अध्याय १३ भाग ६

           तो म्हणतो की आत्मज्ञान हेच खरे आहे व इतर ज्ञानामधुन मनाचे योग्य समाधान होत नाही,  अशा निश्चयाकरता मेरुपर्वतासमान त्याची बुध्दी अचल होते, याप्रमाणे ज्याच्या बुध्दीचा दृढ निश्चय अध्यात्मज्ञानाच्या द्वारात आकाशातील ध्रुवताऱ्याप्रमाणे स्थिर होवुन राहीलेला असतो, ‍त्याच्याच ठिकाणी ज्ञान वास करत असते, यामध्ये काहीही शंका नाही, आणि अशा प्रकारे त्याच्या मनात ज्ञान पुर्णपणे बिबंल्याबरोबर तो माझ्याशी ऐक्या पावतो, ते ज्ञान मनाच्या अध्यात्मनिष्ठेने होत असते, ते केवळ शब्दांचे होत नाही, ते मन  अध्यात्मनिष्ठ झाले असता अपरोक्ष ज्ञान प्राप्त होते. आणि आत्मज्ञानापासुन जे फळ प्राप्त होते ते ज्ञेय म्हणजे ब्रम्ह होय त्यावर तो आपली पुर्ण दृष्टी ठेवतो, एरवी ज्ञानाचा लाभ झाल्यानंतरही जर ज्ञेय म्हणजे ब्रम्हाचा अनुभव आला नाही, तर ज्ञानाचा लाभ होवुनही न झाल्याप्रमाणे आहे, आधंळयाने हाती दिवा घेतला तर त्याचा काया उपयोग आहे?  त्याप्रमाणे ज्ञानाचा नुसता निश्चय करुन ईश्वरदर्शन झाले नाही  तर ते व्यर्थ होय. जर परोक्ष ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याच्या ठिकाणी बुध्दीचा प्रवेश होत नसेल, तर ती बुध्दी आंधळी म्हणजे अज्ञानी होवुन रहाते, म्हणुन ज्ञान जेवढे दाखवील, तेवढे सर्व ज्ञेय वस्तुत असते, परंतु त्या समग्र ज्ञेय वस्तुला पाहील अशी बुध्दी शुध्द असावी लागते,  म्हणुन त्या निर्दोष ज्ञानाने जाणावयाची वस्तु दृष्टीस पडते, त्या प्रतिभायुक्त ज्ञानाने जो संपन्न झाला आहे. (ओवी ६२१ ते ६३०)

            अशा प्रकारे ज्याच्या ज्ञानाला सर्वत्र ज्ञेयाशिवाय दुसरे काही दृष्टीस पडत नाही, तो पुरूष ज्ञानी नसुन प्रत्यक्ष ज्ञानच आहे, असे शब्दांनी वर्णन करण्याचे कारण नाही, ज्याच्या बुध्दीमध्ये ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुध्दी ज्ञेयापर्यत पोचते, तो जणू हातात धरल्याप्रमाणे परतत्वस्वरुप ब्रम्हाला स्पर्श करतो. हे अर्जुना !  तो पुरूष ज्ञानरुप आहे असे म्हटले तर त्यात आश्चर्य  ते काय आहे? सुर्याला सुर्य म्हणावे लागते काय?  तेव्हा श्रोते म्हणाले, आता हा विस्तार पुरे झाला, त्या ज्ञानी पुरूषाचे महत्व अतिवर्णन करु नका, गीता-ग्रंथातील वचनाला हा विस्ताराचा प्रतिबंध का करता?  आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा पाहुणचार मोठा झाला आहे, कारण तू आत्मज्ञानाविषयी फारच विस्ताराने सांगितेले आहेस, कवी हे काव्यात मुख्य प्रतिपाद्य विषयापेक्षा केवळ रसच जादा प्रमाणात उपयोगात आणतात‍, पण अध्यात्मविषयातं श्रोत्यांना असे चालत नाही, ते श्रोते वक्याचे शत्रु होतात, यासाठी तु इतर कवीचां संकेत स्वीकारु नकोस, भोजन करण्यास पात्रावरं बसावयाचे वेळी जी बाई स्वयपांक घेवुन मागच्या दाराने पळुन जाते, तिच्या इतर आदर-सत्काराचा काय बरे उपयोग ?  सर्व गुणांमध्ये उत्तम असुनही धार काढण्यासाठी कासेला जर ती हात लावु देत नसेल, लाथा मारत असेल तर अशा उपयोग नसलेल्या अवगुणी गाईला कोण बरे सांभाळेल?  इतर कवी ज्ञानाविषयी न बोलता बाकीच्या गोष्टीचे हवे तेवढे वर्णन करतात परंतु त्या कवीचे असो , तु मात्र मुख्य त्या ज्ञानाविषयी सांगुन चांगले केलेस,  ज्या ब्रम्हज्ञानाच्या कणभर प्राप्तीसाठी सुध्दा साधक योगादी साधने अतिशय कष्टाने करतात ते ब्रम्हज्ञान तु उत्तम प्रकारे सांगितल्यामुळे समाधान प्राप्त झाले. (ओवी ६३१ ते ६४०)

       सात दिवस सातत्याने अमृताची झड लागली तर तिचा कंटाळा कोण करेल काय?  तसेच सुखाचे कोटयावधी दिवस जरी गेले तरी ते मोजीत बसुन त्याचा कंटाळा कोण करेल काय? पोर्णिमेच्या चंद्राप्रमाणे चांदण्यांच्या  एक युगभर रात्री जरी निघुन गेल्या तरी चको पक्षी चंद्राकडे पाहण्याचाकंटाळा करतील काय?  त्याप्रमाणे ब्रम्हज्ञानाचे  निरुपण रसाळ भाषेत श्रवण करीत असता आता पुरे झाले असे कोणी म्हणेल काय?  श्रीमंत पाहुणा घरी यावा आणि वाढणारी बाई उदार अंतकरणाची व भाग्यवान असावी, त्या पाहुण्यांना उत्तम पदार्थ खाण्याची आवड असावी, त्या वेळी ते उत्तम पदार्थ लवकर संपावेत, असे दोघांनाही वाटत नाही, त्याप्रमाणेच हा प्रसंग आहे आम्हाला ब्रम्हज्ञानाविषयी आवड आहे आणि तुलाही त्या ज्ञानाविषयी प्रेम आहे, म्हणुन तुझ्या ज्ञानाच्या निरुपणाला चौपट स्फुर्ती आली आहे. आम्हाला श्रवणाची इच्छा असल्यामूळे हा विस्तार नको म्हणवत नाही आणि तु तर ज्ञानाविषयी डोळस आहेस. तरी आता यापेक्षाही तु बुध्दीची  पुष्टता धारण कर आणि गीतेच्या श्लोकांतील पदांचे यर्थाथ निरुपण कर, याप्रमाणे संताचे अमृतधाराचे वाक्य ऐकल्याबरोबर निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले, महाराज माझेही अशाच प्रकारचे मनोरथ आहे, यावर तूम्ही स्वामीनी मला आज्ञा केलेली आहे, तर मी आता व्यर्थ बोलणे वाढु देणार नाही, याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला ही अठरा ज्ञान-लक्षणे सांगितली आहेत ती ऐका. (ओवी ६४१ ते ६५०)

        मग श्रीकृष्ण म्हणाले, ही ज्ञानलक्षणे ज्याच्या ठिकाणी दिसतात, त्याचे ठिकाणी ज्ञान असते, असे माझे मत असुन , ज्ञानीही असेच म्हणतात, तळहातावरती डोलत असलेला वाटोळा आवळा जसा प्रत्यक्ष पहावा, त्याप्रमाणे तुला डोळयांनी प्रत्यक्ष दिसेल, अनुभवास येईल असे ज्ञान दाखविले आहे , हे महान बुध्दीमान अर्जुना, आता अज्ञान ज्याला म्हणतात, तेही त्यांच्या लक्षणासंह स्पष्ट करुन सांगतो, अर्जुना, एरवी ज्ञानाचे स्वरुप स्पष्ट करुन झाल्यानंतर अज्ञान कसे असते, ते कळुन येतेच, कारण जे ज्ञान नसते, ते सहजपणे अज्ञान असते, असे पाहा की, दिवस संपल्यानंतर मग रात्रीची पाळी उरते, कारण रात्र व दिवस या दोहोवाचुन तिसरा प्रकारच नाही, जेथे ज्ञान नसते, तेथे अज्ञान असते,असे निश्चीत समज, तरीपण त्या अज्ञानपणाची काही लक्षणे सांगतो, जो केवळ प्रतिष्ठेपायी जगतो, लोक मान देतील म्हणुन वाट पहातो, लोकांनी केलेल्या सत कार्याने संतोष पावतो, पर्वताची शिखरे ज्याप्रमाणे खाली उतरत नाहीत, तसा जो गर्वाने मोठेपणावरुन खाली येत नाही, त्याच्या ठिकाणी पुरे अज्ञान आहे असे समज, पिंपळाची मुंज केल्यावर ती जशी  पिंपळाला उचं जागी बाधंतात, त्याप्रमाणे स्वधर्मरुपी मोळाची दोरी वाणीच्या पिंपळाला बांधतो, कुंचा वाटेल ‍त्याच्या उपयोगास येतो, त्याप्रमाणे लोकांत आपले कृतकर्माची प्रसिध्दी करतो. आपणास प्राप्त असलेल्या विद्येची जो प्रसिध्दी करतो, आपल्या हातुन जे सत कार्य घडलेले असेल त्याचा डांगोरा पिटतो, प्रत्येकांच्या मुखात आपली किर्ती असावी यासाठी सर्व काही करतो. (ओवी ६५१ ते ६६०)

        मन शुध्द न करता शरीरावर भस्म, गंध, टिळे लावतो मी मोठा भक्त आहे हे दाखवण्यासाठी देवपुजेचे नाटक करतो तो अज्ञानाची खाण आहे असे समज, ज्याप्रमाणे ज्याच्या आचरणातुन सर्व जगाला दुख होते, तो कौतुकाने जे जे बोलतो, ते तीक्ष्ण भाल्याप्रमाणे अधिक टोचत असते, किबंहुना तो अज्ञानाचा ठेवाच असतो आणि त्याचे आयुष्य म्हणजे हिंसेंचे घर असते जसा लोहाराकडील भाता फुंकल्याने फुगतो व त्यातील वारा सोडल्यावर तों रिकामा पडतो, त्याप्रमाणे इष्टानिष्टाच्या संयोगाने व वियोगाने जो च्ढलो व उपरुन जातेा वाऱ्च्या भोवऱ्‍यामध्ये धुळ सापडली असता ती जशी वर आकाशाकडे चढते, त्याप्रमाणे लोकांनी केलेल्या स्तुतीच्या वेळी जो हर्षाने चढुन जातो. थेबंभर पाण्याने ज्याप्रमाणे चिखल ओला होतो आणि वारा सुटल्यावर वाळतो, त्याप्रमाणे कोणी थोडी निंदा केली असता जो वाईट वाटुन कपाळ धरुन बसतो. त्याप्रमाणे ज्याला मान-अपमान दोन्ही सहन होत नाहीत त्याचे ठिकाणी पुर्ण अज्ञान आहे असे समज, ज्याच्या मनात वेगळयाच विचारांच्या गाठी असतात आणि मुखाने तो दुसरेच बोलुन दाखवितो एकाला वचन देतो व दुसऱ्याला मरत करतो, जसे पारधी जनावरास चारा घालतो परंतु त्या जनावरा घात करण्याचा पारध्याचा  हेतु असतो, त्याप्रमाणे तो एखाद्याचे पालन-पोषण करतो परंतु तरीही तो त्याचा घातच करतो.  (ओवी ६६१ ते ६७०)

        शेवाळयाने लिप्त झालेली शिळा हिरवीगार दिसत असते किवां लिंबोळया वरुन पिवळयाधमक दिसत असतात, त्याप्रमाणे ज्याची बाह्य क्रिया वरुन चांगली दिसत असते, त्याचे ठिकाणी अज्ञान आहे असे जाण, या बोलण्यात खोटे काही नाही हे अगदी सत्य समज, गुरूकुळाची ज्याला लाज वाटते, जो गुरूसेवेला कंटाळतो, गुरूपासून विद्या घेवुन गुरूविषयी उन्मत्तपणाने वागतो, अशा मनुष्याचे नाव घेणे म्हणजे अपवित्र माणसांच्या घरी अन्न सेवन केल्याप्रमाणे आहे,परंतु काय करावे?  अज्ञानाची लक्षणे सांगताना मुखाने त्यांचा उच्चार करावा लागतो. आता ज्या गुरुभक्ताचे नाव प्रखर सुर्याच्या तेजाप्रमाणे सर्व अधंकार नाहीसा करणारे आहे त्याचे नाव घेवुया आणि वाचेने घडलेल्या पापास प्रायश्चित देवुया. गुरूची निंदा करणाऱ्याचे नाव मुखाने घेण्यात जे पातक घडले, ते यापासुन दुर होईल या मर्यादेपर्यत गुरूभक्ताचे नाव अभक्ताच्या नावाच्या उच्चारापासुन प्राप्त होणारे भय नाहीसे करते, मग आणखी अज्ञानाची लक्षणे ऐक असे देव म्हणाले, जो शरीराने नित्यकर्म करण्याविषयी आळशी असतो ज्याचे मन अनेक विषयांनी भरलेले असते अरण्यातील मोडकळीस आलेला आड जसा असतो. या आडाच्या तोंडाशी काटेरी झाडे पसरलेली असतात आडात पाणी नसते आणि आतमध्ये जनावरे पडुन त्यांची हाडे पसरलेली असतात, त्याप्रमाणे तो अज्ञानी माणुस आतुन-बाहेरुन अशुध्द असतो,कुत्रा जसा अन्न खाताना हे झाकलेले आहे का उघडे आहे हे पाहत नाही, व मिळालेले  अन्न कुठेही खातो, त्याप्रमाणे तो ही संपत्ती दुसऱ्याची आहे की आपली आहे हे जाणत नाही व दुसऱ्याची संपत्ती खुशाल घेतो.   (ओवी ६७१ ते ६८०)

         ग्रामसिहांच्या ठिकाणी जसा स्त्री-संग करण्यासाठी योग्य अयोग्य स्थानाचा विचार नसतो, त्याप्रमाणे तो स्त्री-संगाविषयी कोणताच विचार करत नाही, नित्य-नैमत्तिक कर्माची वेळ चुकली अथवा ते कर्म करावयाचे राहुन गेले तरी त्याविषयी त्याला काही दुख वाटत नाही,  पापी कर्म करण्याविषयी जो निर्लज्ज असतो आणि पुण्य कर्म करण्याविषयी जो नि:संग व कोरा असतो, ज्याच्या मनातील संशयाची चक्रे वेगाने फिरत असतात, तो पुर्ण अज्ञानाचा पुतळा आहे असे जाणावे, ज्याच्या डोळयापुढे धन मिळावे एवढी एकच अपेक्षा असते, ज्याप्रमाणे गवताचे बीज मुंगीच्या पायानेही हलते, त्याप्रमाणे शुल्लक स्वार्थाकरीता तो केलेल्या निश्चयापासुन ढळतो. डबक्यात पाच घातल्याबरोबर ते पाणी गढुळ होते, त्याप्रमाणे भयाचे नाव काढताच तो घाबरुन जातो, पुरात पडलेला भोपळा जसा प्रवाहात वाहत जातो, त्याप्रमाणे ज्याचे मन मनोरथांच्या प्रवाहाबरोबर कुठेही वाहुन जाते, वाऱ्याच्या सहाय्याने धुर जसा उंच-उंच आकाशापर्यत जातो, त्याप्रमाणे दु:खाच्या वार्तेने ज्याचा जीव कासावीस होतो, वावटळ ज्याप्रमाणे कोठेही स्थिर होत नाही, त्याप्रमाणे जो एखाद्या क्षेत्रात किवां तीर्थस्थळात किवां नगरात कोठेही कायम राहत नाही, माजलेला सरडा जसा झाडाच्या बुडापासुन ते शेडयांपर्यत आणि शेंडयापासुन बुडापर्यत रिकाम्या खेपा करतो, त्याप्रमाणे त्याचे भटकणे निरर्थक स्वरुपाचे असते. (ओवी ६८१ ते ६९०)

         ज्याप्रमाणे रोवल्यावाचुन रांजण जसा स्थिर राहण्याचे जाणत नाही तसा तो झोपी गेला, पडला, तरच एके ठिकाणी राहतो नाहीतर जो सारखा हिडंत असतो, त्याचे ठिकाणी अज्ञान पुर्णपणे वास करत असते, त्याचा चंचलपणा नेहमी माकडाप्रमाणे चालु असतो आणि हे अर्जुना ! त्याच्या मनाला आत्मसंयमाचा वारादेखील नसतो, ज्याप्रमाणे एखाद्या ओहोळास लोंढा आला म्हणजे तो वाळुच्या बांधास जुमानत नाही त्याप्रमाणे जो निषिध्द प्रकारची कर्मे करतो, जो कुळातील आचार मानीत नाही, वेदांची आज्ञा दुर ठेवतो, जो योग्य कर्मे कोणते व अयोग्य कर्मे कोणते यातील निवड जाणत नाही, सोडलेला पोळ जसा पाहिजे तिकडे मोकाट फिरत असतो, वारा जसा इकडे-तिकडे वाहत असतो अथवा अरण्यात फुटलेला पाण्याचा पाट जसा स्वैरपणे वाहत असतो, आंधळा हत्ती माजला असता जसा वाटेल तिकडे पळत असतो. डोगरांत अग्नी प्रज्वलित झाला असता तो जसा वाटेल तितका चेतावतो, त्याप्रमाणे त्याचे चित्त विषयांच्या मागे धावत असते. उकिरडयांवर काय पडत नाही?  मोकळे जनावर कोणास सापडत नाही?  गावच्या वेशीचा उबंरठा कोण ओलांडीत नाही?(ओवी ६९१ ते ७००)

           ज्याप्रमाणे अन्नसत्रात तयार झालेले अन्न कोण खात नाही ?  अथवा सामान्य माणसाला अधिेकार प्राप्त झाला, तर तो काय बरे करणार नाही? वारांगनेच्या उंबरठयाच्या आत कोण बरे प्रवेश करणार नाही, त्याप्रमाणे  ज्यांचे अंतकरण कोणत्याही विषयांच्या मागे सतत धावत असते त्याचे ठिेकाणी अज्ञानाची संपुर्ण वाढ आहे असे जाणावे. जो जिवंतपणेच काय मृत्यूनंतरही विषयांची हाव सोडत नाही, ज्या योगाने स्वर्गातील विषयंभोग भोगता येतील त्या मार्गाचे आचरण जो या लोकी करत असतो, त्याचे सर्व प्रकारचे श्रम विषयभोगाच्या प्राप्तीसाठीच असतात, ज्याला सकाम कर्माशिवाय इतर कर्मे आवडत नाहीत, आणि विरक्त पुरूषाचे मुख पाहण्यात आले तर जणु विटाळ झाला, असे समजुन जो अंगावरील कापडासह स्नान करतो, एखादे वेळी विषय हे भोग घेणाऱ्यास कंटाळुन जातात परंतु विषयासक्त मनुष्य विषयांना कंटाळत नाही, जीवनाचा अर्थ समजुन घेण्याविषयी तो सावध होत नाही, कुष्ठरोगी ज्याप्रमाणे सडलेल्या हाताने खातो परंतु त्याला त्याची किळस वाटत नाही, गाढवीच्या पाठीमागे गाढव लागल्यावर गाढवी लाथा मारुन त्याचे नाक फोडते तरीपण ते गाढव मागे हटत नाही, त्याप्रमाणे जो जळत्या आगीत उडी घालतो परंतु आपले व्यसन हे आपले भुषण मानतो, मृगजळाच्या इच्छेने धावता-धावता जरी हरिणीचे ऊर फुटले, तरी त्याची हाव कमी होत नाही, तर अधिकच वाढते परंतु दुपारी माध्यानाला येणाऱ्या रोहीणी नक्षत्राच्या मुहुर्ताचा हा भ्रम आहे हे त्यास समजत नाही उलट तो विषयांवर अधिकच प्रेम करत असतो, बालपणात आई-बाबांच्या प्रेमाचे वेड असते परंतु तारुण्यात ते प्रेम संपते, आणि तो स्त्रीच्या मांसापिंडाने वेडापिसा होवुन जातो. (ओवी ७०१ ते ७१०)

       मग तारुण्यात स्त्रीचा उपभोग घेत असताना शरीरातील बल कमी होत जाते आणि वार्धक्य येते त्यावेळी तो आपले प्रेम नातंवडाकडे वळवितो. एखाद्या आंधळया मुलास जन्म दिला तर आई जशी त्याला जवळ बाळगते, त्याप्रमाणे हा वृध्द माणुस आपल्या मुलांबाळामध्येच जीव गुतंवतो, त्याचा त्यातच मृत्यू होतो, परंतु शेवटीही त्याचे विषयांचे प्रेम कमी होत नाही. त्याच्या ठिकाणी अज्ञानास पार नाही असे समज.  आता आणखी काही अज्ञानाची लक्षणे सांगतो ती ऐक. देह म्हणजेच आत्मा अशा मनोवृत्तीने जो कर्म करण्यास आरंभ करतो, आणि कमी अथवा जास्त जे काही कर्म करतो त्या कर्माच्या अभिमानाने कुंथू लागतो, क्षुद्र देवतेचे उपासक डोक्यावर ठेवलेल्या देव्हाऱ्याने घुमू लागतात, नाचू लागतात, त्याप्रमाणे तो अज्ञानी विद्येने व तारुण्याने माजतो आणि छाती ताठ करुन चालत असतो, तो म्हणतो, जगात मी काय तो एकच श्रीमंत माणुस आहे? माझ्याच घरी खुप संपत्ती आहे माझ्यासारखी आचरण करण्याची पध्दत कोणाजवळ आहे? माझ्या सारखा मोठा कोणीही नाही मी सर्वज्ञ असुन जगप्रसिध्द आहे, अशा खोटया गर्वाने संतुष्ट झालेला तो ताठ होवुन राहत  असतो, व्याधीने ग्रस्त झालेल्या माणसास खाण्या-पिण्याचे भोग दाखवु नयेत, कारण ते पाहुन त्यांची तळमळ होत असते त्याप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले पाहुन त्याला सहन होत नाही, दिवा वात तेवढी खातो तेल जाळुन टाकतो व जेथे ठेवावा तेथे काजळासारखे काळे डाग पाडतो. (ओवी ७११ ते ७२०)

        पाणी शिंपल्याने तो तडतड करतो वारा लागल्याने तो विझुन जातो एखाद्या ठिकाणी दिवा लागला तर तो सर्व अग्नीने भस्म करुन टाकतो थोडा प्रकाश करतो परंतु त्या प्रकाशापासुन सुध्दा उष्णता निर्माण करतो. त्या दिव्याप्रमाणे जो विद्वान असतो म्हणजे ज्याला ज्ञान कमीच असतो, परंतु त्या ज्ञानाचा अहंकार जास्त असतो, नवज्वर झालेल्या माणसाला औषध म्हणुन दुध दिले तरी त्याचा ताप वाढतो, अथवा सर्पाला दुध पिले तरी त्याचे विषच होते, त्याप्रमाणे उत्तम गुणाविषयी जो मत्सरी असतो,विद्ववत्तेचा ज्याला अतिशय अहंकार असतो , तपाने आणि विद्येने ज्याला अपार गर्व चढतो, अशा अज्ञानी माणसाला राज्यावर  बसविले तर तो गर्वाने फुलुन जातो, अजगराने खाबं गिळला तर तो पुर्वीपेक्षा अधिकच फुगतो, त्याप्रमाणे तो अहंकाराने नुसता फुगलेला असतो. जो लाटण्याप्रमाणे ताठ असुन लवत नाही, विषारी सर्प चावला असता ते विष मांत्रिकालाही उतरविता येत नाही, त्याप्रमाणे मोठा ज्ञानीदेखील त्याला ताळयावार आणू शकत नाही. फार काय वर्णन करावे?  त्याच्याजवळ अज्ञान हे वाढत्या प्रमाणात आहे हे तुला मी प्रतिज्ञेने सांगत आहे.  हे धंनजया , आणखी असे पाहा की जे आपले घरदार, संपत्ती, देह व संसारातील वर्तमानकाळातील जन्मदुखाचा विचार करत नाही, कृतघ्न माणसावर उपकार केला असता तो जसे सर्व विसरुन जातो, चोराच्या हातामध्ये व्यापारासाठी जर काही भांडवल दिले तर तो जसा सचोटी विसरतो, अथवा निर्लज्ज मनुष्याची स्तुती केली असता तो जसा सर्व विसरतो, ओढाळपणा करणाऱ्या कुत्र्याचे कान व शेपुट कापुन टाकले तरी रक्त ओले असतानाच ते निर्लज्जपणाने पुन्हा घरात येते. (ओवी ७२१ ते ७३०)

         सर्प बेडकाला गिळीत असतानाही बेडुक हा माशी खाण्याच्या इच्छेने जीभ बाहेर काढतो परंतु आपण सर्पाच्या तोंडात आपण सापडल्यामुळे मृत्यू होणार आहे याची त्याला काहीच आठवण नसते. त्याप्रमाणे मनुष्याचे कान, नाक, डोळे , गुदा, शिश्न आदी शरीराचे नऊही द्वारे पाझरत असतानाही त्याला आपली अशी स्थिती होण्याचे कारण काय आहे, हा विचार देखील त्याच्या मनाला शिवत नाही, कदाचित ही आपल्या जीवनाची अंतिम घटीका जवळ आल्याची सुचना तर नाही ना, अशी पुसटशी कल्पनाही तो करत नाही काय? आईच्या उदररुपी गुहेत वडीलांच्या वीर्यातुन, गर्भाच्या नाळेने गुरफुटुन नऊ महीन्यापर्यत उकडला जातो, ते मातेच्या गर्भातील दु:ख अथवा उदरातुन बाहेर निघताना झालेले दु:ख याविषयीचे काही स्मरण जो नीट आठवत नाही. मल, मुत्राच्या चिखलात लोळणारी मुले आपल्या मांडीवर आली आहेत हे पाहुन जो किळस करत नाही, कालच एक जन्म घेणे संपले आहे आणि उद्या पुन्हा जन्म येणार आहे, याचे ज्याला काहीच वाटत नाही, आणि त्याचप्रमाणे आयुष्याची भरभराट पाहुन जो उद्या मरण येईल याची काहीच काळजी करत नाही, जगण्यावर ज्याचा पुर्ण विश्वास असतो आणि एक दिवस हे जीवन संपणार आहे  हे ज्याच्या मनाला पटत नाही. अथवा थोडयाशा पाण्यात राहणारा मासा हे पाणी कधी आटणार नाही, या आशेने खोल डोहाकडे कधीच जात नाही, अथवा पारध्याच्या गाण्याला भुलून हरीण जसा पारध्याकडे पाहत नाही किवां मासा हा गळास लावलेल्या अमिषाच्या आतुन काटेरी गळ आहे, असे न समजता अमिष त्या गळासह गिळुन टाकतो. (ओवी ७३१ ते ७४०)

पुढील भाग