अध्याय ११ भाग ८

         अशा प्रकारच्या गोष्टी जगाच्या वाचारूपी पटावर अर्जुना, तू लिहून ठेव आणि विजयी हो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे ही सर्व कथा त्या मनोरथ पूर्ण न झालेल्या कुरूदेशाच्या राजाला, म्हणजे धृतराष्ट्राला संजय सांगत आहे. मग त्या सत्यलोकांपासुन गंगेचे पाणी सुटल्यावर खळखळ वाहत जसे खाली येत असते त्याप्रमाणे श्रीकृष्ण गंभीर वाणीने बोलत असता  खळखळ असा ध्वनी निर्माण होवु लागला होता. किवां प्रचंड मेघाचे लोट एकाच वेळी गडगडाट करतात अथवा ज्या वेळी समुद्रमंथन झाले, त्या वेळी क्षीराब्धी जसा गंभीर वाणीने हे वाक्य बोलले. ते बोल अर्जुनाने थोडेसे ऐकले, यामुळे अर्जुनाचे शरीरावर शहारे आले, हे शहारे त्याच्या शरीरावर भितीमुळे आले किवां सुखामुळे परंतु ते दुप्पटीने वाढले हे खरे. भगवान श्रीकृष्णांच्या या आपुलकीच्या बोलण्यामुळे अर्जुन मनोमन सुखावुन गेला आणि तो आपोआपच भगवान श्रीकृष्णांच्या चरणी तन-मन-धन अर्पुन नतमस्तक झाला. पुढे तो काही बोलणार तोच त्याचा कंठ दाटुन आला, हा सुखाचा अविष्कार आहे का एका अनामिक भयाचा याचा आपण विचार करावा. परंतु श्रीकृष्णांच्या वचनाने अर्जुनाची अशी अवस्था झाली, हे श्लोकातील अर्थावरुन म्हणत आहे. नंतर अर्जुनाने पुन्हा एकदा नम्रपणे भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांना नमस्कार करुन म्हणाला, महाराज आपण असे बोललात ना ! (ओवी ४८१ ते ४९०)

            या सर्वाचे भक्षण करणारा मी प्रत्यक्ष महाकाळ आहे, आणि या साऱ्यांची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणे हा तर माझा नित्यांचा खेळ आहे, हे तुझे बोलणे आम्ही अढळ खरे मानू परंतु देवा तुम्ही जे काळ आहात त्यांनीच आज जगाचे पालन करण्याच्या वेळेस जगाचा संहार करावा ही गोष्ट मला पटत नाही, अंगात भरलेले तारुण्य बाहेर कसे काढावे? नसलेले वार्धक्य कसे आणावे? या गोष्टी जर होणार नाहीत तर तु या स्थिती कालात संहार करु म्हणतोस तर हे होणे शक्य नाही, श्री अंनता !  दिवसाचे चार प्रहर न भरता माध्याही सुर्य कधी मावळेल का?  देवा , अखंडित असे आपण काळ आहात ते आपण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करता आणि त्या-त्या वेळी त्या अवस्थेमध्ये महाशक्तीशाली असता. ज्या वेळेस उत्पत्ती होवु लागते त्या वेळी स्थितीचे प्रलय हरपुन जातात, आणि स्थितीच्या काळात उत्पत्ती व नाश मिरवीत नाहीत म्हणजे नसतात. प्रलयाच्या वेळेस उत्पत्ती व स्थिती या दोहोंचा जय होतो हे कशानेही बदलु शकत नाही, या अवस्था अगदी अनादि कालापासुन आहेत, म्हणुन आज हे जग स्थितीचा उपभोग घेण्याच्या भरात असता या काळी तु जगाचा संहार करशील हे मनाला पटत नाही, तेव्हा खुणेने देव म्हणाले, अर्जुना, फक्त या दोन्ही सैन्यांचे आयुष्य संपले आहे हे मी तुला प्रत्यक्ष दाखविले आहे त्याप्रमाणे हे नष्ट होतील बाकीचे जग यथाकाळी नष्ट होईल हे जाण. हा संकेत दाखविण्यास अनंताला जेवढा वेळ लागला तेवढया वेळात अर्जुनाने पुन्हा पुर्वीप्रमाणे सर्व लोक सुखरुप असलेले पाहीले. (ओवी ४९१ ते ५००)

          अर्जुन म्हणाला, हे देवा ! आपण या विश्वरुपी लिलानाटकाचे सुत्रधार आहात, त्या योगाने हे संपुर्ण जग पुर्व स्थितीला प्राप्त झाले आहे, हे श्रीहरी ! भक्त दु:ख सागरात पडल्यानंतर तु ज्या प्रकारे त्यांना वर काढतोस त्यातुझ्या कीर्तीचे मी स्मरण करत आहे. पुन्हा पुन्हा तुझ्या कीर्तीचे स्मरण करीत असताना महासुखाचा सोहळा मी उपभोगीत आहे आणि त्या आनंदसागराच्या लाटेवर लोळत आहे. देवा, हे जगत् जिवंत राहिल्यामुळे तुझ्याविषयी प्रेमभाव ठेवुन आम्ही सुखाने राहतो आणि जे दुष्ट आहेत त्याचां आपण नाश करता, हे ऋषिकेशा !  त्रिभुवनातील राक्षसांना तु मोठा भयरुप आहेस, म्हणुन ते राक्षस दाही दिशांना पळत असतात, बाकीचे जे देव, सिध्द, किन्नर, यक्ष, गंर्धव आणि सारा चराचर आपणास पाहुन आनंदाने निर्भय होतात आणि तुला आदराने साष्टांग नमस्कार करतात. हे नारायणा !  जे राक्षस आहते हे काणत्या कारणामुळे तुझ्या चरणकमलांना नमस्कार न करता पळुन गेले आहेत,खरोखर हे तुला विचारले पाहिजे काय? एवढे तर आम्हाला देखील समजते की सुर्याचा उदय झाल्यानंतर अंधकार कसा बरे राहु शकेल? तु स्वयं प्रकाशमान आहेस‍ आणि आमच्या पुढे प्रत्यक्षपणे  प्रगट झाला आहेस म्हणून रात्री संचार करणाऱ्या राक्षसांचा केर सहजपणे झाडला गेला आहे, हे श्रीरामा !  इतके दिवस तुझ्याविषयी काही ती जाण नव्हती आता मात्र तुझा महिमा किती महान आहे हे प्रत्यक्षपणे  पाहत आहे.        (ओवी ५०० ते ५१०)

           ज्याच्या पासुन अनेक सृष्टींच्या पंक्ती व प्राणिमांत्राच्या वेली सर्वत्र पसरतात, त्या मायेला आपली श्रेष्ठ इच्छा प्रसवली आहे, देवा! आपण अमर्याद अबाधित तत्वरुंप असुन आपले अस्तित्व सर्वकाळ त्रिकालाबाधित आहे आपण अंतरहित आहात, आपल्या गुणांची गणती करता येत नाही आपण प्रतिबंधरहित सर्व समभावाला प्राप्त झालेले देवांचे देव आहात, देवा! आपण त्रैलोक्याचा जिव्हाळा, आश्रय आहातआपण सदैव कल्याणस्वरुप असुन नाशविकार रहित आहात,तुच सत् व असत् आहात आणि त्याही पलिकडे जे सारतत्व आहे तेही तूच आहेस. देवा! आपण प्रकृतिपुरुषाचे मूळ अधिष्ठान आहात. महत्तत्वाची शेवटची मर्यादाही तूच आहेस तु स्वता अनादि पुरातन असा आहेस, तू सर्व विश्वाचे जीवन आहत तूच सर्व जीवांचा आश्रय आहेस भुत-भविष्याचे ज्ञान तुझ्या अधीन आहे. श्रुतीच्या नेत्रांना ज्या स्वरुपापासुन सुख प्राप्त होते ते तुच आहेस, तु विश्वाशी अभिन्न आहेस त्रैलोक्याला आधारभुत असलेली जी माया, ती देखील तुच आहेस, म्हणुन हे देवा ! तुला परममहाधाम असे म्हटले आहे ज्या वेळी कल्पाचा शेवट होतो त्या वेळी माया तुझ्या स्वरुपात लय पावते. किंबहुना, अधिक काय सांगावे?  तूच हे संपुर्ण जगत् विस्तालेले आहेस, तुझी जी अनंत रुपे आहेत त्यांचे वर्णन कोण करु शकेल? देवा तु काय एक नाहीस? तू ज्यात नाहीस अशी या विश्वामध्ये कोणती वस्तु आहे ? तु कोणत्या ठिकाणी नाहीस? तू जसा आहेतस तसा तुला माझा नमस्कार असो. अंनता, तु वायू आहेस, नियमन करणारा यम आहेस आणि प्राणिमात्रांच्या ठिकाणी जठराग्नीच्या रुपाने जो आहे तो तुच आहेस.  (ओवी ५११ ते ५२०)

         हे देवा !  तु वरुण आहेस, सोम आहेस, संपुर्ण विश्वाला उत्पन्न करणारा ब्रम्हदेव आहेस, जगताचा पितामह ब्रम्हदेव याचांही पिता म्हणजे विश्वाचा प्रतितामह, आदिजनक खरोखर तुच आहेस.जे जगन्नाथा !  आणखी ह्या विश्वात जे जे काही आहे त्याला व्यवहारिक रुप असो वा नसो ते सर्व तुच आहेस, म्हणून अशा तुला माझा नमस्कार आहे. याप्रमाणे अर्जुनाने प्रेमभरित चित्ताने नमन केले आणि मग पुन्हा पुन्हा म्हणू लागला की, हे प्रभो, तुला माझा नमस्कार असो, तुला माझा नमस्कार असो, नंतर त्याने त्या श्रीमुर्तीकडे संपूर्णपणे न्याहाळून पाहिले आणि पुन्हा म्हणाला तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो. विश्वरुपाच्या एकेक अवयवाचा भाग पहात असताना त्याच्या चित्ताला समाधान होत होते, आणि तो पुन्हा म्हणाला तुला नमस्कार असो. या सर्व स्थावर-जंगम विश्वामध्ये अंखडित जो प्रभू त्याला त्याने पाहिले आणि पुन्हा म्हणाला तुला नमस्कार असो, हे प्रभो !  तुला नमस्कार असो. अशी ती अनंत प्रकारची अदभुत रुपे आश्चर्यकारक प्रकारे अर्जुनासमोर प्रगट होत होती, ती पाहुन तो पुन्हा पुन्हा तुला नमस्कार असो, तुला नमस्कार असो, असे म्हणू लागला. हे विश्वाचा प्रतितामह नमस्तस्यै, नमस्तस्यै याशिवाय त्याला दुसरी स्तुती आठवत नव्हती तसेच निवांतही राहवत नव्हते,अर्जुन कसा आणि कोणत्या प्रेमभावाने गर्जत होता हे लक्षात येत नव्हते. फार काय सांगावे? याप्रमाणे अर्जुनाने विश्वरुपाला हजारो वेळा नमन केले आणि पुन्हा म्हणाला, हे श्रीहरी ! तुला समोरुन नमस्कार असो, देवाला पाठ आहे अथवा पोट आहे या विचाराचा आम्हाला काय उपयोग?  हे स्वामी ! तुला पाठीमागुनही नमस्कार. (ओवी ५२१ ते ५३०)

           तु माझ्या पाठीमागे उभा आहेस म्हणुन तुम्हाला पाठमोरे असे म्हणतो परंतु जगाच्या समोर‍ अथवा  पाठमोरे असे तुम्हाला संभवत नाही. आता वेगवेगळया अवयवांचा उल्लेख करुन त्या प्रत्येकला  नमस्कार करण्याचे मला समजत नाही यासाठी सर्व चराचर बनुनही विश्वामध्ये सम प्रमाणात आत्मरुप तुच आहेस त्या तुला नमस्कार असो, देवा , तु अनंबळाच्या आवेशाचे ठिकाण आहेस, तुझा महान पराक्रम मोजता येत नाही, तु सर्व काळी सम प्रमाणात असतोस, सर्व देशस्वरुप असलेल्या हे देवा ! तुला नमस्कार असो. ज्याप्रमाणे संपुर्ण पोकळीमध्ये आकाश हेही एक पोकळी होऊनच असते, त्याप्रमाणे हे देवा !  तु सर्व विश्वाला व्यापुन सर्वरुप झाला आहेस, किबंहुना हे संपुर्ण त्रिभुवन तुच आहेस. परंतु क्षीरसागरावरती क्षीरांच्या लाटा असतात, त्याप्रमाणे हे देवा , तुझ्या अधिष्ठानावर संपुर्ण विश्व असले तरी तुझ्यापेक्षा भिन्न नसल्यामुळे ते विश्व तुच आहेस, म्हणून देवा , सर्वापेक्षा तु वेगळा नाहीस, हे माझ्या पुर्ण अनुभवास आले आहे, आता सर्वत्र तुच तु आहेस. परंतु हे स्वामी , तु विशाल विश्वरुप आहेस हे आम्ही कधीच जाणले नाही, आम्ही तुझ्याशी असलेले सोयरे-संबंधाचे नाते लक्षात घेवुन त्या कर्तव्यानेच तुझ्याशी व्यवहार केला. अरेरे !  माझ्या हातुन फारच वाईट कर्म घडले मी अमृताचा उपयोग सडा-संमार्जनकडे केला. कामधेनु देवुन तिच्या बदल्यात शिंगरु घेतले, तु म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष‍ परिसाचा मोठा खडकच लाभला होतास, परंतु तो फोडून आम्ही त्याचा उपयोग केवळ भिंतीचा पाया भरण्यासाठी केला, साक्षात कल्पवृक्ष आम्हाला लाभला असताना तो तोडुन आम्ही त्याचे शेत राखण्यासाठी कुपंन केले, खरोखर मला चितांमणीची खाण लाभली  होती परंतु मी त्या  चितांमणीने ओढाळ जनावरानां हाकलुन लावले त्याप्रमाणे तुझे अनमोल सानिध्य लाभलेले होते पण मी तुझ्याशी मित्रत्वाचे नाते जोडुन ते व्यर्थ घालविले. (ओवी ५३१ ते ५४०)

         हे प्रत्यक्ष आजचेच उदाहरण पहा, हे युध्द ते काय आणि किती महत्वाचे आहे? परंतु तु प्रत्यक्ष परब्रम्ह असुन देखील मी तुला माझ्या रथाचे सारथी केले. हे दातारा , दुष्ट अशा कौरवांच्या घरी आम्ही तुला शिष्टाई करण्यासाठी पाठविले हे जगदीश्वरा, आम्ही तडजोडीसारख्या सामान्य व्यवहारासाठी तुला जणु विकुन टाकले. तु योगियांच्या समाधीमध्ये अनुभवले जाणारे महासुख आहेस, परंतु मी अज्ञानी असल्यामुळे हे जाणलेच नाही आणि तुझ्यासमोर उपरोधिक पध्दतीने बोलत राहिलो. या विश्वाचे आदिकारण मुळ तु आहेस, पण तु ज्या सभासदांमध्ये बसत होतास, तेथे जे शब्द नातलगांच्या बरोबर बोलत असताना शोभतील अशा शब्दांनी आम्ही तुझ्याबरोबर विनोद करत होतो, आम्ही ज्यावेळी तुझ्या घरी येत असु त्या वेळी तुझ्याकडुन आम्हाला बरोबरीचा आनंद मिळत होता, परंतु तुझ्याशी अतिशय परिचय असल्यामुळै उलट आम्ही तुझ्यावरच रुसुन बसत होतो हे शारंगपाणी !  आम्ही तुझ्या पाया पडुन तुझी क्षमा मागावी अशा अनेक अनुचित  गोष्टी तुझ्याविषयी आम्ही केल्या, मी तुझा मित्र या नात्याने तुझ्यासमोर खुशाल पाठ करुन बसत होतो हे वैकुंठनायका !  ही काय आमची योग्यता होती ?  खरोखर आम्ही चुकलो देवा तुझ्याबरोबर आम्ही दांडपट्टा खेळलो, आखाडयात तुझ्याबरोबर कुस्ती करुन झोबांझोबीं केली, सोगंटया खेळताना तुझा तिरस्कार करुन तुझ्याबरोबर निकराचे भांडण केले जी चांगली वस्तु असेल ती आम्ही तुझ्याकडे हट्टाने मागत होतो,आपण सर्वज्ञ असतानाही आपणासच शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो तु काही करण्याविषयी सांगितलेस तर तुझा आणि आमचा संबंध काय ? असे उर्मटपणे विचारत होतो. अशा प्रकारे त्रिभुवनात न मावतील असे अपराध आमच्या हातुन घडले परंतु तुझ्या पायांवर हात ठेवुन सांगतो की त्या वेळेस आम्हाला काही कळत नव्हते. (ओवी ५४१ ते ५५०)

पुढील भाग