अध्याय १४ भाग ३

           कावीळ झाली असता, आपणास पांढरे पदार्थ पिवळे दिसतात, ते सुध्दा त्या डोळयांनाच कळते. अथवा सुर्य आपल्या प्रकाशाने  ज्या वेळी प्रकट होतो तेव्हा आकाशात आलेली अभ्रे दिसतात आणि अभ्रांनी ज्या वेळी सुर्य झाकला जातो, हे देखील सुर्यामुळे दिसते, आपल्या छायेला पिशाच्च समजुन एखादा मनुष्य भ्याला, तर त्या भिणाऱ्या माणसापेक्षा छाया भिन्न आहे काय? त्याप्रमाणे नाना प्रकारच्या देहाचे प्रकाशन करुन मीच नाना प्रकारचा होतो आणि त्या देहात जो बंध आहे तोही मीच पाहतो, मीच त्या बंधाचे प्रकाशन करत असतो, बंध असणे आणि बंध बांधला जाणे हे दोन्ही प्रकार  माझ्यामुळेच आहेत आपल्याच अज्ञानाने बंध निर्माण होतो आणि माझा मलाच जाणणे उत्पन्न होते तेव्हा बंध नाहीसा होतो. अर्जुना! कोणत्या गुणांनी मला कसा बंध आहे आणि माझा मी बंध आहे असे का वाटते ते आता श्रवण कर. गुण किती आहेत?  त्यांचे धर्म कोणते आहेत? त्यांची नामेरूपे कोणती? ते गुण कोणापासुन झाले आहेत? ते सर्व तु एकाग्रतेने श्रवण कर. तरी सत्व, रज, तम अशी या तीन गुणांची नावे आहेत आणि त्यांची जन्मभुमी प्रकृती आहे, हया तीन गुणांमध्ये सत्वगुण हा उत्तम आहे रजोगुण हा मध्यम आहे आणि तमोगुण हा कनिष्ठ आहे. ज्याप्रमाणे एका देहाच्या ठिकाणी बाल्य,तारुण्य आणि वार्धक्य अशा तीन अवस्था असतात, त्याप्रमाणे एकाच अंतकरणवृत्तीचे ठिकाणी तीन गुण आहेत असे अनुभवास येते. (ओवी १३१ ते १४०)

        सोन्यात जसजसे किडाळ मिसळावे तसतसे त्याचे वजन वाढते परंतु ते सोने पंधराच्या दरास कसाला कमी पडते आणि पाचाच्या किमतीचे होते. आळसामुळे जसा सावधपणा नाहीसा होतो‍आणि मग झोप दृढ होते, त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करुन अंतकरणवृत्ती सत्व,रज,तम या गुणांनी विखरुन जाते, त्या वेळेस ती सत्व, रज होवुन तम ही होते. अर्जुना ! सत्व ,रज,तम यानां गुण असे नाव आहे, हे जीवात्म्याला कसे बांधतात, त्याचे मर्म मी तुला अघडपणे सांगतो. हा शुध्द स्वरुप आत्मा जीवदशेत ज्या वेळी प्रवेश करतो, तेव्हा तो हा देह मीच आहे असे म्हणण्यास प्रांरभ करतो, जन्मल्यापासुन मृत्यूपर्यत देहाचे सर्व धर्म ते माझे आहेत, अशी ममत्वाची दोरी तो हातात घेतो न घेतो तोच ज्याप्रमाणे माशाच्या तोंडात गळास लावलेले अमिष पडल्याबरोबर ताबडतोब कोळी गळाला हिसका मारुन गळाची दोरी ओढतो. त्याप्रमाणे सत्वगुणरुपी पारध्याकडुन सुख-ज्ञानाचे पाय ओढले जातात मग हरीण जशी पारध्याच्या जाळयात अडकतो तसा तो सुख आणि ज्ञान यांच्या पाशात अडकतो. मग तो ज्ञानपाशात अडकल्यामुळे स्वताबद्दल फुशारक्या, बढेजाव मिरवतो आणि विद्ववत्तेची घमेंडीत वावरतो परंतु त्यामुळे तो आपले आत्मसुख हे व्यर्थच गमावुन बसतो, तेव्हा विद्या आणि प्रतिष्ठा यांच्यामुळे तो सुखावुन जातो अशा थोडयाशा सुखाच्या लाभाने हर्षीत होतो, आणि मी सुखी, समाधानी आहे अशा प्रकारच्या अभिमानाने स्वताकडे पाहुन आपलीच आत्मप्रशंसा करु लागतो. (ओवी१४१ ते १५०)

         या जगात माझ्यासारखा दुसरा कोणीही सुखी नाही हे माझे परमभाग्य आहे असे मानुन अष्टसात्विक भावाने फुलुन जातो, आणि एवढयानेच सपंत नाही त्याच्यामागे दुसरे एक बंधन लागते त्याच्या अंगी विद्ववत्तारुपी भुताचा संचार होतो, आपण स्वता ज्ञानस्वरूप आहोत याचे त्याला ज्ञान नसते त्याबदृल त्याला दुखही वाटत नाही तर उलट विषयज्ञानाच्या भरात तो आकाशाएवढा फुगून जातो. ज्याप्रमाणे एखादा राजा स्वप्नामध्ये भिकारी होतो आणि भिक्षा मागतो अशा वेळी त्याला दोन दाणे भिक्षा जरी मिळाली तरी तो स्वताला इंद्र समजतो, अर्जुना ! त्याप्रमाणे जीवात्म्याने देहाचा अभिमान धरल्यावर बाहय ज्ञानामुळे त्याची अशी अवस्था होते, तो कर्मशास्त्रात निपुण होतो, यज्ञविद्येत तो निष्णात बनतो, फार काय सांगावे, स्वर्गापर्यत त्याला सर्व काही समजते, आणि माझ्याशिवाय या जगात दुसरा कोणी ज्ञानी नाही व माझे चित्त हे चातुर्यरुपी चंद्राचे आकाश झाले आहे असे तो म्हणतो, याप्रमाणे सत्वगुण हा जीवाला सुखरुपी व ज्ञानरुपी दावे लावुन नंदीबैलासारखी त्याची स्थिती करतो, आता हाच आत्मा देहामध्ये ज्या प्रकाराने रजोगुणाने बांधला जातो तो मी सांगणार आहे तरी त्याचे श्रवण कर.  रजोगुणाला रज हे नाव हया साठी आहे की, जीवाला विषयांमध्ये रंजविण्याची कला जाणतो हा रजोगुण अभिलाषेच्या तारुण्याने सर्व काळ तरुण आहे. (ओवी १५१ ते १६०)

           हा रजोगुण अंतकरणात थोडासा जरी प्रविष्ठ झाला की लगेच तो कामाच्या नादी लागतो, मग तो विषयांच्या वाऱ्यावर स्वार होतो. अग्नीकुंडामध्ये अग्नीवर तुप घातले म्हणजे जसा वज्राग्नी भडकला जातो त त्याला लहान मोठी वस्तु याचे भान रहात नाही तो सर्वाचा नाश करुन टाकतो, त्याप्रमाणे विषयांची इच्छा ज्याप्रमाणे खवळते त्या वेळी विषयांत दुख असुनही विषयप्राप्तीच्या तीव्र इच्छेमुळे त्यातील दुख हे त्याला गोड वाटते की मेरु पर्वतदेखील त्याला प्राप्त झाला तरी त्याहीपेक्षा अधिेक मोठी वस्तु प्राप्त व्हावी यासाठी तो प्रयत्न करु लागतो. एका कवडीवरुन देखील आपले जीवन ओवाळुन टाकण्यास तो तयार असतो आणि तृणाइतकीदेखील वस्तु प्राप्त झाली तरी तो आपणास कृतकृत्य मानतो. आज आपणाजवळ असलेले धन खर्च केले तर उद्या काय करावे, अशा काळजीमुळे तो मोठमोठया उद्योगधंद्यास प्रारंभ करतो आणि म्हणतो की आपणास जर स्वर्गाची प्राप्ती झाली तर तेथे खावयास काय मिळणार, या करीता यज्ञ करण्यास धावतो, एका व्रतानंतर दुसरी व्रते करतो यज्ञ करतो, जगात किर्ती होण्याकरता विहीरी,धर्मशाळा,बागा बांधतो. आणि काम्य कर्मावाचुन दुसऱ्या कोणत्याही कर्मास स्पर्श करत नाही. हे अर्जुना ! जसा ग्रीष्म ऋतुच्या शेवटी वाहणारा वारा क्षणभर देखील विश्रांती घेण्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे हा रजोगुणी पुरुष व्यापार करीत असता दिवस आणि रात्र म्हणत नाही, त्या रजोगुणी माणसापुढे मासा तरी कसला चंचल? कामिनी स्त्रीचा कटाक्ष जितका चचंल इतका तो चचंल असतो अशा मनुष्यास काम करण्याची जितकी घाई असते, चाचंल्य असते तितके वीजेतसुध्दा नाही. (ओवी १६१ ते १७०)

          याप्रमाणे देहामध्ये असलेला आत्मा हा देहापेक्षा वेकळा असुन देखील तृष्णेची बेडी तो पायांत घालतो, व्यापारांच्या खटाटोपाचे लोढणे गळयात अडकवुन घेतो अशाप्रमाणे देहात राहणारा जो जीव त्याला रजोगुणांचे अतिशय बळकट भयंकर असे बधं असते आता तमोगुणांच्या बंधनाचे कौशल्य ऐक, ज्याच्या पडद्याने मनुष्याची व्यवहारातील दृष्टी मंद होते व जो तमोगुण मोहरुपी रात्रीतील काळा ढग आहे त्या तमोगुणाला केवळ अज्ञानाचे प्रेम आहे व त्या तमोगुणाच्या आधारे भ्रमिष्ट होवुन जीव वाटेल तसे कर्म करतो, अविचार हाच तमोगुणांचा महामंत्र आहे जो मुर्खपणारुपी अंमली पदार्थाचे भांडे आहे जीवाला भुल पाडणारे ते मोहनास्त्र आहे. अर्जुना ! या लक्षणास तमोगुण असे म्हणतात व जे या देहालाच आत्मा समजतात त्यांना हा चारी बाजुंनी जखडुन टाकतो, हा तमोगुण एकटाच चराचराच्या अंगी वाढु लागला म्हणजे त्या अवस्थेत दुसऱ्या कोणत्याही गुणाचा शिरकाव होत नाही. हा तमोगुण सर्व इंद्रियांना जडत्व आणतो, मनामध्ये मूर्खता आणतो आणि याच्या योगाने आळस वाढत जातो तमोगुणी मनुष्य सतत शरीराला आळे-पिळे देतो, कोणतेही काम करण्याविषयी त्याच्या मनात उत्साह नसतो, तो सातत्याने नुसत्या जांभया देत असतो. (ओवी १७१ ते १८०)

            अर्जुना ! अशा तामसी माणसाचे डोळे उघडे असुनही त्याला समोरील दिसत नाही, कोणीही हाक न मारताच तो ‘ओ’ म्हणून उठत असतो. जमिनीवर पडलेला धोंडा जसा या कुशीवरुन त्या कुशीवर वळण्याचे जाणत नाही त्याप्रमाणे हा तमोगुणी जीव एकदा मुरकुंडी मारुन झोपला की या कुशीवरुन त्या कुशीवर होत नाही. पृथ्वी पाताळात जावो किवां आकाश अंगावर येवुन पडो परंतु त्या भयाने तरी निजलेले उठावे अशी इच्छा त्या तामसी माणसाच्या मनात उत्पन्न होत नाही. आळसामध्ये सुस्त असताना योग्य काय आणि अयोग्य काय याची आठवण अंतकरणात राहत नाही. जेथे पडला असेल तेथेच लोळावे, अशी त्यांची बुध्दी असते, हा तमोगुणी तळहात वर करुन दोन्ही गालांवर दाबुन ठेवतो, व दोन्ही गुडघ्यामध्ये डोके खुपसुन ठेवतो, निद्रेविषयी त्याच्या मनात अतिशय आसक्ती असते झोप लागल्यावर त्यापुढे स्वर्गसुखही कमीच मानतो, ब्रम्हदेवांचे आयुष्य लाभावे आणि कल्पांतकापर्यत झोपुनच राहावे असे त्याला वाटते कारण झोपेवाचुन त्याला दुसरे व्यसनच नसते. वाटेने चालताना पाय घसरुन पडला असता तेथेच त्याचा डोळा लागतो, अशा स्थितीमध्ये त्याला कोणी अमृत जरी आणुन दिले तरी तो घेत नाही, जसा कोणी आंधळा मनुष्य अतिशय रागावुन गेल्यावर कोठे जाईल व कोठे पडेल याचा नेम नसतो, तसेच हा तमोगुणी कोणत्या वेळेला काय करील याचा काही नेम नाही, कोणत्या प्रसंगी कसे वागावे, कोणाबरोबर कसे बोलावे, हे त्याला कळत नाही तसेच कोणत्या कर्माने आपणास काय प्राप्त होईल व कशाने नुकसान होईल हेसुध्दा त्याला समजत नाही. (ओवी १८१ ते १९०)

         प्रज्वलित झालेला वणवा मी माझ्या पंखाने पुसून घ्यावा अशी प्रबळ इच्छा करुन पंतग जसा त्या वणव्यावर झडप घालतो, त्याप्रमाणे एखादे साहस करण्याकडे तो प्रवृत्त होतो धैर्याने अयोग्य व अशक्य काम करण्याचा तो प्रयत्न करतो, असले प्रमाद करणे त्याला आवडते, याप्रमाणे तमोगुण निद्रा, आळस, प्रमाद या तीन प्रकारांनी उपाधिरहित अशा जीवास बंधन होतो. ज्याप्रमाणे अग्नी लाकडामध्ये संचरला असता तो लाकडांच्या आकारासारखा दिसतो किवां घटाने पोकळीला व्यापले असता त्याला ‘घटाकाश’ हे नाव प्राप्त होते, अथवा पाण्याने सरोवर तुडूंब भरले असता त्यात चंद्राचे बिबं प्रतिबिबं होते त्यामुळे चंद्र सरोवरात बांधला गेल्यासारखा भासतो, त्याप्रमाणे आत्मा गुणपाशाने बध्द झाल्यावर गुणांच्या लक्षणासारखाच वागतो. कफ आणि वात यानां मागे सारुन पित्त ज्या वेळी देहामध्ये व्यापते, त्या वेळी ते देहाला संतप्त करते. उन्हाळा व पावसाळा निघुन गेल्यावर थंडी पडु लागली असता आकाशसुध्दा थंडगार असेच होते, अथवा जागृतावस्था आणि स्वप्नावस्था नाहीशी होवुन जेव्हा गाढ झोपेची अवस्था प्राप्त होते तेव्हा चित्तवृत्ती सुषुप्तीसारखीच मुढ होते. त्याप्रमाणे रजोगुण आणि तमोगुण यापेक्षा ज्या वेळी सत्व गुण अधिक वाढतो त्या वेळी ‘मी सुखी आहे’ असे तो या जीवास म्हणावयास लावतो त्याच प्रमाणे सत्वगुण व रजोगुण हे लोप होवुन ज्या वेळी तमोगुणाचे प्राबल्य वाढते त्यावेळी सहजपणे प्रमाद घडुन येतात.    (ओवी १९१ ते २००)

पुढील भाग