अध्याय १३ भाग ५

           त्याप्रमाणे  पंचमहाभूतात्मक देहाची जरी इंद्रियांच्या संबंधाने हालचाल होत असली, तरी त्याचे चित्त्‍ कोणत्याही विकाराने विचलित होत नाही मोठे वावटळ आले तरी पृथ्वी जशी हालत नाही, त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या दु:खांचे लोंढे आले तरी जो वाहून जात नाही. दरिद्रयापासून होणाऱ्या त्रासाने जो कधी दु:खी होत नाही भय व शोक याने जो कंपित होत नाही देहास मृत्यू आला असताही जो भीत नाही कोणतीही मानसिक पीडा व आशा यामुळे आणि वृध्दकाल व रोग यामुळे त्याचे चित्त मागे वळून पाहत नाही आणि तो खिन्न होत नाही. निंदा व अपमान यांचे अनेक आघात झाले अथवा काम व क्रोध अंगावर येऊन आदळले तरी ज्याचे मन थोडेदेखील विचलित होत नाही आकाश जरी ओसरून गेले अथवा पृथ्वी जरी विरघळून गेली, तरी ज्याचे चित्त आत्मतत्त्वास सोडून परत फिरत नाही, हत्तीला फुलांनी मारले तरी तो जसा माघारी फिरत नाही त्याप्रमाणे त्याच्यावर अपशब्दांचा मारा केला तरी तो मागे पाहत नाही. क्षीरसमुद्राच्या लाटा कितीही उसळल्या तरी त्या लाटांनी मंदार पर्वताला जसा कंप सुटत नाही अथवा वणव्याच्या प्रचंड ज्वालांनी आकाश जसे जळत नाही त्याप्रमाणे विषयविकाराच्या लाटा कितीही आल्या-गेल्या तरी ज्याचे मन थोडे देखील अस्थिर होत नाही तसेच करूणान्त जवळ आला तरी जो धैर्य धारण करण्यास समर्थ असतो. हे वैचारिक देखणेपण असलेल्या अर्जुना! “स्थैर्य” या नावाने जिचे वर्णन केले जाते  ती हीच अवस्था आहे हे जाण. (ओवी ४९१ ते ५००)

        असे निर्भय स्थैर्य ज्या पुरूषाच्या आतबाहेर भिनले आहे तो पुरूष उघड-उघड ज्ञानाचा ठेवाच आहे. ब्रह्मराक्षस अथवा सर्प जसा आपले धन असणाऱ्या घराला विसरत नाही एकुलत्या एक बाळाला आई जशी कधी विसरत नाही अथवा मधमाशी जशी मधाविषयी अतिशय लोभी असते.  अर्जुना! याप्रमाणे जो आपले अंत:करण जपतो मनाला ताब्यात ठेवतो आणि मनाला इंद्रियांच्या दारातदेखील उभे राहू देत नाही तो म्हणतो, मन स्वाधीन केले  हे कामरूपी बागुलबुवा ऐकेल व आशारूपी डाकीण पाहील आणि त्याला आपल्या पाशात गुंतवून ठेवील, म्हणून त्याला फार भीती वाटते. ज्याप्रमाणे व्यभिचारिणी स्त्रीला तिचा दांडगा पती जसा खोलीत बंद करून ठेवतो त्याप्रमाणे अंत:करणातील सर्व हालचालींवर तो सदैव देखरेख ठेवतो. जिवंतपणी देहाची काही पर्वा न करता देह झिजवून इंद्रियांचा निग्रह करतो. मनाच्या महाद्वरात अंतर्मुखतेच्या पहाऱ्याच्या जागेत तो यम व दम हे पहारेकरी रात्रंदिवस उभे करतो. आधार, नाभी आणि कंठ या ठिकाणी मूळ, ओडियाणा आणि जालंदर बंधाची गस्त घालतो आणि इडा व पिंगळा यांच्या संगमस्थानी म्हणजे सुषूम्नेत चित्त एकाग्र करतो ; आणि समाधीरूप शय्येजवळ ध्यानाला बांधून टाकतो म्हणजे आपले ध्यान दृढ करतो आणि चित्त व चैतन्य यांच्या समरसतेने अंतर्मुखतेत रममाण होतो.       (ओवी ५०० ते ५१०)

         अरे, अंतकरण-निग्रह जो आहे तो याच लक्षणाचा आहे आणि असा दृढ निग्रह जेथे आहे तेथेच ज्ञानाचा विजय आहे हे जाणुन घे. ज्याची आज्ञा अंतकरणाला शिरसावंद्य आहे तो मनुष्यरुपाने जगात कर्म करीत असला तरी तो मुर्तिमंत ज्ञानच आहे हे जाण. ज्याच्या मनामध्ये विषयांविषयी वैराग्याची उत्तम आणि जिवंत अशी समृध्दी असते, आंबलेल्या अन्नविषयी ज्यांची जिभ जशी लाळ घोटत नाही, प्रेताला आलिंगन देण्यासाठी जसे कोणीही आपले अंग पुढे करत नाही विष खाणे आवडत नाही पेटलेल्या घरात शिरवत नाही, वाघाच्या गुहेत वस्ती करण्यासाठी जावु वाटत नाही, रसरशीत तापलेल्या  लोखंडाच्या रसात उडी घालवत नाही मोठया अजगराची उशी जशी करवत नाही. त्याप्रमाणे त्याला विषयांचा  विचार देखील आवडत नाही, इंद्रियांच्या द्वारे कोणत्याच विषयांला तो अंतकरणापर्यत जावु देत नाही. ज्याच्या मनात विषयसेवनाविषयी अतिशय आळस भरलेला असतो देहाच्या ठिकाणी रोडपणा असतो व ज्याला शम-दमाविषयी अतिशय गोडी असते. अर्जुना ! जो तपे व व्रते एकसारखी करतो, ज्याला गर्दीच्या गावात येणे म्हणजे प्रलयासारखे संकट वाटते, ज्याला योगसाधनेची उत्कट इच्छा असते जनरहित वनात जाण्याची ज्याची धाव असते, तसेच ज्याला जनसमुदायाचे नावदेखील सहन होत नाही. (ओवी ५१० ते ५२०)

          बाणांच्या शय्येवर जसे निजणे अथवा पुवाच्या चिखलात जसे लोळणे तसे तो इहलोकीचे भोग भोगणे मानतो. स्वर्गतील उपभोगांचे नुसते वर्णन ऐकुन जो त्याला श्वानाच्या कुजलेल्या मासांप्रमाणे मानतो, अशा प्रकारे हे विषयांविषयीचे वैराग्य असते  हे वैराग्य आत्मप्राप्तीचा लाभ करुन देणारे भाग्य आहे याच्या योगाने जीव ब्रम्हानंदाचा भोग घेण्यास पात्र होतो. इह-परलोकीच्या उपभोगाविषयी ज्याला पुर्णपणे कंटाळा असतो, तेथे ज्ञानाची वस्ती आहे असे जाणावे. सकाम पुरुषाप्रमाणे तो इष्टकर्म करतो, लोकोपयोगी कामे करतो, परंतु त्याचे ठिकाणी थोडादेखील अभिमान नसतो, वर्णाश्रम धर्माप्रमाणे तो नित्य नैमित्तीक कर्माचे आचरण करतो, त्यांत काही कमी पडु देत नाही, पण ही कर्मे मी केली आणि माझ्यामुळे सिध्दीस गेली असा थोडासाही अहंकार त्याच्या कर्म विषयक वासनेत नसतो, ज्याप्रमाणे वायु हा सहजपणे सर्वत्र संचार करत असतो किवां सुर्य जसा कोणत्याही अभिमाना शिवाय सर्वानां प्रकाश देत असतो, अथवा वेद जसे स्वभावताच निरपेक्ष भावाने उपदेश करत असतात किवां गंगा नदी कोणताही हेतु न ठेवता वाहत असते, त्याप्रमाणे त्याचे वागणे अहंकार विरहीत असते, वृक्षास योग्य ऋुतूकाळात फळे येतात परंतु त्याची त्यास आठवण नसते त्या पुरूषाच्या मनाची स्थिती सदैव त्या वृक्षासारखी असते.  (ओवी ५२० ते ५३०)

          ज्याप्रमाणे एकपदरी माळेतील दोरा काढुन घेतला असता तिच्यातील मणी जसे सहजपणे गळुन पडतात, त्याप्रमाणे ‍त्याच्या मनातुन, कर्मातुन आणि वाचेतुन अहंकाराचे विचार काढुन टाकलेले असतात. ज्याप्रमाणे आकाशातील ढग हे आकाशाला चिकटलेले नसतात, त्याप्रमाणे देहाच्या माध्यमातुन झालेल्याकर्माचा अहंकार त्याला स्पर्श देखील करत नाही, मद्यपान केलेल्या  माणसास त्याच्या अंगावरील कपडयाचेही भान नसते, अथवा चित्रातील वीरपुरुषाच्या हातात शस्त्र असुनही ते निरुपयोगी असते, बैलाच्या पाठीवर पोथ्या बांधल्या तरी त्याला जसे त्या पोथ्याचे ज्ञान होत नसते, त्याप्रमाणे ज्याला मी देहधारी आहे याचे स्मरण नसते, त्या अवस्थेला निरहंकारता असे नाव आहे असे जाणावे, ही संपुर्ण निरहंकारता ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी ज्ञान आहे याबद्दल काहीही शंका बाळगु नये. जन्म, मृत्यू, दुख, रोग, वार्धक्य व पातके ही प्राप्त होण्याच्या अगोदरच त्यांना जो दुरूनच विचारपुर्वक पाहतो, ज्याप्रमाणे आपणास पिशाच्च बाधा होवु नये म्हणून मांत्रिक अगोदरच दक्ष असतो, योगी हा समाधीला बंधनकारक ठरणाऱ्या ऋध्दी-सिध्दींना आधीच ओळखुन असतो, अथवा भिंत वाकडी-तिेकडी होवु नये म्हणुन गवंडी जसा आधीच वळंब्याची तयारी करतो ज्याप्रमाणे सर्पाच्या मनातुन जन्मोजन्मीचे वैर नाहीसे होत नाही, त्याप्रमाणे मागील जन्माचे दोष जो मनात बाळगतो डोळयात गेलेला खडा जसा विरघळत नाही, अथवा जखमेमध्ये शस्त्र जसे जिरत नाही , त्याप्रमाणे तो भुतकाळातील जन्माचे दुख कधी विसरत नाही, तो म्हणतो, मी मुत्रद्वारातुन पुवाच्या खाडयात गेलेल्या रेतापासुन जन्मलो आहे,मातेचे स्तनपान करतेवेळी माझ्या तोडांत स्तनावरचा घाम सुध्दा गेला आहे. (ओवी ५३० ते ५४०)

          या विचाराने तो जन्माचा तिरस्कार बाळगतो आणि म्हणतो, ज्या योगाने हे जन्मदुख होईल, ती गोष्ट मी यापुढे कधी करणार नाही, जुगारामध्ये हरवुन गेलेले धन परत प्राप्त करण्यासाठी जुगारी जसा पुन्हा पुन्हा नवीन डाव खेळण्यास तयार होतो,अथवा वडिंलाच्या वैराबद्दल मुलगा जसा सुड घेण्यास परिश्रम करतो, मोठया भावाला मारल्याच्या रागाने धाकटा भाऊ ज्याप्रमाणे मारणाऱ्याचा सुड घेण्याची इच्छा करतो, तितक्याच रागाने तो जन्म चक्र नाहीसा होण्याचे प्रयत्न करतो, संभावित मनुष्याला जसा अपमान सहन होत नाही त्याप्रमाणे त्याचे अंतकरण जन्म घेण्याची लाज सोडत नाही पुढे येणारा मृत्यू कल्पांतका इतका  लांब असला तरी तो आजच सावध होतो. अर्जुना! या नदीमध्ये अथांग पाणी आहे असे कोणीतरी म्हणताच पोहण्यास निघालेला मनुष्य काठावर असतानाच जसा कासोटा बळकट घालतो रणांगणामध्ये जाण्यापूर्वीच योध्दयाला जसे धैर्य सांभाळावे लागते अथवा शस्त्राचा घाव लागण्यापूर्वी ढाल जशी पुढे करावी लागते, उद्याच्या मुक्कामात वाटमारे लोक आहेत हे कळताच प्रवासी मनुष्य जसा आजच सावध होतो शरीरातून जीव निघून जाण्यापूर्वी जशी औषधांसाठी धावाधाव करावी लागते कदाचित असे घडले की जर मनुष्य आग लागलेल्या घरात सापडला तर आपल्या शक्तीने घरात विहीर खणून घराला लागलेली आग तो विझवू शकत नाही. खोल दरीत पडलेला दगड जसा बुडून तळाशी जातो, त्याप्रमाणे संसाररूपी सागरात जो बुडतो त्याने कितीही आरडाओरडा केला तरी कोणास ऐकू येत नाही. नंतर तो बुडाला हे तरी कोणी सांगू शकेल काय?  (ओवी ५४० ते ५५०)

          ज्याचे शक्तिशाली मनुष्याशी हाडवैर निर्माण झाले आहे तो जसा आठही प्रहर शस्त्र सज्ज ठेवून असतो, उपवर झालेली मुलगी लग्नापूर्वी माहेराविषयी उदासीन असते अथवा संन्यास घेऊ इच्छिणारा साधक सर्वसंग परित्याग करण्यापूर्वीच मनाने जसा संन्यासी बनलेला असतो त्याप्रमाणे मरण येण्यापूर्वीच तो पुढे येणाऱ्या मरणासंबंधी विचार करून उदास झालेला असतो. याप्रमाणे जो जिवंतपणीच भावी जन्माचे निवारण करतो आणि या मनुष्यदेहाच्या मृत्यूने पुढे येणारा मृत्यू नाहीसा करतो म्हणजे जन्म-मरण हे मिथ्या आहे हे जाणून‍ आत्मस्वरूपी लीन असतो. याप्रमाणे ज्याच्या ह्रदयातील खुपत असलेले जन्म-मृत्यूचे दु:ख नाहीसे झाले आहे त्याच्या ठिकाणी ज्ञानाची काहीही उणीव नसते. त्याप्रमाणेच शरीराला वार्धक्य येण्यापूर्वी ऐन तारूण्याच्या भरात असताना जो पुढे येणाऱ्या वार्धक्याविषयी विचार करतो. तो म्हणतो “आज माझ्या शरीरामध्ये जी शक्ती आहे ती उद्या निघुन जाईल आणि या शरीराची वाळलेली काचरा होईल ” भाग्यहीन मनुष्याने केलेलेविविध व्यवसाय जसे बंद पडतात, त्याप्रमाणे हाता-पायांची कर्मे बंद पडतील, राजाला जर धर्मवान मंत्री नसेल, तर राज्याची जी दुस्थिती निर्माण होते तसाच प्रकार या शरीरबळाचा होईल, फुलाचा सुगंध घेण्याकरीता ज्या नाकाला सुगंधाचे प्रेम असते ते नाक वृध्दापकालात उंटाच्या गुडघ्याप्रमाणे बसके आणि विद्रुप होवुन जाईल, ओढाळ अशा गुरांची खुरे आषाढ महीन्यात वाहणाऱ्या वाऱ्याने बुरशीयुक्त झालेली असतात, त्याप्रमाणे वृध्दापकालात माझ्या डोक्याची दुर्दशा होवुन जाईल, आज तारूण्यामध्ये असणारे डोळे सौदर्याच्या अभिमानाने कमळांच्या पाकळीशी स्पर्धेने भांडत असतात, तेच डोळे वृध्दापकालात पिकलेल्या पडवळाप्रमाणे होतील. (ओवी ५५० ते ५६०)

          भुवयांचे पडदे झाडाच्या वाळलेल्या सालीप्रमाणे डोळयांवर लोंबतील आणि डोळयांतील ओघळणाऱ्यापाण्याने ऊर कुजून जाईल, ज्याप्रमाणे सरडा हा बाभळीच्या खोडावरुन सारखा खाली-वर आल्यामुळे तो डिकांने बुळबुळीत होतो, त्याप्रमाणे थुंकीने तोंड गिरबटुन जाईल, स्वयंपाक करणाऱ्या घरात  चुलीच्या जवळच खणलेल्या खड्डयात ज्याप्रमाणे घाणेरडे पाणी साचुन जसे बुडबुडे येतात, त्याप्रमाणे नाकपुडया शेबंडाने भरुन जातील, जो आज विडा खावुन ओठ लाल करतो हसताना चकचकीत दात दाखवतो, मुखाने सुंदर शब्दांचे भाषण करुन जगात मिरवतो, ज्याच तोंडाला वार्धक्यामध्ये कफांचा लोंढा येतो आणि दाढासह दातही उपटुन निघतील, शेतीचा व्यवसाय कर्जाने बसला असता त्याची प्रगती होत नाही अथवा झडीच्या पावसाने गुरे एकदा बसली म्हणजे उठत नाहीत, त्याप्रमाणे वार्धक्यामध्ये जीभ एकदा जड झाली की ती काही बोलु शकत नाही, माळरानावरची वाळलेली कुसरे ज्याप्रमाणे वाऱ्याने उडून जातात, त्याप्रमाणे मुखाच्या ठिकाणी दाढीची दुर्दशा होवुन जाते, आषाढ महीन्यातील पावसाच्या झडीने जशी पर्वतांची शिखरे पाझरत असतात, त्याप्रमाणे ओठांच्या दोन्ही बाजुंच्या  खिंडीतुन लाळ पाझरु लागते, वाणीला शुध्द बोलण्याचे सामर्थ्य रहात नाही कानांची कवाडे बंद होवुन जातात, अशा प्रकारे शरीर हे म्हाताऱ्या माकडांसारखे बेडौल होवून जाते, गवताचे तयार केलेले बुजगावणे जसे वाऱ्याने हलत असते, तसे सर्व शरीराला कापरे येईल. (ओवी ५६० ते ५७०)

         पायात पाय अडकतील, हात वाकडे होतील, आत्ताचे सैादर्य वार्धक्यामध्ये एखाद्या सोगांडया प्रमाणे नाचवील, मलमूत्राची द्वारे फुटक्या भांडयाप्रमाणे होतील त्या वेळी लोक माझ्या लवकर मरण्याकरता नवस-सायास बोलतील, अशी माझी वार्धक्यातील विचित्र अवस्था पाहुन जग माझ्यावर थुंकेल, नातेवाइकांना माझ्या मृत्यूची काळजी  लागेल, या प्रमाणे सर्वानाच माझ कंटाळा येईल, शेजारच्या घरात झोपलेल्या कोलांनला माझ्या  खोकल्याने त्रास होवुन जागरण होईल, त्या वेळी ते म्हणतील की हा म्हातारा आणखी किती त्रास देईल कळत नाही. तरुण असतानाच अश म्हातारपणीची सुचना जो विचारदृष्टीने पाहतो ‍आणि त्या म्हातारपणाला मनापासुन विटतो, तो म्हणतो उद्या हे असे म्हातारपण येईल आणि आज असलेले तारुण्य बघता-बघता निघुन जाईल, मग आपले हित साधण्यास काय शिल्लक राहिल?  म्हणुन बहिरेपणा आला नाही, तोपर्यत तो अध्यात्माचे विचार ऐकुन घेतो आणि ‍शरीर साथ देते तोपर्यत तो तीर्थयात्रा करुन घेतो, दृष्टि आहे तोपर्यत विश्वातील सत्य, शिव, सुंदर पाहुन घेतो आणि वाचा बंद होण्यापुर्वी मंगलमय सुभाषिते पाठ करुन ठेवतो. वार्धक्यामध्ये आपले हात लुळे होतील हे जाणुन तो आत्ताच पवित्र हाताने सर्व दान-धर्म करुन घेतो. (ओवी ५७० ते ५८०)

         इंद्रियांची अशी दुर्दशा होईल आणि मनदेखील वेडेपिसे होईल म्हणुन तो शुध्द स्वरुप आत्मज्ञानाचा विचार करुन ठेवतो, उद्या आपणास चोर लुटुन नेतील हे जाणुन तो आपल्या संपत्तीची योग्य व्यवस्था करतो ‍अथवा दिवा मालवण्यापुर्वीच सर्व वस्तु व्यवस्थित झाकुन ठेवतो, त्याप्रमाणे उद्या वार्धक्य यावे आणि जीवनाचे खरे हित साधण्यावाचुन ते व्यर्थ जावे, त्यापेक्षा तो आजच तारुण्यामध्ये पारमार्थिेक हित साधुन घेतो, वाटेमध्ये डोगंराचे चढ-उतार आहेत हे जाणुन पक्षी आपल्या घरटयाकडे परत चालले आहेत, तेव्हा संध्याकाळ झाली आहे असे समजुन जो आपल्याजवळ काही ऐवज न घेताच जातो त्याला चोर कसे बरे लुटू शकतील? त्याप्रमाणे उद्या वार्धक्य येईल आणि आजचे तारुण्य व्यर्थ जाईल म्हणुन जो पारमार्थिक हित पाहत नाही त्याला प्रत्येकाला शंभर वर्षे आयुष्य नसते हे कळणार कसे?  ज्याप्रमाणे एकदा झाडलेली तिळांची बोंडे पुन्हा झाडली तर जसे तीळ सापडत नाहीत‍ अथवा अग्नी जरी असला तरी एकदा का त्याची राख झाली मग तो कोणत्याही पदार्थाला जाळील काय?  म्हणुन भविष्यकाळात पुढे वार्धक्य येणार आहे हे जाणुन तारुण्यामध्येच जो अध्यात्मज्ञान प्राप्त करुन घेतो, त्योच वार्धक्य कायमचे संपलेंले असते, त्याच्या ठिकाणी आतुनच ज्ञान प्रगट झालेले असते, तसेच पुढे नाना प्रकारचे रोग शरीराला ग्रासतील म्हणुन त्यापुर्वी तो आरोग्याचा उपयोग परमार्थ-प्राप्तीसाठी करुन घेतो, सापाच्या तोंडातुन पडलेला अन्नाचा गोळा शहाणा मनुष्य घराच्या बाहेर नेवुन टाकतो, देहाच्या स्नेहामुळै अनुकूल विषयांचा वियोग, दुख, विपत्ति आणि शोक प्राप्त होतात त्या स्नेहाचा त्याग करुन जो सुखा-समाधानाने उदास होवुन राहतो. (ओवी ५८० ते ५९०)

       ज्या ज्या इंद्रियांच्या द्वारे पापे प्रतेया करतील त्या त्या कर्म करणाऱ्या इंद्रियाच्या बिळांमध्ये निग्रहाचे धोंडे ठोकुन घट्ट बसवितो,  याप्रमाणे जो आचरण करत असतो तोच ज्ञानरुप संपत्तीचा स्वामी आहे, अर्जुना !  आता आणखीही एक अलौकिक लक्षण तुला सांगतो तरी तु त्याचे श्रवण कर, ज्याप्रमाणे एकादा प्रवासी मुक्कामाच्या  जागेविषयी आसक्त नसतो, त्याप्रमाणे तो स्वताच्या शरीराविषयी उदासीन असतो जसे वाटसरु प्रवास करताना झाडाच्या सावली खाली बसतो व काही वेळाने सावलीचा त्याग करुन पुढे निघुन जातो,त्याच्या मनात सावलीची आसक्ती नसते त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाच्या मनात घराविषयी आसक्ती नसते, देहाबरोबर सावली सदैव असते, परंतु ती सावली आपल्याबरोबर आहे हे लक्षात देखील रहात नाही, तशा प्रकारे स्त्रीविषयी त्याला आसक्ती नसते, आपली मुले-बाळे म्हणजे ज्याप्रमाणे वाटसरु धर्मशाळेत राहतात, किवां गुरे दोन प्रहरी झाडाखाली बसतात, त्याप्रमाणे तो मानतो. अर्जुना ! ज्याप्रमाणे एखादा वाटसरु वाटेंने जात असताना रस्त्यावरील एखाद्या गोष्टीविषयी केवळ साक्षीभुत असतो त्याप्रमाणे संपत्ती असुनही त्या संपत्तीविषयी तो उदासीन असतो फार काय सांगावे? पिजंऱ्यातील पोपट जसा बाळगणाऱ्या मालकाच्या आज्ञेत रहातो, त्याप्रमाणे तो वेदविधीप्रमाणे संसारात रहात असतो ऐऱ्हवी जो स्त्री-पुत्राविषयी कर्तव्य पार पाडतो परंतु त्यांच्यात आसक्त रहात नाही तो ज्ञानाची जननी आहे असे समज. (ओवी ५९० ते ६००)

          ग्रीष्म ऋुतूत आणि वर्षा ऋुतू मध्ये महासागर जसा सारखाच भरलेला असतो, त्याप्रमाणे इष्ट-अनिष्ट गोष्टीतही तो परिपुर्ण आनंदाने भरलेला असतो.ज्याप्रमाणे तिन्ही काळांत सुर्याचे तीन प्रकार होत नाहीत त्याप्रमाणे त्याच्या मनाला सुख-दुखापासुन भेद होत नाही, कोणत्याही ऋतुत ज्याप्रमाणे आकाशात जसा बदल होत नाही त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीत ज्याच्या चित्ताच्या समतेला कमीपणा येत नाही, अर्जुना, त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत ज्ञान आहे असे तु समज. आणि माझ्यावाचुन दुसरे चांगले जगात काही नाही असा ज्याच्या काया, वाचा, मन या तिघांनी निश्चय केला आहे , ज्याच्या शरीर, वाणी आणि मनाने अशा प्रकारे कृतनिश्चयाची शपथ वाहिली आहे की, या विश्वात माझ्यावाचुन दुसरे काही नाही आणि माझ्यावाचुन आणखी कशाची तो इच्छा करत नाही, किबंहुना ज्याचे अंतकरण माझ्याशी संलग्न झाले आहे, त्याने माझ्याशी पुर्ण ऐक्य केले आहे,  पतिव्रता स्त्रीच्या मनात पतीपुढे जाताना शरीरात -मनात संकोच नसतो, त्याप्रमाणे जो माझ्याशी अनन्य भावाने अनुसरला आहे, गंगेचे पाणी सागरास मिळून जसे त्यात मिसळतच असते, त्याप्रमाणे माझ्या स्वरुपी ऐक्य झाल्यानंतर तो सर्व भावाने माझे भजन करीत असतो, सुर्याच्या प्रभेचा सुर्याबरोबर उदय होतो व अस्ताबरोबर लय होतो, हे ऐक्य ज्याप्रमाणे प्रभेला शोभते, जलाच्या पृष्ठभागावरती जल हे कौतुकाने हालत असते, या हालचालीला लोक लौकिकदृष्टया लहरी असे म्हणतात, परंतु वस्तुत: हे जलच असते.   (ओवी ६०१ ते ६१०)

         याप्रमाणे जो माझ्याशी अनन्य आहे आणि माझ्याशी ऐक्य झालेला असुन माझे भजन करतो,तो पुरुष मुर्तिमंत ज्ञानच आहे. ज्याला राहण्यासाठी परमपवित्र तीर्थ, पावन नद्यांचे काठ , शुध्द तपोवने व गुहा आवडतात, पर्वताच्या कुशीतील विवरे व सरोवरांची परिसरे येथे जो प्रेमाने रहातो, परंतु जो गावामध्ये येत नाही, ज्याला एकांतवासाची आवड आहे आणि मनुष्यवस्तीमध्ये राहण्याचा कंटाळा असतो, तो मनुष्यरुपाने ज्ञानाची मुर्ती आहे असे जाणावे, हे उत्तम बुध्दीमान अर्जुना !  ज्ञानाचा निश्चय होण्याकरता पुन्हा आणखीन काही ज्ञानाची लक्षणे सांगतो. परमात्मा म्हणुन अशी जी एक वस्तु आहे की, ज्या ज्ञानामुळे ती अनुभवास येते, त्या एका ज्ञानावाचुन इह-परलोकी जी इतर स्वर्ग व संसार याविषयीची ज्ञाने आहेत, ती खरोखर अज्ञाने आहेत, असा जो मनाने निश्चय करतो, स्वर्गाला जाण्याची इच्छा तो सोडुन देतो, आणि सदभावनेने अध्यात्मज्ञानात रममाण होवुन जातो, ज्याप्रमाणे एखादा वाटसरु ज्या ठिकाणी अनेक वाटा फुटतात, त्यांचा  योग्य प्रकारे विचार करुन सर्व आडमार्ग सोडुन सरळ राजमार्गाने जातो, त्याप्रमाणे इतर ज्ञानमार्गाचा त्याग करुन तो आपल्या मनाला व बुध्दीला  आत्मज्ञानाकडे प्रवृत्त करतो. (ओवी ६११ ते ६२०)

पुढील भाग