अध्याय ११ भाग ७

          अथवा महाप्रलयाचा काळ आला असता यम जसा क्रोधायमान झालेला असतो, त्या वेळी पाताळासह एकवीस स्वर्गानाही तो ग्रासुन टाकतो. अथवा प्रतिकुल दैवाच्या आधारे कृपणाचे ऐश्वर्य स्वभावताच जेथल्या तेथेच लय पावते, त्याप्रमाणे कर्माची गती कशी गहन आहे ते पाहा. रणांगणात जमलेला सर्व सैन्याचा समुदाय एकदम या विराट मुखात शिरुन त्यातुन एकही बाहेर पडत नाही.ज्याप्रमाणे उंदरानी अशोक वृक्षाचे शेंडे तोंडात चघळुन टाकावेत. त्याप्रमाणे या विश्वरुपाच्या तोंडात हे लोक वाया गेले आहेत. परंतु मुकूटासह सैनिकांची मस्तके दाढांच्या चिमटयात सापडुन त्यांचे कसे पीठ होत आहे हे प्रत्यक्ष दिसत आहे, मुकूटावरील काही रत्ने दातांच्या फटीत अडकलेली आहेत. कित्येक रत्नांचे पीठ झाले असुन ते जीभेच्या बुडाशी लागलेले आहे काही चुर्ण दातांच्या अग्रभागावरुन माखलेले दिसत आहे. विश्वरुप काळाने लोकांची शरीरे बलात्काराने गिळुन टाकली आहेत, परंतु त्या जीवांच्या शरीराची मस्तके ही अवश्य राखुन ठेवली आहेत. मस्तके जशीच्या तशी आहेत. त्याआधी ही मस्तके शरीराच्या इतर सर्व अवयवांमध्ये शुध्द स्वरूपाची होती; म्हणूनच ती महाकाळाच्या तोंडात जाऊनही शेवटी शिल्लक राहिली आहेत. नंतर अर्जुन म्हणाला, हे काय? जन्माला आलेल्या प्राण्याला दुसरी गतीच नाही की काय? संपूर्ण जग  या वदनरूपी डोहात आपोआप येऊन बुडत आहे. ही संपूर्ण सृष्टी आपोआपच या मुखाच्या मार्गाला लागली आहे आणि हा भगवंत जागच्या जागी स्तब्ध राहून सहजपणे सर्व जगाला गिळीत आहे. ब्रम्हादिक वगैरे समस्त देव ते सर्व उंच असलेल्या मुखामध्ये वेगाने जात आहेत आणि इथे सामान्य लोक ते खालच्या अलिकडच्या तोंडात पडत आहेत. आणि इतर प्राणी मात्र निर्माण झालेल्या ठिकाणीच मुखामध्ये नाहीसे होत आहेत; परंतु ह्याच्या मुखातून काही सुटत नाही. (ओवी ४११ ते ४२०)

          ज्याप्रमाणे मोठमोठया नद्यांचे प्रवाह अतिवेगाने समुद्रास येऊन मिळतात, त्याप्रमाणे हे जग सर्व बाजूंनी तुझ्या मुखामध्ये प्रवेश करत आहेत. सर्व प्रकारच्या प्राण्यांचे समुदाय आयुष्याच्या मार्गाने  पायऱ्या करून तुझ्या या मृत्यूरूप प्रचंड विशाल मुखाशी त्वरेने सोयरीक साधत आहेत. ज्याप्रमाणे वणवा लागलेल्या डोगरांच्या दरीमध्ये पतंगाचे समुदाय उडया घालत असतात, त्याप्रमाणे हे सर्व लोक तुझ्या विशाल मुखामध्ये येवुन पडत आहेत. तप्त झालेले लोखंड जसे पाणी शोषुन घेते त्याप्रमाणे जेवढे प्राणी तुझ्या मुखात जात आहेत, त्यांची वहिवाटांमध्ये असलेली नावे पुसून टाकली जात आहेत. याप्रमाणे संपुर्ण जगाचे‍ भक्षण  करुनदेखील तुझी भुक काही केल्या कमी होत नाही, तुझ्या जठराग्नीचे प्रज्वलन कसे उदयाला आले ते पाहा.जसा एखादा मनुष्य तापातून बरा झाला की त्याला काहीतरी खाण्याची इच्छा वाढत जाते,किवां दुष्काळाचे दिवस संपुन सुकाळाचे दिवस उजाडले, म्हणजे गरीब माणसांची खाण्याची इच्छा वाढत जाते, त्याप्रमाणे सर्व जगाला आपल्या मुखात टाकुनही आपण जिभा चाटत आहात. त्याप्रमाणे  खाण्याचे जे जे पदार्थ आहेत, त्यापैकी तुझ्या विशाल मुखापासुन कशाचाही बचाव झाला नाही, तसे कडक भुकेलेपणाने नावीन्य दिसत आहे. अथांग सागराचा एकच घोट करुन प्यावा अथवा विशल पर्वताचा घास करुन गिळुन टाकावा, अथवा संपुर्ण ब्रम्हांडदेखील दाढेखाली सहज घालावे. (ओवी ४२१ ते ४३०)

         दाही दिशा गिळुन टाकाव्यात, आकाशातील चांदण्या चाटुन-पुसून घ्याव्यात, अशी ही तुला स्वभावत: हाव दिसुन येते. ज्याप्रमाणे विषयभोगाने पुन्हा पुन्हा विषय भोगण्याची इच्छा वाढते किवां काष्ठामुळे अग्नीला जाळण्याचे सामर्थ्य वाढत जाते, त्याप्रमाणे तुझी मुखे सतत खात असली तरी पुन्हा पुन्हा खा खा करतात. ज्याप्रमाणे वडवानळामध्ये कवठ टाकले असता ते त्याला पुरत नाही, त्याप्रमाणे आपले अतिविशाल मुख एवढे पसरले आहे की त्याच्या जिभेच्या टोकाला त्रिभूवनदेखील पुरत नाही, एका मुखाची ही अवस्था आहे तर तुझ्या असंख्य मुखांना खाण्यासाठी एवढी त्रिभुवने आणायची कोठुन?  त्यांना खाण्यास आता काही नसताना तु इतकी मुखे का बरे निर्माण केलीस? ज्याप्रमाणे चारी बाजुंनी वणवा लागला असता त्यामध्ये हरणे सापडावीत त्याप्रमाणे तुझ्या विशाल मुखांच्या ज्वालांमध्ये संपुर्ण जगत सापडले आहे. आता तसेच या संपुर्ण विश्वाचे झाले आहे, जणु काही हा देव नसुन जगाचे पापकर्मच आडवे आले आहे अथवा जगरुपी जळचरांना काळरुपी जाळयाने बरोबर अडकविले आहे, आता या अत्यंत तेजस्वी जाळयातुन सुटण्यासाठी ही चराचरे कोणीकडुन बाहेर निघतील? ही देवाची मुखे नसून प्रज्वलित लाखेची घरेच जगाला प्राप्त झालेली आहेत, आपल्या दाहक तेजाने प्राणिमात्रांची अंगे कशी पोळुन निघतात, हे अग्नी कधी जाणत नाही, परंतु ज्याचा त्याला स्पर्श होत असतो त्याचे प्राण जिवंत राहत नाहीत, अथवा आपल्या तीक्ष्ण धारेने दुसऱ्याला मरण कसे प्राप्त होते हे शस्त्राला माहीत नसते किवां आपण किती प्राणघातक आहोत याची विषाला काही कल्पना नसते. त्याप्रमाणे देवा तुला आपल्या उग्रपणाची थोडी देखील आठवण नाही पण तुझ्या अलिकडच्या मुखात सर्व जगाचा नाश होवुन राहिला आहे. (ओवी ४३१ ते ४४०)

        देवा, तु सर्व विश्वाला व्यापणारा आत्मा आहेस तर मग आमच्यासाठी प्राण घेणाऱ्या यमाप्रमाणे पुढे का आला आहेस? मी तर आता जिवाची आशा सोडली आहे आता तुही मनात कोणती भीड न धरता तुझ्या मनात काय आहे हे उघडपणाने सांग. देवा, तुझे हे उग्र रुप किती वाढविणार आहेस? आपल्या स्वताच्या अंगी असलेल्या भगवंतपणाचे  एक वेळ तरी स्मरण कर, अथवा माझ्यापुरती तरी कृपा कर. वेदांकडुन जाणल्या जाणाऱ्या त्रिभुवनाच्या उत्पत्तीच्या पुर्वीही सत्तारुपाने असलेल्या विश्ववंद्या एक वेळ तरी माझी विनंती ऐक, त्या शुरवीर अर्जुनाने याप्रमाणे बोलुन भगवंताच्या चरणकमलांवर मस्तक ठेवले आणि मग म्हणाला, सर्वेश्वर भगवंतरने माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. माझे समाधान व्हावे म्हणुन विश्वरुप दाखवा असे मी म्हटले, तर तुम्ही एकदम संपुर्ण त्रिभुवनाला गिळण्याच्या हेतुने विशाल भयंकर असे रुप धारण केले. तेव्हा तु कोण आहेस? इतकी भयानक मुखे का बरे धारण केली आहेस? तसेच सर्व हातांत शस्त्रे का बरे घेतली आहेस? महाराज आपण जेव्हा – तेव्हा क्रोधायमान होवुन आकाशाला कमीपणाका बरे आणत आहात?  डोळे भयंकर मोठे करुन आम्हाला भीती का बरे दाखवत आहात? देवा , सर्वनाश करणाऱ्या यमाशी आपण का बरे स्पर्धा करीत आहात? असे उग्र भयानक रुप धारण करण्याचा आपला हेतु काय आहे ते तरी सांगा. हे ऐकुन श्रीकृष्ण म्हणाले, मी कोण आहे आणि एवढी उग्रता कशाकरिता वाढविली आहे असेच विचारीत आहेस ना? (ओवी ४४१ ते ४५०)

          खरोखर मी काळ आहे लोकांचा संहार करण्याकरिता मी एवढा वाढलेलो आहे आणि त्याकरिता मी पुष्कळ तोंडे सर्वत्र पसरली आहेत आणि आत्ताच सर्व गिळुन टाकीन. त्यावेळी अर्जुन म्हणाला, “अरेरे ! मागील संकटाला भिवुन मी त्रासलो म्हणुन देवाने प्रसन्न व्हावे अशी मी प्रार्थना केली तो हे उलट जास्त भयानक असे संकट प्राप्त झाले, तो अनिष्ट रुपाने प्रगट झाला.” आपल्या या कठोर भाषणाने अर्जुन खिन्न होवुन जाईल म्हणुन श्रीकृष्ण पुन्हा म्हणाले, हे अर्जुना ! हयात दुसरीही एक गोष्ट आहे आता जो संहार होणार आहे या संहाराच्या बाहेर तुम्ही पांडव राहणार आहात तुमचा संहार होणार नाही हे विचार ऐकताच अर्जुनाच्या जीवामध्ये जीव आला. अर्जुन मरणरुपी महामारीमध्ये सापडलेला होता तो पुन्हा सावध झाला आणि श्रीकृष्णाच्या बोलण्याकडे एकाग्रनेने लक्ष देवु  लागला त्या वेळी देव म्हणाले अर्जुना ! तुम्ही पांडव माझे आहात असे जाणावे तुमच्या बाजुने इतर सर्वाचा ग्रास करण्यासाठी मी तयार झालो आहे प्रलयकालच्या प्रचंड प्रज्वलित अग्नीमध्ये लोण्याचा गोळा घातल्यावर तो जसा नाश्‍ पावतो, त्याप्रमाणे माझ्या तोडांत सर्व जग गेलेले तु पाहिले आहेस. यावरुन निश्चितपणे असे समज की या जगापैकी काहीही शिल्लक राहणार नाही हे सर्व सैन्य जय मिळण्याची व्यर्थ वल्गना करत आहे आपल्या पराक्रमाच्या अहंकारावर ते आरुढ झालेले आहेत त्याच्याकडे चतुरंग सैन्य असल्यामुळे ते महाकाळाशी स्पर्धा करत आहेत. ते महायोध्दे म्हणतात, या सृष्टीनंतर आम्ही दुसरी सृष्टी निर्माण करु पैजेने मृत्यूला मारुन टाकू आणि जगाचा संहार करु. (ओवी ४५१ ते ४६०)

          सर्व पृथ्वी गिळुन टाकू. आकाश तर वरच्या वर जाळुन टाकू बाणाने वाऱ्याला हलु देणार नाही. हे सर्व सैन्यसमुदाय जमवुन आपल्या वीर वृत्तीच्या आधारे ते अहंकाराने गुरगुरत आहेत तसेच आपल्याजवळ आलेले गजदळ यमावर देखील विजय प्राप्त करु शकते असे वर्णन करीत आहेत. हे त्यांचे बोलणे शस्त्रापेक्षाही अतिशय तीक्ष्ण आहे. आगीपेक्षाही जास्त दाहक आहे या शब्दांच्या मारकपणाची जर काळकुट विषाबरोबर तुलना केली तर काळकूट विषसुध्दा मधुर म्हणावे लागेल परंतु हे गंधर्वनगरीचे लोक जसे पोकळीचे भेडोंळे अथवा चित्रातील पुतळे असावेत त्याप्रमाणे हे वीर आहेत असे समज. ज्याप्रमाणे मृगजळाला पुर यावा, असे हे सैन्य आहे  अथवा कापडाचा सर्प करावा अथवा शृंगारुन मांडुन ठेवलेल्या बाहुल्या असाव्यात, त्याप्रमाणे हे सर्व योध्दे  आहेत शिवाय जे बळ यांना हालचाल करविते ते सर्व मी पुर्वीच ग्रासुन टाकले आहे आता हे सैन्य कुंभाराने केलेल्या पुतळयाप्रमाणे निर्जीव आहे कळसुत्री बाहुल्यांना हालविणारी दोरी तुटली तर कोणीही त्या बाहुल्यांना हलविले तरी त्या उलथुन पडतात. त्याप्रमाणे सैन्याचा हा पोकळ आकार मोडताना थोडादेखील वेळ लागणार नाही म्हणुन आता लवकर उठ आणि शहाणा होवुन युध्दास सज्ज हो. विराट  राज्याच्या गायी हरण करण्यास जेव्हा कौरंव मस्त्य देशात आले होते त्या वेळी सर्व सैन्यास मोहनास्त्र घालुन विराटाच्या  अतिशय भित्र्या उत्तराकडुन त्यांची वस्त्रे तु हरण करविलीस. आता तर हे सर्व कौरंव त्यापेक्षाही तेजहीन झाले आहेत त्यात आयता युध्दांचा प्रसंगही आला आहे तरी तु त्यांना मार आणि एकटया अजुनाने सर्व शत्रु जिकंले आहेत असे यश मिळव. (ओवी ४६१ ते ४७०)

           आणि ते यश केवळ कोरडे नसून त्याबरोबर सर्व राज्यचीही प्राप्ती तुला होईल. अर्जुना, या युध्दासाठी तू केवळ निमित्तकारण हो. तू द्रोणाचार्यांची पर्वा करू नकोस, भीष्माचार्यांचे भय बाळगू नकोस व कर्णावर शस्त्राने कसे मारु असे म्हणू नकोस. जयद्रथाला मारण्यासाठी कोणता उपाय करावा, याचेही चित्तात चिंतन करू नकोस, आणखी इतर जे नामांकित असे वीर आहेत, ते सर्व भिंतीवर काढलेल्या चित्रातील सिंहाप्रमाणे निर्जीव आहेत, असे मान. जणू काही ते ओल्या हाताने सहज पुसून घेण्यास योग्य आहेत, असे समज. अर्जुना! यापेक्षा युध्दासाठी दुसरा कोणता बरे समुदाय शिल्लक आहे? हा संपूर्ण मिथ्या असा आभास आहे. खरे तर मी त्यांना पूर्वीच ग्रासून टाकले आहे. जेव्हा तू माझ्या विशाल तोंडात हे सर्व पाहिलेस, तेव्हाच त्याचे आयुष्य संपलेले होते. ते आता केळयांच्या पोकळ रिकाम्या सोपटयांप्रमाणे राहिलेले आहेत. म्हणून आता लवकर ऊठ. मी ज्यांना आधीच मारलेले आहे, त्यांचा तू युध्दात संहार कर; आणि खोटया शोकसंकटात पडू नकोस.आपणच निशाण उभे करावे; आणि आपणच त्यास कौतुकाने भेदून पाडावे, त्याप्रमाणे या सर्व वीरांचा नाश करण्यासाठी तू केवळ निमित्तमात्र हो. बा अर्जुना! तुझ्याविरूध्द जे जे काही घडले होते, ते उत्पन्न होताच वाघाने नेले, असे समज. आता राज्यासह यश संपादन करून त्याचा तू उपयोग घे. तुझे भाऊबंद स्वभावत:च अहंकाराने फुगून गेले होते. तसेच, ते जगामध्ये बलवान आणि मदाने उन्मत झाले होते. त्यांना मी कष्ट न करता सहजपणे नाहीसे केले. (ओवी ४७१ ते ४८०)

पुढील भाग