुध्द सोन्यासारखी, काही रुपे अमर्याद काळया रंगाची आणि कित्येक जणु काही आकाश शेदंराने भरलेले आहे अशी शेदंरी रंगाची, रत्नांनी संपुर्ण ब्रम्हांड जडल्यामुळे जसे चमचम करत असावे,  तशा प्रकारची कित्येक रुपे सौदर्याने चमचम करत होती, कित्येक रुपे अरुणोदयाप्रमाणे केशरी रंगाची होती, कित्येक रुपे शुध्द स्फटिकाप्रमाणे होती, कित्येक इंद्रनील मण्याप्रमाणे गडद निळया रंगाची होती, कित्येक काजळाच्या पर्वताप्रमाणे काळी होती आणि कित्येक रुपे रक्ताप्रमाणे लाल रंगाची होती, कित्येक सोन्याप्रमाणे पिवळयाधमक रंगाची होती, कित्येक जळाने भरलेल्या नुतन मेघासारखी श्यामवर्णाची होती, काही चाफयाच्या फुलाप्रमाणे गोरी होती आणि काही हिरव्या रंगाची होती, काही तापलेल्या तांब्याप्रमाणे तांबडी होती, काही शुभ्र चंद्राप्रमाणे शुध्द शीतल होती, श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना,अशी नाना रंगांची माझी रुपे पाहा.त्या रुपांचे रंग जसे  भिन्न भिन्न होते, तशा आकृत्याही  भिन्न भिन्न होत्या, मदनाने देखील लज्जित होवुन शरण जावे, अशी सुंदर रुपे होती, कित्येक शृंगाररुपी संपत्तीची जणु भांडारे उघडली  आहेत अशा आकृत्या होत्या, काही पुष्ट अवयव असलेल्या मांसल आकृत्या होत्या, तर कित्येक वाळलेल्या अतिशय भयंकर काही उंच मान असलेल्या कुरूप अशा काही वेडयावाकडया आकृत्या होत्या, याप्रमाणे विविध प्रकारच्या आकृत्या आहेत, अर्जुना, त्या आकृत्या पाहु लागलो, तर त्यांना अंतपार नाही आणि एका-एका अंगाच्या भागावर हे सर्व जग भरलेले आहे ते पहा. (ओवी १३१ ते १४०)

         ज्या वेळी या विश्वरुपाची दृष्टी उघ‍डते, तेव्हा बारा आदित्यांच्या सृष्टी विस्तारित होतात, जेव्हा  ती दृष्टी झाकली जाते, तेव्हा आदित्य त्या दृष्टीमध्ये एकमेकांना मिठी देतात, म्हणजे एकत्र येऊन मावळत असतात, विश्वरुपाच्या तोंडातुन निघणाऱ्या वाफेबरोबर संपुर्ण विश्व ज्वालामय होते आणि त्या ज्वालांतुन अष्टवसूंचा समुदाय निर्माण होतो, माझ्या भिवयांची टोके क्रोधाने एके ठिकाणी मिळतात, असे दिसु लागले म्हणजे अकरा रुद्रगण निर्माण झालेले दिसु लागते. माझ्या सौम्यतेच्या ओलाव्यामुळे असंख्य अश्विनीकुमार निर्माण होतात आणि हे पांडवा, कानातुन अनेक वायु उत्पन्न होतात. माझ्या एकेका अवयवाच्या लिलेपासुन देव-सिध्द चारणांची कुळे उत्पन्न होतात. अशी ही माझी अमर्याद आणि अतिविशाल रुपे पहा, ज्या रुपाचे वर्णन करण्यास वेदांची वाणीदेखील कुंठीत होते ज्याचे सर्वाग पाहण्यासाठी अनंत काळाचे आयुष्य देखील कमी पडते, सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रम्हदेवांला देखील ज्याचा ठावठिकाणा सापडत नाही. तीन वेदांनी ज्यांच्या स्वरुपाविषयी देखील कधी ऐकले नाही, ती विश्वरुपे तु प्रत्यक्ष पाही आणि कौतुकाने आश्चर्याचे मोठे ऐश्वर्य भोग. कल्पवृक्षाच्या बुडाशी लहान कोवळे गवताचे अंकुर ज्याप्रमाणे असतात त्याप्रमाणे अर्जुना, माझ्या या विश्वमुर्तीच्या अंगावरील केसांच्या बुडाशी विशाल सृष्टी असलेली बघ, ज्याप्रमाणे वाऱ्याने उडणारे परमाणू प्रकाशामध्ये स्पष्ट दिसतात, त्याप्रमाणे विश्वरुपाच्या सांध्यामध्ये अनंत ब्रम्हाडं भ्रमण करीत असलेली दिसतात.या विश्वरुपाच्या एक-एक भागावर विस्तार पावलेले विश्व बघ आणि विश्वाच्याही पलीकडे पहावे, असे जर वाटत असेल तर. (ओवी १४१ ते १५०)

          तर त्याविषयी देखील येथे कोणत्याही प्रकारची कसलीही अडचण येणार नाही सुखाने आवडीने माझ्या देहाच्या ठिकाणी वाटेल ते तु पाहू शकशील. याप्रमाणे विश्वमुर्ती श्रीकृष्णाच्या करुणेने प्रेमाने बोलल्यावर अर्जुन आपले रुप पाहतो किवां नाही म्हणुन श्रीकृष्ण पाहु लागले तो अजुन निवांत बसलेला ल्यांच्या दृष्‍टीस पडला.या प्रसंगी हा का बरे असा गप्प बसला आहे? म्हणुन श्रीकृष्णांनी जेव्हा बघितले तेव्हा तो इच्छांचे अलंकार घालुन तसाच उत्कंठित झालेला दिसला.मग देव मनात म्हणाले, याची विश्वरुप पाहण्याची इच्छा अजुनही कमी झालेली नाही, अजुनही चाला विश्वरुप-दर्शनाच्या सुखाचा मार्ग सापडलेला नाही. मी याला विश्वरुप दाखविले पण त्याला ते आकलन झाले नाही, असे म्हणून देव हसले आणि अर्जुनास म्हणाले, आम्ही तुला विश्वरुप दाखविले पण तु तर ते पाहतच नाहीस. हे असे बोलणे ऐकून बुध्दीमान अर्जुन म्हणाला, मी विश्वरुप बघू शकत नाही हा कमीपणा कोणाला आहे? तुम्ही बगळयाकडुन चांदणे सेवन करु पाहता आहात. अहो ऋषीकेशा! तुम्ही आरसा स्वच्छ पुसून तो आधंळयाला दाखवावयास लागला आहात. तुम्ही बहिऱ्या पुढे गायन करीत आहात, हे शारगंधरा! आपण जाणुन-बुजून पुष्पपरागाचा सुगंधी चारा, भ्रमरास न घालता चिखल खाणाऱ्या बेडकास देत आहात आणि मग हे कार्य वाया गेले म्हणुन कोणावर रागवता? जे विश्वरुप इंद्रियास दिसु शकत नाही, असे वेदशास्त्रांनी वर्णन केले आहे  व जे केवळ ज्ञानदृष्टीचाच विषय होणार आहे, असे विश्वरुप हे तुम्ही माझ्या चर्मचक्षुं समोर आणले आहे, तर मी ते कसे पाहु?  परंतु हा तुमचा कमीपणा मी बोलु नये कारण तसे योग्य नाही, तुमचे बोलणे मी सहन करावे, हेच चांगले त्यावर देव म्हणाले, बाबा अर्जुना ! तु म्हणतोस ते मला मान्य आहे. (ओवी १५१ ते १६०)

          खरोखरच तुला विशाल रुप दाखवायचे होते तर ते पाहण्यासाठी प्रारंभी तुला ते पाहण्याचे सामर्थ्य दिले पाहिजे होते,परंतु प्रेमाच्या भरात बोलताना तुला दिव्य दृष्टी देण्याचे विसरुन गेलो. हे कसे झाले म्हणशील तर जमिनीची योग्य प्रकारे मशागत न करता तिच्यामध्ये बी पेरले तर तो पेरण्याचा वेळ व्यर्थ होऊन जातो, म्हणून माझे स्वताचे विश्वरूप पाहण्यास समर्थ असणारी दृष्टी तुला प्रदान करत आहे. मग अर्जुना! हया दिव्य दृष्टीने आमचा सर्व ऐश्वर्य योग पाहुन आपल्या अनुभवामध्ये साठवुन ठेव. जो वेदान्तांचा जाणण्याचा विषय तो सर्व लोकांचा मुळ पुरूष व जो संपुर्ण जगाला पुजनीय, असा श्रीकृष्ण याप्रमाणे बोलला. संजय म्हणाला, हे कौरव कुळातील चक्रवर्ती धृतराष्ट्र राजा! मला पुन्हा पुन्हा हे आश्चर्य वाटत आहे की, तिन्ही लोकांमध्ये लक्ष्मीपेक्षा कोणी अधिक भाग्यवान आहे काय? परमेश्वराच्या स्वरुपाचे यथार्थ सुक्ष्म वर्णन करण्याकरिता जगामध्ये वेदांवाचुन दुसरा कोणी सर्वज्ञ आहे काय? दाखवा बरे? अथवा शेषाच्या अंगी जो सेवकपणा आहे, त्यामुळे शेषाशिवाय दुसरा कोणी अनन्य सेवक आहे काय? अहो महाराज, भगवंताच्या प्राप्तीसाठी योगी जसे आठही प्रहर शिणत असतात, तसे शिणणारे दुसरे कोणी आहेत काय? आणि गरुडाप्रमाणे देवास आपल्याला वाहुन घेतलेला दुसरा कोणी आहे काय? परंतु ते सर्व एका बाजुला राहीले, हे कृष्ण सुख कोणालाही प्राप्त न होता सांप्रत अर्जुनाच्या ठिकाणी एकवटले ज्या दिवसापासून पाडंव जन्माला आले, त्या दिवसापासून हे असे घडले, परंतु त्या पाच पाडंवापैकी श्रीकृष्ण हे सहजच अर्जुनाच्या अधीन झाले जसे विषयाने आसक्त झालेल्या एखाद्या पुरूषाला स्त्री आपल्या अधीन करते. एखादा शिकवलेला पोपट देखील वेळप्रसंगी आपल्या इच्छेप्रमाणे बोलणार नाही किवां पाळीव पशु देखील आपण सांगितल्या प्रमाणे चालणार नाहीत, ऐनवेळी  ते अडुन बसतील, परंतु या अर्जुनाच्या ठिकाणी भाग्य कसे वृध्दींगत झाले, ते जाणता येत नाही. (ओवी १६१ ते १७०)

          आज परब्रम्हाचा अनुभव घेण्याचे भाग्य अर्जुनाच्या दृष्टीला लाभले आहे, अर्जुनाच्या बोलण्याचे लाड श्रीकृष्ण कसे पुरवीत आहेत. अर्जुन रागवला, तर देव शांतपणे ते सहन करतो, अर्जुन रुसला, तर  देव त्याची समजुत घालतो, नवल म्हणजे देवाला अर्जुनाचे वेडच लागले आहे, एरवी विषयांना जिकुंन जन्माला आलेले शुक्राचार्य हे खरे पुरुष ! हे भगवंताच्या केवळ वैषयिक लीलांचे म्हणजे रासलिलांचे वर्णन करुन आपण कृतार्थ होऊ, या इच्छेने स्तुती करणारे त्यांचे भाट झाले, हे योग्यांच्या समाधीतील अनमोल धन आहे,  परंतु अर्जुनाच्या अधीन होवुन राहीलेले आहे, या करीता हे राजा धृतराष्ट्रा ! माझे मन आश्चर्य करीत आहे.त्याबरोबरच संजय असेही म्हणाला हे कौरवेशा, धृतराष्ट्रा ! खरोखर याविषयी आश्चर्य तरी काय आहे? श्रीकृष्णानी ज्याचा स्विकार केला आहे, त्याचे भाग्य असेच उदयाला येत असते. म्हणुनच तो देवांचा महाराजा श्रीकृष्ण म्हणाला, मी तुला ती अलौकिक अशी दिव्यदृष्टी देतो की ज्या दृष्टीने तु विराट विश्वरुप पाहु शकशील. श्रीकृष्णाच्या मुखातुन अशी अक्षरे प्रगट होत असताना अर्जुनाला दिव्यदृष्टी प्राप्त होवु लागली आणि अज्ञानाचा अंधकार जावु लागला. भगवंताच्या मुखातुन निघालेली ती फक्त अक्षरे नव्हती तर ब्रम्हाचे सार्वभौम राज्य दाखविणाऱ्या ज्ञानकला-स्वरुप मशाली होत्या आणि त्या अर्जुनासाठी  श्रीकृष्णानी प्रज्वलित केल्या होत्या, श्रीकृष्णाच्या कृपेने अर्जुनाच्या ठिकाणी दिव्य चक्षू प्रगट झाला, त्यामुळे त्याच्या ज्ञानदृष्टीचे सामर्थ्य वाढले आणि श्रीकृष्णाने आपले ईश्वरी सामर्थ्य विराट विश्वरुपाच्या द्वारा अर्जुनाला दाखविले हे जे मस्य-कुर्मादी अवतार होवुन गेले, ते ज्या   विश्वरुपी  समुद्राच्या लाटा आहेत अथवा ज्याच्या अलौकिक तेजस्वी सुर्यकिरणांमुळे जे सर्व जग मृगजळाप्रमाणे भासमान होते. (ओवी १७१ ते १८०)

         ज्याच्या अनादिसिध्द सत्स्वरुप भूमिेकेवर स्थावर-जंगम रुपचित्रे उमटतात, ते आपले वैकुंठनायक श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखविले मागे लहानपणी गोकुळात असताना श्रीकृष्णानी जेव्हा एकदा माती खाल्ली होती, तेव्हा  यशोदा मैय्याने रागवुन कान्हाला हाती धरले होते, नंतर भीत-भीत “मी माती खाल्ली नाही” असे म्हणत यशोदा मैय्याच्या कान्हाने आपले तोंड उघडुन  यशोदा मैय्याला आपल्या जबडयात चौदा भुवने दाखविली होती, अथवा मधुवनात ध्रुव तप करत असताना भगवंताने त्याच्या गालाला स्पर्श केला तेव्हा वेदांनाही भगवंताची स्तुती करता आली नाही, ती ध्रुव सहजपणे करु लागला. हे धृतराष्ट्र राजा ! त्याप्रमाणे श्रीकृष्णानी अर्जुनावर अनुग्रह केला. तेव्हा माया कोणीकडे गेली याची भाषाही तो जाणत नव्हता. सामर्थ्य एकसारखे परंतु त्याचे ईश्वरी रुप तेज वाढत होते त्यामुळे विश्वरुप दर्शनाच्या चमत्काराचा महासागर निर्माण झाला होता आणि त्याचे चित्त त्या  चमत्काराच्या सागरात बुडून गेले होते. मार्कडेयं ऋषीना भगवंतानी जेव्हा आश्चर्य दाखविले, त्या वेळी पाताळापासुन ब्रम्हलोकापर्यत भरलेल्या पाण्यात मार्कडेयं एकटाच पोहत होते, त्याप्रमाणे अर्जुन विश्वरुपाच्या महासागरात आश्चर्याने लोळू लागला. अर्जुन म्हणाला, एवढे अफाट आकाश दिसत होते ते कोण कोठे घेवुन गेले? स्थावर-जंगम सर्व पदार्थ पंचमहाभुते काय झाली? काही कळत नाही. दिशांचे मागमुसही शिल्लक राहिले नाही, आकाश-पाताळ कोठे गेले हे काही समजेना, जागे झाल्यावर स्वप्न जसे नाहीसे होवुन जाते,  त्याप्रमाणे संपुर्ण सृष्टीची प्रपंचरचना गिळुन टाकली आहे. (ओवी १८१ ते १९०)

        त्यावेळी मनाला संकल्प विकल्प करण्याची स्पूर्तीच राहीली नाही. बुद्धी आपण आपल्याला आवरेनाशी झाली. इंद्रियाच्या सर्व वृत्ती माघारी फिरुन हदयात साठवल्या गेल्या. या अलौकिक विश्वरुप दर्शनामध्ये स्तब्धतेला स्तब्धता प्रात्प झाली.एकाग्रतेला एकाग्रतेचे ध्यान लागले.सर्व विचारांना जणू मोहनास्त्र घातले गेले.आणि सर्व विचार स्तब्ध झाले. याप्रमाणे तो अर्जुन आश्र्चर्य‍ चकित होऊन कौतुकाने चहुकडे पाहु लागला. तो त्याच्यासमोर जी चर्तभुज लहान मुर्ती होती ती वाढून सर्वत्र पसरली असे दिसले.ज्याप्रमाणे वर्षा ऋतूला येणारे मेघ आकाश भरुन वाढत असतात अथवा महाप्रलयाच्या वेळचे प्रखर तेज एकदम सर्वत्र पसरते त्याप्रमाणे महान विश्वरुपाने आपल्या वाचून जगाचा कोणताही भाग ऊरुन दिला नव्हता.प्रारंभी हे निर्गुण ब्रम्ह असुन ते आपलेच स्वरुप आहे असे जाणुन अर्जुन डोळे मिटून शांत बसला. नंतर त्याने डोळे उघडले तर त्याला समोर विश्वरुप दिसू लागले. अशा प्रकारे दोन्ही डोळ्यांनी विश्वरुप पहावे अशी अर्जुनाची इच्छा होती तो सर्व लळा श्रीकृष्णा ने पुरविला. मग त्या विश्वरुपाच्या ठिकाणी अर्जुन अनेक मुखे पाहू लागला. जणु ती मुखे म्हणजे लक्ष्मीपतीची राजमंदीरे आहेत.अथवा विविध प्रकारच्या सौंदर्यलक्ष्मीची भांडारेच प्रकट झाली आहेत.किंवा आनंदाची वनेच बहरुन आली आहेत अथवा जणु काही सौंदर्याला राज्य प्राप्त झाले आहे अशी श्रीहरीची मुखे त्याने पाहीली. त्यामध्ये अनेक मुखे स्वभावतच भयानकच मृत्युलाच मुखे निर्माण झाली आहेत. अथवा भयाचे किल्लेच विस्तार पावले आहेत अथवा प्रलय अग्नीची महाकुंडेच उघडली आहेत.          (ओवी १९१ ते २००)

पुढील भाग