अध्याय-१२-भाग-१

ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी

सार्थ भगवद् गीता अध्याय –  १२

भक्तीयोग

श्री ज्ञानदेवांनी भगवद् गीतेतील अध्याय१२ मधीलभक्तीयोगया अध्यायातील ते २० संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन २४७ ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे. खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे, परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहे. हा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य  कृपाप्रसाद आहे, मनुष्य जीवन जगण्यासाठी अनमोल संजीवनी आहे, किंबहुना संसारसागर पार करण्यासाठी अध्यात्मातील नौका आहे, तिच्या मदतीने संसार करता सावरता आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनसागरातुन तरुन जावे आणि आपल्या जीवनाचे कोटकल्याण साधावे. ही ज्ञानदेवांची  “अक्षरब्रम्ह ज्ञानेश्वरीआत्मसाद करुन जीवनाचे  सार्थक करावे.

 

            हे गुरूकृपादृष्टी! माते! तू शुध्द आहेस तू उदार म्हणून प्रसिध्द आहेस आणि विश्वावर अखंड आनंदाची वृष्टी करणारी आहेस तुझा जयजयकार असो. विषयीरूपी सर्पाने दंश केल्यानंतर मूर्च्छित झालेला मनुष्य उठत नसतो; परंतु तुझ्या गुरूकृपादृष्टीच्या योगाने तो मूर्च्छित झालेला मनुष्यदेखील विषयरहित होतो. तुझ्या प्रसादरूपी लाटांची भरती आली, म्हणजे संसाराचा त्रिविध ताप कोणाला होऊ शकेल?‍आणि शोकापासून कोणाला बरे पीडा होईल? हे प्रेममय कृपादृष्टी! भक्तांना अष्टांग-योगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात आणि तूच त्या भक्तांचे ‘ते परब्रम्ह मी आहे’, अशा प्रकारचे अभेद ज्ञान प्राप्त करून घण्याचे लाड पुरवितेस. हे गुरूकृपादृष्टी! तु आपल्या भक्तियोग साधकाला, मूलधार चक्राच्या ठिकाणी जागृत झालेल्या कुंडलिनीच्या मांडीवर लाडाने वाढवितेस; आणि हृदयाकाशरूपी पाळण्यात कौतुकाने बसवून आपल्या उपदेशाने निजवून झोके देतेस.आत्मप्रकाशाच्या ज्योतीने साधकरूपी बालकास तु ओवाळतेस आणि मन व प्राण यांचा विरोध करणे, हिच जणू खेळणी आपल्या बालकाच्या हातात देतेस आणि आत्मसुखाची बाळलेणी त्या बाळाच्या अंगावर घालतेस. ब्रम्हरंध्रामध्ये असलेल्य सतराव्या चंद्रामृतकलेचे दूध पाजतेस, अनाहत नादाचे स्पष्ट व मधूर गाणे गातेस आणि समाधिसुखाचा बोध करून स्वरूपी निजवितेस. म्हणून तू साधकांची माता आहेस. तुझे चरणकमल धरल्याने सर्व ज्ञान-विज्ञानाची प्राप्ती होते. यामुळे मी तुझी सावली,म्हणजे तुझ्या चरणकमलांचा आश्रय सोडणार नाही. हे सदगुरूकृपादृष्टे! तुझे कारूण्य ज्याला स्वीकारते, तो जणू सर्व विद्यांच्या सृष्टीचा उत्पन्नकर्ता ब्रम्हदेवच होतो. म्हणून हे श्रीमान अंबेमाता! तू भक्तांच्या मनातील इच्छा सफल करणारी कल्पतरूच आहेस. विश्वमाते ! मला गीतेचा अर्थ सांगण्याची आज्ञा कर. (ओवी १ ते १०)

          तू शृंगार, वीर, बीभत्स, रौद्र, हास्य, भयानक अदभुत आणि शांत या नवरसांनी भाषेचा सागर माझ्याकडून भरवून टाक. उचित अशा उपमा, दृष्टांत अलंकाररूपी रत्नांच्या खाणी निर्माण कर आणि भावार्थाचे मोठमोठे पर्वत निर्माण कर. मराठी भाषारूपी जमिनीत साहित्यरूपी सोन्याच्या खाणी उघडून विचाररूपी वेलींची दाट लावणी कर. सुखसंवादरूपी विविध प्रकारच्या सध्दांतांची उद्याने निर्माण कर आणि गुरू-शिष्यातील फळांचा साठा असलेली वने निर्माण कर. नास्तिकपणाच्या दऱ्या नाहीशा कर आणि कुतर्करूपी दुष्टे जनावरे हाकलून दे. गीतार्थाच्या रूपाने श्रीकृष्णाचे गुणवर्णन करीत असता मला समर्थ कर आणि श्रोत्यांना श्रवणाच्या राज्यावर बसव. या मराठी भाषेच्या नगरीमध्ये ब्रम्हविद्येचा सुकाळ कर आणि या जगाला ब्रम्हनंदाचे घेणे-देणे होऊ दे. हे गुरूमाउली! तू आपल्या कृपारूपी पदराने मला आपले पांघरूण घालशील, तर मी आत्ताच या अध्यायामध्ये अमृतमधुर विचार प्रगट करीन. अशी विनंती केल्यानंतर गुरूंनी कृपादृष्टीने पाहिले. आणि गुरूमाउली म्हणाली,”तू आता इतर विचार न बोलता गीतेचा भावर्थ सांगण्यास तयार हो.” गुरू असे बोलले, तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांना सहजच आनंद प्राप्त झाला आणि ते त्यांना म्हणाले,” आपण जी मला आज्ञा केली, तो महाप्रसाद आहे. मी आता गीतेचा भावार्थ प्रगट करतो. इकडे लक्ष द्यावे.” तरी जो वीरांचा श्रेष्ठ राजा, सोमवंशातील विजयध्वज पंडू राजाचा पुत्र तो अर्जुन बोलता झाला. (ओवी २१ ते ३०)

            अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, आपण ऐकले का? तुम्ही मला जे विराट विश्वरूप दाखविलेत, ते अतिशय अदभुत असल्यामुळे माझ्या चित्तात भीतीच्या लहरी निर्माण झाल्या. तुमच्या या सगुण मूर्तीची अधिक सवय असल्यामुळे माझ्या मनात तिचीच आवड निर्माण झाली आहे. परंतु सगुण मूर्तीवर‍ अधिक प्रेम ठेवू नकोस, असे देवा, तुम्हीच निक्षून सांगितलेले आहे. तरी साकार आणि निराकार ही दोन्हीही रूपे निश्चितपणे तुमचीच आहेत, हे मला समजून चुकले आहे. भक्तिमार्गाने सगुण रूपाची आणि योगमार्गाने निर्गुण स्वरूपाची प्राप्ती होते. हे वैकुंठनायका, भक्ती आणि योग या दोन्ही वाटा तुझ्या प्राप्तीसाठी आहेत. या वाटांनी गेल्यास व्यक्त आणि अव्यक्तच्या दारात प्रवेश करता येतो. जो कस शंभर भार सोन्याच्या लगडीचा असतो, तोच कस त्या लगडीतील वाढलेल्या वालभर सोन्याचा असतो; म्हणुन मर्यादित आणि व्यापक या दोघांची योग्यता सारखीच असते. अमृताच्या सागरामध्ये जी सामर्थ्याची थोरवी आहे, तीच थोरवी त्या अमृतसागरातील लाटेती एक चुळभर अमृत प्याले असता प्राप्त होत असते. ही जाणीव माझ्या चित्तात खरोखर आहे. परंतु हे योगेश्वरा, तुला जे विचारायचे आहे, ते याकरिता की, देवा, तुम्ही जे क्षणभर व्यापक विश्वरूप धारण केले,ते तुमचे खरे स्वरूप आहे, अथवा तो तुमचा लीलाविलास आहे, हे समजून घेण्यासाठी मी विचारीत आहे.जे आपली सर्व कर्मे तुमच्याकरिता करत असतात, ज्यांना तुमच्याविषयी या जगात दुसरे श्रेष्ठ असे काही नाही, ज्यांनी आपले सर्व संकल्प तुझ्या भक्तीला जणू विकल्पासारखे वाहिले आहेत; हे श्रीहरी, इत्यादी सर्व प्रकरांनी जे भक्त तुला आपल्या अंत:करणात स्थिर करून तुझी उपासना करतात. (ओवी २१ ते ३०)

          आणि जे तुमचे स्वरुप ओमकाराच्या पलीकडे असुन ज्याचे वर्णन वाणीने करण्यास अशक्य व कोणत्याही प्रकारच्या वस्तुबरोबर ज्याची तुलना होत नाही, जे अविनाशी आहे, प्रत्यक्षादी प्रमाणांना ज्याचा विषय करता येत नाही, एवढा-तेवढा असा निर्देश करता येत नाही, त्याला पुर्वापार कोणत्याही प्रकारची देशमर्यादा नाही, अशा परमतत्वाची तो परमात्मा आहे या अभेद भावाने जे ज्ञानी लोक चितंन करतात, हे अनंता , अशा ज्ञानी लोकांत व भक्त लोकांत खरा योग कोणास समजला ते सांगा. अर्जुनाच्या या बोलण्याने जगन्मित्र भगवंत संतोष पावले, ते म्हणाले , प्रश्न कसा करावा, हे तु उत्तम प्रकारे जाणतोस. असे पाहा की अस्ताचलाच्या कंठाजवळ माथ्याच्या थोडाशा खालच्या बाजुस सुर्याने प्रवेश केल्यानंतर त्या सुर्यबिंबाच्या पाठोपाठ त्याची किरणे जशी जातात. अर्जुना , पावसाळया मध्ये नदीचे पाणी दिवसेंदिवस जसे वाढु लागते, त्याप्रमाणे माझे मनोभावे भजन करीत असताना भक्तांचे माझ्याविषयीचे प्रेम वाढत असलेले दिसुन येते. ज्याप्रमाणे गंगा नदी सागरास प्राप्त झाल्यानंतरही तिच्या  मागील पाण्याचा अनिवार लोट सतत येत असतो, त्याप्रमाणे  त्या भक्तांच्या हदयातील प्रेमभाव माझे ठिकाणी असुन तो प्रेमभाव, माझ्यावरील भक्ती प्रकर्षाने  अधिकाअधिक वाढत जातो, तसेच सर्व इंद्रियांसहित चित्त माझे ठिकाणी  करुन रात्रंदिवस न म्हणता जे भक्त अखंडपणे माझी उपासना करतात, अशा प्रकारचे जे भक्त आहेत ते स्वतालाही मला अर्पण करतात त्यांनाच मी उच्च प्रतीचे योगयुक्त मानतो. अर्जुना , याशिवाय दुसरे जे निर्गुण रुपाचे उपासक आहेत, ते देखील तो परमात्मा मी आहे अशी दृढ भावना करुन अवयवरहित व अविनाशी अशा ब्रम्हाला आलिंगन देतात, म्हणजे त्याच्याशी एकरुप होतात.  (ओवी ३१ ते ४०)

            ज्या ब्रम्हाचे ठिकाणी मनाचे छोटेसे नख देखील प्रवेश करु शकत नाही, जेथे बुध्दीची दृष्टी देखील प्रवेश करु शकत नाही, ते इंद्रियांसारख्या स्थुल साधनांना कसे बरे समजेल? परंतु जे ब्रम्ह एके ठिकाणी न सापडल्यामुळे ते कोणत्याही आकारात येत नसल्यामुळे जे ध्यान करण्यासही कठीण आहे. जे सर्व ठिकाणी समरुपाने नेहमी असते आणि ज्याची प्राप्ती झाली असता सर्व प्रकारचे चितंन आपोआप थांबते, जी वस्तु उत्पन्न होत नाही म्हणुन ती नाशही पावत नाही जी वस्तु नाही असेही म्हणता येत नाही व आहे असेही सांगता येत नाही, असे ते परमतत्व सर्व प्रकारच्या भावभावनेच्या‍ पलिकडचे आहे, म्हणुन  त्याच्या प्राप्तीसाठी कोणतेही साधन जन्माला येत नाही,  जे निर्विकार असल्यामुळे आपल्या स्वरुपापासुन कधी चलित होत नाही, जे अतिव्यापक असल्यामुळे कधी हालत नाही, जे पुर्ण रुपाने असल्यामुळे कधी संपत नाही, जे परिशुध्द असल्यामुळे कधी मलिन होत नाही, ते परब्रम्ह ज्यांनी आपल्या तपोबळाने आत्मसाद केले आहे, वैरागीरुपी विशाल अग्नीने विषयरुपी सैन्य जाळुन ज्यांनी आपली होरपळलेली इंद्रिये कष्टाने आवरुन त्यापुढे निग्रहांची ताटी उभारली व त्यांना अंर्तमुख करुन मनाच्या कपाटात कोंडुन ठेवले, अपान वायूच्या द्वाराला वज्रासनाची मुद्रा लावली आणि मूळबंधाचे बुरूज उभे केले, आशेचे संबंध तोडले, अधैर्याचे कडे पाडले, व निद्रारुपी अंधकार नाहीसा केला, वज्रासनरुपी अग्नीच्या ज्वालांनी रक्त, मांस आदी सप्त धातुंची होळी करुन व्याधींचा नाश केला आणि  त्यांच्या मस्तकाने प्राणायमाच्या तोफांची पुजा केली.   (ओवी ४१ ते ५०)

         मग कुंडलिनीची मशाल मुलाधार चक्रावर उभी केली, ‍त्या वेळी त्या प्रखर प्रकाशाने त्यांना ब्रम्हरंध्राचा मार्ग स्पष्ट दिसु लागला. आपल्या शरीरातील नऊ दारांच्या कवाडावर सयंमाचा अडसर घातला व सुषुम्ना नाडीचे मुख उघडले. प्राणशक्तीरुपी चामुंडादेवीपुढे संकल्परुपी मेढयांचा बळी दिला व मनोरुप महिषाचे मस्तक कापुन बळी दिले. इडा, पिडा नाडयांच्या सुषुम्नेंमध्ये प्रवेश करुन अनाहत चक्राच्या नादाचा गजर चालु केला आणि सतराव्या चंद्रकलेचे अमृत त्वरेने जिं‍कुन घेतले, मग कुंडलिनी शक्तीने सुषुम्ना नाडीच्या आत पोकळी असलेल्या त्या कोरीव जिन्याने एकेक चक्राची पायरी  वर चढुन ब्रम्हरंध्ररुपी शिखर गाठले, ओमकाराची तिसरी मात्रा जी मकार, त्या मकाररुपी जिन्याने बिकट शेवट ते चढुन जातात आणि गहन अशा मूर्ध्नी आकाशाला बगलेत मारुन ब्रम्हाशी एकरुप होतात, याप्रमाणे सर्व भुतमात्रांविषयी समबुध्दी असलेले योगी “तो परमात्मा मी आहे” हा अनुभव गिळुन टाकण्याकरीता अमर्याद अष्टांगयोगरुपी किल्ले स्वाधीन करुन घेतात, याप्रमाणे स्थुल देहापासुन सुक्ष्म मनापर्यतच्या सर्व गोष्टी देवुन सर्वविशेष शुन्य असा ब्रम्हाचा अनुभव घेतात, अर्जुना ते योगी मलाच प्राप्त होतात. भक्तीने जे प्राप्त होते, ते योगमार्गाने प्राप्त होत नाही, उलट योगमार्गामध्ये जास्त कष्ट आहेत, ज्या योगी पुरूषांनी सर्व प्राणीमांत्राचे हित म्हणजे सुखाचे साधन असलेल्या निर्गुण, निराकार, निराधार परब्रम्हाचे ठिकाणी सगुण भक्तीचे सहाय्य न घेता आसक्ती धरलेली आहे.(ओवी ५१ ते ६०)

पुढील भाग