अध्याय १४ भाग ४

         त्याच रीतीने सत्वगुण व तमोगुण यांना पाठीमागे सारुन ज्या वेळी रजोगुण बळावतो तेव्हा देहाचा राजा जीवात्मा यास कर्मावाचुन दुसरे काहीही चांगले दिसत नाही, या तीन श्लोकांनी तीन गुणांचे निरुपण केले आता सत्वादी गुणांच्या वृध्दीचे लक्षण आदरपुर्वक श्रवण कर. रजोगुण व तमोगुण यांच्यावर विजय मिळवुन देहामध्ये ज्या वेळी सत्वगुण वाढतो, त्या वेळी जी लक्षणे होतात ती अशी असतात, वसंत ऋतुत ज्याप्रमाणे कमळाच्या पाकळयांमध्ये सुवास न मावता तो बाहेर पडतो त्याप्रमाणे ज्ञान हे अंतकरणात ओतप्रोत भरुन बाहेर निघते. सर्व इंद्रियांच्या अंगणी विवेक हा सेवा करत असतो आणि हातापायांना देखील विवेकाचे डोळे फुटतात, म्हणजे सहजपणे चांगले काय आणि वाईट काय हे कळु लागते.राजहंसासमोर दुधव पाणी याचे मिश्रण ठेवले असता तो आपल्या चोचीने दुध व पाणी वेगळे करतो, त्याप्रमाणे इंद्रियेंच चांगल्या व वाईट कर्माची पारख करतात, निग्रह हा इंद्रियांचा सेवक होतो आणि त्यांची सेवा करतो.जी ऐकण्यासारखी गोष्ट राही ती गोष्ट कान एकत नाही जी पाहण्यासारखी गोष्ट नाही ती गोष्ट डोळे पहात नाहीत आणि जे बोलणे वाईट आहे त्याला जीभच टाळत असते, दिव्यासमोर जसा काळोख पळायला लागतो त्याप्रमाणे इंद्रियांसमोर निषीध्द भोग येतच नाहीत.       (ओवी २०१ ते २१०)

          पर्जन्यकाळात नदी जशी पाण्याने उचंबळु लागते त्याप्रमाणे कोणत्याही शास्त्रात त्याची बुध्दी विकसित होवु लागते, अरे !  पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा शीतल प्रकाश आकाशामध्ये जसा पसरतो, त्याप्रमाणे त्याच्या वृत्तीत ज्ञानाचा प्रकाश पसरतो, त्याची वासना भगवंताच्या चरणी नतमस्तक होते. संसाराकडे मनाची असलेली धाव कमीहोत आणि मन विषयांना विटते. याप्रमाणे जेव्हा सत्वगुण वाढतो, तेव्हा ही लक्षणे स्पष्टपणे दिसतात आणि  या काळात जर मृत्यू घडला, अथवा दुष्काळाचे दिवस  संपल्यावर सुबत्ता आल्यावर मोठा सण यावा आणि अशा वेळी आपले स्वर्गातील पुर्वज पाहुणे यावेत अशी सहसा न घडणारी गोष्ट घडल्यास सर्वाना आनंदाचे भरते का येणार नाही? अर्जुना! अशा प्रकारे सदाचरण असले म्हणजे मग त्याला दुसरी तोड कोठुन असणार?  याप्रमाणे सत्वगुण वाढत असता  मृत्यू आला तर पुन्हा सत्वगुणी कुळात जन्मास आल्याशिवाय जीव दुसऱ्या कोणत्या कुळात जाणार? उत्तम प्रकारे आचरण करणारा भोग भोगण्याचे ठिकाण जे शरीर त्याचा त्याग करुन सत्वगुणाला बरोबर घेवुन जातो. अशा प्रकारे जो देह ठेवतो, तो केवळ सत्वगुणांचीच मुर्ती बनलेला असतो, तो आत्मज्ञानी कुळात जन्माला येतो, अर्जुना! असे सांग बरे राजा डोंगरात गेला तरी तो राजेपणाच्या ऐश्वर्याने कमी असतो काय?  (ओवी २११ ते २२०)

            अथवा अर्जुना! एका गावातील दिवा दुसऱ्या गावाला नेला तरी त्या दिव्याचा उजेड दोन्ही ठिकाणी सारखाच पडतो ना? याप्रमाणे सत्वगुणांची शुध्दी ज्ञानावर‍अधिकाअधिक वाढत जाते तेव्हा बुध्दी विवेक-विचारांवर तरंगु लागते. नंतर महदतत्वापासुन पृथ्वीतत्वापर्यत जी तत्वे आहेत त्यांचा विचार करुन शेवटी विचार करणारा त्या विचारांसह ब्रम्हस्वरुपामध्ये लीन होतो. तेराव्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे छत्तीस तत्वांच्या पलिकडील जे सदतिसावे तत्व सांख्यमताप्रमाणे जे चोवीस तत्वांपलिकडील जे पंचवीसावे तत्व आणि तिन्ही गुणाहुन निराळे असे जे चौथे ब्रम्ह असे जे सर्वामध्ये उत्तम ब्रम्हत्व यांचा ज्याला साक्षात्कार झाला आहे,  अशा ब्रम्हसाक्षात्कारी पुरुषाच्या कुळात त्याला सत्वगुणासह जन्म प्राप्त होतो. याप्रमाणे ज्या वेळी तमोगुण व सत्वगुण खाली तोंड करुन बसतात, म्हणजे कमी होतात त्या वेळी रजोगुण वाढतो, तेव्हा रजोगुण शरीररुपी गावात आपल्या कार्याचा धुमाकुळ माजवितो, त्या वेळी त्या शरीरात अशा लक्षणांचा उदय होतो, वावटळ सुटल्यावर ज्याप्रमाणे जमिनीवरच्या पदार्थानां एकत्र करुन ती वर उडवते, त्याप्रमाणे इंद्रिये  विषयांकडे मोकळी सुटतात, परस्त्री-गमनाचा प्रसंग पडला तरी ते शास्त्रांच्या विरुध्द आहे असे त्यास वाटत नाही, मग इंद्रियांना जणू शेळीचे तोंड करुन तो विषय स्वैरपणे चरत असतात, या मर्यादेपर्यत त्या रजोगुणी पुरुषाला विषयभोग भोगण्याकरता विषय मिळत असतात जे विषय मिळणे शक्य नसते तेवढेच नाईलाजाने भोगावयाचे शिल्लक रहातात.(ओवी २२१ ते २३०)

          अर्जुना! कोणताही धंदा समोर आला असता तो धंदा करण्याविषयी मनाचा कल तो मागे घेत नाही, ज्याप्रमाणे एखादे भले मोठे देऊळ बांधावे अथवा अश्वमेघ यज्ञ करावा, अशा अचाट छंदांच्या मागे तो लागतो, मोठी शहरे बसवावीत, मोठे- मोठे तलाव बांधावेत, नाना प्रकारच्या विशाल बागा अरण्यात निर्माण कराव्यात, त्याप्रमाणे तो अचाट कर्मे हाती घेतो आणि इह-परलोकीच्या प्राप्तीसाठी इच्छा कधीच करत नाही, समुद्रसुध्दा हार घेईल व अग्नालीही तीन कवडयांइतकी किमंत रहाणार नाही इतका रजोगुणी माणसाचा अभिलाष प्रबळ असतो, त्याच्या विषयांची इच्छा चंचल मनाच्याही पुढे-पुढे आशेची धाव घेत असते सारे विश्वही त्याला पुरेसे होत नाही. याप्रमाणे रजोगुण वाढला असता ही लक्षणे प्रखरपणे प्रगट होतात, आणि अशाच स्थितीत मृत्यू आला तर तो याच रजोगुणांनी युक्त होवुन मनुष्ययोनीत दुसऱ्या देहाने जन्म घेत असतो. एखादा भिकारी मनुष्य सर्व सुखांसह मोठया रुबाबदारपणाने जर राजवाडयात बसला तरी तो राजा होवु शकेल काय?  बैल जरी श्रीमंत वऱ्हाडाबरोबर गाडीला जुंपून लग्नाला घेवुन गेले तरी सारी वऱ्हाड मंडळी पक्वान्ने खातात परंतु बैलाच्या नशिबी मात्र धान्याचा कडबाच असतो. (ओवी २३१ ते २४०)

         म्हणुन व्यापारामुळे ज्यांना रात्रंदिवस थोडादेखील विसावा मिळत नाही, अशा प्रकारच्या लोकांच्या पंक्तीत तो जुपंला जातो, म्हणजे तशा कुळात जन्म प्राप्त होतो, साराशं एवढाच की, जो रजोगुण स्वभावाच्या डोहामध्ये बुडून मृत्यू पावतो तो काम्य कर्म करणाऱ्या कर्मठ कुळात जन्माला येतो, मग त्याचप्रमाणे पुढे रजोगुण व सत्वगुण नाहीसे करुन तमोगुण उन्नतीला येतो, म्हणजे वाढत जातो, त्या वेळी जी लक्षणे देहाच्या आत-बाहेर असतात, ती आता आम्ही तुला सांगत आहे तरी एकाग्रतेने श्रवण कर.अमावस्येच्या रात्रीचे आकाश जसे सुर्य-चंद्राशिवाय पुर्ण अंधकारमय असते, त्याप्रमाणे तमोगुणी मनुष्याचे मन विवेकहीन होते, तसेच त्याचे अंतकरण उत्साहशुन्य, प्रतिभाशुन्य आणि उदास होते, त्यावेळी धर्म व अधर्म या विचारांची भाषाच हरवुन जाते.बुध्दीही कठीणपणात दगडालासुध्दा मागे सारते, या मर्यादेपर्यत बुध्दीने विचारांची मृदुता टाकुन दिलेली असते, स्मरणशक्ती तर देशोधडीला गेलेली दिसते, त्याच्या शरीरावरती आंर्तबाहय अविचार हा सतत उभा असतो आणि तो तमोगुणी मनुष्य मृत्यू पावला तरी त्याच्याबरोबर त्याची पापक्रियाही जात असते, ज्याप्रमाणे घुबडास अंधाऱ्या रात्री स्पष्ट दिसते त्याप्रमाणे इतर लोकांपेक्षा पापकर्म करण्यास त्याचे चित्त फार उल्हासित असते.         (ओवी २४१ ते २५०)

        त्याप्रमाणेच शास्त्रनिषीध्द कर्मे करण्याची त्याला अतिशय हाव असते आणि त्याच्या इंद्रियांची धावही तिकडेच असते. हा मद्य न पिताच डुलत असतो, शुध्द हरवल्या वाचुन  बरळत असतो. आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय एखादयासाठी तो वेडा होतो, त्याचे चित्त ताळयावरती नसते पण ही काही समाधी नव्हे तो मोहाने भ्रमित झालेला असतो, अधिक काय सागांवे?  ज्या वेळी तम आपल्या स्वाभाविक गुणांसह वाढला जातो,‍तेव्हा जीव अशा लक्षणांचे पोषण करतो, आणि अशा वेळी मृत्यू आला तर तो तमोगुणांसहच देहरुपी घरटयामध्ये जन्म घेत असतो, मोहरी पेरल्यावर ज्या वेळी उगवते त्या वेळी जी फुले, फळे येतात, ती मोहरीशिवाय दुसरी कुठली फळे येणार आहेत काय? तद्ववतच दिव्याच्या स्वरुपात अग्नी विझला, तरी तो ज्या ठिकाणी प्रज्वलित करतील तेथे तो पुन्हा अग्नीच्याच रुपात दिसतो, म्हणुन आपल्या संकल्पात तमाचे गाठोडे बांधुन देहाला मृत्यू आला तर तो पुन्हा तामसयोनीत जन्म घेतो. आता याचा किती विस्तार करावा? असा तमोगुणी देह त्याच्या पापकर्मानुसार पशु, पक्षी, कृमी-किटक, झाडे,झुडपे अशा जन्मास येतो, याच कारणासाठी जे सत्वगुणापासुन उत्पन्न होते त्याला ‘सुकृत’ असे श्रुतीत म्हटले आहे. (ओवी २५१ ते २६०)

         म्हणुन सत्वगुणांला सहज येणारे अर्पुव असे सुख आणि ज्ञानफल याला ‘सात्विक फल’ म्हणतात.आता रजोगुणापासुन ज्या क्रिया निर्माण होतात, त्या कडू इंद्रावणीप्रमाणे दिसावयास सुरेख परंतु अंतर्यामी दुख निर्माण करणाऱ्या असतात, निंबोळया फळ वरुन गोड दिसते परंतु आत कडु विष असते, त्याप्रमाणे काम्य कर्मे, उद्योगधंदे या राजस क्रिया दिसावयाला चांगल्या असतात पण परीनामी दुखरुपी फळ देतात. ज्याप्रमाणे विषाच्या अंकुराला विषाचीच फळे येतात, त्याप्रमाणे जेवढे तामस कर्म आहे तेवढे अज्ञानरुपी फळाने फलित होते, म्हणुन अर्जुना , ज्याप्रमाणे दिवसाला सुर्य कारण आहे, त्याप्रमाणे ज्ञानास सत्वगुण कारण आहे, स्वताच्या मुळ स्वरुपाचे विस्मरण हे जसे द्वैताला कारण आहे ‍त्याप्रमाणे लोभास रजोगुण कारण आहे, हे प्रज्ञावंत अर्जुना ! मोह, अज्ञान, प्रमाद या दोषसमुहाला तमोगुण कारण आहे, ज्याप्रमाणे एखाद्या माणसाला तळहातावर घेवुन आवळा दाखवावा, त्याप्रमाणे विचांराच्या डोळयाला स्पष्ट दिसतील असे सात्विक, राजस व तामस या गुणांची लक्षणे व फळे वेगवेगळी दाखविली आहेत. सत्वगुणांवाचुन दुसरा कोणताही गुण ज्ञानाकडे आणत नाही, रजोगुण आणि तमोगुण हे दोन्ही मनुष्याचे पतन घडवुन आणतात. ज्याप्रमाणे आर्त, जिज्ञासु व अर्थार्थी या तीन भक्तीचा त्याग करुन ज्ञानी भक्त ज्ञानरुप भक्तीचे भजन आजन्म आचरण करतात, आणि संपुर्ण जीवनभर सात्विक वृत्ती धारण करतात. (ओवी २६१ ते २७०)

         अशा प्रकारे जे सात्विक गुणांचे सदैव आचरण करतात, ते देहत्यागानंतर स्वर्गाचे राजे होतात. त्याचप्रमाणे जे रजोगुणांचे आचरण करीत मृत्यू पावतात ते मृत्यूलोकांत मनुष्य होतात. ज्या मृत्यूलोकांत जन्म-मरणाच्यां वाटेत पडल्यावर मुक्त होण्याची शक्यता नसते अशा मृत्यूलोकांत देहरुपाच्या ताटात सुख-दुखाची खिचडयात खितपावे लागते. तसेच जे सदैव तमोगुणांचे आचरण करतात ते देह पडल्यावर एकप्रकारे नरकात जाण्याची सनद मिळवतात. हे अर्जुना ! आत्मवस्तुच्या अधिष्ठानरुपी सत्तेने तिन्ही गुणांना ऊर्ध्व, मध्य, अधोगतीची कारणे सकारण स्पष्ट करुन तुला सांगितली. आत्मवस्तु सदैव आत्मरुपाने जरी निर्विकार असते परंतु ती गुणांच्या उपाधीने गुणलक्षणा प्रमाणे कार्य करत असते, राजा ज्या वेळी आपणावर परचक्र आले असे स्वप्नात पाहतो त्या वेळी आपला जय आणि पराजय तो स्वता आपणच असतो, त्याप्रमाणे स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे गुणांच्या वृत्तीने भेद आहते ती गुणदृष्टी दुर करुन पाहीले असता ब्रम्हवस्तु शुध्द आहे तशीच आहे. पण हे बोलणे आता राहु दे मात्र तु एवढे लक्षात ठेव की, मी तुला विषयाला सोडुन दुसरे काही बोलत नाही, मागील विषय पुढे सांगतो तो श्रवण कर, तरी हे जाण की तीनही गुण स्वताच्या सामर्थ्याने सहजपणे देहादिकांच्या आकाराने परिणामाला प्राप्त होतात. (ओवी २७१ ते २८०)

पुढील भाग