अध्याय १३ भाग १

ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी

सार्थ भगवद् गीता अध्याय१३

क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग

श्री ज्ञानदेवांनी भगवद् गीतेतील अध्याय१३ मधीलक्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगया अध्यायातील ते ३४ संस्कृत श्लोकांचे इसवी सन १३ व्या शतकात तत्कालीन मराठीतुन ११७० ओव्यामधुन सखोल निरूपण केले आहे. खरतर हा मराठी भाषेचा अतिव गौरव आहे, परंतु कालपरान्वये बोली आणि लिखीत मराठी भाषेमध्ये फरक पडल्यामुळे ती मराठी भाषाही अवघड वाटू लागली. श्री निवृत्तीनाथांचे परमशिष्य श्री ज्ञानदेवांच्या कृपार्शिवादाने तेच सखोल निरूपण मराठी वाचंकासाठी सोप्या मराठी भाषेत (२१व्या शतकातील प्रचलित मराठी भाषा) जसे आहे तसे देत आहे. हा श्री ज्ञानदेवांचा अमुल्य  कृपाप्रसाद आहे, मनुष्य जीवन जगण्यासाठी अनमोल संजीवनी आहे, किंबहुना संसारसागर पार करण्यासाठी अध्यात्मातील नौका आहे, तिच्या मदतीने संसार करता सावरता आपणही याचा अवश्य लाभ घेवून जीवनसागरातुन तरुन जावे आणि आपल्या जीवनाचे कोटकल्याण साधावे. ही ज्ञानदेवांची  “अक्षरब्रम्ह ज्ञानेश्वरीआत्मसाद करुन जीवनाचे  सार्थक करावे.

 

       ज्यांचे अतं:करणापासुन स्मरण केले असता साधक हा सर्व विद्यांचे आश्रयास्थान होतो तेच सदगुरूंचे परमपुज्य चरणकमल ‍! त्यांस वंदन करुया.ज्यांचे स्मरण केले असता काव्य करण्यास लागणारी शब्दसृष्टी सहज स्वाधीन होते आणि समल विद्या जिभेवर येतात, तसेच वकृत्वाला इतकी मधुरता प्राप्त होते कि, ते अमृतालाही फिके पाडते, नवरस हे शब्दांची सेवा करतात, ज्याच्या स्मरणाने रस उत्पन्न करणाऱ्या भावांचे प्रकाशन होते आणि आत्मज्ञानाच्या सिध्दांताचे प्रकार प्रकाशित करणारी अचुक खुण हाताशी येते, जेव्हा सदगुरुंचे चरणमकल ह्दयरुपी मंदिरात स्थिर होतात, त्यावेळी अध्यात्मज्ञानाला एवढे भाग्य प्राप्त होते, त्या सदगुरुंच्या चरणकमलानां अत्यंत विनम्र भावाने वंदन करुन मी (श्री ज्ञानदेव महाराज) गीतेवर भाष्य प्रगट करत आहे, श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात, श्री ब्रम्हदेवांचा पिता व श्री लक्ष्मीदेवीचे नाथ जे भगवान वैकुंठनायक ( श्रीकृष्ण ) ते असे म्हणाले अर्जुना ऐक, या देहाला क्षेत्र असे  म्हणावे आणि या देहरुपी क्षेत्राला जो जाणतो ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हणावे, जो सर्व क्षेत्रांचे पालन करतो, त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात तो मीच आहे, असे निश्चीत जाण. क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला यथार्थरुपाने जाणणे याला “ज्ञान” असे आम्ही समजतो. तर आता या शरीरास ज्या अभिप्रायाने “क्षेत्र” हे नाव दिले, तो संपुण अभिप्राय आता सांगतो, याला क्षेत्र असे का म्हणावे? हे कसे व कोठे उत्पन्न होते? कोणकोणत्या विकारांनी हे वाढले जाते? (ओवी १ ते १०)

         हे साडेतीन हाताचे आहे की केवढे व कसले आहे?  हे क्षेत्र न पिकणारी जमीन आहे की सुपीक जमीन आहे?  तसेच हे क्षेत्र कोणाच्या मालकीचे आहे? आदी जे जे देहाचे धर्म आहेत ते मी तुला यथासांग सांगणार आहे तरी तु इकडे लक्ष दे. याच क्षेत्राच्या निर्णयासाठी वेद नित्यनुतन ज्ञान सांगत असतात, या कारणानेच तर्काला अतिबोलके केले आहे, या क्षेत्रासंबंधी बोलत असताना सहा शास्त्रे आपले विचार मांडुन स्वस्थ बसली, म्हणुन आजपर्यत त्यांच्यातील मतभेदांचे द्वंद्व मिटले नाही, सिध्दांत सांगण्यासाठी सर्व शास्त्रे एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती परंतु क्षेत्रासंबंधी त्यांचे एकमत झाले नाही, यामुळे जगामध्ये क्षेत्रासंबंधी वादविवाद चालु आहेत, एका शास्त्रांचा निर्णय दुसऱ्या शास्त्रांशी जुळत नाही. एका शास्त्रांचा एक विचार तर दुसऱ्या शास्त्रांचा दुसरा विचार असतो, त्यामुळे एकवाक्यता होत नाही,विविध युक्तीला व बोलण्याला हे एक क्षेत्रच कारणीभुत आहे, हे क्षेत्र कोणाच्या मालकीचे आहे हे कळत नाही,परंतु याच्यासंबंधी वादविवाद करणाऱ्यांना बळ प्राप्त झाले आहे, घराघरात डोक्याला ताण देवुन याचा विचार करण्याचा प्रयत्न सुरु आहे, नास्तिकांना तोंड देण्यासाठी वेदांचे हे मोठे बंड असलेले पाहुन पाखंडी लोक व्यर्थ बडबड करतात, नास्तिक लोक वेदांस म्हणतात, तुमचे वाक्यपंडित्य हे खोटे असुन त्यास कोणताच आधार नाही, जर कोणी त्यास खरे म्हणत असतील, तर आम्ही पैजेची सुपारी ठेवतो, आमच्याशी वाद करण्याची ताकद असेल त्यांनी विडा उचलावा. ( ओवी ११ ते २० )

        पाखंडयाच्या समुदायामध्ये कोणी दिगंबर बनतात, तर कोणी मुंडण करतात, तरी त्यांनी ठरवलेले सर्व वितडंवाद आपोआप गप्प बसतात, मृत्यूच्या प्रचंड बळामुळे हे शरीर फुकट जाईल याचा सुक्ष्म विचार करुन योगी लोक योगाचा अभ्यास करण्यासाठी वनात निसर्गरम्य शांत जागी निघुन गेले, ज्यांना मृत्यू हा भयानक आहे हे कळाले, ते निर्जन वनात निघुन गेले आणि मृत्यूला जिकंण्यासाठी यम, नियम, आसन, प्राणायम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या आठ अंगाचा त्यांनी अभ्यास पुर्ण केला, या क्षेत्राचा अभिमान प्राप्त होवु नये म्हणुन  भगवान श्री शंकरांनी कैलासाच्या राज्यांचा त्याग केला आणि स्मशान भुमीत निवास केला, राज्य सोडुन स्मशानात राहण्याच्या प्रतिज्ञेमुळे  शंकरांना तेथे दाही दिशा पांघरून नग्नावस्थेत राहावे लागले, काम हा योगभ्रष्ट करणारा आहे हे जाणुन त्यांनी कामला जाळुन  त्याचां कोळसा केला. क्षेत्राचा निर्णय करण्याकरिता ब्रम्हदेवाला चार मुखे निर्माण झाली, तरी त्या क्षेत्राचे पुर्ण स्वरुप ते जाणू शकले नाहीत, अनेक जीववादी म्हणतात, समुळ देह हे शेत जीवाच्या मालकीचे आहे, मग प्राण हे त्याचे इथले कुळ आहे, प्राणाच्या घरी अपान, व्यान, उदान, समान, असे स्वता राबणारे चार भाऊ आहेत, आणि त्याच्यां मनासारखा शेताच्या सर्व बाजुस फिरणारा, सर्वावर देखरेख करणारा आणि शेत पिकवण्यास सहाय्य करणारा नोकर आहे, त्या जीवाजवळ पाच ज्ञानेद्रियें, पाच कर्मेद्रियें मिळुन दहा इंद्रियेरुपी बैलाचां ताफा आहे, तो रात्रंदिवस अमावस्या, पोर्णिमा व्यतिपात न समजता कोणत्याही वेळी विषय फुलुन येणाऱ्या शेतात कसुन मेहनत करतो, मग तो जीव विधिनिषेधांचा वाफसा टाळुन अन्यायाचे जर बी पेरील आणि त्याला दुर्वर्तनाचे खत इंद्रियांकडुन घालण्याचे कार्य करवील. (ओवी २१ ते ३०)

          तर पेरलेल्या अधर्माप्रमाणे ते पीक खुप फोफावते, त्यामुळे तो देहरुपी शेतीचा मालक असलेला जीव पुढील कोटयावधी जन्मांत दु:खच दु:ख भोगीत असतो. अथवा विधीचा वाफसा झालेल्या जमिनीमध्ये सत्कर्मरुपी बी जो जीव पेरतो, तो जीव शेकडो जन्मांच्या मापाने सुखच सुख मोजीत असतो, प्रकृतीवादी म्हणतात, हे जीवाचे क्षेत्र आहे असे म्हणु नका या क्षेत्राविषयी सर्व काही तुम्ही आम्हाला विचारा, अहो, जीव हा येथे कर्मानुसार वाटेने जाता-जाता काही काळ या देहात राहणारा वाटसरु आहे आणि प्राण हा या क्षेत्राचा बलुतेदार असल्यामुळे तो जागा राहुन क्षेत्राचे संरक्षण करतो, अनादि जी प्रकृती, जिचे सांख्यशास्त्र निरुपण करतात, हे क्षेत्र तिचे वतन आहे असे जाणा, आणि हिच्याजवळ शेती चालविण्याचा घरच्याच मंडळीचा मेळावा आहे, म्हणुन शेत बटाईने न देता त्याची सर्व वहिवाट ती घरीच करते,  या शेतीची मुळ लागवड करणारे त्या सृष्टीत जे प्रमुख सात्विक, राजस, तामस हे तीन गुण आहेत, ते या प्रकृतीच्याच पोटी जन्माला आले आहेत, रजोगुण हा पेरणी करतो, तितक्यांचे सत्वगुण रक्षण करतो, मग एकदा तमोगुण वेळेवर सर्व पिकांची काढणी, कापणी करतो, आणि मग तमोगुण हा महत् तत्वाचे खळे तयार करुन एकटया काळरुपी पोळया कडुन या सर्वाची मळणी करतो, त्या वेळी तेथे अव्यक्त सुक्ष्म सृष्टीची रास बनते, तेव्हा कित्येक बुध्दीमानांनी दु:ख मानुन या बोलण्यास नापंसती दर्शविली आणि म्हटले हे तुमचे ज्ञान अगदीच अलिकडचे आहे. (ओवी ३१ ते ४०)

         ते म्हणतात -अहो परब्रम्हयाचे ठिकाणी प्रकृतीची गोष्टच कशाला करता?  हा क्षेत्राचा सर्व वृत्तांत आम्ही तुम्हालां सांगतो, तो तुम्ही निवांत पणे ऐका, शुन्य असे जे ब्रम्ह त्या ब्रम्हरुपी शय्यागृहामध्ये अंथरुण ठेवलेल्या लयरुपी गादीवर या बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती, तो अकस्मात जागृत झाला तो आपल्या उद्योगात नेहमी तत्पर होता, म्हणून त्याने इच्छा करताच त्यास त्रिभुवनरुपी ठेवा प्राप्त झाला, त्या निराकार परब्रम्हयाच्या ठिकाणी त्रिभुवनाएवढी विशाल सुंदर बाग निर्माण होते ती त्या संकल्पाच्या सहाय्याने आकाराला आली, नंतर वेगवेगळी पंचमहाभुते एकत्र करुन भुतमांत्राची जारज, स्वेदज, अंडज व‍ उभ्दिज्ज अशा चार घाटांची रचना केली, यानंतर निरनिराळया पंचमहाभुतांच्या योगाने पंचीकरण झाले आणि त्यांना स्थुल आकार प्राप्त होवुन एक क्षेत्र तयार झाले, मनुष्य-शरीररुपी क्षेत्राच्या उत्तम गती आणि अधम गती या दोन विभागांकडे पुण्य-पापांचा दगडांनी बांध घातले आणि न पिकणारी माळराने सुपीक केली, मग संकल्पाने शेतात येण्या-जाण्यासाठी कोणाचाही लाग येथे लागणार नाही, असे विशिष्ठ प्रकारचे जन्म-मृत्यूरुपी भुयार तयार केले, मग संकल्पाने अहंकाराबरोबर एकरुपता प्राप्त करुन बुध्दीद्वारे तो चराचरांची वहिवाट करवु लागला, याप्रमाणे वेगळी परब्रम्हरुपी संकल्पाची डहाळी वाढते म्हणून तो संकल्प या प्रपंचाला मुळ आहे.  (ओवी ४१ ते ५०)

       याप्रमाणे संकल्पवाद्यांची मुक्ताफळे ऐकुन त्या ठिकाणी दुसरे जे स्वभाववादी होते ते म्हणाले, तुम्ही असे कसे जो विचारवंत? परब्रम्हरुपी गावात संकल्पाची शेज अवस्था म्हणजे लीन अवस्था जर मानावयाची, तर प्रकृतिवाद्यांची प्रकृती परब्रम्हयाचे ठिकाणी का मानु नये? परंतु हे असु दे, तुम्ही या क्षेत्राचे वर्णन करण्याच्या नादी लागु नका, आता हे सर्व आमच्याकडुन सांगण्यात येईल, तर आकाशातील मेघांमध्ये पाण्याची भरती कोणी केली ? अंतरिक्षात अनेक तारे आहेत, त्यांना आधार कोणाचा आहे ?  आकाशाचे छत मध्ये झोल न येता  सारखे ताणलेले आहे हे छत कोणी व केव्हा ताणुन बांधले?  आणि वाऱ्याने सतत फिरत असावे ही कोणाची बरे आज्ञा आहे?  अंगावरचे केस दिसतात, त्यांची पेरणी कोण बरे करतो?  सागर हा कधी आटत नाही, त्यामध्ये पाणी कोण भरतो? पावसाच्या रिमझीम जलधारा कोण उत्पन्न करतो?  त्याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावत:च झाले असुन ती कोणा मालकाची मिरासदारी नाही, या क्षेत्राला जो योग्य प्रकारे जपेल, त्यासच हे उपभोगावयास मिळते, इतरांना मिळत नाही, तेव्हा दुसरे एक कालवादी क्रोधाने म्हणाले, तुम्ही म्हणता हे जर खरे मानले तर या क्षेत्रावर काळाची सत्ता का बरे आहे? या विक्राळ काळाचा मार अपरिहार्य आहे असे सर्वजण प्रत्यक्ष पाहतात, तरी देखील अभिमानी लोक आपल्या मतावरच अधिक भर देत असतात, हे  क्षेत्र मृत्यूरुपी क्रोधायमान सिंह राहण्याची जणु गुहाच आहे असे आम्हाला वाटते परंतु वेगवेगळया मतांचा अभिमान ठेवणाऱ्यांना उत्तरे देण्यास आम्ही एकटे पुरे पडु काय?  (ओवी ५१ ते ६०)

         हा काळरुपी भयंकर सिंह महाकाळाच्याही पलीकडे ब्रम्हदेवांची शंभर वर्षे संपल्यानंतर ताबडतोब अकस्मात उडी घालुन सत्यलोकरुपी हत्तीच्या अंगावर झडप घालतो, हा काळरुपी भयंकर सिंह स्वर्गरुपी अरण्यामध्ये शिरुन प्रत्येक दिवशी नित्य नवीन असलेल्या लोकपालरुपी दिग्गजांचे समुदाय नाहीसे करतो, या काळरुपी भयानक सिंहाच्या नुसत्या अंगाच्या वाऱ्याने इतर जीवरुप पशू निर्जीव होवुन जन्म-मृत्यूच्या चक्रात भ्रमत रहातात, या काळरुपी भयानक सिंहाचा जबडा एवढा आहे की, तो विश्वाकाररुपी हत्तीला जबडयात धरुन विशाल पसरला आहे, म्हणुन या क्षेत्रावर काळाची सत्ता आहे हे आमचे बोलणे खरे आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, अशा प्रकारे या क्षेत्राविषयी अनेक प्रकारचे वाद आहेत. ऋषींनी नैमिष्यारण्यात या क्षेत्रांविषयी अनेक वादविवाद केले आहेत, यासंबंधी पुराणे साक्षीभुत आधार आहेत, वेदांमधील अनुष्टुपांदि छंदांत याबद्दल विविध प्रकारची चर्चा केली आहे, अजुनही या क्षेत्राविषयी लोक अभिनिवेशाने ग्रंथ तयार करतात, वेदांतील बृहद् सामसुत्र जे ज्ञानाने परम पवित्र आहे त्यालादेखील क्षेत्र म्हणजे काय, हे समजले नाही, आणखी काही पुष्कळ महाकवीनीं आणि तार्किक लोकांनी या क्षेत्रांच्या निर्णयासाठी आपली बुध्दी खर्च केली, परंतु हे क्षेत्र असे आहे, एवढे आहे, या क्षेत्राचा मालक अमुक आहे, हे आजपर्यत कोणालाही कळले नाही. (ओवी ६१ ते ७०)

         तर आता हे क्षेत्र नेमके काय आहे, याविषयी तुला आरंभापासुन शेवटपर्यत सांगतो, पाच महाभूते, अंहकार, बुध्दी, प्रकृती, पाच ज्ञानेद्रियें आणि पाच कर्मेद्रियें मिळुन दहा इंद्रिये, आणखीही एक मन, ज्ञानेद्रियांचे पाच विषय व कर्मेद्रियांचे पाच विषय असे दहा विषय, सुख, दुख,द्वेष, संघात आणि इच्छा , चेतना व धृती सर्व मिळुन क्षेत्राची जी छत्तीस तत्वे आहेत, ती तुला सर्व स्पष्ट सांगितली, आता महाभुते कोणती, विषय कोणते, इंद्रिये ती कशी, हे निरनिराळे एकेक करुन सांगतो, तरी तुला पंचमहाभुते म्हणुन सांगितली आहेत ती पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश ही आहेत असे समज, आणि जागृत अवस्थेत स्वप्न जसे लपलेले असते अथवा अमावस्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो, अथवा लहान बालकाच्या ठिकाणी तारुण्य जसे गुप्तरुपाने वसत असते, अथवा फुलांची कळी फुलण्यापुर्वी जसा तिच्यात सुगंध गुप्तरुपाने असतो, किबंहुना अर्जुना, लाकडामध्ये अग्नी जसा गुप्तरुपाने असतो, त्याप्रमाणे प्रकृतीच्या पोटी तो गुप्तरुपाने असतो, ज्याप्रमाणे शरीराच्या धातुमध्ये असलेला ज्वर प्रगट होण्यास अपथ्य झाल्यावर तो देहाला आतुन-बाहेरुन व्यापुन रहातो. (ओवी ७१ ते ८०)

         त्याप्रमाणे पंचमहाभुते एकत्र आल्यावर म्हणजे त्यांचे पंचीकरण झाल्यावर देहाचा आकार स्पष्ट होतो, तेव्हा तो अहंकार देहाला चहुकडे नाचवितो, या अहंकाराची गोष्ट अशी आश्चर्यकारक आहे की तो विशेषकरुन अज्ञानी लोकांच्या पाठीशी लागत नाही, पण स्वताला जे ज्ञानी म्हणविणारे आहेत त्यांच्या गळयाशीं झोबंतो आणि त्यांना नाना प्रकारच्या संकटांत फिरवतो. यादव-श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले, त्या बुध्दीचे लक्षण सांगतो ते ऐकावे, जिला बुध्दी म्हणतात ती अशी लक्षणांनी जाणावी, कामाचा आवेग वाढल्यावर जी इंद्रियांच्या सहाय्याने विषयांचे समुदाय जिंकुन आणते, त्या विषयांच्या सुख-दुखांच्या लुटीचा माल अतंकरणामध्ये जेव्हा जीवाला नेमका हिशोब द्यावयास लागतो, तेव्हा त्या सुख-दुखांविषयी ही जी योग्य प्रकारे निवड करते हे सुख हे दुख, हे पाप हे पुण्य, हे शुध्द हे अशुध्द , याप्रमाणे जी निवड करते, जिला उत्तम आणि अधम योग्य प्रकारे कळते, जी लहान अथवा थोर समजते, जीव जिच्या दृष्टीने विषयांची परीक्षा करीत असतो, जी ज्ञानतत्वाचे मुळ उत्पत्तीस्थान आहे, जी सत्वगुणांची वाढती अवस्था आहे जो आत्मा व जीव या दोहोंच्या संधीमध्ये उपाधिरुपाने राहते, अर्जुना! ही सर्व बुध्दी होय, असे तु जाण आता अव्यक्ताची लक्षणे तुला सांगतो, ती तु ऐक, हे महाबुध्दीमान अर्जुना! सांख्यांच्या सिध्दातांमध्ये जिला प्रकृती म्हणतात, तिला येथे प्रस्तुत क्षेत्र-विषयांत अव्यक्त असे म्हटले आहे.  (ओवी ८१ ते ९०)

        सांख्य आणि योग या दोघांच्या मतांनी प्रकृतीचे स्वरूप कसे आहे , हे तुला यापूर्वी ऐकविले आहे आणि सातव्या अध्यायामध्ये परा आणि अपरा अशा दोन प्रकारच्या प्रकृतींचे विवेचन विस्ताराने केले आहे. अर्जुना ! त्या दोन प्रकृतीं पैकी दुसरी जी जीवदशा नावाची परा प्रकृती आहे तिला “अव्यक्त”  असे दुसरे नाव आहे. त्या प्रकृतीला अव्यक्त म्हणण्याचे कारण असे की  उजडल्या नंतर रात्र आणि तारे-नक्षत्रे जसे आकाशात लोप पावतात अथवा सूर्यास्त झाल्यावर प्राणिमात्रांच्या हालचाली जशा हारपून जातात; अथवा अर्जुना, देह पडल्यानंतर देहादिक उपाधी केलेल्या कर्मात गुप्त असतात; अथवा छोटया बीजाच्या अकारामध्ये प्रचंड वृक्ष जसा गुप्तरूपाने राहतो किंवा तंतूंच्या अवस्थेत वस्त्रपणा राहतो, त्याप्रमाणे पंचमहाभूते आणि प्राण्यांचे देहसमुदाय आपले स्थूलत्व टाकून आणि सूक्ष्म होऊन जेथे लीन होऊन जातात, त्या अवस्थेला अव्यक्त हे नाव आहे असे जाणावे. आता इंद्रियांचे प्रकार किती आहेत हे सर्व ऐक, कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा ही पाच ज्ञानेंद्रिये आहेत  असे जाण. या क्षेत्ररूप मेळाव्यापैकी बुध्दी ही सुख:दुखाचा जो विचार करते तो या पाच ज्ञानेंद्रियांच्या मुखाने करते. मग वाणी, हात आणि पाय, उपस्थ (शिश्न,योनी) आणि गुद हे आणखीन इंद्रियांचे प्रकार आहेत, ज्यांना कर्म-उत्पादक इंद्रिये असे म्हणतात. ती हीच आहेत असे मोक्षाचे स्वामी श्रीकृष्ण सांगतात. शरीरामध्ये जी क्रियाशक्ती नावाची प्राणाची स्त्री आहे, तिचे शरीराच्या बाहेर जाणे व आत येणे या पाच दारांनी होते. याप्रमाणे पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेद्रिये अशी दहा इंद्रिये सांगितली. आता मन म्हणजे काय हे तुला स्पष्ट स्वरूपात सांगतो ते ऐक असे श्रीकृष्ण जे मन इंद्रिय आणि बुध्दी यांच्यमधील संधीमध्ये रजोगुणाच्या खांद्यावर चंचलपणाने भासमान होत आहे, तो आकाशामधील निळा रंग, मृगजळावरील लाटा, त्याप्रमाणे या मनाच्या चंचलतेचा भास व्यर्थ आणि खोटा आहे. पुरूषवीर्य आणि स्त्रीरज यांचे मीलन झाले असता पंचमहाभूतांची आकृती देहाच्या रूपाने प्रगट होते. मग त्या देहामध्ये एकच वायुत्व प्राण, अपान, व्यान, उदान,समान,  नाग, कूर्म, कृकल, देवदेत्त, धनंजय अशा नावांनी दहा प्रकारचे झाले आहे. मग त्या दहा भागांनी देहनिर्वाहीशी समरस होऊन आपआपल्या देहातील विशिष्ट अंगांचा आश्रय केला. मग त्या रजोगुणमिश्रित चंचल अशा वायुतत्वाला ‘मन’ हे नाव आहे. मन स्वैरपणामुळे बुध्दीच्या बाहेर आहे, तसेच भ्रांतपणामुळे ते अहंकाराच्या उरावर बसले आहे; म्हणून बुध्दी आणि देह-अहंकार यांच्या मधल्या जागी ते बळकट होऊन बसले आहे. रजोगुणमिश्रित चंचल अशा वामुतत्वाला मन हे नाव व्यर्थ आहे. एरवी मन ह्या नावाने मूर्तिमंत कल्पनाच आहे व त्या मनाच्या संगतीने ब्रह्मवस्तूला जीवदशा प्राप्त झाली आहे. जे मन सर्व व्यवहाराचे मूळ कारण आहे व कामवासनेला ज्याचे बळ आहे जे अहंकाराला अखंड चेतवीत असते, जे इच्छेला वाढविते आशेला चढविते, जे भय निर्माण करते, ज्याच्या योगाने द्वैतभावना निर्माण होते, ज्याच्या योगाने अविद्येला बळकटी येते, जे इंद्रियांना विषयांमध्ये लोटते, जे आपल्या संकल्पमात्राने सृष्टी घडविते आणि ताबडतोब विकल्पाने मोडून टाकते, तसेच विविध प्रकारच्या मनोरथाच्या उतरंडी उतरते व रचते, जे भ्रमाचे खोल विवर आहे, जे वायुतत्वाच्या आतला गाभा आहे आणि बुध्दीचे विचारांचे द्वार ज्यांनी झाकून टाकलेले आहे  अर्जुना ! त्याला ‘मन’ असे म्हणतात. या माझ्या बोलण्यामध्ये गैर असे काही नाही. आता विषयांची नावे आणि त्यातील भेद यांचे श्रवण कर. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे कान, त्वचा, डोळे, जिव्हा आणि नाक या पाच ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. ज्याप्रमाणे हिरव्या चाऱ्याला पाहून जनावरे भांबवतात आणि त्या चाऱ्याकडे धावत जातात, त्याप्रमाणे विषयांना भांबावून या पाच इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाची धाव बाहेर होते. मग आकारादी स्वर, ककारादी वर्ण आणि अ: क: इत्यादी विसर्ग यांचा उच्चार करणे, हा वाणीचा विषय होय. घेणे व देणे हा हातांचा विषय होय. जाणे व येणे हा पायांचा होय. विष्ठेचा त्याग हा गुदाचा आणि मुत्राचा त्याग हा उपस्थाचा विषय होय. हे कर्मेंद्रियांचे खरे पाच विषय आहेत अथवा या पाच विषयांचा उंच-उंच माळा बांधून त्यावरून सर्व क्रिया धावत असतात. (ओवी १११ ते १२०)

पुढील भाग